O P Nayyar's Lullaby & Children Songs
| |

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs

ओपींची अंगाई आणि बालगीते? कसे शक्य आहे.

आपण शिर्षक वाचून दचकलात असालच! ऱ्हीदम किंग ओपी नय्यर, घोड्यांच्या टापाच्या तालावर गाणी देणारा ओपी नय्यर, पंजाबी ठेक्यावर गाणी देणारा ओपी नय्यर, क्लब मधील नृत्याची गाणी देणारा ओपी नय्यर, झालेच तर उडत्या चालीची आणि विनोदी गाणी देणारा ओपी नय्यर आशा विविध विशेषणांनी ज्यांना नावाजले जाते, त्या ओपींनी अंगाई आणि बालगीतेही दिली आहेत ह्यावर विश्वास बसणे थोडे अवघडच आहे. पण आपण ते आता पाहणारच आहोत (अर्थात ऐकणार आहोत) आणि ओपींच्या गाण्यांचा हा नवीन पैलू आता उलगडून पाहणार आहोत.

१९५२ संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या ओंकार प्रसाद नय्यर, म्हणजेच ओ. पी. नय्यर यांची कारकीर्द तब्बल १९९५ पर्यंत चालली. तरी देखील १९५२ चा ‘आसमान’ चित्रपटापासून १९७४ चा ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ह्या चित्रपटापर्यंतची त्यांची खरी कारकीर्द समजली जाते. ह्या दरम्यान ओपींना मिळालेल्या बहुतेक चित्रपटांच्या कथा गुन्हेगारी, विनोदी, प्रेमकथा, सामाजिक अशा पार्श्वभूमीवर असायच्या. काही शास्त्रीय संगीतावर आधारीत कथा ही होत्या, हा आमच्या पुढच्या लेखाचा विषय असेल, असो. हे सर्व चित्रपट ओपींच्या संगीतांमुळेच गाजले हे कोणीही मान्य करेल.

ओपींना गंभीर किंवा कौटुंबिक विषयांवरील चित्रपट खूपच कमी मिळाले. पण ओपींनी कथेला न्याय देवून त्या धर्तीची गाणी त्या चित्रपटांमध्ये दिली आहेत. अशा काही चित्रपटांतून ओपींनी अंगाई आणि बालगीते यांची रचना केली आहे, पण ते स्वतःची छाप ठेवूनच. त्यामुळे ओपींच्या स्टाईलमध्ये अशी गाणे ऐकणे हा एक आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच आहे. ओपींनी कितीतरी विविध विषय गाण्यांद्वारे हाताळले आहेत, हे ह्यातून सिद्ध होते.

ओपींची अंगाई आणि बालगीते संख्येने तशी कमीच आहेत, त्याचे कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे आहे. चला तर आता ऐकूयात ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली निवडक अंगाई आणि बालगीते, आणी जाणून घेवूया ओपींच्या सांगीतिक कारकीर्दीतील एक दुर्लक्षित पैलू!

आजच्या भागातील पहिले गाणे आहे, ‘चांद रातोको निकले ना निकले‘!

१९७१ च्या ‘ऐसा भी होता है’ ह्या कौटुंबिक चित्रपटात नायिकेवर चित्रित झालेले एक गाणे आहे. साधारण एक-दीड वर्ष वय असलेल्या बाळाला त्याची आई त्याला झोपवत किंवा खेळवत असतानाच्या प्रसंगावर हे गाणे असावे असे वाटते. हा चित्रपट प्रदर्शित झाला की नाही, किंवा त्याच्या प्रिंटचे काय झाले, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. पण चित्रपटाची ४ गाणी मात्र ध्वनिमुद्रीत झालेली आहेत.

त्यापैकी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे गाणे मात्र अप्रतिम आहे, गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेले हे गाणे माझे अत्यंत आवडीचे आहे. गाणे ऐकताना डोळे भरून येतात. टिपिकल ओपी स्टाईल वाद्यवृंद वाजवलेला आहे. गाण्याच्या सुरुवातीला आशाजींनी जी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे शब्द ज्या पट्टीत उचलले आहेत, ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.

चला तर ऐकूयात हे ‘चांद रातोको निकले ना निकले’.

गाणे क्र. १: ‘चांद रातोको निकले ना निकले’, चित्रपट: ऐसा भी होता है (वर्ष १९७१), गायिका: आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

आजचे दुसरे गाणे आहे, ‘गुडिया तेरे राज में, बाजे बाजा’!

चाळीत शेजारी राहणाऱ्या लहान मुलांच्या बाहुला बाहुलीच्या खेळात भाग घेऊन नायिका हे गाणे म्हणते असे चित्रित आहे. त्यामुळे गाण्याचा मूड थोडा वेगळा म्हणजेच मौजमस्तीचा आहे. शिवाय मजरूह सुलतानपूरी ह्यांनी हे गाणे लिहिले असल्याकारणाने गाण्यातील अवखळपणा जास्तच फुललेला आहे. ‘हम सब चोर है’ ह्या चित्रपटात नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे पडद्यावर पाहणे हे खूपच आल्हाददायक आहे. नलिनी जयवंत ह्या नृत्यनिपुण होत्या कि नाही, हे मला माहीत नाही, ह्याविषयी कुठेच वाचल्याचे आठवत नाही, परंतु त्यांचे अभिनय, भावप्रदर्शन व नृत्यकौशल्य मात्र अप्रतिम होते असे माझे मत आहे. रसिकांनी ह्या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी युट्युबवर त्याकरीता नक्की पाहावीत आणि आपले मत ठरवावे.

गाणे क्र. २ : गुडिया तेरे राज में, बाजे बाजा‘, चित्रपट: हम सब चोर है (वर्ष १९५६), गायिका: आशा भोसले, गीतकार: मजरूह सुलतानपूरी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

आजचे तिसरे गाणे आहे, ‘अपनी माँ की किस्मत पर मेरे बेटे तू मत रो’!

१९६९चा ‘संबंध’ ह्या चित्रपटातील गाणी म्हणजे ओपींच्या सांगीतिक कारकीर्दीतील कळस म्हटले पाहिजे. ओपींचा दर्जा येथे सिद्ध होतो. परंतु ओपींच्या कारकीर्दीचा शेवटचा टप्पा सुरु झालेला होता. आणि चित्रपट अजिबातच चालला नाही, त्यामुळे गीतकार कवी प्रदीप आणि संगीतकार ओ. पी. नय्यर ह्या अभूतपूर्व संयोगाने निर्माण झालेली ह्या चित्रपटातील गाणी मात्र उपेक्षित राहून गर्दीत विरून गेली. केवळ रसिक श्रोत्यांना ही गाणी माहीत आहेत किंवा आठवतात.

‘संबंध’ चित्रपटाची कथा अतिशय गंभीर आणि वेगळी होती. त्यात परिस्थतीने गरीब झालेली एक माता आपल्या एकुलत्या मुलाला मोठ्या श्रीमंताच्या घरी ठेवून कायमचे निघून होते, त्यापूर्वी त्या बाळाकरीता ती शेवटची अंगाई म्हणते, ते हे गाणे. मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणे पाहताना डोळ्यात अश्रू येणारच. मुलाच्या ताटातुटीने मातेचे काळीज तीळतीळ तुटत असते, तेव्हा त्या अभागी मातेला काय वेदना होतात ह्याचे चित्रण कवी प्रदीप यांनी उत्कृष्ट केले आहे.

आशा भोसले यांनी ह्या गाण्याला पूर्ण न्याय देवून हे गाणे अतिशय चांगले गायले आहे. संगीतकार ओपी यांनी कमीतकमी परंतु परिणामकारक वाद्यवृंद वापरून गाण्याला अभिप्रेत असलेला परिणाम साधला आहे.

गाणे क्र. ३ : ‘अपनी माँ की किस्मत पर मेरे बेटे तू मत रो’, चित्रपट: संबंध (वर्ष १९६९), गायिका: आशा भोसले, गीतकार: कवी प्रदीप (रामचंद्र द्विवेदी) आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

पुढची दोन गाणी एकाच चित्रपटातील आहेत.

१९८० मध्ये ओपींनी ‘बिन माँ के बच्चे’ ह्या चित्रपटास संगीत दिले त्यातील दोन गाणी आपण आता ऐकूयात. चित्रपटाच्या नावावरूनच चित्रपटातील कारुण्य जाणवते. आशा भोसले यांच्याबरोबरच्या वितुष्टामुळे ओपींनी मराठीतील गायिका पुष्पा पागधरे यांना ह्या चित्रपटात गायनाची संधी दिली. त्यांनी ह्या चित्रपटात एकूण तीन गाणी गायली त्यापैकी दोन गाणी आपण आता ऐकूयात.

आजचे चौथे गाणे आहे, ‘जो रात को जल्दी सोये और सुबह को जल्दी जागे’!

ह्या गाण्याचे चित्रीकरण आता पडद्यावर कुठेच पाहावयास मिळत नाही. परंतु दोन अनाथ भावंडामधील मोठा भाऊ त्याची लाडकी बहिण ‘मुन्नी’ला झोपवताना हे गाणे म्हणत असावे असे जाणवते.

गाणे क्र. ४: ‘जो रात को जल्दी सोये और सुबह को जल्दी जागे’, चित्रपट: ‘बिन माँ के बच्चे’ (वर्ष १९८०), गायिका: पुष्पा पागधरे, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

आजचे पाचवे गाणे आहे, ‘अपनी भी एक ऐसी मोटरकार होगी’!

हे गाणे दूरदर्शनच्या ‘छायागीत’ कार्यक्रमात पाहिल्याचे मला आठवते. वर उल्लेख केलेली दोन भावंडे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत असताना, एकदा त्यांना एक कार धुण्याचे काम मिळते, ते काम करत असताना, तो मोठा भाऊ त्याच्या लाडक्या मुन्नीला उद्याचे आशावादी मोठे स्वप्न दाखवून धीर देत असतो, ते हे गाणे.

गाणे क्र. ५: ‘अपनी भी एक ऐसी मोटरकार होगी’, चित्रपट: चित्रपट: ‘बिन माँ के बच्चे’ (वर्ष १९८०), गायिका: पुष्पा पागधरे, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

आजचे पुढचे गाणे आहे, ‘हम यतीमों के जैसा भी संसार में’!

१९७३-७४ च्या ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ ह्या चित्रपटानंतर ओ. पी. नय्यर हे सुमारे ५ वर्षे चित्रपटसृष्टीत नव्हते. १९७८च्या ‘खून का बदला खून’ चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. १९७८ नंतर ओपींनी नवीन गायिकांचा आवाज वापरला. त्यापैकी वाणी जयराम आणि उत्तरा केळकर यांनी गायलेले एक लहान आणि अनाथ मुलांचे गाणे आता आपण ऐकूयात.

गाणे क्र. ६: ‘हम यतीमों के जैसा भी संसार में’, चित्रपट: ‘खून का बदला खून’, (वर्ष १९७८), गायिका: वाणी जयराम आणि उत्तरा केळकर, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

वरील तीन-चार दुःखमय गाणी ऐकून आणि त्यातील वेदना जाणवून आपली मन दुःखी झाले असेल, तर आता ते पूर्ववत आणण्यासाठी पुढचे गाणे ऐकाच.

आजच्या भागातील सातवे गाणे आहे, ‘छुक छुक छुक छुक रेल चले’!.

१९५८च्या ‘सोने की चिडीया’ ह्या चित्रपटातील हे गाणे गायले आहे अर्थातच आशा भोसले यांनी. आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्न पहात असलेल्या आणि लहान मुलांची आवड असलेल्या नायिकेच्या मनातील हे गाणे आहे. आपल्या मुलांना आपण खेळवत आहोत आणि गाणे म्हणत आहे असे स्वप्नदृष्य ती ह्या गाण्यात पाहात आहे.

गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे बालगीत असले तरीही ओ. पी. स्टाईल ह्या गाण्यात पूर्णपणे जाणवते. गाण्यातील काही धून इतर गाण्यांत वाजवल्याचे ही आपल्या लक्षात येईल. शिवाय आशा भोसले यांच्या साथीला चक्क लहान मुलांचा कोरस वापरल्याचे जाणवते.

गाणे क्र. ७: ”छुक छुक छुक छुक रेल चले”, चित्रपट: ‘सोने की चिडीया’, (वर्ष १९५८), गायिका: आशा भोसले आणि साथी, गीतकार: साहिर लुधियानवी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर

आता ऐकूयात आजच्या भागातील शेवटचे गाणे, ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता‘!

संगीतकार ओ. पी. नय्यर आणि गायिका आशा भोसले ह्या दोघांच्या सहयोगाने झालेल्या एकूण ३२४ गाण्यांपैकी ह्या गाण्याचा क्रमांक पहिल्या ५ मध्ये नक्कीच लागेल असे मला वाटते.

१९६० मध्ये ‘मिट्टी में सोना’ या नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे व्हिडिओ कुठेच उपलब्ध नाहीत. पण ह्या चित्रपटाची जवळपास सर्वच गाणी मात्र तबकडीवर ऐकायला मिळतात. ओपी आणि आशा यांच्या जोडीचे आणखी एक सर्वोत्कृष्ठ गाणे ‘पूछो न हमें, हम उनके लिये’, हे सुद्धा ह्याच चित्रपटातील.

ह्याच चित्रपटात आशाजींनी गायलेली अंगाई ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता, मेरा प्यार तुझसे रहेगा सदा’ आता आपण ऐकूयात.

बाळाच्या काळजीने आणि प्रेमाने आईच्या मनात काय काय विचार येतात, आई आपल्या बाळासाठी काय धाडस करू शकते, ते सर्व ह्या गाण्यातून गीतकार एस. एच. बिहारी यांनी मांडलेले आहेत. गाणे ऐकताना आपल्याला आपली आई आपली कशी काळजी घ्यायची हे आठवून डोळ्यात पाणी येणार हे नक्कीच, म्हणूनच हे गाणे मुद्दामच शेवटाकरीता राखून ठेवले आहे.

गाण्यात केवळ सारंगी किंवा व्हायोलीन (किंवा अन्य वाद्य?), गिटार आणि बासरी यांचा वापर केलेला आहे, सोबत ओ. पी. स्टाईल ऱ्हीदम आहेच. ह्या गाण्याचे मला जाणवलेले आणखे एक वैशिष्ट्य म्हणजे आशाजींनी गाण्याच्या सुरुवातीला थोडा आणि शेवटचे १० ते १२ सेकंदाचा आलाप घेतला आहे, तो चक्क बासरीच्या आवाजात. (माझ्या ह्या वाक्याविषयी जाणकारांकडून टीका करून मार्गदर्शन करावे, कारण संगीत आणि वाद्यांविषयी माझे ज्ञान जरा जास्तच कमी आहे).

गाणे क्र. : ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता’, चित्रपट: ‘मिट्टी में सोना’ (वर्ष १९६०), गायिका: आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार अर्थातच ओ. पी. नय्यर

वरील सर्व गाणी ऐकून आपणाला लक्षात आलेच असेल कि, ओ. पी. नय्यर ह्यांनी बालगीते आणि अंगाईगीत हा प्रकारही लीलया वापरला आहे, परंतु टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न! पुढच्या वेळेस ओपींच्या आणखी एका नवीन पैलू विषयी जाणून घेवूयात.


संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याविषयीचे माझे इतर लेख वाचा:

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी- भाग १

पडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २


ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs – लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९

कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.

आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.


DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकू.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Copyrights of Audio & Video songs use more...

Similar Posts

3 Comments

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply