स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama
माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – लेखिका: स्मिता कढे – Narmada Parikrama
ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात!
मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada
स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग १ – Narmada Parikrama
नर्मदे हर!
खूप दिवसांनी कै. दादांची (माझे वडील) तीव्र ईच्छा त्यांच्या मागे पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. ठाण्यातील डॉ. गिरीष बापट यांच्या श्रीरामकृष्ण ट्रावेल्सची माहिती मिळाली. आणि नरेनने (माझा मुलगा) उचल घेतली, नर्मदा परिक्रमा करण्याकरीता (Narmada Parikrama by Vehicle) माझे नाव नोंदवले.
गंमत म्हणजे या प्रवासात माझ्या ओळखीचे किंवा नात्यातील कोणीही बरोबर नव्हते. एका अनोळखी ग्रुपबरोबर मी जाणार होते. १० फेब्रुवारीला त्यांनी सर्वांना मिटिंगसाठी बोलावले होते. मी व नरेन गेलो होतो. श्री. व सौ. पाटील तसेच कल्याणची अर्चना व सुमनताई यांची ओळख झाली. डॉक्टरांनी आम्हाला सगळी माहिती दिली. चांगला नाष्टा दिला व निघताना एक हँडबॅग, एक किट, एक शबनम व एक होल्डींग पाऊच दिला. किटमध्ये दररोज लागणाऱ्या व प्रवासात ऐनवेळी दगा देणाऱ्या गोष्टींवर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी दिल्या. उदा. नेलकटर, कात्री, सुई-दोरा, बटणे, पिना, साबण, टूथपेस्ट, बॅटरी, शाम्पू, डायरी, पेन इत्यादी. घरी सर्वांना दाखवले. खूपच समाधान वाटले.
अठरा दिवसांच्या प्रवासाची भरपूर तयारी करुन १४ तारखेला संध्याकाळी मी व नरेन टॅक्सीने मुंबई सेंट्रलला गेलो. संध्याकाळी ७.२० ला अवंतिका एक्सप्रेसने मुंबई सोडली. माझ्या डब्यात म्हणजे बी३ मध्ये मी शयनयान क्रमांक ८० वर होते. २२, २४वर मालाडच्या दोघी होत्या. व आर.ए.सीवाल्या तिघी मध्ये होत्या. माझ्या कुपेमध्ये दोन स्त्रिया व सहा पुरुष होते. मी सोडल्यास सर्व हिंदी भाषिक होते. त्यांच्या गप्पाटप्पा ऐकत रात्रीचे जेवण केले.
प्रवासात मानवी स्वभावाचे विविध नमुने पहायला मिळाले. दोन सामान्य माणसे (कदाचित मोठी असतीलही) टाटा श्रेष्ठ का रिलायन्स श्रेष्ठ यावर जोरजोरात वाद घालत होती. तर दुसरा एक जण डब्यातील सर्व अनोळखी माणसांना घरच्या समस्या सांगत होता. त्यात प्रमुख म्हणजे, आमचे दोन दोन ठिकाणी घरे आहेत. मोठ्या मुलाची सासूरवाडी खूपच श्रीमंत आहे. त्यामुळे धाकट्याच्या सोयरीकीचा प्रश्न त्यांना भेडसावित आहे. हे सगळे ऐकून मी मात्र मनातल्या मनात हसत होते. एक वाजता आम्ही झोपलो.
उजाडता उजाडता उज्जैनी आली. सामान घेऊन मी खाली उतरले. तेंव्हा डब्यातील सहयात्रिक भेटले. जिना चढण्याउतरण्याचा प्रश्न नव्हता. सामान बाहेर नेण्यास मला सहयात्रींनी मदत केली. बाहेर कंपनीचे लोक १८ सीटरची बस घेऊन आले होते. बसने आम्ही गिरनार हॉटेलवर गेलो. तेथे आम्हाला तीन जणांना एक एक रुम देण्यात आली. माझ्या रुमवर मी, अर्चना व भावना होतो. प्रवासातील जास्तीजास्त दिवस आम्ही एकत्र होतो. रुमवर गरम पाण्याने अंघोळी करुन नाष्टा व चहा घेऊन महांकाळेश्वरला गेलो. दोन ते अडीच तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले. परत येताना बडा गणपती व कालिका मंदिर पाहून हॉटेलवर परत आलो.
कंपनीचे सामान व कुक बरोबर असतात. हॉटेलमध्येही त्यांच्यासाठी मोकळी जागा असते. त्यामुळे त्यांनी स्वयंपाक केला. सर्व हॉटेल व धर्मशाळेत अशा सोई आढळल्या. दुपारी चहानंतर आम्ही कालभैरव मंदिर व सांदिपनी आश्रम पाहिले. दुसऱ्या दिवशी पहाटे चारला अंघोळी करुन महांकिलेश्वरला भस्मारतीसाठी जायचे होते. आधी पुन्हा रांगेत उभे राहणे नको म्हणून न जाण्याचे ठरविले पण मुलींनी (आता मी त्यांची ममा, व त्या माझ्या मुली हे मानसिक नाते निर्माण झाले होते) मला उभारी दिली व मी गेले. आधी माझे दोन वेळा दर्शन झाले होते पण दुरुनच. आता मात्र स्वतःच्या हाताने पिंडीवर जल घालून व हात लावून दर्शन घेतले. मनाचे समाधान झाले.

नंतर मंडपात बसून शंकराची पंचामृती पूजा पाहिली. हवेत गारठा होता. पहाटेची वेळ होती. मंडपात जाताना सुद्धा वरखाली चढउतार करुन जावे लागले. पाणी घालण्यासाठी गाभाऱ्याशी गेल्यावर अंगावरील स्वेटर, शाल पायातील मोजे वगैरे सगळे काढावे लागले. आधीच थंडी त्यात पाय ओले, गारठले पण माझ्या मुलींनी माझ्यासाठी जागा धरुन ठेवली. गर्दी तर खूपच होती. त्यांनी मला हाका मारल्या पण गदारोळात ऐकू येत नाही असे पाहिल्यावर अर्चना खाली आली व हाताला धरून मला वर घेऊन गेली. पूजा बरोबर ४.३०ला सुरु झाली व ५.२०ला भस्मारती! चितेतले खरेखुरे भस्म आणले जाते. म्हणून ही आरती स्त्रियांनी पहायची नाही, डोळे मिटून बसायचे. त्या भस्माचे पिंडीवर विलेपन करतात.

यानंतर रुमवर येउन एक तास विश्रांती घेतली. सर्व सामान पॅक करुन बॅगा रुमबाहेर ठेवल्या. इडली चटणीचा नाष्टा करून व चहा घेऊन आम्ही इंदोरकडे प्रयाण केले. वाटेत महागणपती, अन्नपुर्णामंदिर, लालमहाल व खजराना मंदिर पाहिले. व ‘गजानन धर्मशाळा’ नर्मदा घाट, ओंकारेश्वर येथे गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता चहा झाल्यावर अंघोळीचे कपडे, पूजेचे साहित्य, नर्मदा (Narmada River) जलासाठी बाटली इत्यादी घेऊन नावेतून नदी पार केली. अजून परिक्रमेला सुरवात झाली नव्हती. पलिकडील घाटावर सर्वजण गेलो. नंतर सर्वजण ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी वर गेले. मी वर चढले नाही. दर्शन झाल्यावर नावेतून परत इकडच्या घाटावर आलो. या घाटाला नांगर घाटाला-नांगर घाट म्हणतात. येथे नर्मदेची शास्त्रोक्त पूजाअर्चा व आरती केली. तेव्हा गुरुजींनी प्रत्येकाला आपले आई वडिल सासू सासरे इतर नातेवाइक, तसेच दोन्हीही घराण्याचे गोत्र उच्चारण्यास सांगितले. त्यावेळी दादांच्या आठवणीने डोळे भरून आले. पूजेसाठी मी नऊवारी नेसले होते. प्रार्थनेच्यावेळी मी काकूळतीने, ‘माझी परिक्रमापूर्ण करुन घ्यावी’, अशी विनंती दादा व नर्मदा मैयाला केली. आणि दोघांनी ती माझ्याकडून करवून घेतली.

बाटलीत जल भरून घेतले नंतर सवाष्णीची ओटी, साडी चोळी नेसवली. कुमारीकेची पूजा केली व घाट चढायला सुरवात केली. बाकी सारे ममलेश्वराच्या दर्शनाला गेले मी खालीच रिक्षात बसले. नंतर आम्ही आठदहा जणी रिक्षाने धर्मशाळेत आलो. असे म्हणतात की, शुलपाणीला मामा लोक लूटतात आणि ते चांगले असते. आमच्या बसच्या मार्गावर हे जंगल लागत नाही. म्हणूनच मैयाने, घाटावरच माझ्याकडील एक टॉप व एक टॉवेल गेला. व रिक्षातून उतरताना पर्स गेली. पर्समध्ये १५० रुपये, आधार कार्ड, निवडणूक कार्ड व कुटूंबाचे फोटो होते.
जेवणे झाल्यावर साधारण अडीच तीनला आम्ही ओंकारेश्वर सोडले. आणि परिक्रमेची खरी सुरवात झाली. रात्री बडवानी येथील श्रीकृष्ण राजभोग येथे आलो. इथे नर्मदेचे विशाल पात्र आहे. येथे घाटावर अंघोळी करतात. येथून पुढे पात्रात मैयाचे वाहन असणाऱ्या मगरींचे वास्तव्य आहे. तसेच पायवाटेवर शूलपाणीचे जंगल लागते. तिथे नर्मदेचे भाऊ असलेले मामा लोक रहातात.

गुजराथमध्ये शिरण्यापुर्वी नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात प्रकाशा हे गाव आहे तेथे पश्चीमवाहीनी तापी नदी नर्मदेला मिळते. प्रकाशा येथे एक मोठे कुंड आहे त्याचे नाव बलबला असे आहे. कुंडाजवळ उभे राहून मोठ्याने नर्मदे हर म्हटल्यास कुंडातून बुड बुडे येतात. जितके आपण मोठ्याने म्हणू तितके मोठ मोठे बुडबुडे येतात. पूर्वी या परीसरात बलबला राक्षसाने धुमाकूळ घातला होता. नर्मदेने त्याच्याशी युद्ध करुन त्याचा पाडाव केला अशी वदंता आहे. पण मोठ्या आवाजाने मोठे बुडबुडे हे मात्र प्रत्यक्षच पाहिले. नंतर राज पिपला येथील हरसिद्धी धर्मशाळेत थांबलो. जवळच स्वामी नारायणाचे सुंदर देवालय आहे यालाच निलकंठ धाम म्हणतात. तेथेच आम्ही मुक्काम केला.
भाग 1 समाप्त – क्रमश:

लेखिकेचा परिचय
नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: 2, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006
Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.
काही क्षणचित्रे




आमचे इतर लेख वाचा:
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग १
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग २
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ३
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ४
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ५
