मुंबई-पुणे पदयात्रा: भाग २
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग २
प्रवासास सुरुवात
आणि १७ मे १९८१ रोजीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे किंवा साधारण ६ वाजता प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो होतो. पण उठून आवरायलाच उशीर झाला. सर्व उरकल्यावर प्रथम देवाच्या आणि नंतर आईवडिलांच्या आणि शेजारील काही वडीलधाऱ्यांच्या पाय पडलो आणि घराबाहेर पाऊल टाकले. तोच समोरचा रमेश कलव पुढे आला. मला म्हणाला, “चारू, जाशील ना बरोबर? जमेल ना तुला?” त्याच्या चेहऱ्यावरची काळजी जाणवत होती. मी म्हणालो, ” हो जाऊ आम्ही बरोबर, नको घाबरू”. खरेतर रमेशच्या ह्या वागण्याचे मला आश्र्चर्य वाटले होते. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. आणि वयाने लहान असणाऱ्या माझ्यासारख्यांना तो त्रास द्यायचा. आमची नेहमी भांडणे आणि झटापटी व्हायच्या. आणि आता तो माझी काळजी करतो म्हटल्यावर, मलाच त्याची काळजी वाटू लागली. पहिल्या मजल्यावर प्रमोद तयारच होता. त्याच्याही घरी जाऊन निरोप घेतला. आम्हाला निरोप देण्यासाठी चाळीतले पंचवीस एक जण खाली उतरले होते. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. येथूनच आम्हाला निरोप द्या असे मी सर्वांना सांगितले. आम्हाला निरोप आणि शुभेच्छा देण्याकरिता चाळीच्या तिन्ही मजल्यावर गॅलरीमध्ये बरेचजण उभे होते. सगळ्या तीसच्या तीस खिडक्या भरलेल्या होत्या. एक वेगळेच वातावरण तयार झाले.
सर्वांचा निरोप घेतला आणि निघालो. त्यावेळेस सकाळचे साडे आठ वाजले होते. निघण्यास खूपच उशिर झाला होता. म्हणजे सुरुवातच लडखडत झाली होती. मुंबई तशी माझ्या पायाखालचीच होती, त्यामुळे मुंबईतून बाहेर पडेपर्यंत काहीच अडचण नव्हती. आम्ही सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या चाळीत राहायचो. तिथून सुरुवात केल्यावर सर जे. जे. हॉस्पिटल (Sir J. J. Hospital) मार्गे डॉ. मोहम्मद अली रोडने (Dr. Mohammed Ali Road) भायखळाच्या दिशेने निघालो. आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तिथून पुढे सरळ राणीबाग, चिंचपोकळी, भारतमाता, परळ, दादर, सायन, चेंबूर ते मानखुर्द हा सरळ रस्ता तसा माहीत होता. तिथून पुढे खाडी पूलमार्गे वाशी आणि त्यापुढील भाग हा मात्र नवीन होता. आम्ही आपले इकडे तिकडे पाहात रमतगमत चालत मार्गक्रमण करत होतो. मुंबईतील एकेक विभाग मागे पडत होता. चेंबूरच्या पुढे जरी रस्ता माहीत नसला तरी देखील येजा करणाऱ्या गाड्यांकडे पाहून पुण्याला जाणारा रस्ता हाच आहे हे न विचारता हि कळत होते. आणि एकदाचा आला तो वाशीला जाणारा खाडीपूल. तेथील मोठा टोल नाका. तेथील गाडयांची गर्दी, हे चित्र तसे आम्हाला नवीनच होते. ते सर्व पाहून खाडीपूलावर आलो. एवढा मोठा पूल देखील प्रथमच पहात होतो. पुलावर मध्यभागी आल्यावर जरा कठड्याजवळ थांबलो. आणि सगळीकडे पाहू लागलो. पुलाच्या खाली खोलवर खाडीचे पाणी लाटांबरोबर हलत होते, एकटक त्याकडे पाहिल्यावर पूल हलल्याचा भास व्ह्यायचा. पाण्यावर सूर्याची किरणे पडून सगळीकडे सोनेरी रंगाच्या लाटा वरखाली होताना पहायला मजा आली. पाण्यावर सूर्याची किरणे कुठून पडतात हे पाहण्यासाठी मान वर करून समोर पाहिले तो, पश्चिमेला सूर्याचा लालसर नारंगी गोळा अस्ताला जात असल्याचे जाणवले, आणि मग मात्र मी दचकलो.
प्रमोदकडे पहात मी ओरडलो, “प्रमोद, अरे हे काय?”. त्याला काहीच जाणवले नाही. तो म्हणाला, “कुठंय काय?”
“अरे, तिकडे सूर्य बघ, डुबायची वेळ झाली” मी म्हणालो.
“मग?”, तो म्हणाला.
“अरे, याचा अर्थ आता थोड्याच वेळात सूर्यास्त होवून अंधार पडणार. आणि आपण अजूनही मुंबईतच आहोत. आपल ठरलं होत ना, पहिल्या दिवशी त्या डोंगराच्या पलीकडे पनवेल पर्यंत चालायचे ते. अरे, लोकांना हे कळले तर काय वाटेल त्यांना, जरा आता पाय उचलूया आणि रात्री मुक्कामाला पनवेला पोहोचायचंच”.
चालण्यात असा उशीर झाला. दिवस संपायला आला तरी आम्ही अजून मुंबईतच, ह्या भावनेने मला माझीच लाज वाटू लागली. (म्हणजे आम्ही आतापर्यंत केवळ २0 कि. मी. अंतर पार केले होते.) अशी चूक आपल्याकडून झाली याचे वाईट वाटू लागले. पण आता हाती असलेला वेळ न दवडता रात्री उशीरापर्यंत पनवेलला पोहोचायचेच ह्या निश्चयाने आम्ही पुढे निघालो. खाडीपूल पार करून वाशी गावात आलो. पुढे गेल्यावर रस्ता उजवीकडे वळतो. तिचे जाईपर्यंत ठार अंधार झाला होता. त्याकाळी तिथे एक छोटे मंदिर होते. ( सध्या तिथे रेल्वे लाईन आहे). मंदिरात चौकशी केली पनवेल किती लांब आहे. तिथला पुजारी म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे. तुम्हाला कुठे जायचे?”. आम्ही पुण्याला निघालो हे त्याला सांगितले. त्यावर तो म्हणाला, “पनवेल खूप लांब आहे, तुम्हाला आज नाही पोहोचता येणार. शिवाय अंधार झाला आहे, रात्री गाड्या वेगात धावतात. तुम्ही आजची रात्र येथेच राहा”.
वाचा: मुंबई-पुणे-मुंबई – भाग १
पहिला मुक्काम
पण मी हट्टाला पेटलो होतो, म्हणालो, “नको. आम्ही निघतो. आज रात्री डोंगराच्या पलीकडे तर जाऊच आम्ही”. असे म्हणून आम्ही तिथे न थांबता निघालो. सावधगिरी म्हणून आम्ही गाड्यांच्या विरुध्द्व दिशेने, म्हणजे मुंबईला येणाऱ्या रस्स्त्याने पुण्याच्या दिशेला चालू लागलो. त्याकाळी तिथे नवीन उपनगरे निर्माण झाली नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरील गाड्यांशिवाय कोणी नव्हतं. चालण्याचा वेग वाढवला, त्यामुळे रात्रीची थंड हवा असून सुद्धा घाम आला. अशा तऱ्हेने चालत चालत बरेच अंतर कापले. पुढे एकदाच तो डोंगर संपला. एक चढ आणि मोठे वळण आले. वळणावरून पुढे आलो तर, खाली मोठे गाव लागले. लांबून दिव्यांचा झगमगाट आणि मोठमोठ्या इमारती पाहून जीवात जीव आला. मनात म्हटलं, “चला, आले एकदाचे पनवेल”.
उतारावरून खाली आल्यावर जरा शंका यायला लागली. मी पाहिलेले पनवेल हे नाही असे वाटू लागले. मग हे कुठले गाव आले मध्येच? तोवर खूप रात्र झाली होती. रात्रीचे ११ वाजले होते. गावात एसटी स्टॅन्ड वगैरे असणारच. तिथे जाऊन पाहूया असे म्हणून डावीकडच्या रस्त्याने आत गेलो. जरा पुढे गेल्यावर लगेचच बसस्टॅण्ड दिसला. ठाणे, वाशी पासून येणाऱ्या स्थानिक बसगाड्या तेथून येजा करता होत्या.
स्टॅण्डवर जाऊन विचारले. “ह्या गावाचं नाव काय आहे?”.
स्टॅन्डवरील माणूस, “कोकण भवन”.
“हे कुठले गाव, नाव कधीच ऐकले नाही”, पनवेल कुठंय मग?” मी म्हणालो.
“हे कोकण भवन आहे, म्हणजे सीबीडी बेलापूर. कोकण रेल्वेचे ऑफिस आहे, कोकण भवन बिल्डींग मध्ये. म्हणून कोकण भवन म्हणतात”. “तुम्ही कोण, कुठे निघालात?”.
मी म्हटले, “आम्ही पुण्याला चालत निघालोय, आणि पनवेल पर्यंत जायचं आहे आज”. आमची माहिती दिली. सोबतची पत्रे दाखविली. तोपर्यंत अजून तीन चार ड्राइवर, कंडक्टर वगैरे तिथे जमा झाले. आमची चौकशी केली.
मग त्यांनी सांगितले. “पनवेल इथून १२ किलोमीटर वर आहे, खूप रात्र झाली आहे. आता आजची रात्र इथेच काढा. आम्ही पहाटे पर्यंत आहोत तुम्हाला सोबती.”
असे म्हणून त्यांच्या विश्रांतीच्या खोलीबाहेर आम्हाला झोपायला सांगितले. चौदा तासांहून अधिक वेळात आम्ही सुमारे ४० किमी अंतर पार केले होते. त्यामुळे पायांचे पार तुकडे पडायची वेळ झाली होती. भूक पण लागली होती. त्यामुळे थोडे फार खाऊन घेतले आणि सकाळी लवकर उठून पनवेल सकाळी सकाळी गाठूया असा विचार केला आणि पायाचे दुखण वगैरे विसरून लगेच झोपी गेलो.
सकाळी लवकर उठलो, रस्त्यात एखादी नदी लागली तर अंघोळ करू असा विचार करून स्टॅण्डवर तोंड वगैरे धुवून चहा घेतला आणि लगेचच निघालो. माझ्या जवळच्या नोंद वहीमध्ये स्टॅण्डवरील अधिकाऱ्याकडून वेळ नोंदवून शेरा लिहून घेतला. कालच्या अनुभवातून शहाणे होऊन अजिबात वेळ न दवडता, इकडे तिकडे न पहाता आम्ही पनवेलच्या दिशेने मार्गक्रमण केले. साधारण दहा-साडे दहा वाजेपर्यंत पनवेल गाठले. तिथे थोडेफार खाऊन घेतले.
दुसरा मुक्काम
मजल दरमजल करीत चाललो असताना पनवेलच्या पुढे १८ किलोमीटर अंतरावर चौक नावाचे गाव लागले. गाव जरा मोठे वाटले. गावाच्या बाहेरून बायपास जात होता. उजवीकडे छोटा रस्ता गावात शिरला होता. संध्याकाळ झालीच होती. तेव्हा यापुढे न जाता याच गावात मुक्काम करूया असे ठरवून गावात शिरलो. आता या अनोळखी गावात कशी रात्र काढायची कळेना. पण मनात म्हटले, “बघूया. पहिले गावात तर जाऊ. गावात शाळा किंवा मंदिर असणारच. तिथे जाऊन काढू आजची रात्र. जेवण नाही मिळाले तरी चालेल, बॅगेतले काहीतरी खाऊन झोपू”. गावात आता शिरताच रस्त्याच्या कडेला पाटी दिसली. ‘शिवसेना शाखा चौक, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, आपले सहर्ष स्वागत करीत आहे’. शिवसेना शाखा या गावात आहे हे कळल्यावर आनंद झाला. मनात म्हटले, “चला सोय झाली, आता शाखेतच मुक्काम करूया”. गावात शाखा कुठे आहे, हे विचारल्यावर आम्हाला घेवून दोन तीन मुले शाखेपर्यंत आले. शाखेत काही तरुण मुले बसली होती. जय महाराष्ट्र करून आमची माहिती दिली. आमच्या मुंबईच्या शाखेचे पत्र दाखविले. ते वाचून शाखेतील उपस्थित मुले एकदम खुश झाली. मुंबईचे शिवसैनिक मुंबई ते पुणे चालत जात आहेत हे ऐकून त्यांना आनंद झाला. लगेच आम्हाला चहा पाणी दिला. तोपर्यंत अंधारले होते.
शिवसैनिकांची मदत
मी विचारले, “आजची रात्र आम्ही इथेच शाखेबाहेर झोपलो तर चालेल का?”
एक शिवसैनिक म्हणाला,”असे कसे होईल, आम्ही तुमची सर्व सोय करू, जरा वेळ थांबा, शाखाप्रमुख येतीलच इतक्यातच, त्यांना निरोप पोहोचवलाय तुम्ही आल्याचा”.
माझ्यावर फारच दडपण आले, ‘आम्ही कोण आणि कुठले?, अन स्थानिक शाखाप्रमुख आम्हाला भेटायला येत आहेत म्हणजे काय?’ त्यांना सामोरे कसे जायचे, काही सुचेना.
नंतर अडचण नको म्हणून एकाला हळूच विचारले, “इथले शाखाप्रमुख कोण आहेत, त्यांचे नाव काय”.
दुसरा शिवसैनिक म्हणाला, “त्यांचे नाव ‘देवेंद्र साटम’, ह्याच गावाचे आहेत”.
इतक्यातच शाखाप्रमुख ‘देवेंद्र साटम” तेथे आले. आल्याबरोबर आमचे अभिनंदन केले आणि थोडी विचारपूस केली. आम्ही त्यांना मुंबईच्या शाखाप्रमुखांचे पत्र आणि आमची नोंदवही दाखवली. त्यांनी नोंदवही मध्ये शेरा लिहिला. स्थानिक शिवसैनिकांना काही सूचना दिल्या, आणि काही लागले तर आमच्या शिवसैनिकांना सांगा तुम्हाला पाहिजे ती मदत मिळेल, असे सांगून निघून गेले. हेच देवेंद्र साटम पुढे कर्जत खालापूर मतदार संघातून तीनवेळा आमदार झाले आहेत.
मग एका शिवसैनिकाने (आता त्यांचे नाव आठवत नाही) आम्हाला त्याच्या घरी नेले. तिथे आम्हाला त्याच्या घरच्यांनी छान जेवण दिले. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात अंथरूणे टाकून दिली. (खूप वर्षे झाल्याकारणाने काही संदर्भ विसरलो आहे, त्यातच, जपून ठेवलेली माझी नोंदवही देखील सापडत नाहीय, त्यामुळे माहीती आणि नावांचा थोडा घोटाळा होवू शकतो, त्याबद्दल क्षमस्व).
तसे फारसे अंतर आज चाललो नव्हतो, पण आज पाय खूप दुखत होते. तेव्हा प्रमोदच्या ताईने दिलेल्या औषधाची आठवण झाली, तिने सांगितले होते कि, “पाय दुखले, तर हे औषध लावा”. औषधाची बाटली काढली, थोडे हातावर घेवून बघितले, आयोडेक्सच्या वासाचे ते एक तेल होते. ते तेल दोघांनी पायांना चोळले. त्याचा चांगलाच घमघमाट सुटला होता. आणि काय आश्चर्य? आमचे ठणकणारे पाय आणि पायचे स्नायूंचे दुखणे चमत्कारीकरीत्या पाचच मिनिटात गायब!
अशा तऱ्हेने आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस संपला. आजच्या दिवसात आम्ही ३० किलोमीटर चाललो होतो. म्हणजे आम्ही दोन दिवसात साधारण ७० किलोमीटर अंतर पार केले होते.
असा प्रवास केल्यावर पुण्याला पोहोचणार तरी कधी? बघू उद्या, असा विचार करून आणि दिवसभराच्या थकव्याने आम्ही पुढच्या पाचच मिनिटात झोपी गेलो.
मुंबई-पुणे प्रवास – भाग २ समाप्त.
आमचा पुढचा प्रवास कसा सुरु झाला …. ते वाचा पुढच्या भागात.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

मुंबईचे माजी महापौर स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांनी दिलेले शिफारसपत्र
हा लेख आपल्याला आवडला असणारच याची मला खात्री आहे. कृपया हा लेख आपल्या मित्रांना सामाईक (Share) करा.