चूक – Marathi Story
चूक – लेखक: दीपक तांबोळी. (‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा) – Marathi Story
निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतांनाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात अँडमीट केलं. नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असतांना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पहात राहिले. निर्मलाबाईंची या वर्षातली दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती. आणि मागच्या दोन वर्षातली सातवी. खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासातापासांनी त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं. त्यामुळेच त्या वारंवार आजारी पडत होत्या. आता त्यांना कावीळ झाली होती. सगळं शरीर पिवळं पडलं होतं. मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. चारपाच दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं होतं. सलाईन सुरु होती. निर्मलाबाई डोळे मिटून पडल्या होत्या.
त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून वसंतराव रुममधून बाहेर आले. नातेवाईकांना ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते. कारण ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परीस्थीती निर्माण झाली होती. मागच्या वेळी निर्मलाबाईंना ऍडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजकेच नातेवाईक दवाखान्यात भेटीला आले होते. काहींनी तर चक्क दुर्लक्ष केलं होतं. पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक “अहो आम्हांला कळवायचं तरी! आम्ही परके आहोत का?” असं म्हणायला कमी करत नाही हे त्यांना अनुभवावरुन माहीत होतं. शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला. अर्धा तास ते फोन करत होते.
आता शेवटचा फोन राहिला होता. तो म्हणजे त्यांच्या मुलीला-दिपाला. “दिपा, तुझ्या आईला परत अँडमिट केलंय”.”अरे रामा! आता काय झालंय तिला?”.
“कावीळ झालीये. तीन चार दिवसांपासून खाणंपिणं सोडलंय. खूप अशक्त झालीये”.
“होणारच. पण बाबा तिच्या मागे काय हे आजारपण लागलंय कुणास ठाऊक? तुमचेही हाल होत असतील ना?”.
“असू दे गं. पण आता माझंही वय झालंय. असं काही घडलं की माझेही बी. पी. आणि शुगर वाढतात. थोडे कष्ट पडले की धाप लागते. कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागतं”.
“साहजिकच आहे. भाई जवळ असता तर त्याने हे सगळं सांभाळलं असतं. पण तो जाऊन बसलाय अमेरिकेत. बरं त्याला फोन केला होता की नाही?.
“नाही गं. त्याला फोन करुनही काय उपयोग? तो लगेच थोडाच येऊ शकणार आहे”.
“तेही आहेच म्हणा. आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणं जमणार कसं? पहा बाबा तो अमेरीकेत गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता, आता मात्र त्याने सगळं सोडून इथे यावं असं वाटू लागलंय”.
“ते शक्य नाही दिपा. एकदा का अमेरिकेच्या सुखसमृध्दीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही”.
“तेही खरंच आहे. पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करुन बघा. तो येवो न येवो. मी बघते. जमलं तर एखादी चक्कर टाकते. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यातून माझ्या सासरेबुवांचं नेहमीचं आजारपण. कसं जमेल काय माहीत?”.
“जाऊ दे. दगदग करुन घेऊ नकोस. निर्मलाच्या तब्ब्येतीबद्दल मी तुला कळवत राहीन”.
“चला, घ्या आईची काळजी” असं म्हणून तिने फोन बंद केला.
वसंतरावांना आता घरी जायचं होतं. निर्मलाबाई आणि स्वतः त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं. पण निर्मलासोबत कुणीतरी असणं गरजेचं होतं. त्यांना आपले लहानपणाचे दिवस आठवले. घरात इतकी माणसं असत की पेशंटसोबत कुणी रहायचं हा प्रश्नच निर्माण व्हायचा नाही. घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटची सोबत करत. समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हसी महत्वाची वाटू लागली. त्यामुळे संयुक्त कुटूंबपध्दती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. अगोदर कुटुंबातलं कुणाचं आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही. आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात आणिबाणी निर्माण व्हायची. नोकरी, घरातली कामं, फक्त विचारपुस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांची सरबराई यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे. वसंतरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच होते. मदतीला कुणीच येत नव्हतं.
जी गोष्ट नातेवाईकांची तीच शेजाऱ्यापाजाऱ्यांची. त्यांनाही शेजारी काय घडतंय याचं सोयरसुतक नव्हतं. माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झाली होती. तासनतास फेसबुक, व्हाँटस्अपवर पडलेल्या किंवा टिव्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळ नव्हता. असं आजारपण आलं की वसंतरावांना आपल्या अमेरिकेत असलेल्या मुलाची, अनुपची प्रकर्षाने आठवण यायची. तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती. आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं. पण काही इलाज नव्हता.
अनुपने अमेरिकेत जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती. त्याला अमेरिकेत नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते. आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही? तो अमेरिकेत गेला तेव्हा त्यांची आणि निर्मलाबाई दोघांचीही तब्ब्येत ठणठणीत होती. दहापंधरा वर्ष तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती. माणसाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती. अनुप अमेरिकेत गेल्यानंतर थोड्याच दिवसात वसंतरावांना बी. पी. आणि डायबेटीस झाल्याचं आढळून आलं. निर्मलाबाईही वारंवार आजारी पडू लागल्या. कधी मलेरिया तर कधी टायफॉईड तर कधी डेंग्यू. जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी होतीच. तीन महिन्यापूर्वीच त्या बाथरुममध्ये घसरुन पडल्या. कमरेचं हाड मोडलं. महिनाभर हाँस्पिटलमध्ये होत्या. त्यांचं सगळं वसंतरावांनाच करावं लागलं. नाही म्हणायला दिपा सात दिवस येऊन राहून गेली पण त्या सासुरवाशीणीवर तरी किती भार टाकणार? तिलाही तिचा संसार, नवरा, मुलं, सासुसासरे होतेच ना!
निर्मलाबाईंना नर्सच्या भरंवशावर सोडून वसंतराव घरी आले. स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती. काय करावं या विचारात ते पडले. शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली. टेबलवर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले. ते सगळं डब्यात पँक करुन ते निघाले. अक्टिव्हावर बसून त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला पण ती सुरु होईना. मेकॅनिक बऱ्याच दिवसापासून त्यांना तिची बँटरी बदलायला सांगत होता पण निर्मलाबाईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. बॅटरी गेल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडला लावली आणि किक्स् मारु लागले. पण आजारी गाडीने आज जणू असहकारच पुकारला होता. किक्स् मारुन वसंतराव थकले तरी ती सुरु होईना. थकलेले वसंतराव धापा टाकत उभे राहिले. शेजारी रहाणारं कुणीतरी येऊन गाडी चालू करुन देईल या अपेक्षेनं त्यांनी इकडेतिकडे पाहिलं. पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करुन बसणाऱ्यांना त्यांची असहायता थोडीच कळणार होती? शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली. डिक्कीतून डब्याची पिशवी काढून ते रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किमीवरच्या स्टाँपवर पोहोचले. एवढंसं चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता. रिक्षा पकडून ते हाँस्पिटलला गेले. निर्मलाबाईंची जेवायची इच्छा नव्हती पण वसंतरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं.
“तुम्ही जेवलात?”, निर्मलाबाईंनी विचारलं.
“नाही. तुझं झालं की बसतो” वसंतरावांनी पिशवीतून सँडविच काढले.
“हे काय? फक्त सँडविचवर भागवणार आहात का?”.
“आपली बाई आली नाही, नाहीतर कुठून तरी डबा मागवून घेतला असता”.
“जाऊ दे गं. आता म्हातारपणात भुक तरी कुठे लागते? त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार?”
निर्मलाबाई काही बोलल्या नाहीत पण वसंतरावांना वातड झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज घरात सुन असती तर ही वेळ आली नसती असं त्यांना वाटून गेलं. बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे ते सँडविच वसंतरावांनी कसेबसे संपवले. ते हात धुत नाहीत तर त्यांचे एक परीचित बायकोसह आले.
“काय म्हणते तब्येत वहिनींची? सध्या वारंवार अँडमिट होताय दवाखान्यात!” त्यांनी विचारलं.
“तब्येत थोडी बरी आहे. बिलिरुबीन कमी झालंय. तीन-चार दिवसांत मिळेल कदाचित डिस्चार्ज”.
वसंतराव म्हणाले, “मुलाला बोलावून घ्या अमेरिकेतून. अहो नातवंडांशी खेळायचे दिवस तुमचे आणि अशा आजारपणात हक्काचा मुलगा आणि सुन सोबतीला हवेच. अनुपला म्हणा भरपूर पैसा कमावला असशील तू. आता जरा आईवडिलांकडेही लक्ष दे. आईवडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कुणी करायची?”.
लेखक दीपक तांबोळी यांच्या आमच्या ब्लॉगवरील इतर कथा:
१. कर्तव्य
२. कुडंलीयोग
आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी वसंतरावांना हाच सल्ला देत होती.
“अहो असं एकदम सोडून कसं चालेल? सुनबाईही नोकरी करते. दोघंही भरपूर पैसे पाठवतात आम्हांला. त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात”.
“अहो वसंतराव, पैशाला काय करायचंयं? तुमचं पेन्शनच पुरेसं असेल तुम्हांला. पण बघाना तुमचे काय हाल होताहेत! घरात मुलगा, सुन असले की आजारपणही सुसह्य होतं. आमच्या प्रकाशलाही जर्मनीत नोकरी मिळत होती. पण आम्ही जाऊ दिलं नाही. असू देत कमी पगार, पण आज मुलगा, सुन आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं”. ही गोष्ट तर खरीच होती. वसंतरावांनाही ती पटत नव्हती असं नाही पण अनुपला नोकरी सोडून भारतात ये, असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं. बरेच उपदेश करुन परिचित निघून गेले.
ते गेल्यावर निर्मलाबाई म्हणाल्या, “मलाही वाटतंय हो अनुपला बोलावून घ्यावं. माझं काही आता खरं राहिलेलं नाही. कधी देव उचलेल त्याचा नेम नाही. मुलगा, नातवंडं समोर असली तर कमीतकमी समाधानाने तरी डोळे मिटेन”.
“असं का म्हणतेस? आताशी साठी गाठली आहेस तू! इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला? अजून चारधाम यात्रा बाकी आहे आपली”.
“मुलगा, सुन समोर असले तर कशाला हवं चारधाम? तुम्ही खरंच त्याला बोलावून घ्या”. वसंतरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली. रात्री नऊ वाजता अनुपचाच फोन आला. तो पाहून वसंतराव निर्मलाबाईंना म्हणाले, “भाईचा फोन आहे. भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको. फार बिझी असतो तो. उगीच त्याला टेंशन देऊ नकोस”.
निर्मलाबाईंनी मान डोलावली. अनुपशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल वसंतरावांकडे दिला. “हं बोल भाई. कसं चालू आहे?”.
“माझं काय नेहमीचं बिझी शेड्युल. तुमची तब्ब्येत बरी आहे ना? आईचं फार करावं लागतं ना तुम्हांला?” त्याने तसं विचारल्यावर वसंतरावांना एकदम गहिवरुन आलं, पण ते स्वतःला सावरुन म्हणाले, “चालायचंच भाई. आता आमची वयं झालीत. दुखणीखुपणी सुरुच रहाणार”.
“फार वाईट वाटतं हो मला. मी तिथं असतो तर तुम्हां दोघांचं आजारपण सांभाळू शकलो असतो. पण काय करणार? इलाज नाही. असो. मी प्रयत्न करतो येत्या आठदहा दिवसात भारतात यायचा पण नक्की सांगता येत नाही. मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही.यावेळी तरी प्रयत्न करतो”. अनुप नेहमी येतो येतो म्हणतो पण येत नाही हा नेहमीचाच अनुभव होता त्यामुळे वसंतराव यावर काहीच बोलले नाहीत. जुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दिपाचा फोन आला. “बाबा, मला तिकडे यायची खुप इच्छा आहे हो. पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती भयंकर गर्दी असते. आणि कोल्हापूरहून नाशिकला विनारिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे, हे तुम्हांला माहितीच आहे. तेव्हा यावेळी थोडं अँडजस्ट करुन घ्या. पुढच्या वेळी मी नक्की येईन. सॉरी हं बाबा”.
वसंतराव काय बोलणार होते? शेवटचा आधार गेला याचं त्यांना मनस्वी दुःख झालं. “ठिक आहे बेटा. आता हे नेहमीचंच झाल्यावर तू तरी किती वेळा येणार? बरं डॉक्टर आलेत. मी कळवतो तुला आईच्या तब्ब्येतीबद्दल”. तिच्या प्रतिसादाची वाट न पहाता त्यांनी काँल कट केला.
पाच दिवसांनी निर्मलाबाईंना डिसचार्ज मिळाला. नव्हे वसंतरावांनी डॉक्टरशी भांडून तो घेतला. घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते पार थकून गेले होते. अजून काही दिवस हाँस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं होतं. बारा दिवसांनी अनुपचा फोन आला. एक दोन दिवसांनी भारतात येत़ोय असं म्हणाला. नेहमीप्रमाणे सुनबाई, नातवंडं येणार नाहीत हे त्यांनी ग्रुहित धरलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलं नाही. भाई तीन वर्षांनी येतोय हे काय कमी होतं? नाही म्हणायला त्यांना आणि निर्मलाबाई दोघांनाही खुप आनंद झाला.
भाई आला तरी तीनचार दिवसांपेक्षा जास्त रहाणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यातले दोन दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते. त्यांच्या वाट्याला तो फार कमी येणार होता.पण हरकत नव्हती. आईला भेटायला येतोय हेच खूप होतं. अशक्तपणा वाटत असुनही निर्मलाबाईंनी त्याला आवडणारे खारेगोड पदार्थ करुन ठेवले. वसंतरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या.
दोन दिवसांनी सकाळी बेल वाजल्यावर वसंतरावांनी दरवाजा उघडला. समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. अनुपसोबत त्याची बायको मिताली उभी होती. सोबतच नातवंडांना पाहून वसंतराव हरखूनच गेले.
“या, या, आत या. खूप मोठं सरप्राईज दिलंस भाई. सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटलं नव्हतं”. मुलाला मिठी मारत ते म्हणाले. निर्मंलाबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं. “अहो, आई दवाखान्यात असतांना दिपाताईचा फोन आला होता. मला ती खुप रागावली. आईबाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलंस, वगैरे वगैरे”.
“खरंतर आईबाबा मला आणि मितालीलासुध्दा तुमची खुप आठवण येते. या वयात आम्ही तुम्हांला सांभाळलं पाहिजे असं आम्हांलाही वाटतं. पण अमेरिकेत राहून ते शक्य नाही. किंवा मग तुम्हीच अमेरिकेत आलात तरच शक्य आहे. पण तुम्हांला अमेरिकेत करमत नाही. तिथली लाईफस्टाईल तुम्हांला आवडत नाही. म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय”.
“कसला निर्णय?”, दोघांनी त्याला एकदमच विचारलं”.
“आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलंय. कायमचं!”.
“काय म्हणतोस काय? खरंच?”, विश्वास न बसून वसंतरावांनी विचारलं.
“हो बाबा. खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय. तुम्हां दोघांना अशा उतारवयात एकटं सोडणं आम्हालाही बरं वाटेना म्हणून आम्ही तसं ठरवलंय. शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्यं आहेतच ना!” त्याच्या या बोलण्यावर निर्मलाबाईंना भरुन आलं. त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली.
“पण मग तुझ्या नोकरीचं काय? सुनबाईच्या नोकरीचं काय ठरवलंय?” वसंतरावांनी विचारलं.
“मला पुण्यात एक जाँब मिळतोय. सुरुवातीला पन्नास हजार देणार आहेत ते. मग बघू पुढे. मितालीचं म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे. मुलांची शिक्षणंसुध्दा आहेत. त्यांच्याकडेही तिला लक्ष देता येईल. मात्र तुम्हांलाही आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. मी पुण्याला एक बंगला बघतोय. तिथंच आपण सगळे राहू.तु म्हांला वाटलं तर हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या. तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्यात दखल देणार नाही”.
नाशिकमधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने वसंतराव दुःखी झाले पण मुलगा, सुन, नातवंडांसोबत रहाण्यातही मोठं सुख होतं. ते त्यांना घालवायचं नव्हतं.
“चालेल चालेल. आपण भाड्याने देऊ” नातवाला जवळ घेऊन ते म्हणाले. त्यांनी मितालीकडे पाहिलं. ती मात्र या निर्णयाने खुष दिसत नव्हती. साहजिकच होतं. अमेरिकेतल्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि स्थिरस्थावर झालेलं एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणं कुणालाही आवडणारं नव्हतं. आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी म्हणजे लाखात एक असंच असेल. अनुप आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याचबद्दल वसंतरावांना अनुपचा अभिमान वाटत होता.
संध्याकाळी अनुप बायको मुलांसह त्याच्या मित्राकडे गेला. निर्मलाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकात गुंतल्या होत्या. वसंतराव टिव्हीवरच्या बातम्या पहात बसले होते. मुलगा आल्यामुळे एक प्रकारची तृप्ती, समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टिव्हीचा आवाज कमी करुन मोबाईल उचलला.
सोनटक्केंचा फोन होता. त्यांचा मुलगाही अमेरिकेत अनुपच्याच कंपनीत होता.”काय मग वसंतराव? सध्या खुष असाल मुलगा आणि नातवंडं आल्यामुळे!”.
“हो तर. अहो बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं. व्हिडीओ काँलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेच म्हणा. पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी!”.
“आमचा अभय म्हणत होता, अनुप जॉब सोडून भारतात चाललाय. खरंय का ते?”.
“हो खरंय. पुण्यात जाँब बघितलाय त्याने. तिथं घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून”. वसंतरावांच्या बोलण्यातून आनंद ओसांडून वहात होता.
“अहो वसंतराव फार मोठी चुक करतोय अनुप. तुम्हांला त्याने सांगितलं की नाही मला माहित नाही पण अभय सांगत होता की कंपनीच्या मँनेजमेंटने अनुपच्या परफाँर्मन्सवर खुष होऊन त्याला पार्टनरशिप आँफर केलीये. एक मराठी मुलगा अमेरिकेतल्या कंपनीचा मालक बनतोय वसंतराव. केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही! त्या आँफरमुळे अनुप अब्जोपती बनणार आहे अब्जोपती! तुमची सुनबाईही तिथल्या एका काँलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करतेय. एवढं ऐश्वर्य, एवढा सन्मान सोडून अनुप भारतात येतोय पन्नास हजाराच्या फडतूस नोकरीवर. आणि ते कशासाठी तर आईवडिलांची काळजी घेणारं कुणी नाही म्हणून. अहो वसंतराव, आपण आता पिकली पानं. कधी गळून पडू याचा नेम नाही. अशा या जिर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं हे तुम्हाला तरी पटतंय का? वसंतराव तुम्हांला एक मुलगी तरी आहे. अभय तर माझा एकुलताएक काळजाचा तुकडा. पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना?”.
वसंतराव कानात प्राण आणून सोनटक्केंचं बोलणं ऐकत होते. अनुपने हे आपल्याला का सांगितलं नाही बरं? आपण त्याचा निर्णय बदलवू म्हणून? सुनबाई नाराज दिसत होती ती याच कारणाने तर नव्हे?.
“ऐकताय ना वसंतराव?” सोनटक्केंनी विचारलं.
“हो हो ऐकतोय ना! अनुप खरंच काही बोलला नाही हो आम्हांला”.
“तुम्ही विचारा त्याला याबद्दल. तुम्हांला माहित असेलच अनुपची कंपनी अमेरिकेतली नावाजलेली कंपनी आहे. विचार करा केवढा मोठा बहुमान मिळतोय तुमच्या मुलाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्याच्याकडे जाऊन रहात?”.
“तो बोलवतोय हो आम्हांला पण आम्हांलाच आमचं घर, आमचे नातेवाईक, आमचा देश सोडावसा वाटत नाही. मागे एकदा गेलो होतो आम्ही त्याच्याकडे. चांगले महिनाभर होतो तिथे. पण करमत नव्हतं आम्हाला. कधी एकदा मायदेशी परततो असं होऊन गेलं होतं. ज्या गावात, ज्या देशात आमचा जन्म झाला, जिथे लहानाचे मोठे झालो, ज्या मातीत आमची पाळंमुळं आहेत ती तोडून एका वेगळ्या संस्कृतीतल्या परक्या देशात जायला, त्या देशाला आपला म्हणायला मन तयार होत नाही. काय करणार!”.
“इथंच चुकतो आपण! आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो. सुख, समाधान, करीयर, पैसा की आपले आईवडील, आपला देश यांची निवड करणं त्यांना अवघड होऊन बसतं. ठिक आहे. निर्णय तुम्हांला घ्यायचाय. शेवटी अनुप तुमचा मुलगा आहे”, सोनटक्केंनी फोन ठेवला.
वसंतरावांचा चेहरा आता गोंधळाच्या रेषांनी व्यापून टाकला होता. काय योग्य, काय अयोग्य हे त्यांना समजेनासं झालं.
“काय झालं? कुणाचा फोन होता?”, निर्मलाबाईंनी विचारलं. वसंतरावांनी त्यांना सोनटक्के काय म्हणाले त्याचा शब्द नी शब्द सांगितला.
“अरे बापरे! भाई आपल्याला तसं काही बोलला नाही. तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं”.
वसंतराव काही बोलले नाहीत.त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. रात्री अनुप आला. जेवणं झाल्यावर वसंतरावांनी त्याला सोनटक्केंचा फोन आल्याचं आणि त्याला मिळालेल्या ऑफरबद्दलही सांगितलं.
“हो बाबा ही खरी बातमी आहे. खूप चांगली आँफर आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत. त्यांना मुलबाळ नाही. ते मलाच आपला मुलगा मानतात. त्यांच्या पश्चात मीच त्यांच्या कंपनीचा मालक होईन अशी परीस्थीती आहे. पण बाबा तुमचीही आता वयं झालीत. म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कुणी करायची? काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशातही कंपनी सुरु करु शकेन असा मला विश्वास आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलाय”.
“आमची काळजी करु नकोस भाई”, निर्मलाबाई म्हणाल्या, “आमचं काय आज आहोत उद्या नाही. आमच्यासाठी तू ही सुवर्णसंधी वाया घालवू नकोस”.
“बरोबर म्हणतेय तूझी आई, भाई” वसंतराव मध्येच म्हणाले.
“अमेरिकेसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खुप संघर्ष करावा लागेल. इथला भ्रष्टाचार, पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाहीत. आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ. गावाकडे मिळेल एखादा माणूस. तो घेईल आमची काळजी. स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे”.
“पण बाबा बाहेरची माणसं शेवटी बाहेरचीच असतात. ती फक्त पैशासाठी कामं करीत असतात.त्यात आपुलकी, प्रेम वगैरे काही नसतं”.
वसंतरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले, “किती काळजी करशील आमची? जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचंच आहे”.
त्यांच्या गळ्यात हात टाकून अनुप म्हणाला, “असं नका म्हणू बाबा. तुम्हांला अजून खुप जगायचंय.”
निर्मलाबाईंचेही डोळे पाणावले. पदराने डोळे पुसत त्या म्हणाल्या, “भाई, जा तू परत अमेरिकेला. आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. तुझा अभिमान वाटतो आम्हांला”.
“ठिक आहे मी जाईन. पण तुम्ही दोघं मला वचन द्या, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही. आणि काही झालं की मला लगेच कळवाल. मान्य आहे की मला इथे यायला अनेक अडचणी येतात पण मला तुम्ही आपलं समजता याचं तर समाधान मिळेल. यावेळी आईच्या आजारपणाचं तुम्ही मला कळवलं नाही. मला दिपाताईकडून कळलं”.
“बरं बाबा कळवत जाऊ” वसंतरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगलं हास्य फुललं होतं.
अनुपला अमेरिकेला जाऊन आता महिना उलटला होता. त्याच्या आग्रहाखातर वसंतरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा. एक दिवस वसंतरावांच्या पँटच्या खिशातून पैसे चोरतांना निर्मलाबाईंनी त्याला रंगेहात पकडल्यामुळे वसंतरावांनी त्याला हाकलून दिलं.
एक दिवस वसंतरावांना सणसणून ताप भरला. शरीरातले सांधे दुखायला लागले. परीस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातापायाची हालचाल सुध्दा करता येईना. कामवाल्या बाईच्या मुलाच्या मदतीने निर्मलाबाईंनी त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि वसंतरावांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान केलं. वसंतरावांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही.
तीन मजले चढून निर्मलाबाई वसंतरावांसाठी डबा घेऊन आल्या. हॉस्पिटलची लिफ्ट दोन दिवसांपासून बंद पडली होती. जिन्याची एक एक पायरी चढतांना त्यांचा जीव जात होता. दोन ठिकाणी बसत आणि धापा टाकत कशाबशा त्या वसंतरावांच्या रुमपर्यंत पोहचल्या. वसंतराव पलंगावर वेदनांनी विव्हळत पडून होते. सलाईन सुरु होती.
“आजी मी तुम्हांला कितीवेळा सांगितलं की तुम्ही यांच्यापासून दुर रहा. नाहीतर तुम्हांलाही स्वाईन फ्लू व्हायला वेळ लागणार नाही” डॉक्टरांनी रुममध्ये आल्या आल्या निर्मलाबाईंना रागावलं.
“अहो घरात दुसरं कुणीच नाहिये. त्यांना एकटं सोडून कसं चालेल? मलाच करावं लागणार ना?”
डॉक्टरांनी वसंतरावांना तपासता तपासता नाराजीने मान हलवली. “तुमच्या मुलाला नाहीतर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या”.
“मुलगा अमेरिकेत आणि मुलगी कोल्हापुरात असते. नातेवाईकांना वेळ नाही. सांगा कुणाला बोलवू?”.
डॉक्टर शांत राहिले. मग वसंतरावांना तपासून म्हणाले, “मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो. अशा परीस्थितीत तुम्ही फिट रहाणं फार महत्वाचं आहे” ते निघून गेले.
अनुपला फोन करुन बोलवावं का असा त्यांच्या मनात विचार आला पण तो त्यांनी खोडून टाकला. मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करुन तो ठेवून दिला. थकल्यामुळे त्यांना झोप लागली. संध्याकाळी वसंतरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली. त्यांचं सर्वांग दुखत होतं. कसंबसं त्यांनी वसंतरावांना पाणी दिलं आणि त्या धपकन पलंगावर आडव्या झाल्या.
कसकस होत होती म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्याच. त्यांना सणकून ताप भरला होता.
“काय झालं?” वसंतरावांनी क्षीण आवाजात विचारलं.
“अहो मला ताप भरलाय”, त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं.
दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं.
दोघांच्या नजरेत “आता काय करायचं?” हा प्रश्न तर होताच शिवाय, ‘भाईला अमेरिकेला परत पाठवून आपण फार मोठी चूक केलीय’ याची जाणीवही स्पष्ट दिसत होती.
लेखक दीपक तांबोळी यांच्या आमच्या ब्लॉगवरील इतर कथा:
१. कर्तव्य
२. कुडंलीयोग
लेखक: दीपक तांबोळी. (‘रंग हळव्या मनाचे’ या पुस्तकातील एक कथा)
लेखाचे सर्वाधिकार: लेखक दीपक तांबोळी – ९५०३०११२५०
लेखक परिचय:
या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह

💫 कथा माणुसकीच्या
💫 हा खेळ भावनांचा
💫 रंग हळव्या मनाचे
या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह
🌹 गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची🌹
प्रकाशनपूर्व सवलतीत उपलब्ध आहे. मूळ किंमत रुपये 200/-, सवलतीची किंमत रुपये 150/- (टपाल खर्चासह).
गुगल पे/फोन पे नं.- 9503011250 (पेमेंट झाल्यानंतर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा).
लेखक दीपक तांबोळी यांची ह्रदयस्पर्शी कथांची इतर प्रकाशित पुस्तके
तिन्ही पुस्तकं एकत्रित घेतल्यास फक्त रु. ४००/-मध्ये (पोस्टल चार्जेस रु.५०/- अतिरिक्त)
जे पुस्तक हवे असेल त्या पुस्तकाची किंमत खालील खात्यात जमा करावी
Name: Deepak Madhukar Tamboli Bank
Name: Union Bank Of India
Branch Name: Sindhi colony Branch, Jalgaon
A/C No. 507002010000689
IFSC : UBIN0550701
किंवा आपण गुगल पे, फोन पे, पेटीएमने शुल्क 9503011250 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.
रक्कम भरल्यावर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा.
पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया ९५०३०११२५० ह्या मोबाईल क्रमांकावर लेखकाशी संपर्क करावा
Image Source Courtesy:
- https://www.onmanorama.com/news/india/2021/06/07/eight-injured-as-mumbai-kolkata-flight-hits-severe-turbulence.html
- https://www.indiatvnews.com/news/india-77-indian-parents-expect-to-live-with-sons-in-old-age-329687
