माझे गाव: भाग १० : आमचे घर, आमची माणसे – १ (my-village-my-home-my-family)
चला आमच्या घरी – या बसा रामराम
आतापर्यंत आपण गावातील बऱ्याच जणांना भेटलो आहोत, बऱ्याच ओळखी झाल्यात. पण अजून तुम्ही आमचे घर आणि आमच्या घरातील माणसांना अजून भेटला नाहीत, चला तर मग आमच्या घराकडे.
पूर्वी आमच्या घराण्याचे एक सामाईक घर होते. नंतर साधारण ५५ साली माझ्या आजोबांनी गावात दुसरी जागा घेवून स्वतःचे नवीन घर बांधले. घर तसे छोटेसेच, एकदम वाडा वगैरे असे काही नाही. पण खूप छान बांधले होते. फक्त तीन खण रुंद आणि चार दालनांचे होते. प्रथम पडवी लागायची. पुढे स्वयंपाकघर, नंतर माजघर आणि शेवटी न्हाणीघर अशी रचना होती. सुमारे दीड मीटर रुंदीची तीन मोठी दारे एका रांगेत होती. घराच्या बाहेर उंच ओटा रस्त्याच्या कडेने तिरपा गेला होता. आणि तेच आमचे अंगणसुद्धा होते. ओट्याच्या उजवीकडे, खालच्या बाजूला मोठे पण वरती छोटे असे शंकूच्या आकारचे, दगड बाहेर आले असल्यामुळे थोडेसे ओबडधोबड दिसणारे तुळशी वृंदावन. त्याच्या शेजारी ओटा चढण्यासाठी दोन पायऱ्या. पायऱ्यांच्याच रांगेत ओट्याच्या कडेने कमी उंचीचे, पाटाच्या आकाराच्या चपट्या दगडांची रांग तिरपी गेली होती. अंगणाच्या कोपऱ्यात हात पाय धुणासाठी एक दगड. अंगणाचा भाग शेणाने सारवलेला. तसे अख्खे घर शेणानेच सारवलेले असायचे. चार फूट पुढे घराचा दरवाजा. तिथे पण एक मोठा दगड कोरून पायरीला ठेवलेला. त्यालाच जोडून आणखी तीन चार दगड घराला समांतर गेले होते. घराचे दार वैशिष्टपूर्ण होते. एकूण तीन भागात ते दार विभागले होते. पायऱ्यांच्या समोर घराच्या डाव्या बाजूला प्रवेशद्वार उत्तरेला तोंड करून, त्याला लागून उरलेल्या जागेत दोन मोठी दारे. त्या दोन दारांना दुकानासारख्या घडीच्या फळ्या होत्या. सुमारे १० इंच रुंदीच्या प्रत्येकी तीन घडीच्या फळ्या दोन्ही बाजूला होत्या. अशा एकूण बारा फळ्या त्या दोन दरवाजांना होत्या. ती दोन्ही दारे उघडली कि अख्खी पडवी प्रकाशाने भरून यायची. मुखय दाराच्या बाजूला खाली एक साधारण १० इंचाची छोटी खिडकी केलेली होंती. तिला आतल्या बाजूला एक झडप होती. मी कधी विचारले नाही पण मांजर येण्याजाण्यासाठी असावी. मुख्य प्रवेशद्वार आणि त्या सर्व फळ्या फिकट गुलाबी रंगाने रंगविलेल्या. प्रत्येक फळीवर देवीदेवता, प्राणी अथवा राष्ट्रपुरुष यांची चित्रे कोरून काढलेली होती. घडीच्या दरवाजांच्यावर उभ्या सळ्यांची जाळी होती.
पायऱ्या चढून आत पाऊल पडवीत टाकल्यावर उजवीकडच्या भिंतीत दोन कोनाडे दिसतील, साधारण सव्वा फूट रुंद आणि २ फूट उंच कोनाडे वरच्या बाजूला मध्यावर निमुळते होते. एका कोनाड्यात विहिरीवर पाणी भरण्यासाठीची लोखंडी बादली ठेवलेली असायची. दुसऱ्यात काहीतरी नेहमी लागणारी वस्तू ठेवलेली असायची. त्या कोनाड्यांच्यावर भिंतीला एक पोटमाळा केलेला होता तेथे काही अवजारे ठेवलेली असायची. समोरच मोठा दरवाजा होता. दरवाज्याच्या काळ्या रंगाच्या चौकटीला सर्व बाजूला छान महिरपी नक्षी होती. त्याखाली दरवाज्याच्या मापाचा एक छोटा पायरीचा दगड होता. दरवाज्याच्या वर आणि आजूबाजूला काचेच्या छोट्यामोठ्या फोटोफ्रेम लावलेलया होत्या. कुटुंबातील सदस्य, घर, बैलं, आम्ही मुले, दोनचार देवांची चित्रे अशा त्या फ्रेम होत्या. पडवीची बाहेरची भिंत जरा वेगळ्या छोटया आयताकृती दगड/विटांची होती. भिंतीच्या खालच्या बाजूला मध्यावर आणि डाव्या कोपऱ्यात एकेक चिरा जमिनीत रोवला होता. त्यांच्याच रांगेत भिंतीत तीन कड्यासुद्धा होत्या. त्यांचा वापर पावसाळ्यात बैलांना पडवीत बांधण्याकरिता केला जात असे. त्या भिंतीलासुद्धा वरच्या बाजूला उभ्या सळ्यांची जाळी होती. त्यातून आतील चुलीचा धूर बाहेर पडत असे. पलीकडच्या कोपऱ्यात लाकडं आणि कारवीचा वापर करून एका पोटमाळा बनविला होता. त्यावर पावसाळ्यात चुलीत जाळण्याकरिता आणलेला लाकूडफाटा साठवून ठेवला जाई. त्याच्याखाली भिंतीत तीन मोठे कप्पे होतात त्यात शेणाच्या गोवऱ्या ठेवल्या जात. पडवीच्या साधारण मध्यावर उखळ होते.
आमचा नाना हा मोठा कलाकार माणूस होता. घराच्या सर्व दारांवरील चित्रे, कलाकुसर नाना करायचा. आमच्या घराचे दुसरे वैशिष्टय म्हणजे साधारण ३ ते ४ इंच उंचीच्या पाट्या. एक पाटी ‘या, बसा. रामराम’ अशी स्वागताची तर दुसऱ्या पाटीवर ‘येथे कोणी पान तंबाखू खाऊन थुंकू नये’ अशी कडक सूचना लिहिलेली होती. माझे आजोबा थोड्या पुढारलेल्या विचारांचे होते तर आजी कडक स्वच्छतेची होती. त्यामुळे घरात आणि आजूबाजूला चांगलीच स्वच्छता असे. गावातील कोणीही माणूस आमच्या घरी येवून तंबाखूची गुळणी घेवून बसला तर त्याला थुंकण्यासाठी उठून बाहेरच जावे लागे असा धाक आमच्या आजीने निर्माण केला होता. वयाप्रमाणे लाड आणि मानसन्मान सर्व व्हायचे पण स्वच्छतेच्या बाबतीत तडजोड नाही. अख्खे गाव घाबरायचे आजीला. तीच शिस्त आजीने तिच्या सुनांना म्हणजे आमची काकू आणि माझी आई ह्यांना लावली. ह्या बाबतीत त्यांना उठताबसता चांगलाच सासुरवास केला असणार. कारण आजी जाऊन आता ४० हून अधिक वर्ष झालीत, पण काकू अजून आजीची शिस्त आणि स्वच्छतेच्या सवयी विसरली नाहीय. काकू आजही घर एकदम स्वच्छ आणि टापटीप ठेवते. स्वच्छतेच्या बाबतीत कडक असलेली आमची आजी माणुसकीला मात्र भारी होती. कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला आमच्या घरात थेट प्रवेश असायचा. पडवी किंवा आतल्या खोलीत गोधडी किंवा गोणपाट टाकून बसायला मिळायचे. आम्ही खाणार पिणार त्याच भांड्यातून सर्वांना जेवण किंवा चहा मिळे. कुठलाही भेदभाव आणि शिवाशिव आमच्या घरात नसे. हा काळ सुमारे ४५ ते ५० वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात घ्यावे. ह्या वागणुकीमुळे आमच्या घरात कायम राबता असायचा. अशा तऱ्हेचं घर गावात त्याकाळी दुसरे नव्हतेच. मंगलौरी कौले, सागाच्या तुळया आणि खांब प्रथमच गावात वापरल्या होत्या. कोणीही घरात आला हि सर्व फोटो फ्रेम आणि नक्षीकाम बघत बसे.
आतल्या घरात म्हणजेच स्वयंपाकघरात भिंतीच्या कडेला औलाची चूल बांधलेली होती. चुलीच्या बाजूला गाडग्यांच्या चार उतरंडी होत्या. त्याच्या पायाला मोठी मडकी मातीने लिंपून ठेवलेली होती आणि त्यांवर ९ ते १० एकापेक्षा एक लहान अशी काळी मडकी एकावर एक रचून ठेवलेली होती. गूळ, साखर, चहा, मसाले अशा काही वस्तू सोडल्यातर प्रत्येक मडक्यात काहींना काही वस्तू भरून ठेवलेल्या असत. उतरंडीच्या वरच्या बाजूला माळ्यावरच्या एका फळीची जागा मोकळी सोडलेली होंती, त्याद्वारे चुलीचा धूर वर निघून जाई, तसेच भरपूर प्रकाश पण आत येई. चुलीच्या बाजूला आजी किंवा काकू बसून स्वयंपाक करीत असे. तिथेच भितींत वरच्या बाजूला एक लाकडाचे कपाट बनविले होते, त्यात साखर, गुळ, चहा अशा मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असत. तिथेच जरा पुढे छताला शिंके लावलेले असे. त्यात दुधाचे भांडे ठेवलेले असे.
प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला वरती शिकार केलेल्या एका घोरपडीचे डोके, शेपूट आणि चारही नख्या लाकडावर ठोकून बसविलेल्या होत्या. दरवाजाला लागून असलेल्या भिंतीत इथे पण दोन कोनाडे होते. एका कोनाड्यात पाण्याला जाताना डोक्यावर भांड्याखाली ठेवण्याकरीता चार पाच कापडी चुंबळी ठेवलेल्या असत. दुसऱ्या कोनाड्यात वेणीफणी करण्याकरीता करंडा ठेवलेला असे. आतल्या माजघरात जातानाच दरवाजाला लागूनच डाव्या हाताला माळयावर जाण्याकरिता जिना होता. आमच्या घराचा माळा स्वयंपाकघर आणि माजघर ह्या दोन्ही खोल्यांच्या वरच्या बाजूला होता. खालच्या बाजूने उंची चांगलीच १० फूट असेल. तीनचार पायऱ्यांवर स्वयंपाकघराच्या बाजूला छोटा उघडा कोनाडा होता. माळ्याच्या वरच्या बाजूला मध्यावर कौलांची उतरती बाजू होती. त्यामुळे दोन्ही बाजूला माळ्याची उंची कमी होती. जिना चढून वर आलो कि समोरचा सुमारे दीड मीटरचा चौरस भाग जरा वेगळा दिसायचा. तिथे एक चार इंचाची पोकळी दिसे, त्यामध्ये त्याच आकाराच्या लाकडी फळ्या ठेवलेल्या आता आणि त्यावर अजून काही वजन असायचे. त्या फळ्या बाजूला केल्या कि खाली दिसायचे ते बळद. सुमारे दीड मीटर लांब रुंद आणि माळ्याची संपूर्ण उंची म्हणजे जवळपास १० फूट उंच एवढ्या आकारची भूमीगत बंदिस्त खोलीच होती ती. भात साठवायची जागा होती ती. भात काठोकाठ भरलेले असायचे. आजी असेपर्यंत घरात अन्नधान्य भरपूर असायचे. खाचरांतून कित्येक खंडी भात व्ह्यायचे. भुईमूग, शाळू आणि बाजरी व्हायची. बाकीचे किरकोळ तर असायचेच. आम्ही गावाला गेलो कि नाना किंवा आजी आम्हाला ते बळद उघडून दाखवायचे. माळ्याला दोन्ही खोल्यांच्या वर एक एक फळी मोकळी सोडली होती आणि त्याच्यावर काचेची कौल लावली होती त्यामुळे घरात नैसर्गिक प्रकाश भरपूर असायचा. माळ्यावर सुद्धा एका बाजूला मडक्यांची उतरंड होती. प्रत्यके मडक्यात काय काय भरलेले असायचे. दुसऱ्या बाजूला लाकडाच्या मोठमोठ्या पेट्या, लोखंडी पिंपे. मधोमध काठ्या टांगलेल्या असत, त्यावर आणि भिंतीवरील खिळ्यांवर मणी, घुंगरू लावलेली बैलांच्या जुंपण्याचे अनेक जोड, विविध रंगी कासरे, औताला किंवा बैलगाडीला लावण्याकरिता लोखंडी साखळ्या, चाबूक, शेतात काम करताना बैलांना लावण्याकरीताच्या मुरख्या, विविध आकाराच्या चाळण्या अशा नाना वस्तू असत. ह्या सर्व वस्तू ब्रिटिशकालीन असल्याने अतिशय दर्जेदार आणि टिकावू होत्या, नव्हे आहेत, आजही कित्येक वस्तू सुस्थितीत आहेत.
माळ्याच्या मध्यावर एक छोटी खिडकी बाहेरच्या बाजूला उघडत असे. नक्षीदार जाळी असलेली ती खिडकी केवळ देखाव्यासाठी होती कारण मी लहान असूनसुद्धा मला त्यातून कसेबसे बाहेर पडता यायचे. बाहेर आल्यावर एकदम खालच्या पडवीच्या कौलांवर येई. आणि सर्व गाव तेथून दिसत असे. पण कौलांवर जास्त उभे राहणे जमायचे नाही. त्या खिडकीच्या आतल्या बाजूला खालच्या स्वयंपाक घरातील वरच्या बाजूची फळी काढलेली होती त्यातून खालच्या चुलीच्या धुर बाहेर निघून जाई. माळ्यावरून खाली येताना शेवटच्या पायरीच्या पुढे खोलीच्या छताला फळ्या टाकून एक छोटा कप्पा केलेला होता. त्यात विविध प्रकारची विळे, कोयता अशी लोखंडी हत्यारे आणि अवजारे असायची.
माजघरात पुन्हा काही पिंपे होत. त्यातही तांदूळ भरलेले असायचे. माळ्याखालच्या भिंतीत एक छोटे कपाट होते. त्यात अनके गोष्टी असायच्या. अंधारात चमकणाऱ्या फ्लुरोसंट (रेडियम) च्या माळा, डबे भरून विविध आकाराचे आणि रंगाचे मणी अशा अनेक गोष्टी तिथे होत्या. मागच्या बंदिस्त न्हाणीघरात एक मोठी पेटी होती. त्यात खूप बाटल्या होत्या. तेलाच्या बाटल्या, तुपाची बाटली, औषधांच्या बाटल्या अशा अनेक बाटल्या त्या पेटीत होत्या. सर्वात महत्वाची बाटली होती ती सर्व रोगांवर एकच औषध ह्या प्रकारातील ‘राजबिंदू तेल’ या औषधाची. काहीही दुखणे निघाले कि आजी थोडे उग्र असे ते राजबिंदू ओषध पाण्यातून प्यायला देई. ताबोडतोब आराम पडत असे. स्वतंत्र न्हाणीघर असलेले त्याकाळचे आमचे एकमेव घर होते.
अशा तऱ्हेने आमचे घर आपण पाहून झाले आहे. घरातील माणसांची तोंडओळख सुद्धा झालेली आहे.
आता पुढच्या भागात घरातील माणसांची सविस्तर ओळख करून घेवूयात ….
(घराचे जुने छायाचित्र सापडले नाही म्हणून दुसरेच छायाचित्र टाकले आहे. )
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

घराचे चित्र प्रत्यक्ष समोर येते खुप छान.