न्याय – Marathi Story Short
न्याय – लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा) – Marathi Story Short
शिपायाने “आत जा” म्हटल्यावर अशोक केबिनमध्ये जायला निघाला. एक क्षण तो दरवाजातच थबकला. आजचा हा त्याचा दोन वर्षातला तेरावा इंटरव्ह्यू होता.
“आज तरी सिलेक्शन होऊ दे रे देवा” त्याने मनोमन देवाची प्रार्थना केली. मग धडधडत्या ह्रदयाने तो दार लोटून आत शिरला. समोरच बसलेल्या करारी चेहऱ्याच्या अग्रवालशेठला त्याने नमस्कार केला आणि आपली फाईल त्यांच्यासमोर ठेवली. अग्रवालशेठने त्याला साधं “बसा” म्हणण्याचंही सौजन्य दाखवलं नाही.
“अरे बापरे! तुम्ही तर मेकॅनिकल इंजीनियर आहात. अशोक, मग तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी का अप्लाय केलात?” अग्रवालशेठने अशोकच्या प्रमाणपत्रांकडे बघत विचारलं.
अशोक ओशाळवाणं हसला. मग म्हणाला.
“काय करणार सर, दोन वर्ष झालीत बी. ई. होऊन, पण अजून नोकरी नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, त्यामुळे…”.
“काय करतात वडिल तुमचे?”
“गणपती मंदिराजवळ फुलांचं दुकान आहे सर आमचं”.
” बी. ई. झाल्यानंतरच्या या दोन वर्षात तुम्ही काय करत होता?”.
“नोकरीच शोधत होतो सर इंटरव्ह्यू देत होतो”.
“मग एकाही ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं नाही?”
“झालं होतं. भोपाळ आणि दिल्लीच्या कंपनीत झालं होतं. पण एकुलता एक असल्याने आईवडील इतक्या दूर पाठवायला तयार नव्हते. तिथं गेलो असतो तर मलाही आईवडिलांची काळजी लागून राहिली असती. म्हणून गेलो नाही”.
“ओह! पण तुम्हाला कल्पना आहे ऑफिस असिस्टंटला काय काय काम असतात ती?”.
“हो सर. सगळी नॉन टेक्निकल काम असतात. पण ईलाज नाही सर. माझ्या आईवडिलांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. बी. ई. झाल्यावर मी नोकरीला लागून चांगला पगार कमवेन असं त्यांना वाटत होतं. मात्र दोन वर्षांपासून मी रिकामा बसून आहे. एकुलता एक मुलगा असल्याने ते मला बोलत नाहीत पण त्यांच्या वेदना मी समजू शकतो. या नोकरीमुळे कमीतकमी मी कुठेतरी गुंतल्याचं आणि काहीतरी कमवत असल्याचं समाधान तरी त्यांना मिळेल”.
अग्रवालशेठ विचारात पडले. गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या फॅक्टरीत एका मेकॅनिकल इंजीनियरची जागा रिकामी होती. अशोकला तिथे पाठवता आलं असतं पण त्याला इंजीनियरचा पंधरावीस हजार पगार द्यावा लागला असता. शेठ महाधूर्त होते. त्यांनी खेळी खेळायचं ठरवलं.
“ठिक आहे अशोक. तुम्ही उद्यापासून येऊ शकता. तुम्हांला पाच हजार पगार देऊ आम्ही. ऑफिसची सर्व कामं तुम्हाला करावी लागतील. मात्र वेळ पडली तर शिपायाची कामंही तुम्हांला करावी लागतील”.
“येस सर, मला कल्पना आहे त्याची”. अशोक खूष होऊन म्हणाला.
जसा तो जाण्यासाठी वळला शेठ म्हणाले.
“अजून एक, आता तुम्ही इंजीनियर आहात तर आमच्या फॅक्टरीत गरज लागली तर जाल ना?”
“जाईन की सर. ते काम जास्त आवडेल मला”.
शेठ हसले. त्यांचा हेतू साध्य झाला होता.
दोनतीन दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर अशोकला फॅक्टरीत बोलावण्यात आलं. कामकाज समजावून देण्यात आलं आणि दुसरा इंजीनियर मिळेपर्यंत तिथेच काम करावं असं सांगण्यात आलं. अशोकलाही आपल्या शिक्षणाशी संबधित काम मिळालं याचा आनंद झाला. थोड्या दिवसातच तो फॅक्टरीत रुळला. मेहनती आणि हुशार असल्याने उत्पादनाशी संबधित सर्व बारकावे त्याने पटकन आत्मसात केले. क्वालिटी आणि क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याने बऱ्याच सुधारणा केल्या त्या चांगल्याच यशस्वी ठरल्या. त्याच्या लक्षात आलं की इथले कामगार खूप बेशिस्त आहेत. वेळीअवेळी मशीन्स बंद करुन तंबाखू, गुटखा खाणं, केव्हाही चहा प्यायला जाणं, काम सोडून गप्पा मारत बसणं असे उद्योग चालायचे. प्रॉडक्शन मॅनेजरला सांगून त्याने त्यांच्यावर बंधनं आणली. त्यामुळे कामगार दुखावले पण उत्पादन वाढलं. कंपनीचा नफा वाढू लागला.
तीन महिने झाले तरी दुसरा इंजीनियर आला नाही. किंबहुना मॅनेजमेंटनेच कुणाला नियुक्त केलं नाही. अशोकचा पगारही पाच हजारावर गेला नाही. वीस पंचवीस हजार पगार घेणारे दुसरे इंजीनियर्स आता त्याची टिगलटवाळी करु लागले. महाधूर्त असणाऱ्या अग्रवालशेठनी त्याचा पाच हजारात कसा बकरा केला यावर हशा पिकू लागला. अशोकलाही ते समजत होतं. पण मोठ्या मुश्कीलीने ही नोकरी मिळाली होती आणि जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी सोडून चालणार नव्हतं. परत आईवडिलांना दुःखी करण्याची आणि त्यांच्यावर ओझं व्हायची त्याची तयारी नव्हती.
मध्यंतरी अग्रवालशेठनी सगळ्या इंजीनियर्सची मिटींग घेतली. त्यात त्यांनी अशोकची खुप प्रशंसा केली. “कमी पगारातही अशोकचा परफॉर्मन्स एक्सलन्ट असून वीस पंचवीस हजार पगार घेणाऱ्या इंजीनियर्सनी त्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे”, असं ते म्हणाले तेव्हा अशोकची छाती अभिमानाने फुलून आली. अग्रवालशेठनी त्याला पगारवाढीचंही आश्वासन दिलं.
अशोकला आता फॅक्टरीत ११ महिने झाले होते. अग्रवालशेठनी त्याला दिलेलं पगारवाढीचं आश्वासन पाळलं नाही. तो निराश झाला पण इमानदारीने काम करणं त्याने सोडलं नाही. कधीतरी शेठना दया येऊन ते पगार वाढवतील अशी त्याला खात्री होती.
त्यातच एक दुर्दैवी घटना घडली. फॅक्टरीत कामगार युनियनची निवडणूक होऊन गुंड प्रव्रुतीचे प्रतिनिधी निवडून आले. त्यांनी फॅक्टरीतील वातावरण बिघडवून टाकलं. अशोकच्या रोजच कामगारांशी बेताल वागण्यावरुन आणि कामं करण्यावरुन कटकटी होऊ लागल्या.
एक दिवस तंबाखू खाण्यावरुन एका कामगाराशी अशोकचा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. आजबाजूच्या कामगारांनी आपापल्या मशीन्स बंद केल्या आणि अशोकला मारायला सुरुवात केली. सिक्युरिटीने वाद सोडवला पण अख्ख्या फॅक्टरील्या कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केलं. जोपर्यंत फॅक्टरीत अशोक आहे तोपर्यंत काम सुरु होणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. फॅक्टरीच्या डायरेक्टर्सची तातडीने बैठक झाली, आणि त्यात अशोकला फॅक्टरीतून काढून टाकायचा निर्णय घेण्यात आला.
दुसऱ्या दिवशी अग्रवालशेठनी अशोकला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. काय होणार याची पुसटशी कल्पना असल्याने धडधडत्या ह्रदयाने अशोक केबिनमध्ये शिरला.
“या अशोक बसा. जे घडलं ते वाईट घडलं”.
अग्रवालशेठनी बोलायला सुरुवात केली. “यात तुमची काही चूक आहे असं मला वाटत नाही. पण माझा काही इलाज नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने तुम्हांला काढून टाकायचा निर्णय घेतला आहे”.
अशोकचे डोळे अश्रूंनी भरुन आले.
“सर मी जे काही केलं ते फॅक्टरीच्या हितासाठीच होतं. कामगार बेताल झाले होते. केव्हाही मशीन्स बंद करुन तंबाखू खाणं, चहा प्यायला जाणं, गप्पा मारणं असे उद्योग सुरु होते. मी त्यांना हटकलं तर त्यांनी सरळ मारहाणीला सुरुवात केली”.
“मला मान्य आहे. एक वर्षापासून मी तुम्हाला ओळखतोय. तुम्ही चांगलं काम करताय. पण तुम्ही जाणताच दोन दिवसांपासून फॅक्टरी बंद आहे. लाखोंचं नुकसान होतंय. एका माणसासाठी एवढं नुकसान आम्ही सहन करु शकत नाही”.
“सर पण प्लिज मला काढू नका. मी ऑफिस असिस्टंट म्हणूनही काम करायला तयार आहे”.
“तिथे तर दोन माणसं अगोदरच काम करताहेत. त्यामुळे ते शक्य होणार नाही”.
अशोक आता रडकुंडीला आला.
“सर मी माझ्या आईवडिलांना कसं तोंड दाखवू? त्यांना हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल”.
दुःखाने अशोकच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले. अग्रवालशेठनी खांदे उडवले.
“आय अॅम सॉरी. तुमचा हिशोब तयार आहे. कॅशियरकडून जाऊन घ्या”.
अशोक जड अंतःकरणाने उठला. दरवाजाजवळ जाऊन त्याने दरवाजा उघडला. अग्रवालशेठ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. त्यांच्याही मनात विचारांचं वादळ उठलं होतं. अशोकला असं काहीही चूक नसतांना काढून टाकणं त्यांच्या मनाला कुठंतरी बोचत होतं. एकाएकी त्यांनी निर्णय घेतला.
“थांबा अशोक”.
अशोक वळला. त्याने चमकून शेठकडे पाहिलं.
“या फॅक्टरीतून तुम्हांला काढलं असलं तरी आमची नाशिकची कंपनी तुम्ही जॉइन करु शकता”.
अशोकला आपण काय ऐकतो आहोत ते समजेना.
“काय म्हटलात सर?”.
“होय अशोक तुम्ही योग्य तेच ऐकताहात. तुमची तयारी असेल तर आमचं नाशिक युनिट तुम्ही जॉइन करु शकता. अर्थात त्यासाठी तुम्हांला आईवडिलांना सोडावं लागेल किंवा त्यांना तुम्ही तिथेही घेऊन जाऊ शकता”.
“सर, पण तिथे तुम्ही पाच हजार पगार द्याल ना मला?”. अशोक थरथरत्या आवाजात म्हणाला. अजूनही तो संभ्रमावस्थेतच होता.
अग्रवालशेठ हसले, “नाही अशोक तिथे तुम्हाला पाच नाही, पन्नास हजार रुपये पगार मिळणार आहे”.
“सर चेष्टा करताय माझी अशोक अविश्वासाने म्हणाला.
“नाही अशोक, तिथे तुम्ही सुपरवायझर नाही तर प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून जाताय. तुमची हुशारी, मेहनत, प्रामाणिपणा पाहून कधीपासूनच ते माझ्या मनात आलं होतं. पण नाशिकच्या युनिटमध्ये जागा नव्हती. तिथल्या प्रॉडक्शन मॅनेजरने परवाच कंपनी सोडल्यामुळे ती संधी आज अशा प्रकारे चालून आली. तुमच्यावर नशिबाने, कामगारांनी आणि आम्हीसुद्धा खरोखरच खूप अन्याय केलाय. आता न्याय करायची वेळ आलीये”.
अशोक आनंदला.
“सर पण मला दोन दिवस वेळ द्या पुढची सगळी व्यवस्था करायला”.
“काहीच गरज नाही अशोक. तिथे टू बिएचकेचा वेल फर्निश्ड फ्लॅट रेडी आहे. बाकी सर्व व्यवस्थाही परफेक्ट आहे. तुम्ही फक्त बॅग पॅक करा. उद्या सकाळी तुम्हाला घ्यायला गाडी येईल. तुम्ही जोपर्यंत नोकरीत रहाल तोपर्यंत ती कायम तुमच्याकडेच राहील”.
अशोकच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले. तो पुढे येऊन शेठजींच्या पाया पडू लागला.शेठजींनी त्याला उचलून छातीशी धरलं.
“अशोक, एक गोष्ट मला नेहमी खटकते. तुम्ही मराठी तरुण का नोकरीच्या मागे लागता? दोन वर्षं तुम्ही नोकरी मिळत नाही म्हणून घरी बसलात. आणि आता आमच्याकडे जेवढी मेहनत तुम्ही महिना पाच हजारासाठी वर्षभर केलीत तेवढ्या मेहनतीत तुम्ही स्वतःच्या व्यवसायात महिन्याला दोन लाख कमवू शकले असता”.
“सर, आमच्याकडे भांडवलाचा प्रश्न असतो. ते असलं तरी कुटूंबाचा आणि आमच्या समाजाचा आम्हांला पाठींबा मिळत नाही. त्यातून धंदा नाही चालला तर नुकसान होण्याची भिती असती. आणि धंदा बंद पडला तर कुणीही मदतीला धावून येत नाही. मग अशावेळी नोकरीच बरी होती असं वाटू लागतं”.
“अहो तुम्ही पाण्यात पडायची तयारी तर ठेवा. पोहता तुम्हाला आपोआपच येईल. तुम्हांला सांगू मी दोनदा दिवाळखोर झालोय. भीक मागायची नाहीतर आत्महत्या करायची वेळ आली होती माझ्यावर. पण चिकाटी ठेवली तर माणूस तरुन जातो. ठिक आहे. यापुढे मराठी तरुणांना व्यवसायात आणण्याची जबाबदारी तुमची! दोन मराठी तरुणांना जरी तुम्ही व्यवसाय सुरु करुन दिलात तरी तुम्ही समाजाला न्याय दिला असं मी म्हणेन”.
“हो सर मी अवश्य प्रयत्न करेन”
अशोकने आश्वासन दिलं तर खरं पण मराठी तरुणांच्या मनातली व्यवसायाची भिती तो कितपत काढू शकेल याची त्यालाही शंका वाटत होती.
लेखक दीपक तांबोळी यांच्या आमच्या ब्लॉगवरील इतर कथा:
१. कर्तव्य – वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२. कुडंलीयोग – वाचण्यासाठी येथे क्लिक करा
३. चूक – वाचण्यासाठी येथे क्लिक करा
४. मोबदला – वाचण्यासाठी येथे क्लिक करा
न्याय – Marathi Story Short – लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा) – Marathi Story. लेखाचे सर्वाधिकार: © लेखक दीपक तांबोळी – ९५०३०११२५०.
लेखक परिचय:
या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह

💫 कथा माणुसकीच्या
💫 हा खेळ भावनांचा
💫 रंग हळव्या मनाचे
💫 गिफ्ट-भेट ह्रदयस्पर्शी कथांची
या ह्रदयस्पर्शी कथासंग्रहांच्या प्रचंड यशानंतर रसिक वाचकांचे आवडते लेखक दीपक तांबोळी यांच्या मनाला वेड लावणाऱ्या कथांचा नवीन कोराकरकरीत कथासंग्रह!
लेखक दीपक तांबोळी यांची ह्रदयस्पर्शी कथांची इतर प्रकाशित पुस्तके

💫 कथा माणुसकीच्या
💫 हा खेळ भावनांचा
💫 रंग हळव्या मनाचे
💫 गिफ्ट
💫 अशी माणसं अशा गोष्टी
या पाचही पुस्तकांचा संच सवलतीच्या दरात रु. ८००/-मध्ये (टपाल खर्चासहीत). (मूळ किंमत रु. १०००/-)
जे पुस्तक हवे असेल त्या पुस्तकाची किंमत खालील खात्यात जमा करावी
Name: Deepak Madhukar Tamboli Bank
Name: Union Bank Of India
Branch Name: Sindhi colony Branch, Jalgaon
A/C No. 507002010000689
IFSC : UBIN0550701
किंवा आपण गुगल पे, फोन पे, पेटीएमने शुल्क 9503011250 ह्या क्रमांकावर पाठवू शकता.
रक्कम भरल्यावर आपलं नांव व पत्ता आणि जमल्यास स्क्रीनशॉट ताबडतोब 9503011250 ह्या व्हॉट्सअपवर पाठवावा.
पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया ९५०३०११२५० ह्या मोबाईल क्रमांकावर लेखकाशी संपर्क करावा.
न्याय – लेखक: दीपक तांबोळी. (‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील एक कथा) – Marathi Story Short – Cover Image Source: https://www.zenefits.com/workest/from-coworker-to-boss-helping-newly-promoted-employees-transition-to-management/
