Making Clay Bollock

माझे गाव: भाग १४ : माझे गावातील खेळ

माझे गावातील खेळ

मागच्या एका लेखात मी माझ्या मित्रांसोबत विहिरीवर पोहोण्याचा निष्फळ प्रयत्न कसा केला याची गंमत वाचली असेलच. गावी गेल्यावर माझे मित्रांच्या साहाय्याने असेच काहीना काही निष्फळ प्रयोग चालत असत.

आम्ही रोज काही शेतात जात नसू. अशा वेळी घरात किंवा गावातच आमचा काही ना काही उद्योग चाले किंवा खेळत असू.

एका दिवशी नानाजी बरोबर मोठ्या विहिरीवर बैल पाणी पाजायला गेल्यावर, मी बैलांपासून थोडे दूर रहावे म्हणून विहिरीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन कठड्याजवळ उभा राहिलो.

मी तिकडे जाताना दिसलो कि मला म्हणायचा, ‘तिकडं नको जाऊ, गाळात पाय जाईल, चिखल हाय तिथं’.

मी खाली पहिले तर विहिरीभोवती शेतातील मातीत जागोजागी लहानमोठे खड्डे पडलेले होते. त्या खड्ड्यात माणसांच्या आणि जनावरांच्या पायाचे खोल ठसे उमटलेले दिसत. म्हशीच्या पायांचे ठसे जरा मोठे दिसत. काही खड्ड्यांमधे विहिरीवर पाणी भरताना उडालेले किंवा सांडलेले पाणी जमा होऊन साठलेले असे, त्यात निळ्या आकाशाचे किंवा पांढऱ्या ढगांचे पुंजके यांचे प्रतिबिंब दिसायचे. थोडीशी मान वाकडी करून, पुढे मागे जाऊन एखाद्या खड्ड्यात शिंगीच्या शिखराचे अथवा सूर्याचे प्रतिबिंब दिसतंय का याचा शोध घेण्याचा मी कधी कधी प्रयत्न करत असे. त्या खड्ड्यांमधली आणि आजूबाजूची माती गुळगुळीत आणि निसरडी झालेली असायची.

‘हि चिखलातील चिकणी माती लय भारी असती, या मातीची बैलं बेस्ट बनतात’, नानाजी म्हणाला.

आधीच बैलं म्हणजे माझ्या आवडीचा विषय. आणि या मातीची खेळण्यातील बैलं करता येतात हे कळाल्यावर मी त्याच्या मागेच लागालो, ‘आपण मातीची बैलं करूया’.

दुपारी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही पुन्हा मोठ्या विहिरीवर गेलो. मोठ्या विहिरीवरच्या गाळातील चिकण माती हि इतर विहिरींपेक्षा कशी वेगळी आहे हे ज्ञान नानाजीने मला व्यवस्थित समाजावून दिले. बऱ्याच खड्ड्यात हात घालून आम्ही घमेलंभर चिकण मातीचा चांगला गाळ काढून घरी घेवून आलो. एका टोपात थोडे पाणी घेवून आम्ही अंगणात बसलो. प्रथम मातीत थोडे पाणी टाकून माती एकजीव करून मातीतली खडे, गवत वगैरे काढून साफ टाकले जाई. मग मूठभर मातीचा गोळा घेवून दोन्ही हाताने दगडावर फिरवून दंडगोलाकार आकार दिला जायचा. हे झाले बैलाचे शरीर तयार. मग मातीपासून बोटाच्या आकाराचे आणि बोटभर लांब चार दंडगोल केले जाई. हे झाले बैलांचे पाय. हे पाय मग अगोदर तयार करून ठेवलेल्या बैलाच्या शरीराला खालच्या बाजूने चारी कोपऱ्यांना जोडले जाई. पाय जोडताना थोडे पाणी लावून लावून पाय आणि धडाचा भाग एकजीव केला जाई. आमचा बैल आता मुंडक्याशिवाय उभा राहिलेला दिसे. मग मातीचा एक लांबूळका त्रिकोणी आकार हातावर माती थापून बनविलेला जायचा, तो मागच्या बाजूने जाड आणि निमुळता असायचा. त्याला बैलाच्या चेहऱ्यासारखा साधारण आकार दिला जायचा. मग तो चेहऱ्याचा भाग धडाला समोरच्या बाजूने जोडायचा. मानेचा आणि धडाचा भाग चांगलाच एकजीव करून जोडायचा. हातात थोडी माती घेवून शेंगुळ्या केल्यासारखी मळायची कि झाली शिंगे तयार. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराची शिंगे बनवायचा. मग ती शिंगे एक एक करून डोक्याला जुळवायची. नंतर मातीचा एक छोटासा गोळा तयार करून बैलाच्या शिंगामागे खांद्याच्या वर चिकटवायचा. त्याला एकजीव करून आपल्या पसंतीप्रमाणे आकार द्यायचा कि झाले बैलाचे वशिंड तयार. त्या वशिंडाला वरच्या बाजूने बोटाने हळूच दाबून बारीक खड्डा पाडायचा कि वशिंड रुबाबदार दिसे. मग बैलाला शेपटी लावायची. अशा तऱ्हेनं बैल तयार झालेला असायचा. तो थोडावेळ बाजूला सुकवायला ठेवून दुसरा बैल तसाच तयार करायचा. मग पुन्हा पहिला बैल हातात घेवून त्यावर शेवटचा हात फिरवून बारीक काडीने त्याला डोळे, तोंड, नाक, मानेची पोळी, पायाचे गुढगे, नख्या असे अवयव काढायचे. झाले आमचे बैल तयार. नानाजीने शिकविल्याप्रमाणे मी सुद्धा दोन रुबाबदार बैलं तयार करून ठेवत असे. मग आम्ही ती बैलं रात्रभर सुकविण्यासाठी वरती ठेवून द्यायचो आणि दुसऱ्या उद्योगाला लागायचो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आटोपल्यावर सुकायला ठेवलेली बैलं खाली काढायचो. पहातो तर काय. माझ्या बैलांनी माना खाली टाकलेल्या असायच्या. एखाद्याचा पाय किंवा शिंग मोडून पडलेलं असायचे. अंगावरील माती सुकून अंगावर खपल्या पडलेल्या असायच्या आणि त्यातून आता फक्त आतडी बाहेर पडायची वेळ झाली आहे अशी त्यांची अवस्था झालेली असायची. आणि नानाने केलेली बैलं मात्र मस्तपैकी श्रावण किंवा भादव्यातील हिरवा चारा खाऊन अंग भरलेल्या बैलांसारखी दिसायची. माझा हिरमोड व्हायचा. मग मी नानाला बोलावून ते दाखवायचो. तो माझे बैल दुरुस्त करून द्यायचा. पण माझी बैलं काही सुधारायची नाही. दुपारी परत माना टाकायचे. असे दोन तीन वेळा झाल्यावर मात्र मी बैलं बनविण्याच्या भानगडीत पडलो नाहो. कोणाकडे तरी अगोदरच तयार करून ठेवलेले आयते बैल आम्ही जमवून अंगणात खेळायचो. काड्यांची छोटी बैलगाडी बनवून त्या गाडीला मातीची बैलं जुंपून ठेवायचो आणि त्याकडे बघत बसायचो.

हाच उद्योग पुढच्या वर्षी करताना कधी गणपत सोबत असायचा. पण हा उद्योग कायम करायचो, पण माझ्या नशिबी कायम अपयशच यायचे. माझे बैल कायम माना टाकायचे.

आमच्या घरात छोटा कॅरम बोर्ड होता. तसा आमच्या घरात होता म्हणजे सर्वांसाठीच होता हे ओघानेच आले. परंतु आम्ही गावी गेलो कि गावातील मुलांना कायम खेळायला मिळायचा. त्यामुळे गावातील अनेक मुलेमुली आमच्या बरोबर कॅरम खेळण्यासाठी आमच्या घरी येत. मुली बहिणींबरोबर खेळत. दुपारी कित्येक तास आम्ही मुले कॅरम खेळत असू. कारण सर्वांनांच कॅरम खेळायचे असे. पण पाळीपाळीने एकेकाला काहीवेळ खेळायला मिळे. मी मात्र एक बाजूला कायम बसून असे. बाकीचे भिडू फक्त बदलायचे. असे खूप वेळ खेळून झाले कि मी उठायचो, आणि मग कॅरमबोर्डवर गावातील मुलेच खेळत बसायची. गावातील मुलांना कॅरम तसा फार खेळायला मिळायचा नाही. पण सर्वजण चांगले खेळायचे. मला नेहमी हरवायचे. आमच्या पडवीचे सर्व दरवाजे उघडून लख्ख प्रकाशात आम्ही कॅरम खेळत असू तेव्हा मुले बघायला खूपच गर्दी करायची. खूप लहान मुले मात्र फक्त बघत बसायची. आणि काही खास घडले, कि हसून दाद द्यायची. सर्व खेळून झाल्यावर त्यांना पाच दहा मिनिटे खेळायला द्यायचो. दुपारभर एवढा सगळा गोंधळ चालायचा पडवीत, पण कधीही आजी किंवा काकू कोणालाही ओरडली नाही किंवा त्यांची झोपमोड झाली नाही. अजूनही खूप बैठे खेळ आमच्या घरात होते. ते सर्वांना खेळायला मिळायचे.

दुपारचे गावात फिरताना आम्ही देवळाकडे जायचो. आमच्या गावात तीन मोठी मंदिरे आहेत. त्यापैकी मारुतीच्या मंदिरात गावातील त्याकाळची रिकामटेकडी तरुण मुले दुपारी पत्त्यांचा डाव टाकत असत. तीनपत्ती, मेंढीकोट असे काही डाव चालत. सर्व भिडू जमेपर्यंत एखाद जण मला विचारी, ‘तुला येतं का खेळायला?, मी नाही म्हटल्यावर, मग मला एखादा डाव शिकवून टाकी. तिथे बसून पत्त्यांचे खेळ शिकायला मिळाले. परंतू तेथे पाच पैसे, दहा पैसे अशा तऱ्हेने जुगार खेळला जाई. ते पाहून लहान वयातही वाईट वाटे. मग तिथे न थांबता आम्ही मुले आमच्या घरी पत्ते खेळायला लागलो. जोडपत्ता हा साधासुधा खेळ माझ्या आवडीचा. पण पाच पत्ते, सात पत्ते असले काहीतरी खेळ सुद्धा आम्ही खेळायचो.

आमच्या घरात माझ्यासाठी सुताराकडून खास बनवून घेतलेली लाकडाची गाडी होती. पांगुळगाड्या सारखीच. साधारण चार इंचाची चाके दोन्ही बाजूला. मध्यभागी जाड आणि मजबूत लाकडी पट्टी. पट्टीच्या मध्यभागी बसवलेला दोन ते अडीच फूट लांबीचा दांडा अशी तिची रचना होती. त्याच्या जोडीला पण वेगळे बनवलेले एक छोटेखानी जू (जुकाड) होते. मोठ्या खऱ्याखुऱ्या जू सारखेच सगळे भाग त्याला होते. आम्ही मुले ती गाडी घेऊन गावात आणि गावाच्या बाहेर आसपास मातीत पळवत असू. रस्त्यातील छोटी छोटी वासरे पकडून त्यांना या गाड्याला जुंपून घाटामध्ये शर्यत लावावी असे आमच्या मनात खूप यायचे. पण आमचा गाडा खूपच छोटा होता म्हणून तो प्रयोग करण्याचे राहून गेले.

लहान मुले अन लपाछपी खेळणार नाही, असे कधी शक्य आहे का? दुपारचे आम्ही देवळाच्या आवारात जाऊन लपाछपी खेळायचो. मारुतीच्या देवळात, विठ्ठल मंदिरात वर चढून लपायला खूप जागा होत्या. तिकडे आम्ही लपून बसत असू. पण बऱ्यापैकी उघडी जागा असल्याने फार वेळ लपून राहता येत नसायचे.

मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे माझी मावस आत्या नकूबाई हिच्या घरी गेल्यावर देवोशी गावात मी पहिल्यांदा विटीदांडूचा खेळ शिकलो. आत्याभाऊ शंकर सोबत मी त्यांच्या गावातील पटांगणात त्याच्या सवंगाड्यासोबत विटूदांडू खेळलो आहे. गलीमधली विटी कोलायची म्हणजे जोरात उडवायची, विटी हवेत असताना खाली पडण्यापूर्वी दोन तीन वेळा पुन्हा दूरवर टोलवायची हे मी लगेच शिकलो. मी ती विटी एकदम दूरवर म्हणजे आजच्या भाषेत स्टेडियमच्या बाहेर षटकार मारल्याप्रमाणे टोला मारून आजूबाजूच्या घरांच्याही पलीकडे टोलवायचो. मी त्या गावात पाहूणा, शिवाय मुंबईचा असल्याकरणाने मला गावातली कोणी मुलं काही बोलत नसत, अन्यथा शिव्या खाव्या लागल्या असत्या. मग ती विटी शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नसे. लगेच शेजारच्या एखाद्या घरातून कोयता किंवा विळा आणून लाकडाचा बारीक तुकडा तासून नवी विटी तयार केली जायची आणि खेळ पुढे सुरु राहायचा.

अशा तऱ्हेने गावाकडच्या खेळाच्या आठवणी अविस्मरणीय झाल्या आहेत.

छायाचित्र सौजन्य:
Mud Bull making tips – बैलपोळ्यासाठी मातीपासून बैल तयार करणे.
Learn how to make bail clay bull making
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=qg2us-VIfvU

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant

Similar Posts

3 Comments

  1. त्याकाळात लिमिटेड साधनातून अनलिमिटेड आनंद घेता यायचा. आता उलट झालं आहे.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply