Marathi Story by Deepak Tamboli
| |

मोबदला – Marathi Story

मोबदलालेखक: दीपक तांबोळी. (‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा) – Marathi Story

शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, “अहो जरा अण्णांना बघता का? खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत”.

“हो. फ्रेश झालो की लगेच बघतो”.

बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते.

जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं.

“काय झालं अण्णा? काय होतंय?” स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं.

अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, “काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा”.

“म….ला…..दे……वा……क…..डे……जा….य…चं….य” परत हात वर करुन ते म्हणाले.

शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला, “मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा? त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”

अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले. “बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं?”

त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं. पण असं रडून चालणार नव्हतं.

स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं, “डॉक्टरांना बोलावू?”. त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला. “बरं, बरं. मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”. अण्णांनी होकारार्थी मान हलवली.

शिरीष बाहेर आला. “काय झालं? काय होतंय त्यांना?” नेहाने विचारलं.

“काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत. कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच” शिरीष गहिवरुन म्हणाला.

शिरीष योग्यच म्हणतोय हे नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्ष अण्णा पॅरालीसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही मोठे भाऊ निर्मल आणि गुणवंत तसंच त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिने मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत, घरी आलो की चहापाणी, स्वयंपाक करुन वाढणं, नंतर सगळं आवरणं केलं पाहिजे असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कामावरुन कटकटी वाढल्या आणि बायकांची भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं.

नेहाही जावांच्या अरेरावीला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसतांना त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं. नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खूप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच, संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही. त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांना पॅरालीसीस अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्या तरी घेऊन किती घेणार? माणूस ठेवला तर त्याचे पैसे कोण देणार? शिवाय त्यानं घरात चोऱ्यामाऱ्या केल्या तर? घरात परत एकदा भांडणं होऊ लागली.

अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं. शिरीषची संमती घ्यायचीही त्यांना गरज वाटली नाही. अर्थात शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची.

शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती.

पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.

झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला, “आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत”. मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला, “अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला”.

अण्णांनी मान डोलावली. रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरु होता. सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते. त्याला हायसं वाटलं, “कसं वाटतंय?”त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.

“अण्णा, मी येतो अंघोळ करुन. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन”. अण्णांनी मान डोलावली.

शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिलाही हायसं वाटलं. शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली, “अहो, अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही”.

शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, “डॉक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा. . . .”.

पुढे त्याला काही बोलता येईना. डॉक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करुन गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला. सगळ्यांना कळवणं भाग होतं.

त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला – निर्मलला फोन लावला. “दादा, अण्णा गेले” तो रडतरडत म्हणाला, “काय? असे कसे गेले मागच्या आठवड्यात तर चांगले होते. तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”.

“सकाळपर्यंत चांगले होते. अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये, मग सांगेन तुला सविस्तर”.

“अरे बापरे, शिरीष, आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार”.

तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला, “शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये. तिचे पैसे आता कोण देणार?”.

शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्याने फोन बंद करुन मधला भाऊ – गुणवंतला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली.

“ओ माय गॉड! शिरीष मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”.

“अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो”.

“मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळव”.

शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली. वडिल वारल्याचं कोणतंच दुःख त्याच्या बोलण्यातून जाणवत नव्हतं. पण आता ते बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता. निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता.

शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला, “अरे, मी दोन तासापूर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली तयारी? बरं आलोच”. जसा वडिलांच्या अंत्यविधीला येऊन तो शिरीषवर उपकारच करणार होता. सगळेजण त्याची वाट पहात बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.

तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता. तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच केला.

लेखक दीपक तांबोळी यांच्या आमच्या ब्लॉगवरील इतर कथा: Marathi Story

१. कर्तव्य
२. कुडंलीयोग
३. चूक

चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने न रहावून विषय काढला, “अरे शिरीष, अण्णांनी काही मृत्युपत्र करुन ठेवलं होतं का? नाही म्हणजे, आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटे हिस्से नको का व्हायला?”.

“दादा मला तरी मृत्युपत्राबद्दल काही माहीत नाही. आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही”.

“असं कसं म्हणता भाऊजी? त्यांची काही फिक्स डिपॉझिट्स असतील किंवा एखादा प्लॉट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?” शोभा वहिनी मध्येच बोलली.

“हो शिरीष”, गुणवंत म्हणाला.

“मरण्यापूर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे”.

वडिलांच्या मरणाचं दुःख नसणाऱ्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची मात्र खूप काळजी होती हे स्पष्ट दिसत होतं.

“रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते, ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं”. शिरीष आठवून म्हणाला.

“अरे मग वाट कसली बघतोस? लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.

शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला, “ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे”.

दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले. वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.

“मृत्युपत्रात खास असं काही सांगण्यासारखं नाही”, वकीलसाहेबांनी मृत्युपत्र काढून सांगायला सुरुवात केली

“निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात, तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही, तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये रहातोय, म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तीची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे, तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे”.

“याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत”, निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.

वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं. मग म्हणाले, “अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघां भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही आणि त्या तीस लाखाचं तुम्ही काय केलं? त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर”.

निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खूण केली.

“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा. आणि अण्णा तुमच्याकडे असतांना तुम्ही त्यांचे काय हाल केले हेही मला चांगलंच माहित आहे. तेव्हा बोलतांना सांभाळून बोला”, वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले. तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.

“बस्स. एवढंच होतं मृत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.

“पण वकीलसाहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे?” गुणवंतने विचारलं.

“ते मला कसं माहित असणार? तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा, ते सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी काहीही मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल”. गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब रागाने म्हणाले.

वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायका-मुलांसह निघून गेले.

ते गेल्यावर शिरीष नेहाला म्हणाला, “चला बरं झालं. सगळं व्यवस्थित पार पडलं. वाटे हिश्शांच्या भानगडीही मिटल्या”.

“ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खूपच कमी दिलंय?”

“त्यामानाने म्हणजे?”

“म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खूपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय”.

शिरीष हसला, “नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही”.

“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या मानाने, असं मला म्हणायचं होतं. विचार करा. तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं? त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरालीसीस झाला. पॅरालीसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. विचार करा या सात वर्षांत आपण अण्णांसाठी काय नाही केलं? या सात वर्षात कधीही आपण टुरला नाही गेलो. अण्णांना एकटं राहू द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्नासमारंभाला गेलो नाही. अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलावलं नाही. या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये भरती होते. तुमचे भाऊ परक्या माणसांसारखे भेटायला यायचे. कधी त्यांनी विचारलं की, “शिरीष, किती बिल झालं? आम्ही काही मदत करु का तुला?”. अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढल्या आहेत. मान्य आहे की ते आपलं कर्तव्य होतं. पण मग तुमच्या भावांची, वहिनींचीही काही कर्तव्यं नव्हती का? अण्णांनी केवळ तुम्हांलाच नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिलाय, त्यांनाही शिकवलं, मोठं केलंय मग त्यांचीही काही जबाबदारी नाही का? तुम्ही पाहिलंच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंतच सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला. इस्टेटीत वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेल्या खर्चात वाटा नको, ही कोणती पध्दत? निर्मल आणि गुणवंतने अण्णांचे हाल केले तरीही अण्णांनी इस्टेटीत त्यांना समान वाटा दिला. त्याचं मला वाईट वाटत नाही. पण आपण केलेल्या त्यागाचा, सेवेचा, खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा”.

शिरीष निशब्द होऊन ऐकत होता. नेहाचा एक एक शब्द त्याचं काळीज चिरुन जात होता. काय चुकीचं बोलत होती ती? आजवर तिने जे पाहिलं, अनुभवलं तेच तिच्या तोंडून बाहेर पडत होतं. शिरीषला ते पटत होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं ते त्याला कळेना. काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला, “तुझं म्हणणं बरोबर आहे गं, पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे काही असायला हवं ना? जे होतं ते त्यांनी वाटून दिलं. कदाचित निर्मलदादा, गुणवंत दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगारावर नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा”.

नेहा क्षणभर काहीच बोलली नाही. मग उसासा टाकून म्हणाली, “तसं असू शकतं. पण मन काही मानत नाही हेच खरं”.

रात्री बराच वेळपर्यंत शिरीषला झोप लागली नाही. नेहाचे शब्द आठवून तो वारंवार बैचेन होत होता. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हां तेव्हा नेहाचं बोलणं त्याला आठवायचं आणि तो मग भुतकाळात जायचा. त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी,काही बरेवाईट प्रसंग त्याला आठवू लागायचे आणि मग तो अस्वस्थ व्हायचा. अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागायची. आपल्या तुलनेत आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरुन दिलं याचं त्याला दुःख होऊ लागायचं. आठवडाभर त्याला या विचारांमुळे काम सुचत नव्हतं. कितीही झटकून टाकायचा प्रयत्न केला, तरीही ते विचार पुन्हापुन्हा त्याच्या मनाला चिकटून बसायचे. अर्थात आता करण्यासारखं त्याच्या हातात तरी काय होतं?

आठदहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असतांना रणदिवे वकीलांचा फोन आला, “शिरीष घरी आहेस का? यायचं होतं जरा बोलायला”.

“हो या ना. का हो काका काही विशेष काम?” त्याने विचारलं.

“अरे काही नाही, जरा बोलायचं होतं. मी आलो की सांगतो सर्व”.

“या, या, मी घरीच आहे”, शिरीषच्या पोटात खड्डा पडला.

निर्मल आणि गुणवंतने वकीलाला भेटून काही गडबड तर केली नसेल ना? दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहेत हे त्याला माहित होतं. अर्ध्या तासातच वकीलसाहेब घरी आले. शिरीषने नेहाला त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितलं.

“काका, निर्मल आणि गुणवंत दादालाही बोलावून घेऊ का?” त्याने वकीलांना विचारलं.

“नाही, नाही, हे फक्त तुझ्यासाठी आहे”, त्यांनी बँगेतून फाईल काढून ती उघडली. शिरीषचं ह्रदय धडधडू लागलं.

“तुला माहितच असेल की, अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर्सची उलाढाल करीत असत”.

“हो, पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं. आईला हे कळल्यावर तिचं अण्णांशी जोरदार भांडण झालं होतं. त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला होता”.

वकीलसाहेब हसले, “नाही, त्यांनी ट्रेडिंग बंद केलं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर्स विकत घेणं बंद केलं नाही”.

“अच्छा! पण या सगळ्याचा आता काय संबंध?”.

“तुला कल्पना नसेल, पण अण्णांनी जवळपास पंचवीस लाखाचे शेअर्स घेतले होते. त्यांचा शेअरब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळली. तीन महिन्यांपूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो. तू घरी नव्हतास आणि नेहा तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती. मी अण्णांना या शेअर्सबद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी करायची ते विचारलं, तेव्हा अण्णांनी ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले. मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना कळवू नये आणि त्यांच्या मृत्युनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावं. तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहेत. त्यांना या शेअर्सबद्दल कळलं तर ते त्यात हिस्सा तर मागतीलच. नाही दिला तर कोर्ट कचेऱ्याही करायला कमी करणार नाहीत अशी त्यांना भिती वाटत होती”.

“पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितलेत?”, नेहाने चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवत विचारलं.

वकीलसाहेब क्षणभर शांत बसले. मग म्हणाले, “अण्णांनी ते सगळे शेअर्स शिरीषच्या नावे केले आहेत”.

“काय? माझ्या नावावर?” आश्चर्याचा धक्का बसून शिरीषने विचारलं.

“हो! पण शिरीषम आनंदाची बातमी पुढेच आहे. या सर्व शेअर्सची आजची मार्केट वॅल्यू आम्ही काढली. ती जवळजवळ अडीच कोटीच्या आसपास आहे”.

“ओ माय गॉड! अडीच कोटी!!” शिरीषचे डोळे विस्फारले. नेहाही आ वासून वकीलांकडे पहात राहिली.

“आता हे तू ठरव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे”, वकील शिरीषला म्हणाले आणि त्यांनी फाईल मधून शेअर सर्टिफिकेट काढून त्याच्या हातात दिले.

“ते ठिक आहे काका, पण या शेअर्समुळे काही लीगल प्रॉब्लेम्स तर येणार नाहीत ना? अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर?” शिरीषने काळजीने विचारलं.

“तशी शक्यता फार कमी आहे. कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं मृत्युपत्र बनवण्याच्या आतच, ते शेअर्स कायदेशीररीत्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते. आणि तू जरा आता हुशार हो. तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ. त्या मानाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे. तरीसुध्दा तू आँफिसला आला की मी तुला समजावून सांगेन. आता जस्ट सेलेब्रेट. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली”.

“कोणती?”.

“अण्णांनी तुला विनंती केली आहे की, त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राध्दाला वृध्दाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावंस”.

“जरुर देईन काका”, वकीलसाहेब निघाले.

त्यांना निरोप देऊन घरात येता येता शिरीषची नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला गलबलून आलं. भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरल्या स्वरात तो नेहाला म्हणाला, “तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून? बघ त्यांनी असा मोबदला दिलाय की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही”.

नेहाच्याही डोळ्यात त्यावेळी अश्रूंनी गर्दी केली होती. पण त्याचसोबत अण्णांनी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला दिलाय याचंही समाधान तिच्या चेहऱ्यावर विलसत होतं.

दोघांच्या नजरेत “आता काय करायचं?” हा प्रश्न तर होताच शिवाय, ‘भाईला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केलीय’ याची जाणीवही स्पष्ट दिसत होती.

लेखक दीपक तांबोळी यांच्या आमच्या ब्लॉगवरील इतर कथा: Marathi Story

१. कर्तव्य
२. कुडंलीयोग
३. चूक

लेखक: दीपक तांबोळी. (‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा -Marathi )

लेखाचे सर्वाधिकार: लेखक दीपक तांबोळी – ९५०३०११२५०


लेखक परिचय:

दीपक मधुकर तांबोळी
दीपक मधुकर तांबोळी

वास्तव्य: जळगांव
रेल्वेत सिनियर सेक्शन इंजीनियर या पदावर कार्यरत
आतापर्यंत तीन पुस्तकं प्रकाशित झाली असून, चौथं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
या तीनही पुस्तकांना आतापर्यंत सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
Facebook Link of Author


या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह

Gift- Marathi Stories - Book By Writer: Deepak Tamboli
नवीन कोराकरकरीत कथासंग्रह – गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची – प्रकाशनपूर्व सवलतीत उपलब्ध आहे. मुळ किंमत रुपये 200/-, सवलतीची किंमत रुपये 150/- (टपाल खर्चासह).

💫 कथा माणुसकीच्या
💫 हा खेळ भावनांचा
💫 रंग हळव्या मनाचे

या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह
🌹 गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची🌹
प्रकाशनपूर्व सवलतीत उपलब्ध आहे. मूळ किंमत रुपये 200/-, सवलतीची किंमत रुपये 150/- (टपाल खर्चासह).
गुगल पे/फोन पे नं.- 9503011250 (पेमेंट झाल्यानंतर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा).


WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.47 PM
मुळ किंमत रु. २००/- | सवलतीची किंमत रु. १५०/-

लेखक दीपक तांबोळी यांची ह्रदयस्पर्शी कथांची इतर प्रकाशित पुस्तके

WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.48 PM 1
मुळ किंमत रु. २००/- | सवलतीची किंमत रु. १५०/-
WhatsApp Image 2021 05 21 at 2.04.48 PM
मुळ किंमत रु. १७५/- | सवलतीची किंमत रु. १५०/-

तिन्ही पुस्तकं एकत्रित घेतल्यास फक्त रु. ४००/-मध्ये (पोस्टल चार्जेस रु.५०/- अतिरिक्त)

जे पुस्तक हवे असेल त्या पुस्तकाची किंमत खालील खात्यात जमा करावी

Name: Deepak Madhukar Tamboli Bank
Name: Union Bank Of India
Branch Name: Sindhi colony Branch, Jalgaon
A/C No. 507002010000689
IFSC : UBIN0550701

किंवा आपण गुगल पे, फोन पे, पेटीएमने शुल्क 9503011250 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.
रक्कम भरल्यावर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा.

पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया ९५०३०११२५० ह्या मोबाईल क्रमांकावर लेखकाशी संपर्क करावा


Image Source Courtesy: https://lawrato.com/newsuploads/1581663820partition_of_property_legal_notice.jpg


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply