पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २ – O P Nayyar’s Unseen Songs
O P Nayyar’s Unseen Songs पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग २
Cover Photo Courtesy: https://hamaraphotos.com/o_p_nayyar_(music_director)_3725_69.html
[मागच्या भागात हि माहिती आहे: १९५२ संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या ओंकार प्रसाद नय्यर, म्हणजेच ओ. पी. नय्यर यांची कारकीर्द तब्बल १९९५ पर्यँत चालली. तरी देखील १९५२ चा ‘आसमान’ चित्रपटापासून १९७४ चा ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ह्या चित्रपटापर्यंतची त्यांची खरी कारकीर्द समजली जाते. अर्थातच मध्यंतरीच्या काळात खूप मोठा खंड पडलेला आहे. त्यांनी संगीतकार म्हणून जवळपास तीन-चार वेळा पुनरागमन केले आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द कायम चर्चेत राहिली. त्यांच्या गाण्यांने बॉक्स ऑफिसवर गाजवलेले वर्चस्व, सर्वात महागडा संगीतकार, ओपी आणि आशा भोसले यांनी एकमेकांना दिलेली साथ, ओपीचा गायक मोहम्मद रफी बरोबरचा रुसवा, सरकारच्या नाराजीमुळे आकाशवाणीवर ओपीच्या गाण्यांवर बंदी (ओपीची गाणी रेडिओ सिलोनवर ऐकावी लागत), चित्रपटाच्या पोस्टरवर फक्त संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे छायाचित्र झळकणे, गीतकार साहिर बरोबरची फारकत, आशा भोसले बरोबरची साथ तुटणे, बी ग्रेडचेच चित्रपट मिळणे, तब्बल ८ ते ९ वर्ष कोणताही स्टुडिओ त्यांना गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी न मिळणे, पुढे दुसरी आशा म्हणून बनविण्याच्या निष्फळ धडपडीतून दिलराज कौर, रूना लैला, पिनाझ मसानी, पुष्पा पागधरे आणि काही अन्य गायिकांना गाण्यासाठी वापरणे, कुटुंबापासून दूर एकटेच राहणे अशा आणि आणखी कितीतरी विवादास्पद गोष्टींनी त्यांचे आयुष्य काठोकाठ भरलेले होते. असो, हा आपला आजचा विषय नाहीय.
ओपींची सांगीतिक कारकिर्दीत वरील गोष्टींबरोबर अजूनही एक खास गोष्ट घडलेली आहे. ओपींनी साधारण ७२ चित्रपटांतून ५५० हून अधिक गाणी दिलेली आहेत. त्यातील ओपींची कित्येक गाणी प्रसिद्ध आहेत आणि आजही रेडिओवर किंवा घरात ऐकली जातात.
आणि ती गाणी फक्त ऐकावीच लागत, कारण ह्या प्रसिद्ध गाण्यांपैकी बऱ्याच गाण्यांनी पडदा पाहिलाच नाहीय (O P Nayyar’s Unseen Songs). हि गाणी फक्त रेकॉर्डवरच सापडतील, पाहायला नाही मिळणार. हि गाणी पाहण्याचे भाग आपणास नाही आहे, कदाचित त्यासाठी कालचक्र उलटे फिरवून त्या काळात गेलो तरीदेखील चार-पाचच गाणी पाहावयास मिळतील. इतर बऱ्याच संगीतकारांचे चित्रपट हे पूर्ण तयार असतात परंतु काही कारणामुळे प्रदर्शित होत नाहीत, किंवा कधी कधी काही चित्रपटांतील एखादे गाणे काढून टाकले जाते. त्यामुळे ती गाणी आपणास पडद्यावर दिसत नाही. अगोदरच ध्वनिमुद्रित केलेली गाणी आपणास ऐकावयास मिळतात. परंतु ते केवळ अपवादानेच झालेलं दिसते. संगीतकार मदन मोहन यांची देखील काही उत्कृष्ठ गाणी अशीच पडद्यावर दिसत नाहीत.
परंतु ओपींच्या गाण्यांच्या बाबतीत हा योगयोग बऱ्याचदा आणि न चुकता झालेला दिसतोय. हि गाणी संख्येने खूप मोठी आहेत, कि त्यावर आता एकच नाही तर दोन लेख लिहावे लागतील असे वाटते. इथे पण ओपींची गाणी आघाडीवर दिसतात.]
O P Nayyar’s Unseen Songs ‘पडदा न पाहिलेली ओपीची गाणी- भाग १’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाग दुसरा सुरु:
चला तर आता आपण ऐकूयात ओपींची गाणी जी कधीच पडद्यावर दिसत नाही, आणि जाणून घेवूया त्यामागची गोष्ट. गाण्यांचा काही विशिष्ट क्रम ठेवलेला नाहीय, तरी जास्त प्रसिद्ध गाणी सुरुवातीला घेतली आहेत, जी ऐकून आपणास आश्चर्य वाटेल आणि हि गाणी चित्रपटात न दिसल्याबद्दल वाईटही वाटेल.
चला तर, या भागाची सुरुवात करूया, ‘सावन की घटा’ ह्या चित्रपटातील रसिकांच्या अतिशय लोकप्रिय गाण्यापासून.
१९६४ च्या ‘काश्मीर की कली‘ या चित्रपटासाठी निर्माता शक्ती सांमता यांच्या सुचनेनुसार ओपींनी सुमारे १५-१६ चाली बनविलेल्या होत्या. त्यापैकी ९ चाली वापरून ‘काश्मीर की कली’ ची गाणी तयार झाली, आणि अतिशय गाजली देखील. उरलेल्या चाली शक्ती सांमता यांच्या पुढच्या चित्रपटात म्हणजे १९६६ च्या ‘सावन की घटा‘ ह्या चित्रपटात ओपींनी वापरल्या. ‘सावन की घटा’ चित्रपटात एकूण ८ गाणी आहेत. त्यापैकी मो. रफी आणि आशा यांच्या आवाजातील एकमेव युगल गाणे रेकॉर्ड केले गेले पण पडद्यावर दाखविले गेले नाही. हे खरोखरच प्रेक्षकांचे दुर्देव म्हणावे लागेल.
हि गोष्ट आहे, ‘मो. रफी आणि आशा यांनी गायलेले ‘ओठोंपे हसी, आखोंमें नशा’ ह्या अतिशय लोकप्रिय गाण्याची. चित्रपटात नसून देखील हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.
सतारीच्या सुरांनी सुरु होणाऱ्या धूनमध्ये लागोपाठ सारंगीची धून ऐकायला मिळते. या गाण्यात सतारी बरोबरच, सारंगी, व्हायोलीन, गिटार, बासरी आणि खास ओपी स्टाईल टांगा रिदम गाण्यात वाजविला आहे. त्यावेळेस उस्ताद रईस खान (सतार), पंडित रामनारायण (सारंगी), पं. हरिप्रसाद चौरसिया आणि बर्वे (बासरी) आणि पं. शिवकुमार शर्मा (संतूर) अशा मान्यवर वादकांनी ओपींचे वादक म्हणून आपली कला दाखविली आहे. पहिल्या अंतऱ्यात बासरी आणि सितारची इंटरल्यूड आणि दुसऱ्या अंतऱ्यात गिटार आणि सितारची इंटरल्यूड, आणि गाण्याचा शेवट बासरीने केला आहे. ह्या विविध प्रयोगांनी गाण्यांची उंची फारच वर गेलेली आहे. सारंगीचे सूर संपूर्ण गाण्यात एक गूढ आणि हुरहूर लावणारे वातावारण निर्माण करते. गाणे ऐकताना गाण्याच्या तालावर (ऱ्हिदम वर) गाण्याबरोबरच आपण अधांतरी तरंगत वाहतोय की काय असा भास होतो. (वाद्यांच्या संदर्भात काही चुकत असेल तर जाणकारांनी कान ओढावेत, आणि चुक सुधरवून सांगावी. तसे मी कुठलेच संगीताचे शिक्षण घेतलेले नाहीय, त्यामुळे चूक होणे शक्य आहे. आम्ही फक्त विविधभारती आणि इराण्याच्या हॉटेलमधील ज्यूकबॉक्सचे शिष्य!). शिवाय या गाण्यात तीन वेळा आलेला ‘क्या बात है …..’ हे शब्द आशाजींनी प्रत्येक वेळेस वेगळ्या पद्धतीने म्हटलेला आहे, हे केवळ ज्याने त्याने अनुभवावे.
चला तर, एकदा हा अनुभव घेवूनच पहा. आणि आम्हालाही कळवा.

By Source, Fair use, https://en.wikipedia.org/w/index.php?curid=57731119
Source: Madhu Nair
पुढचे गाणे आहे, ‘नया दौर’ ह्या चित्रपटातील एकदम अनोळखी गाणे.
१९५७ चा अतिशय गाजलेला चित्रपट ‘नया दौर’. ह्या चित्रपटातील गाण्यांने ओपींच्या कारकिर्दीला अजून उंचावर नेले. ह्या चित्रपटांच्या गाण्यांकरीता ओपींना १९५८ वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्यांना मिळालेले हे एकमेव पारितोषिक आहे. पंजाबी ठेक्यातील ह्या चित्रपटातील गाण्यांनी खूपच लोकप्रियता मिळवली होंती, आणि ती आजही कायम आहे. चित्रपटात एकूण सात गाणी आणि एकाच कडव्याचे एक गाणे अशी आठ गाणी दाखवलेली आहेत, त्यात आशाजींचे एकही सोलो दिसत नाही.
परंतु याचा चित्रपटासाठी आशाजींनी गायलेले ‘एक दीवाना आते जाते हमसे छेड़ करे’ हे सोलो गाणे तबकडी अथवा पडद्यावर दिसत नाही.
सुरुवातीला ‘नया दौर’ची नायिका मधुबाला होती. त्यामुळे ओपींनी तिच्यासाठी खास चाल बांधलेले ‘एक दीवाना आते जाते हमसे छेड़ करे’ हे गाणे मधुबालावर चित्रित देखील झाले होते. परंतु काही कारणांमुळे वडिलांच्या हट्टामुळे मधुबाला ‘नया दौर’ मधून बाहेर पडली आणि त्यात वैजयंतीमालाचा प्रवेश झाला. त्यामुळे मधुबालावर चित्रित झालेले हे गाणे देखील चित्रपटातून बाहेर पडले.
चला ऐकूयात ते गाणे.

Source:https://www.hindigeetmala.net/song/ek_diwana_aate_jate_humse_chhed_kare.htm
१९६८ वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘कही दिन कही रात’ ह्या चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. ह्या वेळपर्यंत ओपींच्या कॅम्पमध्ये महेंद्र कपूर यांचा प्रवेश झाला होता, त्यामुळे ह्या चित्रपटातील ‘यारोंकी तमन्ना है’ आणि ‘कमर पतली, नजर बिजली’, या दोन एकल (सोलो) गाण्यांबरोबरचे अजून एक एकल गाणे महेंद्र कपूर यांनी गायलेले आहे. ते गाणे रेकॉर्ड झाले आहे, पण पडद्यावर नाही दिसत ( O P Nayyar’s Unseen Songs ).
चला ऐकूयात महेंद्र कपूर यांचे कमी ऐकण्यात असलेले एक छान गाणे, ‘तुम्हारे ये नखरे, तुम्हारी शरारत‘.

Source: Mahendra Kapoor – Topic Provided to YouTube by Saregama India Ltd.
१९७४ वर्षातील ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ हा चित्रपट ओपी आणि आशा यांच्या सहयोगाचा शेवटचा चित्रपट ठरला. ओपींना पुढे चित्रपट मिळणे बंद झाले, रेकॉर्डिंग स्टुडिओची बुकिंग देखील मिळणे कठीण झाले. ४ वर्षांच्या दिर्घ कालावधी नंतर १९७८ मध्ये त्यांचे तिसरे पुनरागमन झाले ते मो. रफीनां बरोबर घेवूनच. पण बहुतेक तो चित्रपट आणि त्याची गाणीही चालली नाही.
पुढच्याच वर्षी १९७८ मध्ये ‘हिरा मोती‘ ह्या चित्रपटात पुन्हा ओपींनी आपली जादू दाखवली. ‘हिरा मोती’ मधून नवीन गायिका ‘दिलराज कौर‘ ला एकूण ५ गाणी दिली त्यातील तीन सोलो आहेत. ह्या तीन सोलोपैकी अतिशय सुंदर गाणे ‘तुम खुदको देखते हो’ हे गाणे पडद्यावर वरून गायब झालेले आहे, त्याचे कारण नाही माहीत. ह्या गाण्यात ओपींची पूर्ण छाप तर आहेच, शिवाय नवीन आशा भोसले निर्माण करण्याचा प्रयत्नही त्यातून दिसत आहे.
चला तर ऐकूयात, दिलराज कौर यांच्या आवाजातील ‘तुम खुदको देखते हो’.

Source: https://en.wikipedia.org/wiki/File:Heera-Moti.jpg
Dilraj Kaur – Topic Provided to YouTube by Saregama India Ltd
ओपी आणि बालगीत? कसे शक्य आहे. (खरंतर हा माझ्या पुढच्या एका लेखाचा स्वतंत्र विषय असणार आहे), पण ओघाने आलेच आहे तर सांगून टाकले. ओपींनी विविध विषय गाण्यांद्वारे हाताळले आहेत, पण ते स्वतःची छाप ठेवूनच.
१९७१ च्या ‘ऐसा भी होता है’ ह्या कौटुंबिक चित्रपटात नायिकेवर चित्रित झालेले एक गाणे आहे. साधारण एक-दीड वर्ष वय असलेल्या बाळाला त्याची आई त्याला झोपवत किंवा खेळवत असतानाच्या प्रसंगावर हे गाणे असावे असे वाटते. हा चित्रपट प्रदर्शित झाला की नाही, किंवा त्याच्या प्रिंटचे काय झाले, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. पण चित्रपटाची ४ गाणी मात्र ध्वनिमुद्रीत झालेली आहेत.
त्यापैकी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे गाणे मात्र अप्रतिम आहे, गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेले हे गाणे माझे अत्यंत आवडीचे आहे. गाणे ऐकताना डोळे भरून येतात. टिपिकल ओपी स्टाईल वाद्यवृंद वाजवलेला आहे. गाण्याच्या सुरुवातीला आशाजींनी जी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे शब्द ज्या पट्टीत उचलले आहेत, त्याला तोडच नाही.
चला तर ऐकूयात हे ‘चांद रातोको निकले ना निकले’.

Source: https://gaana.com/album/aisa-bhi-hota-hai
Source: Asha Bhosle Official Provided to YouTube by Sa Re Ga Ma
१९६० मध्ये ‘मिट्टी में सोना’ या नावाचा चित्रपट निघाला होता. तो कुठं गेला, त्याच्या प्रिंट्स कुठे गेल्या काहीच पत्ता लागत नाही. त्याचे व्हिडिओ कुठेच उपलब्ध नाहीत. (कदाचित काही दिवस चित्रपटगृहात हा चित्रपट दिसला असावा). पण ह्या चित्रपटाची गाणी मात्र तबकडीवर ऐकायला मिळतात. प्रदीपकुमार आणि वैजयंतीमाला अभिनित या चित्रपटातील ७ गाण्यांपैकी गीतकार राजा मेहदी अली खान यांनी लिहिलेली दोन गाणी आपण आता ऐकूयात.
त्यातले पहिले गाणे एका उडत्या चालीचे परंतु खास ओपी स्टाईलचे गाणे ‘आँखोंसे आँख मिली, दिलसे दिल टकराने दो‘ हे मो. रफी आणि आशा यांनी गायलेले एक श्रवणीय गाणे आहे. हे गाणे फारच कमी ऐकायला मिळते म्हणून आपणासाठी ऐकवत आहे. या गाण्यात देखील ‘ ना बाबा माफ करो ….’ हे शब्द आशाजींनी प्रत्येक वेळेस उच्चारले आहेत. तसेच मो. रफी यांनी “आँखों से आँख मिली” आणि “… टकराने दो” हे शब्द प्रत्येक वेळेस वेगळ्या पद्धतीने उच्चारले आहेत, कसे ते ऐका या गाण्यात.
आणि दुसऱ्या गाण्याविषयी काय म्हणावे? ओपी आणि आशा या जोडीचे हे एक सर्वोत्कृष्ठ गाणे मानले जाते. इतके सुदंर गाणे पडद्यावर दिसत नाही हा शाप काय कमी आहे कि काय, म्हणून ह्या गाण्याचे दुसरे कडवे (किंवा दुसरा भाग) देखील रेकॉर्डवर सुद्धा नाहीय. कोणाला कुठून सापडले माहीत नाही, पण त्या सर्व अनामिक संग्राहकर्त्याचे मनःपूर्वक आभार मानायला हवेत. (जिज्ञासूंनी या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यासाठी संपर्क करावा).
एखादे उत्कृष्ठ गाणे एवढे शापित असावे? मी सांगत आहे ते गाणे आहे, ‘पूछो न हमें, हम उनके लिये, क्या क्या नज़राने लाये हैं‘! पियानोवर सुरु होणारे गाणे हे एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. संपूर्ण गाण्यात पियानो सोबत आहे.
चला आता ऐकूयात हि दोन्ही गाणी.
Source: Shankar Iyer – https://www.youtube.com/channel/UC7esakVMsqzaQzpJ8XalvDw
Source: Madhu Nair –https://www.youtube.com/channel/UCLzMnHBKANKLGbvW0LQge9g
ओपींनी मन्ना डे यांना केवळ चार-पाचच गाणी दिली आहेत. त्यात एकही सोलो नाही दिसत. किशोर कुमार अभिनेता असलेल्या १९५८ वर्षातील ‘कभी अंधेरा कभी उजाला’ ह्या चित्रपटामध्ये मन्ना डे आणि आशा भोसले यांनी गायलेलं युगल गीत ‘बाहों को ज़रा लहरा दे’ आपण आता ऐकूयात. हे गाणे पडद्यावर नाही आहे यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे नाहीय. एरव्ही देखील मन्ना डे आणि आशा भोसले यांची युगल गीते खूपच कमी आहेत. त्यामुळे ह्या गाण्याचा आनंद वेगळाच मिळतो.
Source: Asha Bhosle Official Provided to YouTube by Sa Re Ga Ma
आता ऐकूयात या भागातील शेवटचे गाणे. हे गाणे मुद्दाम शेवटी ठेवले आहे, कारण हे गाणे आतापर्यंत ऐकलेल्या या सर्व शापित आणि दुर्देवी गाण्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमाकांवरचे आहे. जाणकारांनी ओळखले असेलच कुठले गाणं आहे ते.
सन १९७४ मधील ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ ह्या चित्रपटातील गाण्याची कथा वेगळीच आणि दुःखदायक आहे. ह्या चित्रपटातील ‘चैन से हमको कभी’ ह्या अतिशय प्रसिद्ध आणि भावपूर्ण गाण्याने ओपी आणि आशा यांच्या जवळपास १५ वर्षांच्या सहयोगाचा शेवट झाला. सन १९७२ मध्येच ह्या गाण्यांचे ध्वनीमुद्रण पूर्ण झाले होते, हे गाणे ओपी आणि आशा दोघांच्या सहयोगाच्या कारकिर्दीमधील शेवटचे गाणे असेल हे अगोदरच ठरले होते, त्यामुळे दोघांनीही गाण्यात सर्वस्व ओतलेले जाणवते. ओपींचा विश्वासू गीतकार एस. एच. बिहारी यांनी देखील या ताटातुटीला अतिशय समर्पक गीत लिहून दिले जे सर्वांच्याच भावनेला हात घालणारे ठरले. ओपींनी या गाण्याला नेहमीपेक्षा वेगळीच चाल लावली आणि कमीतकमी वाद्ये वापरून गाणे बनवले गेले. फक्त गिटार (?), बासरी, पियानो आणि बास देणारे वाद्य एवढीच वाद्ये गाण्यात ऐकायला मिळतात. (माझे या बाबतीतील ज्ञान थोडे नाही तर जास्तच कमी पडत आहे, जाणकारांनी कंमेंट्स मध्ये कळवावे, हि विनंती).
त्या काळाच्या विपरीत घडलेली घटना म्हणजे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही महिने अगोदरच नोव्हेंबर १९७३ मध्ये हे गाणे प्रथम रेडिओ सिलोनवर ऐकवले गेले आणि गाणे अफाट लोकप्रिय झाले. परंतु १९७४ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात हे गाणे पडद्यावर दाखवलेच गेले नाही. हे सर्व घडण्यामागे पडद्यापाठी काय घडले या विषयी अनके दंतकथा ऐकायला मिळतात. फिल्मफेअर पारितोषिक प्राप्त गाणे चित्रपटात नसण्याचे हे ऐकमेव उदाहरण असावे.
अजूनही ह्या गाण्याचे दुर्देव पाठ सोडत नाही, रेडिओवर वाजणाऱ्या ह्या गाण्याच्या पहिल्या कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींना सरकारने (सेन्सॉर बोर्डाने) आक्षेप घेतला, तेव्हा त्या दोन ओळी बदलून गाणे पुन्हा रेकॉर्ड करावे लागले. आपणास हि दोन्ही गाणी पुढे ऐकावयास मिळतील.
अजूनही ह्या गाण्याची कथा संपलेली नाहीय, हे गाणे खूप लोकप्रिय झाल्यावर कधी नव्हे ते ओपींच्या ह्या गाण्याला सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायनाचे १९७५चे फिल्मफेअर पारितोषिक आशाजींना मिळाले. मार्च १९७५ मध्ये झालेल्या फिल्मफेअर पारितोषिक वितरण समारंभात आशाजींच्या अनुपस्थितीत स्वतः ओपींजीनी पारितोषकाचा स्वीकार केला. कार्यक्रम संपल्यावर कारमधून घरी जाताना ओपींनी कार रस्त्याच्या कडेला थांबवायला लावली, आणि काही कळण्याच्या अगोदरच ते पारितोषिक ओपींजीनी खिडकीतून लांब बाहेर फेकून दिले. रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्याच्या खांबावर ते आपटून त्याचे तुकडे तुकडे झाल्याचा आवाज झाल्यावरच ओपी पुढे निघाले. हि कथा त्यावेळेस त्यांच्या सोबत असलेले त्यांचे विश्वासू एस. एच. बिहारी यांनी सांगितली आहे.
चला तर, आता ऐकूयात या दुर्देवी गाण्याची दोन्ही रूपे!

पहिल्या अंतऱ्यातील मूळ शेवटच्या दोन ओळींचे दूरदर्शवरील गाणे
Source: The Listener – Chain Se Humko Kabhi Aapne Jeene Na Diya Asha Bhosle Live Doordarshan
पहिल्या अंतऱ्यातील बदलेल्या दोन ओळींचे रेकॉर्डवरील गाणे
Source: Asha Bhosle Official Provided to YouTube by Saregama India Ltd
हा २रा भाग लिहिताना फारसे लिहावे लागणार नाही असे वाटले होते. पण शेवटी लेखाच्या मर्यादेमुळे थांबावे लागत आहे. अजूनही ओपींची अजूनही प्रदर्शित न झालेली गाणी सापडत आहेत, पण ती बहुतेक प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांमधील आहेत. त्या विषयी पुन्हा कधीतरी लिहीनच.
तर आता आपण इथेच थांबूयात. अजूनही खूप लोकप्रिय आणि विविध विषयांवरची गाणी पुढच्या भागात असतील.
O P Nayyar’s Unseen Songs पडदा न पाहिलेली ओपीची गाणी – भाग २ – लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकू.

Simply astonishing, great
Thnx.