Pathan cobbler boy in a street side shop in Lahore

कर्तव्य (Marathi Story Kartavya)

कर्तव्य (Marathi Story -Kartavya)

लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा) – (Marathi Story Kartavya)

बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली. समोर एक वयस्कर ग्रुहस्थ उभे होते.

“अरे ही चप्पल शिवायची आहे.”

समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करताकरता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली.

“तुम्ही जोशी सर ना?” त्याने विचारलं.

“हो. तू? मला कसा ओळखतोस?”

“सर, मी गजानन. गजानन लोखंडे, झेड. पी. च्या शाळेत दहावी-ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे.”

“बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये.” जोशी सर त्याला निरखत म्हणाले.

“असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन. शिवाय आम्ही नेहमी मागच्या बाकावर बसणारे. कधीही प्रश्नांना उत्तरं न देणारे.” गजू हसतहसत म्हणाला.

“बरं बरं. पण तू हा व्यवसाय का…..?”

“सर हा आमचा पिढीजात व्यवसाय! आजोबा, वडील दोघंही हेच करायचे. दहावी सुटलो. तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये. त्यामुळे शिक्षण सोडून गेली चार वर्षे हेच काम करतोय.”

“काय झालं वडिलांना?”

“सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय. त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात.”

“ओह! आणि तुझे भाऊ?”

“दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत. शिकताहेत. आई अशिक्षित.”

“अच्छा. पण मग या व्यवसायात एवढ्या सगळ्यांचं व्यवस्थित भागतं का?”

“पोटापुरतं मिळतं सर.”

जोशी सर विचारात गढून गेले. गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले. काही दिवसांनी ते परत आले. गजूला म्हणाले, “अरे गजू माझ्या मापाचा एक बूट तयार करुन देशील?”

गजू तयार झाला. त्याने माप घेऊन दोन दिवसात बूट तयार करुन दिला. सरांना तो आवडला. त्यांनी गजू नाही म्हणत असतांनाही पाचशे रुपये दिले. गजूला खुप आनंद झाला. इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.

आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बूट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले. बरेचसे शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी होते. सगळे जोशी सरांनी पाठवलंय असं सांगायचे. कोणतीही घासाघीस न करता गजू म्हणेल ते पैसे द्यायचे. ब्रँडेड चपलाबूटांची मोठमोठी दुकानं सोडून ते आपल्याकडे चपलाबूट बनवतात याचं गजूला आश्चर्यही वाटायचं आणि आनंदही व्हायचा.

काही दिवसांनी सर आले. गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला. त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले, “गजू तुझ्या हातात कला आहे. सगळ्यांना तू बनवून दिलेल्या चपला, बूट आवडताहेत. तू असं का करत नाहीस? इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबूट ठेवले तर गिऱ्हाईकांना तयार होईपर्यत थांबावं लागणार नाही.”

“सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील. तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ.”

“हरकत नाही. मी देतो तुला. पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे. चालेल?”

गजू तयार झाला. सरांनी पंधरा हजार दिल्यावर आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली. महिना-दीडमहिन्यातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. जोशी सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले. त्यांनी ते त्याला परत केले.

“मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती. सहा महिन्यानंतरच मला परत कर. तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर. स्टॉक तयार करुन ठेव. आता लग्नसराई जवळ येतेय. चांगला सेल होईल बघ तुझा.”

सरांनी दिलेल्या कल्पनेने गजूचा आता उत्साह वाढला. त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली. उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली. आता त्याला वेळ पुरेनासा झाला.

सहा महिन्यांनी सर आले.गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

“सर खूप चांगलं चाललंय. पण आता पुढं काय करायचं?”

“गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं. तिथे हे सगळं शिफ्ट करायचं. मी पाहून ठेवलंय दुकान. अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. दुकानाचा मालक माझा विद्यार्थीच आहे. तो तुझ्याकडून भाडं कमी घेईल. आणि हो, स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो. एम.आय.डी.सी. मध्ये फँक्टरी टाकून दे.”

“काय? फॅक्टरी?” फॅक्टरीच्या नावानेच गजूला कापरं भरलं. “सर मला जमेल का? मला त्यातलं काही कळत नाही. नुकसान झालं तर आहे तो पैसाही गमवून बसेन. त्यापेक्षा जे चालू आहे तेच काय वाईट आहे?”

“आहे त्यात समाधान मानलं तर उद्योजक कसे तयार होणार? सगळं जमेल गजू. काही नुकसान होत नाही. आणि मी आहे ना! नुकसान झालंच तर ती माझी जबाबदारी. मग तर झालं?” सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

गजू त्यांचे पंधरा हजार त्यांना देऊ लागला. त्यांनी ते घेतले नाहीत.

“तू प्रामाणिकपणे परत करतो आहेस त्यातच मला आनंद आहे. राहू दे तुझ्याजवळच. तुझ्या कामास येतील. मला गरज लागली तर मागून घेईन.” ते म्हणाले.

गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले. “सर खूप करताय माझ्यासाठी.”

“अरे ते माझं कर्तव्यच आहे” त्याला उठवत ते म्हणाले, “माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत. कोणी इथे मोठे अधिकारी आहेत, व्यावसायिक आहेत. तूच एकटा मागे रहावा हे मला कसं बरं वाटावं?”

गजूच्या डोळ्यात पाणी आलं.

दोन तीन वर्षात गजू खूप पुढे गेला. फॅक्टरी वाढली. एकाची तीन दुकानं झाली. त्याचा माल आता आजुबाजूच्या जिल्ह्यातही जाऊ लागला. गजूचा गजानन शेठ झाला. झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के. फ्लॅटमध्ये रहायला गेला. भाऊबहीणी चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जाऊ लागले. दरम्यान त्याचे वडील वारले. वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं. मुलगी पसंत करायला तो जोशी सरांनाच घेऊन गेला होता. काही दिवसांनी त्याची आईही वारली.

इकडे जोशी सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती. सर आता थकले होते. इंग्लंडमध्ये नोकरी करणाऱ्या त्यांच्या मुलाने तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती. त्यामुळे सर दुःखी होते. त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.

एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला. सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला. सरांची मुलगा, मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत. ते येण्याअगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला. पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला आणि मुलीने ऑस्ट्रेलियाला चलण्याचा खूप आग्रह केला पण सरांची मायदेश सोडायची तयारी नव्हती. शेवटी सरांना इथेच सोडून ते निघून गेले.

सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं. त्यांची तब्येतही अधूनमधून बिघडायची. ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.

एक दिवस सरांनी व्रुध्दाश्रमात जायची तयारी केलीये हे ऐकून गजू बायकोला घेऊन सरांच्या घरी पोहचला. त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

“सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत. तुमच्यामुळेच मला आज समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख मिळालीये. तुम्ही नसता तर आजही मी त्या बाजारात चपलाबूटं शिवत बसलो असतो. सर आज मला अजून एक मदत कराल?”

“अरे आता तुला मदतीची काय गरज? तू आता खूप मोठा झालाहेस. बरं ठिक आहे, सांग तुला काय मदत हवी आहे?”

“सर माझे वडील व्हाल?”

त्याच्या जगावेगळ्या मागणीने सर स्तब्धच झाले. मग म्हणाले, “अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय.”

“हो ना? तर मग आता मला मुलाचं कर्तव्य करु द्या. मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय. तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी इच्छा आणि तुम्हाला विनंती आहे.” गजू हात जोडत म्हणाला.

“अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का? आणि तुझे भाऊबहिण तयार होतील का?”

“सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय. तिलाही वडील नाहीयेत. तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही आनंदच होणार आहे. शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की! भावाबहिणीचाही काही प्रश्न नाही. त्यांना तुमच्याबद्दल आदरच आहे.”

“बघ बुवा. म्हातारपण फार वाईट असतं. मी आजारी पडलो तर तुलाच माझं सर्व करावं लागेल.”

“मुलगा म्हटलं की ते सगळं करणं आलंच. सर, तो सारासार विचार करुनच मी आलोय.”

सर विचारात पडले. मग म्हणाले, “ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे. मला तू सर म्हणायचं नाही.”

“मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन!”

सर मोकळेपणाने हसले.

“अजून एक अट. तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची.”

गजूला गहिवरुन आलं. त्यानं सरांना मिठी मारली. दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.

लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा) – (Marathi Story Kartavya)

लेखाचे सर्वाधिकार: लेखक दीपक तांबोळी – ९५०३०११२५०


लेखक परिचय:

दीपक मधुकर तांबोळी
दीपक मधुकर तांबोळी

वास्तव्य: जळगांव
रेल्वेत सिनियर सेक्शन इंजीनियर या पदावर कार्यरत
आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली असून, चौथं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या तीनही पुस्तकांना आतापर्यंत सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.


लेखक दीपक तांबोळी यांची ह्रदयस्पर्शी कथांची प्रकाशित पुस्तके

WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.47 PM
मुळ किंमत रु. २००/- | सवलतीची किंमत रु. १५०/-
WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.48 PM 1
मुळ किंमत रु. २००/- | सवलतीची किंमत रु. १५०/-
WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.48 PM
मुळ किंमत रु. १७५/- | सवलतीची किंमत रु. १५०/-

तिन्ही पुस्तकं एकत्रित घेतल्यास फक्त रु. ४००/-मध्ये (पोस्टल चार्जेस रु.५०/- अतिरिक्त)

जे पुस्तक हवे असेल त्या पुस्तकाची किंमत खालील खात्यात जमा करावी

Name: Deepak Madhukar Tamboli Bank
Name: Union Bank Of India
Branch Name: Sindhi colony Branch, Jalgaon
A/C No. 507002010000689
IFSC : UBIN0550701

किंवा आपण गुगल पे, फोन पे, पेटीएमने शुल्क 9503011250 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.
रक्कम भरल्यावर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा.

पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया ९५०३०११२५० ह्या मोबाईल क्रमांकावर लेखकाशी संपर्क करावा


Cover Photo Credits: https://commons.wikimedia.org/wiki/File:Pathan_cobbler_in_Lahore.jpg

DescriptionEnglish: Pathan cobbler boy in a street side shop in Lahore, Pakistan, Date: 08 Nov. 2013

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Written by:: Mr. Deepak Madhukar Tamboli, Jalgaon. more...

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply