माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – लेखिका: स्मिता कढे – Narmada Parikrama
ठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात!
मुखपृष्ठ सौजन्य: https://www.kardaliwan.com/narmada
स्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama
नर्मदे हर!
[मागच्या दोन भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या तीरावरील प्रकाशा गावातील बलबला कुंडावर गेलो. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश झाल्यावर प्रसिद्ध शूलपाणीच्या जंगलाला वळसा घालून राज पीपला गावात मुक्कामाला पोहोचलो.
पुढे गुजरातच्या पश्चिम किनार्यावरील कटोपार गावातून नावेने रेवा सागर म्हणजे जिथे नर्मदा नदी समुद्राला मिळते त्याला वळसा घालून पलीकडच्या मिठी तलाई गावात पोहोचलो. तेथे पोहोचेपर्यंत समुद्रात सुमारे दीड मैल चिल्का आणि गाळातून चालावे लागले होते. तेथून पुढचा प्रवास हा नर्मदेच्या उत्तर ताटावरून झाला. वाटेत गरुडेश्वरला वासुदेवानंदसरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, पुढे मांडू गावातील ११०० वर्षे जुने श्रीरामाचे एकमेव चतुर्भुज मूर्तीचे दर्शन घेतले. जबलपूरच्या जवळील भेडाघाटला आल्यावर तेथील सुप्रसिद्ध ‘धुवाधार धबधबा’ पाहिला आणि सायंकाळच्या वेळेस भेडाघाटाच्या रंगीबेरंगी संगमरवरी डोंगरातून नर्मदेत फेरफटका मारला. आता पुढे …..]]
भाग ३रा सुरू:
नर्मदे हर ….!
नंतर रात्रीचा प्रवास करून आम्ही मृत्युंजय आश्रम अमरकंटक येथे पोहचलो. देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडणाऱ्या विंध्य – सातपुडा (Satpuda Mountains) पर्वतात आणि मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात हे स्थान येते. या स्थानापासून पर्वत उंच सखल होत होत अरबी समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. अमरकंटक हे स्थान मैकल पर्वतात आहे. याची समुद्रसपाटी पासूनची उंची ३५०० फूट आहे. रेवा नायक या राजाने येथे कुंडाची निर्मिती केली आहे. त्या राजाचा तेथे पुतळा आहे. नागपूरचे राजे भोसले यांनी येथे स्नानकुंड बांधले आहे. त्याचे स्वच्छतेचे काम चालू होते म्हणून आम्ही जवळच्या घाटावर स्नानाला गेलो. नेमावर व या ठिकाणी स्त्रीयांना कपडे बदलण्यासाठी छोट्या छोट्या पत्र्याच्या शेडस् उभ्या केल्या आहेत. बाकी कुठल्याही घाटावर ही सुविधा नाही. तरीही अंघोळ करताना वा कपडे बदलताना कोणीही स्त्रीयांकडे पहात नाही, किंवा अश्लिल टोमणेही कधी ऐकू आले नाहीत.
उगम स्थानी पांढरी साडी नेसायची मी ठरवले होते. नदीस्नान झाल्यावर मी कपडे करुन टपरीतून बाहेर आले. पांढरे केस तसेच पांढरे साडी ब्लाउज पाहून “नर्मदामैया” म्हणत सर्वांनी ओरडा केला. पण नुसत्या वेषाने गुण थोडेच अंगी येणार.

तेथे एकूण तीन नद्या उगम पावतात. एक नर्मदा, दुसरी शोण (हा नद आहे) आणि तिसरी जुहिली म्हणजेच भद्रा, अर्थात नर्मदेची मैत्रिण असे सांगतात. पूर्वी नर्मदा व शोण यांचे लग्न ठरले होते, पण शोणने जुहिलीशी लग्न केले. नर्मदा रागावली व तिने तोंड फिरविले आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागली. तर शोण व जुहिली पूर्वेकडे वाहू लागले व नर्मदा कुमारिकाच राहिली.


घाटावरुन गाडी दुसऱ्या रस्त्याने जाते. व यात्रिक डोंगरावरील जंगलातून चढ उताराची वाट चालत नदीच्या उगम स्थानी जातात. येथे नर्मदेची काळ्या पाषाणातील अतीसुंदर मूर्ती आहे. तेथील गुरुजी नर्मदेची आपल्याकडून शास्त्रशुद्ध पूजा करुन घेतात. सोबत आणलेले जल थोडे कुंडात ओतायचे व दुसरे भरुन घ्यायचे. येथे नर्मदेची बारीक धार आहे. जलाची पूजा झाल्यावर जल तर बदललेच, पण घरी नेण्यासाठी बाटलीभर तेथील जल घेतले. गुरुजींनी सुंदर माहिती दिली व शंका असल्यास विचारा असे सांगितले. मी दोन प्रश्न विचारले. एक नर्मदेला रेवा का म्हणतात व फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करतात?
त्यांचे उत्तर दिले, “नर्मदा खडकाळ भागातून जाताना खळखळाट करीत जाते. देवाने तिला भेडाघाटाचा डोंगर फोडण्याचे काम दिले होते. ते करण्यासाठी मला सतत शिवसन्निध्यात रहायचे आहे असे तिने सांगितले. आपण पहातोच, नर्मदे किनारी वा कोठकोठे प्रवाहातही शिवलिंग दिसतात. नर्मदेतील गोटे बाण म्हणून (शंकराची पिंड) देवघरात दिसतात. खडक फोडताना बारीक वाळू सारखे कणही उडतात, म्हणजे रेती (वाळू) तयार होते म्हणून तिला रेवा म्हणतात”.
जे चार प्रकल्प झाले त्यात सर्व नष्ट झाले. फक्त नर्मदा मैया व मार्कंडेय ऋषी त्यातून वाचले. तसेच ही एकच नदी पूर्वेला उगम पावून पश्चिमेला वहाते. तापी ही तशीच वहाते पण तिचा प्रवाह नर्मदे इतका खोल नाही.
तेथे एक गंमत झाली एक छोटा हत्ती होता. त्याच्या अंगाखालून बाहेर यायचे. त्या हत्तीची उंची कमी होती, बऱ्याच जणींनी प्रयत्न केला. कोणा कोणाला त्रास झाला.

नंतर आम्ही उगमस्थानच्या मागच्या बाजूने म्हणजे, माईच्या बगिच्यातून चालत चालत जिकडे बस थांबली होती तिकडे गेलो तिथे तर फारच गंमत झाली. चहूबाजूने घनदाट जंगल असल्यामुळे माकडांची कुटूंबच्या कूटूंबे तिथे नांदत होती. वाहानांवरील बॅगांवर त्यांचे लक्ष होते. ड्रायव्हरचे जरा दुर्लक्ष झाले, तर चढविलाच त्यांनी हल्ला! आमच्या बसवरील दोन बॅगा त्यांनी उघडल्या, त्यातील कपडे खाली टाकून खाण्याचे जिन्नस पळविले. एवढ्या गडबडीत एक माणूस तेथे मोठ्या पांढऱ्या शुभ्र काचेच्या पेल्यातून रस विकत होता. मी तहान व भुकेने व्याकुळ झाले होते, पण गाडीखाली उतरण्याची हिंमत होत नव्हती. गाडीतील जे खाली होते त्यांना पैसे देण्याची विनंती करत मी खिडकीतूनच ग्लास घेतला, तेवढ्यात माकडांनी पुन्हा हल्ला केला तसे सर्वजण पटापट गाडीत बसले. मीही पटकन रस पिऊन ग्लास त्याला दिला. तोही माकडांच्या भितीने पळत सुटला. मी गाडीतील सर्वांना पैशाबद्दल विचारले, पण सर्वजण आपण दिले नाहीत असे सांगत होते. मैयाने मला बहूदा शंकराचा प्रसाद दिला असावा.
माझी प्रदक्षिणेची खरी कळकळ तिला कळली असावी. मी कधीही थंड पाण्याने अंघोळ करत नाही, पण या अठरा दिवसात फक्त पहिल्या दिवशी मी गरम पाण्याने अंघोळ केली, नंतर सदैव गार पाणीच वापरले. तसेच मी उघड्यावर म्हणजे नदी किनारी कधीही अंघोळ करत नाही. मागे दोनदा केली पण दोन्ही वेळा मला ताप आला. परिक्रमेत मी जवळ जवळ चार पाच वेळा घाटावर अंघोळ केली. तसेच भर उन्हात व प्रवासात मी ऊसाचा रस पित नाही, मला लगेच बाधतो, पण परिक्रमेत मी ऊसाचा रस प्यायले व अगदी ठणठणीत घरी आले. म्हणून म्हणते, मैयाला माझी कळकळ समजली. एकटी प्रवासाला गेलेली मी, पण प्रवासात साथ संगत सुद्धा भावनिक नाते जोडणारी लाभली.
अमरकंटकहून येताना परतीच्या प्रवासात दोन गंमती घडल्या. आमचे मॅनेजर श्रीयुत खरे मागेच राहिले. माकडांच्या गडबडीने गाडी लवकरच पुढे पळवली. एका पेट्रोल पंपावर ही गोष्ट लक्षात आली. तेंव्हा तेथील कोणाची तरी स्कुटर घेऊन ड्रायव्हर त्यांना आणायला गेला. ते आल्याच्या आनंदात आणि वेळेवर पोहचायचे, या विचिराने गाडी ड्रायव्हरने लगेचच सुरु केली. पाच दहा मिनीटे गाडीने प्रवास केला. नंतर लक्षात आले की, बसमधील दोघी तिघी पेट्रोलपंपावरच राहिल्या. परत गाडी मागे घेऊन त्यांना बसमध्ये घेऊन गाडी निघाली. परत मृत्युंजय आश्रमात जेवणे केली . दुपारच्या चहा नंतर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. मैकल पर्वतात दुग्धधारा व कपिलधारा असे दोन धबधबे आहेत. दुर्वास ऋषींनी उग्र तपाचरण केले, तेथे मैया दुग्धधारांनी धांवली व कपिलऋषींनी जिथे तप केले तिथे ही सहस्त्रधारांनी धांवली, म्हणून धबधब्यांना अशी नावे पडली.
रात्रीचा प्रवास करुन सकाळी सकाळी आम्ही होशंगबादला हॉटेल संगिनी येथे उतरलो. बाकी लोक घाटावर गेले. मी मात्र रुमवरच अंघोळ केली. संध्याकाळी आम्ही सर्वच घाटावर गेलो. शांत वातावरण, फक्त घाटावरच उजेड व नदीवर पूर्ण अंधार. आकाशात चंद्र दिसत होता, तेथून उठूच नये असे वाटत होते. परत समाजाच्या गदारोळात अडकू नये असे वाटत होते. पण फरशीचा गारठा आणि बसलेल्या ठिकाणची कमी उंची, यामुळे उठल्यावर चालणे कठीण वाटले. म्हणून थोड्या जास्त उंचीवर बसावे, म्हणजे पटकन उठता येईल असे वाटले. जरा खालच्या पायरीवर ग्रुपमधील काही बायका होत्या. त्यांना मला दुसरीकडे बसते असे सांगायचे होते म्हणून हाका मारत होते. त्याही त्या दृष्यात गुंग झाल्या, त्यामुळे त्यांचे लक्ष गेले नाही. शेजारच्या ग्रुपमधील एकाचे लक्ष गेले. त्यांनी तत्परतेने पुढे येऊन खाली उतरण्यासाठी मदत देण्याची तयारी दर्शवली. नंतर त्या बायकांना मी सांगतो, तुम्ही चला असे म्हणून माझ्या हाताला धरुन त्या उंच जागेकडे मला चालविले. वाटेतच म्हणले चपला काढा. विचित्र मन साशंक झाले, पण चपला काढल्या तर, अहोआश्चर्य! त्यांनी माझ्या हातात चालू असलेल्या आरतीचे तबकच दिले. दररोज बाटलीतल्या जलाची आरती तर करतातच पण मला नर्मदेच्या पात्राचीच आरती करायला मिळाली. ही त्या मैयाचीच कृपा! डोळ्यात पाणी आले. मैयानेच माझ्याकडून पूजा करवून घेतली. माझ्या दादांची ईच्छा तिनेच पुरवली.
त्या दिवशी नरेनचा वाढ दिवस होता. म्हणून सर्वांना देता येईल असे काहीतरी स्वीट बाजारातून आणायला खऱ्यांना सांगितले. त्यांनी रसगुल्ले आणले होते. प्रत्येकी एक एक आला. जेवणा आधी मैयाची आरती केली. रात्री तिथेच मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारेश्वरासाठी रवाना झालो. दुपारी तीन वाजता तेथे पोहचलो. गजानन धर्मशाळेत जागा मिळाली नाही. दुसरीकडे उतरावे लागले. सर्वजण अगदी मॅनेजर व पुजारी सुद्धा सांगत होते कि, आजच संकल्पपूर्ती करा. पण जेवणे झाल्यावर संकल्पपूर्ती नको असे ठरले. बहुतेकांनी पहाटे रुमवरच अंघोळी केल्या. पहाटे चारला चहा घेऊन आम्ही घाटावर निघालो. घाटावर पूर्ण अंधार होता. पायाखालचा रस्ताही दिसत नव्हता. बऱ्याच उशीराने गुरुजींनी पूजा सांगितली. नंतर बरोबरचे जल थोडे प्रवाहात, थोडे ओंकारेश्वरावर आणि उरलेले सर्व ममलेश्वरावर घालायचे असे गुरुजी म्हणाले. संकल्पपूर्ती झाल्यामुळे आम्ही नावेतून नदी ओलांडून वर जावे का नाही या विचारात असतानाच वैशाली आणि सुजाता म्हणाल्या, “चल ममा, आम्ही आहोत बरोबर. तू स्वतःच्या हातानेच जल घाल”. त्यांनी मला उभारी दिली व मी वर गेले. माझे सामान इतरांनी घेतले. हळू हळू वर चढले. देवळात गर्दी तर खूपच होती. प्रत्येकाच्या हातात पाणी होते. आणि ते पाणी हिंदकळत होते. त्यामुळे सगळीकडे ओले झाले होते. गर्दीने धक्काबुक्की व रेटारेटी होत होती. अर्चनाताईंना फारच त्रास होऊ लागला. कोणीतरी, बहुतेक वैशाली असावी, त्यांना बाजूला काढले व त्यांना मोकळा श्वास मिळाला.
नंतर नावेने अलिकडे येऊन ममलेश्वराला आलो. तेथील घाट कसाबसा चढले. पुन्हा चालणे कठीण वाटले. तर गुरुजीच स्कुटर घेऊन आले. त्यांनी मला देवळात सोडले. इथेही मी स्वतःच्या हाताने पाणी घातले, रिकामी बाटली सिंधुताईंनी घेतली व परत घाटावर जाऊन घरी नेण्यासाठी भरुन आणून दिली. तेवढ्यात यशोदा मैयाने हांक मारली व आपण रिक्षाने रुमवर जाऊ, असे सांगितले. मंदिराबाहेरआल्यावर तिघी चौघी रिक्षाने रुमवर आलो.
आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मला नेहमीचा पायाचा अटॅक आला. अठरा दिवस निर्विघ्न पार पडले होते. मी चालूच शकत नव्हते. रिक्षा ड्रायव्हरच्या मदतीने मी फाटकाच्या आत एका खुर्चीवर बसले. रुममधील माझे सामान पॅक केलेलेच होते. ते मुलींनी बाहेर ठेवले. नाष्टा व जेवणाची पॅकेटस् देण्यात आली होती. बसमध्ये पुढील सीट माझ्यासाठी राखून ठेवण्यात आली. मी कशीबशी सीटवर बसले. ड्रायव्हर हिरालालने कौशल्य दाखवले, ११ वाजता ओंकारेश्वराहून निघून, बरोबर एक वाजता आम्ही इंदोर गाठले. कारण तेथून पुण्याची गाडी १.२०ला होती. तर कोणाचे पाचचे फ्लाईट होते. आमची अवंतिका एक्सप्रेस ४.२०ला होती. स्टेशनला सामान आत नेण्यासाठी हातगाडी ठरवली. पुरुषवर्ग सामानाबरोबर गेला. वैशाली व सुजाता यांनी स्टेशनमध्ये जाऊन माझ्यासाठी व्हिलचेअर आणली. गाडीत बसताना त्यांनी मला आधार देऊन सीटवर बसविले व माझे सामान सीटखाली नीट लावून दिले. ४.२० ला गाडी हलली. अर्चना व भावना पुण्याच्या गाडीने गेल्या. माझ्या पायाच्या अटॅकमुळे मी त्यांना बाय बाय पण करु शकले नाही. नंतर पाच- साडेपाचच्या सुमाराला पाय नॉर्मलला आला. पहाटे पहाटे गाडी मुंबई सेंट्रलला आली. ठाण्याला रहाणारे चौधरी यांनी मला टॅक्सीने घरापर्यंत सोडले.
प्रवासाला सुरुवात झाली, त्यावेळी कंपनीच्या कामगारांपैकी कोणीतरी माझ्या तोंडावरच म्हणाले, या वयात घरच्यांनी एकटे पाठवलेच कसे? मी त्यांना म्हटले, “तुमच्याच जबाबदारीवर”. तसे आम्हाला सांगितलेच होते. असे असूनसुद्धा त्या सर्वांनी खूपच छान काम व सर्वांची योग्य ती काळजी घेतली. माझे पाय खूपच सुजले होते. माझ्या सूनेने मोबाईल वर एका औषधाचा फोटो पाठविला रस्त्यात औषधाचे दुकान दिसताच केदारने ते औषध मला आणून दिले ग्रुपमधील सर्वांनीच एकमेकांना, विषेशतः मला खूपच मदत केली.
जरी आमची ट्रीप खूप छान झाली असली तरी एक फार मोठे गालबोट लागले व कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. आमचे मॅनेजर श्री. खरे, अतिशय साधे व गरीब स्वभावाचे. वेळोवेळी सदैव कुठल्याही कामाला तयार असणारे. ओंकारेश्वरी पहाटेच्या अंधारात अंघोळ करताना पाय घसरून पडले. त्यांना तर पोहता येत नव्हतेच पण पट्टीचे पोहणारेही त्या अंधारात पाण्यात उडी घ्यायला तयार झाले नाहीत. तेथे पाण्याची खोली ५०० फूट आहे असे म्हणतात.
शेवटी उजाडल्यावर म्हणजे सात साडेसातला त्यांचे पार्थीवच हाती आले.
नर्मदेमुळे त्यांचे सोने झाले, पण घरच्यांचे मात्र दररोजचे मरणच ना!
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!
समाप्त!

सूचना: सदर लेखात वापरलेली छायाचित्रे हि केवळ स्थानिक माहात्म्य वाचकांना कळावे, त्याचा अनुभव घेता यावा, म्हणून टाकली आहेत. ती छायाचित्रे परिक्रमे दरम्यानची नाहीत. मात्र क्षणचित्रात वापरलेली छायाचित्रे हि लेखिकेची स्वतःची परिक्रमे दरम्यानची आहेत.

लेखिकेचा परिचय
नाव: स्मिता श्रीहरी कढे
पूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे
वय: ७७
पत्ता: २, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२
मूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.
प्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड!
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.
त्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.
लोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.
भ्रमणध्वनी क्रमांक: 9930863006
Copyright Proof: Digiprove certificate id: P1462946 – Evidence of this text and HTML content has been created.
काही क्षणचित्रे







आमचे इतर लेख वाचा:
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग १
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग २
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ३
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ४
- मुंबई – पुणे पदयात्रा: भाग ५
