Maikgad Fort Near Panvel - माणिकगड घेराकिल्ला

किल्ले माणिकगडावरील रात्र !

किल्ले माणिकगडावरील रात्र !

मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव

रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळच्या किल्ले माणिकगड विषयक जुना लेख

साभार पोच: ‘पर्यटन ‘ – अंक : जुलै १९७७ , संपादक, मालक, मुद्रक – जयंत जोशी, सहसंपादक – सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे .

संकलक: संजय तळेकर, मुंबई . 

माणिकगडाचे छायाचित्र सौजन्य: https://en.wikipedia.org/wiki/Manikgad_(Raigad)


आम्ही सगळे मिळून नऊ जण, त्यातले सातजण पार्ल्याच्या हॉलिडे हायकर्स क्लबचे सभासद. श्रीकांत फ़ूणसळकर, गुबगुबीत बाळसेदार! सुरेश कुळकर्णी दणकट प्रकृतीचा! सुत्रधारही तोच! बाकीचे उमद्या दिलाचे. तरूण रक्ताचे. अनेक डोंगर ओलांडून गेलेले. बेलाग कडे चढून आलेले. कित्येक अडचणी पार केलेले. मी आठवा. तसा किरकोळ पण काटक. नि नववे गिरगावातले श्रोत्री, बहुत बहुत हिंडलेले, दोनवेळा भारत ग्रमण केलेले. हिमालय भटकून आलेले. गंगोत्री पर्यंत चढून गेलेले. आमच्यात वयोवृद्ध, वय वर्ष सत्तर? असे हे आम्ही नवजण! भिन्न व्यवसायातले. पण एकच आस ऊरीपोटी बांधलेली ! पाताळगंगे किनारी असलेल्या एका वटवृक्षाखाली विसावलो आहोत. समोर दुरवर दिसणाऱ्या धुराच्या धुरकटी आवरणातून काहिसा अस्पष्ट डोकावणारा माणिकगड आम्हास खुणावतो आहे. तिथं किती वाजता पोहचू याचा अंदाज बांधीत आहोत, वाटाड्या मिळेल कि नाही या विवंचनेत आहोत.

नदीत मनमुराद डुंबूंन येतो. घास घास खावून घेतो नि माणिकगडाचे दिशेने कूच करतो.

रणरणीत उन्हाची टळटळीत दुपार… दुपार वयात आली आाहे. ती पराकाष्टाची तापू लागली आहे. अंगाला चटचटू लागली आहे. सर्वांगाची लाहीलाही होते आहे. मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक आपला सहानभूतीचा हात सर्वांगी फिरवते. तेवढ्यापुरतच बरं वाटत.

दुतर्फा वासोट्या नि फड्या निवडुंगाच्या काटेरी शतकुपणातून धूळ खात पळत सुटलेली वाट … वाटीवरची धुळ उन्हाच्या धगीनं मनस्वी तापली आहे… पाऊल टेकताक्षणीच घोट्यापर्यंत बूडतं आहे. आगीत पडाव तस भाजून निघतं आहे. बाजुच्या शेतवाडीतून मशागत चालू आहे … मुळापासून जमिनीचा कस काढला जातो आहे… पोटाचं चिपाट पाठीला टेकलं आहे … हे एक यज्ञकर्म आहे. ते प्रत्येकांस करावं लागणार आहे. त्या भूमिपुत्राच हे सुरवातीचं भूमिपूजन आहे … घामाच्या अभिषेकाने अन्नदात्री प्रसन्न होईल उसळत्या डोंबातून कोवळा लुसलुशीत कोंब अंकुरला जाईल … श्वेदगंगेची अन्नगंगा होईल…

गप्पांच्या पुरात वाहता वाहता ‘चावण’ मागं पडतं नि नदीनाले ओलांडून ‘सावण्या’स येऊन थडकतो. गाव केवढं? तर, तळहाती घेऊन सहन निरखता येईल एवढं. पंघरावीस ऊंबऱ्याचं. एवढ्या आडरानात एकटचं वसलेलं, अशा या लहानुकल्या गावात अतीथ्यशील असलेल्या राजाराम देशमुखांच्या घरी मोठ्या अगत्यानं नि आदरानं आमचा पाहुणचार घेतला जातो.

ठाकरवाडी पासून एकदोन फर्लांगावर लागते चढण. वाट जाते वळणावळणानं. रानातून दो बाजूस गच्च रान, दुतर्फा नाना जातीची रानवेलींनी कवटाळलेली झाडं आपल्या फांदोऱ्याचे हात पसरून वाटेवर सावली धरून उभी असलेली. काहींनी तर आपल्या शरीरावरचा भार झटकून हलका केला. वाटेवर एक एक वीत जाडीचा पाचोळ्याचा थर साठवलेला, त्यातून हो ढोरवाट. मुख्य वाटेला लक्षलक्ष वाटा फुटलेल्या. त्या कुठंतरी जाऊन आडरानात घुसलेल्या, …र्हां टाच्या रूरवाळीत हरवून गेलेल्या … खरी वाट कुठली हे उमजेनासं होतं पण, ‘जान्ता बाप्या’ ‘रामू ठाकर’ म्होर आहे. त्या म्होरक्याचं मार्गदर्शन अचूक आहे. आम्हाला यत्किंचीतही चिंता करण्याचं कारण नाही.

चढतो आहोत चढताना धांप लागते आहे. ती लागणारच. जीव कंठाशी घुटमळतो आहे … पाणपिशव्यातलं पाणी संपलं आहे. पाठीवरच्या ‘हॅवरसॅक्स’ अवजड झाल्या आहेत. त्या फेकून द्याव्याशा वाटतांत. शिरी शितल छायेचं छत्र असून देखील नखशिखांत न्हाऊन निघालो आहोत.

पाचोळा तुडवीत ही दुर्घट चढण कशीबशी चढतो. नि समोरचं टेप चढून वर येतो. तोच पुढं उभा ठाकतो गडाचा पश्चिम कडा. नखशिखांत नागवा. काळाकभिन्न अदमासे पाचशे फूट उंचीचा भीमकाय शरीराचा, छातीचा कोट करून सरळसोट उभा असलेला. वरपासून खालपावोतो तुटलेला.

समोरची सपाटी ओलांडली कि लागते खरी अवघड चढण. वाट पूर्वीसारखीच. पण अवखळ दगडधोंडीनी खडबडलेली, एका आडरानात घुसलेली. गुराढोरांच्या पदाघातानं फुटलेली. खोलगट झालेली. दुतर्फा करवंदीच्या जाळ्यांच जंजाळ आपले काटेरी बाहू पसरून वाट अडवून उभं असलेल. भले थोरले दगड ऐन वाटेवरच ऐयपैस ठाण मांडून बसलेले. मुळातच वाटेवरच्या धोंडी नीट बसलेल्या नाहीत. पाय टेकताक्षणीच डुगुडुगु हलताहेत. हरघडी तोल जातो आहे. आधार म्हणून एखादी रानवेल धरून जावं तर ती दुर्दैवाने सुकलेली असते. कटदिशी मोडून पडते. पावलागणिक पाठीवरच ओझं संभाळावं, अंग पेलून तोल सावरावा, ओरखडणाऱ्या काट्याकडं दूलंक्ष करावं, मध्येच चेहऱ्यावरला डवरलेला घाम हातानं पुसावा नि त्याच हातानं वाटेवरचं हे काटेरी जंजाळ बाजूला सारीत असल्या या अडगळ वाटेनं, मोठ्या प्रयासान काठीचा आधार घेत वर चढावं. चढताना एखादा जरी धोंडा बसणीतून निसटला तर जबड्याचं चक्कं बोळक व्हायचं नि मग घरी गेल्यावर फारच मोठी ‘पंचाईत’ व्हायची.

ते तसलं चोरपावलांनी येणारं अकाली वार्धक्य टाळण्यासाठी की काय कोण जाणे अनिल पटवर्धन मला सारखा सारखा म्हणतो आहे. “तुक्या जपून, तू जपून टाक पाऊल जरा, जीवनातल्या मुशाफिरा”.

मी लागलीच उत्तरतो आहे “वाचे विठ्ठल वदावे, पुढे पाऊल टाकावे।”.

अर्धांधीक चढ चढतो नि मग एकदमच कड्याच्या पोटाखालून चालू लागतो, पुढं एका पाणथाळ नाळीतून साठलेले दगडधोडे ओलांडून वर येतो ति समोरच एक निसरत टेपाड चढून ऐन माथ्यावर येऊन पोहोचतो. पाठीवरच्या पाणपिशव्या एका चौथऱ्यावर फेकून देतो. पिसं भरल्यागत धावत सुटतो. मावळतीकडच्या एक्का बुरुजावर जाऊन उभा राहतो. नि समोरचं डोळे खिळवून ठेवणारे दृश्य पाहून काही क्षण भारावून जातो … हरव्‌न जातो … हरखून जातो. … समोर दूरवर डोंगराच्या एका शिखरावर अलगद टेकलेलं सूर्यबिंब. संपूर्ण पश्चिम दिशेवर पसरलेलं संधिप्रकाशाचं झिरझिरीत आवरण. त्या काहीशा मुलायम रेशमी अवगुंठनाखालून झिरपणारी केशरमिश्रीत सोनेरी किरणं… नि या बेहोषीत दुर्ग कर्नाळयावरील शिवलिंगासारख्या दिसणाऱ्या त्या बेलाग सुळक्यांचं नयनरम्य दर्शन… हे दृष्य नेहमीचंच. सर्वांच्याच परिचयाचं पण एवढ्या ह्या दोन हजार फूट उंचावरून काहीसं अधिकच लोभसवाणं दिसणारं हे सोंदर्याच साम्राज्य … श्वास रोखून पहात रहावं नि निसर्गानं मुक्त हस्तानं उघळलेले हे रंगवैभव डोळियांनी टिपून घ्यावं… ही नीरव शांतता … हा निखळ एकांत… ही श्यामल संध्यावेला … ही वेळच मोठी विचित्र… एक अनामिक हुरहुर लावणारी … प्रतिक्षेच्या अपेक्षेने व्याकुळ करणारी … काळजाला बेचैन करणारी… उरीच्या जखमेला हलकेच झोंबणारी.

ढासळलेले बुरूज, अगदी जुजबी तटबंदी, बांधकामाकरिता चुना मळण्याची घाणी, चोरवाट, मुख्य दरवाज, त्याकडे जाणाऱ्या पायऱ्या बहुतांशी ढासळलेल्या, उघड्यावर पडलेली दोन शिवलिंगे, तडा गेलेला नंदी, मंदिरांचा ऊखळलेला घरटा, जागोजागी शिबंदीच्या घरट्यांचे चौथरे, पाण्याची टाकी, एक भला मोठा हौद, मधोमध खासा किल्लेदाराचा वाडा, नि त्यास खेटूनच असलेली छोटेखानी सदर. या सर्व वास्तुंवर वास्तूंवर सर्वभक्षक काळानं आपला सर्वनाशी हात अगदी निर्घृणपणे फिरवलेला.

वाड्याशेजारीच आमचा तळ पडला आहे, सायकलच्या टायर्सचे तुकडे जागोजागी मशालीगत पेटलेले आहेत. त्या अपुऱ्या उजेडात भात पिठल्याची मेजवानी झडते. शतपावली होते. शिळोप्याच्या गप्पासप्पा होतात नि सारेजण उघड्या आकाशाखाली झोपी जातात.

अचानक जाग येते. मध्यरात्र उलटून गेलो असावी. भराट वारा सुटला आहे. सारे सखसोबती डाराडूर झोपले आहेत. दोघेजण तालासुरात घोरताहेत. एकाने तर चक्क खर्जच लावला आहे. बहूधा श्रोत्री असावेत. काहिना तर पिठलंभात मानवलेलं दिसत नाही.

वर अधांतरी पसरलेलं आकाश एखाद्या प्रचंड घुमटासारखं दिसत आहे. ते लख्ख चादण्यांनं भरलं आहे. दुपारी रखरखीत उन्हात घामाने चिंब भिजून गेलो होतो. आता मात्र शीतल चांदण्यात सचैल न्हाऊन निघतो आहे. वर दूधीच्या रंगाची आकाशगंगा पूर्व पश्चिम वाहते आहे. जण मोतीयांचा चुरा वाहून नेते आहे. घुमटभर अनेक ओळखीचे तारे इथंतिथं लुकलुकताना दिसताहेत.. त्यात पुनर्वसू आहे. मृगादिव्याध आहे. अत्यंत तेजस्वी असा शुक्र आहे. पतंगाकृती सप्तर्षी आहे नि बाजूलाच अढळपदी विराजमान झालेला ध्रुव आहे. तो बालयोगी अचल आहे. स्थित: प्रज्ञासारख्या निश्चल आहे. माऊलींन ज्ञानेश्वरीत एक सुन्दर दृष्टांत दिला आहे. “जातया अभ्रासवे जैसे आकाश, न धांवे भ्रमण चक्री न भंबे। धृव जैसा ।।”.

आज शुद्ध चतुर्दशी आहे. आज शुक्र शनिची युती पूपुनर्वसु जवळ होणार आहे. त्यांच्यातले अंतर हळूहळू उणावेल. दोघेजण परस्पर सामोरे येतील. दोघांची गळामिठी होईल. क्षेमकुशल विचारलं जाईल. लगेच गतिमान शुक्र निरोप घेऊन आपला पुढचा मार्ग आक्रमू लागेल.

एका बुरूजावर उभा आहे. चांदण शिंपलेली रात्र … किंचीत भयाण … काहिशी गंभीर … चहूबाजूंचे डोंगर ब्रम्हानंदी टाळी वाजल्यागत ध्यानस्थ बसले आहेत. समोर लख्ख प्रकाशात न्हालेलं दुर्ग कर्नाळयावरील संन्यस्त दुर्ग पाहून क्षणभर हरवल्यासारखं होतं. दूरवर रासायनीतील विजेच्या दिव्यांची टिंब तारकांशी स्पर्धा करताहेत. गच्च रानातील दच्च काळोखात काजव्यांची रोषणाई उठून दिसते आहे. रातकिड्यांचा किर्रS किडन असा मर्मर ध्वनी… घुबडांचं घृत्कारण, रानमांजराचं विविध आवाजात रडणं … ठाकर वाडीतल्या कुत्र्यांचं कर्कश भुंकणं … वानरांचा किचकिचाट … रानडुकरावर झाडलेल्या फैरींचे आवाज…सावण्याच्या हनुमान मंदिरातून गंधधुंद समीरासवे येणारी टाळमृदूंगाची धून… नि या अशा भयमिश्रीत आनंदाच्या बेहोशीत अधून मधून होणारा अुल्कापात!

वितभर पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी धावपळीच हे मानवी जीवन…. या असल्या धकाधकीच्या जीवनात कधीकाळी हे असले आनंदाचे क्षण येतात नि सारं जीवनच कसं मंत्रागत भारून जातात या असल्या क्षणाची चव चाखण्यात जी एक अवीट गोडी असते ती सांगून कळायची नाही, ती प्रत्यक्ष अनुभवावी लागेल.

हा गड तसा काही नामांकित लढाव नसावा. हे पहाऱ्याचं एक बुलंद ठिकाण. इथून अगदी दूरवर नजर ठेवता येते. तर मग कोणे काळी गनिमाची चाहूल सर्वप्रथम याच बुरूजावरील पहारेकऱ्याला लागली असेल, डोळ्यात तेल घालूत नंग्या तलवारीनिशी खडा पहारा करणारे नि हाती चूड घेऊन गस्त घालणारे मऱ्हाठे…! या ईथच. या मातीवर याच आकाशाखाली हाच भराट वारा पिऊन त्याची छाती कशी अभिमानानं फुगली असेल. याच भराट वाऱ्यानं मला पुरतं झपाटल आहे. वर्तमानापासून फार दूर मागं फेकलं आहे… भूतकाळाच्या गहिऱ्या गंभीर गर्तेत लोटलं आहे … माझी मलाच विस्मृती झाली आहे… काय कुणास ठाऊक पण अचानक ऊर भरून येतो हुंदका गळ्याशी दाटतो. यवनांच्या अमानुष जुलमी राजवटीखाली चिरडलेल्या पाशवी अत्यांचाराच्या टांचेखाली तुडवलेल्या, उन्मत राजसत्तेच्या जबरदस्तीमुळं वाढलेल्या नि निर्दय आक्रमणाखाली भरडून निघालेल्या या अफाट ‘ मर््हाजठा’ देशास ज्यांनी पारतंत्र्याच्या जखडलेल्या लोहशृंखलातून मुक्त केलं, त्या महान कार्यात असल्या मराठी रांगड्या गड्यांचा सिहाचा वाटा होता. त्या अज्ञात शक्तिपुत्रांना हा माझा पहिला वहिला मानाचा मुजरा! …

संपादन: चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

मूळ अंकाची प्रत वाचा


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
साभार पोच: : संपादक, मालक, म more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply