Vintage Piano and Microphone
|

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

Singer inside Music Composer संगीतकारातील गायक

हिंदी चित्रपट संगीताला समृद्ध करण्यामागे गायकांचे योगदान कोणी नाकारू शकत नाही. संगीतकारांनी गाण्याच्या मूडनुसार गीतकाराने लिहिलेल्या शब्दांना चाल लावून आणि वाद्यांचा मेळ घालून तयार केलेल्या उत्तम रचनेला न्याय देवून गायक गाण्याला अंतिम रूप देत असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नामवंत आणि प्रतिभाशाली गायकांनी अतिशय सुमधुर आणि लोकप्रिय गाणी रसिकांना सादर केलेली आहेत. कोणा एकाचे नाव न घेता आपल्याला ज्ञात असलेल्या ह्या सर्व गायक/गायिकेचे आपण त्याबद्दल आभार मानूयात. ह्या गायक/गायिकेचे आवाज त्यांची गायिकेची पद्धत हे सर्व आपल्याला ओळखीचे झालेले आहे.

पण, आज आपण काही वेगळ्या गायकांच्या आवाजातली गाणी ऐकणार आहोत.

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात अनेक नामवंत व प्रतिभाशाली संगीतकारांनी हिंदी चित्रपट संगीताला वैभवशाली बनविले आहे. यातील बरेच संगीतकार गायक बनण्यासाठीच चित्रपटसृष्टीत आले होते. आजच्या ह्या लेखातून सचिनदेव बर्मन, हेमंतकुमार, सी. रामचंद्र, राहुलदेव बर्मन आणि ह्यांसारखे नियमित गाणारे अन्य काही संगीतकार ह्यांना वगळले आहे. कारण त्यांचा आवाज नेहमीच्या ऐकण्यातला आहे. त्यांची गाणी आपल्याला माहित आहेत.

संगीतकार मदन मोहन कोहली यांनी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून प्रवेश केल्यावर १९४८ सालच्या गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या ‘शहिद’ चित्रपटात लतादीदींबरोबर दोन गाणी गायली होती. त्या अगोदर १९४७ साली मदन मोहन यांनी दोन गझला रेकॉर्ड केल्या होत्या. पडद्यावर अथवा रेकॉर्डवर मात्र ती दोन्ही गाणी येऊ शकली नाही. संगीतकार रवी (रवी शंकर शर्मा) हे सुद्धा गायक होण्यासाठीच १९५० साली मुंबईत आले होते. संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर (ओ. पी. नय्यर) ह्यांना सुद्धा गायनाची आवड होती. लाहोर रेडिओवर ते गायक म्हणून काम करीत असत.

संगीतकार उषा खन्ना यांना देखील गायनाची आवड होती. त्यांनी एकदा मुलाखतीत सांगितले कि, “माझी गाण्याची आवड पाहून, गायिका होण्यासाठी मला एका ओळखीच्या प्रसिद्ध निर्मात्याकडे नेण्यात आले. तेव्हा त्या निर्मात्याने मला विचारले कि, तू लतापेक्षा छान गाऊन शकशील का? तू आशापेक्षा छान गाऊ शकशील का?, मी नाही म्हटले. त्यावर त्यांनी म्हटले कि, मग तू गायिका नको होवूस”. गीतकार इंदीवर तिथेच उभे होते, त्यांनी त्या निर्मात्याला म्हटले, “ये लडकी गाना भी अच्छा बनाती है”, अशा तऱ्हेने उषा खन्ना अगदी लहान वयात संगीतकार झाली. पण तिची गाण्याची हौस तिने नंतर फेडून घेतली.

अशाच काही अपरिचित आवाजातील गाणी आपण आता ऐकूयात. (यातील काही गाणी जशी उपलब्ध झालीत तशी असल्यामुळे केवळ एकेका कडव्याची आहेत).

सुरुवात करूयात संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या आवाजातील एका दुर्मीळ रचनेपासून.

संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर (ओपी) यांनाही गायनाची आवड होती. विविध भारतीवर झालेल्या ‘उजाले उनकी यादों के’ ह्या कार्यक्रमात ओपींनी स्वतः एक गाणे म्हणून दाखविले होते, ओपींच्या आवाजातील हे दुर्मिळ गाणे प्रथम ऐकूयात. १९९१ सालातील ‘जाने मेहबूब’ ह्या प्रदर्शित न झालेल्या चित्रपटाकरीता महेंद्र कपूर यांनी हे गाणे गायले आहे.

रसिकांसाठी ओपींच्या आवाजातील हे दुर्मिळ गाणे आम्हीच पहिल्यांदा इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहे.

गाणे: ‘प्यार प्यार तो सब कहते है, करता कोई नही है’, चित्रपट: जाने मेहबूब (१९९१ – अप्रदर्शित), गीतकार: नूर देवासी, मूळ गायक: महेंद्र कपूर. संगीत: ओ. पी. नय्यर (संदर्भ: ‘उजाले उनकी यादों के’ ह्या कार्यक्रमातील ओ. पी. नय्यर यांच्या मुलाखतीचा ३रा भाग)

‘जाने मेहबूब’ ह्या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या आवाजातील ‘प्यार प्यार तो सब कहते है, करता कोई नही है’ हे गाणे ऐकण्यासाठी तेथे क्लिक करा

ओपी त्यांच्या तरुणपणी लाहोर रेडिओवर गाणे आणि चाल लावण्याचे काम करीत असत. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी (साधारण १९४३ साली) ओपींनी एचएमव्हीसाठी कबीर दोहे संगीतबद्ध केले आणि स्वतः गायले देखील. आता ओपींच्या आवाजातील कबीर दोहे ऐकूयात. यात त्यांच्या गायकीवर महान गायक सैगल यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

Kabir Dohe 01 – Chaltee Chakke Dekh Ke Diya Kabeera Roye. Singer O. P. Nayyar
Kabir Dohe 02 – Kabeera Rasse Paanv Mein. Singer O. P. Nayyar

१९९८ साली झी टीव्हीवर सादर झालेल्या TVS ‘सारेगामा’ ह्या कार्यक्रमाच्या १५०व्या भागानिमीत्त या कार्यक्रमात जुन्याकाळचे दिग्गज संगीतकार, गायक, गायिका यांना परीक्षक म्हणून आंमत्रित केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सोनू निगम याने तेथे उपस्थित असलेले संगीतकार ओपी यांना त्याच्या बरोबर गायनाची विनंती केली. आणि वयाच्या ७३व्या वर्षी देखील ओपींच्या आवाजातली जादू बघा.

झी टीव्हीच्या TVS ‘सारेगामा’ ह्या कार्यक्रमात सोनू निगम यांच्या सोबत ओपी त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्याचे एक कडवे गाताना

संगीतकार मदन मोहन हे गाण्याला चाल लावताना किंवा रिहर्सल करताना स्वतःच्या आवाजात एका टेपवर हे रेकॉर्ड करून ठेवत असत. अशा अनेक टेप त्यांच्या घरात होत्या. मदन मोहन यांचे निधन झाल्यावर ‘एचएमव्ही’ने त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी गाण्यांचा नवीन अल्बम करण्याकरीता संपर्क केल्यावर मदन मोहन यांच्या कुटुंबीयांनी HMVला त्यांच्या काही टेप दिल्या. त्या टेपमध्ये अनेक मुद्रित आणि मुद्रित अथवा प्रसारित न झालेल्या गाण्यांचे मुखडे, अंतरे, रिहर्सल करताना अशी बरीच गाणी सापडली. त्यातील काही चाली २००४ सालच्या ‘वीर झारा’ या चित्रपटामध्ये निर्माता, दिग्दर्शक यश चोप्रा यांनी वापरल्या आहेत. त्या संग्रहात मदन मोहन यांनी स्वतः गायलेली दोन पूर्ण गाणी सापडली ती प्रथम ऐकूया.

लतादीदी आजारी असल्याकरणाने, चित्रपटाच्या शूटिंगचा खोळंबा होऊ नये म्हणून ‘वह कौन थी’ या चित्रपटातील ‘नैना बरसे, रिमझीम रिमझिम’ हे गाणे मदन मोहन यांनी स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले व त्या पुरुषी आवाजातील गाण्याचे अभिनेत्री साधनावर ह्या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. त्यांनतर लतादीदी आजारातून बऱ्या झाल्यावर त्यांच्या आवाजात गाणे ध्वनिमुद्रित करून चित्रपटात वापरले गेले.

चित्रपट: वह कौन थी (१९६४). गीतकार: राजा मेहदी अली खान. दिग्दर्शक: राज खोसला. निर्माता: एन. एन. सिप्पी.

Source: https://www.saregama.com/search/song?s=Madan%20Mohan%20Sings%20Naina%20Barse


वर सांगितल्याप्रमाणे पुन्हा तसेच घडले. लतादीदींच्या अनुपस्थितीत मदन मोहन यांनी ‘माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की माई री’ हे गाणे गायले. गाण्याचे चित्रीकरण झाल्यावर लतादिदींच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रित करून चित्रपटात वापरले गेले.

चित्रपट: दस्तक (१९७०), गीतकार: मजरूह सुल्तानपुरी. मूळ गायक: लता मंगेशकर. निर्माता, दिग्दर्शक, पटकथा: राजिंदरसिंग बेदी


असेच एकदा गायक मोहम्मद रफी यांच्या अनुपस्थितीत मदन मोहन यांनी डमी ट्रॅक रेकॉर्ड केला.

गाणे: आपके पहलू में आकर रो लिए. चित्रपट: मेरा साया (१९६६). गायक: मोहम्मद रफी. गीतकार: राजा मेहदी अली खान. दिग्दर्शक: राज खोसला.

Source: https://www.saregama.com/song/madan-mohan-sings-aapke-pehloon-mein_97345


मदन मोहन यांनी ‘दिल ढूँढता है, फिर वही, फ़ुर्सत के रात दिन’ ह्या गाण्याला वेगवेगळ्या तीन चार चाली लावून स्वतःच्या आवाजात गावून गायकाला गाणे समजावून दिले आहे. त्या चाली त्यांच्याच आवाजात ऐकूया.

चित्रपट: मौसम (१९७५), गीतकार: गुलजार, गायक: भूपेंद्र, लता मंगेशकर, दिग्दर्शक: गुलजार.

वर उल्लेख केलेल्या मदन मोहन यांच्या आवाजातील त्यांच्या संग्रहातील टेपवरील आणखी काही गाण्यांचे मुखडे, रिहर्सल वगैरे ऐकण्यासाठी खालील लिंकला भेट द्या:

http://madanmohan.in/html/goldenmoments/mmsings.html


हिंदी सिनेमा संगीतातील लोकप्रिय जोडी म्हणजे ‘शंकर-जयकिशन’ यांची जोडी. यातील संगीतकार जयकिशन यांनी त्यांच्या खास आवाजात एका लाईव्ह कार्यक्रमात त्यांच्याच ऑर्केस्ट्रामध्ये गायलेलं एक गाणे युट्युबवर सापडले.

गाणे: ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को, किसीकी की नजर ना लगे’, चित्रपट: ससुराल (१९६१). गीतकार: हसरत जयपुरी, मूळ गायक: मोहम्मद रफ़ी

हेमंतकुमार यांनी संगीतबद्ध केलेल्या आनंदमठ चित्रपटातील सुप्रसिद्ध ‘वंदे मातरम, वंदे मातरम’ ह्या गाण्यामध्ये कोरसमध्ये गावून संगीतकार रवी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली होती. त्यानंतर रवी यांनी स्वतः संगीत दिलेल्या चित्रपटात काही गाणी गायली आहेत. आता संगीतकार रवी यांनी संगीतबद्ध केलेले आणि अतिशय गाजलेले गाणे त्यांच्याच आवाजात ऐकूया.

गाणे: ‘ऐ मेरी जोहरा जबीं, तुझे मालुम नहीं’, चित्रपट: वक्त (१९६५). गीतकार: साहिर. मूळ गायक: मन्ना डे (प्रबोध चन्द्र डे)

संगीतकार रवी हे एक चांगले कवी देखील होते. त्यांनी एक फूल दो माली (१९६९), उम्मीद (१९७१), पडोसी (१९७१), जोगी (१९८२) अशा अनके चित्रपटात गाणी लिहून स्वतः गायली आहेत आणि पडद्यावर दाखवलेली आहेत. रवी यांनी लिहून संगीतबद्ध केलेले अजून एक गाणे त्यांच्याच आवाजात ऐकूया.

गाणे: ‘किस्मत के खेल निराले मेरे भैया’, शिर्षकगीत (Title Song) चित्रपट: एक फूल दो माली (१९६९). गीतकार, संगीतकार आणि गायक: रवी

संगीतकार खय्याम यांनी, त्यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका जगजीत कौर यांच्या बरोबर एक द्वंद्वगीत गायले आहे.

गाणे: ‘कब याद मे तेरा साथ नही’, चित्रपट: अंजुमन (१९८६ – अप्रदर्शित). गीतकार: फैज अहमद फैज. संगीतकार: खय्याम. गायक: खय्याम आणि जगजीत कौर

संगीतकार उषा खन्ना यांना गायनाचे काव्य, गायन आणि संगीताचे बाळकडू त्यांचे वडील मनोहर खन्ना यांच्याकडून मिळाले होते. त्या जोरावर वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी १९५९ साली हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज निर्माता, दिग्दर्शक शशिधर मुखर्जी यांनी उषा खन्ना यांना ‘दिल देके देखो’ या नवीन चित्रपटास संगीतबद्ध करण्याची जबाबदारी दिली. उषा खन्ना यांना गायनाची आवड होती, त्यामुळे त्यांनी काही गाणी स्वतः संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात गायली आहेत. इत्तर संगीतकारानीही त्यांच्या आवाजाचा वापर केला, परंतु पूर्ण गाणे दिलेले आढळत नाही. केवळ काही शब्द गुणगुणने अथवा, एक दोन ओळीं गायला दिलेल्या दिसतात. खूप शोधल्यावर दोन गाणी सापडली ज्यात उषा खन्ना यांनी जास्त गायले आहे. ती गाणी खाली दिलेली आहेत.

गाणे: ‘दो नैन, हाय हाय तेरे दो नैन’, चित्रपट: दादा (१९६६), गीतकार: असद भोपाली, गायक: उषा खन्ना आणि मुकेश
गाणे: ‘हम अलबेले सौदागर’, चित्रपट: नतिजा (११६९), गीतकार: समीर सागर, गायक: उषा खन्ना आणि मोहम्मद रफी

हिंदी चित्रपट संगीतात असंख्य गाणी आहेत, त्यामुळे याच प्रकारातील अजूनही काही ज्ञात गाणी आणि अज्ञात गाणी राहून गेली आहेत. परंतु लेखाच्या मर्यादेमुळे केवळ १४ गाणी येथे दिली आहेत. जसजशी नवीन गाणी माहिती होतील तसतशी ती गाणी आपणापुढे पुन्हा सादर केली जातील.

पुन्हा लवकरच भेटूयात नवीन गाणी आणि नवीन विषय घेऊन.

लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलकचारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९

कृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.

आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.


Piano Image use in Cover Photo is by 👀 Mabel Amber, who will one day from Pixabay, and Microphone Image Source: https://theoldtimey.com/best-vintage-microphones/, Photoshoped by: Charudatta Sawant


DISCLAIMER: Copyrights of songs used in this article belong to its rightful owners. All rights to Music Label Co. or other rightful owners & No Copyright Infringement Intended. Please do note that these links are being shared only for reference purposes and as found when added to the website. We do not have copyright on these links, and hence from time to time you may find some of the links not working, in which case since we have provided the song details, a keen listener could find an alternative link / source instead.

अस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021-2022 Charudatta Sawant
Copyrights of Audio & Video Songs : Copyrights of songs used in this arti more...

Similar Posts

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply