Old Marathi Songs - Marathi P Savlaram and Vasant Prabhu With Lata
| |

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

नवीन वाचकांसाठी पहिल्या भागातील प्रस्तावना

मराठी चित्रपटांतील गाण्यांबरोबरच मराठी भावगीतेही खूप लोकप्रिय आहेत, किंबहुना मराठी भावगीतांचे स्थान हे चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वरचे आहे.

मानवी स्वभावातील विविध रस आणि भावना मनाला हळुवार स्पर्शातून व्यक्त करणारे शब्द आणि गेयता यांच्या सुंदर संयोगाने भावगीत तयार होते. ह्या गीतास साधी-सोपी आणि सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल हे भावगीताचे वैशिष्ट्य आहे.

सुमारे ९६ वर्षांपूर्वी एप्रिल १९२६ मध्ये राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या एकूण १९ कडव्यांच्या कवितेचे गाण्यात रुपांतर करून त्याकाळचे रंगभूमीवरील अभिनेते-गायक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला….’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती नुकतीच अभ्यास व संशोधनातून समोर आली आहे. तिथून पुढे जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे या दिग्गज मंडळींनी मराठी भावसंगीताच्या वाढीसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ह्या भावगीतांकरीता काही नवीन कवी लेखन करीत होतेच, परंतु अनेक जुन्या कवींच्या रचना चालबध्द करुन नवीन भावगीते तयार करण्याची मोठी लाटच ५०च्या दशकात निर्माण झाली आणि ती पुढील दोन दशके टिकली. आता ती लाट ओसरली आहे. ५०च्या दशकात लतादीदींचा उदय झाल्यांनतर तर ह्या भावगीतांनी उचल घेतली, लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाचा सुरेख उपयोग करून घेत नवीन-जुन्या पिढीतल्या संगीतकारांनी अतिशय गोड, अवीट आणि अविस्मरणीय भावगीतांना जन्म दिला. एकाहून एक अशी सुरेख काव्ये, लतादीदींचा स्वर्गीय आवाज आणि अतिशय गोड चालीत स्वरबद्ध झालेली ही गाणी आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

अविस्मरणीय गाणी – भाग १ आणि भाग २ यामध्ये आपण राजकवी भा. रा. तांबे यांनी लिहिलेल्या कवितेचे भावगीतात रूपांतर केलेली गाणी लतादिदींच्या आवाजात ऐकली. आजच्या भागात आपण भावगीतांच्या सुवर्णकाळाचे मानकरी समजले जाणाऱ्या अजून एका आजरामर त्रिकुटाची गाणी ऐकणार आहोत, त्यांच्याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

वयाच्या १३व्या वर्षापासून म्हणजेच १९४२ पासून मराठी चित्रपटात अभिनय आणि पार्श्वगायन करुन स्वर्गीय लता मंगेशकर यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. परंतु १९४९ हे वर्ष त्यांच्या पुढील कारकीर्दीला वळण देणारे ठरले, १९४९ मध्येच त्यांनी गायलेले ‘आयेगा आनेवाला’ हे ‘महल’ या हिंदी चित्रपटातील गाणे खूप गाजले आणि लता हे नाव सर्वोमुखी झाले.

ह्याच १९४९ वर्षी लतादीदींनी गायलेले ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ ह्या मराठी भावगीताने लता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गेली. ह्या अजरामर गाण्याने अभूतपूर्व प्रसिद्धी मिळविली. मराठी लोकांनी या गाण्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. आजही गेली ७० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ह्या गाण्याची जादू मराठी भाषिकांच्या मनावरून उतरलेली नाहीय. ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ या गाण्याशिवाय आजही मराठी कुटुंबातील लग्नकार्य पूर्ण होत नाहीत. आजही हे गाणे कानावर पडले कि, कुठल्याही वयाची सासूरवाशीण असो, माहेराची आठवण येवून तिच्या डोळ्यात अश्रूमालांची धार वाहू लागते. (अश्रूमाला हा शब्द पी. सावळाराम यांनीच प्रथम वापरला आहे).

‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ ह्या अजरामर गाण्यामुळे कवी पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू व गायिका लता मंगेशकर ह्या नवीन त्रिकुटाची ओळख महाराष्ट्राला झाली. हे त्रिकूट म्हणजे मराठी भावसंगीत आणि चित्रपट संगीत क्षेत्राला पडलेले एक गोड स्वप्न! पुढील १८-१९ वर्षात ह्या त्रयीने असंख्य गोड भावगीते आणि चित्रपटगीते रसिकांना दिली.

आजचा लेख ह्याचा त्रयींच्या एकत्रित सांगितिक कारकीर्दीवर आधारित आहे. ह्या त्रिकुटाने दिलेल्या गाण्यांपैकी काही निवडक गाणी आपण येथे ऐकणार आहोत.

आजच्या ‘अविस्मरणीय गाणी – भाग ३’ ह्या भागातील सर्व गाण्यांचे कवी आहेत जनकवी पी. सावळाराम, गायिका आहेत लता मंगेशकर आणि गाणी स्वरबद्ध केली आहेत. वसंत प्रभू यांनी.

आजच्या भागातील पहिले गाणे आहे, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’.

ह्या गाण्याच्या जन्माची कथा आणि गाण्याचे रसग्रहण गाण्याच्या खाली दिलेल्या लिंकवर आपणास वाचावायास मिळेल.

Kalpvrukhsh Kanesathi - Original Handwritten Script
‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ ह्या गाण्याचे पी. सावळाराम ह्यांच्या मूळ हस्तलिखीत. सौजन्य: पुस्तक: पी.सावळाराम यांच्या गाण्यांचा संग्रह – ‘गंगा जमुना’, गार्गी प्रकाशन, www.bookganga.com ह्या संकेतस्थळावरून साभार.
पुस्तक खरेदी करण्याकरीता येथे क्लिक करा
गाणे: कल्पवृक्ष कन्येसाठी

लेखक: महादेव ई. पंडित ह्यांनी ई-सकाळ करिता लिहिलेला लेख:
‘कल्पवृक्ष कन्येसाठी’ ह्या सुप्रसिद्ध गाण्याच्या जन्माची कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जनकवी पी. सावळाराम

पुढचे गाणे ऐकण्यापूर्वी जनकवी पी. सावळाराम यांच्याविषयी जाणून घेवूया. (मागील दोन भागात लता मंगेशकर आणि वसंत प्रभू यांच्याविषयी आपण अधिक माहिती घेतली आहेच).

पी. सावळाराम यांचे पूर्ण नाव निवृत्तिनाथ रावजी पाटील. त्यांचा जन्म १९१३ सालचा. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ‘येडेमच्छींद्र (येडेनिपाणी)’ हे ‘पी.सावळाराम’ यांचे गाव, ‘क्रांतीसिंह नाना पाटील’ ही त्याच गावचे होते. साधारण वर्ष १९४५ नंतर त्यांनी गीतालेखनास प्रारंभ केला. त्यांनी ‘निवृत्तिनाथ रावजी पाटील’ या नावाने सुरुवातीला गाणी लिहिली; पण त्याच वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर एका बासरीवादकाचे नाव निवृत्तिनाथ पाटील असे प्रक्षेपित झालेले त्यांनी ऐकले. त्यामुळे आपण काहीतरी वेगळे नाव घ्यावे म्हणून त्या काळी प्रचलित असलेल्या सी. रामचंद्र, व्ही. शांताराम या शैलीप्रमाणे त्यांनी ‘पी. सावळाराम’ असे नाव धारण केले. कारण त्यांचे शाळकरी मित्र आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती वि. स. पागे हे त्यांना ‘सावळ्या’ नावाने हाक मारत असत.

पी. सावळाराम पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. तेथील राजाराम महाविद्यालयात कविवर्य माधव ज्युलियन (पटवर्धन) यांच्यासारख्या महान कवीचे प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन लाभले. पुढे १९४२च्या ‘चले जाव’ चळवळ मध्येही त्यांनी सहभाग घेतला. १९४३ मध्ये विवाहानंतर त्यांनी ठाण्यात आपला संसार सुरू केला. १९४५ मध्ये त्यांना शिधावाटप अधीक्षकाची नोकरी मिळाली. ही नोकरी सांभाळूनच त्यांनी गीतलेखनाकडे आपली लेखणी वळवली.

एचएमव्हीच्या वसंत कामेरकर यांनी (अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे वडील) त्यांच्यातला गीतकार हेरला. ह्या वसंतराव कामेरकरांनी एचएमव्ही आणि आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक कलाकार पुढे आणले. १९४९ मध्ये पी. सावळारामांनी लिहिलेली दोन गाणी वसंतराव कामेरकर यांच्याकडे आली. कामेरकरांनी वसंत प्रभू ह्या नवोदित संगीतकाराकडे या गाण्यांचे संगीत सोपवले. पी. सावळाराम आणि वसंत प्रभू ह्या जोडीच्या पहिल्या ध्वनीमुद्रिकेवर ‘राघू बोले मैनेच्या कानात ग’ आणि ‘नसता माझ्या मनात काही’ हि दोन भावगीते होती. हि दोन्ही भावगीते गायली होती नलिनी मुळगावकर यांनी. ही दोन्ही गाणी काही गाजली नाहीत.

पण वसंत प्रभू आणि पी. सावळेराम ह्या नवोदित कवी आणि संगीतकार जोडीच्या गाण्याची जादू कामेरकरांना दिसली. लगेचच त्याच वर्षी म्हणजेच १९४९ मध्ये कामेरकरांनी अजून दोन गाणी ह्याच जोडीकडे दिली आणि गायिका म्हणून कु. लता मंगेशकर ह्यांना घेतले. ह्या दुसऱ्या ध्वनिमुद्रिकेवर गाणी होती, ‘हसले ग बाई हसले, आणि ‘‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’.

ह्या ध्वनिमुद्रिकेवरील ‘‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ हे भावगीत अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय झाले. आणि कवी पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर हे त्रिकूट महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आणि या भावगीताने कसा इतिहास घडवला हे सर्वश्रुत आहेच. मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ इथून पूढे सुरु झाला.

पुढे जाण्यापूर्वी ह्याच त्रयींचे आजच्या भागातील दुसरे गाणे ऐकूया. गाणे आहे, ‘घट डोईवर, घट कमरेवर’.

गाणे: घट डोईवर, घट कमरेवर

भावगीत लेखन सुरु असतानाच १९५० साली निर्माता-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून पी. सावळाराम चित्रपटाचे गीतकार झाले. आणि वसंत प्रभू यांचा देखील हाच पहिला चित्रपट. या चित्रपटापासून, म्हणजे १९५० पासून ते १९८५ च्या ‘गड जेजुरी जेजुरी’पर्यंत सुमारे ५० बोलपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. पी. सावळाराम यांनी ‘नांदायला जाते’, या चित्रपटाची निर्मिती करून कथा-पटकथा-संवाद आणि गाणी लिहिली होती.

पी. सावळाराम यांची जवळजवळ सर्वच भावगीते, भक्तिगीते, लावण्या, प्रेमगीत हि मुलगी, सून, प्रेयसी व आई ह्या स्त्री रूपरेखेवरच लिहिलेली आहेत. त्यांनी लिहिलेली दोन भक्तिगीते आता आपण ऐकूयात.

गाणे: जो आवडतो सर्वांना
गाणे: विठ्ठल तो आला आला

पी. सावळाराम हे भावगीत कवी म्हणूनच ओळखले जातात. त्यांची सर्व भावगीते गाजली. महाराष्ट्रात सर्वांच्या तोंडी ती बसली. भावगीते लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे पी. सावळाराम हे पहिले चित्रपट गीतकार होत. त्यांच्या कवितेत भाव, भक्‍ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत. त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली.

पुढे पी. सावळाराम हे ठाणे शहाराचे नगराध्यक्ष झाले. स्वत:च्या कविता आणि गाण्यांच्या पाठबळावर नगराध्यक्षपद मिळविणारा हा जगातला पहिला कवी. एकदा मुलाखत देताना ते म्हणाले होते,‘गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का?’, या एका गीतावर मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे,’ आणि ते खरेच होते. १९६८ साली पी. सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, ग. दि. माडगूळकर त्यावेळीचे साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे सदस्य होते. ह्या सर्वांनी मिळून १९६८ मध्ये पी. सावळाराम यांना ठाणे नगरपालिकेत नगराध्यक्षपदी निवडून आणले.

गीतलेखनासाठी १९८२ सालच्या ‘गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पी. सावळाराम यांच्या नावाने ठाणे महानगर पालिका दर वर्षी चित्रपटातील मान्यवर स्त्री, पुरुष व नवोदित कलावंत यांना पुरस्कार देत असते.

पुढे जाण्यापूर्वी लता मंगेशकर यांच्या अतिशय गोड आवाजातील एक अर्थपूर्ण गाणे ऐकूयात. गाणे आहे, ‘हरवले ते गवसले का’.

गाणे: ‘हरवले ते गवसले का’

पी. सावळाराम हे असे नशीबवान गीतकार आहेत की त्यांची प्रभूंनी व इतर संगीतकारांनीही स्वरबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली. लता मंगेशकर यांनी मराठीत सर्वात जास्त गाणी गायली ती पी. सावळाराम यांची आहेत. लताने पी. सावळाराम यांची सुमारे ९५ गाणी गायली आहेत. कवी पी. सावळाराम, गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू ह्या त्रयींनी चित्रपटगीते सुद्धा खूप सुंदर दिली आहेत. वादळ (१९५३), गृहदेवता (१९५७), शिकलेली बायको (१९५९), कन्यादान (१९६०) अशा काही प्रमुख चित्रपटातून ह्या तिघांनी अतिशय सुंदर गाणी दिली आहेत.

आता वरील चित्रपटातील काही निवडक गाणी ऐकूयात.

गाणे: कोकीळ कुहू कुहू बोले, चित्रपट: कन्यादान (१९६०)
गाणे: प्रेमा काय दिले तू मला, चित्रपट: शिकलेली बायको (१९५९)
गाणे: लेक लाडकी या घरची, चित्रपट: कन्यादान (१९६०)
गाणे: गोड तुझ्या त्या स्वप्नांमधली, चित्रपट: गृहदेवता (१९५७)

१९४९ पासून संगीतकार वसंत प्रभू आणि लता यांची जोडी जमली. ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ ह्या दोघांच्या पहिल्या गाण्याच्या वेळेस लता १९ वर्षाच्या होत्या आणि वसंत प्रभू २५ वर्षांचे होते. ह्या जोडीने इतर कवींबरोबर काम करून अनके सुरेल गाणी रसिकांना दिली. ह्या दोघांना परस्परांच्या कलेचा आदर होता. लता मंगेशकर यांनी वसंत प्रभू यांच्याकडे सुमारे ७५ गाणी गायली आहेत. त्यातही १९५०-६०च्या दशकामध्ये लतादीदी यांनी गायलेली मराठीतील सर्वच भावगीते अथवा चित्रपटबाह्य गाणी हि फक्त वसंत प्रभू यांनीच संगीतबद्ध केली होती. ६०च्या दशकानंतर लता मंगेशकर यांनी हृदयनाथ, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांबरोबर काम केले.

लतादीदीं यांनी वसंत प्रभूंकडे गायलेल्या गाण्यातील आवाज इतर गाण्यांत आपल्याला सहसा आढळून येत नाही. अतिशय हळूवार गोड, तरल आणि निर्मळ असा आवाज लतादीदीं यांनी या गाण्यांना वापरलेला आहे. शिवाय कठीण शब्द किंवा तान असेल तर, मोठ्या कौशल्याने लतादीदीं यांनी ते आव्हान पेलवले आहे, हे कळून येते. वसंत प्रभू यांनी हिंदीत संगीतकार म्हणून प्रवेश केला तो १९५३च्या ‘घरबार’ ह्या चित्रपटापासून. परंतु तो त्यांचा हा हिंदीतील पाहिलं आणि शेवटचा चित्रपट ठरला, तो केवळ मराठीतील व्यस्ततेमुळे अन्यथा आपणास काही छान हिंदी गाणी ऐकावयास मिळाली असती.

लतादीदी यांनी माधवराव शिंदे व दिनकर पाटील यांना एकत्र घेवून ‘सुरेल चित्र’ ह्या नावाने चित्रपट निर्मिती सुरु केली. १९५३ ते १९६३ दरम्यान ‘सुरेल चित्र’ ह्या नावाने निर्मिती केलेल्या बऱ्याच चित्रपटांना संगीत वसंत प्रभू यांचे होते. त्यात ‘वादळ (१९५३), बाळ माझं नवसाचं (१९५५), कन्यादान (१९६०), शिकलेली बायको (१९५९), गृहदेवता (१९५७), बायकोचा भाऊ (१९६२) आदी चित्रपटांचा समावेश आहे.

पुढची दोन गाणी सुद्धा चित्रपटातील आहेत, ही गाणी युगल गीते नाहीत, पण दोन्ही गाण्यात अतिशय गरजेपुरता दुसऱ्या गायकांच्या आवाजाचा वापर केला आहे, त्यामुळे हि गाणी लताचीच आहेत. दोन्ही गाणी अतिशय वेगळ्या धाटणीची आणि अतिशय सुंदर असल्याकरणाने थोडे विषयांतर झाले असले, तरी ती गाणी आपणास ऐकवण्याचा मोह आवरत नाही.

त्यातील पहिले गाणे आहे, १९५६ मधील पावनखिंड चित्रपटातील गाणे ‘मल्हारी माझा मल्हारी’. ह्या गाण्यात लता यांना साथ दिली आहे शाहीर साबळे यांनी. कवी आणि संगीतकार आहेत अर्थातच पी.सावळाराम आणि वसंत प्रभू.

गाणे ‘मल्हारी माझा मल्हारी’

आता दुसरे गाणे ऐका, १९५९ मधील ‘ शिकलेली बायको’ चित्रपटातील गाणे, ‘हर्षाचा वर्षाचा, दिवाळ सण आला’, लतादीदी सोबत आहेत, उषा मंगेशकर आणि साथी

गाणे, ‘हर्षाचा वर्षाचा, दिवाळ सण आला’

आपणास वरील दोन्ही गाणी आवडली असणार यात शंका नाही. बऱ्याच जणांनी ही काही प्रथमच ऐकलेली असू शकतात.

असो, आजच्या भागातील शेवटचे गाणे आता ऐकूयात. लेखाच्या सुरवातीपासूनच ह्या गाण्याचा उल्लेख केला होता, त्या गाण्याविषयी खूप काही सांगितले आहे, आणि ते गाणे अजून कसे नाही ऐकवले, आपण त्या गाण्याची आतुरतेने वाट पहात असणार.

गाणे आहे, ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली, जा, दिल्या घरी तू असूनही रहा’. ह्या अजरामर गाण्याविषयी मी काय लिहू? ह्या गाण्याच्या जन्माची कथा गाण्याखाली दिलेल्या लिंकवर आपण वाचू शकता. चला तर आता थेट गाणेच ऐकूया, ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’.

Ganga Jamuna Dolyat Ubhya Ka - Original Handwritten Script - Old Marathi Songs
गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?’ ह्या गाण्याचे पी. सावळाराम ह्यांच्या मूळ हस्तलिखीत. सौजन्य: पुस्तक: पी.सावळाराम यांच्या गाण्यांचा संग्रह – ‘गंगा जमुना’, गार्गी प्रकाशन, www.bookganga.com ह्या संकेतस्थळावरून साभार.
पुस्तक खरेदी करण्याकरीता येथे क्लिक करा
गाणे: ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का? जा मुली, जा, दिल्या घरी तू असूनही रहा’.
महादेव ईश्वर पंडीत यांनी लिहिलेली ‘गंगा जमून डोळ्यात उभ्या का?’ ह्या गाण्याच्या जन्माची कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा:

दादांची अनेक गाणी सुरेल व मन प्रसन्न करणारी आहेत, पण ह्या गाण्याने दादांना प्रत्येक माणसाच्या घरात तसेच मनात अक्षय स्थान मिळाले. हे गाणे ऐकले गाईले तरी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाला पाझर फुटतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने त्याचक्षणी पी. सावळाराम जनकवी बनले.

महादेव ईश्वर पंडीत

प्रसंग एकदम साधा, सन 1948 मधील मे महिना. पुण्यावरून एक माहेरवासीन सासरकडे रेल्वेमधून निघाली होती. त्याचवेळी पी सावळाराम (माझे दादा) पण पुण्यावरून मुंबईकडे निघाले होते. मुलीची आई मुलीला सासरमध्ये सुखी रहा आणि आता तू जास्त रडू नकोस असा निरोप देत तिला समजावत होती. जन्माला आलेल्या प्रत्येक कन्यारत्नाच्या जीवनात हा प्रसंग येत असतो. दादांनी तो प्रसंग अगदी जवळून पाहीला आणि चांगलाच आत्मसात केला, आणि त्या प्रवासातच तो प्रसंग अत्यंत साध्या, सुरेल आणि अंतःकरणाला भिडतील अशा संगीतमय शब्दांनी साकारत एक अविस्मरणीय आणि अक्षय गाणे तयार केले. प्रसंग एकदम साधा, शब्द साधे सुरेल आणि एकदम साधे जीवन असणारा एक कवी असा एकूणच त्रिवेणी संगम तयार झाला, आणि त्या संगमातून एक नशीबवान व अक्षय गाणे जन्माला आले ते असे;

“गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?
जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा”

पुढे त्या गाण्याला संगीत देण्यासाठी दादांनी वसंत प्रभूंची निवड केली. वसंत प्रभूं – नावातच वसंत आणि प्रभू असल्यामुळे त्याच्या संगीताची जनमानसाला भुरळ नाही पडली तर नवलच आणि जिच्या स्वरांनी मराठी रसिकजन अगदी मंत्रमुग्ध होत असत अश्या त्या गाणकोकीळा लता मंगेशकर यांच्याकडून दादांनी ते गाणे स्वरबध्द करूण घेतले. प्रतिभावंत पी. सावळाराम, आपल्या संगीताने मराठी रसिकावर राज्य करणारे संगीतकार वसंत प्रभू आणि मंत्रमुग्ध सुरेल आणि मधूर आवाजाची दैवी देणगी लाभलेली गाणकोकीळा लता दिदी – अशा महान, प्रतिभाशाली सच्छिल त्रिमुर्तीचा संगम गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? ह्या गाण्याला लाभला आणि ह्या त्रिमुर्तीमुळेच ते गाणे अमृतापेक्षाही मधूर व गोड बनले आणि त्याचक्षणी पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही त्रिमुर्ती पृथ्वीतलावरील प्रत्येक मराठी माणसांच्या अंतःकरणात जाऊन बसली आणि त्यांना अढळ तसेच अक्षयस्थान प्राप्त झाले. Source: https://iyemarathichiyenagari.com/story-of-p-savalaram-ganga-jamuna-song/

जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू ह्या त्रयींची अजूनही खूप अवीट आणि अविस्मरणीय भावगीते आणि चित्रपटगीते आहेत. लेखाची लांबी वाढत असल्यामुळे ह्या लेखात खूपच कमी गाण्यांचा उल्लेख केला आहे.

जनकवी पी. सावळाराम यांचे पुत्र संजय आणि स्नुषा गीता यांनी सांगितलेल्या दादांच्या (पी. सावळाराम) यांच्या काही आठवणी वाचण्यासाठी येथे क्लिक करा


अविस्मरणीय गाणी – भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs) – या लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)
अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

मराठी कवितेच्या गाण्यांचे आमचे अन्य लेख वाचा

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी

बालभारतीच्या कवितेची गाणी वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा


बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ते ७ ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे. आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.


हा लेख लिहिण्याकरीता (Old Marathi Songs) बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!


संदर्भ आणि ऋणनिर्देशन (Old Marathi Songs):

  1. https://rec.music.indian.misc.narkive.com/q6ghz7yO/a-short-note-on-vasant-prabhu
  2. गाण्यांची यादी आणि अधिक माहितीList and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
  3. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5180164450486106526&PreviewType=books
  4. https://www.facebook.com/364265903932470/posts/460858947606498/
  5. https://anandghare.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply