माझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २

आजी, आजोबा आणि नाना

आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.

आता घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….

आजीच्या कडक शिस्तीच्या परंतु माणुसकीचा स्वभाव आपण गेल्याच भागात पाहिला आहे. जातीधर्माच्या पलीकडे तिचे वागणे असे. सर्व लोकांचे आमच्या घरी सारखेच स्वागत आणि उठबस केली जाई. आमच्या घरात बलुतेदारांचा नेहमी राबता असायचा, त्यांना काय हवे नको ते सर्व आजी बघायची. बलुत वेळच्या वेळी व्यवस्थित दिले जाई, त्यात काही हयगय नसे. चहापाणी किंवा जेवण सर्वांना मिळायचे. फक्त स्वच्छता पाळायला लागायची. आजोबा किंवा आजी यांपैकी कोणामुळे झाले माहित नाही, पण आमच्या घरी अख्खा गाव यायचा काही ना काही वस्तू मागायला यायचा (म्हणजे अन्नधान्य असे नाही, गैरसमज नको), पण वापरातल्या वस्तूंकरीता. आमचे नवीन घर बांधल्या नंतर आमच्या घरात अनेक गृहपयोगी वस्तू, शेतीची अवजारे, हत्यारे अशा विविध वस्तूंचा मोठा संग्रह केला होता. छोटे मोठे विळे, कोयते, कुऱ्हाडी, लोखंडी पहारी, शेतीसाठी लागणारी अवजारे, नांगर, पेटारी, कुळव, नांगराचा लोखंडी फाळ, औत बांधण्यासाठीची लोखंडी साखळी, कासरे, जुंपणी आणि तत्सम वस्तू आमच्या घरातून कायम नेल्या जात असत. कधीकधी बैलांसकट बैलगाडी पण नेली जाई. महिला वर्गाकडून पाण्याची बादली, चुंबळ, मुसळ, शेवयाचा लाकडी पाट अशा वस्तूंची मागणी व्ह्यायची. आणि दुसऱ्या कोणी जर नेली असेल तरच ती वस्तू त्यावेळेस मिळायची नाही, अन्यथा गावकरी कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही. गावकरी हक्काने आमच्या घरी गरज पडली की यायचे. आजी आजोबांपासून मिळालेला हा परोपकारचा वसा आजही चालू आहे, घरातील वस्तू काही नाहीशा झाल्या, काही नष्ट झाल्या, परंपरा मात्र आजही चालूच आहे. आणि हेच संस्कार माझे आईवडील आणि नंतर माझ्यावर वारसाहक्काने आले आहेत आणि पुढच्या पिढीतही ते उतरल्याचे दिसत आहे, असो. संध्याकाळी दिवेलागण झाली कि आजी विठ्ठल मंदिरात हरिपाठाला जायची. कधीकधी विणा गळ्यात घालून विठ्ठलाच्या मुर्तीसमोर उभे राहून भजन करायची. मी तिच्या मागोमाग जाई अन हरिपाठ संपल्यावर परत येई.

आम्ही गावी गेलो कि आमची खाण्याची चंगळ असायची. आजी आमच्यासाठी खास गव्हाच्या शेवया करी, त्यासाठी पडवीमध्ये शेवयाचा लाकडी पाट डब्याच्या आधाराने तिरपा लावला जाई, आजी पाटापुढे एका डब्यावर बसत असे आणि पाटावरच्या आडव्या खाचांमधून पिठाचा गोळा हाताने दाबून फिरवायची. मग पाटाच्या कडेने शेवयाची बारीक धार खाली येई. दोन्ही बाजूला दोन बायका बसून त्या शेवया दोन्ही हाताचा आधार देऊन खालच्या कापडावर चकली सारख्या गोलगोल पद्धतीने गोळा करत आणि उन्हात वाळवून साठवून ठेवल्या जाई. आजी मग गूळ घातलेल्या दूधात शिजवून आम्हाला शेवया खायला देई. आमच्यासाठी खास बाजरीच्या बिबड्या केल्या जात. आळण ऊर्फ बेसन तर असायचेच पण शेंगदाण्याचे पातळ आळण सोबत बाजरीची भाकर आणि तिखटाचा गोळा खायला मिळे. आंबेमोहराचा भात घरी व्हायचा. कधीकधी वाफाळलेल्या भाताबरोबर गूळ आणि दूध दिले जाई, पण हा प्रकार मला नाही आवडायचा, मी साखर मागायचो, पण गूळच मिळायचा. एरवी येता जाता भिंतीतल्या कपाटातून पितळेच्या डब्यातील बचकभर गूळ मी नेहमी खात असे. मासवडी रस्सा, पाटवाडी रस्सा बनवला जायचा.

पुरणपोळीचा पण बेत असायचा, काय मजा यायची. गरमागरम पुरणपोळी ताटात पडायची. त्या अगोदर ताटामध्ये गुळवणी ओतलेले असायचे. पुरणपोळी गुळवण्यात भिजलेली मला चालत नसे, त्यासाठी ताटाला खाली लाकडाचे खास बनवलेले साधारण चपट्या त्रिकोणी आकाराचे वटकावणे लावले जाई. आमच्या घरात अशी खास बनून घेतलेली वटकावणे खूप होती. त्याचबरोबर मोठ्या ताटाच्या बाजूला एका छोट्या ताटलीत मूठभर भात ठेवला जाई आणि त्यावर गरमागरम सार ओतला जायचा. आता, अगोदरच दिलेली पुरणपोळी अजून खायला सुरुवात पण झालेली नाही, त्या अगोदर हा भात कसा खायचा हा प्रश्न पडायचा, पण सार उर्फ कटाची आमटीचा वास असा खास यायचा की, विचार नंतर करु, पहिले करूया स्वाहा! तो भात फोडला कि ताटलीभर पसरायचा. मग रस्स्यात कालवून तो भात खायचा. सोबत तिखटाचा गोळा पण असायचाच. शिवाय त्या सारामध्ये थोडे जाडे मीठ टाकून खारट रस्सा खायला मला आवडायचे. मोठे ताट आणि छोटी ताटली ह्या सर्व छान कल्हई लावलेल्या असत. त्या चकचकीत ताटामध्ये हे पदार्थ खूपच छान दिसायचे.

मग ऐक दिवस सकाळी चहा वगैरे झाले कि आजी आम्हाला वाडग्यात नेई, जाताना एक घमेलं आणि एकदोन विळे हातात असे. वाडगे उघडले कि जरा पुढच्या बाजूला शेवग्याच्या झाडाखाली बसून आजी विळ्याच्या साहाय्याने जमीन उकरू लागे. मग दोनतीन मिनिटात जमिनीतील लाल गुलाबी रंगाची रताळी दर्शन द्यायची. मग मी दुसरा विळा घेवून आजूबाजूची जमीन खोदून अजून रताळी काढत असे. घमेलाभर रताळी आम्ही घरी आणत असू. आजी ती रताळी चुलीमध्ये निखाऱ्यावर खरपूस (जरासे जळालेले) भाजून आम्हाला खायला देत असे. कधीकधी छोटया आकाराचे बटाटे पण निखाऱ्यावर भाजून देत असे. या सर्वांपेक्षा भारी असे ती कारळयाची चटणी (आमच्याकडे त्याला काळे तिळ पण म्हटले जाते). घराच्या शेतातील कारळे भाजून, त्यात सुके खोबरे आणि मीठमसाला घातला कि व्हायची तयार खमंग चटणी. पडवीतल्या उखळात तीळ (कारळा) कुटले जायचे. कारळ्याच्या ताज्या चटणीला किंचित तेल सुटलेले असायचे अन चटणीचा एक छान वास यायचा. मी तर वाटीभर चटणी एका वेळेस भाकरी बरोबर खायचो. आमच्या वाडग्यात रताळी काढली त्या ठिकाणी एक शेवगा होता आणि बैलांच्या गव्हाणीच्या वर दुसरा शेवगा होता. आमच्यासाठी आजी त्या शेवग्याच्या शेंगा राखून ठेवत असे. ऐके दिवशी आजी नानाला त्या शेंगा काढायला सांगत असे. मी आणि नाना वाडग्यात जावून शेवग्याच्या शेंगा घरी आणत असू. मग संध्याकाळी शेवग्याच्या शेंगेचं कालवण असा बेत असायचा. हुलग्याच्या शेंगुळ्या, हुलग्याचे कालवण देखील मिळायचे. आमच्या शेतात नाचणी व्हायची. त्याची भाकरी केली जायची. पण नाचणीची भाकर गरम असेल तरच मजा यायची. थंड झाल्यावर भाकर कडक व्हायची, खायाला जमायचे नाही.

मी मटन, कोंबडी नाही खायचो. पण दुसरे वशाट खायचो. कधीकधी कातवडी बाया (कातकरी) डोक्यावर कापडाने झाकून ठेवलेल्या टोपल्या घेवून गावात येत असत. आमच्या घरी यायच्या. मग आजी आमच्यासाठी मासे घ्यायची. बोटाच्या आकाराचे ते मासे अजूनही टणाटणा उड्या मारत असायचे, हे पाहून नवल वाटायचे. कातकरीबाई झाडाच्या पानापासून बनविलेल्या द्रोणात ते मासे काढून देत असे. त्या रात्री माश्याचं कालवण खायचो. अधेमधे गावात सुके मासे घेवून कोणी येत असे. त्याच्याकडून सुके बोंबील, सुके मासे, वामचे चौकोनी तुकडे, सुकट इत्यादी घेतले जाई. चुलीवर भाजलेला बोंबील, वामचा तुकडा रात्री खायला मिळे. बोंबलाचा रस्सा पण व्ह्यायचा, मला तो जास्त नाही आवडायचा, रस्सा चवीष्ट असायचा, पण बोंबलाचा सांगाडा दिसायचा, ते पाहून खायची इच्छा नाहीशी झाली. आयुष्यात एकदाच खेकडा खाल्ला गावाला. घरी गावठी कोंबड्या पाळलेल्या असायच्याच. त्यांची अंडी खायला मिळत. आजी आणि आई माळकरी होत्या. त्या हे वशाट खात नसत.

घराच्या दुधाचे तूप करून मोठ्या पेटीमध्ये बाटलीमध्ये ठेवले असायचे. एक वाटीमध्ये चारपाच चमचे रवाळ आणि घट्ट तूप काढून त्यामध्ये गुळाचे बारीक तीनचार खडे टाकून आजी मला ते खायला देत असे. त्याचा घास तोंडात जाण्याअगोदरच तूपाचा घमघमाट नाकात जायचा. रवाळ तूपाबरोबर गूळ खाण्याची गोडी भारीच असायची. लाला मातीतल्या लाल भुईमुगाच्या शेंगा चुलीवर तव्यात भाजून ठेवत असे. मग येताजाता मुठी भरभरून आणि खिसे भरभरून भाजलेल्या शेंगा फस्त करायचो. घरी बसून खात असेल तर सोबत गूळ पण मिळायचा. भाजलेल्या शेंगातील काही तपकिरी, काळ्या रंगाचे खरपूस भाजलेले दाणे खायला मजा यायची. आजीने कधीतरी गव्ह्याच्या ओंब्या भाजून दिल्याचेही आठवते. आम्ही गावी गेलो कि एकदोन दिवसातच आजी आम्हाला पाठवायची खालच्या मावशीच्या वाडग्याकडे. खालच्या मावशीने आमच्यासाठी खास राखून ठेवलेली वाघूटी आणायला. मावशीच्या वाडग्याच्या दारावरच्या एकमोठे झाड होते. त्या झाडावर वाघूटीची वेल होती. साधारण मोठ्या बोराच्या किंवा लहान लिंबाच्या आकाराची हिरवी फळे असत त्या वेलीवर. ती काढून आणत असू. पण मी ती भाजी कधी खाल्ली नाही.

तर अशी होती खायची चंगळ, हे सर्व पदार्थांची चव अजूनही आठवतेय. अशी गमंत होती आजी जवळ.

आता पुढच्या भागात नानाला भेटूयात

छायाचित्र – सुभाष यशवंत शेळके, ग्रामस्थ-कुडे खुर्द, वास्तव-मुंबई

दुर्देवाने विषयाला अनुसरून योग्य छायाचित्र उपलब्ध नाही आहे.

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant

2 Comments

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!