माझे गाव: भाग १२ : आमचे घर, आमची माणसे – ३
आमचे नाना
मागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात.
आमचा नाना म्हणजे माझ्या वडिलांचा मोठा भाऊ. तरुणपणी दिसायला खूपच तरतरीत होता. किती शिकला माहीत नाही. पण साधारण इंग्रजी शब्द बनवून लिहिता यायचे त्याला. शाळेत असताना कानाला काही अपघात झाला. आणि त्याला ऐकणे येणे बंद झाले. त्यामुळे पुढे बोलणे पण बंद झाले. म्हणून नाव मोतिराम असले तरी मुक्या म्हणूनच पंचक्रोशीतच प्रसिद्ध. बोलणे बंद झाले म्हणजे त्याला फक्त सर्वसामान्य लोकांसारखे शब्द उच्चारणे जमत नव्हते, अन्यथा तोंडाने हा, बाबो, हो, ह्या, वपया, यपया असे बरेच शब्द तो उच्चारू शके. त्याला वर्तमानपत्र वाचायला आवडायचे. मासिके, अंक इत्यादी तो तासनतास वाचत बसे. एखादी खास बातमी आवडली कि शेजारी बसलेल्या माणसाला ती बातमी त्याच्या भाषेत अशी काही समजावून सांगे कि तो माणूस परत नानाच्या नादाला लागायचा नाही किंवा त्याला बातमी पूर्ण कळायची. नानाला ओळखत नाही असे एकही गाव नव्हते, आणि तो ओळखत नाही असा एकही माणूस पंचक्रोशीत नव्हता. तो सर्वज्ञानी होता. लांबलांबपर्यंत त्याच्या ओळखी होत्या. तोंडाने बोलता यायचे नाही पण त्याच्या हातवाऱ्यांच्या भाषेत आणि तोंडाने काही विशिष्ट आवाज काढून तो न थकता कितीही तास गप्प मारू शकायचा. कोणाचा कोण हे सर्व त्याला सर्व माहित असायचे. आणि व्यावहारिक ज्ञानही त्याला चांगलेच होते. इंग्रजीत जरी पत्ता लिहून दिला तरी तेवढ्या सुतावरून गावाहून मुंबईला सरळ घरी यायचा, एवढी हुशारी त्याच्याकडे होती. मध्य मुंबईची खूप माहिती त्याला होती. मुंबईत तो कुठेही एकटा फिरू शकायचा. माझ्या लहानपणी नाना मुंबईला आला कि मला मुंबई दाखवायला न्यायचा. त्याला कपड्यांचीही खूप आवड होती. मुंबई सारखे शर्ट, पॅन्ट घालायचा. शेतात असताना जरा जाडे भरडे कपडे असायचे. शर्टाच्या खिशात कायम छोटी डायरी आणि पेन ठेवायचा.
नाना चांगला कलाकार होता. कुठे शिकला माहीत नाही. पण त्याला रंगकाम करणे, कागदावर निर्सगचित्रे चित्रे अथवा व्यक्तिचित्रे काढणे, भिंतीवर देव देवतांची चित्रे काढून रंगविणे, घराच्या दरवाज्यांवर कोरीव काम करून चित्रे काढणे यांची खूप आवड होती. पूर्वी फावल्या वेळेत आपली कला जोपासायचा. नंतर काही लोकांची कामे पण तो करून देवू लागला.
नानाला आजीचा चांगलाच धाक असायचा. आजोबा तसे फारच लवकर गेले. त्यांच्यानंतर सुमारे १० वर्षे आजीने नानाच्या सहाय्याने घर सांभाळले आणि वाढवले. आजी नानाकडून शेतीची सर्व कामे करून घेत असे. बरीच वर्ष आमच्या घरात मी एकटाच मुलगा असल्याने सर्वांचा लाडका होतो. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो कि माझे खूप लाड करायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकामाची सुरुवात झालेली असे. सोबत कायम मला घेवून जायचा. आमच्या घरासमोरच्या आणि वाडग्याजवळच्या (गोठ्याजवळ) उकिरड्यावरून शेणखत घेवून शेतात न्यावे लागे. बैलगाडीच्या आत चारी बाजूने फळ्या लावून गाडी बंदिस्त केली जाई. मग काकू, नाना खोऱ्याने उकिरडा फोडून घमेली भरून शेणखत बैलगाडीत टाकीत असत. वरच्या बाजूला सुके असले तरी शेणखताच्या ढिगात खाली ओल दिसे. गाडी भरली की बैलं जुंपली जात आणि मला शेजारी बसवून किंवा कधीकधी त्या शेणखताच्या ढिगावर चांगले पोते अंथरून मला बसवायचा आणि मग आम्ही शेतात जायचो. मग खालच्या खाचरात किंवा माळावरच्या वावरात ते खत ओतले जाई. शेतात सुमारे पंधरा फूट अंतरावर त्या खताचे ढीग टाकले जायचे. लांबून ते त्रिकोणी आकाराचे ढीग छान दिसत. ते ढीग टाकत असताना मी बैलगाडीवर कासरा धरून बसलेलो असायचो. एक ढीग टाकून झाला कि बैलं हाकायची आणि पंधराएक फुटावर थांबायचे आणि दुसरा ढीग टाकायचा. हे ढीग टाकायचे काम नानाच करायचा, मी फक्त गाडी तेवढ्यापुरती हाकायचो. आता मुंबईला गेल्यावर सर्व मित्रांना मी बैलगाडी चालवायला शिकलो हे सांगायचे असे मनोमन ठरवायचो. पण नंतर लक्षात आले की, मी फक्त निमीत्तमात्रच होतो. खरे तर नानाच्या आवाजानेच बैल चालायची, थांबायची. पण मला वाटायचे मीच गाडी चालवतोय. हा माझ्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. कारण खत शेतात टाकीत असताना त्यातील सुके गबाळ, गवत वाऱ्यावर उडून माझ्या अंगावर, तोंडावर यायचे, त्याने मी वैतागून गाडीतून खाली उतरून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभा राहिलो, अन पहातो तो काय? बैल मुकाटपणे नानाच्या आवाजावर चालायची. मला आपले उगाच वाटले कि मीच गाडी चालवत होतो.
मग शेणखत टाकीत असतानाच काकू तेथे येई. खताच्या ढिगातील शेणखत फावड्याने शेतात चहूबाजूला पसरून टाकी. ते झाल्यावर दाढ भाजण्याचा कार्यक्रम होई. शेताच्या एका कोपऱ्यात एक आयताकृती पट्टा करून ठेवलेला असे त्यात अगोदरच शेणखत टाकलेलं असे. त्यात वरच्या बाजूला अजून काही शेणाचे सुके तुकडे आणि गवत पसरवून टाकून त्याला आग लावली जाई. मला काही कळायचे नाही पण मी फक्त सगळे पहायचो. कारण आमचा मुक्काम फक्त महिनाभरच असायचा. काही दिवस नंतर नाना मला पुन्हा शेतात न्ह्यायचा. बैलगाडीत सर्व अवजारे भरून घ्यायचा आणि मलाही बैलगाडीत भरायचा. मग शेतात नांगर चालविणे, पेटारा चालविणे, कुळव घालणे इत्यादी कामे करायचा. ते मी बघत बसायचो. नांगराने अथवा पेटाऱ्याने पडलेल्या सऱ्या मोडणार नाही या बेताने मी मागोमाग धावायचो. शेतात कुळव घातला की हातात कासरा घेवून मी कुळवावर उभा रहायचो. कुळव शेतातील भुसभुशीत मातीतून जात असताना, एक ‘सस्स्स्स, सस्स्स्स, सस्स्स्स’ असा काही विशिष्ट आवाज यायचा (शब्दात वर्णन करणे अशक्य आहे) आणि एकदम सुळकन मातीतून तरंगत चाललोय असा भास व्हायचा, मजा यायची.
अशी शेतीची कामे झाली कि एके दिवशी नाना रिकामी गाडी काढी अन आम्ही शेतात जायचो. शेतात एखाद्या बांधाजवळ गाडी उभी केली जाई. बांधावर अथवा जरा पुढे टेकडीच्या उतारावर आंब्याच्या अथवा उंबराच्या झाडाच्या काही फांदया तोडून जळणासाठी लाकूडफाटा अगोदरच काढून ठेवलेला असे. तो गाडीत भरून घरी आणत असू. फाट्याचे वजन जास्त नसल्याकारणाने गाडी खूप उंच भरली जायची. एकदा अशीच गाडी उंच भरली गेल्यावर मला फाट्याच्या ढिगावर उंच बसविले. आणि गाडी निघाली घराकडे. थोडावेळ मजा आली पण नंतर वाट लागली. लाल मातीचा दगडधोंड्यांनी भरलेला रस्ता. गाडी नेहमी वरखाली धडधडायची अथवा आपटायची, मी वरच्या बाजूला वेडावाकडा हलायचो. गाडी बांधायला जाड कासऱ्याचा वापर केला होता म्हणून वाचलो. हाताने कासरा घट्ट धरून ठेवला म्हणून पडलो नाही हे खरे, पण गाडीच्या धक्क्याने खालचा लाकूडफाटा जोरात टोचायचा हा नवीन त्रास सुरु झाला. पण खरा त्रास आणखीनच वेगळा होता. माझी हवा तंग झालेली, पुरती वाट लागलेली. पण हे ऐकणारा आणि पाहणारा कोणीच नाही. नाना खालच्या बाजूला बसून गाडी हाकत असल्याकारणाने तो मला दिसत नव्हता आणि मी कितीही हातवारे केले तरी त्याला दिसत नव्हते. जोरात ओरडायचे म्हटले तरी नानाला ऐकू येत नव्हते. एकवेळ बैलांना माझा आवाज गेला असता पण नानाच्या कानात माझा आवाज जाणे अशक्य. ह्या अवस्थेत कशीबशी २० ते २५ मिनिटे काढली. गावात माझी अशी वरात आलेली बघून लोकं मजा घेत होती. माझे कौतुक करत होती. आता घर जवळ आल्याकारणाने मी गप बसून राहिलो अन कुणालाच काही बोललो नाही. घरासमोर गाडी थांबल्यावर पटकन खाली उतरून मांजरीसारखा टुणकन उडी मारून घरात पसार झालो अन परत कधी तो प्रयोग केला नाही.
कधीकधी लाकडे तोडायला जाताना नानाबरोबर मी जायचो. तेव्हा माळावरून खाली उतरुन शेताकडे चालत जावे लागते. तेव्हा प्रत्येक शेताची माहिती नाना द्यायचा. म्हणजे आमचे शेत कुठले, खालचे आणि वरचे शेत कोणाचे ते सांगायचा. हातवारे करून सांगायचा, मला काहीच कळायचे नाही मग नाना खालची एखादी काडकी उचलून घ्यायाचा आणि स्वतःच्या हातावर त्या काडीने नाव लिहून दाखवायचा. अशा तऱ्हेने शब्द उच्चारता नाही आले तरी नाना सतत बोलत रहायचा.
वाड्याला शनिवारी आठवड्याचा बाजार असायचा. त्या निमित्ताने नाना शुक्रवारी दुपारीच बैलगाडी काढायचा. भाताची आठ ते दहा पोती भरडण्यासाठी गाडीत टाकायचा. दिवस मावळायच्या आत आम्ही वाड्याला पोहोचायचो. एसटी स्टॅन्ड जवळच्या गिरणीत भात उतरवून मग मला वाड्यात फिरवायचा. हॉटेलमध्ये चहा, भेळ, भजी, पेढे, लाडू असा खाऊ द्यायाचा. रस्त्यात भेटणाऱ्या सर्वांची ओळख करून द्यायचा. मग गाडी जुंपून आम्ही गावात जायचो. गावात लोहाराकडे गाडी सोडल्यावर बैलं जरा दूर बांधून वैरण वगैरे देवून परत लोहाराकडे जात असू. मग बैलगाडीची दोन्ही चाके काढून चाकांची लोखंडी धाव दुरुस्त करून पुन्हा चाके गाडीला जोडली जात. तोपर्यंत घरून आणलेली भाजी भाकर खाऊन घेत असू. नंतर रात्री गाडी पुन्हा गिरणीजवळ नेऊन भरडलेले भात आणि कोंड्याची पोती गाडीत टाकून ठेवी. मग मला अंगावर गोधडी टाकून गाडीतच झोपवी. त्याकाळी शुक्रवारी अर्धे वाडा गाव रात्रीचे जागेच असायचे. सकाळी मग बाजारात जाऊन पुन्हा बऱ्याच लोकांच्या भेटी होत. काही तांदूळ विक्री केले जायचे. कोंडा घरी गुरांना लागायचा म्हणून विकायचा नाही. दुपारपर्यंत जेवणखाणे करून, बाजारहाट करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असू.
नानाच्या अशा खूप आठवणी आहेत. माझ्या आईवडिलांशी जरी त्याचे पटत नव्हते, तरी माझ्यावरचे आणि आम्हा भावंडांवरचे त्याचे प्रेम शेवटपर्यंत कमी झाले नव्हते.
माझे गाव ह्या मालिकेतील हा शेवटचा भाग.
छायाचित्र – ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरचा कळस – छायाचित्रकार- ऍड. जितेंद्र शंकरराव सावंत, ग्रामस्थ-कुडे खुर्द, वास्तव्य-पुणे.
दुर्देवाने विषयाला अनुसरून योग्य छायाचित्र उपलब्ध नाही आहे.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

छान मांडणी झाली आहे.मजशीर आहे