पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग १ – O P Nayyar’s Unseen Songs
O P Nayyar’s Unseen Songs पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग १
१९५२ संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या ओंकार प्रसाद नय्यर, म्हणजेच ओ. पी. नय्यर यांची कारकीर्द तब्बल १९९५ पर्यंत चालली. तरी देखील १९५२ चा ‘आसमान’ चित्रपटापासून १९७४ चा ‘प्राण जाये पर वचन न जाये‘ ह्या चित्रपटापर्यंतची त्यांची खरी कारकीर्द समजली जाते. अर्थातच मध्यंतरीच्या काळात खूप मोठा खंड पडलेला आहे. त्यांनी संगीतकार म्हणून जवळपास तीन-चार वेळा पुनरागमन केले आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द कायम चर्चेत राहिली. त्यांच्या गाण्यांने बॉक्स ऑफिसवर गाजवलेले वर्चस्व, सर्वात महागडा संगीतकार, ओपी आणि आशा भोसले यांनी एकमेकांना दिलेली साथ, ओपीचा गायक मोहम्मद रफी बरोबरचा रुसवा, सरकारच्या नाराजीमुळे आकाशवाणीवर ओपीच्या गाण्यांवर बंदी (ओपीची गाणी रेडिओ सिलोनवर ऐकावी लागत), चित्रपटाच्या पोस्टरवर फक्त संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे छायाचित्र झळकणे, गीतकार साहिर बरोबरची फारकत, आशा भोसले बरोबरची साथ तुटणे, राजकपूरसाठी रफीचा आवाज वापरणे, लता मंगेशकर यांचा आवाज कधीही न वापरणे, बी ग्रेडचेच चित्रपट मिळणे, तब्बल ८ ते ९ वर्ष कोणताही स्टुडिओ त्यांना गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी न मिळणे, पुढे दुसरी आशा म्हणून बनविण्याच्या निष्फळ धडपडीतून दिलराज कौर, रूना लैला, पिनाझ मसानी, पुष्पा पागधरे आणि काही अन्य गायिकांना गाण्यासाठी वापरणे, कुटुंबापासून दूर एकटेच राहणे अशा आणि आणखी कितीतरी विवादास्पद गोष्टींनी त्यांचे आयुष्य काठोकाठ भरलेले होते. असो, हा आपला आजचा विषय नाहीय.
ओपींची सांगीतिक कारकिर्दीत वरील गोष्टींबरोबर अजूनही एक खास गोष्ट घडलेली आहे. ओपींनी साधारण ७२ चित्रपटांतून ५५० हून अधिक गाणी दिलेली आहेत. त्यातील ओपींची कित्येक गाणी प्रसिद्ध आहेत आणि आजही रेडिओवर किंवा घरात ऐकली जातात.
आणि ती गाणी फक्त ऐकावीच लागतात, कारण ह्या प्रसिद्ध गाण्यांपैकी बऱ्याचा गाण्यांनी पडदा पाहिलाच नाहीय (O. P. Nayyar’s Unseen Songs). हि गाणी फक्त रेकॉर्डवरच सापडतील, पाहायला नाही मिळणार. हि गाणी पाहण्याचे भाग्य आपणास नाही आहे, कदाचित त्यासाठी कालचक्र उलटे फिरवून त्या काळात गेलो तरीदेखील चार-पाचच गाणी पाहावयास मिळतील. इतर बऱ्याच संगीतकारांचे चित्रपट हे पूर्ण तयार असत, परंतु काही कारणामुळे प्रदर्शित होत नाहीत, किंवा कधी कधी काही चित्रपटांतील एखादे गाणे काढून टाकले जाते. त्यामुळे ती गाणी आपणास पडद्यावर दिसत नाही. अगोदरच ध्वनिमुद्रित केलेली गाणी आपणास ऐकावयास मिळतात. परंतु ते केवळ अपवादानेच झालेलं दिसते. संगीतकार मदन मोहन यांची देखील काही उत्कृष्ठ गाणी अशीच पडद्यावर दिसत नाहीत.
परंतु ओपींच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय. हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर आता एकच नाही तर दोन लेख लिहावे लागतील असे वाटते.
इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.
चला तर, आता आपण ऐकूयात ओपींची गाणी, जी पडद्यावर कधीच दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.
चला तर, सुरुवात करूया, गीता दत्त यांनी गायलेल्या ‘जाता कहा है दिवाने, सब कुछ यहा है सनम’ ह्या गाण्यापासून.
जुन्या काळातील अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी १९५६ मध्ये ‘सी.आय.डी.’ चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यावेळेस त्या केवळ १८ वर्षांच्या होत्या. ‘सी.आय.डी.’ चित्रपटातील त्यांचा पहिला एण्ट्री सीन होता क्लबमधील डान्सरच्या रूपात. त्या प्रसंगी वहिदा यांच्यावर चित्रीत झालेले ‘जाता कहा है दिवाने, सब कुछ यहा है सनम‘ हे गाणे अतिशय गाजले होते. गीता दत्त यांनी गायलेल्या ह्या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. पण तेवढ्यात सेन्सॉर बोर्डाची नजर पडली ह्या गाण्यावर. बोर्डाने ह्या गाण्याच्या चित्रीकरणावर काही आक्षेप घेवून हे गाणे चित्रपटातून काढायला लावले. निर्माता गुरुदत्त यांनी ते गाणे चित्रपटातून काढले.
आणि इथून सुरु झाला ओपींच्या गाण्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा सिलसिला. ओपींची चांगली गाणी यापुढे शापित ठरू लागली.

१९६२ मधील ‘एक मुसाफिर एक हसीना‘ हा चित्रपट म्हणजे ओपींचा दुसरा कमबॅक होता. चक्क दोन वर्षांच्या खंडांनंतर ओपी नवीन स्वरूपात रसिकांपुढे सादर झाले. त्यापुढे १९६२ ते १९६५ या चार वर्षात केवळ चारच चित्रपट! (नावाला एक पाचवा चित्रपट आहे, पण मला वाटते तो रखडलेला चित्रपट असावा). या चारीही चित्रपटांमधील सर्व गाणी आजही हिटच आहेत. ह्या चारीही चित्रपटात सर्व मिळून चार गाणी पडद्यावर पाहावयास मिळत नाहीत, फक्त ऐकायला मिळतात, ती गाणी आता ऐकूयात.
१९६२ मधील ‘एक मुसाफिर एक हसीना’ या चित्रपटात एकाहून एक उत्तम आणि श्रवणीय गाणी आहेत. या चित्रपटात मो. रफी आणि आशा भोसले यांना एकूण ५ द्वंद्वगीते गायला मिळाली आहेत. त्यापैकी पहिल्या क्रमांकाचे म्हणता येईल असे ‘मैं प्यार का राही हूँ‘ हे गाणे पडद्यावर पाहावयास मिळतच नाही. रेकॉर्डवर असल्याकारणाने ऐकावयास मात्र मिळते. काही जाणकारांच्या मते हे गाणे सुरुवातीच्या आठवड्यात चित्रपटात दाखवले होते, नंतर ते काढून टाकण्यात आले. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात हे गाणे छायागीत/चित्रहार मध्ये पाहिल्याचे काहीजण सांगतात. पण आता ते कुठेच पाहावयास मिळत नाही, तर आपण ते गाणे ऐकण्याचा तरी आनंद घेवूया.
ह्या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाण्याचे रेकॉर्डिंगच्या वेळेस जोरदार पाऊस असल्याकरणाने ताडदेवच्या फेमस स्टुडिओमध्ये सर्व वादक वेळेवर पोहोचू शकले नाहीत. पण ओपींच्या कडक शिस्तीमुळे आहे त्या वादकांना घेवून त्यांनी गाणे पूर्ण केले, म्हणून ह्या गाण्यात कमी वाद्ये ऐकायला मिळतात, किंबहुना ताल वाद्य ऐकायलाच मिळत नाही.

Source: Asha Bhosle Official – YouTube Channel
हिंदी चित्रपट संगीतामधील मैलाचा दगड म्हणता येईल, एकापेक्षा एक अशा अतिशय अवीट आणि सुमधुर गाण्यांनी खच्चून भरलेला चित्रपट म्हणजे १९६४ मधील ‘काश्मीर की कली‘. या चित्रपटात एकून ९ गाणी होती. त्यापैकीं २ गाणी नंतर काढून टाकली गेली. त्यांचे व्हिडिओ कुठेच उपलब्ध नाहीत, पण ओरिजिनल साऊंडट्रॅकवर असल्याकरणाने गाणी ऐकावयास मिळतात. ही दोन्ही गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत.
त्यापैकी अतिशय छान आणि प्रसिद्ध गाणे ‘बलमा खुली हवा में‘ हे गाणे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्याने सेन्सॉरबोर्डाला अचानक त्या गाण्यात अश्लीलता दिसली आणि ते गाणे चित्रपटातून काढण्याचे आदेश बोर्डाने दिल्याने हे गाणे पडद्यावरून गायब झाले.
तसेच ह्याच चित्रपटातील दुसरे गाणे ‘फिर ठेस लगी दिलको, फिर याद ने तडपाया‘ हे गाणे चित्रपटाची लांबी वाढत असल्याकारणाने काढून टाकावे लागले.
चला तर, ऐकूयात ही दोन्ही गाणी.
Source: Asha Bhosle Official – YouTube Channel
Source: Asha Bhosle Official – YouTube Channel
आपल्याला गाण्यांचे खालील लेख देखील आवडतील:
१) एकच गाणे दोन गायकांच्या आवाजात:
https://charudattasawant.com/2021/05/30/one-song-two-variants/
२) हिंदी सिनेमातील एकदम अपरिचित आवाज:
https://charudattasawant.com/2021/05/20/unknown-singers-of-bollywood/
३) हिंदी संगीतकारांमधील दडलेला गायक:
https://charudattasawant.com/2021/05/09/singer-inside-music-composer/
४) शंकर-जयकिशन यांच्याबरोबर किशोर आणि आशा:
https://charudattasawant.com/2021/04/18/shankar-jaikishan-kishor-and-asha/
ब्लॉगवरील गाण्यांचे मागील लेख
१९६१ च्या ‘Come September‘ ह्या अमेरिकन चित्रपटावर आधारित १९६० च्या दशकात दोन हिंदी चित्रपट झाले. पहिला १९६४ चा ‘काश्मीर की कली’ आणि दुसरा १९६५ चा ‘मेरे सनम‘. योगायोगाने दोन्ही चित्रपटांचे संगीतकार ओपीच होते. ‘मेरे सनम’ चित्रपटात एकूण ९ गाणी होती, त्यातील ३ द्वंद्वगीते होती. त्यांपैकी सर्वांच्या आवडीचे असे अतिशय सुमधुर प्रेमगीत ‘हम ने तो दिल को आपके कदमों पे रख दिया‘ हे गाणे चक्क चित्रपटात नाहीय, हे गाणे सुरुवातीला चित्रपटात होते पण नंतर काढून टाकण्यात आले असे जाणकार सांगतात. हे ऐकून खूप हळहळ वाटते. ह्या गाण्यावर का अन्याय झाला हे ठावूक नाही.
पहाडी रागातील हे गाणे व्हायोलिनच्या हळूवार सुरावटीने सुरु होत ह्दयाला पीळ पाडते. इंटरल्यूडला सितार आणि त्यासोबत जलतरंगची धून आणखीच मंत्रमुग्ध करते. अंतऱ्यात वाजणारी ढोलकीची थाप संपल्यावर कमीतकमी वाद्ये वापरून खास ओपी टच मिळालेला हलका वाद्यवृंद गाण्याची गोडी वाढवते. व्हायोलिनची धून संपूर्ण गाण्यात सोबत राहते. मो. रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे एखाद्या कवितेसारखे भासते. एखादा गोड आणि आवडीचा पदार्थ खाल्यावर ज्याप्रमाणे त्याची वास आणि चव जिभेवर बराच वेळ रेंगाळत राहते, त्याप्रमाणे हे गाणे संपल्यावर व्हायोलिनची धून कानात वाजतच राहते. गाण्याची जादू मनावरून लगेच उतरत नाही, गाणे संपले असे वाटतच नाही. तुम्ही आपोआप गाण्याची चाल गुणगुणायला सुरु करता.
चला हा अनुभव घेवूनच बघा!

https://en.wikipedia.org/wiki/File:Mere_Sanam.jpg
Source: Asha Bhosle Official – YouTube Channel
१९६०च्या ‘बसंत’ ह्या अडीच तासाच्या चित्रपटात ओपींनी ऐकून १४ गाणी दिली, त्यांपैकी ११ गाणी मो. रफी आणि आशा यांनी गायलेली द्वंद्वगीते आहेत. हा आतापर्यंतचा एकाच चित्रपटात एकाच गायकांनी गायलेली जास्तीतजास्त द्वंद्वगीते असण्याचा विक्रमच आहे. ह्या ११ गाण्यांपैकी २ द्वंद्वगीते मात्र पडद्यावर दिसत नाहीत. ध्वनीमुद्रिकेवर मात्र ऐकायला मिळतात. चित्रपटात झालेली गाण्यांची गर्दी हे कारण असावे कदाचित. चला तर, ऐकूयात ‘बसंत’ चित्रपटातील हि दोन अदृश्य गाणी!
दोन्हीही गाणी खूपच श्रवणीय आहेत. दोन्ही गाणी एकत्रच जोडलेली आहेत.
पहिले गाणे: कितनी बदल गयी है, जरा चाल देखीये, गायक: मो. रफी आणि आशा भोसले, गीतकार: कमर जलालाबादी
दुसरे गाणे: ओ, मॅडम नॅन्सी, गायक: मो. रफी आणि आशा भोसले, गीतकार: शेवान रिजवी

दुसरे गाणे: ओ, मॅडम नॅन्सी
Spurce: https://www.youtube.com/channel/UC4F5cdtKHc_weUbgj1GVsKg
उर्दू साहित्यातील प्रसिद्ध लेखिका पद्मश्री ईस्मत चुगताई ह्यांनी साहित्य क्षेत्राबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील काम केले आहे. चित्रपट कथा, संवाद लेखन, अशा विविध आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. तसेच चित्रपट निर्माती म्हणून त्यांनी १९५८ साली ‘लालारूख’ आणि ‘सोने की चिड़ीया‘ ह्या दोन चित्रपटांची निर्मिती केली. ह्या दोन्ही चित्रपटांचा नायक होते सुप्रसिद्ध गजल गायक ‘तलत मेहमूद‘. ‘सोने की चिड़ीया’ हा चित्रपट ईस्मत चुगताई यांचे पती प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक शाहिद लतीफ यांनी दिग्दर्शित केला होता.
‘सोने की चिड़ीया’ चित्रपटामध्ये तलत मेहमूद यांनी गायलेले ‘प्यार पर बस तो नही है‘ हे अतिशय हळूवार प्रेमगीत रसिकांना अतिशय भावले. तलत यांचा कंपयुक्त तरल आवाज, त्या आवाजाला आशाजींच्या आवाजातील आलाप, पार्श्वभूमीवर अलगद वाजणारा ताल. बस्स, गाण्याला आणखी काही वाद्यवृंद न वापरता ओपींनी सुंदर गाणे दिले आहे. हे गाणे बहुतेकांना ठाऊक आहे. परंतु ह्याच गाण्याच्या मुखड्यावर आधारित गाणे आशाजींनी गायले आहे, हे तर अजून सुंदर वाटते. आशाजींच्या गाण्याला तर अजूनही कमी वाद्यवृंद असावा असे वाटते. हे गाणे तबकडीवर आहे, पण गाणे पडद्यावरून काढून टाकण्यात आले.
चला तर, आशाजींच्या आवाजात ऐकूयात, ‘प्यार पर बस तो नही है’. गाण्याचे गीतकार आहेत साहिर.
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच ओपींची पडदा न पाहिलेली गाणी एका भागात बसत नाहीत. दुसरा भाग लिहावाच लागणार आहे. तर आता आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या भागात उर्वरित गाणी ऐकूयात. अजूनही खूपच लोकप्रिय गाणी पुढच्या भागात असतील.
पुन्हा लवकरच भेटूयात नवीन गाणी घेऊन.
O P Nayyar’s Unseen Songs पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग १ – लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत.

BEAUTIFUL …
सुंदर
धन्यवाद