Trimbakeshwar Alias Brahmagiri
|

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri – लेखक: संजय तळेकर, मुंबई

‘‘दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपूरी’’ असे ज्याचे माहात्म्य श्री संत नामदेव महाराजांनी सांगितले आहे., तो त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर नाशिक पासून अवघ्या २९ किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फूट उंचीवर असून त्याचा घेरा १० मैल इतका प्रशस्त आहे. त्याच्या सर्वच बाजूंनी ३००-४०० फुट उंचीचे नैसर्गिक काताळकडे असल्यामुळे जिंकण्यास तर तो निव्वळ अजिंक्यच. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला आलेले भाविक ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात.

या ब्रम्हगिरीला (Trimbakeshwar Alias Brahmagiri) जोडून वायव्य दिशेस एक उपदुर्ग आहे त्याला दुर्गभांडार असे म्हणतात. हा स्वतंत्र किल्ला नसून ब्रम्हगिरीचाच एक भाग आहे. त्र्यंबकगाव पार केल्यानंतर ‘गंगाद्वार’कडे जाणार्‍या वाटेने चालू लागलो की १५ मिनिटात आपण गंगाद्वाराकडे जाणार्‍या पायर्‍या जेथून सुरू होतात तिथे येऊन पोहचतो. इथून डावीकडे एक मोठी पायवाट ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाते. गर्द झाडीच्या मस्त सावलीतून अर्धातास चालत गेल्यावर उजव्या बाजूस असलेली एक ऐतिहासिक वास्तु आपली नजर आकर्षित करते. ही दुमजली इमारत एक जुना वाडा शोभावा अशी दिमाखदार व सुंदर आहे. या इमारतीला तीन महिरपी कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर कोरीव शिल्प आहेत. दुसर्‍या मजल्याला नक्षीकाम केलेल्या तीन महिरपी खिडक्या आहेत. या वास्तूच्या थोडे मागे एक दगडी विहीर बांधलेली आहे. इतिहासकाळात या वास्तूचा वापर बहुधा धर्मशाळा म्हणून केला जात असावा.

ब्रम्हगिरीवर जाणार्‍या पायर्‍या या वास्तू जवळूनच सुरू होतात. पायर्‍या चढत असताना प्रथम उजवीकडे काताळात खोदलेली एक गुहा आणि त्या पुढे शेंदूरचर्चित मारुतीरायाची दगडात कोरलेली भव्य मूर्ती लागते. इथपर्यंतच्या ४०० पायर्‍या कुणा दानशूर भावीकाने बांधून काढलेल्या आहेत. मात्र त्यापुढील पायर्‍याचा मार्ग पुरातन आहे. एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला कातळभिंत या मधून जाणारा हा पायर्‍यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले जीने होय. हे चढताना आपली चांगलीच दमछाक होते. नळीतून जाणार्‍या पायर्‍या चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुखी प्रवेशद्वारापाशी येतो. उभा आयताकृती दगडात खोदलेला हा दरवाजा अत्यंत साधा असून त्यावर कोणतेही शिल्पकाम नाही. त्या नंतर पुन्हा काही पायर्‍या चढून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो. अत्यंत सुबक धाटणीचा हा दूसरा दरवाजा दक्षिणाभिमुखी असून तो काताळाच्या बेचकीत खोदलेला आहे. याच्या दोन्ही बाजूस शतकमलपुष्प व मध्यभागी कमानीवर साखळीसह घंटेच शिल्प कोरलेल आहे. दोन्ही दरवाज्याच्या तळाला गजशिल्प असून लवकरच ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

किल्ल्याचा हा भाग पाहून पुन्हा पायर्‍यांनी वर गेलो की आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. गावापासून माथ्यावर यायला आपले तास-दीड तास सहज खर्ची पडललेले असतात. ब्रम्हगिरी किल्ल्याचा माथा खूपच विस्तीर्ण पठारासारखा दक्षिणोत्तर लांबवर पसरलेला आहे. त्याच्या सर्व अंगाला कातळकडे असल्यामुळे आवश्यक असलेल्या ठिकाणी तटबंदी बांधण्यात आलेली आहे. सतत भाविकांच्या वर्दळीमुळे किल्ल्यावर फिरण्याच्या पायवाटा चांगल्याच मळलेल्या आहे. गडमाथ्यावर उभे राहिले की समोर एक डोंगर आडवा येतो. याच्या डाव्याबाजूस म्हणजे दक्षिणेकडे एक टेकडी आहे. तिला ‘पंचलिंग शिखर’ असे म्हणतात.

उजव्या बाजूस म्हणजे उत्तरेकडे एक छोटी पण उंच टेकडी लागते. या टेकडीवर चढून जाणारी वाट पूर्वेकडे उतरते. टेकडीवर चढण्यापूर्वी वाटेत डावी-उजवीकडे पाण्याची टाकी लागतात. टेकडीवरुन खाली उतरणारी वाट डावीकडे गोदावरी नदीच्या उगमस्थानापाशी जाते. परतताना हा भाग आपण पाहणार असल्यामुळे आपण आपला मोहरा उजवीकडील डाईक सदृश टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जटामंदिर किंवा जटास्थानाकडे वळवायचा.

आख्यायिका

पुराणात अशी आख्यायिका आहे की गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हगिरीवर घोर तपश्चर्या केली व भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यांची इच्छा काय ते विचारल्यानंतर गौतम ऋषींनी त्यांच्या जटेतील गंगेची मागणी केली. पण गंगा मात्र येण्यास राजी नव्हती. तेंव्हा भगवान शंकराने आपल्या जटा या इथे आपटल्या व ब्रम्हगिरीवर गंगा अवतीर्ण झाली. गौतम ऋषींनी गोहत्येचे पाप निवारण करून गाईला पुन्हा सजीव केले. म्हणून तीच नाव पडलं गोदावरी.

दुसरी आख्यायिका अशी की, एकदा विष्णु ब्रम्हदेवाला म्हणाले, मी पुष्कळ तप केले, परंतु अजूनही मला शिवाचे ज्ञान झाले नाही. तेव्हा त्यांनी ठरवले की, ब्रम्हाने शिवाच्या मस्तकाचा व विष्णूने चरणाचा शोध घ्यायचा. पुष्कळ शोध घेऊनही दोघांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. केतकी व पुष्प यांची खोटी साक्ष उभी करून ब्रम्हाने सांगितले की मी शिवाचा शोध लावला आणि केतकीच्या फुलांनी व दुधाने अभिषेकही केला. त्यावर कृद्ध होऊन शिवाने केतकीला व दूध देणार्‍या गाईला शाप दिला. त्यावर चिडून जाऊन ब्रम्हदेवाने शिवाला प्रतिशाप दिला, ‘‘तू भूतलावर पर्वत होऊन राहशील.’’ रागाचा आवेग ओसरल्यावर ब्रम्हाने दिलेला शाप मागे घेतला आणि स्वत:च भूतलावर पर्वताचे रूप घेवून त्याचे नाव ब्रम्हगिरी असे ठेवले. या मंदिरात खडकावर जटा आपटल्याची खूण (खर तर हा लाव्हारसचा एक भाग आहे) व एखादी पाण्याची धार दिसते. गंगा गोदावरी मंदिराशेजारी पाण्याचे टाके आहे. या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. हे मंदिर ब्रम्हगिरी किल्ल्याच्या पश्चिमेकडील कड्याला बिलगून असल्यामुळे मंदिर प्रशासनाने कड्याला व परीसराला लोखंडी रेलिंग्ज बसवलेले आहेत.

आपले पुढचे लक्ष असते ते म्हणजे दुर्गभांडार. जटामंदिर पाठीमागे टाकून वायव्य टोकाकडे जाणारी पायवाट आपल्याला थेट दुर्गभांडारकडे आणून सोडते. ही वाट ‘बिकट वाट’ या प्रकारात मोडते. एका बाजूस डोंगर व दुसर्‍या बाजूस खाई, अशी ही वाट सतत वापरात नसल्यामुळे बिकट, तर तेथील माती वाहून गेल्यामुळे घासर्‍याची झाली आहे. त्यामुळे ट्रेकिंगचा पूर्वानुभव नसलेल्या नवशिक्यांनी येथे स्वत:ची काळजी घेतलेली बरी. या वाटेने २० मिनिटे काळजीपूर्वक चालल्यानंतर उजव्या हातास जमिनीलगत एक बिन वापरातील पाण्याचे टाके लागते या टाक्यापासून एक पाउलवाट उजवीकडील टेकडीला वळसा घालून जेथून आपण गडफेरीला सुरुवात केली त्या ठिकाणी जाते.

त्या वाटेकडे दुर्लक्ष करून सरळ पुढे जाणार्‍या पायवाटेने चालत राहिलो की काताळात खोदलेल्या दगडी जिन्याच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. समोर दिसतो दक्षिणोत्तर पसरलेला, काताळकड्यांनी वेढलेला आणि एका चिंचोळया दगडी पुलाने ब्रम्हगिरीला जोडलेला दुर्गभांडार. ब्रम्हगिरी पासून खाली असलेल्या दगडी पुलाला जोडलेला उताराचा जिना, चक्क काताळात कोरून तयार केलेला आहे.

दुर्गभांडार किल्ल्याचा चित्तथरारक प्रवास

इथून सुरू होतो दुर्गभांडार किल्ल्याचा रोमहर्षक, चित्तथरारक आणि मंतरलेला प्रवास, जो आपण कधीच विसरू शकणार नाही. खिंडीच्या सुरुवातीला हनुमानाची सुबकशी मूर्ती कोरलेली आहे. पुढचा प्रवास सुखकारक होण्यासाठी या मारुतीरायाला साकड घालून, अंधार्‍या वक्राकार वाटेने दीड फूट उंचीची एक पायरी, या हिशोबाने अंदाजे ५०-६० पायर्‍या उतरल्या की समोर येतो काताळातला दरवाजा. प्रथमदर्शनी हा दरवाजा पाहून आपल्याला प्रश्न पडतो की हा दरवाजा आहे की खिडकी. कारण दोन फूट सोडल्यास हा पूर्णत: मातीने बुजला आहे. त्यातून रांगत, सरपटत पलीकडे उतरले की समोर उभा ठाकतो दुर्गभांडार आणि त्याला जोडलेला फक्त ७-८ फूट रुंदीचा निसर्गनिर्मित दगडी पूल.

अश्या प्रकारचा पूल दुसर्‍या कोणत्याच किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. हा दगडी पूल सावकाश ओलांडून आपण दुर्गभांडार किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो. हा सुद्धा मागच्या दरवाज्यासारखाच गाडला गेलेला असल्यामुळे पुन्हा द्राविडी प्राणायाम करीत आत शिरायचे की मग सुरू होतात किल्ल्यावर जाणार्‍या पायर्‍या. या पायर्‍यासुद्धा काताळात कोरत थेट वरपर्यन्त नेलेल्या आहेत. दीड-दोन फूट उंच असलेल्या या ५०-६० पायर्‍या चढताना चांगलाच दम काढतात आणि खर्‍या अर्थाने आपला दुर्गभांडार किल्ल्यावर प्रवेश होतो.

पुढे पायवाटेवर एक पाण्याचे टाके आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य असल्यास आपली तृष्णा भागवायची आणि मागे वळून आपण केलेल्या चित्तथरारक पराक्रमाचे आपणच कौतुक करून, उगीचच आपली पाठ, आपणच थोपटून घ्यायची. दुर्गभांडार हा गंगाद्वार आणि गहनीनाथांची गुहा असणार्‍या काताळकड्याच्या बरोबर वरच्या दिशेस आहे. त्यामुळे येथून गंगाद्वाराकडे चढत येणार्‍या पायर्‍या खूप सुंदर दिसतात. पाठीशी उभा असतो भव्य ब्रम्हगिरी.

दुर्गभांडारचा पसारा आटोपशीर आहे. त्यामुळे पाचच मिनिटात आपण, डोंगराचा माथा करवतीने कापल्याप्रमाणे कातळ खोदून खिंडीत तयार केलेल्या पायर्‍यांनी, उत्तर टोकाकडे असलेल्या दगडी बुरूजापाशी येतो. १८० अंश कोनाचे वळण, समोर दरी, त्यामुळे बुरूजात उतरताना सांभाळून उतरावे लागते. हा बुरूज चिलखती बांधणीचा आहे. याला काही जण ‘बदामी बुरूज’ असेही म्हणतात. दुर्गभांडारच्या माचीवर एक-दोन पाण्याच्या टाक्या आणि दोन-तीन घराची जोती आहेत. मात्र गवत भयंकर असल्यामुळे ती ही शोधावी लागतात.

इथं अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण झाली की आपण पुन्हा तोच चित्तथरारक प्रवास अनुभवत ब्रम्हगिरीच्या नैऋत्य टोकाकडे जाण्यासाठी, जटामंदिर पार करून उजव्या हाताच्या दरीकाठावर बांधलेल्या रेलिंग्जच्या काठाकाठाने, गोदावरी नदीच्या उगम स्थानाजवळ पोहोचायचे. या ठिकाणी घडीव दगडात बांधलेले सुंदर शिवमंदिर असून त्याला ‘ब्रम्हगिरी मंदिर’ म्हणतात. त्यापुढे नव्याने बांधलेले पाणटाके असून, त्या पलीकडील उतारावर उंबराच्या झाडाखाली मूळ गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. कुंडात गोदामाईची मूर्ती असून कुंडाला ‘गोदातीर्थ’ असे म्हणतात. जवळच दगडी मंडप असून त्यात कनक ऋषी, सपत्नीक बसलेले गौतम ऋषी, ब्रम्हदेव व काही भग्न मूर्त्या आहेत. याच ठिकाणी गौतम ऋषींनी शिवाची आराधना केली होती असे मानले जाते.

एका आख्यायिकेनुसार याच ब्रम्हगिरी पर्वतावर गौतम ऋषींचा आश्रम होता व या भूमितच त्यांनी भाताचे पीक काढण्याचा पहिला यशस्वी प्रयोगही केला होता. संपूर्ण गडावर असलेल्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असेलच याची खात्री नसल्यामुळे जिवंत झरा असलेल्या या टाकीतील पाणी पुढच्या प्रवासासाठी भरून घ्यायचे. आता आपला शेवटचा गडभाग पहायचा शिल्लक राहिल्याने दरीच्या काठाकाठाने ब्रम्हगिरीच्या नैऋत्य टोकाकडे चालत राहायचे. वाटेत दोन अनामिक समाध्या व छप्पर नसलेले दारुकोठार लागते आणि अखेर आपण हत्ती मेटाकडील दरवाज्यापाशी येतो. खरंतर हत्ती मेटावरील दरवाजा हा दक्षिणेकडील दरवाजा आहे. त्यावर येण्यासाठी खालून गावाकडील मार्गाने यावे लागते. हाही मार्ग माहीत असलेला बरा म्हणून आपण तेथूनच माहिती घेऊ.

हत्ती मेट मार्गे ब्रम्हगिरीवर चढाई करण्यासाठी त्र्यंबक गावापलीकडील ‘कोजूली’ गावात उतरायचे. तेथून एका मळलेल्या वाटेने धारेवरून चढत जाऊन मधल्या पाठरावरील ‘हत्ती मेट’ या वाडीत उतरायचे. किल्ल्याच्या या मेटावर पूर्वीच्याकाळी चौकी पहारे होते. हत्ती मेट हे हत्ती दरवाज्यातून येण्या-जाणार्‍यां व्यक्तींवर लक्ष ठेवण्याकरिता वसवले असावे. कड्याला उजवीकडे ठेवत समोरून दिसणार्‍या नळीतून हत्ती दरवाज्याची वाट जाते. वाटेत अंबिकादेवी मंदिर व विखुरलेले वीरगळ लागतात. वाडीतील लोकांची गोदावरी तीर्थावर जाण्याची नेहमीची वाट असल्यामुळे इथ पर्यंतची वाट बर्‍यापैकी मळलेली आहे.

पुढे नळीतून चढाईला प्रारंभ होतो. जिथे वाट उजवीकडील कड्याला बिलगते तिथे खडकात पायर्‍या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणच्या पायर्‍या दरड कोसळल्यामुळे गाडल्या गेल्या आहेत. नळीतून चढाई करीत असताना काही ठिकाणी तटबंदीचे बांधकाम आढळते. पुढे एके ठिकाणी भली मोठी उभी भिंत, तटबंदी सारखी बांधून काढलेली आहे. या भिंतीच्या पोटात गुहा कोरलेली दिसते. भिंतीची प्रचंड प्रमाणात पडझड झाल्यामुळे गुहेचे तोंड मोकळे झाले आहे. दोन्ही बाजूच्या कड्यांचा बुरूजासारखा वापर करून घेत येथे भिंत वजा तटबंदी बांधून तिचा वापर पहारेकर्‍यांच्या देवडी करिता व तेथूनच पुढे किल्ल्यावर जाण्याकरिता केला जात असावा.

भिंतीच्या वरील बाजूस कोनाडे व जंग्या ठेवलेल्या आहेत. येथून वर जायला मार्ग नसल्यामुळे उजव्या बाजूस भिंत व काताळकडा याला धरून लावलेल्या लोखंडाची शिडीने वर जाता येते. वरील बाजूस मोठ-मोठ्या प्रस्तरखंडावर चढून डावीकडे गेल्यावर काताळात कोरलेली गुहा व महादेवाचे मंदिर लागते. मंदिरात शिवलिंग असून आतील बाजूस छतावर कमळ कोरलेले आहे. मंदिरा समोरील कड्यात आणखी एक छोटी गुहा आहे. त्यात उतरण्यासाठी २-३ पायर्‍याही कोरलेल्या आहेत. या दोनही गुहांचा वापर पहारेकर्‍यांसाठी होत असावा.

या पुढचा प्रवास अत्यंत खडतर आहे. घळीत पडलेल्या मोठ-मोठाल्या अगणित प्रस्तरखंडावर उडया मारत तर कधी मुक्त प्रस्तारारोहण करूनच वर चढावे लागते. दोन्ही बाजूने असलेली उंच तटबंदी गडाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किती महत्वाची आहे याची चढताना जाणीव होते. थोडे चढून गेल्यावर मार्ग अडवणारी आणखी एक भिंत आणि थोडा घसारा ओलांडला की आपण गडाच्या मुख्यद्वारपाशी म्हणजेच हत्ती दरवाजा जवळ येतो. अतिशय सुंदर कोरीवकाम असलेला हा दरवाजा अख्खा कातळात कोरून काढलेला आहे. याच्या उजवीकडील बाजूस दगडांनी बांधलेला भक्कम बुरूज व डावीकडे काताळात तासून कोरलेला बुरूज किल्ल्याच्या अजिंक्यपणाची ग्वाही देतात.

सध्या दरवाज्याचा कमानी पर्यन्तचा भाग पूर्णत: मातीने भरून गेलेला आहे. दरवाज्याच्या वरील भागात वेलबुट्टीच्या तोरणावर ओळीने एकावर असे सात कलश, वरील कलशात आंब्याची पाने व त्यात श्रीफळ तर मधल्या कलशाच्या वरील बाजूस मनुष्य सदृश्य राक्षसाचा मुखवटा कोरलेला आहे. कामनीच्या मध्यभागी कमलिका व दोन्ही बाजूस व्याल चित्रित केले आहेत. कामनीखाली गणेश पट्टीवर मध्यभागी श्रुंखला सहित घंटा व तिच्या दोन्ही बाजूस गोलाकार पुष्पे कोरली आहेत. गणेशपट्टीवर श्रीगणेश मूषकावर विराजमान आहेत.

महादरवाज्याच्या डावीकडील काताळावर चढून पुढे गेल्यावर दूसरा दरवाजा लागतो. हा सुद्धा असाच मातीने पूर्ण गाडला गेलेला आहे. कुठे तरी या दरवाज्याचा अंश नजरेस पडतो आणि इथे आणखी एक दरवाजा आहे याची खात्री पटते. हा भाग साफ केल्यास सुंदर अश्या दरवाज्याचा नजराणा आपल्याला निश्चित पहायला मिळेल. हा दरवाजा पाहून आपण ब्रम्हगिरीच्या माथ्यावर येतो. येथे उत्तरेकडून येणारी वाट गोदावरी उगमस्थानाकडे घेऊन जाते अन इथे आपली ब्रम्हगिरी दुर्गभांडारची मोहीम पूर्ण होते.

ब्रम्हगिरी दुर्गभांडार यांच्या माथ्यावरून दिसणारा आसमंत…… पूर्वेकडे लांबवर पसरलेले त्र्यंबकेश्वर शहर, नवरा नवरीचे सुळके त्याच्या शेजारी एकाच सरळ रेषेत अंजनेरी, मागे रांजणगिरी, त्याच्याही मागे गडगडा, अंजनेरीच्या उजव्या बाजूस कावनाई, नैऋत्येस त्रिंगलवाडी, पश्चिमेस कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर, हरिहर किंवा हर्षगड व बसगड किंवा भास्करगड, वायव्य दिशेस दुर्गभांडारच्या मागे वाघेरा इत्यादी किल्ले पाहता येतात.

किल्याचा इतिहास

या किल्याचा इतिहासातील पहिला उल्लेख बाराव्या शतकाच्या मध्यावर सापडतो. इ.स. १२७१ ते १३११ च्या दरम्यान देवगिरीचा राजा रामचंद्र देव यादव याच्यावतीने त्याच्या भावाची सत्ता त्र्यंबकेश्वर व आसपासच्या परिसरावर होती. यादवांच्या अस्तानंतर हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. बहामनी राज्य संपुष्टात आल्यावर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. निजामशहाच्या मृत्यूनंतर निजामशाही वाचविण्यासाठी मुर्तूजा या छोट्या निजामशहाला मांडीवर बसवून स्वत: त्याचा वजीर बनून इ.स. १६२९ ते १६३३ पर्यन्त राज्य सांभाळले. तोपर्यंत त्र्यंबकगड शहाजी राजांच्या ताब्यात होता. शहाजी राजांची बागावत सहन न झाल्यामुळे मुघल पातशाहा शहाजंहान याने शहाजी राजांचा माहुली येथे पराभव केला व ८ हजारची फौज देऊन सेनापती खानजमान याला त्र्यंबकगडावर सोडला. त्र्यंबकगड खानजमानने जिंकून घेतल्यावर काही काळ तो मुघलांकडेच होता.

नोव्हेंबर १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराज्यांच्या काळात मुघलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली सुरू होत्या. त्यावेळी गडाचा किल्लेदार होता सामराज पद्मनाभी. इ.स. १६८२ च्या सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मुघली फौजेत दाखल करण्यात आले. त्याने आक्रमक पवित्रा घेऊन गडाखालील तीन वाड्या जाळून टाकल्या. बादशाही कृपा झाली तर त्र्यंबकगड मुघलांना मिळवून देतो या अटीवर फेब्रुवारी १६८३ च्या सुमारास राघो खोपडा हा फितूर होऊन अनामतखानला जाऊन मिळाला. राघो खोपड्याने त्र्यंबकगडाच्या किल्लेदाराला आमिष दाखवून वश करण्याचा प्रयत्न केला. पण किल्लेदार बधला नाही. तो शंभाजीराजांशी एकनिष्ट राहिला. खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे मुघलांनी त्यालाच कैद केला. नोव्हेंबर १६८४ मध्ये अकरमत खान व महमतखान यांनी पुन्हा एकदा गडाखालील वाड्या जाळल्या व तेथील जनावरे पळविलीत. इ.स. १६८२ ते १६८४ पर्यन्त मुघलांनी हरप्रकारे किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. ऑगस्ट १६८८ मध्ये मुघल सरदार मातबरखानने किल्ल्याला वेढा घातला.

औरंगजेब आणि त्र्यंबकगड

त्यावेळी औरंगजेबाला लिहीलेल्या पत्रात तो म्हणतो, ‘‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महीन्यापासून वेढा घातला होता. किल्ल्याभोवती चौक्या बसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे-जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील.’’ यावर बादशहा म्हणतो, ‘‘त्र्यंबकचा किल्ला हरप्रकारे घेण्याचा प्रयत्न करावा, त्याचे चीज होईल हे जाणावे.’’ त्यावर मातबरखान किल्ला कसा घेतला हे बादशहला पत्रातून कळवितो, ‘‘गुलशनाबाद नाशिकच्या ठाण्यात आमचे सैन्य फार थोडे होते. या भागात मराठ्यांच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या पसरल्या ही परिस्थिति पाहून मी त्र्यंबकच्या किल्लेदाराला बादशाही कृपेची आश्वासने दिली. ८ जानेवारी १६८९ त्र्यंबक किल्ल्याचे अधिकारी तेलंगराव व श्यामराज हे किल्ल्यावरून खाली उतरले. आपल्या कृपेने त्र्यंबकचा किल्ला आमच्या ताब्यात आला. तेलंगराव व श्यामराज यांना कोणत्या मानसबी द्याव्यात याचा तपशील सोबतच्या यादीवरून दिसून येईल. त्याची अर्जी आणि किल्ल्याच्या किल्ल्या या काका मनसबदार व भावाबरोबर पाठविल्या आहेत. त्या पहाण्यात येतील.’’ याशिवाय मातबरखान म्हणतो, ‘‘त्र्यंबक किल्ल्याच्या मोहिमेत औंढा किल्ल्याचा श्यामसिंग, त्याचा मुलगा हरिसिंग याने जमेतीनशे कामगिरी केली आहे. त्याच्या बरोबर तीनशे स्वार, हजार पायदळ देवून मी त्याला त्र्यंबकचा किल्ला सांभाळण्याच्या कामावर नेमले आहे. नवीन किल्ल्यदार नेमून येईपर्यंत तो हे काम सांभाळील.’’ मातबरखान या पत्रात अशी मागणी करतो, ‘‘साल्हेरच किल्ला नेकनामखान याने असोजी कडून ताब्यात घेताना त्याला जशी बक्षिसी आणि मनसब देण्यात आली. तशीच बक्षिसी आणि मनसब त्र्यंबकचा किल्लेदार तेलंगराव व श्यामराज यांना द्यावी.’’ किल्ला ताब्यात आल्यावर बादशहा औरंगजेब फर्मान पाठवितो, ‘‘मातबरखानाने जाणावे की तुमची अर्जी पोहोचली. आपण त्र्यंबकचा किल्ला जिंकून घेतला असून त्र्यंगलवाडीच्या किल्ल्याला वेढा घातला असल्याचे कळविले आहे. त्र्यंबकच्या किल्ल्या आपण पाठविल्या त्या मिळाल्या, तुमची कामगिरी पसंत करण्यात येत आहे. तुमच्या मनसबीत पाचशेची वाढ करण्यात येत आहे. तुम्हाला खिलतीचा पोशाख, झेंड्याचा मान आणि तीस हजार रुपये रोख देण्यात येत आहे.’’

यावरुन त्र्यंबकगड किती महत्वाचा होता हे दिसून येते. इ.स. १६९१ च्या सुमारास या भागात मराठ्यांचे हल्ले वाढले. पुढे या भागातील अधिकारी मुकबरखान बादशहास कळवितो, ‘‘त्र्यंबकच्या किल्लेदाराचा मृत्यू झाला आहे. त्याचा मुलगा लहान आहे. तो कर्जबाजरी झाला आहे. सावकाराचा तगादा चालू आहे. त्र्यंबकगड सांभाळणे शक्य नाही. कुणीतरी उमदा आणि अनुभवी मनुष्य किल्लेदार म्हणून पाठवावा, नाहीतर किल्ल्यावर भयंकर संकट कोसळेल.’’ इ.स. १७१६ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची मागणी मुघलांच्याकडे केली, पण त्यांनी ती फेटाळली. इ.स. १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करून किल्ला घेतला. २ डिसेंबर १७५१ मध्ये पेशव्यांनी भेदनीतीचा वापर करून त्र्यंबकगड ताब्यात घेतला. सरते शेवटी २६ एप्रिल १८१८ मध्ये मराठ्यांशी कडवी झुंज देऊन त्र्यंबकगड इंग्रजांनी ताब्यात घेतला.

त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri – लेखाचे सर्वाधिकार – लेखक: संजय तळेकर, मुंबई

(सांप्रतकाळात अनेक शिवभक्तांनी, दुर्गवीरांनी व संस्थांनी स्वेच्छेने दुर्ग संवर्धनाची जबाबदारी स्विकारून अनेक गड किल्ल्यांवर पाणटाक्या, तटबंद्या, पायर्‍या, महाद्वारे यांची डागडुजी व जिर्णोद्धार केला आहे व करीत आहेत. त्यामुळे दिलेल्या माहितीमध्ये बदल असण्याची शक्यता आहे.)


त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – छायाचित्रे


Image Source: https://www.facebook.com/media/set/?vanity=sanjay.talekar.92&set=a.2869389999776510


हे देखील वाचा:


91885592 2869397919775718 2190890447214215168 n min
संजय तळेकर

लेखक, इतिहास प्रेमी व दुर्गप्रेमी
भ्रमणध्वनी: ९८२०२३८१७७

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Acknowledgements: Written by: Sanjay Talekar, Mumbai -9 more...

Similar Posts

3 Comments

 1. लेख वाचला.
  लेखात फक्त वाटा व अवशेष यांची माहिती नसून त्याचे पौराणिक संबंध विषद केले आहेत. ऐतिहासिक माहिती काही घटनांनासह लिहिल्यामुळे त्यामागे अभ्यास व ध्यास दिसुन येतो.
  त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरी संबंधी हा लेख सगळ्यांसाठीच परिपूर्ण वाटत आहे.

  — धनंजय मदन

 2. फारच बारकाईने माहीती दिलीय ब्रह्मगिरीविषयी! जायचं कसं…इतर वाटा आणि उपलब्ध इतिहासही आणि जायची उत्कंठा वाढवणार्‍या फोटोंसहीत! सगळ्यांत महत्वाचं की लिहीण्याची शैली! पुढे पुढे वाचत रहाण्याची इच्छा वाढत जाते. अशीच माहीती इतर किल्ल्यांविषयीही वाचायला मिळाली तर बहारच असेल. पुस्तक करणार असशील तर ‘लय भारी” असेल असंच म्हणेन! माझ्या शुभेच्छा आहेत,
  पुस्तक व्हायला हवं!
  💐💐💐💐💐

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply