एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants
एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants
चित्रपटात गाणी बनवताना किंवा बसवताना एखादा विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री नजरेसमोर ठेवून गायक अथवा गायिका यांना गाणे गाण्यासाठी बोलावले जात असे. परंतु मुख्य गायक/गायिका वेळेअभावी अथवा अन्य काही कारणाने उपलब्ध नसतील तर दुसरे अन्य गायक/गायिका किंवा दुय्यम दर्जाचे गायक/गायिका किंवा नवोदित गायक/गायिका यांच्याकडून गाणे गाऊन घेतले जायचे. आणि त्या गाण्यावर कलाकार ओठांच्या (Lip Syncing) आणि चेहऱ्याच्या हालचाली आणि अभिनय करून गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करायचे. त्यानंतर मुख्य गायक/गायिका यांच्या आवाजात गाणे नव्याने ध्वनिमुद्रीत केले जायचे, आणि ते आपल्याला पडद्यावर अथवा त्याकाळच्या तबकडीवर (Vinyl Records) वाजायचे. याला डमीट्रॅक सुद्धा म्हटले जाते आणि हि तशी सर्वमान्य पद्धत होती.
कधीकधी एका नामवंत गायकाकडून गाऊन घेतलेले गाणे जरी चांगले असले तरी, निर्माता अथवा अभिनेता/अभिनेत्री यांच्या दडपणामुळे (आपल्याला हा आवाज सूट होत नाही ह्या भ्रमामुळे) ध्वनीमुद्रित झालेले गाणे बासनात बांधून ठेवले जायचे, आणि त्या अभिनेता/अभिनेत्री यांच्या आवडीच्या गायक/गायिका यांच्याकडून गाणे नव्याने ध्वनिमुद्रित करून चित्रपटात पडद्यावर दाखविले/ऐकविले जायचे.
या आणि अन्य कारणांमुळे हिंदी चित्रपटाच्या गाण्यांच्या सुवर्णकाळामध्ये आपणास एकच गाणे दोन गायकांच्या आवाजात ऐकायला मिळते, (खरे तर सध्या मिळतच नाही, केवळ आकाशवाणी अथवा विविधभारती नियमित ऐकणाऱ्या कानसेनानांच यातील काही गाणी माहिती आहेत). हि गाणी पडद्यावर, ओरीजीनल साऊंडट्रॅक अथवा तबकडयांवर (Vinyl रेकॉर्डस्) ऐकायला मिळतच नाहीत. आपल्या सारखे रसिक, अभ्यासक आणि कानसेनांकरीता हा मौल्यवान ठेवा काही अनामिक संग्राहक रसिकांकडून आपल्याला युट्यूब आणि अन्य मार्गाने उपलब्ध झालेला आहे. त्या अनामिक संग्राहक रसिकांचे खरेतर आभार मानायला हवे, मी फक्त हा ठेवा आपणापुढे उघड करीत आहे.
व्यक्तिशः आपल्याला कोणी एक गायक/गायिका आवडत असतात, त्याच गायकांची गाणी दुसऱ्या आवाजात ऐकायला मिळणे हा खरेतर कपिलषष्ठीचा योग म्हणावे लागेल. एकच गाणे दोन आवाजात ऐकण्याचा आनंद काही वेगळाच.
चला तर आता ही दुर्मिळ गाणी ऐकुयात.
श्रोत्यांना आस्वाद घेता यावा आणि अभ्यासूंना सोईचे पडावे म्हणून गाण्यांच्या दोन्ही आवृत्यांचे ध्वनिमुद्रण एकत्र दिले आहे.
सुरुवात करुया, १९५६ सालच्या ‘चोरी चोरी‘ ह्या चित्रपटाच्या दोन गाण्यांपासून.
ह्या चित्रपटातील सर्व गाणी श्रवणीय आणि लोकप्रिय ठरली. या गाण्यांसाठी शंकर-जयकिशन यांना १९५६ सालातील सर्वश्रेष्ठ चित्रपट संगीतकाराचा फिल्मफेयर पुरस्कार प्राप्त झाला होता. ह्या चित्रपटातील लतादीदींनी गायलेलं ‘पंछी बनू उडके फिरू मस्त गगनमें’ आणि लतादीदींनी मन्ना डे यांच्याबरोबर गायलेलं द्वंद्वगीत ‘ये रात भिगी भिगी, ये मस्त फिजाये” हे अतिशय सुमधुर हे कोण विसरू शकेल? ह्या दोन्ही गाण्यांचे गारुड आज ६५ वर्षांनंतरही रसिकांना डोलवत आहे.
परंतु सुरुवातीला हि दोन्ही गाणी गीता दत्त आणि अगदीच अनोळखी गायक ‘भूषण’ ह्यांच्या आवाजात अगोदरच ध्वनीमुद्रित झालेली होती. गीता दत्त आणि भूषण यांच्या आवाजातील हि दोन्ही गाणी आपल्याला माहीत असलेल्या किंवा आपण ऐकलेल्या गाण्यांपेक्षा एक वेगळाच अनुभव देतात. (हि गाणी यांच्या आवाजात असताना नंतर पडद्यावर किंवा रेकॉर्ड्सवर लतादीदी आणि मन्नाडे यांच्या आवाजात घेण्यामागचे कारण आता अज्ञात आहे). मी प्रथमच नाव ऐकलेला ह्या भूषण नावाच्या गायकाविषयी काहीच अधिक माहिती मिळाली नाही, पण त्या गायकाने मन्नाडेपेक्षा एकही सूर वेगळा लावलेला नाहीय. तोच तो मूड भूषणने व्यक्त केला आहे. अगदी रेकॉर्डवर जरी भूषणचा आवाज ठेवला असता तरी गाण्याच्या मूडमध्ये काहीच फरक पडला नसता हे गाणे ऐकताना जाणवते. (यावेळेस खरेतर भूषण हा नवोदित गायक असला तरी गीता दत्त मात्र प्रस्थापित गायिका होती).
चला ऐकूयात ती दोन्ही गाणी. ह्या दोन्ही गाण्यांना आजच्या भाषेत कव्हर व्हर्जन म्हणायचे कि त्यानंतरच्या गाण्यांना? ते तुमचे तुम्हीच ठरवा. तशी ही दोन्ही गाणी थोडीसी अर्धीकच्ची आणि परिपूर्ण वाटत नाहीत (म्हणजेच Raw किंवा Unfinished वाटतात). गीताच्या ‘पंछी बनू’ मधील तालवाद्यही वेगळे आहे, शिवाय ‘हिल्लोरी, हिल्लोरी’ हा कोरस देखील ह्या गाण्यात नाहीय.
गाणे: पंछी बनू उड़के फिरू मस्त गगन में, चित्रपट: चोरी चोरी (१९५६), गीतकार: हसरत जयपुरी, संगीतकार: शंकर- जयकिशन
पंछी बनू उड़के फिरू मस्त गगन में
पंछी बनू उड़के फिरू मस्त गगन में
गाणे: ये रात भीगी भीगी, चित्रपट: चोरी चोरी (१९५६), गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर- जयकिशन
ये रात भीगी भीगी
ये रात भीगी भीगी
१९६८च्या ‘आदमी‘ ह्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये देखील असाच काहीसा गोधळ झालेला दिसतोय. ह्या चित्रपटातील ‘ना आदमी का कोई भरोसा’ हे गाणे सुरुवातील महेंद्र कपूर ह्यांच्या आवाजात रेकॉर्ड झालेले आढळून येते. गाण्याची चाल आणि गती ह्यात बराच फरक आढळतो, तरीही माझ्या आवडीचे गायक महेंद्र कपूर ह्यांच्या आवाजात हे गाणे ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. परंतू हे गाणे चित्रीत झाले आहे दिलीपकुमार यांच्यावर; मग येथे महेंद्र कपूर यांनी हे गाणे गाण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीय. त्यामुळे गाण्याची चाल आणि वाद्यवृंद बदलून हे गाणे मोहम्मद रफी यांच्या आवाजात पडद्यावर आणि तबकडीवर ऐकायला मिळते.
ह्याच चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचीही तीच गोष्ट. मात्र ह्यात महेंद्र कपूर ह्यांच्यावर पहिल्या गाण्यात झालेल्या अन्यायाचे परिमार्जन केले गेले, पण तलत मेहमूद यांच्यावर अन्याय झाला. ह्या चित्रपटातील ‘कैसी हसीन आज बहारोंकी रात है’ हे गाणे प्रथम रफी आणि तलत मेहमूद यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते. पण गाण्याच्या अंतिम ध्वनीमुद्रणाच्या वेळी तलत यांची प्रकृती बिघडल्याने खूप वेळ वाया जाऊ लागला, तेव्हा दुसऱ्या गायकाकडून ही गाणे गाऊन पूर्ण करावयाचे असे ठरले, त्यासाठी महेंद्र कपूर यांना बोलावणे पाठविले, तेव्हा महेंद्र कपूर यांनी प्रथम तलत मेहमूद यांना भेटून माफी मागून त्यांची परवानगी मिळाल्यावरच ह्या गाण्यासाठी आपला आवाज वापरला. त्यामुळे पडद्यावर मनोजकुमार यांच्या तोंडी महेंद्र कपूर यांचा आवाज ऐकायला मिळतो, पण चित्रपटाच्या सर्वच तबकड्यांवर (Vinyl Records) मात्र तलत मेहमूद यांच्या आवाजातील गाणे ऐकायला मिळते. चला आता ऐकूयात ही दोन गाणी.
गाणे: ना आदमी का कोई भरोसा, चित्रपट: आदमी (१९६८), गीतकार: शकील बदायुनी, संगीतकार: नौशाद अली
ना आदमी का कोई भरोसा
ना आदमी का कोई भरोसा
गाणे: ‘कैसी हसीन आज बहारोंकी रात है’, चित्रपट: आदमी (१९६८), गीतकार: शकील बदायुनी, संगीतकार: नौशाद अली
कैसी हसीन आज बहारोंकी रात है
कैसी हसीन आज बहारोंकी रात है
१९५७च्या ‘प्यासा‘ चित्रपटातील समस्त जगाला अनुत्तरित करणारे ‘जिन्हें नाज है हिंदपर वो कहा है’ हे गाणे ऐकताना गीतकार साहिर यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता आल्याने लज्जेने मान खाली घालावी लागते. असे हे अतिशय आशयपूर्ण, भावपूर्ण आणि सुंदर गाणे प्रथम मन्ना डे यांच्या आवाजात ध्वनीमुद्रीत केलेले दिसते. नतंर ते चित्रपटाच्या मूळ साऊंडट्रॅक आणि विडिओट्रॅकवर मात्र रफी यांनी गायलेले गाणी सापडते. मो. रफी यांनी अर्थातच त्या गाण्याला खूपच वर नेऊन ठेवले आहे. एक मैलाचा दगड मो. रफी यांनी रचला आहे. मन्ना डे यांच्या आवाजातील गाणे थोडे अर्धेकच्चे राहिलेले दिसते. असे का घडले हे आता सांगणारे कोणीही नाही. चला तर आता आपण ह्या दोन्ही महान गायकांच्या आवाजात हे गाणे ऐकूयात.
गाणे: ‘जिन्हें नाज है हिंदपर वो कहा है’, चित्रपट: प्यासा (१९५७), गीतकार: साहिर लुधियानवी, संगीतकार: सचिनदेव बर्मन
जिन्हें नाज है हिंदपर वो कहा है
जिन्हें नाज है हिंदपर वो कहा है
१९५७च्या ‘एक झलक’ नावाच्या चित्रपटातील ‘गोरी चोरी चोरी जाना बुरी बात है ‘ हे गाणे संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वतः गायले आहे. आणि नंतर हेच गाणे मुकेश ह्यांच्या आवाजात देखील ऐकायला मिळाले. हे गाणे फारसे अपिरचित आणि अप्रसिद्ध आहे. ह्या गाण्याविषयी यापेक्षा जास्त माहिती आता आमच्याकडे नाहीय, तेव्हा आता हे गाणे ऐकूयात.
गाणे: ‘गोरी चोरी चोरी जाना बुरी बात है ‘, चित्रपट: एक झलक (१९५७), गीतकार: एस. एच. बिहारी, संगीतकार: हेमंत कुमार
गोरी चोरी चोरी जाना बुरी बात है
गोरी चोरी चोरी जाना बुरी बात है
१९५०-६० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यावेळच्या प्रसिद्ध म्युझिक कंपनी ‘HMV’ ने परदेशातील ‘Version Songs’ हि संकल्पना हिंदी चित्रपटसृष्टीत रुजविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका नामवंत गायकाचे गाजलेले गाणे दुसऱ्या मोठया गायकाकडून गाऊन घ्यायचे आणि त्याच्या रेकॉर्डस् बनवून प्रसिद्ध करायच्या. ह्या प्रकारातले पहिले गाणे १९५७च्या ‘भाभी’ या चित्रपटातील मो. रफी यांचे गाजलेले ‘चल उड जा रे पंछी’ गाणे तलत मेहमूद यांच्याकडून नव्याने गाऊन घेतले आणि ७८ RPM च्या रेकॉर्डवर एका बाजूला मो. रफी यांचे गाणे आणि दुसऱ्या बाजूला तलत यांचे गाणे अशी ‘Version Recording FT21027 Twin/Black Label 78 RPM’ ह्या नावाने रेकॉर्ड काढली. परंतु ही संकल्पना हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत गायक/गायिकांना पटली नाही. सर्व गायकांनी एकत्र भेटून चर्चा केली आणि आपण दुसऱ्या गायकाचे गाणे आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे ‘HMV’ ची ‘Version Songs’ हि संकल्पना ताबडतोब बंद पडली. परंतु त्या अगोदरच तलत यांच्या आवाजात पहिले आणि शेवटचे ‘Version Songs’ रेकॉर्ड झाले होते. चला तर आता ऐकूयात तलत यांच्या आवाजात ‘चल उड जा रे पंछी’ हे गाणे.
गाणे: ‘चल उड जा रे पंछी’, चित्रपट: भाभी (१९५७), गीतकार: राजींदर कृष्ण, संगीतकार: चित्रगुप्त
चल उड जा रे पंछी
चल उड जा रे पंछी
पुढच्या गाण्याच्या कथेमध्ये थोडे वळण आहे. ६०च्या दशकात कोणा एका चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी त्यांचे आवडते गीतकार इंदीवर आणि आवडता गायक मुकेश यांच्याकडून एका गाणे बसवून घेतले होते. गाणे रेकॉर्ड होऊन पूर्ण तयार होते. कुठला चित्रपट होता हे नाही माहीत, त्या चित्रपटाचे पुढे काहीच झाले नाही, त्यामुळे ध्वनिमुद्रित करून ठेवलेले हे गाणे मात्र तसेच न वापरता शिल्लक राहिले होते. पुढे १९९४ साली संगीतकार कल्याणजी यांचा मुलगा विजू शहा याने ते गाणे ‘मोहरा’ ह्या चित्रपटात वापरले. गीतकार इंदीवर यांनी गाण्याच्या शब्दांत थोडा बदल करून गाणे नव्याने लिहिले. चला तर ऐकूयात हि दोन्ही गाणी.
गाणे: ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’, चित्रपट: मोहरा (१९९४), गीतकार: इंदीवर, संगीतकार: विजू शहा, मूळ संगीतकार: कल्याणजी-आनंदजी
ना कजरे की धार
यांच्या आवाजात – ना कजरे की धार
१९५४च्या ‘आरपार‘ ह्या चित्रपटाने संगीतकार ओ. पी. नय्यर ह्या नव्या ताऱ्याचा उदय झाला. ह्या चित्रपटातील ‘कभी आर कभी पार’ हे शमशाद बेगम यांचे खास ठसक्यातील गाणे तर ६७ वर्षांनी देखील तेवढेच लोकप्रिय आहे, रिमिक्स वाल्यांचे लाडके गाणे आहे ते. पण हेच गाणे सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलेले आढळते. परंतु तबकडीवर आणि चित्रपटात शमशाद बेगम यांचेच गाणे ऐकायला मिळते. सुमन यांचे गाणे जरा प्राथमिक अवस्थेत असल्यासारखे वाटते. चला तर आजच्या प्रकरणातले शेवटचे गाणे ऐकूयात.
गाणे: ‘कभी आर कभी पार’, चित्रपट: आरपार (१९५४), गीतकार: मजरुह सुलतानपुरी, संगीतकार: ओ. पी. नय्यर
कभी आर कभी पार
कभी आर कभी पार
हिंदी चित्रपट संगीतात असंख्य गाणी आहेत, त्यामुळे याच प्रकारातील अजूनही काही ज्ञात गाणी आणि अज्ञात गाणी राहून गेली आहेत. जसजशी नवीन गाणी माहिती होतील तसतशी ती गाणी आपणापुढे पुन्हा सादर केली जातील.
पुन्हा लवकरच भेटूयात नवीन गाणी आणि नवीन विषय घेऊन.
एका गाण्याची दोन रूपं One Song Two variants लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९
कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.
आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर लगेचच नितीन साळवी ह्या वाचकाने कळवले कि, १९६५ सालच्या ‘जब जब फुल खिले’ ह्या चित्रपटातील ‘परदेसियों से ना अँखियां मिलाना’ हे गाणे प्रथम मुबारक बेगम यांच्या आवाजात रेकॉर्ड केले होते. पडद्यावर आणि रेकॉर्डवर नंतर लतादीदीदींच्या आवाजातील गाणे ऐकायला मिळते. पण त्या गाण्याचा काहीच पत्ता नाही आता. कोणा वाचकांकडे अशीच नवीन माहीत असेल तर कृपया मला तसे कळवावे. अथवा कंमेंट मध्ये लिहावे.
आमचे हिंदी गाण्यांचे इतर लेख वाचा:

अत्यंत सुंदर लेखमाला आहे.आधी गाणे कोणाच्या तरी आवाजात रेकॉर्डिंग करुन ,नंतर दुसऱ्या गायका कडुन गाउन घेण्यात काही तांत्रिक अडचण,अभिनेता,अभिनेत्री चा दबाव असे कारण असु शकते. सावंत सर,आपली भाषाशैली छान आहे.माहीतीपुर्ण लेखमाला आहे.आपल्या पुढील लेखांची वाट पाहतोय……माणिक गुमटे…जुन्या गाण्याचा वेडा पिर.
नक्कीच, नवीन विषय लवकरच येत आहे. कृपया ब्लॉगचे सभासद व्हा (Subscribe करा). साधारणपणे गाण्यांचा लेख आठवड्याला एक टाकावा असे ठरविले आहे.
जुने लेख वाचण्यासाठी https://charudattasawant.com/category/geetmala/ येथे भेट द्या.
धन्यवाद.
Kadachit दोन आवाजातली गाणी gavun घेऊन चांगले ते thevat असतील, पण Yat दुसर्यां gayakacha aapman hot आसे. Pratyaekachya aavajachi जात vagli aaste, दोन aavajanchi tulna kevhahi vaietcha.
Wonderful. Informative and creative.
Thnx. Please read other posts related to songs.
Thanks Charudattaji for very informative presentation.👌🙏
Thnx. Also read other posts related to Marathi and hindi songs.