बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था: इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4
लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे
बालभारतीच्या कवितेची गाणी यातील इयत्ता १ली ते ३री मधील कविता आपण भाग १ ते ३ यात वाचल्या आणि ऐकल्या देखील. आजच्या भागात बालभारतीने वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील इयत्ता ४थी (प्रथमावृत्ती १९७०) मधील कवितेची गाणी ऐकणार आहोत.
पहिल्या भागातील प्रस्तावना वाचण्यासाठी येथे क्लिक करा:
लहानपणीचा काळ किती सुखाचा असतो, हे आपण सर्वांनीच अनुभवलेले आहे. लहान असताना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा यांच्याकडून लाड पुरवून घेण्याचे ते दिवस. आपल्याला खेळवताना त्यांनी आपल्यासाठी गायलेले बडबडगीत, झोपवताना गायलेले अंगाईगीत अशा गाण्यांनी आपल्यावर बालपणीच गाण्यांचे संस्कार झालेले आहेत. त्यावर कळस म्हणजे शाळेत गेल्यावर पहिलीपासून वाचलेल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता आणि गाणी!
मराठी माध्यमातून जे शिकले आहेत त्यांनी हा अनुभव नक्कीच घेतला आहे.
मराठी वाड्मय किती प्रगल्भ आहे, हे त्या कविता पुन्हा वाचताना आता जाणवते. विविध कवींनी आपले वैविध्य राखत वेगवेगळया विषयांवर लिहिलेली बालगीते किंवा कविता बालभारतीच्या पुस्तकांत वाचावयास मिळतात. या कवितेला बाईंनी छान चाल लावलेली असायची, त्यावर आपण त्या कवितेचे रूपांतर गाण्यात करून गात असू.
पण आपणास ठाऊक आहे का? आपल्या आवडीच्या बऱ्याच कवितेची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत असत. त्या काळाच्या अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी ह्या कविता सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून त्याचे गाण्यात रूपांतर करून आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत हे बहुसंख्य लोकांना ठाऊक नाही. ‘मामाच्या गावाला जाऊ या’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी काही चित्रपटात वापरलेली गाणी सोडली तर ह्या कवितेची गाणी आपण ऐकलेली नसायाची, किंवा विसरून गेलो असू.
याबरोबरच आश्चर्याची अन न भूतो न भविष्यती अशी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे अर्थात ‘बालभारती’ यांनी १९६५ साली इयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येकी २ कविता/गाणी घेवून त्यावर चक्क ध्वनीमुद्रिका काढलेल्या होत्या. (त्यातील ६वी च्या गाण्यांची ध्वनीमुद्रिका सापडत नाही).
ईयत्ता १ ली ७ वी पर्यंतच्या बालभारतीच्या विविध आवृत्यांमध्ये तशी एकूण ३० हून अधिक गाणी सापडली आहेत. त्यातही बरीच गाणी आज घडीला कुठेच उपलब्ध नाहीत. हि गाणी यापुढे अशीच दुर्लक्षित न राहता हा ठेवा भावी पिढीकरीता जतन करून ठेवावा ह्यासाठी हा प्रपंच!
आजच्या या भागात आपण ईयत्ता १ली ते २री च्या बालभारतीच्या पुस्तकांत असलेल्या काही कविता गाण्यांच्या रुपात ऐकूयात, सोबतच त्या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. या गाण्यांबरोबरच ध्वनीमुद्रिकेच्या मुखपृष्ठाचे आणि ध्वनीमुद्रिकेचे छायाचित्रे, कवींची थोडक्यात माहिती, पुस्तकातील कवितेच्या पानाचे छायाचित्र इत्यादी देवून लेख अधिक आकर्षक तर केलाच आहे, शिवाय गाणे हि ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. यातील बरीच गाणी हि १९५३ ते १९७० या कालावधीत प्रसिद्ध झालेली आहेत. पण काही गाणी मात्र १९९० च्या दशकानंतर तयार झाली आहेत.
[या लेखमालिकेकरिता घेतलेल्या कविता /गाणी ह्या बालभारतीने इयत्ता १ली ते ७वी करीता वर्ष १९६८ ते १९७० दरम्यान प्रसिद्ध झालेल्या १ल्या मालिकेतील मराठीच्या पुस्तकातील आहेत. त्यानंतर साधारण वर्ष १९७६ पासून २ऱ्या मालिकेतील पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामुळे १ल्या मालिकेतील कविता आणि गाणी २ऱ्या मालिकेतील वेगवेगळ्या इयत्तेमध्ये आढळून येतील.]
भाग ४था सुरु
बालभारतीच्या कवितेची गाणी – इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs – 4
या बालांनो सारे या
आजची पहिली कविता आहे, गेल्या शतकातील कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांनी लिहिलेली कविता – ‘या बालांनो सारे या’.
कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांच्याविषयीची भाग ३ मध्ये लिहिलेली अधिक माहिती वाचा
गेल्या शतकातील कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे! ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ म्हणून राहिलेल्या भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक समजले जाते. साधारण १९२० मध्ये त्यांचा कविता संग्रह ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या नावाने (प्रथम आवृत्ती) प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतेक कविता ह्या नव्वद ते शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. पण त्यातील सौंदर्य मात्र आजही ताजेतवाने आहे. त्यांच्या कवितेचे स्वरूप हे भावगीतांचे राहिले आहे, त्यांनी लिहिलेल्या असंख्य कविता रेडिओवर भावगीतांच्या रूपात ऐकायला मिळतात. भा. रा. तांबे यांच्या कविता किती गेय आहेत, हे त्या कवितेला लावलेल्या चालींनी कळून येते.
त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध कविता/गाणी खालीलप्रमाणे:
- कशी काळ नागिणी
- कळा ज्या लागल्या जीवा
- जन पळभर म्हणतील हाय हाय
- तिनी सांजा सखे मिळाल्या
- तुझ्या गळा माझ्या गळा
- ते दूध तुझ्या त्या
- निजल्या तान्ह्यावरी माउली
- या बाळांनो या रे या
- रे हिंदबांधवा थांब
राजकवी कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांना इंग्रजी शिक्षणाची आवड होती. शाळेत असल्यापासून इंग्रजी कवितांचे भाषांतर करण्याचा त्यांना छंद होता. त्यांची ही आवड आणि त्यांच्या बुद्धीचा आवाका पाहून मध्यप्रदेश मधील देवासचे लेलेमास्तर यांनी कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे यांना विविध भाषांचे शिक्षणाबरोबरच साहित्यशास्त्र आणि वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना दिले. आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यास मदत केली. लेले यांनी कविवर्यांना विविध विषयांवरचे उपयोगी ग्रंथ व पुस्तके यांची माहिती देऊन त्यांचे ज्ञानभंडार समृद्ध केले.
कविवर्यांनी वयाच्या साधारण २२व्या वर्षी (साधारण १८९५ मध्ये) इंग्रजीतील महान कवी ‘रॉबर्ट ब्राउनिंग’ यांनी १८४२ मध्ये लिहिलेल्या ‘पाईड पायपर (Pied Piper)’ या सुप्रसिद्ध इंग्रजी कवितेचे मराठीत रूपांतर केले. एकूण ११० कडव्यांची ही कविता आहे. त्या मराठी कवितेतील ९१, ९२ आणि ९३ क्रमांकाची कडवी म्हणजेच आपली आजची आपली पहिली कविता ‘या बालांनो सारे या’. (संदर्भ: ‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’,तिसरी आवृत्ती १९४५.) मूळ मराठी कवितेचे नाव आहे ‘पुंगीवाला‘. पुस्तकाची एकूण १२ पाने ह्या एकट्या कवितेने व्यापली आहेत.
नगरात उंदीर फार झाले. त्यावर काही उपाय सुचत नाही. तेंव्हा आपल्या बासरीच्या/पुंगीच्या नादाने उंदरांना पळवणारा एक जादूगर आहे. त्याला बोलावले तर हे उंदीर तो आपल्यामागे घेवून जाईल असे समजते. तेंव्हा गाव प्रमुख त्या जादूगाराला बोलावून आणतात. तो पुंगी वाजवून सगळे उंदीर आपल्या मागोमाग घेवून जातो. नदीच्या काठावर जो जातो आणि त्याच्या इशार्यावर सर्व उंदीर नदीत उडी मारतात. मग हा जादूगार आपली बिदागी गावाला मागतो. त्याने मागितलेली रक्कम देण्यास गाव कां कू करते. उंदीर तर मेले आता कशाला याला पैसे द्यायचे. हे समजल्यावर तो जादूगर रागाने निघून जातो पण जाताना आपल्या पुंगीच्या नादात गावातील सगळ्या मुलांना मोहित करून घेवून जातो. अशी ही कथा आहे ह्या कवितेची. कविवर्यांनी मूळ कविता मराठीत आणताना महेश्वर हे अहिल्याबाईंचे राजधानीचे किल्ला मंदिरे नदीवरील घाट असलेले सुंदर शहर, खळखळा वाहणारी नर्मदा नदी असे सगळे संदर्भ घेतले आहेत. ‘या बालांनो सारे या’ ही या कवितेतील हा छोटासा तुकडा आहे. (संदर्भ: https://shriumrikar.blogspot.com/2020/07/blog-post_8.html?m=1).
बालभारतीच्या पुस्तकात या कवितेच्या पानावर फार मोहक रंगीत चित्र छापलेले असायचे, ते चित्र पाहत कविता वाचताना त्या जादूगाराबरोबर ‘या नगराला लागुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया’ ची सफर पूर्ण व्हायची.
चला तर आता वाचू आणि ऐकूया लहान मुलांना एका वेगळ्या भावविश्वात नेणारी कविता ‘या बालांनो सारे या’. चला तर ऐकूया आजच्या भागातील कवितेच्या गाण्याचे प्रथम गाणे, आणि परत घेऊयात ४थीच्या वर्गातील आनंद! आपल्या बरोबर नवीन पिढीला हा ठेवा दाखवावा आणि ऐकवावा!



गाणे ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा:
ह्या कवितेचे रसग्रहण आणि अधिक माहिती वाचण्याकरीता येथे क्लिक करा
ह्या गाण्याची एक गंमत: ह्या कवितेत जादूगर पुंगी वाजवून मुलांना मोहित करून नगराबाहेर नेतो, त्याचप्रमाणे हा जादूगर पुंगी वाजवून नगरातील सर्व उंदरांना शहराबाहेर नेतो असे वर्णन ह्या मूळ कवितेत आहे, ते वर्णन (कडवी क्रमांक ४६ आणि ४७) अगदी वरील कवितेप्रमाणे त्याच तालासुरात केलेले आहे. इथे कविवर्यांच्या प्रतिभेचे दर्शन होते. जिज्ञासूंनी ती दोन कडवी वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.
या उंदरांनो ! या रे या !
सहपरिवारचि सारे या !
मजा करा रे ! मजा मजा !
आज दिवस तुमचा समजा.
दूध, दही,
तूप, मही,
मधुर फळें
घ्या सगळे !
या ! बाजार भरे दुनिया,
घ्याच हवें तें चाखुनिया.
या उंदरांनो, या रे या !
सहपरिवारचि सारे या ! ||४६||
मालटाल या रे उडुं द्या,
घडि न आजची परत उद्यां;
भले बहाद्दर ! खूप भिडा !
हवे तसे या, तुटुनि पडा !
आहारीं,
व्यवहारीं,
भीड नको.
भीति नको.
तर मग चंगळ उडवुनि द्या,
टंगळमंगळ सोडुनि द्या !
या उंदरांनो, या रे या !
सहपरिवारचि सारे या ! ||४७||
सुगी – देवाचं देणं हे (गाणे उपलब्ध नाही)
ह्या गाण्याचे कवी आहेत जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध बहुरंगी कथालेखक, ग्रामीण कादंबरीकार ग. ल. ठोकळ अर्थात गजानन लक्ष्मण ठोकळ. त्यांनी मराठी कवितेला ग्रामीण साज चढविला. त्यांच्या अगोदर देखील ग्रामीण कविता लिहिल्या जायच्या पण ग. ल. ठोकळ ग्रामीण कविता ह्या गावाकडच्या बोलीभाषेत आणल्या.
स्वत:च्या ‘श्री लेखन वाचन भंडार’ या प्रकाशन संस्थेद्वारे वर्ष १९३३-३४ मध्ये मराठी भाषेतील प्रथम ग्रामीण कविताचा संग्रह प्रकाशित करण्याचा मान त्यांना जातो. त्यांनी ४०० हून अधिक मौलिक ग्रंथ स्वतःच्या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केले आहेत. ठोकळ गोष्टी (५ भाग) हा त्यांचा ग्रामीण कथांचा संग्रह प्रसिद्धच आहे.
ग. ल. ठोकळ यांनी लिहिलेली काही प्रसिध्द पुस्तके खालीलप्रमाणे:
- कोंदण
- गावगुंड
- मत्स्यकन्या
- मीठभाकर
- टेंभा
- ठिणगी
- ठोकळ गोष्टी ( ५ भाग)
- क्षितिजाच्या पलीकडे
त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध कविता खालीलप्रमाणे:
- पऱ्यांचे गाणे
- भिकारीण
- गढी
- जात्यावरचं गाणं
- गरिबीचा पाहुणचार
- गरिबीचा सौंसार
त्यांनी यांच्या कथेवर प्रदर्शित झालेले चित्रपट:
- प्रीतिसंगम
- गावगुंड
- सोन्याची लंका
चित्रपट कथा लिहिण्याबरोबरच ग. ल. ठोकळ यांनी पटकथा, संवाद, गीतलेखन अशा विविध आघाड्यांवर काम केले आहे.
चला तर आता वाचूया आणि ऐकूयात ग. ल. ठोकळ यांची प्रसिद्ध कविता, ‘सुगी – देवाचं देणं हे’. शेतातील पिके तयार झाल्यावर सुगीच्या दिवसात पिके कापणीला आली की, शेतकरी पुन्हा कामाला लागतो. शेतकरी एकमेकांना मदतीने कापणी, मोडणी, मळणी अशा विविध प्रकीया पार पाडून शेतातील सोन घरी आणतो, त्यावेळेस शेतकऱ्याला होणाऱ्या आनंदाचे वर्णन ह्या कवितेत कवीने मांडले आहे. चला तर शेतकऱ्याबरोबर आपणही आनंद घेऊन थोडा वानोळा लुटुया.
कवितेचे गाण्यात रूपांतर केले आहे संगीतकार वसंत देसाई यांनी, गायले आहे प्रभाकर, जैसवाल, जयवंत, फैयाज आणि मुले यांनी.



(दुर्देवाने ह्या गाण्याची ध्वनिफीत अथवा ऑडिओ मला आता मिळत नाहीय, परंतु हे गाणे मी नुकतेच कुठेतरी ऐकले आहे असे मला वाटते. कुणा वाचकाकडे जर हे गाणे उपलब्ध असेल तर मला तसे कळवावे, हि विनंती. हे गाणे नक्कीच सापडणार म्हणून बाकीची माहिती तयार ठेवली आहे.)
मला आवडते वाट वळणाची
ह्या कवितेचे कवी आहेत ‘कवी अनिल‘ ह्या टोपण नावाने काव्य करणारे कवी आत्माराम रावजी देशपांडे. कवी अनिल यांनी मराठी भाषेत ‘मुक्तछंद‘ ह्या काव्यप्रकाराचा सर्वप्रथम वापर केला. तसेच १० ओळींची ‘दशपदी‘ कविता, हा काव्यप्रकार देखील कवी अनिलांनी सुरू केला. ‘कवी अनिल’ यांनी १९५८ मध्ये मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
कवि अनिलांच्या काही प्रसिद्ध कविता/गाणी खालीलप्रमाणे:
- अजुनी रुसून आहे
- केळीचे सुकले बाग
- थकले डोळे माझे
- वाटेवर काटे वेचीत चाललो
गावाबाहेर जाणाऱ्या अनेक वाटा गावातून आणि गावाबाहेर दिसतात, ह्या वाटांकडे पाहून लहान मुलांना एक वेगळाच आनंद मिळतो आणि त्या त्या वाटेवर आढळणाऱ्या दृष्याकडे पाहता मुले आपलय भावविश्वात कशी रंगतात आणि त्यांना सर्वच वाटा कशा सुंदर दिसतात याचे भाववर्णन कवी अनिलांनी या कवितेत कसे केले आहे तेच आता वाचूया आणि ऐकूयात ‘मला आवडते वाट वळणाची’ ह्या कवितेमधून, गायक आहेत अजय गोगावले आणि संगीतकार आहेत आनंद मोडक.

१९५१ मध्ये हेच गाणे सुप्रसिद्ध संगीतकार ‘पद्मभूषण पं. श्रीनिवास खळे’ यांनी गायिका सुधा माडगांवकरांच्या आवाजात गाणे ध्वनिमुद्रित केलेलं आहे, खळे काकांचे हे पहिले ध्वनिमुद्रित गाणे आहे. दुर्दैवाने आज ते गाणे कुठेचं सापडत नाही, कुणा रसिक वाचकाकडे असेल तर तसे आम्हाला कळवावे, म्हणजे हा ठेवा अन्य श्रोत्यांपुढे आपण ठेवू शकू.
कवि अनिलांच्या काही प्रसिद्ध गाण्यांविषयीच्या कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा:
- ‘रुसवा’ कवितेचे गाणे ‘अजूनी रुसुन आहे’ आणि त्याची गोष्ट
- कवी अनिलांची पहिली दशपदी
- ‘कुणी जाल का.. सांगाल का’ ह्या कवितेची गोष्ट
- कवी अनिलांच्या मुक्तछंद आणि दशपदी काव्य प्रकाराची समीक्षा
धन्य आजि दिन, झाले संतांचे दर्शन
बालभारतीच्या पुस्तकाचे शेवटचे पान म्हणजे अर्थातच विविध संतांच्या अभंगाचे पान. भक्तिरसात रंगायची सवय हि लहानपणापासूनच बालभारतीच्या शेवटच्या एक-दोन पानांवरील अभंगामुळेच लागली. ते संस्कार आजही आपल्या मनावर कायम आहेत.
आजची शेवटची कविता आणि त्याचे गाणे आहे, ‘धन्य आजि दिन, झालेले संताचे दर्शन’. संताचे दर्शन झाल्यावर काय अनुभव मिळतो, हे संत तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात लिहिले आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या खास शैलीत अभंग गायला आहे आणि त्यास सुंदर चाल लावली आहे संगीतकार श्रीनिवास जोशी यांनी. आपल्या रसिकांच्या दुर्दैवयाने ह्या गाण्यात अभंगाचे एकाच कडवे उपलब्ध ध्वनिमुद्रीत झालेले आहे.
चला तर वाचूया आणि ऐकूया ‘धन्य आज दिन’.

पुढच्या भागात वाचा आणि ऐका ईयत्ता ५वीच्या कवितेची गाणी: – Balbharati Poem Songs
घाल घाल पिंगा वाऱ्या ……
खबरदार जर टाच मारूनी ……
माझ्या मराठीची गोडी ……
आणि अन्य कवितेची गाणी…
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs
बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs
मागील भाग वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा
ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.
लेखनाचे सर्वाधिकार: लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८
बालभारती कवितेचा आजचा हा ४था भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.
Balbharati Poem Songs हा लेख आपल्या मित्रमंडळींना सामायिक (Share) करा:
हा लेख लिहिण्याकरीता बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!
Acknowledgments:
- Vinyl Record Cover Images of Marathi Songs – Balbharati are taken from https://www.discogs.com/; Specially Manufactured by – The Gramophone Company Of India Ltd. For – Maharashtra State Bureau of Text Book Production, Pune.
- Vinyl Record Cover Images Contributor: Mr. Gawaskar (More details not found).
- गाण्यांची यादी आणि अधिक माहिती – List and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
- Images and List of Songs: https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- बालभारतीची जुनी पुस्तके डाउनलोड करण्याकरिताची लिंक (Download link of Balbharati Books): https://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx
- List of Songs: https://balbharatikavita.blogspot.com/
- संतांचे चरित्र: https://www.santsahitya.in/
- List of Songs: http://marathikavitagani.blogspot.com/
DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.
अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.
आमचे इतर लेख वाचा

Related Posts

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs – 6

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

One Comment