हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi

या यानाच्या बसूनी तळाशी, झेप घेऊया आकाशी,
चला मुलांनो भेट देऊया, ग्रहगोलांच्या नक्काशी||
हिरण्यगर्भाचा भरे अंबरी, नवरत्नांचा दरबार,
जमले सारे गोल मंडळी, ऊपग्रहही बरोबर||

अग्रस्थानी मान मिळविला छोट्या लाडक्या बुधाने,
राजाशी जवळीक साधता गिरक्या घेई जोमाने||
संक्रमणाचा जादू घडते छाया पडते सूर्यावर,
काळा टीका लावी राजाला नवलच दिसते पृथ्वीवर||
पीत अंबर नेसून आला राजाच्या ग दरबारी,
बुद्धीची देवता म्हणूनी मान मिळतो पृथ्वीवरी ||१||

दुसऱ्या स्थानी कोण चमकते पूर्वेच्या ग अंगणी,
तेजस्वी तारका ही तर शुक्राची ग चांदणी|||
सौंदर्याची पुतळी, ही तर बहीण देखणी पृथ्वीची,
रुपगर्विता म्हणती तिजला, मर्जी जिच्यावर शुक्राची||
वर्षापेक्षा दिवस मोठा, गोष्ट असे ही नवलाची,
प्रवाहाविरुद्ध जाऊनी हा दिशा बदलतो भ्रमणची ||२||

सुंदर अवनी असे दरबारी मानाच्या तिसऱ्या स्थानी,
सृजनतेचे वरदान लेवले, वंदू तिजला अग्रणी||
वाजत गाजत निघे पालखी, चांदोबाची चंदेरी,
गुलाम हा तर वसुंधरेचा, मान नाही त्या दरबारी||
सावल्यांचे अजब खेळ दाखवी, नाराज खट्टू ही स्वारी,
अरुणाचे कधी गर्व हारुनी, बिंब ही झाके पुरेपुरी||
कधी कट्टी घेऊनी हा मग अवनीस लोटे अंधारी,
लाटांसंगे खेळ रंगता खुष चांदोबाची स्वारी ||३||

लाजत गाजत हळूच डोकावी लाल गोजिरा मंगळ,
कुंडलीच्या अनिष्ट स्थानी बसता भीती वाटते अंमळ||
इवलासा हा जीव जरी तो दिलासा मानवी वंशाला,
मान तयाचा चौथा दरबारी, भालदार-चोपदार दिमतीला ||४||

अतिविशाल मग बृहस्पती ये लवाजमा ही भरपूर,
स्वतःमध्ये मग्न होऊनी गिरक्याही घेतो भराभर||
बडा घर पोकळ वासा पाचव्या रत्नाची ही दशा,
कुंडलीत इष्ट स्थानी पडता जीवनास मिळे योग्य दिशा ||५||

सात कंकणे लेवूनी मिरवी शनीदेवाची शानच न्यारी,
गुरुदेवांसम याचेही असती बडे प्रस्थ हो अंबरी ||
लोकांमध्ये भय पसरवी साडेसाती जव संसारी,
भाग्यवंत हो म्हणती त्याला कृपाछत्र याचे जयावरी||
सहावे स्थान असती ह्याचे हिरण्यागर्भाच्या दरबारी,
दूरदृष्टीने पाहून घ्या हो रुप तयाचे मनोहरी ||६||

कुणी म्हणती अरुण याला कोणी म्हणती प्रजापति,
नवलाईची गोष्ट याची, हा घेतो क्षैतिज गती||
विस्तारित होते कक्षा याने गंमत ही किती नवलाची,
सूर्याच्या दरबारी मिळवी जागा सातव्या स्थानाची||
तेरा कंकणे फिरती, त्याच्या लोभस मंडला भोवती,
शितल सौम्य घननीळ तो, लवाजमा ही सभोवती ||७||

वरुण असती आठवे रत्न हिरण्यगर्भच्या दरबारी,
मान शेवटचा मिळता चिडूनी जाऊन बसतो दुरवरी||
योग भेटीचा असे तयाचा पूर्वजांचे संचित,
शतकानुशतके भेटीस असते वसुंधरा ही वंचित||
दर्शन अशक्य असती ह्याचे नुसत्या ऊघड्या डोळ्यांना,
गणिते मांडून शोध लावला आठव्या मानाच्या रत्नाचा ||८||
काव्य सागरी उफाळून येती विविध हे भावतरंग,
शब्दफुलेही अचूक दाविती ग्रहगोलांचे अंतरंग,
आपण सारे करू सफारी हिरण्यगर्भाच्या दरबारी,
चला मुलांनो भेट देऊया ग्रहगोलांच्या नक्काशी ||
हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील
चित्रकार: सौ. नितु हार्दिक सावंत
Cover image Courtesy: Solar system for Kids Photo by NASA, Source: https://spaceplace.nasa.gov/planet-what-is/en/#
आणखी कविता वाचा: मराठी कविता – सूर्य (Marathi Kavita)

सुंदर छान ,👌👍