Old Marathi Songs
| |

अविस्मरणीय गाणी – भाग 1: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

अविस्मरणीय गाणी – भाग १ला: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

मराठी चित्रपटांतील गाण्यांबरोबरच मराठी भावगीतेही खूप लोकप्रिय आहेत, किंबहुना मराठी भावगीतांचे स्थान हे चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वरचे आहे.

मानवी स्वभावातील विविध रस आणि भावना मनाला हळुवार स्पर्शातून व्यक्त करणारे शब्द आणि गेयता यांच्या सुंदर संयोगाने भावगीत तयार होते. ह्या गीतास साधी -सोपी आणि सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल हे भावगीताचे वैशिष्ट्य आहे.

सुमारे ९६ वर्षांपूर्वी एप्रिल १९२६ मध्ये राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या एकूण १९ कडव्यांच्या कवितेचे गाण्यात रुपांतर करून त्याकाळचे रंगभूमीवरील अभिनेते-गायक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला….’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती नुकतीच अभ्यास व संशोधनातून समोर आली आहे. तिथून पुढे जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे या दिग्गज मंडळींनी मराठी भावसंगीताच्या वाढीसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ह्या भावगीतांकरीता काही नवीन कवी लेखन करीत होतेच, परंतु अनेक जुन्या कवींच्या रचना चालबध्द करुन नवीन भावगीते बनवीन्याची मोठी लाटच ५०च्या दशकात निर्माण झाली आणि ती पुढील दोन दशके टिकली. आता ती लाट ओसरलीआहे. ५०च्या दशकात लतादीदींचा उदय झाल्यांनतर तर ह्या भावगीतांनी उचल घेतली, लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाचा सुरेख उपयोग करून घेत नवीन-जुन्या पिढीतल्या संगीतकारांनी अतिशय गोड, अवीट आणि अविस्मरणीय भावगीतांना जन्म दिला.

आजच्या लेखातील पहिले भावगीत आता आपण ऐकूयात.

गाणे: जन पळभर म्हणतील हाय हाय, कवी: भा. रा. तांबे, (रचना: अजमेर, २०/०८/१९२१), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

आताच आपण ऐकलेले गाणे होते, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, कवी होते भा. रा. तांबे, गायले होते लता मंगेशकर यांनी आणि ह्या गाण्यास स्वरबद्ध केले होते संगीतकार वसंत प्रभू यांनी.

आजचा लेख भावगीतांच्या सुवर्णकाळातील ह्याच लोकप्रिय त्रिकुटांविषयी आहे. कवी भा. रा. तांबे, गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या त्रिकूटाची अतिशय अवीट आणि गोड अशी ६ भावगीते सापडतात. एकाहून एक अशी सुरेख काव्ये, लतादीदींचा स्वर्गीय आवाज आणि अतिशय गोड चालीत स्वरबद्ध झालेली ही गाणी आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

भा. रा. तांबे, लता आणि वसंत प्रभू

गेल्या शतकातील कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे! ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ म्हणून राहिलेल्या भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक समजले जाते. साधारण १९२० मध्ये त्यांचा कविता संग्रह राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या नावाने (प्रथम आवृत्ती) प्रकाशित झाला. भास्कररावांच्या प्रत्येक कवितेखाली ती त्यांनी कविता कोठे आणि कधी लिहिली म्हणजे स्थान आणि दिनांक याचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांची कविता कशी फुलली हे अभ्यासू जाणून घेवू शकतात. त्यांच्या बहुतेक कविता ह्या नव्वद ते शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. पण त्यातील सौंदर्य मात्र आजही ताजेतवाने आहे. त्यांच्या कवितेचे स्वरूप हे भावगीतांचे राहिले आहे, त्यांनी लिहिलेल्या असंख्य कविता रेडिओवर भावगीतांच्या रूपात ऐकायला मिळतात. भा. रा. तांबे यांच्या कविता किती गेय आहेत, हे त्या कवितेला लावलेल्या चालींनी कळून येते.

त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध कविता/गाणी खालीलप्रमाणे:

 • कशी काळ नागिणी
 • डोळे ही जुलमी गडे
 • तुझ्या गळा, माझ्या गळा
 • तिनी सांजा सखे मिळाल्या
 • या बाळांनो या रे या
 • रे हिंदबांधवा थांब
 • मरणात खरोखर जग जगतें
 • पिवळे तांबुस ऊन कोवळे

पुढे जाण्यापूर्वी ऐकूयात आजच्या लेखातील दुसरे गाणे!

गाणे: कळा ज्या लागल्या जीवा, कवी: भा. रा. तांबे, (रचना: अजमेर, ३०/०१/१९२२), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

भास्कर रामचंद्र तांबे यांनी विविध धार्मिक ग्रंथांबरोबरच रुद्र व वेदपठणाचा अभ्यास केला होता. त्यांना इंग्रजीची आवड होती. तसेच त्यांनी संस्कृत आणि ऊर्दू भाषाही शिकून घेतली होती. त्यांनी संस्कृत आणि हिंदी भाषेतही काव्यरचा केली आहे. भास्कररावांना नारायण भगवान या गायकाकडून संगीतातील शास्त्रीय रागांचे ज्ञान मिळाले. ह्याचा वापर त्यांनी कविता लिहिताना केला. काव्य व संगीत एकमेकांस पूरक आहेत, असे ते मानत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांची कविता सुरांसकट जन्माला येते. संगीताचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. भास्करावांनी त्यांच्या बऱ्याच कवितेची जाती आणि राग कुठला आहे हे देखिल कवितेबरोबर लिहून ठेवल्याचे दिसते. म्हणूनच मघाशी म्हटल्याप्रमाणे तांबे यांच्या कविता ह्या गेय आहेत. रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांना लिहिलेल्या पत्रात भास्कररावांनी स्वतःच्या कवितेच्या रचनेमागचे रहस्य उलगडून दाखविले आहे.

त्यांनी लिहिले आहे कि, ‘कित्येक ठिकाणी सोळा मात्रांच्या जागी मी चौदा मात्राच ठेविल्या आहेत. त्या का? तेथे संगीत कलेचा संबंध येतो. ….संगीताचा आणि काव्याचा किती निकट संबंध आहे, आणि संगीतामुळे काव्यातील भावना किती उठावदार होतात, आणि या दोन जुळ्या बहिणी कला एकमेकींस भेटल्या व खेळीमेळीने सहकार्य करू लागल्या, तर ह्या दुःखमय पृथ्वीवर स्वर्गलोक कसा भरभर उतरून येतो, हे मी तुम्हांला सप्रयोग सिद्ध करून दाखविले असते.’

(१३/४/१९३५, संदर्भ: सह्याद्री, फेब्रुवारी १९४२, – डॉ. आशा सावदेकर यांनी लिहिलेल्या लेखातून साभार).

‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आताच आपण राजकवी भा. रा. तांबे यांच्याविषयी माहिती वाचली आहे. आता जाणून घेऊयात ह्या गाण्यांचे संगीतकार वसंत प्रभू यांच्यविषयी.

त्यापूर्वी ऐकूयात आजच्या लेखातील तिसरे गाणे!

गाणे: नववधू प्रिया मी बावरते, कवी: भा. रा. तांबे, (रचना:प्रतापगढ, १२/१०/१९२०), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

आताच आपण ऐकलेल्या गाण्याचे बोल ऐकून ह्या कवितेत एखाद्या नववधूचे मनोगत असावे असे वाटते खरे, पण कवीला यात काय सांगावयाचे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वसंत प्रभू यांचे खरे नाव होते, व्यंकटेश प्रभू. ऊंच आणि देखणे असलेल्या व्यंकटेश प्रभू यांनी १४ वर्षांचे असताना बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. परंतु पुढे हिंदी अथवा चित्रपटात नायक होण्याचे त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. त्यांना संगीताचेही उत्कृष्ठ ज्ञान होते हे साहजिकच आहे, परंतु त्याविषयी अधिक माहिती अजून आम्हाला सापडली नाही.

भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. प्रभूंनी दिनकर पाटील दिग्दर्शित चित्रपट ‘तारका’ चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शित केले ज्यात त्यांनी अजिबात नृत्य येत नसलेल्या अभिनेत्री सुलोचना (लाटकर) यांना नृत्याचे धडे दिले. (Ref. https://www.loksatta.com/manoranjan/93-anniversary-of-marathi-music-composer-vasant-prabhu-1384281/).

१९५५ सालात वसंत प्रभू यांनी लतादीदींना सोबत घेवून भा. रा. तांबे यांच्या गाण्याची प्रथम ध्वनीमुद्रिका काढली.

चला आता ऐकूयात ते गाणे!

गाणे: मधू मागशी माझ्या सख्या, कवी: भा. रा. तांबे, (रचना: लष्कर-ग्वाल्हेर, १९३३), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

‘मधू मागशी माझ्या सख्या’ ह्या गाण्याच्या कवितेचे शिर्षक आहे ‘रिकामे मधुघट’, ह्या कविकतेचे रसग्रहण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वसंत प्रभू यांची मराठी चित्रपट संगीत आणि भावगीतांमध्ये जोडी जमली ती कवी पी. सावळाराम यांच्याबरोबर. ‘कन्यादान’ ह्या मराठी चित्रपटातील गाण्यांमुळे वसंत प्रभू, पी. सावळाराम, लता मंगेशकर हे त्रिकुट प्रचंड लोकप्रिय झाले. ह्या दुसऱ्या त्रिकुटाने ‘गंगा जमुना डोळ्यात उभ्या का’ ह्या सारखे अजरामर गाणे दिले आहे, पण आजचा विषय वेगळा असल्याने त्याविषयी पुन्हा कधीतरी माहिती घेवूया. तसेच ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटासाठी हिंदीतील सुप्रसिद्ध गजलकार तलत मेहमूदच्या यांच्या आवाजाचा वापर मराठीत प्रथमच वसंत प्रभूंनी केला. वसंत प्रभू यांचे चरित्र लेखक मधू पोतदार यांनी ‘मानसीचा चित्रकार तो’ ह्या नावाने प्रसिद्ध केले आहे, रसिक अथवा अभ्यासूंनी ते पुस्तक नक्की वाचावे.

ह्या भागातील शेवटची दोन गाणी माझ्या अत्यंत आवडीची असून, दोन्ही गाणी अतिशय अर्थपूर्ण आहेत. माझा कवितेविषयीचा अभ्यास तोकडा आहे, त्यामुळे या कविते/गाण्यांबद्दल फार काही मला लिहिता येत नाहीय, परंतु हि दोन्ही गाणी सरळ हृदयाला भिडतात हे मी अनुभवले आहे, हा अनुभव आपणही घ्यावा.

चला आता ऐकूयात आजच्या भागातील पाचवे गाणे!

गाणे: ते दूध तुझ्या त्या घटातले, कवी: भा. रा. तांबे, (रचना: प्रतापगढ, ०३/१०/१९२०), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

आपण कवीवर्य भा. रा. तांबे आणि संगीतकार वसंत प्रभू यांच्याविषयी अधिक माहिती आताच वाचली आहे. परंतु वर उल्लेख केलेल्या त्रिकूटामधील गायिका लता मंगेशकर यांच्या विषयी काहीच मी लिहिले नाही. संपूर्ण भारताचे आदरस्थान आणि सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या गोड गळ्याच्या लतादीदींविषयी अनेक दिग्गज प्रभूतींनी अगोदरच एवढे लिहून ठेवले आहे, की मी बापडा आणखी काय लिहिणार?

कवीवर्य भा. रा. तांबे आणि संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर ह्यांनी तिघांनी मिळून वेगवेगळ्या कालखंडात मराठी रसिक आणि श्रोत्यांसाठी खूप मोठा आणि अमूल्य ठेवा निर्माण करून ठेवला आहे. कवीवर्य भा. रा. तांबे यांचा असाच आणखी एक मौल्यवान ठेवा संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर ह्या भावंडांनी आपल्यासाठी निर्माण केला आहे, ते जाणून घेण्यासाठी लवकरच भेटूयात. संगीतकार वसंत प्रभू यांनी कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या अजून दोन कविता संगीतबद्ध केल्या आहेत, त्यापैकी पहिले आहे, ‘डोळे हे जुल्मी गडे (गायिका आशा भोसले)’ आणि दुसरे आहे, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा (गायक- सुधीर फडके आणि आशा). पण आजचा विषय वेगळा असल्याने येथे या दोन गाण्यांचा फक्त ओझरता उल्लेख केला आहे.

कवीवर्य भा. रा. तांबे आणि संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर ह्या त्रिकूटाचे आजच्या भागातील सहावे आणि शेवटचे ही गाणे मुद्दाम लेखाच्या शेवटी ठेवले आहे, कारण डोळ्यात पाणी आल्यावर आपण वाचू शकत नाही. पण ऐकू तर नक्की शकू.

गाणे: निजल्या तान्ह्यावरी माऊली, कवी: भा. रा. तांबे, (रचना: अजमेर, डिसेंबर १९२१), गायिका: लता मंगेशकर, संगीत: वसंत प्रभू

कवीवर्य भा. रा. तांबे, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर ह्या त्रिकूटाला माझे त्रिवार नमन!


अविस्मरणीय गाणी – भाग १ला: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ते ७ ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे. आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/


मराठी कवितेच्या गाण्यांचे आमचे अन्य लेख वाचा

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था : इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Son

बालभारतीच्या कवितेची गाणी वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.


हा लेख लिहिण्याकरीता (Old Marathi Songs) बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!


संदर्भ आणि ऋणनिर्देशन (Old Marathi Songs):

 1. mr.wikipedia.org/s/3jmq
 2. https://www.loksatta.com/lokrang/swarbhaoyatra/articles-in-marathi-on-bhaskar-ramchandra-tambe-2-1569940/
 3. डॉ. आशा सावदेकर यांचा लेख https://maharashtranayak.in/taanbae-bhaasakara-raamacandara
 4. गाण्यांची यादी आणि अधिक माहितीList and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
 5. गोविंदाग्रज यांची एकूण १९ कडव्यांची संपूर्ण कविता (मराठीतील पहिले भावगीत): https://balbharatikavita.blogspot.com/
 6. कवीवर्य भा. रा. तांबे यांचे संकल्पित छायाचित्र सौजन्य: https://www.loksatta.com/lokrang/swarbhaoyatra/articles-in-marathi-on-bhaskar-ramchandra-tambe-2-1569940/
 7. वसंत प्रभू आणि लता मंगेशकर यांचे छायाचित्र (सोबत ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर) – छायासौजन्य प्रदीप साठे आणि बाळ चावरे: https://www.loksatta.com/manoranjan/93-anniversary-of-marathi-music-composer-vasant-prabhu-1384281/

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Mr. Charudatta Sa more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply