माझे गाव: भाग ८ : यात्रेची गंमत
गावची यात्रा – भाग २
आम्ही लहान मुले सकाळपासून देवळाकडे येऊन जाऊन फिरत असू. काल्याचे किर्तन चालले असे, काही धार्मिक मुले फक्त तिथे बसून रहायची, मला त्यात फारसा रस नसायचा, फक्त कसे काय चालले आहे हे कुतूहलाने पाहायचो. मग देवळात जाऊन देवाची आरास कशी केली ती पाहायचो. देवळाला नमस्कार करायचो. गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला हाराच्या टोपल्या ठेवलेल्या असायच्या. दुसऱ्या बाजूला रात्रीच्या पालखीची तयारी चालू असे. देवळाच्या मागच्या बाजूला जेवणाची (भंडारा) तयारी चालू असे तिकडे एक फेरी व्ह्यायची. जमिनीत सुमारे दीड ते दोन मीटर लांब आणि दोनेक फूट रुंद असे खड्डे केलेले असत, त्यात खाली लाकडाचे मोठमोठे ओंडके घालून त्यांचा जाळ करीत असत. त्यावर मोठमोठ्या आकाराची पण लहान तोंडाची पितळेची पातेली ठेवून त्यात भात शिजवला जायचा. त्या भांड्यात सुरुवातीला केवळ पाणी टाकले जायचे. पाणी खूप तापले कि त्यात अगोदरच निवडलेले तांदूळ टाकले जायचे. आणि केवळ पाचच मिनिटात त्या पातेल्यांची (त्यांना डेंग म्हटले जायचे) तोंड फडक्याने बंद करून ती डेंग दोन्ही बाजूला लाकडांच्या सहाय्याने धरून विस्तवावरून उतरवले जाई आणि जवळच तयार केलेल्या एका खड्यात उलटी करून थोडावेळ ठेवली जायची, मग त्यातील गरम गरम पाणी खड्यात पडायचे आणि डेंग आतल्या खोलीत आणून उपडी केली जायची, मग त्यातून पांढराशुभ्र भात खाली अंथरलेल्या कपड्यावर बाहेर पडे. असा तो पांढराशुभ्र गरमागरम वाफाळलेला भात पहाताना मजा यायची. शिवाय आमच्या गावाकडचा सुप्रसिद्ध आंबेमोहर तांदूळ असायचा तो, त्याचा खास सुंगध सगळीकडे पसरून राहायचा. शेजारीच दुसऱ्या डेंगीमध्ये वरण किंवा आमटी आणि तिसऱ्या डेंगीत शाकभाजी असा बेत असे. शाकभाजी शिजल्याचा रटरट आवाज येई. सगळीकडे धूर, वाफा आणि सुंगध पसरलेला असे. ते पाहून भूक उफाळून यायची, पण आजच्या दिवशी घरात सकाळी कोणीच जेवण बनवीत नसे. त्यामुळे काल्यानंतर भांडारा होईपर्यंत थांबावेच लागे.


तिथून बाहेर आलो कि, शेजारचे हनुमान मंदिर, समोरचे ग्रामपंचायतीचे कार्यालय तसेच मंदीराच्या बाहेरच्या बाजूला, समोरची गल्ली अशा सर्वच ठिकाणी निरनिराळी दुकाने थाटलेली असत. विविध खेळणी, बांगड्या विकणारा कासार, फणी, कंगवा, टिकल्या इ. वस्तू विकणारा, पान तंबाखू घेवून आलेला तांबोळी, मसाला आणि सौदा विकणारा दुकानदार, भेळ, शेव चिवडा, कुरमुरे, रेवड्या, शेंगुळ्या असे खाद्यपदार्थाचे दुकानदार, गारीगारची सायकल घेवून आईस्क्रीम विकणारा असे नाना दुकानदार आपापली दुकानं थाटून रस्त्यावर बसलेले असायचे. बाळू मामा (तांबोळी) चे दुकान हमखास असायचे. त्याच्याकडे गेलो कि रेवड्या, शेंगुळ्या असा काहीतरी खाऊ मिळायचाच. त्याने पोटात थोडीफार भर पडायची. मग आता भंडारा होईपर्यंत तग धरता यायची. खेळण्यांच्या दुकानाकडे जाऊन विविध खेळणी पहायचो. तसली खेळणी मुंबईकडे मिळायची नाही. एखादी गारगार पण घ्यायचो. उन्हामध्ये गारीगार खायला मजा यायची.
यात्रेच्या निमित्ताने गावातीलच हौशी आणि तरुण मंडळी यांच्या तर्फे संध्याकाळी भारूड किंवा नाटकाचा कार्यक्रम ठेवलेला असे. शेजारच्या गावावरून नाटकाचे पडदे आणले जात. आणायचे काम अर्थातच जास्त हौस असलेल्या आमच्या घराकडे असे. नाना बैलगाडी काढून देत असे. मग नाना किंवा एक दोन कार्यकर्ते बैलगाडी घेवून औदरला जाऊन नाटकाचे पडदे आणायचे काम करीत. मी एकदा त्यांच्याबरोबर गेल्याचे आठवते. नाटकाचे पडदे घेऊन निघालेली बैलगाडी औदरच्या घाटातून वर चढताना बरीच अडचण झालेली आठवते. मग रात्री उशिरा गॅसबत्ती, बॅटरी किंवा जनरेटर ह्यांच्या सहाय्याने तो नाटकाचा प्रयोग किंवा भारूड पार पडायचे. या कार्यात माझे वडील, शेजारचा प्रभू धंदे आणि अन्य सहभागी असायचे. माझे वडील पेटीवर संगीत द्यायचे.
यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे देवाची पालखी. रात्री उशिरा ग्रामदैवत श्री भैरवनाथाची पालखी गावातून निघे. गाव तसे लहानच पण ठिकठिकाणी थांबत थांबत मिरवणूक गावातून येई. या वेळेस मी अंगणातच झोपेलेलो असे. आवाज झाल्यावर थोडं उठून बसायचो, मिरवणूक पाहायचो. आणखी फारसे काही आठवत नाही. नंतर जसे कळू लागले तसे यात्रेला गेलो तरी मुक्कामाला थांबणे व्ह्यायचे नाही, त्यामुळे खरी पालखी मी अजून पाहिली नाहीय.
यंदा मात्र जागेपणीच पालखी बघायची इच्छा आहे.
गावची यात्रा – शेवटचा भाग २ समाप्त.
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९
अजून काही छायचित्रे आणि क्षणचित्रे

खुप छान.