Mumbai-Pune on Feet

मुंबई-पुणे पदयात्रा: भाग ४

मुंबई ते पुणे पायी प्रवासाची कथा – भाग ४

प्रवासाचा चौथा दिवस

दिनांक: १९ मे १९८१

सकाळी लवकर उठून आम्ही वलवण गाव सोडले. रात्री ज्यांच्या घरी राहिलो होतो, त्या माऊलीने सकाळी आम्हाला लवकर उठवले. आमच्यासाठी अंघोळीला गरम पाणी दिले. मे महिना असूनसुद्धा बाहेर थंडी होती, घर शेतात असल्याने थंडी जास्त जाणवत होती. त्यातच अंघोळीची सोय घराच्या बाहेर एका कोपऱ्यात केली होती. बाहेरच्या थंडीमध्ये गरम पाण्याच्या अंघोळीने फारसा फरक जाणवला नाही. कशीबशी घाईघाईत अंघोळ आटोपली. त्या आजीने चहा फराळ करून दिला. त्यांचे आभार मानून निघालो. परतफेड म्हणून निघताना त्या माऊलीच्या पाया पडलो.

मजल दरमजल करीत मळवली, कामशेत अशी गावे करून चाललो होतो. इंद्रायची नदीचे कोरडे पात्र आणि रेल्वेलाईन ओलांडल्यावर कामशेतच्या पुढे वडगाव मावळ गाव लागते. ह्या रस्त्याच्या समांतर डाव्या बाजूने काही अंतरावरून मुंबई पुणे रेल्वेलाईन जाते. आम्हाला अधेमध्ये लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या ये जा करताना दिसायच्या, ते बघायला मजा यायची. त्या दरम्यान वडगाव मावळच्या अलीकडे दुपारच्या वेळेत पोहोचलो होतो. भूक लागली होती. रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर दोनचार मोठ्या झाडांची सावली छान पडली होती. सावलीत बसून जेवूया असे ठरले. आमच्याकडचे पाणी संपले होते. आजूबाजूला पाहिले तर लांबलचक वावराच्या दुसऱ्या बाजूला घर दिसले. तिकडे जाऊन बाटलीत पाणी भरून आणले. झाडाच्या सावलीखाली निवांत जेवत बसलो. थोड्या वेळात जेवण आटोपलेच होते, आवराआवर चालू होती. तेव्हढ्यात आम्हाला पाहून एक कार रस्त्याच्या कडेला थांबली. त्यातून एक गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबीय खाली उतरले. दोन लहान मुले होती. कार असली तरी ते कुटुंब ग्रामीण भागातील वाटत होते.

त्या गृहस्थाने आम्हाला विचारले, “इथं पाणी कुठे मिळेल?”.

मी त्या शेतातील घराकडे हात करून म्हटले, “आम्ही त्या घरातून पाणी घेतले”.

त्या गृहस्थाने मला म्हटले, “आम्हाला पाणी आणून दे जरा”, असे म्हणून त्यांच्याकडील दोन बाटल्या माझ्याकडे दिल्या.

मला थोडे विचित्र वाटले. मनात म्हटले, ” हा स्वतः जावून का नाही पाणी आणत?”. पण काही न बोलता वावरातील मोठमोठी ढेकळं तुडवीत पुन्हा त्या घराकडे जाऊन दोन बाटल्या पाणी आणून त्यांना दिले. तोपर्यंत त्यांनी झाडाखाली छान बैठक मारून पंगत सुरु केली होती.

मी त्यांना पाणी दिले, अन आम्ही निघालो पुढच्या मार्गाला. त्या गृहस्थाने किंवा त्यांच्या कुटुंबाने आमची अजिबात विचारपूस केली नाही, जेवणार का असे तर विचारलेच नाही, आणि आमचे आभारही मानले नाही, याचे मला वाईट वाटले, असो.

चौथ्या दिवसाचा मुक्काम

संध्याकाळ झाली. अंधार पडला तेव्हा आम्ही देहू रोड गावात प्रवेश केला. गाव हमरस्त्यावर होते आणि चांगलेच मोठे वाटत होते. तेव्हा आजची रात्र इथेच मुक्काम करूया असे ठरवले. पण रस्त्यावर तर सर्वत्र दुकाने दिसत होती. मुक्काम कुठे करायचा हेच कळेना. देहू रोड बाजराच्या गल्लीच्या जरा पुढे आलो तर एका दुकान बंद दिसले, अन दुकानाचं बाहेर चांगली ऐसपैस जागा दिसली. मुख्य म्हणजे शेजारच्याच दुकानात एक भटारखाना (खानावळ) होता. तिथे मोठया शेगडीवर भले मोठे पातेले होते, त्यात डाळीच्या वरणाचा एक प्रकार रटरट शिजत होता. जोडून असलेल्या दुसऱ्या शेगडीवर एकजण रोट्या बनवत होता. त्याच्या बाजूला रोट्यांची चळत तयार झाली होती. शेजारीच एका मोठ्या पातेल्यात भात शिजवून ठेवला होता. हे सारं पाहिल्यावर भूक उफाळून आली, पण आता जरा जेवण केले, तर रात्री परत भूक लागेल, तेव्हा काहीच खायला मिळणार नाही, सारी दुकाने बंद झालेली असतील. उशिरात उशिरा ह्याच भटारखाण्यातून जेवण घेवू, आणि आता थोडी बिस्किटे वगैरे खाऊ असा विचार केला. आम्ही त्या बंद दुकानाच्या बाहेरच आमच्या बॅगा ठेवल्या, पायातील बूट काढले अन जरा मोकळे झालो.

आमच्या प्रवासात जिथे जिथे शक्य होईल तेव्हा, किंवा टपालाची लाल पेटी दिसली कि मी लगेचच बॅगेतून एक पोस्टकार्ड काढून, आम्ही कुठे आहोत, कसे आहोत ह्याची खुशालीचे पत्र लिहून टाकत असे. त्याकाळी आदल्या दिवशी टाकलेलं पत्र पुणे ते मुंबई प्रवास करून चक्क एका दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारच्या डाकेने घरी पोचत असे. (नवीन पिढीने ह्यावर विश्वास ठेवावा, हवे तर जुन्या लोकांना विचारावे). ह्या मोठ्या बाजारपेठेत जवळपास टपालाची पेटी असणारच ह्या विचाराने लगेच पत्र लिहून काढले. पायात बूट नुसतेच चढवले आणि निघालो पेटी शोधायला. साधारण शंभर मीटर अंतरावर पेटी होती. तिथे जाईपर्यंत पायांनी असहकार पुकारला, पोटरीत गोळे आले, पाऊल पुढे टाकवेना, त्यातच मोजे न घालता तसाच निघाल्याकारणाने पायाचे तळवे दुखायला लागले, जमीन पायाला टोचू लागली. पाऊल पुढे टाकले कि तळव्यातून भयंकर वेदना यायच्या, रस्त्यावरील खडी वगैरे खालून टोचायची. हातात पाय घेवून चालण्याची सोय असती तर बरे झाले असते, असे भयंकर विनोदी विचार त्या अवस्थेत सुचू लागले. कसाबसा टपाल पेटीत पत्र टाकून परत आलो. जागेवर आल्यावर पहिले पायातून बूट काढले, आणि एकेक पाय हातात घेवून बसलो. पायाला भयंकर वेदना होत होत्या. पायाच्या तळव्यांना असंख्य भोके पडली आहेत आणि त्यातून पायाला असंख्य सुया टोचत आहेत असे वाटत होते. पुन्हा एकदा प्रमोदच्या बहिणीने दिलेले तेल घेवून गुढग्यापासून खाली दोन्ही पायांना ते तेल लावले. तेव्हा पाच दहा मिनिटांनी वेदना बंद झाल्या.

आम्ही थोडी विश्रांती घेतली. आता उद्या आपण पुण्यात पोहोचू अन आपल्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण होईल, ह्या विचाराने आनंद झाला. रात्र वाढू लागली. रस्त्यावरची रहदारी कमी झाली. फक्त मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या येजा करत होत्या. आजूबाजूची काही दुकाने बंद होऊ लागली. लवकरच शेजारचा भटारखाना सुद्धा बंद होईल, त्या अगोदर जेवून घेवूया, अशा विचाराने तेथून जेवायला डाळ (वरण), रोटी आणि भात घेतला. भुकेपोटी त्या डाळभाताची चव अप्रतिम लागली. गेले तीन तास त्या भटारखान्यात लोक आमच्याकडे पहात होतीच. आम्ही पैसे द्यायला गेलो तेव्हा आमची चौकशी केली त्यावर, “चाहो तो और खावो, लेकिन पैसा देनेका नही|” असे म्हणून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले नाही. रात्री बाहेर झोपण्यास काही अडचण नाही. “इधरही सो जावो”, असे सांगितले. त्या भटारखान्याच्या जागी आज मोठी बेकरी झालेली आहे. रोज नोकरीनिमित्त चिंचवडला जाताना त्याच रस्त्यावरून बसने जाणे होते, त्या प्रत्येकवेळी त्या बेकरीकडे लक्ष जातेच. कित्येक वेळा वाट वाकडी करून त्या बेकरीतून काही खरेदी केलेली आहे.

थोड्याच वेळात तो भटारखाना (खानावळ) बंद झाला. सर्वत्र सामसूम झाली. मग आम्ही देखील शांतपणे आडवे झालो.

अशा तऱ्हेने आजचा आमच्या प्रवासाचा चौथा दिवस संपला. आजच्या चौथ्या दिवशी आम्ही सर्वात जास्त अंतर पार केले होते. वलवण ते देहू रोड हे सुमारे ४२ किलोमीटरचा पल्ला आम्ही १० तासात पूर्ण केला होता. (विश्रांतीची वेळ न धरता).

दिवस पाचवा

आजच्या दिवसात पुण्याला पोहोचायचंच ह्या निश्चयाने आम्ही सकाळी पुढे चालण्यास सुरुवात केली. तसेही पुणे आता केवळ २५ किलोमीटर अंतरावरच होते. त्यामुळे वेगळेची चिंता नव्हती. पण पुण्यात संध्याकाळच्या आत पोहोचलो, तर पुण्याला एक चक्कर टाकून पुणे पहाता देखील येईल, ह्या विचाराने भरभर निघालो. पूर्ण उजाडले होते, पण अजून भटारखाना उघडला नाहीत, कदाचित उशीरा सुरु करीत असतील. आजूबाजूला चहाचे दुकान हि दिसेना. पण रस्त्याच्या पलीकडे एकाने त्याचे उसाच्या रसाचे गुऱ्हाळ सकाळीच चालू केले होते. ते पाहून जरा नवलच वाटले. “पण जाऊदे, आपली तर सोय झाली. आज चहा ऐवजी ऊसाचा ताजा रस पिऊन दिवसाची सुरुवात करूया”, असा विचार करून रस्ता ओलांडून पलीकडे गेलो. मोठा काचेचा पेला भरून पाहिल्या धारेच्या ताज्या उसाच्या रसाचे प्राशन केले.

नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्या रसवाल्या काकांकडून नोंदवही मध्ये दिनांक, वेळ आणि स्थान याची माहिती नोंदवून घेतली. मग त्यांनी अधिक माहिती विचारून घेतली. ह्यात जरा वेळ निघून गेला. असा वेळ वाया जात आहे, असे दिसल्यावर मग मी घाई केली. भराभरा बॅग उचलून त्या काकांचा निरोप घेतला आणि निघालो पुण्याच्या दिशेला. तीन चारशे मीटर अंतरावर पूल लागतो. त्या पुलाखालून रेल्वेलाईन मुंबई पुणे हमरस्त्याच्या डावीकडून उजवीकडे जाते. पुलाचा चढ चढून वर आलो. खालची रेल्वेलाईन दिसू लागली. तो अचानक आठवले.

मी प्रमोदला विचारले, “अरे आपण त्या उसाच्या रसवाल्याला पैसे दिले का?”. तो नाही म्हणाला.

“अरे मग आपले चुकले, त्या काकांना काय वाटेल?, असं तो माणूस यापुढे कोणावर विश्वास नाही ठेवणार. चल आपण परत जावून रसाचे पैसे देऊया”. मी म्हणालो.

पण मनात ना ना विचार येऊ लागले.

“आम्ही प्रामाणिकपणे पैसे द्यायला जायचो, अन जर त्याच्या लक्षात अगोदरच आले असेल, आणि तो आमच्यावर रागावला असेल तर आम्ही आयतेच त्याच्या तावडीत सापडू. मग तो काय करील याचा काय नेम नाही. त्यांच्याकडचे तीर्थ प्राशन तर केलेच होते, जोडीला उगाचाच सकाळी सकाळी प्रसादही मिळायचा.”

“पण आम्ही पैसे द्यायला विसरलो किंवा दिले नाही. हे कदाचित त्याच्या लक्षात देखील आले नसावे. नाहीतर आमच्या मागे धावत येऊन आम्हाला हटकले असते. किंवा जाऊदे पैसे. ती मुलं एवढं करतायत, त्याला आपली एक मदत”, असा विचार करून कदाचित त्याने विचार सोडला असावा. आणि त्याच्यापर्यंत जाउन परत यायचे म्हणजे सुमारे एक किलोमीटरचे अंतर वाढणार होते. ह्या विचाराने मी म्हणालो, “जाऊदे, आपण पुढेच जावूया”, आलाच मागावर तर बघू काय करायचे ते”. असे ठरवून आम्ही पुढे निघालो.

पण त्या रसवाल्या काकांची बोहनी आम्ही फुकट रस पिऊन केली, त्यामुळे त्याचा दिवस कसा गेला असेल, असा विचार अधूनमधून डोक्यात यायचा. आम्ही तब्बल ६० पैसे बुडवले होते त्या रसवाल्या काकांचे, हे आठवले कि हसू येतं.

पुण्यात प्रवेश

पुढे निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी अशी अनेक गावे करत आम्ही दापोडीला पोहोचलो (हि सर्व नावे आम्हाला नंतर माहित झाली). दापोडीला आमचे दूरचे नातेवाईक राहात होते. ते आमचे कोकाटे आजोबा. त्यांच्या घरी पत्र पाठवून आम्ही पुण्याला चालत येत आहोत हे अगोदरच कळविले होते. त्यांच्या मुलाचे ‘रवींद्र जनरल स्टोर्स’ ह्या नावाचे दुकान दापोडीच्या सीएमई गेटच्या समोरच्या चौकात होते. रवींद्र मामा गेले दोन दिवसापासून आमची वाट पहात होते. आणि त्यांनी तसे आजूबाजूच्या दुकानदार मित्रांनाही सांगून ठेवले होते. साधारण एक दीड वाजता दापोडीला त्यांच्या दुकानापाशी गेल्यावर आमची ओळख सांगितली. आम्हाला पाहून रवींद्र मामाला खूपच आनंद झाला. मी पण त्यांना प्रथमच पहात होतो. त्यांनी लगेच आजूबाजूला आम्ही मुंबईहून चालत चालत दापोडीला पोहोचलो हे कळविले. आजूबाजूचे दुकानदार गोळा झाले. शेजारच्या हारवाल्याने आमच्यासाठी दोन छोटे हार आणले. लगेच दापोडी चौकात शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यासमोर आमच्या हार घालून सत्कार केला. सर्वांनी टाळ्या वाजवून आमचे अभिनंदन केले. शहिद भगतसिंग यांच्या अर्धपुतळ्या समोरच आमचा सत्कार झाल्याने मी खूपच भारावून गेलेलो होतो. कारण शहीद-ए-आझम भगतसिंग यांचा हॅटवाला फोटो नेहमी माझ्या पाकिटात असायचा. मग मला रवींद्र मामाने दोन शब्द बोलण्यास सांगितले. आता आली का पंचाईत? मी तसा मुखदुर्बल होतो. जास्तच आग्रह झाल्यावर, “अजून आमची मुंबई-पुणे पदयात्रा पूर्ण झालेली नाही, तेव्हा आम्हाला आता रजा द्यावी”, असे म्हटल्यावर सर्वजण भानावर आले अन आमची लगेचच सुटका केली.

आणि तिथून पुढे सुरु आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा.

मुंबई-पुणे प्रवास – भाग समाप्त.

आमचा पुढचा प्रवास कसा सुरु झाला …. ते वाचा पुढच्या भागात.

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Rajabhau Chimbulkar Certificate
Reference Letter issued to us by Ex. Mayer of Mumbai Late Rajabhau Chimbulkar
मुंबईचे माजी महापौर स्वर्गीय राजाभाऊ चिंबुलकर यांनी दिलेले शिफारसपत्र

हा लेख आपल्याला आवडला असणारच याची मला खात्री आहे. कृपया हा लेख आपल्या मित्रांना सामाईक (Share) करा.

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply