मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ५
मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग ५
प्रवासाचा पाचवा आणि शेवटचा दिवस
दिनांक: २१ मे १९८१
पुण्यात पोहोचलो
पाचव्या दिवशी दुपारी साधारण एक दीड वाजता दापोडी चौकात माझे नातेवाईक स्व. रवींद्र कोकाटे यांच्या दुकानापाशी पोहोचलो होतो. तेथील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर आमचा हार घालून सत्कार केला गेला. तेव्हा मला रवींद्र मामाने दोन शब्द बोलण्यास सांगितले. जास्तच आग्रह झाल्यावर, “अजून आमची मुंबई-पुणे पदयात्रा पूर्ण झालेली नाही, तेव्हा आम्हाला आता रजा द्यावी”, असे म्हटल्यावर आमची लगेचच सुटका केली. आणि आम्ही मार्गस्थ झालो.
आणि तिथून पुढे सुरु झाला आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा.
दापोडी ते पुणे हे केवळ ९ ते १० किलोमीटरचे अंतर पार केले कि पुण्याला पोहोचणार आणि आमचा संकल्प पूर्ण होण्यास आता फक्त तीन ते चार तासाचा अवधी उरला आहे, ह्या विचाराने आमचा हुरूप वाढला आणि आम्ही भराभरा चालू लागलो. शेवटी एकदाचे शिवाजीनगरच्या रेल्वे पुलावर पाऊल टाकले. उजव्या बाजूला खाली शिवाजीनगर रेल्वे स्थानक दिसले आणि आत्तापर्यंत खूपदा नाव ऐकलेले शिवाजीनगर ह्याची डोळा पाहिले आणि धन्य धन्य वाटले.
चक्क छत्रपतींच्या गावात पाऊल टाकल्याचा आनंद झाला. हेच ते पुणे, जिथे छत्रपती शिवाजीराजे लहानपणी बागडले आहेत. हेच ते पुणे, जिथे जीजाऊंनी बाळ शिवबाच्या हाताने सोन्याचा नांगर शेतात फिरवून पीडित जनतेचा स्वाभिमान जागा केला. हेच ते पुणे, जिथे जीजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबाने रांझ्याच्या पाटलाच्या अन्यायपूर्वक वागणुकीला दण्डित करून जनतेला स्वकीयांच्या न्याय्य राज्यकारभाराची ग्वाही दिली. हेच ते पुणे, जिथे लालमहालात राजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हेच ते पुणे, जिथून पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार अटकेपार केला. शाळेत असताना अभ्यासलेली चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पाने भर्रकन नजरे सामोरून गेली. अशा ह्या इतिहासप्रसिद्ध पुण्यनगरी मध्ये पाऊल टाकले ह्या केवळ विचारानेच शरीरातून वीज चमकल्याचा भास झाला. छाती आणि डोळे दोन्ही भरून आले.
पुण्यात नानापेठेत राहणारे आमचे नातेवाईक श्री. खवले यांच्याकडे मुक्कामाला जायचे होते. आता पुणे शहरात मुंबई सारख्या ईमारती आणि दुकाने, गाडयांची गर्दी दिसू लागल्यावर थोडे भांबावलोच होतो. ह्या अनोळखी शहरात फक्त ‘२४४, नाना पेठ, डोके तालीम जवळ’ एवढ्याशा पत्त्यावर कसे पोहोचू याची काळजी वाटू लागली. पण ‘पुणे तिथे काय ऊणे’ ह्या म्हणीचा प्रत्यय मात्र चांगल्या अर्थाने आम्हाला पुण्यात लगेच आला. पुण्यातील गर्दीने आमच्या अवताराकडे पाहून आणि चौकशी करून उत्तम मार्गदर्शन केले. शिवाजीनगरहून मनपामार्गे मुठानदीवरील भव्य दगडी पुलावरून पलीकडे गेलो, तो दर्शन झाले भव्य शनिवारवाड्याचे आणि त्या समोरील मराठेशाहीचे थोर सेनापती थोरले बाजीराव यांच्या पुतळ्याचे. परंतु शनिवारवाड्याच्या आत न जाता वाड्याला डाव्या बाजूने वळसा घालून पुढे आलो. येथून जवळच छत्रपती शिवाजींचे बालपण गेले तो लालमहाल आहे हे एकूण माहीत होते. शनिवारवाडा एवढा मोठा तर छत्रपतींचा लालमहाल केवढा प्रचंड मोठा असेल ह्याची कल्पना करत करत लालमहाल अजून दिसत का नाही, ह्या विचाराने रस्ता ओलांडून सिग्नलला थांबून चौकशी केली. तो एकाने समोरच हात दाखवून म्हटले, “हाच लालमहाल”. त्या दिशेनं पाहिले तो एक लाल विटकरी रंगाची बंगलीवजा ईमारत दिसली आणि फारच भ्रमनिरास झाला. छत्रपती शिवाजीराजांचे बालपण ज्या जागी गेले, ज्या ठिकाणी कित्येक मोहिमा रचल्या गेल्या असतील, कित्येक न्यायनिवाडे तिथे झालेत, तो महाल आजूबाजूच्या ईमारती आणि चाळींच्या गराड्यात अंग चोरून उभा असावा हे माझ्या कल्पनेच्या पलीकडले होते. हे मात्र आमच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले नव्हते. ते पाहून मात्र वाईट वाटले. असो.
पुढे लक्ष्मी रस्त्यावरून डावीकडे वळून सिटी पोस्ट ऑफिस समोरून सरळ चालत एकदाचे नाना पेठेत ईच्छित स्थळी म्हणजे ‘२४४, नाना पेठ, डोके तालीम जवळ’, येथे पोहोचलो. आमचे नातेवाईक म्हणजे माझ्या लांबच्या मावशीच्या घरी पोहोचलो. तिला आम्ही बेबी म्हणायचो. काकांचे नाव सुधाकर खवले. मुंबईहून निघण्यापूर्वी त्यांना पत्र टाकलेच होते, त्याप्रमाणे ते सर्व आमची वाटच पहात होते. मावशीने आमचे स्वागत केले. काही वर्ष अगोदर काका आणि मावशी मुंबईला आमच्या घरी आले होते, त्यामुळे ओळख लगेच पटली. पुण्यातील वाडा संस्कृती तिथे अनुभवली. एकूणच मुंबईतील चाळीसारखेच वातावरण होते. सर्वकाही सार्वजनिक. थोड्याच वेळात काका कामावरून आले. आमचे अभिनंदन केले. आमची नोंदवही पाहिली, अन म्हणाले, “तुम्ही चांगले धाडसी कार्य केले आहे, ह्याची बातमी वर्तमानपत्रात यायला हवी.” मी असा काही विचार केलाच नव्हता. तेवढ्यात काकांनी त्यांचा मुलगा केशवला सांगितले, कि “यांना ‘सकाळ’ मध्ये घेवून जा”. मग आम्ही केशव बरोबर ‘दैनिक सकाळ’ च्या पुणे कार्यालयात गेलो. तेथील स्थायी वार्ताहर काकांनी आमची नोंदवही पाहिली आणि लगेच आमची एक छोटी मुलाखत घेवून टाकली. जरा बरे वाटले, आमचा हा उपक्रम आणि धाडस लक्षणीय ठरले याचा अभिमान वाटला. पुढे त्या मुलाखतीचे काय झाले कळले नाही.
आमचा उपक्रम
तर अशा तऱ्हेने ‘मुंबई ते पुणे’ पायी चालत जाण्याचा आमचा उपक्रम यशस्वी झाला. दि. १७ मे १९८१ रोजी सकाळी ८.३० ला मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनहून चालण्यास सुरुवात केली आणि दि. २१ मे १९८१ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुण्यातील नाना पेठेत सांगता केली. आमच्या नोंदवही मधील नोंदीप्रमाणे आम्हाला मुंबई ते पुणे हे सुमारे १६०-१६५ किलोमीटरचे अंतर जुन्या हमरस्त्याने पायी पार करण्यास आम्हाला एकूण ५० ते ५२ तास लागले. म्हणजेच दररोज सरासरी ३२ किलोमीटरचे अंतर आम्ही रोज चालत होतो. (दुर्देवाने आमची ती नोंदवही आता सापडत नाहीय). चौथ्या दिवशी आम्ही सर्वात जास्त अंतर पार केले होते. वलवण ते देहूरोड हा सुमारे ४२ किलोमीटरचा पल्ला आम्ही चौथ्या दिवशी पार केला होता. आम्ही दिवसा उजेडी सकाळ ते सायंकाळ ह्या वेळेतच प्रवास केला (अपवाद पहिल्या दिवशीचा). आम्हाला काही कुठला जलद चालण्याचा विक्रम वगैरे करायचा नव्हता. फक्त पायी चालण्याचा मनोसोक्त अनुभव घ्यायचा होता. म्हणून आम्ही चालण्याचा वेग आणि वेळ यांचे गणित सोडवले नाही. (तसेही हे वेग आणि वेळ यांचे गणित शाळेत गणिताच्या तासाला पण सुटले नव्हतेच). पण ठरवलेले ध्येय न थकता आणि अर्धवट न सोडता यथाशक्ती पूर्ण केले याचे समाधान आम्हाला मिळाले. आणि त्या जोरावर आता आयुष्यात कधीच अपयशी ठरणार नाही हा आत्मविश्वास बळावला. जो पुढील आयुष्यात कामी आला. कुठलेही आव्हान स्विकारण्याचे धाडस मनात निर्माण झाले.
पुण्याच्या महापौरांची भेट
दुसऱ्या दिवशी काकांनी अजून एक काम मागे लावले. केशव बरोबर आम्हाला पुणे शहराचे तत्कालीन महापौरांच्या कार्यालयात पाठविले. पुण्यातील वास्तव्यात केशव आमचा वाटाड्या आणि मार्गदर्शक बनला होता. केशवने मग आम्हाला ‘कॉर्पोरेशन’ला नेले. म्हणजे पुणे महानगर पालिकेच्या मुख्यालयात. एखादया इमारतीचे नाव ‘कॉर्पोरेशन’ कसे असू शकते याचे मला त्यावेळी नवल वाटायचे. केशवने आम्हाला सरळ पुणे शहराचे तत्कालीन महापौर श्री. सुरेशजी तौर यांच्या कार्यालयात नेले. महापौरांनी आमची नोंदवही आणि मुंबईचे माजी महापौर स्व. राजाभाऊ चिंबूलकर यांनी दिलेले शिफारसपत्र पाहिले. आमचे कौतुक केले, चहा पाजला. चहा पिऊन होईपर्यंत त्यांच्या स्वीय सहायकाने महापौरांनी सांगितल्याप्रमाणे पत्र टाईप केले. आणि पुण्याच्या महापौरांनी त्यावर स्वाक्षरी करून आम्हास प्रशस्तिपत्रक दिले. त्यांचे आभार मानून आम्ही तिथून निघालो.
हेच पुणे शहराचे माजी महापौर श्री. सुरेशजी तौर सुमारे २९-३० वर्षांनी शिवाजीनगर कोर्टात एका कोर्टरूमच्या बाहेर स्वतःच्या टाईपरायटरवर पक्षकारांचे अर्ज वगैरे टाईप करताना मला दिसले. समाजासाठी झटणारा एक साधा आणि प्रामाणिक कार्यकर्ता उच्चपदावर जाऊन पुन्हा समाजात कसा साधेपणाने वावरतो ह्याचे ते मुर्तिमंत उदाहरण होते. केवळ एखादी टर्म नगरसेवक झाल्यावर सात पिढ्या बसून खातील एवढी मोठमोठी सामाजिक आणि लोकोपयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विपरीत उदाहरण डोळ्यासमोर दिसले. मी ऐन सकाळी कामाच्या गर्दीच्या वेळेत तिथे गेल्याकारणाने त्यांना ओळख सांगून त्यांच्या कार्यात व्यत्यय आणला नाही. असो. थोडे विषयांतर झाले.
महापौरांच्या कार्यालयातून निघाल्यावर केशवने आम्हाला पुणे दर्शन घडवले. नक्की काय काय पाहिले ते आता आठवत नाहीय. पण बऱ्याच गोष्टी पाहिल्या. पुण्यातील पुलावरून चालत असताना पश्चिमेला सिंहगडाचे दर्शन झाले आणि धन्य धन्य झालो. लांबून पर्वतीही बघितली. लाल महालात जाऊन थोडे ऐतिहासिक काळात फिरुन आलो. वेळ कमी होता. त्यामुळे फार न फिरता मुक्कामी परतलो. संपूर्ण पुणे पाहण्यासाठी लवकरच परत येऊ असे स्वतःला आश्वासन दिले.
आता ‘पुणे ते मुंबई’
आता वेळ आली ती ‘पुणे ते मुंबई’ चालत येण्याची. पण अगोदरच वेळ आणि वेळेचं गणित बिघडलेले होते. तीन दिवसात पुण्याला पोहोचू, दोन दिवस पुण्यात काढू आणि परत ‘पुणे ते मुंबई’ चालत येऊ, हे सर्व करण्यास ७ ते ८ दिवस लागतील अशा विचाराने घराबाहेर पडलो होतो. पण पुण्यास पोहोचण्यास पाच दिवस लागले, आणि आता आणखी पाच दिवस परत जाण्यास लागतील, एवढा त्रास घेण्याचे आणि वेळ घालविण्याचे नकोसे वाटले. आणि मग पुण्यातून तिसऱ्या दिवशी सकाळच्या पुणे मुंबई पॅसेंजर गाडीने आम्ही मुंबईस परतलो. संध्याकाळी घरी पोहोचलो. अख्खी चाळ आम्हाला पहाण्यासाठी माझ्या घरी आली. बऱ्याच जणांनी नाना चौकशा केल्या, आमचे अनुभव विचारले. दोन तीन दिवसांनंतर सगळे सांगतो असे सर्वांना सांगितले. दोन तीन दिवस तर सोडाच, पण आमची ‘ मुंबई-पुणे’ ची कथा लोकांना सांगण्यास तब्बल ४० वर्षांचा अवधी लागला. आमच्या चाळीतले आमचे मित्र आणि नवीन पिढी वगैरे आता मोबाईलवरून आमचे प्रवास वर्णन वाचत आहेत. माझा सहकारी प्रमोद राऊत आता ऍडव्होकेट प्रमोद राऊत झाला आहे.
१९८१ साली आमचे प्रवासातील जेवण-खाणे, रस-सरबत पिणे ह्या शिवाय पुणे ते मुंबई पॅसेंजर रेल्वेचे तिकीट हा सर्व खर्च प्रत्येकी फक्त १८ रुपयेच झाला होता.
त्यांनतर साधारण एक वर्षाने मुद्दाम वेळ काढून पुण्यास गेलो. तेव्हा बऱ्याच जणांनी म्हणजे दापोडी आणि नाना पेठेतील नातेवाईकांनी सांगितले. ‘अरे, तुम्ही मुंबई पुणे पायी चालत आला होता, त्याची बातमी सकाळ मध्ये आली होती.’ मनातल्या मनात स्वतःला दोष दिला, कि आपण इतर सर्वांच्या बातम्या वाचतो, पण स्वतःचीच बातमी वाचायची राहून गेली.
लहानपणी एक सुभाषित वाचले होते. ‘केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार’. ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर, ‘चला घराबाहेर पडा’. नवीन जग पाहावयास मिळेल, अनुभवयास मिळेल.
मुंबई-पुणे प्रवास – शेवटचा भाग ५ समाप्त.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९
पुण्याचे तत्कालीन महापौर श्री. सुरेशजी तौर यांनी आम्हास दिलेले प्रशस्तीपत्रक

मुंबईचे माजी महापौर स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांनी दिलेले शिफारसपत्र
हा लेख आपल्याला आवडला असणारच याची मला खात्री आहे. कृपया हा लेख आपल्या मित्रांना सामाईक (Share) करा.