Mahipatgad

(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव

महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड ह्या दुर्गत्रिकुटाच्या भ्रमंती विषयक जुना लेख – (MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD)

साभार पोच: ‘पर्यटन ‘ – दिवाळी अंक १९७६, संपादक, मालक, मुद्रक – जयंत जोशी, सहसंपादक – सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे .

संकलक: संजय तळेकर, मुंबई . 

महिपतगडाचे छायाचित्र सौजन्य: https://marathivishwakosh.org/


दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड

महाराष्ट्रात सह्याद्रिनं अनेक किल्ले आपल्या शिरी मिरवविले आहेत नि त्यांनी घालून दिले धडे त्यानं आपल्या उरो मिरविले आहेत. अश्या ह्या सह्यगिरीच्या मुख्य रांगेची लांबी आठशे मैल असली तरी तीस जागोजागी अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यास शाखा आहेत. उपशाखा आहेत. अशा ह्या आपुल्या शाखा उपशाखांचे बाहू अस्ताव्यस्त पसरून, पश्चिम किनाऱ्यापासून कमी जास्त अंतर राखून तो दक्षिणोत्तर असा इथून तिथून दुरवर पसरला आहे. मुंबई – गोवा मार्गे चिपळूणकडं जाताना असाच एक फाटा पोलादपूरापासून चिपळुणच्या दिशेनं धावत गेला आहे. त्यास फुटलेल्या एका शाखेवर ठोकताळपणं उभे आहेत महिपतगड, सुमारगड नि रसाळगड! (MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) अशा ह्या अंतर्भागात अगदी अडगळीच्या स्थळी दडून बसलेल्या दुर्लक्षित गडांकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही. सहजासहजी इकडं कुणी जायला धजत नाही. ज्यांच्या पायात मजबूत बळ नि छातीत पुरती हिंमत असेल, त्यांनीच यांच्या वाटेला जाव, एरव्ही परीटघडीची काळजी घेणाऱ्या गुलहौशी पर्यटकांनी दुरूनच दर्शन घेऊन मनी संतोषावं हेच सर्वोत्तम!

काय असतं, की काही ठिकाणी ह्या शाखा उपशाखांचं असं काही जाळं पसरलेलं असतं की त्यातून वाट शोधीत घटनास्थळी पोहचणं मोठं अवघड होऊन जातं. ह्या डोंगरांचं काही खरं नाही. सारेच भूलभूलवैये. ऐक डोंगर मोठ्या प्रयासानं चढून नि निथळलेल्या घामानिशी धापा टाकीत त्याच्या माथी जाऊन उभं रहावं तो समोरच दुसरा डोंगर हात पसरून वाट अडवून उभा असलेला दिसतो. नि मग हे असले डोंगर चढता उतरता दमछाट होते… पायांचे टाके ढिले होतात… जीव अगदी मेटाकुटोस येतो…नि संकेतस्थळी पोहचेपर्यंत सारा उत्साह मावळून जातो.

दिवस कललेला असतो… सावल्या लांबलेल्या असतात…पाखरं घरट्याकडं झेपावत असतात. . .गुरं दौडत असतात. बायामाणसं घरांकडं परतत असतात… नि एव्हाना आपण मात्र गडावरचा भन्नाट वारा पिऊन ताजेतवाने झालेले असतो… अस्तु!

बोरघर हे तसं काही उल्लेखनीय एस. टी. स्थानक नव्हे. हा एक ‘रिकवेस्ट स्टॉप’, मुंबई-गोवा मार्गी धावणाऱ्या गाड्यांपैकी क्वचितच एखाद दुसरी गाडी किंचित का होईना इथं आपली पायधूळ झाडतेच. तर काय, एका सुप्रभाती पायउतार होतो नि समोरची कोरडी नदी ओलांडून महिपतगडाच्या दिशेनं चालू लागतो.

बोरघर पासून महिपतगड (Mahipatgad) अवघा सोळा मैलांवर. पण हे सोळा मैल तसे काही सरळ नाहीत. अवघड चढउतारांचे व जीवघेण्या वळणावळणांचे…त्यातून दिवस भर उन्हाचे… ग्रीष्मातल्या काहीलीचे,  नद्यानाले साफ आढळलेले… चक्कं कोरडे पडलेले…आसंमत पेटून उठलेला, आगडोंब उसळलेला… रानातला पर्णभार करपलेला…भर पावसात आलो असतो तर हिरव्यागार वृक्षसृष्टीनं दिठी सुखावली असती… खळखळत झुळझुळणाऱ्या कर्णमधुर संगीताने कोरडलेला जीव पाणावला असता.

आम्ही एकूण अकराजण. सारेच ‘हॉलिडे हायकर्स क्लब’ चे सभासद. राजेश्री हिरा पंडित नि विवेक गोऱ्हे हि मित्रद्वयी नुकतीच गिर्यारोहणाचं प्राथमिक शिक्षण संपवून हिमालयातून सुखरूप मायदेशी परतलेले, प्रा. चांदेकर तर ह्या क्षेत्रातले आघाडीचे अनुभवी. बाकीचे तरुण रक्ताचे…उमद्या दिलाचे…अनेक अडचणी पार केलेले…शेकडों मैलांचे दोरे करून आलेले! राहता राहिलो मी. मी ह्या भटकंतीचा सुत्रधार. ह्या राहळातली थोडीफार माहिती असलेला. ह्या पंचक्रोशीत बालपणी हिंडलेला.

नुकतीच शेतभाजणीची कामं आटोपली आहेत. क्वचित कुठे ‘साकूळ’ (न भाजलेला राब) जमविण्याचे काम तसंच राहून गेलं आहे. आता फक्त पाऊस येण्याचा अवकाश! पहिले वहिले पावसाळी ढग जमतील…अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघालेल्या धरणीवर वर ते अमृत वर्षाव करतील. . .पहिल्या-वाहिल्या सुखद स्पर्शानं तृप्त उसासे फुटतील…मातीच्या घमघमटानं आसंमत भरून जाईल … बीयाणी पेरली जातील… बीजं अंकुरतील…रोपं वाढतील… ती वाऱ्यासवे डोलू लागतील… हिरव्यागार पाचूचं सोन होईल… सोनियाच्या ताटाला मोतीयाचे घोस लटकतील…आणि मग ही धरतीमातेची दौलत अहर्निश काबाडकष्ट करणाऱ्या भूमिपुत्रांच्या घरी भरून भरून वाहू लागेल…

गप्पांच्या ओघात ‘चांदिवली’ मागं पडतं, पुऱ्याचे फौजदार श्री. पवार यांचं मार्गदर्शन होत. शिंगाऱ्याचे पोलिस पाटील श्री. कदम यांचं सहकार्य लाभत. अशी ही गावोगावी थोडीफार विश्रांती घेत, कूच दरकूच करीत, मजल दरमजल गाठीत, नद्यानाले ओलांडीत, दऱ्याखोरी तुडवीत ‘दिस मावळतीच्या वकुताला’ महिपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलदारवाडी पाशी येऊन थंडकतो. भूमीला टेकताक्षणीच, वर एका बुरुजावर उभ्या असलेल्या मधूकर मोरे नि रसाळगडाच्या पेठेतला तात्याबा सावंत यांच्या हाकारण्यान मी तर अगदी मनोमन सुखावतो. मनी म्हणतो, अखेर मोरे-सावंत दिलेल्या शब्दाला जागले म्हणायचे तर!

आता फार वेळ बसून जमायचं नाही. दिवसा उजेडी गडावर पोहोचलं पाहिजे. उघड्यावरच तळ दिला पाहिजे. चांगली मोकळी चाकळी जागा शोधून काढली पाहिजे, ती साफ केली पाहिजे नि अन्नब्रम्हाची काहीतरी सोय केली पाहिजे. पण ह्या एका गोष्टीविषयी मी मात्र अगदी निश्चित आहे. कारण ‘मुदपाक खान्याचा खास अधिकारी (अर्थात भटारी) म्हणून श्री. विनय दवे यांची अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे. मधे कुठूनहि ‘कुमक’ येण्याची शक्यता नसल्यामुळे तीनचार दिवस पुरेल तीतकी ‘रसद’ त्यांनी आरंभीच सवे घेतली आहे.

तडातडा पावलं टाकीत उभा गड चढून जातो नि मग धूरकट भरल्या संधिप्रकाशात नेमून दिलेल्या चाकरीवर जो तो इमाने इतबारे रूजू होतो. टिमटिमत्या चिमणीच्या मंद प्रकाशात घासचूटका खातो पितो नि उघड्या आकाशाखाली झोपी जातो. इटुकल्या मिटुकल्या चांदण्या डोळे मिचकावीत आमचेवरी पहारा देत राहतात, रात्रभर जागत बसतात.

कुणा महिपत नावाच्या बेलदाराने हा गड अल्पावधीत बांधून पुरा केला म्हणून त्यास महिपतगड हे नाव ठेवलं गेलं, असं ह्या राहाळातले वयोवृद्ध सांगतात. गडाची उंची आहे एकशे तीस फूट. माथा आहे मायेरान. याचा वरील विस्तारच आहे मुळी दोनशे एकर एकोणतीस गुंठे. खाच खळग्यांनी युक्त असलेला हा पठारी प्रदेश घनदाट झाडावळीनं व्यापला आहे. दाटीवाटीनं उभी असलेली नानापरीची रायवळी झाडं अशी फोफावलेली! तळाशी काटेरी झुडूपांचं जंजाळ पसरलेलं! त्यातच शेकडो ढोरवाटा सगळ्या ‘र््हाट’ भर अशा काडी वळणावळणानं धावत गेल्या, की अशा ह्या बंबाळात शिरून गडाचा कानाकोपरा न्याहळणं म्हणजे विनाकारण चक्रव्यूहाचा भेद करून आत अडकून पडण्यासारखं आहे. गडावर असणाऱ्या ह्या असल्या झाडावळी विषयी म्हटलं आहे. “गडावरी झाडे जी असतील ती रक्षावी. या विरहीत जी जी झाडे आहेत ती फणस, चिंचा, वड, पिपळ आदि करून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे आदि करून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावर लावावे; जतन करावे. समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजनास येतील”.

कोंबडसादी उठतो. झूंजूमुंजू लागतं. पूर्वेला चांगलं फटफटतं. तांबडं फुटतं. राबता सुरू होती. नि लगेच इशाऱ्याची नौबत झडते… अखेरचा मुजरा ठोकून सज्जड तयारीनिशी बेलदारवाडीच्या दिशेनं गड उतरू लागतो.

आजचा दिवस फार महत्त्वाचा. एकेकाच्या जिद्दीचा. प्रत्येकाच्या धाडसाचा. आजच्या दिवसात मधला अवघड सुमारगड करून निदान दिवे लागणी पर्यंत तरी रसाळगडी (Rasalgad) पोहचणं आहे. आता चालण्याचा झपाटा वाढवला पाहिजे. विश्रांतीला खो दिला पाहिजे. सतत चालत राहिलं पाहिजे.

बखरीत सुमारगडास ‘सुमारूगड’ असं म्हटल आहे. ज्याच्या माथ्यावरून चारिही दिशांचं सुमारक्षेम कळतं तो सुमारगड. सुमारगडास जवळून पाहिलं की चंदेरीच्या ‘पिनॅकल’ ची स्मृती जागृत होते. चंदेरीचा पिनॅकल चहूबाजूंनी उभार तुटलेला आहे. वरती जाण्यास फक्त एकच वाट, पणं तीही अवघड, वाट कसली ती. एक अति दुर्गम जीवघेणी घळच! दंड थोपटून उभ्या असलेल्या चंदेरीशी आम्ही दोन डाव खेळलो होतो. आता घडीला सुमारगडचं आव्हान आहे. तेहि आम्ही बिनबोभाट स्वीकारलं आहे.

“गाडी घोड्यातून फिरणाऱ्या नि ऐषआरामात राहणाऱ्या तुम्हा मुंबईकरना सुमारगड व्हायचा नाही. ते मध्यमवर्गीयांचं काम नोहे” असं बहुतांनी नानापरीनं बहुत बहुत हिणवलं होतं. देवघरचे यशवंतराव मोरे देखील म्हणाले, “इतर किल्ल्यांप्रमाणे हा गड आता वहिवाटीत नाही. राबता तुटला आहे. फार दिवसात आपल्यापैकी कुणी वर चढल्याचं निदान माझ्या तरी ऐकीवात नाही. महिपतगड करून तुम्ही सरळ रसाळ गडावर या. सुमारच्य़ा भानगडीत पडू नका”.

गालातल्या गालात हसत नुसत्या मानेनच होकार दिला खरा पण तत्क्षणी मनी संकल्प सोडला की, खऱ्या पौरुषत्वाचं लक्षण सुमारगड चढण्यातच आहे. स्वत:च्या लेकरांना अंगाखाद्यांवर खेळवितांना पित्याला नाही का धन्यता वाटत ? मग आम्ही तर त्यात सह्याद्रिची लेकरं, त्याच्या अंगाखाद्यावर असे खेळलो, बागडलो, उनाडलो तर तो काही रागे भरणार थोडाच? हुं की चू देखिल करणार नाहो. हा चढताना एखादवेळ चुकून आपलं पाऊल सरकेल पण कडा काही जागचा सरकणार नाही.

उगवतीच्या बाजूस कड्याच्या ऐन कपारीत एक वारसाच झाड आहे. त्या झाडाखालूनच फक्त वर चढता येत असं तात्याबा सावंत सकाळ पासूनच म्हणत होता. अरुंद चिंचोळ्या वाटेनं कड्याचा आधार घेत वारसाच्या झाडापर्यंत पोहचतो. पिसं भरल्या गत तात्याबाच्या मागोमाग तो उभा शंभर फूटी कडा हा हा म्हणता चढून जातो नि अंगी वारं भरल्या वासरागत गडभर सुसाट दौडत सुटतो.

आजचा दिवस सोनियाचा… ‘आजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा धनु। ‘दृश्य तर मोठं विहंगम, केवढा अफाट प्रदेश पसरला आहे समोर… दुर्लक्ष्य पर्वत श्रेणी… बेलाग कडे… बुलंद ठाणी… दुर्गम वन, पाताळावेरी गेलेल्या दुर्घट दऱ्या… आकाशावेरी गेलेले दुर्धर सुळके… छे! छे ! सारंच अलौकिक… सारचं अपूर्व…, खरंच ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो’ . या असल्या अफाट प्रदेशावर नजर ठेवण्यास हे असले बुलंद खणखणीत किल्लेच हवेत.

जिद्द पुरी केली खरी पण आमच्या ह्या यशस्वी गिर्यारोहणाला शेवटी अपघातचं गालबोट लागलंच. अर्धामुर्धा कडा चढून आलेल्या शाम जांबोटकरांना अपघात, आधार म्हणून एका उगमत्वा धोंडोला हात घातला नि अखेर त्या आधारानंच त्यास दगा दिला. ती धोंड आपल्या बसणीतून जी निखळली ती शामच्या पायाच चागलं खरपूस सालटं खरचटतून घंघाळत खाली गेली. खाली उभा असलेला जोशी थोडक्यासाठी वाचला नाहीतर जोशीबुवांचा कपाळमोक्षच व्हायचा. जीवावर बेतलेलं अखेर पायावर निभावलं.

दोन एक फर्लांग लांबी रुंदीचा सुमारगड तसा काही नामांकित लढाव नव्हे. एक पहाऱ्याचं बुलंद ठिकाण. पाण्यानं तुडूंब भरलेलं एक भलमोठं जोड टाकं, गुहेतल शिवलिंग नि बांधकामाचा चुना साठविण्यासाठो बांधलेली एक चतुष्कोनी कोठीवजा विहिर पाहिली की आटोपलं.

पूर्वी सुमारगडी जत्रा भरत असे. पण एका जत्रेत ‘ढालकाठी’ नाचवितांना चुकून तोल गेल्यानं दोन सख्ख्ये भाऊ ढालकाठी सकट हजार एक फूट खाली कोसळले. तेव्हापासून ती जागा रसाळगडी हलविण्यात आली. आजतागायत तीन वर्षानं एकदा या गडी जत्रा भरते. जत्रेचं स्वरूप मोठं देखणं असतं. बालपणी मी ते एकदा पाहिल आहे. अनुभवलं आहे. सुमारगडच्या मावळतीकडून उतरणं म्हणजे एक परीक्षाच. ती अवघड अशी ती एक कसरतच. चुकून जरी तोल गेला तरी सरळ हजार एक फूट खाली कोसळल्याविना दुसरा पर्यायव नाही. मात्र पायथ्यापासून पुढं गेलेली वाट मोठी नयनरम्य आहे… वाट जाते वळणावळणानं, डोंगराच्या ऐन कुशीतून. ना उतार ना चढ. समोर दिसतो रसाळगड. रसाळगडचा पश्चिम कडा. छाती उंदावून ताठ मानेनं खडा.

रणरणीत उन्हाची टळटळीत दुपार… उन सपाटून तापलं आहे… अंगाला चटचटू लागलं आहे… पायाखालची धूळ मनस्वी तापली आहे… वरून सूर्य आग पाखडतो आहे… सारा आसमंत पेटून उठला आहे… आगडोंब उसळला आहे…अंगाची लाही लाही, काहिली होते आहे… जीभ वळवळत सुकल्या ओठांवरून फिरते आहे… तोंडातली लाळं चिकट झाली आहे… तहानेनं घसा कोरडा पडलां आहे… खरंच, ‘नको ते गड पाहणं ‘ असं मनोमन वाटू लागलं आहे.

मधूनच एखाद्‌ दुसरी वार्याघची थंडगार झुळूक येते नि सर्वांगाला एक सुखद स्पर्श करून निघून जाते. तेवढ्यापुरतं बरं वाटतं. काळसर हिव्या रानातला फुललेला पळस चट्टदिशी लक्ष वेधून घेतो. क्षणभर सारं काही विसरायला लावतो… सह्याद्रित पलाशवृक्ष भरपूर. वसंतात त्यांना हिरवीशार कोवळी पालवी फुटते नि उन्हाळयात लालभडक फुले… गोरे लोक पास ‘फ्लेम्‌ ऑफ दी फॉरेस्ट’ म्हणतात तर आम्ही ‘ बौध भिक्षुकांचा थवा’ म्हणून. एकेकाची कवी कल्पना ! दुसरं काय!

पिछाडीच्या राखीव शिबंदीच्या नेतृत्वाची सारी सुत्रं मोऱ्यांच्या हाती सोपवून आम्ही काहीजण भराभरा पावलं टाकीत तात्याबाच्या अंगणी येवून थोडावेळ विसावतो नि तद्नंतर टुण्णदिशी गडावर येऊन थडकतो. तासाभरात चुकलं माकलेलं पिछाडीचं सैन्य हजर होतं. नि मग मुळातच तापट असलेले विनय दवे, हे असलं कोकणातलं वैशाखी ऊन खाऊन अधिकच तापतात, नि गुंजासारखे लालभडक डोळे वटारून आतल्या आत घुमसत राहतात. अशावेळी फक्त ‘बत्ती’ लावली कि दव्यांचा बुलंद तोफखाना एकदमच धुड$म॒ दिशी था$डथा5$ड गरजत काही वेळ आग पाखडीत बसतो. अहर्निश बाजारभावांचे चढ उतार करणारा हा प्लायवुडचा गुजराती व्यापारी, ह्या असल्या तीन गडांचे चढउतार एका दिवसात करून उशीरा का होईना पण रसाळगडी सुखरूप पोचला हे ध्यानी येताच मी त्याजवर राजी होतो. तबियत निहायत खूष होते नि तुरंत क्षणाचाही विलंब न लावता, सोन्याचं कडं नि एक उमदं घोडं त्यांना नजर करून ‘राय-ई-रायान ‘ हा सर्वोत्कृष्ट किताब त्यांना बहाल येतो (मनातल्या मनात).

तसं पाहिलं तर रसाळगड त्रिकोनी. दोन टोकं दक्षिणोत्तर तर तिसरं टोक निमुळतं होत पूर्वेला एका टेकडीवजा पर्वतराईत घुसलेलं. गडाच्या पोटाशी कड्याच्या ऐन गर्भातच कोरलेली दिसतात पाण्याची टाकी, पैकी दक्षिणेस असलेलं सुप्रसिद्ध खांबटाकं आकारानं चांगलं ऐसपैस, चाळीस फूट लांबीरूंदीचं. मधे चार लांब सोडलेले. वर्षांचे बारा महिने स्वच्छ नि नितळ पाण्याने तुडूंब भरलेले. कुण्या डोंगराच्या कुहरात हो असलो टाकी दिसली की समजावं तो किल्ल्ला जुना. ज्या दुर्गाजवळ गुहा नि विहार आहे, ते दुर्ग प्राचीन हे अगदी निःसंशय. ही अशी डोंगरांच्या कुशीत शिरून कोरलेली लेणी पाहिली कि, त्या त्या किल्ल्याचं प्राचीनत्व चट्टदिशी ध्यानी येत. त्याचा निर्मितीकाल ठरविता येतो. उदाहरणच द्यायच झालं तर राजमाची, लोहगड, विसापूर शिवनेरी नि रायगडादि किल्ल्यांचं देता येईल.

गडाला पोषक नि अत्यावश्यक असलेली बहुधा सारी लक्षणं याहि गडावर मोठ्या दिमाखानं विराजत असलेली. तट, बुरुज, दरवाजे, शिबंदोचे घरटे, हवालदार कारखानवीसांचे वाडे, बालेकिल्ला, बालेकिल्ल्यात खासा किल्लेदाराचं मकान, मधोमध आई वाघाईचं मंदिर, मंदिरा समोर दीपमाळ, बाजुला मुबलक पाण्याचे दोन हौद , नि याहून महत्वाचं म्हणजे लहान मोठ्या मिळून चौदा तोफा नि त्यांचे साठी असलेलं एक बुलंद दारुकोठार. दारु कोठारात असलेलं तळघर, जागोजागी असलेली लहानमोठी पाण्याची टाकी व तळी चक्क दगड्धोंडींनी, बुजुन गेली. खडखडीत कोरडी पडलेली. ह्या असल्या दुर्लक्षित जागा पाहिल्या ना कि हुकुमतपन्हा रामचांद्र अमात्य यांचं आज्ञापत्र आठवतं, “:दारूखाना घराजवळ घराचे परिघाखाली नसावा. सदरपासून सुमारास जागा बांधून त्यास तळघर करावे. तळघरात गच्च करावा. त्यात माल घालोन त्यावरचे दारूचे बस्ते मडकी ठेवावी बाण होके आदिकरून मध्य घरात ठेवावे. सर्दी पावो न द्यावी. आठपंधरा दिवसात हवालदाराने येऊन दारु, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्म देऊन मागुती मुद्रा करोन ठेवीत जावे. तसेच गडावर आधी उदक पाहोन किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळीटाकी पर्जन्यकालपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबूत बांधावी, गडावर झराही आहे. जसे तसे पाणीही पुरते, म्हणोन तितकियावरी निश्चिपती न मानावी. किनिमित्य की झुंजामध्ये मांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणी याचा खर्च विशेष लागतो. तेव्हा संकट पडते. याकरिता तसे जागी जखिरीयाचे (साठवलेले) पाणी म्हणून दोनचार टाको तळी बांधावी”.

रसाळगडच्या उत्तर टोकावर कुणा खाश्याची मशीद आहे. त्या मशिदीपाशी वा दक्षिण टोकावर असलेल्या टेहळणी बुरुजापाशी उभं राहिलं की उत्तरेकडील, दूरवर असलेले पालगड नि वासोटा हे दोन किल्ले दिसू शकतात. मात्र महिपतगडावरून प्रतापगड नि मकरंदगड या द्वयींचं होणारं सुरम्य दर्शन…ह्या सुरम्य दर्शनाला जोड नाही हे तितकंच खरं.

वर आकाशाचं घुमट पसरले आहे…त्यात लक्ष चांदण्यांचे दिवे लागले आहेत…आसमंत शांत आहे… निरवळ एकांत आहे…भन्नाट वारा मळभळतो आहे… अशावेळी आपण आपले नसतो…खोल कुठंतरी हरवलेले असतो…

सखेसोबती कलंडले आहेत. काहीजण डाराडूर आहेत. मी मात्र एकटाच समोरच्या दीपमाळेशी आहे. मनी असंख्य विचारांचं काहूर माजलं आहे. एक चिंता बोचते आहे. एक खंत टोचते आहे. एक शल्य कोचते आहे. वीसएक वर्षांपूर्वी जिथं वीस-बावीस तोफा होत्या. आता उण्यापुऱ्या फक्त चौदा उरल्या आहेत. बाकीच्या कुठं गेल्या? कुणाच्या भक्षस्थानी पडल्या? यांचे भक्षक कोण? या गोष्टीला निदान आता तरी वेळीच आळा घातला पाहिजे. त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे. असं न झाले तर अजून काही वर्षांनी एकही तोफ तिथं दिसणार नाही. अन्‌ दुर्दैवाने असे झालेच, तर मग ह्या दुर्गाचे दुर्गपणच नाहिसे होईल, आंगठीतला खडा निखळून पडल्यावर नुसत्या कोंदणाला ते काय महत्त्व? अशा असंख्प विचारांच्या झुंजात न कळत पापण्या मिटतात नि दुसऱ्या दिवशी सकाळी गडाचा जीवलावणा निरोप घेताना न कळतच पावलं घुटमळतात.. . मनी एक अनामिक काहुर माजतं… उरी कालवाकालव होते…साहजिकच अ!हे, गेले दोन दिवस गड आमचे होते…आम्ही गडाचे होतो…मागचे पुढचे सारे काही विसरून आम्ही एकरूप झालो होतो. एकजीव झालो होतो…ही ओढ रक्ताची आहे…हे प्रेम भक्ताचं आहे…हे नातं जोडलेले नाही, जडलेले आहे.

कित्येक ज्ञात अज्ञात पूर्वजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या भूमीला हात स्पर्शून तो भाळी टेकवतो नि विषण्ण मनानं गड उतरू लागतो.

त्या दिवशी, रसाळगडावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नि आतिथ्यशील असलेल्या देवघरच्या यशवंतराव मोऱ्यांकडे मुक्काम, नि दुसऱ्या दिवशी एस. टी. पकडून मुंबई.

संपादन: चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९




मूळ अंकाची छायाचित्रे

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply