शेतकऱ्याची पोर – सावित्री – Making of a Neurosurgeon: भाग ७

Indian Village Baby Girl

Making of a Neurosurgeon- मेकिंग ऑफ अ न्युरोसर्जनभाग ७

लेखक: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन

Cover Image Artist: Ratan Dutta – Source: https://www.teahub.io/viewwp/iTxxJRo_easy-village-girl-painting/


शेतकऱ्याची पोर – सावित्री

सकाळचे १०- १०.३० वाजले असतील. ‘जे. जे. हॉस्पिटलची’ न्यूरोसर्जरी OPD पेशंटने खचाखच भरली होती. एवढ्यात एक २०-२२ वर्षाचा मुलगा OPD मध्ये डोकावत मला म्हणाला, “डॉक्टर सायेब, आत येऊ का?” मी हो म्हणाल्यावर, गळ्यात अडकवलेली मोठी बॅग व एका हातात रिपोर्ट्स घेऊन कसाबसा तो आत घुसला आणि त्याच्या पाठोपाठ एक गरोदर मुलगी देखील आत आली.

मी काहीही न विचारताच त्याने ओळख करून दिली. साहेब “मी शिवराम, आणि ही माझी बायको!”. बायको कसली 16-17 वर्षाची पोरंच होती. वाढलेलं पोट बघून ७-८ महिन्याची गरोदर असेल असं वाटतं होत. चापून-चोपून बांधलेले केस, कपाळावर मोठी टिकली, भेदरलेली नजर, गळ्यात काळ्या मण्यांच मंगळसूत्र आणि नावाला असाव्या म्हणून सोन्याच्या छोट्या वाट्या, हातात वीतभर बांगड्या! काळी सावळी असली तरीही नाकीडोळी नीटस व आखीव-रेखीव! मुलगा ही तसाच चुरगाळलेला, पांढरा शर्ट इन न करता बाहेरच सोडलेला, काळी पँट, नुकतेच मिसुरड फुटलेले आणि खुरटी दाढी!

एका हातात OPD पेपर्स आणि दुसऱ्या हातात मोठी कापडी हिरव्या रंगाची बॅग! त्या बॅगेमध्ये कपडे असे दाबून-दाबून भरले होते, की तिची चेन एका बाजूला उसवली होती, आणि त्याला फिक्स करण्यासाठी २-४ सेफ्टीपिना लावून त्याला ठिगळ लावलेलं. मुलीनं पर्स घट्ट आवळून बगलेत ज्या पद्धतीने धरली होती, त्यावरून स्पष्ट होत होतं की, नवऱ्याने तिला घरून निघतानाच बजावलं असावं की, “मुंबईला प्रवसात पैसे चोरी होण्याची शक्यता असते म्हणून.” असा एकंदरीत अवतार बघून मी समजलो की ते दोघं बाहेर गावाहून आले असावेत आणि सकाळीच ट्रेनमधून स्टेशनला उतरून, पत्ता विचारत-विचारत जे. जे. हॉस्पिटलपर्यंत पोहोचले असावेत. मुलगी तर पहिल्यांदाच गावा बाहेर पडली असावी, अस तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होतं.

कुठल्याही पेशंटशी बोलायला सुरुवात करताना कितीही गडबड असली तरी मी कधीच, “काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे?” या प्रश्नांनी सुरुवात करत नाही. कारण एकदा प्रॉब्लेम विचारला की मग डायग्नोसिस, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंटच चक्रच चालू होऊन जातं आणि बऱ्याचदा पेशंटकडे एक माणूस म्हणून बघायचंच राहून जातं. म्हणून मी विचारलं, “हं, बोला, कुठून आलात?”.

त्यांनी गावाकडच्या डॉक्टरने दिलेला एक पेपर माझ्या समोर धरला आणि म्हणाला, “सर, नांदेडच्या पलिकड मुखेड तालुक्यातल्या गावावरून आलोय, डॉक्टरनी पाठवलयं. माझ्या मेंदूमध्ये गाठ झाली म्हणाले डॉक्टर!”

हे ऐकून त्याची बायको म्हणाली, “साहेब, मागल्या ऐतवरी ह्यांना शेतात काम करताना अचानक फेपरं भरलं (फिट्स आल्या). अचानक तडफडाया लागले, डोळे पांढरे केले आणि तोंडातून फेस पन आलता”. “बरं मग तुम्ही काय केलं?”

ती म्हणाली, “लई घाबरल्यावर सर कांदा फोडून वास दिला, पर फेफरं थांबलं नाय. मग तसच ह्यांना गावाच्या दवाखान्यात घेऊन गेलो, चांगले दोन-चार तास बेहोश होते हे. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावाला जाऊन CT स्कॅन केला, तवा कळाल की मेंदूमधे गाठ हाय म्हणून”.

मी त्याला विचारलं , “तू काय करतोस?” तो म्हणाला, “वायरमॅन आहे सर. फिट्स आल्यापासन उजवा हात कमजोर झालाय. हात वर उचलताना ताकत कमी लागते. मी हुईल ना ठीक सर? माझा हात नीट करा, सर माझं हातावरचं पोट हाय. न्हायतर कोण मला काम दील?”.

मला त्यावेळी न्युरोसर्जरीला जॉईन होऊन १५-२० दिवसच झाले होते. त्यामुळं स्कॅनमधलं मलाही फारसं कळत नव्हतं. मी त्यांना डॉ. वर्णन वेल्हो (डिपार्टमेंटचे प्रमुख) यांच्याकडे घेऊन गेलो व थोडक्यात केस प्रेझेंट केली. सरांनी स्कॅन हातात घेतला व म्हणाले, “Ya.. looks like intracranial epidermoid tumour. Get him admitted”.

खर तर गाठ चांगली ७-८ सेंटीमीटर मोठी होती, फक्त चांगली गोष्ट हीच होती की ती गाठ कॅन्सरची नव्हती. मी त्यांना ॲडमिट व्हायला सांगितलं आणि ऑपरेशन साठी निघून गेलो. ऑपरेशन संपायला रात्रीचे १० वाजले. दिवसभर ॲडमिट झालेल्या पेशंटना अजून बघितलच नव्हतं. म्हणून मी माझे सिनियर डॉ. ऋषिकेश यांच्या बरोबर पटापट वॉर्ड राउंड चालू केला.

वॉर्डात मला ते दोघं दिसले. नवरा बेडवर बसला होता तर बायकोने बेडच्या बाजूला सतरंजी टाकून बॅग ठेवली होती आणि छोटा संसार थाटला होता. इथे पेशंटच्या नातेवाइकांना राहण्यासाठी फारशी वेगळी सोय नसल्यामुळे सर्वच नातेवाईक वॉर्डात दोन बेडच्या मध्ये १-२ फूट जागा असायची तिथेच झोपायचे. मी सिस्टरना बोलावलं व सांगितलं, “ही मुलगी गरोदर आहे, हिची शेजारच्या धर्मशाळेत रहायची व्यवस्था करा” आणि तसा फॉर्म भरून दिला. इतक्यात ऋषी सरानी आवाज दिला, “प्रवीण, चल लवकर, रात्री ४ केसेस वेटिंगला आहेत, पटापट चालू करू!” आणि मी निघालो.

पुढचे २-३ दिवस धावपळीत गेले. ह्या दोघांशी फारसा संबंध आलाच नाही. ७० -८० पेशंटचा वॉर्ड आणि दिवसरात्र चालणार ऑपरेशन थिएटर. यामुळे पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायला कधी वेळच मिळायचा नाही. त्या दिवशी कशाची तरी सुट्टी होती म्हणून ओ. टी. (ऑपरेशन थिएटर) बंद होती, म्हणून मी ही खुश होतो. आज सगळ्या पेशंटशी मनमुराद गप्पा मारायच्या असं ठरवून मी, सकाळी-सकाळी वॉर्डात आलो. इतक्यात सिस्टर म्हणाल्या, “प्रविण, सर बर झालं तुम्ही वेळेवर आलात!”. आणि त्या मला स्टाफरूम मध्ये घेऊन गेल्या. त्यांच्या पर्समधला डबा उघडला आणि हे घ्या शेंगदाण्याचे लाडू म्हणून दोन लाडू माझ्या हातावर ठेवले. मी दोन्ही लाडू खाऊन परत तिसऱ्या लाडूसाठी डबा उघडणार तोच सिस्टर माघून हसत हसत म्हणाल्या ” हूं …सर, दोनच घ्या, तुमच्यासाठी नाही आणले ते.”

मी सिस्टरना म्हणालो, “आता माझ्यापेक्षा ज्युनिअर कोण आलय सिस्टर इथे? इतके लाड कोणाचे चाललेत”. तर सिस्टर म्हणाल्या, “सर, त्या सरिता साठी आणलेत शिवराम पेशंटची बायको..! बघा ना सर १६-१७ वर्षांचीच असेल पोरगी, त्यात गरोदर पण आहे, नवऱ्याला एक मिनिट नजरेआड करत नाही. तिला धर्मशाळेत रहा म्हणले, तर नको म्हणली! दिवसभर इथेच असते. सकाळी १० मिनिटात समोरच्या फिमेल वॉर्डमध्ये जाऊन फ्रेश होऊन येते. पण जाताना देखील आम्हाला नवऱ्यावर लक्ष ठेवायला सांगून जाते. तिच्या नवऱ्याला फिट्स आलेल्या बघितल्यापासून चांगलीच हदरलीय बिचारी. आम्ही विचारलं तर मुद्दाम खोट-खोट स्वतःच वय २१ आहे असं सांगते. पण खूप गोड आहे पोर! आठवा महिना चालू आहे तिला! स्वतःला सांभाळून कसं नवऱ्याला जपते बघा! ते तर जाऊद्या सर! आम्हाला पण कधकधी आमच्या कामात मदत करते. काल मावशींना पेशंटला जेवण वाढायला मदद करत होती. एवढं मोठं पोट घेऊन कशी लगबग चालू असते बघा तिची.”

मी म्हणालो, “अरे पण सिस्टर, त्या पेशंटच्या नातेवाईकांना कळायला नको का? एवढ्या लांब पेशंटबरोबर गरोदर बाईला कोण पाठवेल का ऑपरेशनसाठी?’ त्या म्हणाल्या, “तस नाही सर, आम्ही सगळी चौकशी केली, तिची सासू आंधळी आहे, काहीच दिसत नाही आणि सासऱ्यांना पॅरॅलिसिस झाल्यापासून ते देखील अंथरुणावरच आहेत. दुर्दैव बघा, तिची आई लहानपणीच वारली आणि वडिलांनी देखील दुसरं लग्न केलं, त्यामुळं तिच्याकडं कुणीच बघत नाही. एकदा डिलिव्हरी झाली की बाळाचं आणि नवऱ्याचं दोघांच एकत्र नाही करता येणार म्हणून लवकर ऑपरेशन करून घ्यावं म्हणून स्वतःच नवऱ्याला घेऊन एवढ्या लांब आलीय बघा!”

“कसा काय एवढा समजुतदारपणा येत असेल ह्या पोरींमध्ये? माझी मुलगी पण कॉलेजला आहे सर! हिच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठीच असेल, पण अजून सकाळी उठल्यावर स्वतःच्या अंथरुणाची घडी सुद्धा घालत नाही की साधा चहा सुद्धा बनवता येत नाही. तुम्हाला काय वाटत सर, होईल ना तिचा नवरा बरा ? लवकर नंबर लावा त्याचा. नाहीतर बिचारीची इथेच डिलिव्हरी व्ह्याची”.

इतक्यात ऋषि सर आले. आज सर्व पेशंटच्या नातेवाईकांच काऊन्सिलिंग करायचा प्लॅन होता. एका पाठोपाठ एक नातेवाईकांना बोलावून काऊन्सिलिंग चालू होतं. सरानी सरिताला बोलावलं, ऑपरेशन विषयी समजावलं आणि सांगितलं की, “ऑपरेशन नंतर पेशंटचा मृत्यू होऊ शकतो, लकवा मारू शकतो, मेमरी किंवा बोलण्याची ताकत जाऊ शकते.” सर जसजसे बोलत होते तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. चांगलीच पांढरी फटक पढली बिचारी. एक शब्दही फुटला नाही तिच्या तोंडातून, नुसतीच सरांकडे बघत राहिली.

आमचा राऊंड संपल्यावर वॉर्डच्या बाहेर ती माझी वाट पाहत उभी होती. मला बघताच मला हाक मारली, ‘भाऊ, मोठे डॉक्टर बोलले ते खर आहे का?’ तिची अवस्था बघण्यासारखी झाली होती. डोळे रडून-रडून लाल झाले होते, हातामध्ये कुठल्यातरी देवाची मूर्ती घट्ट आवळून धरली होती. नवऱ्याच्या मरणाचे भय तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मी तिची अवस्था बघून तिला धीर दिला व म्हणालो, “अगं काळजी करू नको, काही होणार नाही तुझ्या नवऱ्याला. आम्हाला सगळ्याच पेशंटना ऑपरेशन आधी हे सांगावंच लागतं. तुझ्या डिलिव्हरी पर्यंत चांगला करून पाठवू तुझ्या नवऱ्याला!!” हे ऐकून जो चेहरा खुलला तिचा! मला धन्यवाद देत ती आत निघून गेली.

आमचं बोलणं सरांनी लांबूनच ऐकलं असावं कदाचित. ते मला बोलवून म्हणाले ” प्रविण, आपण न्यूरोसर्जन आहोत! पेशंटच्या नातेवाईकांना वाईट वाटलं तरीही जे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते त्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला नातेवाईकांशी बोलायला फार वेळ मिळत नाही, त्यामुळे तू त्यांच्याशी जी काही ४-५ वाक्ये बोलतोस, तीच ते मनात कोरून ठेवतात. त्यामुळं बोलताना खूप जपून बोलावं लागतं आता जर चुकून तिच्या नवऱ्याला काही कॉम्पलिकेशन झालं तर तू काय करशील? ती तर तुला हेच म्हणले की, ‘तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्या डिलिव्हरी पर्यंत नीट करणार होता! आणि दुसरी गोष्ट पेशंटशी फार इमोशनली ॲटॅच होत जाऊ नकोस. त्याचा त्रासच होतो. तू आत्ताच जॉईन झाला आहेस कळेल तुला हळूहळू, असे म्हणून माझ्या पाठीवर हात ठेवून ते निघून गेले”.

पुढे मी वर्णन सरांना तिची अडचण सांगून ऑपरेशन लवकर करण्यासाठी विनंती केली आणि पेशंटचे ऑपरेशन ठरले. ऑपेरशन सुरु झाले. मला जॉइन होऊन महिनाभर होत आल्याने सरांनी मलाच ऑपेरशन असिस्ट करायला सांगितले. अशी अवघड न्यूरोसर्जिकल केस मी पहिल्यांदाच बघत होतो, एखाद्या सराईत व्हायोलीन वादकाचा हात जसा लयबध्द चालावा तसा सरांचा हात चालत होता. एवढा मोठा १५ फूटाचा माइक्रोस्कोप, एंडोस्कोप, ड्रिल्स हे सगळ मी पहिल्यांदाच बघत होतो. सरांनी हळूहळू गाठ काढायला सुरुवात केली. गाठीमध्ये अडकलेल्या केसासारख्या बारीक रक्तवाहिन्या सरांनी अलगद बाजूला केल्या. बघता-बघता पूर्ण गाठ निघाली. एवढी सुंदर सर्जरी मी कधीच बघितली नव्हती. अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. गाठ पूर्ण निघाल्यानंतर सरांनी माइक्रोस्कोपमधून डोकं बाहेर काढल आणि म्हणाले, “Done!! So Pravin, Did you like it?” मला तर काय उत्तर द्याव हेच कळत नव्हतं. मी सरांना म्हणालो, “Sir, Its absolutely mesmerizing!” यावर सर म्हणाले “हो, सर्जरी सुंदर झाली, आता पेशंटच काय होतय बघूया. आणि सर डीवॉश झाले. थोड्या वेळाने पेशंट पूर्ण शुद्धीवर आला. मी पूर्ण न्यूरोलॉजिकल असेसमेंट केली, त्याला कसलाही व्यंग (Neurological Deficit) आलेल नव्हतं.

मी खुश होऊन सरांना सर्जन रूममध्ये जाऊन सांगितलं की, “पेशंट एकदम व्यवस्थित आहे”. पण सरांनी काहीच आनंद प्रकट केला नाही, फक्त म्हणाले, “Lets see what happens to him now”. माझा थोडा हिरमोडच झाला.

मी बाहेर येऊन ऋषि सरांना म्हणालो, “सगळे न्यूरोसर्जन असे दुर्मुखलेलेच असतात का? एवढी चांगली ६ ते ७ तासांची सर्जरी झाली, पेशंट व्यवस्थित आहे म्हणून सरांना सांगायला गेलो. तर ते फक्त lets see!! एवढच म्हणाले. थोडा आनंद व्यक्त केला तर काय बिघडत? कायम टेंशनमध्येच राहन्याला काय अर्थ आहे सर?”

ऋषि सर मला म्हणाले, “अरे तस नाही ते Epirmoid ( गाठीचा प्रकार) चे पेशंट थोडे ट्रिकी असतात. गाठ जरी चांगली निघाली, तरीही त्या गाठीत काही केमिकल्स असतात, त्यामुळे पेशंटला केमिकल मेनिंजाइटिस (मेंदुला सूज येणे) होऊ शकतो. त्यासाठी आपण पेशंटला आत्तापासूनचं स्टेरॉइड चालू करूयात”.

“पण सर, मेनिंजाइटिस होऊ नये म्हणून आपण काही करू शकत नाही का?” मी विचारलं. ते म्हणाले, “फारसं काही नाही!”

आता ऑपरेशन होऊन २-३ दिवस झाले होते. शिवराम मजेत होता, चांगला खायचा, प्यायचा, वॉर्डमध्ये फिरायचा, वगैरे. त्याच्या उजव्या हाताची ताकत पण बऱ्यापैकी सुधारली होती. सरिता तर जाम खुश होती. तिचे अजूनही लाड चालूच होते. वॉर्डच्या सिस्टर्स तर तीला स्वतःच्या मुलीसारखंच जपत होत्या. सगळा आनंदी-आनंद होता.

पुढे ५-६ दिवसांनी शिवरामच्या डिस्चार्जची तयारी सुरु झाली. सरिता मला येऊन म्हणाली, “सर, तुम्ही माझ्यासाठी काय केलय कसं सांगू! माझा नवरा जर ठीक झाला नसता, तर सासू सासऱ्यानी मला घरीच घेतलं नसतं. दोघांनीबी मेंदूचं ऑपरेशन करुन घ्यायचं नाही असंच सांगितल होतं! मीच हट्ट करून यांना हिकड घेऊन आले. आता काय टेंशन न्हाई. उद्या डिस्चार्ज मिळणारं! ट्रेनची टिकट पण काढली बघा”.

दुसऱ्या दिवशी मी वॉर्डमध्ये जरा लवकरच आलो. वाटेत मला ऋषि सर भेटले व म्हणाले, “तुझ्या लाडक्या पेशंटला डिस्चार्ज दिलाय रे, बघून ये एकदा”. आणि मोठ्यांदा हसले. मी सरांना म्हणालो, “बघा सर, तिला मी डिलिव्हरीच्या आधी नवरा व्यवस्थित होईल म्हणालो होतो! किती घाबरवलं होतं तुम्ही बिचारीला.”

मी वॉर्डमध्ये जाऊन शिवरामला भेटलो, मला बघताच तो बेडवरून उठून उभा राहिला. बॅग बांधून तयार होता. दुपारी निघणार आहे पण थोडं डोकं दुखतय म्हणत होता, मला वाटलं पेनकिलर बंद केल्यामुळे दुखत असेल, म्हणून मी त्याला गोळी घेण्यासाठी सांगून निघून गेलो. मेल वॉर्डचा राउंड संपवून मी फिमेल वॉर्डचा राउंड चालू केला होता, तेवढ्यात वॉर्डचा फोन खणखणला, सिस्टर बोलत होत्या, “प्रविण सरांना लवकर पाठवा, शिवराम पेशंटला फिट्स आल्यात.” मला निरोप मिळाला आणि मी पळतच मेल वॉर्डमध्ये आलो. समोरचं दृश्य बघून मी मूळापासून हादरलो. शिवरामला झटके येत होते, तोंडातून फेस येत होता. सिस्टरनी त्याच्या हातापायाला दाबून धरलं होतं. मी ऑर्डर सोडल्या, सिस्टर्सना फिट्सचे औषध द्यायला लावलं, सलाईन चालू केली पण फिट्स कंट्रोल होत नव्हत्या, ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा कमी व्हायला लागल होतं. आता वेंटिलेटर वर घेण्याशिवय पर्याय नव्हता. मी त्याला पूर्ण बेशुद्ध केलं आणि कृत्रिम श्वासाची नळी बसवली.

तासाभरातच होत्याचं न्हवतं झालं होतं. घरी जाण्यासाठी बॅग बांधून तयार झालेला शिवराम आता व्हेंटीलेटर वर होता. मी बाहेर येऊन बघितलं, सरिता तिथंच भिंतीला टेकून खाली बसली होती. काय चाललय याचं भान तिला बहुदा राहिल नसावं. ती एकटक छताकडे बघत होती. एक नर्स तिच्या शेजारी बसून तिला पाणी प्यायला देत होत्या. शेवटी नियतीने आपला डाव साधला होता.

झालेला प्रकार मी ओ. टी. मध्ये फोन करुन सरांना सांगितला. सरांच्या संगण्यानुसार ‘पेशंटच्या पाठीतून पाणी काढून मी स्वतःच तपासायला घेऊन गेलो. रिपोर्ट तयार होईपर्यंत लॅबमध्येच बसून राहिलो. न्यूरोसर्जन स्वतः लॅबमध्ये बसलेले बघून टेक्निशियननी गांभीर्य ओळखलं आणि १५-२० मिनिटातच रिपोर्ट दिला. डाइग्नोसिस झालं होतं. शिवरामला मेनिंजाइटिस झालं होतं आणि एका नवीन खेळाची सुरुवात झाली होती. “तुझ्या नवऱ्याला तुझ्या डिलिव्हरी आधी बरं करतो, या शब्दांच ओझं किती मोठं असतं हे मला जाणवायला लागलं होतं”.

आता पुढे येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी जीवघेणा होता. आता शिवरामला व्हेंटिलेटर वर घेऊन १०-१२ दिवस होऊन गेले होते, मी रोज राउंड घ्यायचो, रोज त्याच्या नवीन तपासण्या व्हायच्या, व्हेंटिलेटर कमी-जास्त करायचो, फिजियोथेरपी चालू होती पण शिवराम काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. ना हातापायाची हालचाल ना डोळ्यांची, व्हेंटिलेटरवरून बाहेर देखील येत नव्हता. सरिता तर पूर्ण खंगून गेली होती, दिवसभर शिवरामच्या शेजारी नजर शून्यात लावून बसलेली असायची. तिच्या गरोदरपणाची तर तिला कसलीही जाणीव राहिली नव्हती. हळूहळू तिच्याकडचे पैसे संपत आले असावेत कदाचित, म्हणून तिने शेजारच्याच एक दोन पेशंटची केअरटेकर म्हणून काम करायला सुरुवात केली. ९ महिन्याच्या गरोदर बाईची ती तडफड बघवत नव्हती. गेल्या १०-१२ दिवसात मी तिच्याशी एक शब्दही बोललो नव्हतो. तिच्या नजरेला नजर देण्याचे धाडस माझ्यात नव्हते. मी एकदा तिची अवस्था बघून नर्सकरवी तिला पैसे देऊ केले, पण ती भलतीच खुद्दार…., “पैसे नको, नवरा परत करा!!” एवढचं बोलली.

तिची डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती, तो विचार करून आम्ही सर्वानी तिला बोलावलं आणि म्हणालो, “शिवारामला आम्ही सांभाळू, तू आता गावी परत जा. दुसरं कोणी नातेवाईक असेल तर बोलावून घे!, नाहीतर तुझी इथेच डिलिव्हरी होईल!”. त्यावर ती म्हणाली, “सर दुसरे कुणी नातेवाईक न्हाईत आणि नवऱ्याला न घेता मी सासरी जाऊ शकत नाही. मुलगी जिद्दी होती. नवरा वाचणार ह्याच्यावर तिचा ठाम विश्वास होता. शिवरामच्या बेडच्या शेजारी तिने एका प्लेटमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये देवाची मूर्ती ठेवली होती आणि दिवसभर त्या मूर्तीसमोर हात जोडून बसायची.

मी माझ्या परीनं ही लढाई चालू ठेवली होती, मला सरांनी सांगितलं होतं, आज ना उद्या मेनिंजाईटीस सेटल झालं की पेशंट शुध्दीवर येईल, पण तो पर्यंत पेशंटला इतर काही कॉम्प्लिकेशन होता कामा नये, तरच तो वाचेल!

वॉर्डच्या मामा-मावशीपासून ते सिस्टरपर्यंत सर्वानी मात्र जणू शिवरामला बरा करायचा चंगच बांधला होता. त्याला नळीमधून ज्युस व डाळीचं पाणी दिल जायचं, पूर्ण अंग डेटॉलच्या पाण्याने पुसून काढलं जायचं, मलममूत्र विसर्जन बेडमध्येच व्हायचं. त्याचा काहीही रिस्पॉन्स नसला तरीही, हे सगळे जाऊन त्याच्याशी गप्पा मारत उभे रहायचे. एकदम जीवंत माणसाशी मारतो तशा गप्पा हे सगळे मारायचे. त्याच्या आवडीची गाणी रेडिओवर ऐकवायचे. मला मात्र हे सर्व कधीकधी फार विचित्र वाटायचं. असं गप्पा वगैरे मारून आणि गाणी ऐकवून काय तो शुद्धीवर येणार आहे का? पण मी त्यांच्या भावना समजून घ्यायचो आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचो. गेले १५-२० दिवस हे सर्व असच चालू होतं.

त्या दिवशी मी रात्री OTमध्ये ऑपरेट करत होतो. रात्रीचे ३ वाजले असावेत कदाचित आणि मला वॉर्डमधून नर्सचा फोन आला. मामाने फोन माझ्या कानाला लावला. नर्स म्हणाल्या, “प्रविण सर, ऑपरेशन करताय का? अक्च्युअली सरिताला लेबर पेन सुरू झालेत (प्रसव वेदना) काय करू कळत नाही, मी तिला लेबर वॉर्डला शिफ्ट करू का?”

मी त्यांना सांगितलं, की तुम्ही स्वतः जा तिच्याबरोबर आणि लेबर वॉर्डमध्ये तीला ऍडमिट करून या. बाकी सगळं मी बघतो. ऑपरेशन संपवून डिवॉश होतो तोच लेबर वॉर्ड मधुन फोन आला. तिथले डॉक्टर माझे मित्रच होते, ते म्हणाले, “सर हिच्याबरोबर कोणीच नातेवाईक नाही, आणि वय पण कमी आहे, हाय रिस्क प्रेगनन्सी आहे. डिलिव्हरीमध्ये हिला किंवा बाळाला काही झालं तर जबाबदारी कोण घेणार?”

मी त्यांना म्हणालो, “ठीक आहे! नातेवाईक म्हणून माझा नाव टाका, मी येऊन बाकीचं बघतो पण पेशंटला व्यवस्थित मॅनेज करा” आणि फोन ठेवला. थोड्या वेळाने मी वॉर्डच्या सिस्टरना घेऊन सरिताला भेटायला गेलो, तशाही अवस्थेत तिने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता व म्हणाली, “सर, माझ्या नवऱ्याकड लक्ष द्या! मी ठीक हाय”. सिस्टर मला म्हणाल्या, “सर, तुम्ही जाऊन झोपा थोडा वेळ, हिची डिलिव्हरी व्हायला बराच वेळ लागेल!”

मी रूमवर परत येऊन २-३ तास छान झोप काढली. सकाळी फ्रेश होऊन वॉर्डमध्ये आलो, बघतो तर काय सगळीकडे आनंदी-आनंद. सिस्टर्स, मामा, मावशी सगळे खुश दिसत होते. मला बघताच सिनियर सिस्टरनी माझ्या हातावर पेढा ठेवला व म्हणल्या, “सर, मी आजी झाले. मला दोन मिनिटं समजेना, “सिस्टर तुमची मुलगी तर अजून कॉलेजला आहे ना? लग्न कधी झालं तीचं?” त्यावर सगळ्या नर्सेस हसत म्हणाल्या, “सर आमची दुसरी मुलगी सरिता!!” मी उडालोच, “काय डिलिव्हरी झाली तिची! वेळ लागणार म्हणत होते ना?’ त्यावर त्या म्हणाल्या, “सर, नॉर्मल डिलिव्हरी झाली, मुलगी झाली सरीताला. मी ड्युटीवर येता येता बघून सुद्धा आले.”

तो दिवस कसा गेला कळल सुद्धा नाही. मी सुद्धा का कोणास ठाऊक उगाचच खूष होतो दिवसभर!

दुसऱ्या दिवशी मी मॉर्निंग राऊंड घेत होतो. तेवढ्यात लेबर वॉर्डमधून फोन आला. समोरचे डॉक्टर बोलत होते. “प्रविण सर, ती सरिता फार त्रास देतीये. डिस्चार्ज द्या, म्हणून मागे लागलीय सकाळपासून!! लगेच कसा डिस्चार्ज देणार, कालच तर डिलिव्हरी झाली तिची!” मी ठीक आहे बघतो म्हणून फोन ठेवला, सिस्टरना जाऊन सरिताला भेटायला सांगितलं आणि ऑपरेशनसाठी निघून गेलो. आजचं ऑपरेशन बराच वेळ चाललं, संपायला ७-८ वाजले. OT संपवून राऊंड घेण्यासाठी वॉर्डमध्ये आलो बघतो तर सरिता आधीच तिच्या बाळाला घेऊन हजर होती. मला बघताच धडपडत-धडपडत बेडला धरून उभी राहिली, आणि म्हणाली, “मी ठीक आहे सर!!”. तीचं असं लगेचच डिस्चार्ज घेऊन येणं मला अजिबात पटलेलं नव्हतं पण तिच्या बाळाकडे बघून सगळा राग निवळला. ती म्हणाली, “सर, कधी एकदा ह्यांच्यासमोर पोरीला धरते असं झालं होतं बघा.”

पुढच्या २-४ दिवसात सरिता आणि शिवरामच्या बरोबर तिची मुलगीसुद्धा आमच्या वॉर्डचा एक भाग झाली होती. नर्सेस तर ती स्वतःच्या मुलगी असल्यासारख्याच वागत होत्या. त्या बाळासाठी दूपटी, कानटोपी, पावडरी, नको-नको ते आणून ठेवल होतं. सरीतला चांगले घरचे डिंकाचे लाडू मिळत होते. २-४ दिवस असेच गेले असतील. शक्यतो दिवसभर आम्ही सगळे डॉक्टर OT मध्ये असल्यानं, वॉर्डमध्ये डॉक्टर नसायचे. एकदा मी असाच दुपारी सहज वॉर्डमध्ये आलो, पाहतो तर काय सरीताने बाळाला चक्क शिवराम शेजारी झोपवलेलं होतं. समोरचं दृश्य बघून माझा राग अनावर झाला. एक तर पेशंट ICU मध्ये गेला की नातेवाईकांना त्यांना भेटता येत नाही, म्हणून सरिताची अडचण समजून घेऊन आम्ही शिवरामला ICU मध्ये शिफ्ट न करता वॉर्डच्या शेजारी SEMI ICU मध्ये व्हेंटिलेटर वर ठेवलं होतं, जेणेकरून सरिताला बरोबर रहाता येईल पण आता त्या बाळाला शिवरामच्या शेजारी झोपवलेलं बघून, मला राग अनावर झाला. मी सिस्टरना आणि सरिताला दोघांना रागावलो.

शिवरामला आधीच ढीगभर इन्फेक्शन्स झाली होती. श्वासाला, खायला, लघवीला सगळीकढे नळ्या बसवल्या होत्या. अशा अवस्थेत जर त्या बाळाला इन्फेक्शन् झाले तर काय करणार? शिवराम तर जवळपास गेल्यातच जमा होता वर आता बाळाच्या जीवालाही धोका झाला तर काय करायचं. माझा तो रुद्रावतार बघून सगळेच हादरले होते. थोड्या वेळाने माझा राग शांत झाल्यावर, मी तिला जरा समजवण्याच्या स्वरात सांगितले, “बघ, आधीच तुझ्या नवऱ्याला एवढी सगळी इन्फेकशन झालीयेत, तेच जर तुझ्या बाळाला पण झालं तर काय करणार? कुणा-कुणाकढे बघणार? अजिबात बाळाला शिवरामच्या जवळ न्यायचं नाही”.

ती तशीच बराच वेळ माझ्या समोर उभी होती. मग मात्र धाडस करून म्हणाली, “सर, एक सांगू! सर, ही शेतकऱ्याची पोर हाय, हिला काय बी होणार नाय बघा!! शेतकऱ्याच्या पोरी जन्मापासूनच सोशिक असत्यात. मी आज घरी जरी असते, तरीबी काय बदललं नसतं! आमच्या घरातच गुरांचा गोठा हाय, शेणा-मुतातच आमची पोरं मोठी होतायत बघा!! काय भी होत नाय त्येनला”. परत एक लांब श्वास घेऊन आणि हुंदका दाबून ती परत म्हणाली, “तसबी लई मोठी लढाई लढायची हाय माझ्या लेकीला अजून!!”

“म्हणजे? कसली लढाई? मी समजलो नाही”. ती बोलली, “सर, माझ्या नवऱ्याचं काय होणार हे तुम्हाला बी म्हाईत हाय, पण तरीबी आपण तग धरून रहायलोय. माझ्याकडं बघून तुमचा जीव तूटतो म्हणून, माझ्या नवऱ्यासाठी तुम्ही दिवसरात्र धडपडताय हे दिसतंय मला. पण माझा नवरा जर न्हाई राहिला तर!!! तर मला बी आणि माझ्या बाळाला बी, कोणीच थारा देणार न्हाई! जलमल्या जलमल्या स्वतःच्या बापाला खाल्लं म्हणून आयुष्याभरासाठी अपशकुनी म्हणून ठपका लागंल, माझ्या पोरीच्या कपाळी! कोणी तिच्याशी चार शब्द गोड बोलणार न्हाई की जवळ घेणार न्हाई. कदाचित माझ बी दुसरं लग्न लावून देतील. दुसरा नवरा माझ्या पोरीकड बघल नाय बघल, काय सांगावं! आयुष्यभरासाठीचा वनवास लागंल बघा माझ्या पोरीच्या मागं”.

“आणि सर, उद्या जर माझ्या पोरींन मला मोठं झाल्यावर विचारलं, की “आई कधी मला माझ्या बापानं डोळं उघडून बघितलं होत का? माझ्या डोक्यावरनं कधी हात फिरवला होता का? मला कधी जवळ घेतलं होतं का? तर मी तिला काय उत्तर देणार, की मीच तिला तिच्या बापाच्या जवळ जाऊन दिल नाही म्हणून !! ह्यो समदा विचार केला, म्हणून लगेचच डिस्चार्ज घेऊन बाळाला यांच्याकडे घेऊन यायची गडबड केली बघा.”

तिच्या बोलण्यानं डोकं सुन्न झालं होत १६-१७ वर्षाची पोरंच ती, पण तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघून मी आवाक झालो. किती विचार केला होता तिनं, आजच्या काळातली छोट्या छोट्या कारणावरून ब्रेकअप करणारी आणि घटस्फोट घ्यायला जाणारी जोडपी कुठं आणि ही मुलगी कुठं? काही ताळमेळच नाही. खरच एक डॉक्टर म्हणून किती सुपरफीशीअली (वरवरचं) बघत असतो पेशंटकडे आपण. त्यांच्या आयुष्यात चाललेली ही लढाई आपल्या समोर कधीच येत नाही.

मी सिस्टरना सांगितलं, “ठीक आहे, बाळाला शिवराम शेजारी थोडा वेळ झोपू दे. पण सरांना कळू देऊन नका, नाहीतर आपलं काही खर नाही!”

दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच वॉर्डमध्ये आलो. सरांचा राऊंड चालू होण्याआधी मला बरच पेपरवर्क करायचं होतं, म्हणवून मी ४०-५० पेशंटच्या फाईल्सचा ढीग समोर घेऊन बसलो होतो.

तितक्यात एक ज्युनिअर नर्स माझ्याकढे पळत आल्या आणि म्हणाल्या, “सर…, शिवराम रडतोय. सर मला वाटतय तो रिस्पॉन्स देतोय. त्याच्या डोळ्यातून पाणी येतंय”.

मी मान वर न करताच तिला म्हणालो, “अग नाही, त्याला कंजंक्टिवाईटीस झालाय. आयड्रॉप्स टाकताय ना तुम्ही?” त्यावर त्या म्हणाल्या, “सर एकदा येऊन बघा प्लीज” आता त्या हट्टालाच पेटल्या म्हणून मी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि शिवरामला बघायला गेलो.

पाहतो तर त्याच्या दोन्ही डोळ्यातून खळखळ पाणी वाहत होतं आणि त्याच्या डोळ्यात हालचाल दिसू लागली होती. मी भलताच खुश झालो, त्याच्या डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप चालू झाली होती. वॉर्डमध्ये सगळेच खुश झाले होते. पुढच्या १-२ दिवसात त्याच्या हातापायाची हालचाल देखिल सुरू झाली. तो हळू हळू शुद्धीवर येत होता.

वर्णन सर देखील त्याचा रिस्पॉन्स पाहून खूष झाले. ते बघून सरांनी माझं कौतुक केलं. “See Pravin I told you, if you take a good care of him till the meningitis settles, we will get him back!” सरांचा शब्द मी खाली पडू दिला नव्हता!

पुढच्या ४-५ दिवसात त्याचा श्वास देखिल चांगला चालू लागला आणि आज तब्बल २५ दिवसांनी तो व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. असं असलं तरी तो अजूनही बेडरीडनच होता. हातापायांची हालचाल व्हायची पण ती अजून म्हणावी तशी नव्हती. पण आता आम्ही त्याच्याशी काय बोलतो हे त्याला कळायचे!! डोळ्यानी हातवारे करून तो रिस्पॉन्स द्याचा.

आज रविवार होता. सुट्टीचा दिवस असल्याने मी जरा निवांतपणे वॉर्ड वर्क करत होतो. इतक्यात सिस्टरनी गरमागरम चहा माझ्यासमोर ठेवला नी म्हणाल्या, “काय सर, आणलं की नाही लेकींनं बापाला परत!” मी म्हणालो, “म्हणजे?”

“काही नाही सर, शिवरामचा जीव अडकला होता लेकीमध्ये, म्हणूनच तो शुद्धीवर आला बघा.” मी हसत सिस्टरना म्हणालो, “सिस्टर उगाच फिल्मी डायलॉग मारू नका, तो एवढे दिवस ‘लॉकड्-इन्’ फेजमध्ये होता आणि जसं त्याचं मेनिंजाईटीस बरं झालं तसा तो शुद्धीवर आला. न्युरोसर्जरीच्या पुस्तकांत दिलंय सगळं, एकदा वाचून बघा.”

“अच्छा!! मग एवढे दिवस का नाही आला तो शुद्धीवर?” सिस्टर एकदम ठसक्यात म्हणल्या. “एवढया ढीगभर टेस्ट, औषधे, अँटीबायोटिक्स असून सुद्धा काही फरक पडत होता का? पण पोरगी आल्यावर कसा चार दिवसात शुद्धीवर आला की नाही? सर, वीस वर्ष झाली मला या वार्डमध्ये. तुमच्या पुस्तकांच्या पलीकडची न्युरोसर्जरी बघितली आहे मी या आयुष्यात”.

सिस्टरांच बोलणं मी फारस मनावर घेतल नाही. पण दिवसभर डोक्यामध्ये विचार घोळत राहिला, “खरच, काय असते ही ‘जगण्याची ओढ’ कोमामधल्या पेशंटला ती ओढ जाणवत असेल का? त्या चिमूकल्या बाळाच्या स्पर्शाने, शिवरामला जगण्याची ओढ मिळाली असेल का? त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून, त्याचा देखील जीव कासावीस होत असेल का? त्या पैंजणाच्या आवाजाने, त्या पावडर, काजळच्या वासाने शिवरामला नवीन चेतना मिळाली असेल का? खरच त्या बाळामुळेच तो परत आलाय? आणि ते बाळ नसतं, तर तो नसता बरा झाला?”

“नाही-नाही काय वेड्यासारखे विचार करतोय मी?! it’s a natural course of the disease. मेनिंजाईटीस सेटल झाल्यावर आपोआपच मेंदूची सूज कमी झाली आणि तो शुद्धीवर आलाय” असं मी स्वतःलाच बजावलं. आपण डॉक्टर असून सुद्धा असा विचार करायला लागलो तर काय होणार? मी पटकन तो विचार मनातून झटकून टाकला.

पुढे १०-१२ दिवसात शिवराममध्ये बराच फरक पडला. बेडमध्ये पडल्या-पडल्या तो बऱ्यापैकी हालचाल करायचा. आता त्याची परत एकदा डिस्चार्ज घेण्याची वेळ आली. डिस्चार्जच्या दिवशी सरीताने माझ्या पायावर डोकं ठेवलं. खूप अवघडल्यासारखं वाटलं मला. तिनं माझ्या मागं लागून लागून माझा एक फोटो मागून घेतला. माझ्या पाकिटामध्ये एक पासपोर्ट साईज फोटो होता, तोच मी तिला देऊन टाकला. फोटो बघून ती जाम खुश झाली व, “हा फोटो मी फ्रेम करून घेणार” म्हणाली. आज तीनं पाण्यात बसवलेल्या देवाला पण बाहेर काढलं गेलं. शिवराम अजूनही बेडवरच होता, खाण्यासाठी व युरीनसाठी नळी बसवलेली होतीच पण सरिता ही या एका महिन्यात चांगलीच तायार झाली होती. औषधांची नावं तर तिला तोंडपाठ होती. घरीच नवऱ्याची काळजी घेते आणि काही लागलं तर फोन करते म्हणून तीने डिस्चार्ज घेतला.

पुढे दीड-दोन महिने असेच निघून गेले. आता नवीन पेशंट नवीन सर्जरीज् यामध्ये मी पूर्णपणे बुडून गेलो. सरीताला आता मी जवळजवळ विसरून गेलो होतो. एकदा असाच वॉर्डमध्ये बसल्यावर सिस्टरनी विषय काढला, “सर सरिताचा काय फोन? दोन महिने होत आले काहीच खबर नाही तिची. फॉलोअपला पण आली नाही ना!”

“अरे हो, काहीच कॉन्टॅक्ट नाही. तिचे पुढे काय झाले कोणास ठाऊक?” मी म्हणालो. सिस्टर म्हणल्या ,”मी खूप वेळा फोन करून बघितला, पण तिचा फोन नाही लागत. काय झालं असेल सर! नवऱ्याला अशा अवस्थेत घेऊन गेली म्हणून तिला आणि तिच्या पोरीला घराबाहेर तर नसेल ना काढलं! की शिवरामला काही बरंवाईट झाल असेल?” या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडं नव्हती. आता मात्र मला खूपच बेचैन व्हायला झालं. मनात शंका येऊ लागली, की ‘शिवरामचं नक्कीचं काहितरी बरवाईट झाले असणार, नाहीतर निदान फॉलोअपला तरी आली असती. दोन दिवस कशातच लक्ष लागल नव्हतं. तरी ऋषि सर म्हणाले होते, “कुठल्याही पेशंटमध्ये इमोशनली ईनवॉल्व्ह होऊ नको म्हणून! त्रास होतो”.

दोन दिवसांनी असाच OPD मध्ये पेशंट बघत बसलो होतो. एवढयात एका अननोन नंबर वरून फोन आला. “सर, सरिता बोलते, ओळखलं का?”

“अरे सरिता कुठे होतीस एवढे दिवस, फोन नाही केला” म्हणून मी तिला चांगलच सुनावलं. पण ती म्हणाली, ” सर त्या वेळी, ॲम्ब्यूलन्सने मी ह्यांना घरी घेऊन आले, पण येताना एवढं ६०० कि.मी. अंतर कापायला जड झालं. तीन-चार वेळा थांबायला लागलं. त्या गडबडीत माझा मोबाईल हरवला. त्यातच तुमचा नंबरबी गेला, मग फोन कसा करनार? मग मागल्या आठवाड्याला आमच्या शेजारच्या गावातला एकजन तुमच्या हॉस्पिटलला आलता, त्याच्याकडनं तुमचा नंबर मागवला, अन् आज फोन लावला. पुढल्या आठवड्यात येणार आहे फॉलोअपला ह्यांना घेऊन!!”

“म्हणजे शिवराम व्यवस्थित आहे?” चुकून भलतंच तोंडातून निघून गेलं. तिकडून सरिता एकदम उत्साहात म्हणाली, “आन, म्हणजे काय? त्यांना काय झालयं! कसे बघा पोरीबरोबर खेळत बसलेत. घ्या, बोला त्यांच्याशी”.

शिवराम बोलत होता, “प्रविण सर….” एवढचं बोलला, आणि त्याचा कंठ दाटून आला. पुढं बोलता येईना फक्त फोनवर त्याचा मूसमुसुन रडण्याचा आवाज येत होता, बराच वेळ!!

मग सरितानं फोन घेतला. मी तिला विचारल, “नाव काय ठेवल गं मुलीचं?” तीनं सांगितलं, “सावित्री!!”

‘सावित्री!’

“किती योग्य नाव ठेवलंस. एक ती सावित्री होती जिनं आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणलं! आणि ही आजच्या जगातली मी बघितलेली सावित्री, जिनं आपल्या बापाला खेचून आणलं!!!”

लॉकडाऊन चालू असताना, कुठल्यातरी एका वेब सीरिजमध्ये (पाताळ लोक) एका कुत्रीचं नाव त्यांनी सावित्री असं ठेवलं होतं. ते बघून त्याच वेळी खटकलं होतं मनाला. नवीन पिढीला ‘सावित्री’ ची चुकीची ओळख व्हायला नको, म्हणून मी बघितलेल्या या सावित्रीची गोष्ट आज सांगाविशी वाटली!!

Making of a Neurosurgeon: भाग ७ – शेतकऱ्याची पोर – सावित्री – लेख सर्वाधिकार: डॉ. प्रविण सुरवशे, NEUROSURGEON कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे. 7738120060

Cover Image Artist: Ratan Dutta – Source: https://www.teahub.io/viewwp/iTxxJRo_easy-village-girl-painting/


Dr. Pravin Survashe
डॉ. प्रविण सुरवशे

कन्सल्टंट न्युरोसर्जन, पुणे
pravinsurvashe97@gmail.com

डॉ. प्रविण सुरवशे यांनी लिहिलेले अन्य लेख:

भाग १ : काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

भाग २ : एक दिवसाची सुट्टी !

भाग ३ : ससून मधील अननोन!

भाग ४: ती २७ मिनिटे…

भाग ५ – सेकंड चान्स!

भाग ६: सायलेंट हिरोज्!


डॉ. प्रविण सुरवशे यांच्या ब्लॉगला भेट द्या


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Cover Image: Cover Image downloaded from: https:// more...

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: