Mumbai-Pune by Feet
|

Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १

मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा (Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १)

वर्ष १९८१. नुकतीच बी. एस्सी. च्या पहिल्या वर्षाची परीक्षा संपली होती. दुपारपासून गच्चीवर क्रिकेट खेळून दमलो होतो. संध्याकाळी अंधार पडल्यावर नाईलाजाने क्रिकेट बंद करून आम्ही काही मित्र पाण्याच्या टाकीवर बसून थंड हवा खात गप्पा मारत बसलो होतो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सहा महिन्यांपूर्वीच १९८०चे मॉस्को ऑलिम्पिक संपन्न झाले होते. ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू कसे कसब दाखवायचे. त्या रोमानिया तसेच बल्गेरिया, झेकोस्लोव्हिया, युगोस्लोव्हिया इत्यादि कठीण उच्चारांची नावे असलेल्या देशांचे खेळाडू वैयक्तिक कामगिरी करून कसे पदक पटकावतात हा विषय निघाला.

” ते खेळाडू खूप कष्ट आणि मेहनत करतात. त्यांचा सराव खूपच कडक असतो”, एकजण म्हणाला.
“हो, पण त्यांचे सरकार त्यांची खूप काळजी घेते, त्यांना सर्व साधने आणि सवलती पुरविल्या जातात”, दुसरा एकजण म्हणाला.
“अरे ते तर जाऊ दे, त्यांना लहानपणापासूनच खेळासाठी तयार केले जाते”, अजून तिसरा एकजण म्हणाला.
असा फार मोठ्या गहन विषयावर वाचाळपणा सुरु होता.
त्यावर एकाने अजून विषय पुढे नेला, “अरे, त्या जापान, जर्मनी आणि युरोप मधले लोक कसे एकेक विक्रम करत असतात. कोणी सायकलवर देश फिरतात, कोणी उलटे चालत फिरतात. काही जण तर चालत जग फिरतात. आणखी कायकाय करतात ते लोक, हल्ली टीव्हीवर दाखवतात ते सगळं. अन आपल्याकडे काय कोण करत नाही, आपल्या लोकांना नाय येत तसे काही”. काही जण त्याला अनुमोदन देत होते.

एवढा वेळ मी सर्वांचे ऐकून घेत होतो. पण हे शेवटचे वाक्य ऐकल्यावर मात्र मला राहावले नाही. “अरे, दुसऱ्याचं कशाला सांगता तुम्ही. तुमच्या हिम्मत आहेत का तसे काही करायची? तुम्ही का नाही करत तसे काही?” मी ओरडलो.
सगळे चूप.
“अरे, पण आपण कुठे काय करू शकतो? आपल्याला काय येतंय?”, एकजण म्हणाला.
पण मी जरा पेटलो होतो, “नसुदे काही येत आपल्याला. ते उलटे चालतात, पण तुम्हाला सरळ तर चालायला तर येतं ना? मग आपण तेवढे तरी करु शकतो कि नाही?”
“म्हणजे काय करू शकतो?”
” हे बघ, ते पायी जग फिरतात ना?, मग आपण लांब नको, पण मुंबई ते पुणे (Mumbai to Pune by Feet) चालत जाऊ”.
मी जरा जास्तच पेटलो होतो, ” मला लोकांचे नका सांगू तुम्ही आता, तुम्ही कोणकोण पुण्यापर्यंत चालत जाऊ शकता ते सांगा पहिलं?”.
सगळे परत चिडी चूप.
“अरे सोड ना विषय, आपल्याला नाही जमणार ते, कोणी नाही जाणार पुण्याला चालत”, एकाने माघार घेतली.
“स्वतःला नाही जमत म्हणून दुसरे कोणी करू शकणार नाही असे नसते, उगाचाच नावे नका ठेवू आपल्या देशातील लोकांना”. मी म्हणालो.
आता, माझा असा स्वभाव सर्वांना माहीतच होता. म्हणून सर्वांनी माघार घेतली व चूप झाले.
पण मी तर पुरता पेटलो होतो, “हे बघा, तुम्हाला जमणार नसेल, तर हरकत नाही, पण मी आता ठरवले, मी पुण्याला चालत जाणार”. असे बोलून मी एखाद्या सेनापतीसारखा स्वतःच्याच मनाने स्वतःच्याच पैजेचा विडा स्वतःच उचलला.
आणि गरजलो, “तुमच्या पैकी कोण माझ्या बरोबर पुण्यापर्यंत चालत येणार ते सांगा”.
एखादं कुत्र्याचं पिल्लू घाबरून खाली मान घालून कसे मागे मागे जाते तसे, एकएक जण करू लागला.
पण एक वीर जवान पुढे आलाच. “चारू, तू खरोखर जाणार पुण्याला चालत?” प्रमोदने मला विचारले.
“हो मी नक्की जाणार, कोण सोबत नाही आले तरी एकटा जाणार”, जसा विरोध वाढू लागला तसा माझा निश्चय पक्का होत चालला.
प्रमोद पण पेटला, “तू जाणार, तर मी पण येणार तुझ्याबरोबर. आपण दोघे जाऊ पुण्याला चालत”.
अशा तऱ्हेनं मुंबई ते पुणे पायी चालत जाण्याचा उपक्रम मी आणि प्रमोद राऊत असे आम्ही दोघेजण करणार असे मी तिथल्या तिथे रात्रीच्या अंधारात पाण्याच्या टाकीवर बसून जाहीर केले.

घरची परवानगी मिळवली

मुंबई ते पुणे पायी जाण्याचा हा निर्णय आम्ही घरी न विचारता किंवा चर्चा न करताच परस्पर घेतला होता. मला माझ्या घरच्यांची परवानगी मिळणार ह्याची मला खात्री होतीच. पण आमचे दादा म्हणजे माझे वडील गावाला गेलेले होते. ते उद्या परवा येतील मग त्यांना सांगून टाकू आणि मग पुढच्या तयारीला लागू असे मी ठरवले. प्रमोदने सुद्धा घराची परवानगी मिळण्याची खात्री दिली, आणि गरज वाटली तर त्याच्या घरच्यांना पटवायची जबाबदारी माझ्यावर टाकली. बाकीच्या मित्रांनी “बघा हं, विचार करा पुन्हा. पुणे काही जवळ नाहीय. त्रास होईल. तुम्हाला काय झालं तर?” अशा प्रकारे बोलून, समजावून मला ह्या उपक्रमापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या स्वभावाप्रमाणे मला जितका जास्त विरोध होई, तितका माझा निश्चय अजून पक्का होई.

गच्चीवरून खाली घरी आलो. अन पाहतो तर काय? वडील गावावरून परत आलेले होते अन अंघोळ करत होते.
मी बाहेरूनच वडिलांना सांगीतले, “दादा, मला पैसे लागतील”.
त्यांनी विचारले “कशाला?”
मी, “पुण्याला चालत जायचंय”.
“अरे, मग चालत जायला पैसे कशाला लागतात”, वडील अजून माझ्या पुढचे होते.
“दादा, चालायला पैसे नकोत, वाटेत काही खायला प्यायला, खर्चायला लागेल ना”.
वडील म्हणाले , “थांब जरा, नंतर बोलू”.

अंघोळ करून वडील बाहेर आल्यावर मी माझी योजना आई वडिलांना सांगितली. त्यांनी लगेच होकार दिला. काहीही प्रश्न विचारले नाही मला. वडिलांनी पन्नास रुपये देण्याचे कबूल केले.

“पुण्यात आपले काही नातेवाईक आहेत. त्यांची मदत मिळेल, आपण त्यांना पत्र टाकूया” असे वडील म्हणाले.

प्रमोद राऊत हा पहिल्या मजल्यावर राहायचा आणि मी दुसऱ्या. माझ्या घरून संमती मिळाल्यावर मी लगेच त्याच्या घरी जाऊन सर्व बेत सांगितला. मी सोबत आहे म्हटल्यावर त्याच्या घरूनही फारशी आडकाठी झाली नाही. प्रमोद हा स्काउटचा विद्यार्थी. माझ्यापेक्षा वयाने आणि उंचीने लहान. पण अंगाने दणकट. (त्याचे टोपण नाव शिंदोड होते, त्याचा अर्थ मला अजूनही माहित नाही). लगेचच आमच्या मित्रांना आम्हाला घरून परवानगी मिळाली हे सांगितले. आमचा पुण्याला चालत जाण्याचा बेत हाणून पाडणे हे माझ्या आईवडीलांच्याच हातात होते, त्यावर सर्वांची भिस्त होती. पण त्यांनीच परवानगी दिली म्हटल्यावर मित्रांचा नाईलाज झाला. उगीच गच्चीवर काहीतरी बोलून ह्याला डिवचला अशा अपराधी भावनेने माझे मित्र दुःखी झाले आणि ह्या दुःखाच्या भरात सर्व मित्रांनी “चारु आणि शिंदोड पुण्याला चालत जाणार” हि बातमी रात्री उशिरापर्यंत अख्ख्या चाळीत पोहोचवली आणि मगच हलक्या मनाने झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी चाळीत सगळीकडे चर्चा. आमच्या कार्यक्रमाचे पुढारीपण माझ्याकडे आपोआपच आले होते. म्हणून जो भेटेल तो मला अधिक माहिती विचारी. मी नंतर सांगतो असे म्हणून वेळ निभावायचो.

खरेतर आम्ही फक्त “मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) चालत जाणार आणि परत पुणे ते मुंबई चालत येणार” एवढेच ठरवले होते. पण मी किंवा प्रमोद दोघांनीही पुणे कुठे असते आणि कसे दिसते हे या अगोदर पहिलेच नव्हते. आमच्या गावी जाणारी एसटी बस लोणावळ्याच्या पुढे डावीकडे वळून तळेगाव मार्गे राजगुरुनगरच्या दिशेने जात असे. त्या ठिकाणाचा रस्ता सरळ पुण्याला जातो. एवढीच माझी पुण्याची माहिती! आणि प्रमोद हा कोकणातला, त्यामुळे त्यानेही पुणे हे फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकातच वाचलेले. मुंबई ते पुणे हे रस्त्याने किती किलोमीटर अंतर आहे हे देखील माहित नव्हते. (नंतर लक्षात आले, कि हे अंतर ठाऊक असते आणि रस्त्यातील गावांची नावे माहीत असती तर वेळ आणि वेग यांचे गणित बसवता आले असते). त्यामुळे पुण्याला कसे जायचे ह्याचा अभ्यास आम्ही प्रथम सुरु केला. त्यावर एकेकाने वेगवेगळा सल्ला द्यायला सुरुवात केली. दुर्देवाने मुंबईहून पुण्याला जाण्याकरिता केवळ दोनच मार्ग होते. म्हणून जास्त सल्ले मिळू शकले नाहीत. मला ठाणे-मुंब्रा मार्गे पनवेल-लोणावळा हा मार्ग आमच्या गावाच्या एसटी बसमुळे माहीत होता. पण वाशीच्या खाडीपूल मार्गे नवीन रस्ता सुरु झालेला आहेत, त्याने गेला तर तुमचे खूप अंतर वाचेल असे बऱ्याच जणांनी सांगितले.

मार्गदर्शन

आता हा वाशीचा पूल कुठे लागतो हे विचारल्यावर काही जणांनी मला लगेच चाळीच्या गच्चीवर नेलं. गच्चीवरून साधारण उत्तर पूर्व दिशेला दूरवर दिसणाऱ्या द्रोणागिरीच्या डोंगराच्या रांगेकडे बोट दाखवून हातवारे करून सांगितले. “पहिलं सरळ दादरला जायचं, तेथून पुढे सरळ सायन-चेंबूर मार्गे मानखुर्दच्या पुढे ह्या डोंगराच्या अलीकडे मोठी खाडी लागेल, खाडीवर नवीन मोठा पूल बांधला आहे. खाडी ओलांडली की वाशी, नंतर उजवीकडे वळून त्या डोंगराच्या खालून रस्ता जातो. अन त्या डोंगराच्या पलीकडे गेलात कि मग पनवेल लागतं. एकदम शॉर्टकट आहे”. असे अभिनव पद्धतीने खरोखरचे मार्गदर्शन केले.

अन मी पण फसलो त्या मार्गदर्शनाने. मनात म्हटले, “अरे, हे तर चांगलेच झाले. डोंगर तर जवळच दिसतोय. अन डोंगर ओलांडला कि पनवेल. खरंच खूप अंतर वाचेल. ठाणे-मुंब्रा मार्गे पनवेलला जायला मोठा वळसा घालावा लागणार, त्यापेक्षा हे बरंय!” अशा तऱ्हेने कुठल्या मार्गाने पुण्याला जायचं ते गच्चीवर उभ्याउभ्याच ठरवले. तीन दिवसात दरमजल करून आम्ही पुण्याला पोहोचू हे पण नक्की केले.

खरेतर माझ्या वडीलांना सर्व माहीत होते. पण त्यांनी आम्हाला फार काही न सुचविता, “न घाबरता तुम्हाला जसे जमेल तसे करा”, असे सांगितले होते. (खरेतर हि जगणे शिकविण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी वापरली होती).

पूर्वतयारी

आता नवीन प्रश्न निर्माण झाला.
“अरे, तुम्ही असे दोघेच रस्त्याने जाणार, तुमची ना ओळख ना पाळख. मग तुम्हाला कोण ओळखणार आणि मदत करणार? तुम्हाला कोणी चोर म्हणून पकडले तर?” असे नाना प्रश्न विचारले.


प्रश्न बरोबर होता, अन माझ्याकडे उत्तर नव्हते. मग एकाने सुचविले, “आपल्या विभागातील मान्यवरांकडून तुमची ओळखपत्र बनवून घेवू”.

मग मुंबईचे महापौरपद दोन वेळा भूषविलेले स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांचे नाव कोणीतरी सुचवीले. त्यांची मुले सेवादलाच्या माध्यमातून माझ्या ओळखीची होती. त्यांच्या मार्फत राजाभाऊ चिंबुलकर यांची भेट घेतली. आमचा मुंबई ते पुणे (Mumbai to Pune by Feet)पायी जाण्याचा उपक्रम त्यांना सांगितला. त्यावर त्यांनी आनंदाने आमच्यासाठी ओळखपत्र वजा शिफारसपत्र लगेचच स्वतःहून टाईप करून दिले व आम्हाला शुभेच्छा दिल्या. आमच्याच चाळी समोरील शिवसेना शाखा क्र. ६ चा मी धडाडीचा अर्धवेळ कार्यकर्ता होतो. त्यावेळेचे शाखाप्रमुख श्री. विजय पाटकर यांनी आमच्या उपक्रमाचे कौतुक करून आम्हाला शिफारसपत्र लिहून दिले. आणि कुठेही काही अडचण आली तर स्थानिक शिवसेना शाखेत जाऊन शिवसैनिक म्हणून ओळख सांगायची आणि हे पत्र दाखवायचे, तुम्हाला सर्व मदत मिळेल असे सांगितले. आणि खरोखरच त्या दोन्ही पत्रांमुळे आम्हाला खूपच फायदा झाला.

माझ्याकडे शाळेत असताना वापरायचो ते नारंगी रंगांचे रेक्झिनचे दप्तर होते. चार पाच वर्षाने ते बाहेर काढले. चर्मकाराकडून त्यांचे बंद, पट्टा वगैरे शिवून घेतल्या. त्याकाळी आजच्या सारख्या सॅक मिळत नसत. प्रमोदने सुद्धा त्याचे खादीचे दप्तर बाहेर काढले. त्याच्याकडे स्काऊटचे कॅनव्हासचे बूट होते. माझ्या कॅनव्हासच्या बुटावर प्रयोगशाळेत ऍसिड पडल्यामुळे त्याला भोक पडले होते. त्यावर माझ्या जुन्या कॉड्रा जीन्स पॅन्टीचा सुमारे दीड इंचाचा गोलाकार भाग कापून फेविकॉलने चिटकवला. एकाच बुटावर तो गोल तुकडा बरा दिसेना, म्हणून दुसऱ्या बुटावर पण विरुद्ध बाजूला दुसरा गोल चिटकवला. निळ्या कॅनव्हासच्या बुटावर ते लाल रंगाचे गोल छान दिसायचे. आमच्या घरून रस्त्यात खाण्यासाठी थोडे पदार्थ बनवून दिले होते. दोन-तीन शर्ट पॅन्ट, एक चादर, एक नोंद वही, पोस्टकार्डे, पेन, पाण्याची बाटली असे मोजकेच समान सोबत घेतले होते.

प्रमोदची ताई हॉस्पिटलमध्ये नर्स होती. तिने एक काचेची बाटली भरून एक औषध दिले, “पाय दुखले कि हे लावा’, असे सांगितले. मी त्या औषधाचा वास घेवून पहिला, आयोडेक्स सारखा वास आला. पण त्या औषधाने तर नंतर चमत्कारच घडवला. काही गोळ्या पण तिने दिल्या.

अशा तऱ्हेने आमची निघायची पूर्वतयारी झाली. तारीख ठरली १७ मे १९८१ रोजीची. आमच्या नातेवाईकांना पत्रे लिहून आम्ही तीन दिवसात पुण्याला पोहोचत आहोत, असे कळविले होते.

आणि तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आमची मुंबई ते पुणे (Mumbai to Pune) पदयात्रा सुरु होणार होती. सकाळी सकाळी प्रवास सुरु करावा, म्हणजे दिवसभरात खूप अंतर कापता येईल, म्हणून आदल्या दिवशी रात्री लवकर झोपलो.

मुंबई-पुणे प्रवास ( Mumbai to Pune by Feet ) – भाग १ समाप्त.

आमचा प्रवास कसा सुरु झाला, आणि पहिल्याच दिवशी आमची कशी फजिती झाली …. ते वाचा पुढच्या भागात.

मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा (Mumbai to Pune by Feet – 1 मुंबई ते पुणे पदयात्रा: भाग १) – लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

मुंबई पुणे पदयात्रा : भाग २ वाचा

Mumbai to Pune by Feet
Mumbai to Pune by Feet – Rajabhau Chimbulkar Certificate

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply