मी वाचक कसा झालो?

खरेतर सुरुवातीला माझे आवडते लेखक आणि त्यांची पात्रे याविषयी लिहिण्याचे मी ठरविले होते. पण त्या अगोदर मला वाचनाची आवड कशी लागली ते सांगावेसे वाटते. विविध लेखकांची पुस्तके मी वाचली आहेत. तसे माझे वाचन मर्यादीतच आहे आणि गेली कित्येक वर्षे त्यात खंड पडलेला आहे. हि वाचनाची आवड मला खूपच लहानपणी लागलेली आहे, त्याची हि कथा.

माझा जन्म मुंबईचा. जन्म १९६२ सालाचा, म्हणजे कथा खूप जुनी आहे. हे लक्षात आले असेलच. मध्य मुबईतील डोंगरी भागातील चिंचबंदर येथील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बी.आय.टी. चाळीत मी लहानाचा मोठा झालो. आई आणि वडील दोघांनाही वाचनाची खूप आवड होती. विविध लेखकांच्या कादंबऱ्या, रहस्यकथा, भयकथा, नाटके, गोष्टींची पुस्तके, किशोर मासिके, मासिके, साप्ताहिके इत्यादी साहित्य आमच्या घरात कायम असे. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप इ. नावे तर मला लहानपणापासूनच माहिती होती. मी ३-४ वर्षांचा झालो तेव्हा माझ्या आईवडिलांनी अक्षर ओळख करून देऊन मला मराठी लिहावयास व वाचावयास शिकविले, त्यामुळे शाळेत जाण्याअगोदरच मी थोडे वाचवयास शिकलो होतो. बाजारात किंवा फिरावयास गेलो की रस्त्यांवरील दुकानांच्या पाट्यावरील नावे व इतर मजकूर वाचणे, बस किंवा ट्रेन मधील सूचना, जाहिराती वाचणे, चित्रपटांची पोस्टर्स वाचणे इ. गोष्टी मला शाळेत जाण्याअगोदरच वाचता येत होत्या. परंतु माझ्यावर वाचन संस्कार करणे आणि माझ्यात वाचनाची आवड निर्माण करणे व मला चांगला वाचक बनविणे ह्यात आमच्या चाळीतील ढवळेनाना आणि त्यांच्या शेजारचे कलवभाऊ ह्यांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते.

आमच्या खोलीच्या बरोबर समोरच्या खोलीत राहात होते रामचंद्र ढवळे, सर्वजण त्यांना ढवळेनाना म्हणत असू. त्यांच्याच उजव्या बाजूच्या खोलीत विठ्ठल कलव रहात असत, आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. हे कलवभाऊ भाऊच्या धक्क्याला कामाला जात असत. भाऊच्या धक्क्याजवळ गोदीमध्ये कुठल्याश्या कंपनीमध्ये (किंवा सरकारी खात्यामध्ये) कामाला होते होते, शिवाय ते त्यांच्या गावी वेंगुर्लाला जात ती बोट सुध्दा भाऊच्या धक्क्यावरूनच सुटायची. म्हणून त्या जागेला भाऊच्या धक्का हे नाव पडले हा माझा मोठा गोड समज होता. एवढा मोठा माणूस आमच्या छोट्या चाळीत राहतो याचे मला आश्चर्य आणि अभिमान वाटायचा. समोरच्या खोलीत ढवळेनाना एकटेच रहात असत. त्यांचे कुटुंबीय म्हणजेच ढवळे आजी आणि त्यांची मुले-सुना हि गावी राहून शेती पाहात असत व अधूनमधून १५-२० दिवस मुंबईला येवून राहात असत. त्यांची मुले म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाची होती. काही वर्षांनी नाना गावाला राहायला गेल्यावर ते मुंबईला येऊन स्थायिक झाले. हे ढवळेनाना गोदीमध्येच कुठेतरी मुकादम म्हणून काम करीत होते. ते सकाळी उठून चहा पिऊन झाला की, ते त्यांच्याकडील वर्तमानपत्र जमिनीवर पसरवून वाचावयास घेत आणि विडी ओढता ओढता ते वर्तमानपत्र वाचत असत. त्यांच्याकडे ‘नवाकाळ’ हे वर्तमानपत्र येत असे.

दरवाजा बंद करण्याची सवय चाळीत अजून कोणालाच नव्हती. सर्वांचे दरवाजेच नेहमी उघडे असत. फक्त दुपारी वामकुक्षी करीत असताना काही दरवाजे थोडा वेळ बंद असत. समोरासमोर खोली असल्याकारणाने नाना वर्तमानपत्र वाचत बसले असे दिसले की मग मी त्यांच्या खोलीत जावून बसत असे किंवा ते मला ‘चारु, ये’ अशी हाक मारून बोलवत असत. त्यांच्या शेजारी बसून मी त्या वर्तमानपत्रातील चित्रे वगैरे सुरूवातीला बघत असे, थोड्या वेळाने ते मला त्यांनी वाचलेले एक पान काढून देत असत. मी ते मग वाचण्याचा प्रयत्न करू लागे (?). सुरुवातीला छायाचित्रे, जाहीराती, मोठ्या अक्षरातील वर्तमानपत्राचे नाव व लोगो पाहणे. त्याच्या दोन्ही बाजूला चौकोनात छोट्या जाहीराती असत त्या वाचणे आणि मग मोठा टाईपातील मुख्य बातमीचा ठळक मथळा वाचून नंतर खालील बाजूला असलेल्या इतर छोट्यामोठ्या बातम्यांचे मथळे वाचणे अशी माझी प्राथमिक अवस्था होती. मथळे व त्यांचा अर्थ साधारण कळायचा. बातम्या पूर्ण वाचण्याचा कंटाळा यायचा, काही कळायचे नाही, फक्त मथळे वाचण्याचा आनंद. त्यानंतर आतील पाने पहावयास मिळत. त्यातील चित्रपट व नाटकांच्या जाहिराती हमखास वाचत (कि पाहत) असे. नाना माझ्याकडून थोडेफार वाचनही करून घेत असत. वर्तमानपत्र वाचून झाले की साधारण नऊ साडे नऊला नाना कामावर जात. मग तिकडून उठून मी कलव भाऊंच्या घरात जात असे. भाऊंकडे ‘लोकसत्ता’ येत असे, मी जाईपर्यंत भाऊंचे वर्तमानपत्र वाचन झालेले असे व ते कामावर जायच्या तयारीत असत. मी मग त्यांचा ‘लोकसत्ता’ घेऊन जमिनीवर बसून वाचण्याचा (कि पहाण्याचा?) प्रयत्न करीत असे. मी सर्वांचा अतिशय लाडका असल्याने मला कोणी काही बोलत नसे. उलट खाऊ देखिल मिळे. माझे वाचन पूर्ण झाले, आता बस झाले, असे वाटले की मग मी घरी जात असे. मग अभ्यास आणि जेवण करून मी शाळेत जात असे.

संध्याकाळी शाळेतून साडेपाच वाजेपर्यंत मी घरी येत असे. मग पुढे नाश्ता झाल्यावर खेळ वगैरे. तोपर्यंत सात वाजत. तेव्हा नाना कामावरून परत येत. उंच, सडपातळ, अंगात सदरा व धोतर घातलेले असे नाना संध्याकाळी घरी येत तेव्हा त्यांच्या हातात मुंबईचे सुप्रसिद्ध सांजदैनिक ‘संध्याकाळ’ असे व कधीकधी माझ्यासाठी खाऊ. खोली उघडून आत गेले की पहिली मला हाक मारायचे, किंवा मी टपूनच बसलेलो असायचो. मी गेलो की मला खाऊ व ‘संध्याकाळ’ द्यायचे मग ते हात-पाय धुऊन परत येईपर्यंत मी ‘संध्याकाळ’ वाचून काढायचो. छोट्या आकाराचे आणि केवळ चार पानांचा ‘संध्याकाळ’ वाचायला फार वेळ लागत नसे.

या सवयीमुळे मी दुसरीत जाईपर्यंत चांगला वाचक झालो होतो आता मी सर्व बातम्या वाचू शकत होतो समजू शकत होतो नाहीच कळले तर नाना किंवा भाऊंना त्यांचे अर्थ विचारी (भाऊ पोथीचे पारायण करीत असत म्हणून) किंवा घरी आल्यावर आईला विचारीत असे.

पुढे ३ऱ्या इयत्तेमध्ये जाईपर्यन्त मी सर्व काही वाचावयास शिकलो होतो. ढवळेनाना यांच्या डाव्या बाजूला एक खोली सोडून पुढच्या खोलीत म्हात्रे कुटुंबीय राहत असे. मला वाटते आम्ही त्यांना बाबूजी म्हणत असू. त्यांच्या घरात माझ्या पेक्षा वयाने मोठी मुले होती. त्यांच्याकडे ‘चांदोबा’ मासिक वाचावयास मिळे. ‘चांदोबा’ वाचण्यात एक वेगळीच मजा होती. छान छान रंगीबिरंगी अशी सुंदर चित्रे पाहताना मजा यायची. आतील पानावर अनुक्रमणिकेच्या अवतीभवती सुध्द्दा छान चित्रे असायची. संपूर्ण चांदोबा एकाच बैठकीत सुमारे तासाभरात वाचण्याएवढा माझा वेग वाढला होता. पण खरा कस लागायचा तो ‘वेताळाच्या गोष्टी’ मधील विक्रम आणि वेताळ यांच्या कथा वाचताना, त्या गोष्टीच्या पहिल्या पानावरील भयानक चित्र, ज्यात कवट्या, भुते, साप, वटवाघुळे, खांद्यावर प्रेत घेतलेला राजा विक्रम, जंगलाचा रस्ता, मोठे झाड आणि गोष्टीच्या शेवटच्या पानावरील सफेद रंगातील श्मशानातील लांब शेपटीवाला उडणारा वेताळ हे सर्व बघताना भयानक भीती वाटत असे. हि गोष्ट साधारण पाचव्या, सातव्या पानावर सुरु होत असे. त्याचा अंदाज लावून ते पान दुमडून त्याच्या अगोदरचे पान वाचावायाचे, वेताळाच्या गोष्टीचे पण समोर आले कि, डोळे मिटून घेऊन पान उलटायचे आणि तेथून गोष्ट वाचावयास सुरुवात करायची. थोडा मजकूर सुटायचा पण ते परवडायचे. नाहीतरी त्या पानावरील पहिला परिच्छेद नेहमी सारखाच असायचा. त्यामुळे फार फरक नाही पडायचा.

लहानपणापासून ‘नवाकाळ’, ‘संध्याकाळ’ ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’, ‘केसरी’ अशी वर्तमानपत्रे वाचल्यामुळे संपादकीय वाचायची मला आवड निर्माण झाली. ‘नवाकाळ’, व ‘संध्याकाळ’ मधील निळकंठ खाडिलकर यांचे सतेतोड अग्रलेख, ‘लोकसत्ता’ मधील विद्याधर गोखले यांचे अलंकारीक भाषेतील अग्रलेख, त्यानंतर माधव गडकरी यांचे अभ्यासपूर्ण अग्रलेख यांचा मी लहानपणापासूनच चाहता झालो होतो. आजही मी प्रथम अग्रलेख वाचतो. परंतु ती मजा गेली आता.

पुढे अजून मोठा झाल्यावर आईला वाचनालयातून पुस्तके बदलून आणण्याचे काम मला करावे लागे. त्यावेळेस मला आई लेखकांची नावे सांगत असे. त्यामुळे नवीन लेखक मला कळाले. बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप आणि अन्य लेखकांची नावे आई सांगत असे व त्यांचे न वाचलेले कुठलेही पुस्तक आण असे सांगायची. त्यामुळे मला लेखक आणि त्यांची पुस्तकांची नावे पण माहीत झाली होती. त्यातील अर्नाळकरांचे झुंजारराव, काळ पहाड, धनंजय खूप प्रसिद्ध होते, हे कळाल्यावर बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ह्यांच्या रहस्यकथा वाचण्याचा छन्द मला लागला. मग नारायण धारप यांच्या भयकथा व गूढकथा मी ५वी, ६वी इयत्तेमध्ये असतानाच वाचून काढल्या होत्या. दिवाळीची सुट्टी म्हणजे मजाच असायची. वडील पोस्टात जीपीओला होते. तेथे खूप सभासद असल्याकारणाने केवळ १०० ते १५० रुपये वर्गणीमध्ये १०० हून जास्त वैविध विषयांवरील दिवाळी अंक वाचायवास मिळत. त्यात किशोर, टॉनिक सारखी बाल मासिके, जत्रा, आवाज, सत्यकथा, मनोहर, माहेर, मेनका, धनंजय, किर्लोस्कर, स्त्री इत्यादी अनेक लोकप्रिय मासिके वाचावयास मिळायची.

अशा तर्हेने मी समृद्ध वाचक झालो. हाती आलेला कुठलाही कागद अगदी भेळ, बटाटेवडा यांच्या पुडीचा कागद संपूर्ण वाचल्याशिवाय फेकायचा नाही हि सवय त्यामुळे लागली. रस्त्यात, प्रवासात जात असतांना, दुकानांच्या पाट्या वाचणे, सूचना फलक, जाहिराती वाचणे हि लहानपणाची सवय अजून गेलेली नाही.

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

One comment

  1. अतिशय सुंदरपणे आपण लिहिलं आहे. हे वाचत असतांना माझ्या पण जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.