अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

Old Marathi Songs

अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

लेखन आणि संकलन: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे

गेल्या भागात आपण कवीवर्य भा. रा. तांबे, गायिका स्वर्गीय लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या त्रिकूटाने सादर केलेली अतिशय अवीट आणि गोड अशी ६ भावगीते ऐकण्याचा आनंद घेतलाच, शिवाय त्या गाण्यांविषयी आणि कवीवर्य भा. रा. तांबे तसेच संगीतकार वसंत प्रभू यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली.

आज आपण मराठी भावगीतांच्या सुवर्णकाळातील अजून एक नवीन त्रिकुट, कवीवर्य भा. रा. तांबे, गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावगीतांविषयी जाणून घेणार आहोत. संगीतकार वसंत प्रभू यांच्याप्रमाणेच संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि लतादीदी यांनी गायलेली कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेची गाणीही तितकीच श्रवणीय तर आहेतच पण हृदयनाथ यांच्या अनवट (अनवट म्हणजे खूप वेगळा, अनवट म्हणजे सहजी वापरात नसलेले राग किंवा गाण्याच्या चाली…), अवघड चालीत वेगळे रुप दिलेल्या कवितेला लतादीदींनी तितक्याच अनवट आणि अवघड सुरांत गायले आहे. भावगीतात अपेक्षित असलेले शब्द, सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल (सोपी किंवा अवघड) ही भावगीताचे वैशिष्ट्य आहेत.

लतादीदींच्या दुःखद निधनाची वाईट बातमी काल सकाळी प्रसिद्ध झाली आणि श्रद्धांजली म्हणून ह्या लेखाद्वारे मी त्यांना माझी शब्दांजली अर्पण करीत आहे. खरे तर लतादीदींना आता स्वर्गीय लतादीदी असे संबोधावे लागते हे वेदनाकारक आहे, परंतु त्यांचा उल्लेख स्वर्गीय असा करणे मी टाळले आहे, कारण त्या अमर आहेत, त्यांची आठवण आणि सहवास हा त्यांच्या गाण्याद्वारे आपणास कायम मिळणार आहे. त्यांनी शरीराचा त्याग केला पण त्यांचा आवाज मात्र कायम आपल्या आयुष्यातील सुखदु:खाच्या प्रत्येक प्रसंगी आपल्यासोबत असणार आहेच. खरे तर ‘लता’ असा एकेरी उल्लेख त्यांचा आपण करतो, कारण ‘लता मंगेशकर’ ह्या नावाच्या स्वराची ओळख आपल्याला पाळण्यात असल्यापासूनच झालेली आहे. त्यामुळे ‘लता’ ही आपल्याला कधीच परकी वाटली नाही. आईनंतरची आपल्या आयुष्यातील आवडती आणि आदरणीय स्त्री असेल तर ती ‘लता’च! जिची बालगीते ऐकत आपण मोठे झालो, तरुणपणी प्रेमगीते ऐकली, प्रौढपणी आयुष्यातील कडू-गोड अनुभव जिच्या गाण्यांतून अनुभवले, वृद्धापकाळी जिच्या स्वरातून संत-महात्म्यांची वाणी ऐकली, अशी ती ‘लता’ कायमच आपल्याबरोबर होती आणि राहणार आहेच. भविष्यात ह्या जगात आपण नसू पण ‘लता’ मात्र तिच्या स्वरांनी इथेच असणार आहे. पुराणातल्या ‘सप्तचिरंजीव’ ह्या शब्दात बदल करून आता ‘अष्टचिरंजीव’ हा शब्दप्रयोग आता सुरू करावा आणि त्यात आठवे नांव असावे ‘लता मंगेशकर’! असो, ‘लता’ विषयी जेवढे लिहायला जातो तेवढे जास्त अश्रू वाहू लागतात. तेंव्हा एवढेच पुरे!

आजच्या लेखातील पहिले भावगीत आता आपण ऐकूयात.

नवीन वाचकांसाठी मागील भागातील प्रस्तावना

मराठी चित्रपटांतील गाण्यांबरोबरच मराठी भावगीतेही खूप लोकप्रिय आहेत, किंबहुना मराठी भावगीतांचे स्थान हे चित्रपटांतील गाण्यांपेक्षा वरचे आहे.

मानवी स्वभावातील विविध रस आणि भावना मनाला हळुवार स्पर्शातून व्यक्त करणारे शब्द आणि गेयता यांच्या सुंदर संयोगाने भावगीत तयार होते. ह्या गीतास साधी -सोपी आणि सहज गुणगुणता येईल व मनात घर करून राहील अशी चाल हे भावगीताचे वैशिष्ट्य आहे.

सुमारे ९६ वर्षांपूर्वी एप्रिल १९२६ मध्ये राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांच्या एकूण १९ कडव्यांच्या कवितेचे गाण्यात रुपांतर करून त्याकाळचे रंगभूमीवरील अभिनेते-गायक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला….’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती नुकतीच अभ्यास व संशोधनातून समोर आली आहे. तिथून पुढे जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे या दिग्गज मंडळींनी मराठी भावसंगीताच्या वाढीसाठी खूप मोलाचे योगदान दिले आहे. ह्या भावगीतांकरीता काही नवीन कवी लेखन करीत होतेच, परंतु अनेक जुन्या कवींच्या रचना चालबध्द करुन नवीन भावगीते बनवीन्याची मोठी लाटच ५०च्या दशकात निर्माण झाली आणि ती पुढील दोन दशके टिकली. आता ती लाट ओसरलीआहे. ५०च्या दशकात लतादीदींचा उदय झाल्यांनतर तर ह्या भावगीतांनी उचल घेतली, लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाचा सुरेख उपयोग करून घेत नवीन-जुन्या पिढीतल्या संगीतकारांनी अतिशय गोड, अवीट आणि अविस्मरणीय भावगीतांना जन्म दिला. एकाहून एक अशी सुरेख काव्ये, लतादीदींचा स्वर्गीय आवाज आणि अतिशय गोड चालीत स्वरबद्ध झालेली ही गाणी आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव आणि आनंद देतात. या लेखाद्वारे नवीन पिढीपुढे हा ठेवा मी पुन्हा उलगडून दाखवित आहे.

या कवितेत कवीवर्यांनी जीवनात येणाऱ्या एका कटू पण वास्तवाची वेदना मांडली आहे, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या काव्यातील करूण रसाकरीता राग मारवाच्या स्वरांचा पूरक उपयोग केला आहे, (संदर्भ: शैलेश दामले यांचा फेसबुकवरील लेख –https://www.facebook.com/groups/1279359818773320/user/543116406). लतादीदींनी या करुण रसाला न्याय देवून अतियश सुरेल स्वरात हे गाणे गायले आहे, की त्यामुळे कवितेतील वेदना आपल्याला प्रत्यक्ष जाणवते. गाण्याची चाल मात्र अतिशय अवघड आहे, जिथे जिथे चालीत गाणे शक्य नाही, तिथे तिथे लतादीदींनी आपल्या कौशल्याने स्वरांना वळण दिले आहे असे मला वाटते.

Old Marathi Songs
Old Marathi Songs
'राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकातील कवितेचे पान
‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकातील कवितेचे पान, पुस्तकाची लिंक खाली दिली आहे.
गाणे: मावळत्या दिनकरा (प्रथम ध्वनिमुद्रण: १९६४), कवी: भा. रा. तांबे (रचना: लष्कर-ग्वाल्हेर, दि. ०३/१०/१९३५), गायिका: लता मंगेशकर, संगीत: हृदयनाथ मंगेशकर

भा. रा. तांबे, लता आणि हृदयनाथ मंगेशकर

मागच्या भागातील राजकवि भास्कर रामचंद्र तांबे यांच्याविषयीची अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या शतकातील कविवर्य भास्कर रामचंद्र तांबे! ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ म्हणून राहिलेल्या भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक समजले जाते. साधारण १९२० मध्ये त्यांचा कविता संग्रह राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या नावाने (प्रथम आवृत्ती) प्रकाशित झाला. भास्कररावांच्या प्रत्येक कवितेखाली ती त्यांनी कविता कोठे आणि कधी लिहिली म्हणजे स्थान आणि दिनांक याचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांची कविता कशी फुलली हे अभ्यासू जाणून घेवू शकतात. त्यांच्या बहुतेक कविता ह्या नव्वद ते शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. पण त्यातील सौंदर्य मात्र आजही ताजेतवाने आहे. त्यांच्या कवितेचे स्वरूप हे भावगीतांचे राहिले आहे, त्यांनी लिहिलेल्या असंख्य कविता रेडिओवर भावगीतांच्या रूपात ऐकायला मिळतात. भा. रा. तांबे यांच्या कविता किती गेय आहेत, हे त्या कवितेला लावलेल्या चालींनी कळून येते.

त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध कविता/गाणी खालीलप्रमाणे:

  • कळा ज्या लागल्या जेव्हा
  • डोळे ही जुलमी गडे
  • तुझ्या गळा, माझ्या गळा
  • जन पळभर म्हणतील
  • ते दूध तुझ्या त्या घटातले
  • निजल्या तान्ह्यावरी माऊली
  • या बाळांनो या रे या
  • रे हिंदबांधवा थांब
  • मरणात खरोखर जग जगतें

भास्कर रामचंद्र तांबे यांनी विविध धार्मिक ग्रंथांबरोबरच रुद्र व वेदपठणाचा अभ्यास केला होता. त्यांना इंग्रजीची आवड होती. तसेच त्यांनी संस्कृत आणि ऊर्दू भाषाही शिकून घेतली होती. त्यांनी संस्कृत आणि हिंदी भाषेतही काव्यरचा केली आहे. भास्कररावांना नारायण भगवान या गायकाकडून संगीतातील शास्त्रीय रागांचे ज्ञान मिळाले. ह्याचा वापर त्यांनी कविता लिहिताना केला. काव्य व संगीत एकमेकांस पूरक आहेत, असे ते मानत. गायनातील नोटेशन्सचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांची कविता सुरांसकट जन्माला येते. संगीताचा प्रभाव त्यांच्यावर जाणवतो. भास्करावांनी त्यांच्या बऱ्याच कवितेची जाती आणि राग कुठला आहे हे देखिल कवितेबरोबर लिहून ठेवल्याचे दिसते. म्हणूनच मघाशी म्हटल्याप्रमाणे तांबे यांच्या कविता ह्या गेय आहेत. रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांना लिहिलेल्या पत्रात भास्कररावांनी स्वतःच्या कवितेच्या रचनेमागचे रहस्य उलगडून दाखविले आहे.

त्यांनी लिहिले आहे कि, ‘कित्येक ठिकाणी सोळा मात्रांच्या जागी मी चौदा मात्राच ठेविल्या आहेत. त्या का? तेथे संगीत कलेचा संबंध येतो. ….संगीताचा आणि काव्याचा किती निकट संबंध आहे, आणि संगीतामुळे काव्यातील भावना किती उठावदार होतात, आणि या दोन जुळ्या बहिणी कला एकमेकींस भेटल्या व खेळीमेळीने सहकार्य करू लागल्या, तर ह्या दुःखमय पृथ्वीवर स्वर्गलोक कसा भरभर उतरून येतो, हे मी तुम्हांला सप्रयोग सिद्ध करून दाखविले असते.’

(१३/४/१९३५, संदर्भ: सह्याद्री, फेब्रुवारी १९४२, – डॉ. आशा सावदेकर यांनी लिहिलेल्या लेखातून साभार).

‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपण राजकवी भा. रा. तांबे यांच्याविषयी माहिती वाचली आहे. आता जाणून घेऊयात ह्या गाण्यांचे संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांच्याविषयी.

त्यापूर्वी ऐकूयात आजच्या लेखातील दुसरे गाणे!

Old Marathi Songs
Old Marathi Songs
WhatsApp Image 2022 02 03 at 10.45.17 PM
‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकातील कवितेचे पान, पुस्तकाची लिंक लेखात दिली आहे.
गाणे: तिनी सांजा सखे मिळाल्या (प्रथम ध्वनिमुद्रण: १९६७), कवी: भा. रा. तांबे (रचना: इंदूर, दि. १८/०७/१९०२), गायिका: लता मंगेशकर, संगीत: हृदयनाथ मंगेशकर

वरील ‘तिनी सांजा सखे मिळाल्या’ ह्या गाण्याचे १९७७ साली बंगालीत भाषांतरीत करून प्रसिद्ध करण्यात आले आहे, ते गाणे आपण खालील लिंक वर ऐकू शकता.

‘तिनी सांजा सखे मिळाल्या’ ह्या गाण्याचे बंगालीत रूपांतर

पंडीत हृदयनाथ मंगेशकर

लता, आशा उषा, मीना ह्या चार भगीनींचा धाकटा भाऊ, त्यांचा लाडका ‘बाळ’ म्हणजेच आजचे पंडीत हृदयनाथ मंगेशकर! [१९४३ च्या ‘माझे बाळ” ह्या चित्रपटाच्या एका गाण्यात ही पाचही भावंडे एकत्र दिसली आहेत, येथे क्लिक करून ते गाणे आपण पाहून शकता].

संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगातील प्रतिभावंत गायकनट दीनानाथ मंगेशकर आणि शुद्धमती तथा माई मंगेशकर यांची ही चार अपत्ये. वडीलांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थीतीमुळे वयाच्या अवघ्या १३ वर्षापासून कुटुंबाला स्थिरस्थावर होण्याकरीता दीनानाथ मंगेशकर यांचे मित्र मास्टर विनायक ह्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवून दिला. तिथून पुढे लकवरच लतादीदींने हिंदी चित्रपट संगीतात उच्च स्थान मिळवले.

लतादीदींच्या ह्या प्रवासात त्यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या हृदयनाथ कायम असत. हृदयनाथ यांना अनेक नामवंत आणि प्रतिभावंत हिंदी तसेच मराठी संगीतकार, गीतकार आणि गायक यांचा सहवास लाभला, त्यामुळे हृदयनाथ यांचा अनुभव जास्तच विकसीत झाला. वयाच्या २२ व्या वर्षी १९५९च्या ‘आकाशगंगा’ ह्या चित्रपटाद्वारे हृदयनाथ ह्यांनी संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्या चित्रपटात ‘जाहली जागी पंचवटी’, ‘यश तेची विष झाले, देहांत ते उफाळे’, ‘दसरा ना दिपवाळी, लाटतेस गुळपोळी’ अशा छान गाण्यांनी त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली होती.

पुढे जाण्याअगोदर आजच्या लेखातील तिसरे गाणे ऐकूयात!   

कवीवर्य भा. रा. तांबे यांनी वाईट किंवा अप्रिय आणि कटू अनुभव आल्यामुळे दुखी: आणि निराश झालेल्या एखाद्या तरुणास उद्देशून ही कविता लिहिली असे वाटते. जे काही झाले असेल ते सर्व विसरून, ‘रे! मार भरारी जरा वरी’ असा आशावाद कवी व्यक्त करीत आहेत. ह्या गाण्याची चालही अतिशय अवघड आहे, बाळाने (हृदयनाथ) बसविलेल्या अवघड चालीचे शिवधनुष्य फक्त लतादीदीचं लीलया उंचलू शकतात, आणि कसे ते प्रत्यक्ष ऐकाच!   

Old Marathi Songs
Old Marathi Songs
Old Marathi Songs
Old Marathi Songs
गाणे: घन तमीं शुक्र बघ राज्य करी (प्रथम ध्वनिमुद्रण: १९६८), कवी: भा. रा. तांबे (रचना: इंदूर, दि. २९/१०/१९२०), गायिका: लता मंगेशकर, संगीत: हृदयनाथ मंगेशकर

हृदयनाथ मंगेशकर यांच्या विषयीचे इतर लेख वाचा:

१) https://maharashtratimes.com/editorial/samwad/hridaynath-mangeshkar/articleshow/63338890.cms

२) https://www.lokmat.com/bhakti/pt-happy-birthday-hridaynath-mangeshkar-birthday-wishes-article-a679/?utm_source=Lokmat.com&utm_medium=InfiniteArticle-Desktop

३) https://marathivishwakosh.org/9580/

हृदयनाथ मंगेशकर यांनी केवळ निवडक हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत दिले, त्या सर्वच चित्रपटातील गाणी गाजली आहेत. पण हृदयनाथ मंगेशकर खरे रंगले ते भावगीते, पदे, लोकसंगीत ह्यातच. त्यांचे वाचन अफाट आणि समृध्द असल्याकरणाने संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मीराबाई, सूरदास, कबीर आदी संतकवींबरोबरच भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, स्वा. सावरकर आदी स्वातंत्र्यपूर्व काळातील कवी तसेच आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, ना. धों. महानोर आदी स्वातंत्र्योत्तर आधुनिक कवी यांच्या विविध रचनांचा समावेश त्यांनी आपल्या गाण्यात केला. किंबहुना अशा विविध कवींच्या रचनांवर त्यांनी सुरसाज चढविला. वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या काही बंदिशींच्या मुखड्यांचा आधार घेऊन ती बंदिश सुगम संगीतात चपखल वापरून त्यांनी रसिकांसमोर सादर केल्या. ‘मी डोलकर’ ह्या गाण्याद्वारे कोळीगीते हा गीतप्रकारही वापरुन पाहिला.

संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांचे अभंग स्वरबद्ध करताना त्या त्या संतवाणीशी ते तादात्म्य पावल्यासारखे रचना करतात. म्हणूनच ‘पांडुरंग कांती, मोगरा फुलला, ओम नमोजी आद्या, पसायदान, पैल तो गे काऊ कोकताहे, विश्वाचे आर्त’ अशा अभंगांना ते स्वरबद्ध करू शकले आहेत. यामुळे रसिकांना त्यांच्या गाण्यात एकाच वेळी बौद्धिक व भावनिक आनंद जाणवतो.

हृदयनाथांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शासनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार (२००९), सूरसिंगार हे पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. विशेष म्हणजे सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असूनही पंडित ही पदवी मिळालेले ते सुगम संगीतातील पहिले कलाकार आहेत. पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांच्या हस्ते ‘पंडित’ ही पदवी, शंकराचार्यांकडून ‘भावगंधर्व’ ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. (संदर्भ: https://marathivishwakosh.org/9580/)

चला, आता ऐकूयात आजच्या लेखातील शेवटचे गाणे.

ह्या कवितेचा अर्थ आध्यात्मिक असावा असा मला वाटते. अभ्यासूकांनी याबाबत अधिक माहिती दिल्यास चांगले होईल. लतादिदिंच्या आवाजात हे गाणे खूप गोड वाटते. गाण्याच्या चालीला एक गूढ लय असल्याचा भास होतो. गाणे प्रत्यक्ष ऐकूनच ते स्वत: ठरवावे.

Old Marathi Songs
Old Marathi Songs
WhatsApp Image 2022 02 07 at 5.23.30 PM
‘राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ ह्या पुस्तकातील कवितेचे पान, पुस्तकाची लिंक लेखात दिली आहे.
गाणे: कशी काळनागिणी (प्रथम ध्वनिमुद्रण: १९६७), कवी: भा. रा. तांबे (रचना: अजमेर, डिसेंबर १९२१), गायिका: लता मंगेशकर, संगीत: हृदयनाथ मंगेशकर

कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या कविता गाण्यात स्वरबद्ध करून संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर ह्या भावंडांनी असाच आणखी एक मौल्यवान ठेवा आपल्यासाठी निर्माण केला आहे. कवीवर्य भा. रा. तांबे, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका लता मंगेशकर ह्या त्रिकूटाला माझे त्रिवार नमन!

कालच भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले, त्या निमित्ताने ‘लता मंगेशकर’ यांना ह्या लेखाद्वारे मी श्रद्धांजली अर्पण करतो. हा लेख तसा योगायोगानेच आज पूर्ण झाला, गेले कित्येक दिवस त्याची पूर्वतयारी आणि जुळवाजुळव सुरू होती. शेवटी एखाद्या लेखाच्या भाळी ‘श्रद्धांजलीपर लेख’ असे भविष्य सटवाई त्याच्या जन्मापूर्वीच लिहून ठेवते का?

‘लता मंगेशकर’ ही केवळ सहस्त्रकातून एकदाच जन्माला येते, आणि आपण अशा व्यक्तिमत्वाला जवळून पाहिले आहे, ऐकले आहे, हे आपले मोठे भाग्यच म्हणावयाचे. स्वर्गीय आवाज आज स्वर्गात परत गेला! त्यांच्या आत्म्याच्या सद्गती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!


अविस्मरणीय गाणी-भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)लेखनाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक: चारुदत्त सावंत, तळेगाव दाभाडे, पुणे – ८९९९७७५४३९, ९२२५६०५९६८


अविस्मरणीय गाणी – भाग १ला: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs) वाचण्यासाठी येथे क्लिक करा


मराठी कवितेच्या गाण्यांचे आमचे अन्य लेख वाचा

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग २रा : इयत्ता २री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ३रा : इयत्ता ३री – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ४था : इयत्ता ४थी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ५वा : इयत्ता ५वी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ६वा : इयत्ता ६वी – Balbharati Poem Songs

बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ७वा : इयत्ता ७वी – Balbharati Poem Son

बालभारतीच्या कवितेची गाणी वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा


बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग ते ७ ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे. आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/


ह्या लेखात काही सुधारणा अपेक्षित असतील तर त्या आम्हास नक्की कळवाव्यात.


आजचा हा भाग आपणास आवडला असणार यात शंका नाही, पुढील भाग वाचण्यास चूकवू नका. आजच सदस्य नोंदणी करा. फक्त खालील जागेत आपला ई-मेल आयडी टाका. निशुल्क नोंदणी करा.


हा लेख लिहिण्याकरीता (Old Marathi Songs) बऱ्याच लोकांकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साहाय्य झाले आहे, तसेच खाली उल्लेख केलेल्या वेबसाईट/ब्लॉग वरून देखील माहिती गोळा करण्यास मदत झाली आहे, त्यांचे धन्यवाद!


संदर्भ आणि ऋणनिर्देशन (Old Marathi Songs):

  1. https://mr.wikipedia.org/s/7il
  2. https://www.loksatta.com/lokrang/swarbhaoyatra/articles-in-marathi-on-bhaskar-ramchandra-tambe-2-1569940/
  3. https://marathivishwakosh.org/9580/
  4. गाण्यांची यादी आणि अधिक माहितीList and more information of Songs: https://www.aathavanitli-gani.com/
  5. गोविंदाग्रज यांची एकूण १९ कडव्यांची संपूर्ण कविता (मराठीतील पहिले भावगीत): https://balbharatikavita.blogspot.com/
  6. कवीवर्य भा. रा. तांबे यांचे संकल्पित छायाचित्र सौजन्य: https://www.loksatta.com/lokrang/swarbhaoyatra/articles-in-marathi-on-bhaskar-ramchandra-tambe-2-1569940/
  7. Cover Photo Courtesy: https://lataonline.com/photographs/lata-her-composers.html

DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. We have used audio/video links for reference and information purpose only. We do not have copyright on these links. No downloading has been provided. Any lawful copyright owner does not wish to keep their content on our website, may inform us about it, so that we will remove it from our website.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant
Acknowledgements: Article Written by: Mr. Charudatta Sa more...

2 thoughts on “अविस्मरणीय गाणी – भाग 2: राजकवी भा. रा. तांबे, लतादीदी आणि हृदयनाथ मंगेशकर (Old Marathi Songs)

  1. विस्मरणात गेलेली अजरामर गाणी आपण पुनर्जीवित केली, नव्या पिढीला या मुळे ती माहिती होतील!

    1. आमच्या ब्लॉगवरील मराठी कवितेच्या गाण्यांचे अन्य भागही वाचावे. धन्यवाद।

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: