Bullock Cart Wheels Outside House in Village

माझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या

आमच्या प्रेमळ आत्या

आतापर्यंत गावी खूप मजा केलेली असायची ते आपण पाहिलेच आहे. त्याचबरोबर दुसरी मजा पण घेतलेली आहे. ती म्हणजे गावोगावी फिरणे. गावी गेल्यावर ४-५ दिवसातच वडील आम्हाला गावी सोडून मुंबईला परत जात. त्यापूर्वी वडील आम्हाला घेवून थोरल्या कुड्याला (कुडे बुद्रुकला) न्यायचे.

वडिलांच्या तीन मावस बहिणी पैकी दोघी शेजारच्या गावात, ‘कुडे बुद्रुक’ला होत्या. त्यांची नावे सखूआत्या आणि ठकूआत्या. वडिलांच्याच वयाच्या. वडिलांना सख्खी बहीण नव्हती. त्यामुळे या दोन्ही आत्यांचा त्यांना खूपच लळा. त्या दोघींचाही माझे वडील आणि त्यांचे भाऊ मोतीराम नाना यांच्यावर खूपच जीव. माझ्या आजीच्या हाताखाली लहानपणी ते सगळे एकत्र वाढलेले असल्याकारणाने सर्वांचा एकमेकांवर खूपच लोभ होता. ठकूआत्या आज ८० वय झाले तरी मस्त ठणठणीत आहे.

सखू आत्या तशी गरीब. घरची शेती बरी असावी, त्यामुळे खाऊनपीऊन सुखी घर होते. गोठ्यात गाई, बैल, म्हशी होत्या. सखूआत्याचे जुने घर तसे लहानच होते. छोट्याशा अंगणातून घरात शिरल्याबरोबर दाराच्या बाजूलाच चूल होती. त्याच्या पुढेच आम्ही पोत्यावर बसायचो. आम्ही घरात गेलो कि आमचे खूप लाड करायची. चहा तर व्हायचाच. छोट्या पितळेच्या ताटलीत गरम चहा ओतून मिळायचा. चहा पिण्यासाठी ताटली उचलली कि हात भाजायचा. मी ती ताटली लगेच खाली ठेवायचो, ते पाहिले कि आत्या ताटली उचलून घेऊन चहावर फुंकर मारून चहा थंड करून द्यायची.

चहा घेऊन थोडाच वेळ झाला असायचा, कि लगेच बोलायची, ‘जेवण करते आता’. वडील जेवायला नकार द्यायचे आणि मला तशी भूक लागलेली नसायची, म्हणून मी पण नकार द्यायचो.

मग ती म्हणायची, ‘अरे, उलीसा भात आणि कोरड्यास करते, उली उली खाऊन जा’. तिचा तो ‘उलीसा’ आणि ‘उली’ हे शब्द मला मजेदार वाटायचे.

whatsapp image 2020 12 16 at 11.07.40 am 1
कै. सखूआत्या आणि कै. दत्तूमामा
छायाचित्र: संतोष धंद्रे

अन ती उलीसा भात घालण्यासाठी अल्युमिनियमच्या एक छोटा टोप घ्यायची. तो टोप पाहिल्यावर वाटायचे, काही हरकत नाही, छोटासा तर टोप आहे, अर्धा टोप तर भात घातलाय, सर्व भात संपवून टाकू लगेच. सोबत एखादे कालवण किंवा ‘शेंगदाण्याचे आळाण’ करायची. गप्पा आणि ख्याली खुशाली होईपर्यंत भात चुलीवर तयार व्ह्यायचा. ज्या भाताच्या टोपाला मी छोटा समजलो, त्या टोपाच्या वर इंचभर भात शिजून टम्म फुगून वर आलेला पहिला कि डोळेच विस्फरायचे. अन पितळेच्या छोट्या ताटलीत वाफाळलेला भात वाढायची तेव्हा कळायचे, तो उलीसा भात म्हणजे किती प्रचंड आहे. आता हा उलीसा भात कसा संपवायचा हा नवीन प्रश्न निर्माण झालेला असायचा. पण तो प्रश्न चुटकीसरशी सुटायचा. कारण भाताबरोबर असायचे चविष्ट कालवण किंवा शेंगदाण्याचे आळाण, सोबत शेंगदाण्याची किंवा लाल मिरचीची चटणी. तिखट लागायचे पण चवदार असल्याकरणाने अर्धा टोप भात मी संपवायचो. पोट गच्चं झालेले असायचे. हात धुवायला उठताना त्रास व्हायचा. असे कित्येक वेळा मी तिथे जेवलो आहे.

तिकडून निघालो की, ठकूआत्याच्या घरी. तिचे घर मोठे होते. तिकडे पण लगेच चहा व्ह्यायचा. अन थोडा वेळ गप्पा झाल्या कि पुन्हा ‘उलीसा’ भात’ नाहीतर ‘उलीशी भाकर’ खायचा आग्रह व्हायचा. आता ह्या ‘उलिशा’ची भीतीच वाटू लागली. कसेबसे जेवणाला नकार देऊन आत्याला नाराजच करून आम्ही निघायचो. तिच्या घरी केवळ दोनतीन वेळाच जेवल्याचे आठवते. पण तिला त्याचे कधी वाईट नाही वाटले, माझ्याकडे जेवली नाही तर काय झाले, माझ्या बहिणीच्या घरी तरी पोरं जेवली ह्याचे तिला समाधान असे. आजही तोच अनुभव मिळतो. ठकूआत्याच्याचे सासरे परवानाधारक शिकारी होते. त्याकाळी म्हणजे ५० सालाच्या पुढे मागे शिंगीच्या डोंगराच्या आसपासच्या जंगलात दूरवर जाऊन त्यांनी शिकारी केलेल्या आहेत. त्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांची मुंडकी, शिंगे वगैरे त्यांच्या घरात भिंतीवर लावलेली होती. सोबत त्यांची भली मोठी बंदूक पण होती. जरा भीतीच वाटायची. खाली बसताना त्या भिंतीपासून जरा दूरच बसायचो. हो, उगाचच वर लटकवलेल्या हरणाचे डोके माझ्या डोक्यात पडायला नको.

img 20180228 134224
ठकूआत्या
छायाचित्र: हार्दिक सावंत

दोन वर्षांपूर्वी एका लग्नाला गेलो होतो. तिथे आमची काकू पण होती. निघायच्या अगोदर काकूला हातखर्चाला काही पैसे दिले. ठकूआत्याने ते पाहिले, मला चेष्टेने म्हणाली, ‘तिला पैसे दिलं, मला नाय दिलं कदी ते?’. मी पण चेष्टेने म्हणालो, ‘तुला कशाला हवेत पैसे?, तुला काय हवे ते सांग, आणून देतो’. मग माझ्या हात हात घेऊन म्हणाली, ‘अरे, मला कशाला हवेत पैसे? मला काही नको. तुझा बाप घरी यायचा तवा आम्हाला बहिणींना नेहमी थोडे पैसे द्यायचा, त्याची आठवण झाली’. या दिवाळीला गावी गेलो तेव्हा तिच्यासाठी चांगले स्वेटर घेवून गेलो. स्वेटर दिल्यावर ‘अरे, मला काय करायचे हे?’ असे म्हणाली. दुसऱ्या दिवशी घरी परत येताना निरोप घ्यायला गेलो तेव्हा आम्ही दिलेले स्वेटर घालून होती. आणखी काय हवयं? पैसे वसूल.

ह्या दोघींची एक धाकटी बहीण होती नकूबाई, ती देवोशी गावात होती. आमची शेतं ओलांडले कि माळरान लागते, जरा पुढे डाव्या हाताला एक छोटे गोलाकार आकाराचे टेकाड लक्ष वेधून घेते. (ह्या टेकाडाविषयी एक दंतकथा मी ऐकली आहे, ती कथा नंतर कधी). तसे ते लांबून दिसून येते. तेथून पुढे उजवीकडे टेकडी उतरून खालचा छोटा ओढा ओलांडून वर आलो कि घरं लागतात, तिथे एका घराला वळसा घालून आलो कि नकूआत्याचे घर. तिकडे पण काही दिवस राहिलो. भावंडाबरोबर खेळलो. विटूदांडूचा खेळ पहिल्यांदा देवोशीत खेळलो आहे. खूप मजा केली. रस्ता ओलांडून पुढे उताराहून खाली धावत गेलो कि त्यांची शेती लागायची. तिकडे मजा करायचो. त्यांचा एक पांढराशुभ्र, उंच आणि मोठ्या शिंगाचा खिलारी बैल मला आवडायचा कारण माझ्या लाडक्या पैंजण्याचा तो बाप होता असे मला कोणीतरी सांगितले होते. पण तसे नकूआत्याकडे आमचे जाणे येणे कमीच राहिले.

पहिल्याच भागात उल्लेख केलेली ताराआत्या म्हणजे माझ्या वडिलांची चुलत बहीण. लहानपणी तिचे आईवडील देवाघरी गेल्या कारणाने माझ्या आजीने तिचा काही काळ संभाळ केला. वडिलांपेक्षा वयाने खूपच लहान. आमच्या घरातच लहानाची मोठी झाल्याकारणाने आमच्याच घरातील ती एक सदस्य झाली होती, वडील आणि चुलते यांची ती लाडकी बहीण होती. आम्ही लहानपणी गावी गेलो की ती आमचे खूपच लाड करायची. मी आमच्या घरातील पहिले अपत्य असल्याकारणाने माझे खूपच लाड केले तिने. ताराआत्या दिसायला सुंदर आणि गोरी होती. लग्न झाल्यानंतर ती कायम नाकात मोठी नथ घालूनच असायची. तिच्याविषयी तशा लहानपणीच्या माझ्या आठवणी फारच कमी आहेत. परंतु तिने फारच लाड केले असणार यात शंका नाही.

तिचे सासर आमच्या गावाच्या पुढे साधारण दिड किलोमीटर वरची ‘होजगेवाडी’. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलो की, ‘तुझा भाचा आलाय मुंबईहून’ हा निरोप तिला कोणीतरी सांगायाची खोटी कि, ती हातातले काम सोडून लगेच आम्हाला भेटायला आमच्या घरी यायची. आमच्या ध्यानीमनी नसताना अचानक आमच्या समोर येऊन उभी राहायची, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असलेला स्पष्ट जाणवायचा. हा निरोप तिला कसा काय लगेच पोहोचायचा हे नाही माहीत, पण आम्ही गावी पोचल्यावर कधीकधी दोनेक तासात देखील ती आम्हाला भेटायला आलेली आठवते. तिच्यासाठी आईवडिलांनी काहीना काही आणलेले असायचेच. आमचे कौतुक आणि लाड करून ती लगेच परत निघायची.

‘तुमी आल्याचा निरोप मिळाला अन तशीच आली, मपली पोरं तशीच बसली असतील, जाते आता, उद्याला परत येते’. असे बोलून लगेच आल्यासारखी निघून जायची. तिचा ‘मपली’ हा शब्द मला आवडायचा, कुठून शिकली माहीत नाही, कारण आमच्या घरात हा शब्द कुणीच वापरत नव्हते, कदाचित तिच्या आजोळी हा शब्द ती शिकली असेल. तिच्या बोलण्यात कायम ‘मपली आई’, ‘तुपली आजी’, ‘तुपला आजा होता तवा… ‘ अशी वाक्ये असायची.

taraaatya
कै. ताराआत्या
छायाचित्र: बाळासाहेब होजगे

कधीकधी आम्ही गावी आल्याचा निरोप तिला पोहोचलेला नसायचा. मग आम्ही लगेच एक दोन दिवसात वाडीला तिच्या घरी जायचो. ती बहुतेक वेळा घरी नसायची. रानात खाली किंवा लांब विहिरीहून पाणी आणायला गेलेली असायची. शेजारचे कोणीतरी तिला घराच्या मागून हाळी द्यायचे, ‘ए$$, तारे $$, तुझ्या भावाची पोरं आलीत गं$$’, तिला आवाज पोहोचला कि, ‘आले, आले गं $$’ असा प्रतिसाद देऊन धावत घरी परत यायची. आम्ही पण तिच्या वाटेकडे पहात बसायचो. मग दुरून शेतातल्या वाटेने पाच दहा मिनिटातच ती घाईघाईने येताना दिसायची. डोक्यावर पाण्याचा हंडा, हिरवा, भगवा, लाल अशा उजळ रंगाचे पातळ घातलेली, कपाळावर मोठे उभट कुंकू, नाकात नथ घातलेली असे तिचे दर्शन आम्हाला व्ह्यायचे अन आम्ही सर्व आनंदून जायचो. ‘काय रं बाळा, कवा आला?’, ‘कळवलं का नाही, लगेच आले असते ना,’ अशी बोलायची. मग आमच्यासाठी काय करू अन काय नको असे तिला व्हायचे. चहा व्हायचा. ‘जेवण करते तोपर्यंत शेंगा खावा जरा’ असे म्हणून टोपभर भुईमूगाच्या लाल शेंगा आमच्या समोर जमिनीवर ओतायची. नाईलाजाने थोड्या शेंगा खाव्याच लागायच्या. बटाट्याचा कीस तिच्या घरी भरपूर खायला मिळायचा. आम्ही सुट्टीत येणारच हे तिला माहीत असायचे, तेव्हा आमच्यासाठी बटाट्याचा कीस राखून ठेवलेला असायचा. खायला तर द्यायचीच, पण मुंबईला नेण्यासाठी पण पिशवीभर द्यायची. तिच्या घरी गेल्यावर आम्हाला पिशवी भरभरून वाणावळा मिळायचा. काळे तीळ, मसूर, तांदूळ, हळद असे काय काय द्यायची कि, आता हे सर्व कसे न्यायचे हा प्रश्न पडायचा. पुढे कसे काय झाले कळत नाही पण शेवटची काही वर्षे तिला इन्सुलीन काढावे लागले होते, ते पाहून त्रास व्हायचा. पण ती व्यवस्थित वेळेवर डॉक्टर कडून इन्सुलीन टोचून घ्यायची.

वडिलांना आणखी एक मानलेली बहीण होती, सरूबाई, वडील शिक्षणाकरिता वाड्याला शाळेत जात असत, त्यावेळेस काही वर्षे जवळच्या चिखलगावी त्यांच्या आत्याकडे रहात असत. त्या घरात सरूआत्या होती. (नक्की नातेसंबंध आता आठवत नाहीत). पण तिचेही आमच्यावर खूप प्रेम होते. तिच्या घरी गेल्यावर सुद्धा मजा असायची. तसे पाहिले तर सरूआत्याच्या आठवणी कमीच आहेत. परंतु सरूआत्याची आठवण आणि प्रेम मात्र अजूनही विसरलो नाही.

janaaatya
जनाआत्या
छायाचित्र: प्रदीप शिंदे

अजून एक जवळच्या नात्यातील लाडकी आत्या, आमच्याच गावातील, जनाआत्या. तिचे घरही आमच्यासाठी कायम प्रेमाचे राहिले आहे. दिवाळीला गावी गेल्यावर तिला पण एक स्वेटर दिले. ‘हे घ्या, तुम्हाला’. स्वेटर तिच्या हातात ठेवल्यावर डबडबलेल्या डोळयांनी आंनदाने, स्वेटर वरखाली करून बघत ‘हे कशाला आणलं, मी कुठं घालणार’. ‘मला काय करायचयं हे, किती दिवस घालणार हे मी’ असे काहीसं बडबडली. त्यावर आमची सुनबाई म्हणाली, ‘राहू द्या, आत्या, तुमच्यासाठी आणलयं, जोवर आहात तोवर घालायचं’.

अशा ह्या आमच्या आत्या. सख्खी एकही नाही. पण परकी कधीही वाटली नाही. सर्वच प्रेमाच्या, मायेच्या, सर्वजणी आमच्या लाडक्या. सर्वांकडून भरभरून प्रेम मिळाले आम्हाला. यात देण्याघेण्याची काही अपेक्षा नाही. मोकळ्या हातानं भेटायला जावं अन पोट भरून प्रेम घ्यावे. अपेक्षा फक्त एकच, प्रेम कायम रहावे, गावाला आले कि आम्हाला भेटावं. दुसरं काही नको!

(सर्वांची छायाचित्र उपलब्ध नाहीत).

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant

Similar Posts

3 Comments

  1. खूप छान आहे गोष्ट ..
    आणि गोष्टी प्रमाणे आत्या सुधा तितक्याच छान आहेत

  2. दादा खुपचं छान लेखन आणि आठवणी

  3. खुप छान लेख आहे.अस प्रेम फक्त गावाकडेच मिळु शकत.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply