raigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…

Hirkani Buruj Raigad Fort, The Capital of Maratha Kingdom.

(Raigad Fort) रायगडी चढावे… पाच वाटांनी…

मूळ लेखक: तु. वि. जाधव

स्व. तु. वि. जाधव यांनी लिहीलेला रायगड विषयीचा जुना लेख

साभार पोच: ‘पर्यटन’ – शिवतीर्थ रायगड विशेषांक  – मार्च १९८०, संपादक, मालक, मुद्रक – जयंत जोशी, पुणे .

संकलक: संजय तळेकर, मुंबई . 


हुकुमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात श्रीशिवछत्रपतींचं अनुशासन लिहून ठेवलं आहे. दुर्गद्वारांविषयी लिहिताना ते त्यात म्हणतात- ‘किल्ल्यास एक दरवाजा अयब (दोष) आहे, याकरता गड पाहोन एक दोन-तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करोन ठेवाव्या, त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवोन वरकड दरवाजे व दिंड्या चिणोन टाकाव्या !’.

आजहि हे, कुठलाही गड चहूअंगी डोळसपणे पाहाता क्षणीच ध्यानी येतं. गडावर युध्दोपयोगी आवश्यक असणाऱ्या अनेक वास्तु आणि वस्तूंपैकी गडास एक-दोन चोरवाटा असणं ही युध्दशास्त्राच्या दृष्टीनं एक अत्यावश्यक बाब…! शत्रू केव्हा ‘सुलतानढवा’ करील, म्हणजे राक्षसी साहस करून चढाई करण्याचा प्रसंग गुदरवील याचा काहीच नेम नसे म्हणूनच किल्ला बांधताना घेतलेली ही खबरदारी छत्रपतींच्या युध्दकौशल्य!ची अजूनही साक्ष देते.

रायगड (Raigad Fort) हा अवघ्या गडांचा धनी … ! स्वराज्याचा कंठमणी … ! मराठा साम्राज्याची पहिली राजधानी …! तशी अभेद्य, अजिंक्य नि दुर्गम. अशा या राजधानीस वाटा आहेत तीन. पैकी पहिली महाद्वारातून वर गडापावेतो पोहचविणारी सध्याची वाहती सुगम, नि दुसरी वाघ दरवाजातून चढणारी बख्खळ धोंडींनी युक्त अशी नाहती दुर्गम. राहती राहिली तिसरी चोरवाट. टकमकी नजीकची. चोरदिंडी तून उतरून, टकमकीच्या पोटघळीतून झिरपत हजार फुटी कड्यावरून रेंगाळत खाली वाडीत उतरणारी.

तसा ऐन गडावर प्रवेश करता येतो एकूण पाच वाटांनी. पैकी राजमार्गाची वाट वगळता उरलेल्या चार वाटा उपरोक्त सुरवातीच्या विधानाची सत्यता पटवून देतात.

या वाटांवर इतिहास घडला आहे. साहसं केली गेली आहेत. बऱ्यावाईट संमिश्र भावनांचा स्पर्श यांनी अनुभवला आहे. भारावलेल्या या वाटांचा इतिहास वेगळा… गंध वेगळा — छंद वेगळा — रूप वेगळं – – पण जात मात्र एकच! या वाटांचा गंध मनसोक्त हुंगण्यासाठी मकरंद व्हावं नि धुंद होऊन वर चढावं तेव्हाच कुठे स्वर्गीय सुखाच्या आनंदाची महती पटेल.

भवानी टोकाच्या तटबंदीपासून सातशे फूट उंचीच्या उभार कड्यावरून उडी घेणाऱ्या गुप्त वाटेनं चढताना जिद्दीची कसोटी नि हिंमतीची परीक्षा पावलोपावली प्रत्ययास येते. शिवकालात हा उभा कडा प्राणांची बाजी लावून चढून जाणाऱ्या त्या अज्ञात मर्द मावळयास इनाम देऊन शिवप्रभूंनी गौरविले, अशी एक आख्यायिका अजूनही रायगड (Raigad) खोऱ्यात रूढ आहे.

अशीच दंतकथा आहे हिरकणीविषयी! हिरकणीचा कडा म्हणजे वात्सल्याने पान्हावलेला — ! ममतेनं ओथंबलेला — ! नि माऊलीच्या शीतल साउलीनं सुखावलेला –!

कोजागिरी पौणिमेच्या रात्री स्वर्गातून शुभ्रधवल दुधाच्या शतसहस्र धरांचा अभिषेक या अवघ्या अवनीतलावर होत असता या शुभमंगल प्रसंगी ऐन मध्यान्हरात्री एक माता मातृत्वाची भावना उरोपोटी कवटाळून या अवघड कड्याशी जीवघेणा खेळ खेळते आहे हे, पाहून वारा क्षणभर थबकला असेल — झाडाझुडपांची कुजबूज नि लतावेलींचं हितगुज पळभर थांबलं असेल — साक्षात यमराजानं दातातळी अंगुळी घरून नि श्वास रोधून या जगावेगळया साहसाचं कवतिक केलं असेल आणि – आणि पायाखालच्या पाषानहृदयी  कड्यालादेखील त्यावेळी दयेचा पाझर फुटला असेल!

हिरकणी बुरुज (Hirkani Buruj)’ या नामकरणानं साकार झालेली नि शब्दाविना आकारलेली ही भावस्पर्शी गाथा मातृहृदयाची महती गात आज कित्येक वर्षे वाहते आहे. हिरकणीचा पाषाण चढताउतरता, प्रसंग पडला तर जन्मदात्री आपल्या लेकरासाठी काय दिव्य करू शकते या पुण्यस्मरणानं जो मन्मनी गहिवरत नाही, तो खरोखरीच पाषाणहृदयी!

महाद्वारातून प्रवेश करताना क्षणभर नतमस्तक व्हावं… लवून मुजरा करावा— पायठणीला स्पर्श करून तो भाळी लावावा– असंच पावित्र्य आहे या वाटेचं — असंच महात्म्य आहे या द्वाराचं- – शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही वाट आज कित्येक वर्षे अनेकांना अनेक वेळा नवोदित स्फूर्ती देऊन गेलो आहे.

इथं थांबताक्षणोच मनी येतं,  — कोण कोण चढले असतील या पायऱ्यांवरून ? कोण केव्हा उतरले असतील या दारातून ? काय काय पाहिलं असेल या दरवाजानं ? किती किती अनुभवलं असेल या प्रवेशाने ? कधी छाती रुंदावून ताठ मानेनं विजयाच्या धुंदीत चढणारे जेते तर कधी गर्दन झुकवून नि हात बांधून उतरणारे हार खाल्लेले खासे – – कधी शीर तळाहाती घेऊन झुंजणारे निःस्वार्थी शिलेदार, तर कधी फंदफितुरी करणारे अक्षम्य स्वार्थी गुन्हेगार — ! किती नि काय? छत्रपतींवर प्रसन्न होऊन त्यांच्या मागोमाग चालत आलेली सुरतेची लक्ष्मी — कुबेरघराची संपत्ती – – भाग्य उजळीत मोठ्या दिमाखानं वैभव पाजळीत ऐन गढावर लढली ती याच वाटेनं नि शेवटी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी खाली मानेनं रिक्तहस्ते गड सोडून विषण्णतेनं अश्रू ढाळीत खाली उतरली तीहि याच वाटेनं – -!

हृदय हेलवणारी अशीच एक दुसरी वाट उतरते वाघ दरवाजातून. ऐन मध्यान्ही स्वातंत्र्यसूर्य मावळला — त्या सूर्यपुत्राची निघृण हत्या केली गेली. ती देखिल मध्यान्हीच –! महाराष्ट्रावर अक्षरश: दुर्देव, कोसळलं — आकाश फाटलं  — हलकल्लोळ उडाला – – कल्पांताचा आकांत झाला — नि या प्रचंड आघातानं उभा महाराष्ट्र सूडभावनेनं पेटून उठला –! स्वराज्याच्या नरडीचा घोट घेऊ पाहणारा नरराक्षस धर्मान्ध आपल्या क प्रचंड सैन्यबळासह या भूमीत जातीनिशी ठाण मांडून बसलेला — रायगडास वेढा पडलेला – – फास करकचून आवळला गेला — आचके देत पण ताठमानेनं उभा असलेला रायरी कुणाची तरी वाट पाहात असलेला… काळयाभोर अंध:कारातून आशेचा एक तेजस्वी किरण डोकावताना त्यानं पाहिला मात्र, नि मग त्याही स्थितीत तो किंचितसा का होईना पण हसला.. जुल्फीकारखानाच्या वेढ्यातून सहीसलामत सुटण्यासाठी राजराम महाराजांनी वाट धरली ती वाघदरवाजाची. महाराज या वाटेनं कसे उतरले असतील हे वाघदरवाजा उतरल्याखेरीज ध्यानी यायचं नाही. त्यावेळी त्यांच्या मनी उठलेलं काहूर अजूनही वाघदरवाजा उतरताना मनाला कमालीचा चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही.

राहती राहिली चोरवाट. तटबंदीच्या चोरदिंडीतून उतरणारी ही तटबंदी महाद्वाराच्या उजव्या बुलंद बुरुजाला घट्ट पकडून, अनेक लहानमोठ्या बुरुजांना आपल्या कवेत घेत नि सर्पाकृती होत होत शेवटी ऐन टकमकीच्या कड्याला जाऊन भिडली आहे.

टकमकीच्या खळग्यातून येणाऱ्या पाणलोटानं या तटबंदीचा काही भाग कोसळला आहे. त्या कोसळलेल्या भागाच्या जवळच एकमेकांस खेटून बसलेल्या दोन बुरुजांमधून ही वाट चोवीस पायऱ्यांचा जिना उतरत एका लहानग्या चोरदिंडीतून शंभरफुटी कड्यावरून उडी घेत समोरच्या मेटांना ओलांडून कडेलोटाचं पोट चिरीत चिरीत शेवटी हजारएक फूट खाली वाडीपावेतो घसरली आहे. या वाटेविषयी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, “हो वाट इतकी भयंकर, अवघड नि जिवावरची आहे की, अजूनपर्यंत कोणाच्याही बापाने, कोणाच्याही लेकाने वा कोणीही स्वतःच्याने इथून जायची यायची हिम्मत केलेली ऐकिवातही नाही ! कोण जाईल यमराजाच्या गालावर टिचकी मारायला ? जीव द्यायला निघालेलाही इथून घाबरून परतेल–“.

अशी ही वाट उदईक चढोन जाण्याचा आमुचा मनसुबा आहे.

नीरव शांतता…! निखळ एकांत…! तारकापुंजांनी गच्च भरलेलं आकाश…, गडाभोवती आकर्षक दिसणारी काजव्यांची दिलखेचक रोषणाई…एका अनामिक सुगंधानं ओलावलेला भवतीचा अंधार… नि त्या भावस्पर्शी अंधारातून संथगतीनं वाहणारं गंधधुंद वाऱ्याचं लयबध्द असं सुरेल संगीत… ! या भारावलेल्या जिवंत वातावरणानं बेहोष होऊन आउसाहेबांच्या वाड्यात तुकाराम शेडग्यांशी झालेली बातचीत… दोघांची मोकळी झालेली मनं — त्यांनी व्यक्त केलेली चिंता — नि त्या चिंतेचं सखोल चिंतन –! या चिंतनानं पुरतं वेढलं — अभेद्य तटबंदी उभी केली नि सारी रात तळमळण्यात गेली–!

रामप्रहरी विषण्णावस्थेत रायनाकच्या समाधीपाशी येऊन केव्हा उभा राहिलो हे समजलं देखील नाही. भरसमुद्रात फोफावत उसळणाऱ्या एखाद्या अजस्र काळलाटेसारखा दिसणारा टकमकीचा कडा असा अंगावर आलेला पाहताच खळकन् फुटणाऱ्या एखाद्या काचपात्राप्रमाणं मनी काहीतरी फुटलं — नि एक सुगंधी, सुकुमार स्मरण आकारण्याआधीच तुटलं –!

इथून बावीसशे फूट उंच असलेल्या नि छाती दडपून टाकणाऱ्या या कड्याच्या ऐन गर्भातून चालणं म्हणजे, भक्ष मिळताच ‘आ’ वासून नक्राश्रू ढाळणाऱ्या एखाद्या मगरीच्या जबड्यात स्वतःहून उतरण्यासारखं आहे हे ध्यानी येऊन देखील मनातली उर्मी स्वस्थ बसू देईना. ओढाळ मन पाठी फिरू देईना.

शेवटी निश्चय पक्का झाला. मात्र अंतस्थ प्रेरणेला साक्षी ठेवून एक कृष्णप्रतिज्ञा घेतली,– “ही जिवावरची झुंज खेळताना गिर्यारोहणाच्या कुठल्याही साधनाला चुकूनही स्पर्श न करता आपण जिकून जायचं- ‘ आणि काय?  भो आश्चर्यम — ! ताजूबकी बात – – ! मनोमनी घेतलेली हि कृष्णप्रतिज्ञा शेवटी भीष्मप्रतिज्ञा ठरली.

वाडीतले अनंत जाधव नि देऊ अवकीरकर हे मार्गदर्शक, अनिल पटवर्घंन नि श्याम जांबोटकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मी, यतीन म्हात्रे, काशिनाथ वागळे, बाळ भावे, डॉ. दिनेश रांगणेकर असे आम्ही फक्त पाच, केवळ मागोवा घेणारे पाईक.

सुरुवातीचा हजार फुटी चढ चढून गेल्यावर डाव्या अंगानं एका दरडीखालून वळताच समोर दिसतं अदमासे तीनशे फूट रुंदींचं टकमकाचं ओटीपोट. या ओटीपोटावरून चालत जाणं म्हणजे झोपलेल्या वाघाला उगीचच डिवचण्यासारखं आहे — ! स्वतःहून मृत्यूला उरीपोटो कवटाळण्यासारखं आहे – -!

एरव्ही मो तसा हडकुळा, अशक्त नि भित्रा. पण समोर कडा दिसला की का कुणास ठाऊक, अंगी बारा हत्तींचं बळ आल्यासारखं वाटतं – – पिसं भरल्यागत सर्वांगी काहीतरी संचारतं — नि त्या भारावलेल्या अवस्थेत जिवावर बेतलेलं शेवटी एखाद दुसर्या काट्याच्या छानपैकी ओरखड्यावर सहीसलामत निभावून जातं –!

मात्र या वाटेनं चालताना या काळपुरुषाचं रौद्ररम्य रंगरूप अगदी जवळून निरखण्यात केवढा एक अनोखा आनंद असतो, हे सांगून कळायचं नाही. हा कडेलोट म्हणजे साक्षात काळपुरुषच –_! स्वराज्यापुढं नतमस्तक झालेला हा बलदंड लोहपुरुष थंडीवाऱ्याचे नि उना पावसाचे बेजरब तडाखे खात आज कित्येक वर्षे इथं उभा आहे. यांचा वरील माथा किचित पुढं झुकलेला — उजवा हात छत्री निजामपूरच्या बाजूनं सरळ खाली उतरलेला — तर डावा हात महाद्वारापर्यंत सरळ आडवा धरलेला — याच्या कंठमण्याखाली असलेला कंगोरा हा त्याच्या कंठाखालील खोलगट भाग, तर त्या खालचा पाचशे फुटी ताशीव कडा ही रुंदावलेली नि उंचावलेली काळोकभिन्न बुलंद छाती — त्याखाली घसरतं पोट — पोटाच्या मध्यावर असलेला खळगा ही नाभी, नि त्या खाली — ‘कभिन्न काळ्या मांड्या जश्या पोलादाचे चिरले साग– !’ पैलतीरीच्या मेटावर जाऊन टेकताक्षणीच सुटकेचा निश्वास सोडतो, नि वरील तटबंदीतून खुणावणाऱ्या चोरदिंडीकडे काही क्षण एकटक पाहात राहतो. राजमार्गांवरून न दिसणारी दिंडी फक्त या इथल्या चौथऱ्यावरूनच दिसू शकेल असा संकेत दिठीसमोर ठेवून केलेलं हे बांधकाम केवळ कौतुकास पात्र – – !

इथं उभं रहावं, पुनश्च एकवार कड्याचं रांगडेपण निरखावं. एकवार वर पहावं. पहात रहावं भान हरखून. निरखत रहावं, श्वास रोधून दिठी मिटावी — त्या छत्रीधरी मावळ्याची ती लोकविलक्षण कथा एकवार आठवावी, आदरानं मान तुकवावी — नि मिटल्या डोळ्यांनी पहावं, अंतःचक्षूंसमोर तरळणारं त्या देहांत प्रायश्चिताच भयानक चित्रण- – !

टकमक टोक म्हणजे कडेलोटाची जागा. राजद्रोही, फ़ंदफ़ितुरादि अक्षम्य अपराध्यांचा डोळ्यांवर पट्टी बांधून इथून चक्क कडेलोट होत असे. ते चित्तथरारक दृश्य जीव मुठीत धरून पाहाणारे एकटक टकमक पाहात असत, म्हणूनच तर त्याचं नाव टकमक टोक!

वरून सुटलेला गुन्हेगार प्रथम दर्शनी पहिल्या टप्प्यावर आदळत असे. शरीराच्या खोळीतली हाडं, सांधे चांगली खिळखिळी झाल्यावर त्वरित डोळ्याचं पातं लवते न लावते तोच पुनश्च हजारएक फूट इथं ओटीपोटावर अलगद येऊन कोसळत असे. नि तदनंतर चेंदामेंदा झालेलं ते पार्थिव कलेवर क्षणाचाही विलंब न लावता पुन्हा हजार फूट आडवं तिडवं घरंगळत तळाशी असलेल्या धोंड्यांच्या राशीवर छिन्नविच्छिन्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात वेडेवाकुडं पडलेलं दिसत असे, छे, छे !! भयंकरच ! !

असं हे जबर, महाभयंकर देहांत प्रायश्चित प्रत्यक्ष जातीनं पाहाणाऱ्यांच्या काय पण कर्णोपकर्णी ऐकणाऱ्यांच्या देखील छातीत धस्स होई नि एखादा लहानगा गुन्हादेखील करण्यास ते धजत नसत.

अशी ती जरब! असा तो वचक — ! असं ते शासन –! म्हणूनच ते सुराज्य – – रामराज्य- – !

संपादन: चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९



मूळ अंकाची छायाचित्रे. (अंक जुना असल्याने छायाचित्रे स्पष्ट नाहीत.)

पहिल्या चित्रात रेखाटन केलेला मार्ग आहे तो टकमक टोकाखालून वर चढलेला मार्ग.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: