बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs 1
Balbharati Poem Songs – बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली
लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे
लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिली पासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!
मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.
लहानपणी आपले सर्व हट्ट पुरवले जायचे, परंतु त्या लहान वयात देखील आपल्याला आईबाबांचा हट्ट पुरवावा लागला होता. त्यांच्या हट्टामुळे रडतरडत, घाबरत घाबरत पहिलीच्या वर्गात आपले पहिले पाऊल पडते. किंबहुना आपल्याला पहिलीच्या वर्गात बाहेरूनच ढकलून आई निघून जायची. आपण मात्र डबडबलेल्या डोळयांनी मागे वळून पाठमोऱ्या आईकडे पाहात पुढे जावून वर्गातील एखादी जागा पकडून डोळे आणि नाक पुसत रडत रडत पाठीवरच्या दप्तरासकट बाकड्यावर बसत असू. थोड्याच वेळात वर्गावर वर्गशिक्षिका यायच्या, थोड्याशा दमदाटीने वर्गात शांतता प्रस्थापित झाल्यावर वर्गशिक्षिका हळूहळू सर्वांच्या मनावर गारुड करून सर्वांना आपलेसे करायच्या. त्याकाळी वर्गशिक्षिकेला आम्ही ‘बाई’ म्हणत असू, ते ‘मिस किंवा मॅडम’ वगैरे फार नंतर आले किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चालायचे. मग त्या बाई पुस्तकातील एखादी कविता गाण्याच्या चालीत किंवा स्वरचित चालीमध्ये म्हणून दाखवायच्या. हि होती भविष्यातील कविता आणि गाण्यांची आवड निर्माण होण्याची पहिली पायरी.
शाळेत ईयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषेचे पुस्तकाचे नाव असायचे ‘बालभारती’. या बालभारतीच्या पुस्तकांनी लहानपणी वेड लावलेले असे. अभ्यासाचे वेड देखील त्यामुळेच लागले. बालभारतीच्या पुस्तकांमधील ती सुंदर रंगीत चित्रे, मोठमोठ्या अक्षरांचे धडे आणि कविता. वाचता तर काही यायचे नाही, पण ती सुंदर आणि रंगीत चित्रे बघून एका वेगळ्याच स्वप्नमय भावविश्वात प्रवेश व्हायचा. पुस्तकातील त्या चित्रांप्रमाणेच आयुष्य हे सुखमय, गोड स्वप्नांसारखे, निर्मळ, निखळ आनंदी वाटायचे. चित्रांत दाखविल्याप्रमाणे निसर्गात बागडावे, फुलांफुलांत रमावे, नदीची मजा घ्यावी, सूर्योदय, सूर्यास्त पाहावे, चंद्राबरोबर पळण्याची शर्यत लावावी, पावसात चिंब भिजावे आणि वर्गात बाईंनी शिकवलेली कविता गात मनोसोक्त आनंद घ्यावा असे वाटायचे. नंतर कधीतरी आपल्याला आवडलेली कविता छानपैकी हातवारे करून, पायाचा ठेका धरून आपण घरी किंवा वर्गात म्हणून दाखवीत असू.
मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.
पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायाला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.
याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).
ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!
आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.
[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]
बालभारतीच्या कवितेची गाणी – इयत्ता १ली आणि २री – Balbharati Poem Songs – 1
देवा तुझे किती सुंदर आकाश
आजची पहिली कविता आहे, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’! ही कविता कित्येक शाळांमध्ये प्राथनेच्या रूपात रोज गायली जायची.
ह्या गाण्याचे कवी आहेत ‘कविवर्य ग. ह. पाटील’. कविवर्य ग. ह. पाटील उर्फ गणेश हरी पाटील हे एक मराठी कवी, बालसाहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या अनेक कविता मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत होत्या. यांनी लहान मुलांसाठी खूप साहित्य प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी लिहिलेल्या काही प्रसिद्ध कविता खालीलप्रमाणे:
- अबलख वारूवरी बैसुनी येती हे पाटिल
- डरांव डरांव, डरांव डरांव… का ओरडता उगाच राव?’
- देवा तुझे किती सुंदर आकाश
- पाखरांची शाळा भरे पिंपळावरती
- फुलपाखरू छान किती दिसते आणि
- माझ्या मामाची रंगीत गाडी हो
ह्या कविता तर आजही विसरलो नाहीय.
चला तर ऐकूया कवितेच्या गाण्याचे प्रथम गाणे, आणि परत घेऊयात १ ली च्या वर्गातील आनंद! आपल्या बरोबर नवीन पिढीला हा ठेवा दाखवावा आणि ऐकवावा!

मूळ संग्राहक : श्री. गावस्कर (अधिक माहिती मिळत नाही)
Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-य-बई-य-दव-तझ-कत-सदर-आकश/release/13725723/image/SW1hZ2U6NDA1NDY1MzM=

गाणे: देवा तुझे किती सुंदर आकाश
Balbharati Poem Songs

गाणे ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा:
या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया
दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी_दत्त यांचे (जन्म २७ जून १८७५) त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई (मी त्या महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले याचा मला आता आनंद आणि अभिमान वाटतो) आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. केवळ २४ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या कवी दत्त यांनी रचलेल्या सर्व कविता ह्या केवळ वर्ष १८९७ ते वर्ष १८९८ ह्या कालखंडातील आहेत. त्यांचे चिरंजीव कवी वि. द. घाटे यांनी वर्ष १९२२ मध्ये कवी दत्त यांच्या कवितेचा संग्रह ‘दत्तांची कविता’ या नावाने प्रसिद्ध केला.
त्यांच्या कविता आज १२० वर्षांनंतर देखील वाचनीय आणि श्रवणीय आहेत, यावरून त्यांची प्रतिभा लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या काही प्रसिद्ध कविता खालीलप्रमाणे:
- बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
- बोलत कां नाहीं झालें काय तुला बाई
- प्रात:काली कुणी कोकिळा तरु-शिखरीं बैसुनी
- प्रभात झाला रवी उदेला ऊठ उशिर झाला
- या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया !
- अमर्याद हा व्योमसिंधू गभीर । मधें चालली घार ही नाव धीर
- मोत्या शीक रे
- अ आ ई!
- सांगुं कितीतरी बाई !
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात कवी दत्त यांचे लहानथोर आणि मुलगा असो कि मुलगी, स्त्री किंवा पुरुष असो, अशा सर्वांच्या आवडीच्या कवितेचे गाणे!

Balbharati Poem Songs
मूळ संग्राहक : श्री. गावस्कर (अधिक माहिती मिळत नाही) Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-य-बई-य-दव-तझ-कत-सदर-आकश/release/13725723/image/SW1hZ2U6NDA1NDY1MzI=

गाणे: या बाई या
Balbharati Poem Songs

ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा
पावसात भिजायला कोणाला आवडत नाही? उत्तर आहे, मोठयांना! पण, लहान मुलांना मात्र पावसात भिजायला, पाणी साठलेल्या डबक्यात उड्या मारायला, आणि जोरजोरात आवाज करून आरडाओरडा करायला खूपच आवडते. तुम्हीही लहानपणी हेच केले असणार. शाळेत गेल्यावर यात एवढाच बदल झाला कि, पहिलीमध्ये गेल्यानंतर पावसात भिजताना पुस्तकातली ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ हि कविता गात मुले पावसात भिजायला लागली.
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात मुलांचे सार्वकालिक आवडीची कविता ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’. कवीचे नाव मात्र अज्ञात आहे. (कोणास अधिक माहिती असेल तर कृपया कळवावे). युट्युबवर सापडलेल्या गाणे येथे दिलेले आहे.

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
लहानपणी ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ हे गाणे दिवाळीच्या दिवशी हातात पेटते फुलबाज्या घेऊन म्हटले जायचे. ह्या सुंदर कवितेचे रूपांतर मात्र गाण्यात झालेले आढळले नाही, परंतु ह्या कवितेच्या पहिल्या तीन ओळींचा आधार घेवून एक गाणे बनविलेले आहे. त्या गाण्याचे पुढचे शब्द वेगळे असल्याकारणाने आपण फक्त आपल्याला माहित असलेल्या ओळी ऐकूयात. इतक्या सुंदर कवितेचे गाण्यात रूपांतर झाले नाही याचे वाचकांना आणि श्रोत्यांना नक्कीच वाईट वाटेल. गायिकेचे नाव कळाले पण संगीतकरांचे नाव कळाले नाही. (कोणाला माहित असेल तर नक्की कळवावे).

टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा
शाळेत असताना परीक्षेला कधीकधी पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न यायचा, तसेच झाले आहे पुढील कवितेच्या बाबतीत. आपण आतापर्यंत वरती वाचलेल्या आणि ऐकलेल्या आणि लेखातील शेवटची कविता या बालभारतीच्या ‘१ल्या मालेतील’ पुस्तकातील आहेत. पण पुढील कविता हि ‘२ऱ्या मालेतील’ १लीच्या पुस्तकातील आहे.
बहुआयामी कवीयत्री स्वर्गीय शांता शेळके यांनी लिहिलेली हि कविता वाचताना डोळ्यासमोर एक सुंदर दृश्य उभे राहते, आणि त्या कवितेचे गाणे ऐकताना आपण नकळत तालावर डोलायला लागतो.
चला वाचू आणि ऐकूयात ‘टपटप टपटप टाकीत टापा चाले माझा घोडा’.

विठूचा, गजर हरिनामाचा झेंडा रोविला
कवितेबरोबरच पहिल्या ईयत्तेत ओळख होते ती, अभंग आणि भक्तिगीते यांची. थोर संतांनी मराठी भाषेत खूपच मोलाची भर अगोदरच टाकली आहे. त्यांनी लिहिलेले अभंग अतिशय सुगम आणि गेय आहेत. ह्या अभंगांना इतक्या सुंदर चाली लावता येतील अशी काव्ये ह्या संतांनी ३०० ते ८०० वर्षांपूर्वी कशी काय लिहून ठेवली, याचे लहानपणी फारच आश्चर्य वाटायचे.
तर आता ऐकूयात बालभारतीच्या १ल्या मालेतील ईयत्ता १ ली मराठीच्या पुस्तकातील शेवटच्या पानावरील अभंग. ह्या अभंगावर आधारित गाणे असले तरी ते गाणे पूर्ण नाहीय, आपण फळत पहिल्या दोनच ओळी ऐकूयात आणि ‘विठूचा गजर’ करीत आजचा लेख इथेच थांबवूया. पुन्हा भेटूयात पुढील भागात ईयत्ता २रीच्या कविता ऐकायला.

पुढच्या भागात वाचा आणि ऐका ईयत्ता २री च्या कवितेची गाणी: – Balbharati Poem Songs
हळूच या हो हळूच या
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
असा कसा देवाचा देव बाई ठकडा
आणि अन्य कवितेची गाणी…
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.
लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
आजचा हा भाग १ला आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:
हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!
Acknowledgments
- Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
- Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
- गाण्यांची यादी आणि अधिक माहिती – List and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
- Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
- List of Songs http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/balbharati_edition2_march_2012_lr.pdf
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.
आमचे इतर लेख वाचा

One Comment