मी पोहायला शिकतो तेव्हा
मी साधारण सहावी सातवीत असेन तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. त्यावर्षी माझा सवंगडी होता गणपत रामभाऊ सावंत. ती सुट्टी अख्खी त्याच्या बरोबरच काढली. त्याचे घर माझ्या घराच्या समोरच्या बाजूला, फक्त त्याच्या घराचे तोंड पश्चिमेला आणि आमच्या घराचे तोंड उत्तरेला एवढाच फरक. आता त्याच्याबरोबर सुट्टी काढायची म्हणजे त्याच्या कामानुसार मला जुळवून घ्यावे लागले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्याच्याबरोबर असे. तो जिथे जाणार तिथे. बहुतेक एखाद वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे गणपत. सकाळी उठून माझी अंघोळ आणि चहापाणी झाले कि मी निघे. गणपतच्या घरी त्याचा मोठा भाऊ सखाअप्पा आणि वहिनी सुलाबाई. सुलाबाई आमच्याच शेजारच्या मोऱ्यांच्या घरातली होती. वहिनी कामाला वाघच जणू. कधीही पहावे काहीना काही काम करतच असे. मी त्यांच्या घरी जायचो तेव्हा वहिनी चुलीवर भाकरी करीत असे. कालवण वगैरे औलावर अगोदरच तयार असे. रानात कामाला जाण्याअगोदर वहिनी दिवसभराचे जेवण करून जाई. ती संध्याकाळीच परत येई. गणपत जेवायला बसलेला असे. मग वहिनी मला पण चुलीवरची ताजी भाकर खायला देत असे. मी एखाद भाकरी खात असे. कालवण साधेच पण चविष्ट असे, सोबत शेंगदाण्याची चटणी किंवा लाल मिरचीचा गोळा, मजा यायची. मग दुपारच्यासाठी आम्हा दोघांकरीता भाकरी करून ठेवीत असे. अन कामाला जाई.
मग आम्ही गणपतच्या वाडग्यावर (गुरांचा गोठा) जात असू. त्याच्या वाडग्याच्या खालच्या बाजूला खाचरात त्यांची स्वतःची विहिर आहे. त्या विहिरीवर त्यांच्या बैलांना पाणी पाजून, वैरण देऊन झाले कि आम्ही मोकळे. मग आम्ही दोघे थोडा वेळ तिथे घालवल्यावर गावात परत येऊ. मग त्याच्या घरी दुपारची भाकर खाऊन देवळाकडे जात असू. गणपत माझ्यापेक्षा अभ्यासात हुशार होता. माझ्यापेक्षा जास्त गुण मिळवीत असे तो. गणपतच्या खिशात नेहमीच हरिपाठाचे छोटे पुस्तक असे. तो हरिपाठ वाचीत बसे. मला चालीत अभंग म्हणून दाखवी. मी पण हरिपाठाचे पुस्तक त्याच्याकडून घेऊन अभंग वाचीत असे. ‘देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी ‘ अशी सुरुवात असे. दोन चार पाने वाचून झाली कि मला कंटाळा यायचा. काहीच अर्थ कळायचा नाही. पण पहिल्या चार ओळी पाठ झाल्यात त्या अजूनपर्यंत विसरलो नाही. रात्री देवळात गेल्यावर सर्वजण पुस्तकात न बघता हरिपाठ म्हणायचे. मी नुसता एकमेकांकडे बघत राहायचो कारण मला काहीच येत नसायचे. टाळ सुद्धा चांगलेच वजनदार असायचे आणि ते विशिष्ट तालातच वाजवावे लागतात. गणपत मला टाळ वाजवायला शिकवायचा पण मला नाही जमले कधी. मी फक्त आपल्या टाळ्या वाजवीत उभा असायचो. असो.
थोडया वेळात आम्ही परत गणपतच्या वाडग्याकडे जाऊन बैलांना वैरण द्यायचो. तोपर्यंत दुपारचे बारा एक वाजलेले असत, सर्वत्र सामसूम झालेली असे. वाडग्याच्या खालच्या बाजूला गणपतच्या विहिरीजवळ बरीच मुले जमलेली असायची. आम्ही पण तिथे जायचो. काही मुले कपडे काढून फक्त लंगोटावर असायची, मग पोहायला सुरुवात व्हायची. काही मुले वरूनच दणक्यात विहिरीत उडी मारत. धप्प असा जोरात आवाज होई. चोहोबाजूला पाणी उडे. विहीर तशी खोल नव्हती. पण पाणी खाली गेलेले असायचे. मग एकामागोमाग एक मुले विहिरीत उड्या मारायची. आणि मला म्हणायची ‘ये खाली’. पण मला पोहता येत नसे. हा मोठा अपमान असायचा. पण जीवावर बेतणारा अपमान सहन करण्याची ताकद माझ्यात होती. त्यामुळेच मी ‘नको, मी वरच बरा’, असे म्हणून फक्त त्यांच्याकडे बघत उभा रहायचो. विहिरीला आतल्या बाजूने दगडांमध्ये घट्ट कड्या लावलेल्या होत्या. त्यांच्या खाली विहिरीच्या एका बाजूला चारेक फुट लांब आणि दोनेक फूट रुंद असा अखंड दगड तिरपा गेला होता. ज्या मुलांना उडी मारता येत नसे ती मुले कड्यांना धरून विहिरीत उतरत असत आणि खालच्या मोठ्या दगडावर उभी रहात. मग एकेक जण खाली पाण्यात अलगद उतरून पोहण्यास सुरुवात करी. एकदम नवीन पोरं मोठ्या दगडाला धरून पाण्यात पाय हलवत राहायची. मध्येच दगड सोडून पाण्यात एक फेरी मारायची. मोठी मुलं जोरजोराने हातपाय आपटून पाण्याचा मोठा आवाज करत विहिरीत दोन चार मोठ्या फेरी मारायचे. विहिरीमध्ये त्याचा आवाज घुमायचा. शिकाऊ मुले तिथल्या तिथे फेरी मारायची आणि दम घ्यायची. सर्वजण मला खाली बोलवत असत.
मला पोहणे येत नसले तरी देखील कड्यांना धरून खाली उतरणे मला जमण्यासारखे होते, मग तेवढे तरी साहस करावे असे मला वाटले. मग मी गणपतला सांगितले तु पहिला खाली उतर मग मी येतो. कड्यांना धरून मी भराभरा खाली उतरलो. खालच्या मोठ्या दगडावर उभा राहिलो. तेथे दोनचार मुले अजून उभी होती. ती खाली जायची अन पाण्यात एक दोन फेऱ्या मारून परत वर येत अन मला आग्रह करत ‘चल खाली, तुला पोहायला शिकवतो, सोपं असत ते. फक्त पाण्यात उतरायचे आणि हात पाय हलवायचे मग आपोआप पोहायला येतं’. एवढेच सर्व ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मला हुरूप आला. मनात म्हटले ‘आता उतरायचे, घाबरायचे नाही’, सर्व मुले तर सभोवती होतीच मला धरायला. मग एकाने मला लंगोट घालायला दिला. तो घालून मी त्या दगडावरून खाली उतरलो. दगड अजून खोल होता त्यामुळे त्याच दगडाच्या खालच्या बाजूला मी उतरलो. साधारण गुढग्यापर्यंतच मी पाण्यात होतो. मला धरून ठेवलेल्या मुलांचे मी हात सोडले आणि एकटा तोल सावरत पाण्यात उभा राहिलो. खाली बघितले तर पाणी हलताना दिसल्याबरोबर तोल गेला. पण दगडाला धरूनच उभा होतो म्हणून पडलो नाही. आता खरी वेळ आली होती पाण्यात उतरण्याची. मी हळूच पाय उचलून पाण्यात शिरलो. दोन्ही पाय पाण्यात सोडून दिले, पण हाताने दगड सोडला नव्हता. आता थोडा धीर आला अन दगड सोडून दिला आणि पाण्यात अजून खाली उतरलो. छातीपर्यंत पाण्यात उतरलो आता फक्त पाण्यात स्वतःला सोडून द्यायचे आणि हातपाय हलवायचे एवढेच बाकी होते. मला धरण्यासाठी सगळेच होते. कोणीही मला बुडू देणार नव्हते याची खात्री होती. पण जसा पाण्यात छातीपर्यंत उतरलो, अंगातून एक शिरशिरी निघून गेली. थंड पाण्याने लगेच हुडहुडी भरली. मी कुडकुडायला लागलो. त्यातच आजूबाजूला नजर गेली तर झुरळापेक्षा छोटे पण गोल आकाराचे कीटक पाण्यात सभोवती फिरताना दिसून आले. ते किटक पायाला, अंगाला चाटून जाऊ लागले. हे बघितल्यावर मग मात्र धीर सुटला. भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था झाली. एकवेळ पाण्यात बुडून मेलो तरी चालेल पण हे कीटक अंगावर नको असे वाटायला लागले. मग मात्र मी झपाट्याने दगडाकडे आलो, दगडाला धरले अन पटकन दगडावर चढून उभा राहिलो. सर्वजण मला पुन्हा खाली बोलावत होते. पण आता मी परत पाण्यात उतरणार नाही असा निर्धार करूनच वर दगडावर घट्ट उभा राहिलो होतो. अशा तऱ्हेने माझा पोहण्याचा पहिला वर्ग वाया गेला. त्यांनतर मी किती तरी वेळा कड्या पकडून विहिरीत खाली उतरुन दगडावर उभा राहिलो पण पोहणे नाही म्हणजे नाही. एकदा ठरवले कि मी कोणाचे ऐकत नाही.
काही दिवसांनंतर पुन्हा विहिरीवर गेलो होतो. सर्व मुलं जमली होती. तिथे परत थोडा धीर गोळा करून उतरलो. पोहता येत नाही म्हणजे काय? मुंबईला परत जाण्याअगोदर पोहणे शिकूनच जायचे असा निर्धार पुन्हा केला. एकाचा लंगोट घालून कड्या धरून विहिरीत उतरलो. दगडावर उभा राहिलो. दिर्घ श्वास घेतला आणि आता पाण्यात उतरणार एवढ्यातच समोरच्या भिंतीतून बाहेर पडला एक वीरुळा (साप) आणि पाण्याच्या कडेकडेने पोहत पोहत निघाला फिरतीवर. त्याला वळवळताना बघितल्यावर मी उलटा फिरून कड्यांना पकडून सुसाट वर आलो. सर्वजण म्हणता होते, ‘अरे घाबरू नको, तो वीरुळा आहे, चावत नाही, विषारी नाही’. आता विषाची परीक्षा कोण घेणार? त्यापेक्षा पोहोण्याची परीक्षा रद्द केलेली बरी असा सावध विचार करून शांतपणे नकार दिला. कपडे बदलले. आणि पुन्हा म्हणून पोहोण्याच्या नादी नाही लागलो तो आजपर्यंत.
अशी होती माझी पोहण्याची शिकवणी जी कधीच पूर्ण झाली नाही..
(लेखात वडीलधाऱ्या मंडळी विषयी एकेरी उल्लेख हा प्रेमा पोटीच आहे.)
सर्व छायाचित्रे – अशोक सबाजी मोरे, कुडे खुर्द ग्रामस्थ
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९


मस्त लेख