बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3
बालभारतीच्या कवितेची गाणी – इयत्ता ३री – Balbharati Poem Songs – 3
लेझीम चाले जोरात
आजची पहिली कविता आहे, श्रीधर बाळकृष्ण रानडे यांनी लिहिलेली कविता – ‘लेझीम चाले जोरात’.
मराठी बालसाहित्यकारांना गुरुस्थानी असलेले गेल्या शतकातील बालसाहित्यकार आणि कवी श्रीधर बाळकृष्ण रानडे यांनी ‘उघड पावसा उन पडू दे, माधुकरी, लेझीम चाले जोरात’ इत्यादी प्रसिद्ध कविता लिहिल्या आहेत. मुंबईमधील जोगेश्वरीच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले श्री. बा. रानडे प्रसिद्ध कवी नव्हते, परंतु काव्याची आवड असल्याकरणाने त्यांची कवियत्री पत्नी मनोरमाबाई आणि अन्य मित्रांसोबत पुण्यात काव्याला वाहून घेतलेल्या सुप्रसिद्ध ‘रवीकिरण’ मंडळाची स्थापना त्यांनी केली. ९२ वर्षांचे दिर्घ आयुष्य लाभलेल्या श्री. बा. रानडे यांनी लिहिलेल्या कविता वयाच्या ३५ वर्षांपर्यंतच केलेल्या आढळतात. त्यांनी लिहिलेल्या कविता वर्ष १९२६ पूर्वीच लिहिल्या आहेत. पत्नी मनोरमाबाई यांचे अवघ्या २९व्या वर्षी अकाली निधन झाल्याने रानडे यांनी पुढे काव्य लेखन थांबवले. त्यानंतर त्यांनी काव्य व साहित्य संपादन आणि बालसाहित्य या क्षेत्रात कार्य केले. १९१५ मध्ये कॉलऱ्याने आजरी पडल्यावर चक्क मृत्यूला हुलकावणी देवून परत आलेल्या श्री. बा. रानडे यांनी लिहिलेले ‘काळाच्या दाढेतून’ हे खंडकाव्य अतिशय प्रसिद्ध झाले.
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात श्रीधर बाळकृष्ण रानडे यांची प्रसिद्ध कविता, ‘लेझीम चाले जोरात’. श्रीधर बाळकृष्ण रानडे यांना ग्रामीण पाश्वर्भूमी नसावी, असे वाटते, तरी देखील ग्रामिण आणि शेतकरी जीवन त्यांनी या कवितेत छान रेखाटले आहे.
कवितेचे गाण्यात रूपांतर केले आहे संगीतकार वसंत देसाई यांनी, गायले आहे जयवंत कुलकर्णी, प्रभाकर, वाणी जयराम, कैलासनाथ जैसवाल आणि मुले यांनी. या गायकांपैकी प्रभाकर यांच्या विषयी जास्त माहिती मिळाली नाही, अन्य गायक कैलासनाथ जैसवाल यांनी ३० वर्षांहून अधिक काळ एचएमव्ही वर रेकॉर्डिंग ऑफिसर म्हणून काम केले आहे, तसेच ते गायक, संगीतकार देखील होते आणि संगीतकार वसंत देसाई यांचे ते सहायक होते.
बालभारतीने वर्ष १९६५ मध्ये काढलेल्या तिसऱ्या ध्वनीमुद्रिकेमध्ये ईयत्ता ३रीच्या दोन कवितेची गाणी होती. ती आता आपण ऐकूयात.
चला तर ऐकूया आजच्या भागातील कवितेच्या गाण्याचे प्रथम गाणे, आणि परत घेऊयात ३रीच्या वर्गातील आनंद! आपल्या बरोबर नवीन पिढीला हा ठेवा दाखवावा आणि ऐकवावा!

मूळ संग्राहक : श्री. गावस्कर (अधिक माहिती मिळत नाही)
Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-गण-अमच-जळ-लझम/release/13725678/image/SW1hZ2U6NDA1NDY1OTE=

Manufactured by Gramophone Co. of India Ltd.
Created by: Maharashtra State Bureau of Text Book Production (Balbharati)

गाणे ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा:
टप टप पडती अंगावरती
ह्या गाण्याचे कवी आहेत पद्मभूषण पुरस्कार विजेते कविवर्य मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर त्यांच्या अनेक कविता/गाणी मराठी शालेय पाठ्यपुस्तकांत आहेत. यांनी लहान मुलांसाठी खूप साहित्य प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध बालकविता/गाणी खालीलप्रमाणे:
- सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
- सुट्टी एके सुट्टी, सुट्टी दुणे सुट्टी
- टपटप टपटप थेंब वाजती
- चांदोमामा चांदोमामा भागलास का
- आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता, ‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’. मोकळया कुरणावरील प्राजक्ताच्या झाडांची गळणारी फुले पाहून मुलांच्या मनात काय भाव उमटतात आणि मुले त्याचा आनंद कसा घेतात याचे चित्र पाडगावकरांनी या कवितेत छान रेखाटले आहे, चला तर आपणही त्याचा आनंद घेऊया, अन्यथा कवितेच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ‘गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे’ असे नको व्हायला.
कवितेचे गाण्यात रूपांतर केले आहे संगीतकार वसंत देसाई यांनी, गायले आहे प्रभाकर, वाणी जयराम आणि मुले यांनी.


टपटप पडती अंगावरती
Balbharati Poem Songs. Source: https://www.discogs.com/Vasant-Desai-गण-अमच-जळ-लझम/release/13725678/image/SW1hZ2U6NDA1NDY1ODk=

पिवळे तांबूस ऊन कोवळे
पुढची कविता आहे, गेल्या शतकातील कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांनी लिहिलेली कविता ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’. ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ म्हणून राहिलेल्या भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक समजले जाते. १९३५ मध्ये त्यांचा कविता संग्रह ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या नावाने प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतेक कविता ह्या नव्वद ते शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. पण त्यातील सौंदर्य मात्र आजही ताजेतवाने आहे. त्यांच्या कवितेचे स्वरूप हे भावगीतांचे राहिले आहे, त्यांनी लिहिलेल्या असंख्य कविता रेडिओवर भावगीतांच्या रूपात ऐकायला मिळतात. भा. रा. तांबे यांच्या कविता किती गेय आहेत, हे त्या कवितेला लावलेल्या चालींनी कळून येते.
त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध कविता/गाणी खालीलप्रमाणे:
- कशी काळ नागिणी
- कळा ज्या लागल्या जीवा
- जन पळभर म्हणतील हाय हाय
- तिनी सांजा सखे मिळाल्या
- तुझ्या गळा माझ्या गळा
- ते दूध तुझ्या त्या
- निजल्या तान्ह्यावरी माउली
- या बाळांनो या रे या
- रे हिंदबांधवा थांब
चला तर आता वाचूया आणि ऐकूया ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’ कवी: भा. रा. तांबे, गायक आणि संगीतकार: श्रीधर फडके

दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट
आता आपण ऐकूयात कविवर्य बा.भ. बोरकर यांची कविता, ‘दीपका मांडिले तुला, सोनियाचे ताट’. पद्मश्री पुरस्कारविजेते कवी बा. भ. बोरकर अर्थात बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना साहित्यविश्वात आनंदयात्री कवी म्हणून ओळखले जात असे. त्यांनी मराठी आणि कोंकणी भाषेत कविता केल्या आहेत. गोवेकरांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. बोरकरांना गोव्यात ‘बाकीबाब बोरकर’ म्हणून प्रेमाने म्हटले जायचे.
आपल्या लहान बाळास उष्टावण करताना त्याची आई गाण्यातून आपल्या भावना व्यक्त करत, बाळाच्या भविष्यासाठी कुलदेवतेचे आशीर्वाद मागते, त्यातच बाळ घास घेताना खोड्या करीत असतो, तेव्हा काऊ चिऊ यांना आमंत्रण देवून बाळाला घास भरवीत असल्याचे वर्णन ह्या कवितेत आहे.
चला तर आता ऐकूयात ‘दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट’, गाण्याच्या गायिका आहेत सुमन कल्याणपूर आणि संगीत दिले आहे कमलाकर भागवत यांनी.

कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लीक करा
आली बघ गाई गाई
पुढची कविता आहे साहित्य अकादमी पुरस्कार आणि अन्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या सुप्रसिद्घ मराठी भावकवीयत्री इंदिरा संत यांची.
बालकथांपासून लेखनास प्रारंभ केलेल्या इंदिरा संत यांनी मराठी आणि मानसशास्त्र ह्या विषयांच्या अध्यापिका म्हणून आणि बेळगाव येथील ‘मराठी ट्रेनिंग कॉलेज’च्या प्राचार्या म्हणून १९५६ ते १९७४ या काळात त्यांनी काम केले आहे. त्यांचे पती नारायण संत हे देखील कवी होते. दोंघांच्या कवितांचा एकत्रित संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. पतीच्या अकाली निधनामुळे अवघ्या दहा-बारा वर्षांचे वैवाहिक आयुष्य लाभलेल्या इंदिराजींनी पुढचे आयुष्य साहित्यकृतींना वाहून घेतलेले दिसते. त्यांच्या अनेक काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांची ‘आली बघ गाई गाई’ हि कविता म्हणजे आई लाडक्या आपल्या मुलीला झोपवीत असताना गायलेले अंगाईगीत आहे.
कवितेला सुदर चालीत संगीतबद्ध केले आहे संगीतकार कमलाकर भागवत यांनी आणि मधुर आवाजात गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी.
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात अतिशय गोड कविता/गाणे ‘आली बघ गाई गाई’.

कवीयत्री इंदिरा संत यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तु माझी माऊली
बालभारतीच्या शेवटच्या पानांवर संतांचे अभंग कायम वाचावायास मिळतात. संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, तुकडोजी महाराज आदी संतांचे अभंग वाचणे, त्यांचा अर्थ शिक्षक अथवा आईवडिलांडून समजून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शालेय जीवनातील अनुभवलेला एक संस्कारमय अध्याय. मनावरून न पुसले गेलेल्या संस्कारांची पाळेमुळे इथेच रुजली आहेत, हे बालभारतीचे आपल्यावरील फार मोठे उपकार म्हणावे लागेल.
आता वाचूया आणि ऐकूया संत नामदेवांनी रचलेला अभंग ‘तु माझी माऊली, मी वो तुझा तान्हा’. या अभंगास अतिशय गोड चाल लावून तितक्याच गोड आवाजात गायले आहे संगीतकार सुधीर फडके यांनी.
भक्तांचा प्रिय पाडुंरंग माझ्या पुढेमागे राहून माझा सांभाळ आणि पालनपोषण कसे करतो, याचे अतिशय हृद्य वर्णन संत नामदेवांनी या अभंगात केले आहे, ते ऐकतानाच आईचीच आठवण येते. संत नामदेवांना अभिप्रेत असलेला भाव सुधीर फडके यांनी आपल्या गोड आणि हळुवार आवाजात आणि मधुर चालीत उतरवलेला आहे, हे प्रत्येक शब्दात जाणवते.

https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-namdev-maharaj/
भेटीलागी जीवा लागलीसे आस
या भागातील शेवटचे गाणे आहे संत तुकाराम यांनी रचलेला ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ हा अभंग. वरील अभंगाप्रमाणेच ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी त्यांना विठ्ठल भेटीची आस कशी लागली आहे, याचे वर्णन चंद्र-चकोर, लेक-माहेर, बाळ-आई इत्यादी वेगवेगळी रूपके वापरून केलेले आहे. शेवटी तर लहान मुल भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत असते त्याप्रमाणे मी तुझी वाट पहात आहे, अशी विनवणी तुकाराम महाराज विठ्ठलाकडे करतात. हे सर्व वर्णन वाचणे हा अनुभव तुकाराम महाराजांबरोबरच आपल्यालाही भक्तीरसात बुडवतो.
ह्या अभंगाला संगीतबद्ध केले आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी. श्रीनिवास खळे यांना हा अभंग फारच आवडलेला दिसतो, कारण खळे काकांनी ह्या अभंगाला दोनवेळा संगीतबद्ध करून, दोन्ही वेळेस लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी अशा वेगवेगळ्या गायकांकडून गाऊन घेतलेले ऐकावयास मिळते. दोन्ही चाली मात्र अवघड आहेत. आणि दोन्ही गाण्यांचा अनुभव पण वेगळा आहे.
चला तर ह्या दोन्ही गाण्यांचा अनुभव घेवूयात, आजच्या शेवटच्या गाण्याने.

Source: Saregama Marathi
Source: www.jiosaavn.com/song/bheti-lagi-jiva-lagalise-aas/ADIoXhhGUnI
कवितेचा भावार्थ वाचण्यासाठी येथे क्लीक करा
https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-tukaram-maharaj/
<<– वाचा मागील भाग: बालभारतीच्या कवितेचे गाणी – भाग २
वाचा पुढील भाग: बालभारतीच्या कवितेचे गाणी – भाग ४ –>>
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.
लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
बालभारती कवितेचा आजचा हा ३रा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:
हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!
Acknowledgments:
- Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
- Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
- गाण्यांची यादी आणि अधिक माहिती – List and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
- Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
- संतांचे चरित्र: https://www.santsahitya.in/
- List of Songs: http://marathikavitagani.blogspot.com/
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
Discover more from माझी लेखमाला
Subscribe to get the latest posts sent to your email.


