Historian Mountaineer – इतिहासकार गिर्यारोहक
(Historian Mountaineer) – तुकाराम विजयानंद जाधव
मला इतिहासाच्या अभ्यासाचे वेड लावणारे, मला गुरूस्थानी असणारे आदरणीय कै. तुकाराम जाधव यांची आठवण आल्याशिवाय आमची दुर्गदर्शन अथवा दुर्गभ्रमणाची कोणतीही मोहीम सुरू झालेली नाही.
तुकाराम जाधव म्हणजे इतिहास आणि गिर्यारोहण दोन्ही क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती. एखाद्या किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल पूर्णपणे माहीत असलेली एक व्यक्ती. असा संगम तसा दुर्मिळच. ह्या दोन्ही क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव एकाच ठायी असणे हे आमच्यासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रीयवासियांना मोठी अभिमानाची गोष्ट होती. अशा थोर व्यक्तीच्या सान्निध्यात गडकिल्ले फिरण्याचा अनुभव मला मिळाला हे माझे सद्भाग्यच! आम्ही त्यांना पहिल्या पिढीतील गिर्यारोहक मानतो, पण हे गिर्यारोहण फक्त सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांतून केलेले! गिर्यारोहण करताना सुद्धा इतिहास लक्षात ठेवून ऐतिहासिक घटना खरोखर कशा घडल्या असतील तो अनुभव तीनशे वर्षांनंतर प्रत्यक्ष स्वतः अनुभवण्याची कल्पना आणि ती कल्पना प्रत्यक्ष कृतीतून उतरवणे ह्यासाठी लागणारी प्रचंड इच्छाशक्ती आणि सामर्थ्य त्यांच्या ठायी होते. इतिहासाचा अभ्यास करण्याकरीता जुने, दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक बाड, दफ्तरे इत्यादी साधनांचा वापर त्यांनी केला. ह्या दोन्ही परस्पर संबंधित नसलेल्या क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले.
त्यातल्या त्यात रायगडावर त्यांचे खूपच प्रेम! त्यांनी केलेल्या साहसी मोहिमा अधिकतर रायगडावरच केल्या आहेत. छत्रपती शिवाजी राजांच्या हयातीत मावळ्यांनी केलेल्या साहसी मोहिमा त्यांनी तीनशे वर्षानंतर पुन्हा करून दाखविल्या किंबहुना त्या केवळ दंतकथा नव्हत्या हे सिद्ध करून मावळ्यांची ताकद, साहस, कौशल्य आणि निष्ठा काय असते हे महाराष्ट्राला दाखविले. पार्ल्याच्या हॉलिडे हायकर्स सोबत दूर्ग लिंगाणावरचा सुळका आरोहण, रायगडाच्या बेलाग भवानी कड्यावर आरोहण करणे, हिरकणी नंतर पौर्णिमेच्या रात्री रायगडाच्या हिरकणी कड्यावरुन खाली उतरणे अशा धाडसी मोहिमा त्यांनी पार पाडल्या आहेत. उत्तान कड्याच्या ऐन गर्भातून रायगडाला गडमध्यातून त्यांनी प्रदक्षिणा घातली आहे. प्रचंड उत्साह, इच्छाशक्तीच्या जोरावर वयाच्या ७१ व्या वर्षी साध्या चपला घालून त्यांनी तोरणा सर केला आहे.
आणि ह्याच बरोबर छत्रपती शिवाजी राजांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणाऱ्या तीन कादंबऱ्यांचे लिखाणही त्यांनी केले आहे. अशा बहुगुणी व्यक्तीचा बहुमान समाज न करेल तरच नवल!
त्यांच्या साहसी गिर्यारोहणामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ‘हिरकणी वीर’, बाबासाहेब पुरंदरे यांजकडून ‘भवानी वीर’ अशा पदव्या मिळाल्या आहेत. आतापर्यंत कै. डॉ. काशिनाथ घाणेकर विश्वस्त प्रतिष्ठान तर्फे ‘सुलेखन पुरस्कार’, महाराष्ट्र कला निकेतन तर्फे ‘सर्वोत्कृष्ट रंगकर्मी’, गिरीमित्र मंडळातर्फे ‘ज्येष्ठ गिर्यारोहक’, ‘पार्लेभूषण’ पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. २०१५ साली शिवाजी महाराजांच्या ३३५ व्या पुण्यतीथीचे औचित्य साधून तात्कलीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला.
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचे कमर्शिअल आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाले होते. पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सन १९७८ पासून गेली ४० वर्षे त्यांनी सुलेखनकार म्हणून फलक रंगविण्याचे काम केले आहे. कै. काशिनाथ घाणेकर, लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सारख्या दिग्गज मंडळींसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. अनेक मोठ्या लोकांना ते स्वतःच्या हातांनी सजविलेल्या तुळजाभवानी देवीचे मुखवटे भेट म्हणून देत. पु. ल. आणि तु. वि. यांचे पत्रव्यवहार सुद्धा होत असत. त्यांचे अक्षर अतिशय सुंदर होते. त्यांनी लिहिलेली पत्र किंवा पाकिटे जपून ठेवावी अशी असत. त्यावर नेहमी ते काहीतरी कलाकुसर करून भेट म्हणून देत. त्यामुळे त्यांच्या भेटीतले वेगळेपण कायम सगळ्यांना जाणवत असायचे. दीनानाथ नाट्यगृहामुळे त्यांचा अनेक रंगकर्मीशी परिचय होता.
‘गिरिदुर्ग आम्हा सगे सोयरे’, ‘शिवरायाचा आठवावा प्रताप’ आणि ‘श्रीमंत योगी’ हे शिवरायांच्या संबंधित त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. शेवटचे पुस्तक त्यांचे हे विरक्तीकडे झुकणारे असे होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘धीमंत योगी’ ह्या पुस्तकाचे संकलन त्यांनी त्यांच्या शब्दात केले. त्यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक ‘अपूर्व पार्लेकर’.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपतींचा इतिहास आणि भूगोल यांचा ध्यास घेतलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या आयुष्याची सांगता ‘शिवजयंती’च्या पवित्र दिनी व्हावी, ह्यास परमेश्वराने त्यांच्या कार्याचा केलेला उच्च गौरव म्हणावा कि काय हि भावना मनात दाटून येते व नकळतच हात जोडले जातात आणि डोळे ओलावतात.
संक्षिप्त चरित्र:
जन्मः २० मे १९४०
मृत्यू: ४ मार्च २०१८
छंद:
गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, लेखन, रांगोळी, पडद्यावरील थर्माकोल सजावट, कल्पकरित्या कार्यक्रमाचे आकर्षक सादरीकरण
लेखन:
१. गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे
२. शिवरायाचा आठवावा प्रताप
३. श्रीमंत योगी
या तीन शिवग्रंथांचे लेखन, आणि
४. धीमंत योगी हे स्वामी विवेकांनद यांचे चरित्र विषयक संकलन केलेले पुस्तक
दुर्गभ्रमण:
एकूण पस्तीस किल्यांचे – दुर्गदर्शन
पुरस्कार:
कै. डॉ. काशीनाथ घाणेकर विश्वस्त प्रतिष्ठानतर्फे सुलेखन पुरस्कार
गिरिमित्र मंडळातर्फे जेष्ठ गिर्यारोहक पुरस्कार
विलेपार्ले शिवसेनेतर्फे ‘पूर्व पार्लेकर ‘पुरस्कार
महाराष्ट्र कला निकेतनतर्फे ‘सर्वोकृष्ट रंगकर्मी‘
महाराष्ट्र शासन पु. ल. अकादमीतर्फे ‘कल्पक रंगकर्मी ‘पुरस्कार
पदवीदान:
मा. बाळासाहेब ठाकरे यांजकडून ‘हिरकणी वीर’
बाबासाहेब पुरंदरे यांजकडून ‘भवानी वीर ‘
गो. नी. दांडेकर यांजकडून ‘रायगड भूषण”
डॉ. काशिनाथ घाणेकर यांजकडून ‘अक्षर भूषण’
आणि अन्य …
काही क्षणचित्रे








कै. तुकाराम जाधव यांनी लिहिलेले लेख वाचा:
- RAIGAD FORT – रायगडी चढावे… पाच वाटांनी…
- (MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड
- किल्ले माणिकगडावरील रात्र !
