Narmada Parikrama - Narmada Parikrama Source: https://www.kardaliwan.com/narmada
|

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – लेखिका: स्मिता कढे Narmada Parikrama

ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात!

मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada

स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama

नर्मदे हर!

[मागच्या भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या तीरावरील प्रकाशा गावातील बलबला कुंडावर गेलो. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश झाल्यावर प्रसिद्ध शूलपाणीच्या जंगलाला वळसा घालून राज पीपला गावात मुक्कामाला पोहोचलो. आता पुढे …..]

भाग २रा सुरू:

नंतर आम्ही हसोटी मार्गे कटपोर या सागरकिनाऱ्यावरील ठिकाणी जाण्यास निघालो. आम्हाला दोन दिवसाचे कपडे व सागर पूजनाचे साहित्य बरोबर घ्यायचे होते आणि पादत्राणे मात्र बसमध्येच ठेवायची होती. बस नदीच्या पुलावरून पलिकडे जाणार होती. आणि आम्ही जवळच्याच धर्मशाळेत उतरणार होतो. ज्यांना परिक्रमा (Narmada Parikrama) करायची असेल त्यांना पुलावरुन जाता येत नाही, कारण नदी ओलांडली जाते. आणि दुसरे म्हणजे परिक्रमवासियांनी सागर प्रवास करुन रेवा सागराला वळसा घालून पल्याड तीरावर जायचे असते. परिक्रमेतील हा सर्वात अवघड भाग होता. ज्यांना चिखलातून एक दिड मैल चालता येईल त्यांनी थांबावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी बसने जावे असे सांगण्यात आले. मी सुद्धा दहा वेळा विचार केला. बस सोडण्यापूर्वी घरी फोन करुन ह्यांच्याशी बोलले, मगच सागरी मार्ग निवडला.

आम्ही धर्मशाळेत पोहचलो. मिणमिणता प्रकाश देणारे लाईट होते. त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. आम्हा बायकांना वॉशरुमला जायचे होते. एका साधूने अथवा पायी प्रदक्षिणा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या कमंडलूतून हौदाचे पाणी आणून देण्याची सेवा केली. असे म्हणतात की, परिक्रमावासियांना नर्मदामैया दर्शन देते. मात्र कोणत्याही स्वरुपात देते, ते रुप ओळखण्याची नजर असावी लागते व ती मैयेवरील श्रद्धेतून येतेच. मला तर उज्जैनीला उतरल्यापासून वेगवेगळ्या रुपात तिचे दर्शन होत होते. धर्मशाळेत आम्ही रात्री बाराला पोहचलो होतो. खूप गर्दी असूनही सर्वांची पाठ टेकण्याची सोय झाली. पण पहाटे दोनलाच उठून आम्ही किनाऱ्यावर गेलो. थंड हवा, चमचमणारे थोडेसे तारे, लूकलूकणारा बॅटरीचा उजेड, आणि खाली टोचणारे लहानमोठे दगड अशा अवस्थेत आम्ही तीन साडेतीन तास बसलो होतो. भरती आल्यावरच नावा सोडतात.

Namrada Parikrama Photos 2

सकाळी सकाळी सहा वाजता आम्ही नावेत बसलो. कोठेही लाईट नाही. नावेत टॉर्च, मोबाईल चालू करायचे नाहीत असे सांगितले. पूर्ण उजाडल्यावर आम्ही सर्वांनी फोटो काढले. नर्मदा जिथे सागराला मिळते त्या रेवासागराला वळसा घालून अरबी समुद्रातून सकाळी साडेनऊला आम्ही मिठीतलाई गावाजवळ नावेतून उतरलो. आता खरी परिक्षा होती, उतरण्याच्या वेळी ओहटी होती. त्यामुळे नाव किनाऱ्यापासून एक ते दिड मैल आतच थांबली. व आम्हाला गुढग्याएवढ्या पाणी व चिखलातच उतरावे लागले. पाण्यातून चालताना भिती वाटली, तसेच मजाही वाटत होती. थोडेसे चालल्यावर लटपटत्या पायाने दगा दिला आणि समुद्राने मला प्रेमाने मिठी मारली. तो म्हणाला, “नदीत तर नेहमीच अंघोळ करता जरा माझ्यातही बुडी मार ना”. स्वतःचा जोर व थोडी दुसऱ्याची मदत घेऊन उठले. आधाराने पाण्याबाहेर पडले. पण पुढेतर आणखीच मोठी अडचण ‘आ’ वासून ऊभी! नुसता चिखलच चिखल आणि तो सुद्धा निसरडा, एक एक पाऊल टाकणे कठीण होते. तेथील लोक सांगत होते, एक पाऊल टाकून घट्ट रोवा, मगच दुसरे पाऊल उचला! पण थोड्या कमी वयाच्या व वजनाचे परिक्रमावासी हे करु शकत होते. इथेही एका माणसाच्या रुपाने नर्मदा मैया मदतीला धावली. एक माणूस ‘माँजी, माँजी’ करत पुढे आला, माझ्या हाताला धरुन त्याने मला शेवटपर्यंत, म्हणजे कोरड्या वाळूत आणून सोडले! मी त्याला नमस्कार केला. तर त्याच्या डोळ्यात पाणीच आले. त्यानेच मला वाकून नमस्कार केला. नर्मदेचे हे दुसरे रुप मी पाहिले.

या ठिकाणाला हरीधाम म्हणतात. तेथे चहा नाष्टा करुन आम्ही नारेश्वरला घाटावर अंघोळीला गेलो. माझे बरेच कपडे चिखलाने माखले होते ते सर्व मी नदीवर धुतले. अंघोळ केली. भर दुपारची वेळ असल्यामुळे ओले ओझे घेऊन घाट चढताना मला बराच त्रास झाला. पायऱ्या बऱ्याच उंच होत्या. आणि धर्मशाळाही लांब होती. एका मुलीला मी कपडे वर आणून देण्यास सांगितले. इथे माझी पुरी दमछाक झाली. मी आवारातील एका झाडाखालील बाकावर बसूनच राहिले, जेवायला जाण्याचेही मला त्राण नव्हते. तेंव्हा केदारने पाणी व खऱ्यांनी, ‘थोडे तरी खा’ म्हणून थोडा भात दोन पोळ्या वगैरे भरेलेले ताट तेथेच आणून दिले. हे उपकार कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर आम्ही गाडीने गरुडेश्वरला निघालो. आमच्यातील एक प्रवासी सौ. स्वप्ना केळकर यांनी मात्र गाडीनेच मिठीतलाई गाठली होती.

ह्यावेळेस आम्ही नर्मदेच्या उत्तर तटावर होतो.

नंतर आम्ही गरुडेश्वराला निघालो. येथे श्री वासूदेवानंद सरस्वती यांचे समाधी मंदिर आहे. भोळ्या शिवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी गरुडाने येथे तपश्चर्या केली. म्हणून या स्थानाला गरुडेश्वर म्हणतात. घाटावर गरुड व शिवलिंग यांचे छोटेसे मंदिर आहे. पण घाटावरुन मंदिराला जाण्यासाठी १५० पायऱ्या आहेत. तेथून जवळच टेंबेस्वामींचा मठ आहे तेथेही दर्शन घेतले. नंतर आम्ही मांडूकडे रवाना झालो.

वाटेत पाहिले की, दोन उंच मध्यावर सरदार सरोवर हे धरण बांधण्यात आले आहे. या परिसरात नर्मदेला पाच सहा नद्या येऊन मिळतात. तेथील जवळजवळ असलेल्या दोन टेकड्यांवर सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. आताशी दोन्ही टेकड्यांवर एक एक पाय उभारुन झाला होता. मांडूला जैन धर्मशाळेत मुक्काम केला. येथे श्रीराम मंदिर असून ते ११०० वर्षांचे जुने आहे. त्याची स्थापना इ. स. ९०१ मध्ये झाली. येथील मुर्ती चतुर्भूज आहे.

Chaturbhuj-ram-mandir-mandu
Chaturbhuj-ram-mandir-mandu. Source: Dr Ramdas Shree Mahajan – https://www.tripadvisor.in/

नंतर राणी रुपमतीचा महाल पाहिला. तिची नर्मदेवर खूपच श्रद्धा होती. म्हणून बाजबहाद्दर व रुपमतीने तेथे रेवाकुंड बांधले. राणीचा जहाज महाल पाहिला. या महालाच्या चारही बाजूला तलाव आहेत पावसाळ्यात हे तलाव पाण्याने भरतात त्यामुळे हा महाल जहाजा सारखा दिसतो. दररोज सकाळी व रात्री सोबत घेतलेल्या नर्मदा जलाची आरती आम्ही करत होतो. पुष्कळ वेळा माझी जलाची बाटली विसरली गेली, तेंव्हा अर्चनाने ती जबाबदारी घेऊन स्वतःच्या बाटलीबरोबर माझी ही बाटली घेत असे. तसेच माझ्याजवळ पूजा साहित्यही नव्हते. मी फक्त नर्मदेसाठी तीन साड्या व कुमारीकांसाठी गळ्यात कानात असे घेतले होते. पण मला अर्चनाने वेळोवेळी मदत केली. माझ्या बाटलीला छोटेसे लोकरीचे आसनही दिले, जे मी अजून जपून ठेवले आहे. माझी सख्खी मुलगी ना ती!

नंतर आम्ही महेश्वरला रवाना झालो. हॉटेलवर जाण्यापूर्वी होळकर वाडा व तेथील प्रसिद्ध घाट पाहिला. घाटावर अहिल्याबाईंचा ब्रांझमधीला पूर्ण उभा पुतळा आहे. सर्व संकटांवर मात करत राज्य धुरा सांभाळून लोककल्याणाची अनेक कामे त्यांनी केली. दिल्ली ते रामेश्वर हा क्रमांक एकचा रस्ता त्यांनी बांधला. ठिकठिकाणी घाट व धर्मशाळा व पाणपोई उभ्या केल्या. हातमाग व्यवसाय तेजीस आणला. येथील महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. तसेच इंदुरी साड्याही प्रसिद्ध आहेत. अशा कणखर व्यक्तीमत्वाला व सात्विकतेला माझा दंडवत!

Ahilyabai_Holkar_Statue_in_Maheshwar
Ahilyabai_Holkar_Statue_in_Maheshwar_(3) By Pooja Caravan – Own work, CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=80899842

नंतर आम्ही नर्मदामैयाचे नाभीस्थान असलेल्या नेमावर येथे गेलो. वाटेत मंडलेश्वर येथे नर्मदा स्नान केले. नदीत पाण्याखाली असलेले शिवलिंग पाहिले. पिंडीसमोर नंदी व पिंडीमागे पार्वती असे हे शिवलिंग होते. नेमावर हे नर्मदेच्या मध्यावर आहे म्हणून नाभीस्थान म्हणतात. येथे घाटावर पांडवांनी उभारलेले शिवमंदिर पाहिले. मंदिराची बांधणी व शिल्पकला पाहून लोक खरंच भान विसरतात. घाटावर स्नान करतेवेळी एक गंमतच झाली. रुमवरुन कपडे घेताना मी परकरच विसरले. मग गाऊनवरच साडी नेसली. फारसे कोणाला जाणवले नाही. लहानपणी फ्रॉकवर साडी नेसण्याची युक्ती येथे कामी आली. जेवणे झाल्यावर जबलपूरकडे निघालो.

वाटेत बरमन (ब्राम्हण) घाट लागला. रात्र झाल्यामुळे फक्त वरुनच घाट पाहिला. येथे प्रवाहात मध्यभागी एक भूखंड आहे, त्यावर भीमकुंड, अर्जूनकुंड अशी सात कुंडे आहेत. जैन धर्मशाळेत मुक्कम केला. भेटाघाटावर जाण्यापूर्वी एक धबधबा (धुआंधार धबधबा) पहाण्यासाठी गेलो. घाटापासून खूपच मागे गाडी उभी राहिली. मधला सगळा बाजार ओलांडून घाटावर जावे लागले. मी निम्माच घाट उतरले. परत वर चढणे व गाडीपर्यंत चालत जाणे जमणार नाही. म्हणून मध्येच एका झाडाशी बसले. जवळच पेरुवाली होती. पेरु घेतले. अजून खाली उतरुन गेल्यास नर्मदामैया कड्यावरुन कोसळताना दिसते. तेथपर्यंत विजेरु पाळण्यानेही (Ropeway /Cable Car) जाता येते. पण तसे करताना नदी ओलांडली जाते म्हणून परिक्रमावासी जात नाहीत. मी बसलेली असतानाच श्री. खरे खालून वर आले, व म्हणाले, “ज्यांनी पावसाळ्यात कोकण पाहिले आहे त्यांना या धबधब्याची काय महती”. असो. पण नंतर कळले. जेथे पाणी कोसळते. तेथेच खाली पांढऱ्या संगमरवरी खडकाचे शिवलिंग आहे व त्यावर मैया अभिषेक करते आणि त्याचे तुषार चौफेर उडत असतात.

Dhuandhar_Waterfall_on_the_River_Narmada_20170424203308
धुआंधार धबधबा, Dhuandhar_Waterfall_on_the_River_Narmada_20170424203308 Source: https://www.holidify.com/places/jabalpur/dhuandhar-falls-sightseeing-2118.html

वर आलेले लोक बाजारात संगमरवरी वस्तू खरेदी करत होत्या. जास्त ओझे नको म्हणून मी खरेदी टाळली. आधीच माझे सामान सतत कोणी ना कोणी उचलत होते. त्यात भर नको. हळूहळू मीही वर बाजाराच्या दिशेने चालू लागले. पण रस्त्यात ग्रुपमधले कोणी दिसेनात. अंधारही पडू लागला होता. एका दुकानात मी दमून बसले व मँगो पित होते तेवढ्यात मला श्री. केळकर दिसले. त्यांना हाक मारुन दहा मिनीटात येते असे सांगितले. पण गाडीत गेल्यावर कळले कि पुष्कळ बायका अजून दुकानातच आहेत.

जशी ही ट्रीप ठरली तेंव्हापासून मी परिक्रमेने पछाडले होतेच. जरी गाडीतून कोठेही उतरले नाही तरी गरूडेश्वर व भेटाघाटाला नक्की उतरणार असे मनाशी ठरविले होते. आजपर्यंत सिनेमा, छायाचित्रे व चित्रकलेतून भेटाघाटाचे सुंदर, मनोहारी चमचमणारे चित्र मनावर कोरले गेले होतेच. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर मात्र तसे वाटले नाही. नदी पार न करता नौका विहार करण्याचे ठरले. ट्रिपमधील माझ्या सख्ख्या व सावत्र मुलींनी (ही नावे त्यांनीच ठेवलेली, मात्र वागणूक अशी नव्हती) माझी जबाबदारी घेतली. पायऱ्या उतरवून मला नौकेत बसविले. नाव सुरु झाली आणि नजरेसमोर असलेले घाटाचे स्वरूप पालटू लागले. त्यातच गाईडनेही त्याची रसाळ कॉमेंट्री सुरु केली. हास्याच्या उकळ्या फुटू लागल्या. समोर किळेकभिन्न संगमरवरी दगड तर विरुद्ध बाजूला पांढऱ्या संगमरवराचे खडक पहाताना खूप आनंद व आश्चर्य वाटत होते. प्रवाहात मध्यभागी पांढराशुभ्र संगमरवर आहे. त्याचा आकार शिवाच्या पिंडीसारखा आहे.

पहाता पहाता रात्र झाली. नदी अंधारात बुडाली. आकाशात चंद्र उगवला. वल्ह्याचा चुबुक चुबुक आवाज येत होता. आणि एकदम घाटीकडे लक्ष गेले. कोणी दाक्षिणात्य, त्यांचे ते चक्राकार वातींची रचना असलेले पात्र हाती घेऊन नर्मदेची आरती करत होता. त्याचे सुंदर प्रतिबिंब नर्मदेत पडले होते. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ही दृष्य पहात होते.

आम्ही नावेतून घाटावर उतरलो. क्षणार्धात मला ग्रुपमधील कोणीच दिसेना. घाटावर अंधार पडला होता. वर जाण्याच्या मार्गावर दिवे होते. त्या उजेडात मी बसून राहिले. कोणाचे तरी लक्ष गेले, …अरे, आजी तिकडे कोठे गेल्या. असे म्हणाले. अर्चनाचे लक्ष गेले. ती माझ्याजवळ आली. म्हणाली, “ममा, ईथेच बस, आरती झाल्यावर येथूनच पुढे जायचे आहे”. माझी मैयाजलाची बाटली आरतीसाठी तिने बरोबर घेतली होती. हळूहळू लोक वरती चढू लागले. मीही एका बंद दुकानाच्या फळीचा आधार घेत वर चढू लागले. पाय जाम सुजले होते. तेवढ्यात एक सुस्थितीतील तरुण माणूस खाली आला व माझ्या हाताला धरुन त्याने मला वर नेले. वर गेल्यावर कळले, तो शेवटच्या दुकानाचा मालक आहे. नोकरवर्ग दुकानात होता. आणि हा अडलेल्यांना आधार देत होता.

जय नर्मदे हर! ती मला अशीच वेगवेगळ्या रुपात भेटली.

भाग २ समाप्त क्रमश:

भाग १ वाचा

सूचना: सदर लेखात वापरलेली छायाचित्रे हि केवळ स्थानिक माहात्म्य वाचकांना कळावे, त्याचा अनुभव घेता यावा, म्हणून टाकली आहेत. ती छायाचित्रे परिक्रमे दरम्यानची नाहीत. मात्र क्षणचित्रात वापरलेली छायाचित्रे हि लेखिकेची स्वतःची परिक्रमे दरम्यानची आहेत.


Smita Shrihgari Kadhe

लेखिकेचा परिचय

नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: 2, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006


Copyright Proof: Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.


काही क्षणचित्रे


आमचे इतर लेख वाचा:

  1. मुंबई – पुणे पदयात्रा: भाग १
  2. मुंबई – पुणे पदयात्रा: भाग २
  3. मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ३
  4. मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ४
  5. मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ५

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
http://www.charudattasawant.com on 28/12/2021')" onmouseover="this.style.color='#A35353';" onmouseout="this.style.color='#636363';">Acknowledgements: Written by: Smita Kadhe, Thane, Mobil more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply