मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ३
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग ३
प्रवासाचा तिसरा दिवस
दिनांक: १८ मे १९८१
सकाळी लवकर उठून आम्ही चौक गाव सोडले. रात्री ज्या शिवसैनिकाच्या घरी आम्ही राहिलो होतो. त्यांच्या छोट्या घरात आमची चांगली सोय केली होती. नवीन गोधड्या, चादरी टाकून आमची झोपण्याची व्यवस्था अंगणात केली होती. सकाळी आम्हाला लवकर उठवले. अंघोळीला गरम पाणी दिले. चहा आणि फराळ करून आम्ही लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. निघताना त्या शिवसैनिकाने माझ्या हातात एक चिठ्ठी आणि एक पत्ता दिला व म्हणाला, “तुम्ही साधारण संध्याकाळ पर्यंत लोणावळ्याला पोचाल. तेथून जवळच ह्याच रस्त्यावर वलवण गाव आहे, तिथे आमचा एक नातेवाईक आणि शिवसैनिक राहतो, त्याच्याकडे रात्री थांबा. हि चिठ्ठी त्याला दाखवा, म्हणजे तुम्हाला ते मदत करतील”. रस्त्याने जाताना उगीचच कोठे थांबू नका अन सावधगिरी बाळगा अशी आम्हाला सूचना दिली. आम्ही हो हो म्हणालो खरे, पण त्याचा अर्थ आम्हाला पुढे रस्त्यात कळला. त्याचे आभार मानून आणि ‘जय महाराष्ट्र’ करून आम्ही पुढे निघालो.
जंगलांचे रहस्य
चौक गावातून बाहेर पडल्यावर मुंबई-पुणे हमरस्त्याला लागलो. त्याकाळी तेथे उजव्या हाताला एक मोठे रिसॉर्ट/हॉटेल होते. काही वर्षांनी त्या हॉटेलमध्ये एक मोठा डायनॉसॉरचा पुतळा उभा केला होता. तिथूनच डाव्या बाजूला चौक ते कर्जत जाणारा फाटा होता. तिथून तासभर चाललो असेल, तर काही अंतरावर जंगल लागले. डाव्या बाजूला भैरीगडाच्या डोंगराचा उतार, मध्ये रस्ता आणि उजव्या बाजूला दूरवर काहीच वस्ती दिसेना. आजूबाजूला झाडी होती. अशा ठिकाणी आम्हाला पाहून बरेच म्हणजे तिने ते चार ट्र्क थांबले, कुठे चाललात म्हणून विचारले. “आमच्या बरोबर चला, आम्ही ट्रकने सोडतो तुम्हाला पुण्याला. पैसे नाही दिले तरी चालेल पण ह्या रस्त्यावरून एकटे जाऊ नका”, असे सांगितले. पण आम्ही त्यांना नकार दिला. मग, काही लागले तर मागून येणाऱ्या ट्रकला हात दाखवा ते मदत करतील असे सांगितले.
आता मात्र ह्या रस्त्याचे रहस्य गडद होऊ लागले. हे सर्व असे का सांगतायत? अन सकाळी चौक गावातील शिवसैनिकाने देखील आम्हाला सावधगिरीची सूचना दिली होती, त्याचा ह्या रहस्याशी काही संबंध आहे का? असे ना ना प्रश्न मनात निर्माण झाले.
पण मनातली शंका झटकून आम्ही निर्धास्तपणे चालू लागलो. उजव्या बाजूला एक छोटे मंदिर दिसले. मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथील बाबाने आमची चौकशी केली.
अन, “कशाला या जंगलातून जाताय, एखाद्या ट्रकने जा वर घाटावर. पुढचा रस्ता चांगला नाही. या जंगलात चोर, दरोडेखोर आहेत. ते गाड्या लुटतात. मारहाण पण करतात”. असे म्हटल्यावर ह्या रस्त्याचे रहस्य उलगडले.
पण मी काही मागे हटलो नाही, म्हटले, “बाबा, आले चोर तर येवू द्या, तसेही आमच्याकडे लुटण्यासारखे काहीच नाहीय. भेटलेच तर आमची बॅग उघडून दाखवू, अन, त्यांना आवडला तर बॅगेतील खाऊ देऊ”.
मनात म्हटले, “प्रत्यक्षात समोर चोर-दरोडेखोर उभे राहिल्यावर कसे काय होईल ते माहीत नाही, पण चोर-दरोडेखोर जवळून पाहण्याचा एक अनुभव मात्र घेता येईल”.
आता सर्व रहस्य कळाल्यावर मात्र भीती पळाली. पुढे जाण्याचा आमचा निर्धार पक्का झाला. ‘बघा, जपून जा, अन तसे काही वाटलेच, तर परत या इकडे, मी इथेच असतो”, असे बाबांनी सांगितले. आम्ही निघालो, मंदिरापासून काही पावले पुढे गेलो. तिथे रस्त्याच्या उजव्याबाजूच्या झाडांमागून एक उंच पांढरा बैल अचानक रस्त्यावर आला अन स्वतःच्या तंद्रीत रस्त्याच्या मध्यभागी हलेडुले करत पनवेलच्या दिशेने चालू लागला. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका गाडीचालकाला त्याचा अंदाज काही आला नाही. त्याच्या कारने त्या बैलाला मागच्या बाजूला जोरदार धडक दिली, ब्रेकचा पण मोठा आवाज झाला. बैल रस्त्यावर खाली पडला. गाडीचालक काही थांबला नाही, कारण आम्ही दोघं आणि मंदिराचे बाबा असे तिघेजण साक्षीदार म्हणून उपस्थित होतो, ते पाहून तो पळाला असावा. हे सर्व आमच्यापासून काही फुटांवर नजरेच्या पुढ्यातच घडले, मनात आले कि, आता ह्या बैलाचे मरण आपल्या डोळ्यांनी पाहावे लागेल. नको तो प्रसंग समोर घडला आहे. टाळता म्हणावे तर ते हि शक्य नाही.
पण गंमतच झाली, त्या बैलाला कारची ठोकर बसल्यावर तो खाली कोसळला, परंतू खाली पडताना बैलाचे पुढचे दोन्ही गुढगे दुमडले गेले, अन तसाच तो खाली बसला गेला. त्याच बसलेल्या अवस्थेत तो चक्क १८० अशांच्या कोनात उलटा फिरला गेला. त्याचे तोंड एकदमच विरुद्ध बाजूला म्हणजे खोपोलीच्या दिशेला झाले. क्षणभर तो बैल तसाच खाली बसून राहिला. झालेल्या धक्क्यातून तो बैल सावरला, पुढच्याच क्षणी उठून उभा राहिला. आणि अगदी काहीच घडले नाही अशा तऱ्हेने रस्त्याच्या कडेने खोपोलीच्या दिशेनं चालू लागला, अन डाव्या बाजूच्या झाडीत निघून गेला. जनावरे मुकी असतात, आपल्या भावना ते सांगू शकत नाही म्हणजे नक्की कसे ते अनुभवायास मिळाले. त्या बैलाने साधा हंबरडा पण फोडला नाही, की डरकाळी मारली नाही. खूप वाईट वाटले. रात्री गोठ्यात परत गेल्यावर त्याच्या मालकाला कसे सांगणार, कि माझा आज अपघात झाला आहे, मला खूप दुखत आहे ते. त्या मंदिरातल्या बाबाच्या ओळखीचे कोणी निघाले तरच ते शक्य होते. अन्यथा त्या बैलाला मुकाट्याने वेदना सहन करणे भाग होते.
पुढे जात चाललो, तसतशी झाडी जरा दाट झाली, एका टप्प्याला सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडी आणि उंच झाडे असा देखावा पाहावयास मिळाला. तेवढा पट्टा थोडा सावधगिरीने पार केला. पुढे काही वर्षांनी याचे रहस्य पूर्ण कळाले. त्याकाळी त्या भागात रामा, शिवा, गोविंदा (अशीच काही नावे असावीत) ह्या दोन किंवा तीन दरोडेखोरांची टोळी त्या भागात लुटालूट करत अन शेजारच्या जंगलात पळून जात. परिस्थितीने गुन्हेगारी मार्ग पत्करलेल्या ह्यांच्या टोळीला स्थानिक जनतेची सहानुभूती होती. दहा ते पंधरा वर्षे (नक्की आठवत नाही) पोलिसांना त्यांनी हुलकावणी दिलेली होती. त्यांच्या ह्या जीवनपटावर दूरदर्शनवर एक मराठी मालिका देखील प्रदर्शित झाली होती. त्यांना पकडल्यावर पोलिसांनी फार मोठा गाजावाजा केला होता. अशा कठीण रस्त्याने प्रवास केल्यामुळे आमचा आत्मविश्वास मात्र चांगलाच वाढला.
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग १
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग २
घाटातून प्रवास
मजल दरमजल करीत खोपोलीला पोहोचलो. म्हणजे आतापर्यंत १८ कि.मी. प्रवास झाला होता. भूक लागली होती. खोपोली बसस्टँडवर गेलो. गावाहून मुंबईला परत येताना दुपारी अडीचच्या सुमारास आमची एसटी खोपोली बसस्टँडवर थांबत असे, तेव्हा तिथे उसाचा रस वगैरे घेत असू, अन वाटलेच तर समोरच्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी पित असू. तेव्हा त्या हॉटेलात काहीतरी खायची इच्छा व्हायची, पण बस जास्तवेळ थांबत नसल्याकारणाने त्या हॉटेलमध्ये खाण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. बसस्टँड पाहिल्यावर ती आठवण जागी झाली, मग ठरवले, आज ह्या हॉटेलमध्ये मनोसोक्त खायचे. तिथे पोटाची भूक भागविली. अन निघालो खंडाळ्याच्या घाटाकडे.
घाटरस्ता सुरु झाला. थंड हवेची झुळूक लागल्यावर सर्व थकवा दूर झाला. नेहमी एसटी बसने खंडाळ्याच्या घाटाचा प्रवास व्ह्यायचा, तो आज प्रत्यक्ष पायी चालून जायचा आहे, ह्या कल्पनेने हुरूप आला. घाटाच्या सुरुवातीला असलेल्या शिंग्रोबाचे आत जाऊन दर्शन घेतले, अन मोठ्या आंनदाने घाट चढून वर आलो. सर्व दऱ्यांमधून खाली डोकावून सर्व निर्सग डोळ्यात साठवून ठेवला. सर्व चढ आणि वळणं कशी आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवले. घाटावरून दिवसाची खोपोली आणि दूरवरचा परिसर कसा दिसतो ते पाहिले. लांबपर्यंतचे उंच उंच डोंगराचे सुळके आणि गडकिल्ले दिसत होते. (त्याकाळी डोंगर आणि गडकिल्ल्यांची नावे फारशी ठावूक नव्हती). पुढे सपाटीला आल्यावर अमृतांजन पुलाच्याखालून जाताना उंच पुलाची भव्यता अनुभवली. पुलाखालून पुढे आल्यावर उजव्या बाजूला दिसणारा नागफणीचा कडा आणि त्याखालील दरी ‘ह्याची डोळा’ पाहिली. जरा पुढे समोरच्या बाजूला एक रेल्वेलाईन बोगद्यातून आत गेली होती, आणि दुसरी लाईन डोंगराला वळसा घालून दुसऱ्या बोगद्यातून आली होती. रेल्वेलाईच्या वरच्या बाजूवरून आलेली टाटा वीज कंपनीची पाईपलाईन रेल्वे लाईनच्या खालून दरीमध्ये लुप्त झाली होती.
बोगद्यातून प्रवास
पुढे रेल्वेलाईनच्या बोगद्यावर आल्यावर दोन फाटे निघाले होते. डावीकडचा रस्ता खंडाळ्याहून उतरणाऱ्या वाहनांकरीता मोठया उताराचा होता आणि उजवीकडचा रस्ता बोगद्याचा होता. मी एसटीने प्रवास केला असल्याने हे दोन्ही मार्ग मला ठाऊक होते. एरवी त्या बोगद्याने नेहमीच रात्री प्रवास केल्यामुळे दिवसाउजेडी हा मार्ग अनुभवूया, असा विचार करून थोडे धाडस करावे म्हणून बोगद्याच्या मार्ग मी निवडला. बोगद्यात अंधार असतो. म्हणून बॅगेतील टॉर्च काढून हातात घेतली. अन शिरलो बोगद्यात. बोगद्याच्या तोंडाशी आणि काही मीटरपर्यंत बाहेरचा उजेड आता आलेला होता. तोपर्यंत काहीच जाणवले नाही. पण जसजसे बोगद्यात आता गेलो, तसतसे मग ‘अंधार माझा सोबती’ म्हणजे काय हे अनुभवयाला मिळाले. गाडयांची वर्दळ तशी कमीच होती. पण सर्व गाड्या आमच्या मागून वेगात येत होत्या, त्यामुळे अजून त्रास वाढला. शेवटी टॉर्च मागच्या बाजूला धरला आणि गाडीची चाहूल लागली कि मागे बघत टॉर्च हलवून दाखवीत राहिलो. एखादी गाडी जवळून गेली कि तिचा वाजणारा कर्कश्य आवाज बोगद्यात घुमायचा. अंगावर एक गरम हवेचा झोत यायचा. बोगद्यात थोडी हवा कमी होती, बोगद्यात छान थंड वाटत होते. बोगदा सुमारे साडेतीनशे फुट लांब होता. भिंतीच्या कडेकडेने चालत कसेबसे बोगद्यातून एकदाचे बाहेर पडलो, अन जीवात जीव आला. पण बोगद्यातून बाहेर पडल्यावर डावीकडची दरी, दरी पलीकडील लांबवर दिसणारे डोंगरमाथे, समोर दिसणारा उल्हास नदीच्या उगमाचा मार्ग हे सर्व पाहिल्यावर ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ हे वाक्य आठवले. बोगद्याच्या जरा पुढे दरीच्या तोंडावर एक छोटे विना छप्पर घर किंवा कठडा होता. तेथे सुरक्षितपणे उभे राहून सर्व निसर्गसौदंर्य डोळ्याच्या कॅमेऱ्याने मनात साठवून घेतले अन पुढे निघालो.
खंडाळ्याहून लोणावळ्याला आलो, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. लोणावळ्याची चिक्की सुप्रसिद्ध असते म्हणून चिक्की घेण्यासाठी रस्त्यावरच्या एका छोट्या दुकानात गेलो. दुकानदार जैन होता. त्याचे दुकान खूपच छोटे होते. त्याच्याकडून दोन चिक्कीची अन गोळ्यांची पाकिटे घेतली. आम्ही ज्या ज्या ठिकाणी थांबायचो किंवा खरेदी करायचो, किंवा जेवण, नाश्ता करायचो तेथून दुकान मालक अथवा घरच्या व्यक्ती यांच्याकडून आमच्या नोंदवही मध्ये वेळ आणि शेरा लिहून घेत असू. आमचा उपक्रम पाहून सर्वच आमचे कौतुक करीत, अन दुकानदार किंवा हॉटेल असेल तर आमच्याकडून पैसे घेत नसत. तसेच ह्या छोट्या दुकानदाराने पण केले. आम्ही त्याला पैसे अगोदरच दिले होते, पण आमची नोंद वही पाहून तो खुश झाला. आम्ही घेतलेल्या वस्तूंचे पैसे परत करू लागला. आम्ही त्याला नकार दिला. शेवटी हो ना केल्यावर त्याने आम्हाला अजून खाऊच्या पुड्या भेट म्हणून दिल्या. ह्या छोट्या दुकानदाराची नेहमी आठवण येते, कारण स्वतःचे छोटे दुकान असले तरी त्याचे मन खूप मोठे होते, हे मी स्वतः अनुभवले आहे. त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरचे कौतुकाचे भाव आजही आठवतात. त्याचा आदर्श मी घेतला आहे. प्रवास हा माणसाला बरेच काही शिकवून जातो, हे खरेच.
मुक्कामाला पोचलो
लोणावळ्यात चौकशी केली असता वलवण गाव खूपच जवळ आहे असे कळाले. सूर्यास्त झालाच होता, आता अंधार पडायला लागला होता. वलवण गावात गेलो आम्हाला दिलेल्या पत्त्यावर चोकशी करत करत पोहोचलो. ते घर गावात प्रवेश केल्यावर जवळच होते. आजूबाजूंच्या घरापासून थोडे दूर एका शेतात ते घर होते. आमचं जवळची चिठ्ठी अन अन्य पत्र दाखवून आमची ओळख पटवून दिली. तिथे आमचे स्वागत खूपच प्रेमाने झाले. स्वतःच्या घराची मुले सुट्टीवर आली आहेत, असा तऱ्हेने आम्हाला वागवले.
“एका दिवसात एवढे अंतर चालून तुमचे पाय दुखले असतील”, असे म्हणून त्या घरच्या माऊलीने आमच्याकरीता पाणी गरम केले. तसे आमचे पाय खरोखरच ठणकत होते. त्या माऊलीने एका भांड्यात ते पाणी ओतले आणि त्यात पसाभर मीठ टाकले. अन आम्हाला त्या पाण्यात पाय बुडवून जरा वेळ बसायला सांगितले.
दहा मिनिटानंतर आम्ही पाय बाहेर काढले, पुसले, अन काय आश्चर्य? पायाच्या सर्व वेदना १०० टक्के नाहीश्या झालेल्या होत्या. एकदम हलके हलके वाटू लागले. मनातल्या मनात तिचे आभार मानले. तोंडाने आभार व्यक्त करणे म्हणजे तिचा आणि तिच्या भावनेचा अवमान केल्यासारखे झाले असते.
चहा वगैरे झाल्यावर आमची सर्व माहिती आम्ही त्यांना सांगितली. आम्ही एका दिवसात एवढे अंतर चाललो याचे त्यांना कौतुक वाटले. आमच्यासाठी चांगले जेवण केले, अंगणात अंथरून टाकून दिले.
आम्हाला सकाळी लवकर उठवा, असे सांगितले. आणि दिवसभराच्या थकव्याने आम्ही लगेचच झोपी गेलो.
आजच्या तिसऱ्या दिवसात आम्ही चौक ते वलवण दरम्यान एकूण ३२ किलोमीटर अंतर पार केले होते, म्हणजेच तीन दिवसात एकूण १०० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले होते.
मुंबई-पुणे प्रवास – भाग ३ समाप्त.
आमचा पुढचा प्रवास कसा सुरु झाला …. ते वाचा पुढच्या भागात.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

मुंबईचे माजी महापौर स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांनी दिलेले शिफारसपत्र
हा लेख आपल्याला आवडला असणारच याची मला खात्री आहे. कृपया हा लेख आपल्या मित्रांना सामाईक (Share) करा.
खूप छान लेखमाला आहे.
सगळी दृश्ये डोळ्यासमोर घडतायत असेच वाटत असते