बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5
लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे
बालभारतीच्या कवितेची गाणी यातील इयत्ता १ली ते ४थी मधील कविता आपण भाग १ ते ४ यात वाचल्या आणि ऐकल्या देखील. आजच्या भागात बालभारतीने वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील इयत्ता ५वी (प्रथमावृत्ती १९७०) मधील कवितेची गाणी ऐकणार आहोत.
पहिल्या भागातील प्रस्तावना वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!
मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.
मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.
पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.
याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).
ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!
आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.
[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]
भाग ५वा सुरु
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs – 5
घाल घाल पिंगा वाऱ्या
आजच्या भागातील, म्हणजे इयत्ता ५वी तील पहिली कविता आहे, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या …… ‘.
भावकवी म्हणून ओळखले जाणारे कवी कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब यांनी ही कविता लिहिली आहे. बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये प्रा. कृ. ब. निकुंब मराठीचे विभागप्रमुख होते. ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते, काव्यशास्त्र हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता तरी त्यांनी फार कमी कविता लिहिल्या आहेत.
त्यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात.’ हि कविता म्हणजे लग्नाला वर्ष झाले तरी माहेरी न जाता आलेल्या सासुरवाशिणीच्या मनातल्या भावना आहेत. तिला माहेरच्या घराची, आई-भावाची आठवण येते एवढेच नव्हेतर गोठ्यातील कपिला गाई आणि तिची कालवड नंदा, कपिलच्या दुधावरची साय अशा साऱ्या गोष्टी आठवून ती कासावीस होते, आणि ‘मला माहेराला घेवून कधी जाणार’ हे विचारून ये असा निरोप ती वाऱ्याला देते, अशा तऱ्हेने माहेराची ओढ कवींनी छान मांडली आहे.
हे गाणे जुन्या काळी आकाशवाणीवरून कानी पडले की घरोघरी माहेराची आठवण काढून सासुरवाशिणी रडायला सुरुवात करायच्या, इतकी प्रसिद्धी ह्या गाण्याने मिळविली आहे. केवळ स्त्रियांच नव्हे तर पुरुषांच्याही डोळ्यात पाणी आणणारे गाणे आहे हे. गाणे ऐकून संपले तरी देखील ते गाणे कवितेमधील वाऱ्याप्रमाणे मनात काही काळ पिंगा घालत राहते. पुस्तकात कविता वाचताना अंगणात बसून माहेरच्या दिशेला तोंड करून बसलेली सासुरवाशिणीचे चित्र प्रथम नजरेत भरायचे आणि कविता वाचण्याच्या अगोदरच एक वातावरण निर्मिती व्ह्यायची. चला तर आता पुन्हा खूप वर्षांनी तो अनुभव पुन्हा घेवूया.
ह्या कवितेला वेगवेगळ्या कालखंडात तीन वेगळ्या संगीतकारांनी तीन वेगळ्या गायिकांकडून गाऊन घेतले आहे. कालखंड वेगळा असल्याने तिन्ही गाण्याची चाल आणि गायकीतील फरक जाणवतो. आपल्यासाठी ही तिन्ही गाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. (इंटरनेटवर प्रथमच ही तिन्ही गाणी एकत्र ऐकावयास मिळत आहेत. ही गाणी मिळवून देण्याकरीता मला आपल्या सारख्या रसिक श्रोत्यांकडून खूप मदत झाली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद). गाण्याच्या प्रसिद्धीचे अचूक वर्ष माहीत नसल्याने गाण्यांचा काही विशिष्ट क्रम लावता आला नाहीय.
- पहिले गाणे आहे, बालभारतीने १९६५ मध्ये काढलेल्या ध्वनिमुद्रिकेवरील गाणे. गायिका आहेत फैयाज यानी मुले संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी. (इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध)
- दुसरे गाणे आहे, संगीतकार कमलाकर भागवत यांचे आणि मधुर आवाजात गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. हे गाणे जास्त प्रसिद्ध आहे.
- तिसरे गाणे आहे, जुन्या काळातील गायिका कालिंदी केसकर यांनी गायलेले आणि संगीत दिले आहे ए. पी. नारायणगावकर यांनी.


-‘

गाणे १ ले
गाणे २ रे
गाणे ३ रे
कवी प्रा. कृ. ब. निकुंब यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खबरदार जर टाच मारूनी
आजची दुसरी कविता आहे, खबरदार जर टाच मारुनी…’, कवीवर्य (डॉ.) प्रा. वामन भार्गव पाठक उर्फ कवी वा. भा. पाठक. कवी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी १९३३ मध्ये ‘आशा-गीत’ नावाचा स्वतःचा कविता संग्रह प्रसिद्ध केला. त्या कविता संग्रहातील हि एक कविता आहे.
“खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या” अशा झणझणीत इशाऱ्याच्या शब्दांनी सुरुवात झालेल्या या तडफदार काव्यांत चिमुकल्या सावळ्याच्या तेजस्वी स्वभावाचे व तिखट इमानाचे चित्र. रा. पाठक यांनी भरदार रंगात रंगविलेले आहे, असे आचार्य अत्रे यांनी ह्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे.
नुकतीच इयत्ता ४थी मध्ये ‘शिवछत्रपती’ ह्या पुस्तकात छत्रपतींच्या प्रेरणादायी इतिहासाची ओळख झालेली होतीच, तशातच इयत्ता पाचवीला ही कविता अभ्यासाला आली आणि अंगातून चैतन्याच्या लहरी धावू लागल्या, प्रत्येक विद्यार्थी स्वतःला छत्रपतींचा बालवीर सावळ्या समजू लागायचा. मग जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आणि तेथे आणि ह्या कवितेचे अभिनयासकट गायन करून दाखवायचे आणि धन्य धन्य व्ह्यायचे, असे वातावरण ह्या कवितेने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले. ‘कधी एकदा हातात भाला किंवा तलवार येते आणि समोर आलेल्या शत्रूची खांडोळी करून टाकतो’ असे स्फुरण मनात निर्माण व्ह्यायचे. त्यामुळे ह्या कवितेचा प्रभाव आजही लहान मोठयांवर कायम आहे.
मी परत येईपर्यंत या शिवेवरून तू कोणाही स्वारास जाऊ देवू नकोस’ ही शिवबापासून मोठ्या कष्टाने मिळवलेली कामगिरी सावळ्या बजावत आहे’, अशी कल्पना मांडून कवीने हि कविता रचली आहे.
आता वाचूया आणि ऐकूया ‘खबरदार जर टाच मारुनी… ‘ हे स्फूर्तिगीत. गायक आहेत अमेय पांचाळ, नंदेश उमप, ह्या गाण्यास सुंदर चाल लावणाऱ्या संगीतकाराचे नाव मात्र अज्ञात आहे.

(वरील गाण्याच्या संगीतकाराविषयी कोणास माहिती असेल तर कळवावे)
१९३३ मध्ये ‘आशा-गीत’ नावाच्या कविता संग्रहात प्रसिद्ध झालेल्या खबरदार जर टाच मारुनी…’, ह्या कवितेचे मूळ पान
माझ्या मराठीची गोडी
पुढील गाणे आहे, ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट’. कवी आहेत वि. म. कुलकर्णी.
मराठी भाषेतील कवी, बालकवी आणि साहित्यिक विनायक महादेव कुलकर्णी अर्थात वि. म. कुलकर्णी यांनी मराठीची भाषेची महती ‘माझ्या मराठीची गोडी’ ह्या कवितेत सांगितली आहे. संतांपासून शेतकऱ्यापर्यंत, शाहिरांपासून वीरांपर्यंत आणि भीमा, कृष्णा, गोदावरीच्या काठापासून चक्क माजघरातील जात्यापर्यंत सर्वांच्या आवडीची, प्रेमाची ही मराठी भाषा सर्वांना कायम मोहवीत आली आहे, असे वर्णन करून कवी त्या मराठी भाषेला चक्क एका सात्विक स्त्रीची उपमा देवून म्हणतात की, “हिचे स्वरुप देखणे, हिची चाल तडफेची, हिच्या नेत्री प्रभा दाटे, सात्विकाची, कांचनाची” तेव्हा तर मराठी भाषेची थोरवी आणि सौंदर्य अजूनच वाढते, आणि कवींनी म्हटल्याप्रमाणे आपली मान अभिमानाने उंचावते.
वि. म. कुलकर्णी यांच्या काही प्रसिद्ध कविता/गाणी:
- गाडी आली गाडी आली झुक झुक झुक …..
- आम्ही जवान देशाचे …..
- एक दिवस असा येतो …..
- लमाणांचा तांडा सावधान …..
- एक अश्रू …..
- ते अमर हुतात्मे झाले …..
- माझा उजळ उंबरा …..
वि. म. कुलकर्णी यांनी अनके कादंबऱ्या, कविता संग्रह लिहिले, लहान मुलांकरीता अनेक कविता आणि गाणी लिहिली. त्यांनी लिहिलेली ‘गाडी आली, गाडी आली, झुक झुक झुक …. ‘ ही कविता तर आजही प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक ग्रंथाचे संपादन केले आहे. १९४७ मध्ये त्यांच्या कथेवर ‘गरीबांचे राज्य’ नावाचा चित्रपट मा. छोटू अर्थात दत्तात्रय महाडिक (अभिनेते यशवंत दत्त यांचे वडील) यांनी चित्रपट काढला होता.
चला तर आता वाचूयात आणि ऐकूयात गाणे ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट’. संगीतकार आणि गायक आहेत कमलाकर भागवत आणि त्यांच्यासोबत इतर. मूळ कविता आठ कडव्यांची आहे, परंतु गाण्यात फक्त पहिली ५ कडवी वापरली आहेत. संगीतकार आणि गायक कमलाकर भागवत यांनी कवितेला खूपच गोड चाल लावली आणि गायले देखील खूपच गोड आवाजात, त्यामुळे ‘माझ्या मराठी’च्या गोडी इतकेच हे गाणे देखील गोड आणि अवीट झालेले आहे.

वि. म. कुलकर्णी यांच्याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदैव सैनिका पुढेच जायचे
लहानपणी शाळेत असताना स्वतंत्र भारताचे चीन आणि पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाच्या कथा ऐकावयास आणि वाचावयास मिळत असत. त्यातील भारतीय सैनिकांचा पराक्रम ऐकून सैनिकांचा अभिमान वाटायचा. अशा काळात ‘सदैव सैनिका पुढेच जायचे…’ हे स्फुर्तीगीत वाचल्यावर तर सैनिकांविषयीचा अभिमान आणि आदर अजून वाढला आणि इवलीशी छाती फुगून यायची. काही मुलांना त्याकाळी वाढदिवसाला सैनिकांचा पोशाख भेट म्हणून मिळत असे. ती मुले हातात लुटुपुटीची बंदूक किंवा काठी घेवून ‘सदैव सैनिका पुढेच जायचे…’ ह्या गाण्यावर कवायत केल्यासारखे पाय आपटत गाणे म्हणून दाखवायचे.
कविवर्य वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. त्यामुळे कविवर्य तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. १९४२च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत त्यांनी तुरुंगवास भोगला. त्यामुळे स्फूतिगीते, देशभक्तिपर गीते, पोवाडे, प्रार्थना अशा विविध विषयांवर त्यांनी कविता रचल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘उंबरठा’ सिनेमातील ‘गगन सदन तेजोमय’ ह्या गीताला तर प्रार्थनागीताचा मान मिळाला. त्यांनी वर्ष १९८३ ते वर्ष १९८८ पर्यंत ‘साधना’ नियतकालिकाचे संपादकपद भूषविले. तसेच वर्ष १९९९ मधील ७२व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
वसंत बापट यांच्या गाजलेल्या कविता
गगन सदय तेजोमय ……
आभाळाची आम्ही लेकरे ……
सैन्य चालले पुढे ……
उत्तुंग आमुची उत्तर सीमा ……
देह मंदिर चित्त मंदिर ……
केवळ माझा सह्यकडा ……
शतकानंतर आज पाहिली ……
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेले एक स्फूर्तिगीत, “सदैव सैनिका पुढेच जायचे”, गायले आहे कुंदा बोकिल, दशरथ पुजारी आणि आकाशवाणी गायकवृंद, संगीतबद्ध केले आहे राम वाढावकर यांनी. (बालभारतीने ध्वनिमुद्रित केलेल्या आणि फ़ैयाज आणि इतर गायकांनी गायलेले आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या गाण्याची प्रत आता सापडत नाहीय, पण लवकरच आम्ही ती उपलब्ध करून देवू अशी आशा आहे.)



प्रा. वसंत बापट यांच्याविषयीचे अन्य लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमुची माळियाची जात
नेहमी प्रमाणेच आजच्या भागाचा शेवट अभंगवाणीने करणार आहोत. आजच्या अभंगाची रचना केली आहे संत सावता माळी यांनी. वर्ष १९४४ मध्ये चित्रमहर्षी व्ही. शातांराम यांनी निर्मिती केलेल्या “भक्तीचा मळा” ह्या चित्रपटात हा अभंग वापरला आहे. त्याचे गायक आणि संगीतकार आहेत मास्टर कृष्णराव (फुलंब्ररीकर).
चला तर ह्या भागातील शेवटचे गाणे वाचूया आणि ऐकूयात.

पुढच्या भागात वाचा आणि ऐका इयत्ता ६वी आणि ७वी च्या कवितेची गाणी: – Balbharati Poem Songs
आनंदी आनंद गडे ……
या झोपडीत माझ्या ……
गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या ……
गवतफुला रे गवतफुला ……
आणि अन्य कवितेची गाणी…
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी- Balbharati Poem Songs
मागील भाग वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा:
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.
लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
बालभारती कवितेचा आजचा हा ५ वा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:
हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!
Acknowledgments:
- Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
- Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
- गाण्यांची यादी आणि अधिक माहिती – List and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
- Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
- संतांचे चरित्र: https://www.santsahitya.in/
- List of Songs: http://marathikavitagani.blogspot.com/
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.
आमचे इतर लेख वाचा
