मराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)
मराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)
कवी: स्व. सुधाकर र. रूपदे, पुणे
[प्रस्तावना: कवी: स्व. सुधाकर रूपदे ह्यांनी दि. २७ जून २०१२ रोजी, आपल्या मृत्यूच्या केवळ ३ दिवस अगोदर ही कविता लिहिली होती. तिसऱ्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी कविवर्य स्वर्गवासी झाले. कविता वाचताना देवाला भेटण्याची तीव्र इच्छा कवीच्या मनात निर्माण झाली आहे, हे स्पष्ट कळते. मृत्यूच्या केवळ ३ दिवस अगोदर असे काव्य स्फुरणे याला दृष्टांत म्हणावा की देवाची आस म्हणायचे, हे प्रत्येकाने आपापल्या श्रध्देनुसार ठरवावे.
कविवर्यांचे चिरंजीव, कवितेचे संकलक श्री. श्रीश रूपदे यांनी हि कविता आमच्या ब्लॉगला दिली आहे.]
देवाचा पत्ता
शपथ आहे तुला देवा माझी
सांग तुझा ठाव ठिकाणा आधी
स्वप्नी येऊन भेटतोस अनेकदा
दिपून जातो रूप तुझे पाहता
येशील पुन्हा स्वप्नात माझ्या
प्रथम सांग पत्ता तुझा ||१||
चराचरी भरून राहिलास तू
प्रत्यक्ष गाठभेट नाही अजुनी
आशा सुटेना अशी गत माझी
भेटण्याची तुला सांग आस सोडू कशी ||२||
माहित आहे मजला
तुझी वसती सर्वांच्या हृदयी
सगुण होऊन त्याची प्रचिती
द्यावी मजला अनुभूती ||३||
सांग मला तू सांग मला
आता तरी तुझा ठावठिकाणा ||४||
– सुधाकर (पुणे)
चित्र: सौ. नितु सावंत
कवीचा परिचय

स्व. सुधाकर र. रूपदे हे मूळचे पुण्याचे राहणारे.
त्यांना २ मुली आणि १ मुलगा आहेत, आणि बायको गृहिणी होती.
महाराष्ट्र मार्केटिंग फेडेरेशन, मुंबई येथे नोकरीला होते.
वाचन, लिखाण आणि साहित्य ह्यांची त्यांना चांगली पारख होती व त्यांनी ती त्यांच्या लेखणीतून सहजपणे व्यक्त केली आहे.
निस्वार्थी आणि समाधानी वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलू होत.
अजून कविता वाचा:
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील
सूर्य – कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे
आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – कवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे
