कुंडली योग – Horoscope
कुंडलीयोग – Horoscope : लेखक – दीपक तांबोळी
‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा’– (कुंडली योग – Horoscope)
‘श्रीगणेश ज्योतिष कार्यालय’ ही पाटी वाचून मी आत शिरलो. आतमध्ये १०-१२ जण बसले होते. त्यातल्या एकाला मी “गुरुजी आहेत का?”, असं विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवली. आतल्या खोलीतून कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता. बहुतेक गुरुजी कुणाला तरी भविष्य सांगत होते. बाहेरच्या गर्दीवरुन गुरुजी चांगलेच प्रसिद्ध ज्योतिषी असावेत असा अंदाज येत होता.
एकदिड वर्षांपूर्वी मी जर एखाद्या ज्योतिषीकडे एवढी गर्दी पाहिली असती तर मी नक्कीच या लोकांच्या अंधश्रद्धेवर हसलो असतो. तसा मी नास्तिकच. ज्योतिष हे थोतांड आहे असं मानणारा. आकाशातील करोडो मैलांवरचे ग्रह माणसांच्या जीवनावर कसले परीणाम करणार असं म्हणून ज्योतिषशास्त्राची येथेच्छ टिंगलटवाळी करणारा. पण गेल्या दिड वर्षांपूर्वी बी. ई. पास झाल्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. कॉल येत नव्हते असं नाही पण इंटरव्ह्यू चांगला होऊनही माझी निवड होत नव्हती.
“तुझं नशीब मार खातंय” असं आईवडील म्हणत होते. मला ते पटत नव्हतं. “आपलं भविष्य घडवणं आपल्याच हातात असतं”, असं माझं मत होतं.
पण इतर मित्र भराभर नोकरीला लागत असतांना मी मात्र बेरोजगारीचे चटके सहन करत होतो. गेल्या सहा महिन्यापासून तर मी चक्क डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मनात आत्महत्येचे विचार घोळत होते. ते पाहून आईवडिलांनी मला आज जबरदस्ती इथे पाठवलं होतं. मी समोरच्या लोकांकडे पाहिलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भविष्याची काळजी दिसत होती. प्रयत्न करुनही यशस्वी न झालेली, दुःखात पोळलेली माणसं शेवटी ज्योतिषाचा आणि देवाचा आधार घेतात असं मी ऐकलं होतं. ते आज मी स्वतःच अनुभवत होतो. एक तासाने माझा नंबर लागला. मी गुरुजींसमोर जाऊन बसलो.
गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने हसले. “बोला काय म्हणताय?” त्यांनी विचारलं. मी माझी पत्रिका त्यांच्यासमोर ठेवली. “गुरुजी बी. ई. चांगल्या मार्कांनी पास होऊन दिड वर्ष उलटलंय. साधी पाचदहा हजाराचीही नोकरी लागली नाही. सध्या खुप निराशा वाटतेय. कशात मन लागत नाही”.
“साहजिकच आहे. बेरोजगारांची मानसिक अवस्था अतिशय वाईट असते”.
“गुरुजी बघा बरं माझ्या नोकरीचा योग कधी आहे ते! आणि नोकरी कुठं मिळेल तेही सांगा” गुरुजींनी पत्रिकेवर नजर टाकली. खालची मान वर न करता म्हणाले “तुम्ही हुशार आहात. मेहनती आहात. पण पत्रिकेतल्या नोकरी, व्यवसायाच्या स्थानात अशुभ ग्रहांची युती आहे त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येता हेत” मग त्यांनी पंचांग उघडलं. मनाशी काही आकडेमोड केली. मग माझ्याकडे पहात म्हंणाले “पण वर्षापूर्वी नोकरीचा बऱ्यापैकी योग होता तेव्हा काही झालं नव्हतं का?”
ते म्हणत होते ते खरंच होतं. “हो. एका कॉलेजमध्ये नोकरीची ऑफर होती पण पगार कमी होता आणि तोही चारचार महिने मिळत नाही असं ऐकण्यात होतं. शिवाय ते परमनंट करत नाहीत असं माहित पडल्यामुळे मी गेलो नाही”.
“अच्छा. सगळ्या शिक्षणक्षेत्रात आजकाल अशीच पिळवणूक सुरु आहे. ठिक आहे आता एकवीस आँगस्ट नंतर चांगले योग आहेत. आँगस्ट महिन्यात राहूची महादशा संपून गुरुची महादशा सुरु होतेय. शिवाय गोचरीचे ग्रहही शुभस्थानात येताहेत. नोकरी शंभर टक्के मिळणार. मात्र ती दक्षिण दिशेला मिळेल. पण तुम्ही फार काळ नोकरी नाही करणार. स्वतःचा व्यवसाय सुरु कराल. त्यातही तुम्ही चांगली प्रगती कराल”.
“बापरे म्हणजे अजून सहा महिने वाट पहायची?” मी थोडं नाराजीने आणि अविश्वासाने म्हंटलं. एकतर सहा महिने असे घरी बसून काढायचे माझं जीवावर आलं होतं आणि माझ्या हातात मुंबईच्या तीन चार कंपन्यांचे कॉल्स होते. त्यातल्या एकात तरी माझी निवड होईल असं मला वाटत होतं. अर्थात आजपर्यंतच्या अनुभवावरुन त्याचीही खात्री वाटत नव्हती. शिवाय आईवडिलांना सोडून साऊथमध्ये जायची माझी अजिबात इच्छा नव्हती. गुरुजींनी खांदे उडवले. म्हंणाले, “ग्रह तरी तेच सांगताहेत”.
“नोकरी लवकर लागावी यासाठी काही उपाय नाही का?”.
दीपक तांबोळी यांनी लिहिलेली आणखी एक कथा वाचण्यासाठी इथे क्लीक करा:
कर्तव्य (Marathi Story Kartavya)
“करुनही फायदा नाही. उपायाच्या नावावर लोकांकडून पैसे उकळण्यातला मी नाही. तसंही विधीलिखित टळत नाही. दिड वर्ष वाट पाहिलीत. सहा महिने अजून पहा”.
मी निरुत्तर झालो. “गुरुजी तुमची दक्षिणा किती द्यायची?”.
गुरुजी हसले, “मी बेरोजगारांकडून दक्षिणा घेत नाही. हे माझं एक समाजकार्य आहे असं समजा. नोकरी लागली, भविष्य खरं ठरलं की तुमची जेवढी इच्छा होईल तितकी दक्षिणा द्या. ओके?”.
मला आनंद झाला. मी त्यांचे आभार मानून तिथून बाहेर पडलो. उत्सुकतेपोटी मी गुरुजींची माहिती काढली. गुरुजींचं खरं नाव होतं चंद्रकांत पण त्यांना सगळे चंदू गुरुजीच म्हणायचे. गोरा रंग, देखणा चेहरा, सहा फुट उंची, कपाळावर गंध, मजबूत शरीरयष्टी. गुरुजी मेकॅनिकल इंजीनियर आहेत असं चुकूनही वाटायचं नाही. वय असावं पस्तीस छत्तीस. “माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाही” असं ते सर्वांना सांगायचे. पण त्यांच्या आईने त्यांना जळगांवबाहेर नोकरीला जाऊ दिलं नाही हे खरं सत्य आहे, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं होतं. एकुलता एक मुलगा लग्नानंतर सात वर्षांनी नवसाने झालेला. त्यामुळे त्याला दूर पाठवायला ती माऊली तयार नव्हती. गुरुजींचे वडील ते दहावीत असतांनाच गेलेले. त्यामुळे जे काही करायचं ते जळगांवातच कर असं तिचं म्हणणं होतं.
जळगांवात इंडस्ट्रीज नव्हत्या. गुरुजींना सुरुवातीला मुंबई पुण्याला बऱ्याच नोकऱ्या मिळण्याची संधी चालून आली होती पण आईमुळे ते जाऊ शकले नाही. स्वतःच्या भविष्याचा अभ्यास करता करता भविष्य सांगणे हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. मनमानी दक्षिणा त्यांनी कधीही मागितली नाही तरीही त्यांना चांगली कमाई व्हायची. चांगला अनुभव आलेले लोक त्यांना बराच दानधर्म करायचे. गुरुजींचं लग्न झालं नव्हतं. “माझ्या कुंडलीत विवाहयोग नाही” असंही ते म्हणायचे. त्याच्या लग्नाचे अनेक प्रयत्न झाले. पण केवळ लोकांचं भविष्य सांगून उदरनिर्वाह करणाऱ्याला आपली मुलगी द्यायला कोणीही तयार झालं नाही ही खरी वस्तुस्थिती होती. किंवा मला तशी ती वाटत होती.
त्या सहा महिन्यात मी बऱ्याच ठिकाणी मुलाखतींना गेलो. गुरुजींचं भविष्य खोटं ठरवण्याच्या हेतूने मी इंटरव्ह्यूला जातांना चांगली तयारी करुन जायचो. पण मुलाखती चांगल्या होऊन देखील माझी कुठेच निवड झाली नाही. १६ ऑगस्टला मला बंगलोरच्या एका कंपनीचा मेसेज आला. २२ ऑगस्टला मुलाखतीला बोलावलं होतं. इच्छा नसतांनाही मी गेलो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिलेक्टही झालो. सुरुवातीलाच सहा लाखांचं पॅकेज मिळालं. मला खुप आनंद झाला. चंदू गुरुजींचं भविष्य खरं ठरलं होतं. दोन महिन्यांनी मी जळगांवला आलो. गुरुजींना मी हजार रुपये दक्षिणा आणि पेढे तर दिलेच पण एका हॉटेलमध्ये पार्टीही दिली.
त्यानंतर मी अनेक गोष्टीत गुरुजींचा सल्ला घ्यायला लागलो. ज्योतिषाला थोतांड समजणारा मी गुरुजींच्या सल्ल्याशिवाय कोणतंही कार्य करेनासा झालो. त्याचे फायदेही होऊ लागले. त्यांच्या सल्ल्यावरुन मी माझ्या बहिणीचं लग्नं एका हाँटेल व्यावसायिकाशी लावून दिलं. वर्षभरातच त्यांची भरभराट झाली. दुसरं शानदार हॉटेल सुरु झालं. आता घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली. एका मुलीचं स्थळ सांगून आलं मुलगी सुंदर होती. उच्चशिक्षित होती. माझ्यासह सर्वांनाच आवडली. मी तिची कुंडली चंदू गुरुजींना जाऊन दाखवली.
“मुलीचं बाहेर अफेअर आहे. शक्यतो लग्न करु नका” गुरुजींनी सल्ला दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी मुलीला नकार दिला. आश्चर्य म्हणजे एक महिन्यातच ती मुलगी एका परजातीच्या मुलाबरोबर पळून गेल्याची बातमी आली. मी गुरुजींना लक्ष लक्ष धन्यवाद दिले. नंतर मी गुरुजींच्या सल्ल्यानेच लग्न केलं. माझा संसार सुरळीत सुरु झाला. लग्नानंतर तीन वर्षांनी मला पुण्यात स्वतःची फॅक्टरी सुरु करायची संधी मिळाली. बंगलोरची नोकरी सोडून मी पुण्यात स्थायीक झालो. गुरुजींचं हेही भविष्य खरं ठरलं. दोनच वर्षात माझी खूप भरभराट झाली. बंगला झाला. दोनतीन चारचाकीही झाल्या. परदेशी वाऱ्या होऊ लागल्या.
सगळं चांगलं सुरु असतांना अचानक दोन वाईट बातम्या कानावर आल्या. पुण्यातल्या माझ्या मावसबहिणीचा नवरा अपघातात गेला. फक्त ३५ वर्षाची बहिण आणि तिची १० वर्षाची मुलगी एका झटक्यात अनाथ झाल्या. दुसरी वाईट बातमी चंदू गुरुजींच्या आईच्या निधनाची होती. गुरुजीही अनाथ झाले होते.
मी गुरुजींना जळगांवला भेटायला गेलो तेव्हा गुरुजी विमनस्क अवस्थेत बसले होते. सध्या गांवात मिठास बोलून लोकांना लुबाडणाऱ्या अनेक खऱ्या खोट्या ज्योतिषांनी ज्योतिषाची, वास्तूशास्त्राची दुकानं उडून ठेवली होती. त्यामुळे ज्योतिषाचा धंदा न करणाऱ्या, आपणहून लोकांना दक्षिणा न मागणाऱ्या चंदू गुरुजींच्या उत्पन्नावर वाईट परीणाम झाला होता. त्यांचा ज्योतिषाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता असं ऐकण्यात आलं होतं. त्यातून कटू वाटणारं भविष्य सांगायचं नसतं ही व्यावसायिकता गुरुजींनी पाळली नव्हती त्यामुळे असं कधीतरी होणारच होतं.
सगळी विचारपूस झाल्यावर मी गुरुजींना विचारलं. “आता यापुढे काय गुरुजी? तुम्ही काही ठरवलंय का?”.
गुरुजी मंद हसले. म्हणाले, “तुम्हाला तर माहीतेय माझ्या कुंडलीत नोकरीचा योग नाहीये. त्यामुळे जसं चाललंय तसं चालू द्यायचं”.
“असे एकटे आयुष्य कसं काढणार? लग्न करुन घ्या”.
“मी आता ४२ वर्षाचा आहे. लग्नाच्या वयात लग्न झालं नाही. आता ते काय होणार? मला मुलगी तरी कोण देणार? असाही माझ्या कुंडलीत लग्नाचा योगच नाहीये”.
माझ्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. मी त्यांना म्हणालो, “मी तुमचे हे दोन्ही योग जुळवून आणले तर?”
गुरुजी चमकले. माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. “म्हणजे?”.
“म्हणजे नोकरीचे आणि लग्नाचे दोन्हीही?”
“ते कसे?”
“सांगतो”, मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो. मग मी त्यांना सविस्तर सगळं समजावून सांगितलं. ते अगोदर तयार झाले नाहीत. मी सांगितलेला प्लँन यशस्वी होणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं.
पण “जमलं तर ठिकच, नाहीतर सोडून द्या” असं मी म्हंटल्यावर ते तयार झाले.
आज या घटनेला सहा महिने होऊन गेले. मधला काळ खूप धावपळीचा गेला. गुरुजींना मी माझ्याच कंपनीत, ते इंजीनियर असल्यामुळे सुपरवायझर म्हणून लावून दिलं. त्यानंतर मावसबहिणीला लग्नाला तयार केलं. तिला मुलीची काळजी वाटत होती. पण गुरुजींनी मनाचा मोठेपणा दाखवत तिला मुलीसकट स्विकारलं. बहिण आणि गुरुजी दोघंही नाही म्हणत असतांना मी दोघांचं वैदिक पध्दतीने जोरदार लग्न लावून दिलं. त्यांच्या लग्नानंतर एक महिन्याने मी त्यांच्या घरी गेलो. दोघंही सुखी आणि आनंदी दिसत होते. बहिणीची मुलगी गुरुजींना चिकटून बसली होती. याचा अर्थ नवीन वडिलांना तिनं फक्त स्विकारलंच नव्हतं तर ते तिला आवडू लागले होते. तीन निराधार जीवांना एकमेकांचा आधार मिळाल्यामुळे तिघांच्या चेहऱ्यावर त्रुप्ती आणि समाधान झळकत होतं.
माझ्या एका निर्णयाने तिघांचं आयुष्य सुरळीत झालं याचा मलाही आनंद झाला. मी गुरुजींना म्हंटलं, “गुरुजी तुमचा ज्योतिषाचा व्यवसाय परत सुरु करायला हरकत नाही. इथं पुण्यात खूप चालेल”.
गुरुजी हसले. म्हणाले, “तो व्यवसाय, ज्योतिषाची पुस्तकं, पंचांग मी जळगांवलाच सोडून आलोय. त्या विधात्याच्या मनातलं कोणताही मोठ्यातला मोठा ज्योतिषीही काही सांगू शकत नाही. कुंडलीत कोणतेही योग नसतांना माझ्या बाबतीत जे घडलं ते पाहून मी ज्योतिष सोडून द्यायचा निर्णय घेतलाय.”
“बघा ना, तुमच्या बहिणीच्याही कुंडलीत वैधव्याचा तर योग होता पण पुनर्विवाहाचा काही योग नाहिये. विधीलिखित टळत नाही, असं आपण म्हणतो मग भविष्य बघायचंच कशाला हा मला प्रश्न पडलाय. कदाचित कुंडलीत योग नसतांनाही आम्हांला एकत्र आणण्याचं कर्म तुमच्याकडून नियतीला करुन घ्यायचं असेल. ज्योतिष हे मार्गदर्शक आहेच पण काही कर्मं ही आपल्यालाच करावी लागतात असं माझं आता ठाम मत झालंय. त्यामुळे आता तुम्ही जसा दिला तसा कर्मावर मी भर देणार आहे”.
ते म्हणत होते ते पटत होतं. स्वतःच्या कुंडलीतले लग्नाचे आणि नोकरीचे योग गुरुजींना चांगले ज्योतिषी असूनही का कळले नाहीत हे मला समजलं नाही. पण या घटनेमुळे एक चांगला ज्योतिषी कर्मवादावर उतरलाय याचा आनंद मानायचा की दुःख करायचं हेच मला समजेनासं झालं.
कुंडली योग – Horoscope – लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा)
लेखाचे सर्वाधिकार: लेखक – दीपक तांबोळी – ९५०३०११२५०
दीपक तांबोळी यांनी लिहिलेली आणखी एक कथा वाचण्यासाठी इथे क्लीक करा:
कर्तव्य (Marathi Story Kartavya)
लेखक परिचय:
लेखक दीपक तांबोळी यांची ह्रदयस्पर्शी कथांची प्रकाशित पुस्तके
तिन्ही पुस्तकं एकत्रित घेतल्यास फक्त रु. ४००/-मध्ये (पोस्टल चार्जेस रु.५०/- अतिरिक्त)
जे पुस्तक हवे असेल त्या पुस्तकाची किंमत खालील खात्यात जमा करावी
Name: Deepak Madhukar Tamboli Bank
Name: Union Bank Of India
Branch Name: Sindhi colony Branch, Jalgaon
A/C No. 507002010000689
IFSC : UBIN0550701
किंवा आपण गुगल पे, फोन पे, पेटीएमने शुल्क 9503011250 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.
रक्कम भरल्यावर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा.
पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया ९५०३०११२५० ह्या मोबाईल क्रमांकावर लेखकाशी संपर्क करावा
Cover Image Design by: Background vector created by rawpixel.com – www.freepik.com
