whatsapp image 2020 11 09 at 10.40.51 pm 1

माझे गाव: भाग ७ : गावची यात्रा

गावची यात्रा – भाग १ – बैलगाडयांची शर्यत

आपण शहरात वाढलेली माणसे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार आणि वयोगटानुसार आपल्या शहरात आपणास मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध असतात. आणि आपापल्या क्षमतेनुसार त्यात रमून जगत असतो. ग्रामीण भागात हे पर्याय खूपच मर्यादित असतात. पण दरवर्षी साजरे होणारे विविध सण, उत्सव, घरातली किंवा भावकीतील कार्ये हे सर्व सार्वजनिकरित्या साजरे करण्याचा आनंद गावकरी घेत असत. त्याचप्रमाणे धार्मिक सण, चालीरीती आणि परंपरा गावात मोठ्या उत्साहात आणि हिरिरीने भाग घेवून साजरे केले जात. कोणत्याही गावच्या धार्मिक समारंभामध्ये ग्रामदैवताचा उत्सव अतिशय महत्वाचा मानला जातो. गावाचे संकटापासून संरक्षण व्हावे म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे हि प्रथा गावात पूर्वापार चालू असते. म्हणून प्रत्येक गावाची स्वतंत्र देवता असते आणि तिला ग्रामदैवत असे म्हटले जाते. वेशीवरील मारुतीच्या बरोबरीने ग्रामदेवतेची मंदिरे हि प्रत्येक गावात हमखास असतातच.

आमच्या गावचे ग्रामदैवत आहे श्री भैरवनाथ! भगवान शंकराचा अवतार. पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करणाऱ्या भैरवनाथाची पूजा पूर्वापार चालत आहे. गावात भैरवनाथाचे खूप जुने मंदिर आहे. परंपरेप्रमाणे दरवर्षी होळीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे फाल्गुन शुद्ध द्वादशी ह्या दिवशी ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा गावात भरते. संपूर्ण गावासाठी हा मोठा सण असतो. महिनाभर अगोदरपासून तयारी केली जाते. गावातील प्रत्येक घरातून धान्य वगैरे गोळा केले जाते. चाकरमान्यांकडून रोख वर्गणी गोळा केली जाते. हॅण्डबील छापून गावोगावी पाठवले जातात. काल्याच्या कीर्तनासाठी अथवा हरिनाम सप्ताहासाठी गावोगावचे ह.भ.प. निमंत्रित केले जात. एक आठवडा अगोदर गावात हरिनाम सप्ताहाने उत्सवाची सुरुवात होते आणि फाल्गुन शुद्ध द्वादशीच्या दिवशी काल्याने सांगता होते.

आमच्या गावच्या यात्रेच्या आठवणी मी लहान असतानाच्या आहेत. म्हणजे सुमारे ३५ ते ४५ वर्षांपूर्वीच्या आहेत. संपूर्ण गावातील गावकरी आणि पुण्या-मुंबई सारख्या बाहेरगावच्या ठिकाणी असलेली गावकरी मंडळी यात्रेला हमखास गावाला येणारच. उत्सवाच्या दिवशी बारसेला दुपारपर्यंत काला झाला की, लगेच भंडारा होई. आदल्या दिवशी रात्रीपासून गावकरी देवळाच्या मागच्या बाजूला भंडाऱ्याची तयारी करत असत. भात, वरण किंवा आमटी आणि शाकभाजी असाच साधा बेत असे. पण जेवण अतिशय चविष्ट असे. ग्रामदैवत श्री भैरवनाथ आणि अन्य देवीदेवता यांना नैवद्य दाखवून झाला की जमलेल्या सर्व पाहुण्यांना प्रथम पंगतीत बसवले जात आणि मग सर्वात शेवटी गावकरी कार्यकर्ते पंगतीला बसत. भंडारा संपल्यावर मग थोडा निवांतापणा मिळे. मुंबईच्या फंडाचे कार्यकर्ते अजूनही देवळाच्या आवारात मोठ्या घोंगडीवर बसून फंडाचा वार्षिक हिशोब करीत बसलेले असत. फक्त उत्सवाच्या निमित्ताने गावात आलेल्या गावकऱ्यांकडून फंडाची उचल किंवा वर्गणी जमा करण्याची कार्यकर्त्यांची गडबड सुरु असे. एखादा गावकरी काही कारणाने त्यावर्षी आर्थिक अडचणीत आला असेल तर तो गावकऱ्यांना फंडामधून घेतलेल्या कर्जाऊ रक्कम माफ व्हावी अथवा व्याज आणि मुदलात सूट मिळावी म्हणून विनंती करायचा. ज्या सदस्याला गेल्यावर्षी अशाच प्रकारची सवलत अथवा माफी मिळाली नव्हती तो प्रथम विरोध करायचा, त्यावर मग त्याच्या बाजूने चारपाच जण बोलत आणि त्याच्या विरुध्द दुसरे पाचसहा. मग पाचएक मिनिटे छान वादविवाद, भांडणे व्हायची तर काहींचे मनोरंजन व्हायचे काहीजण विडीचा धुर काढत निवांतपणे चाललेला गोंधळ पहात बसत. थोडा धुरळा खाली बसला कि एकमताने निर्णय दिला जायचा. बहुतेक वेळा अडचणीतील गावकऱ्याच्या बाजूनेच निर्णय व्हायचा आणि त्याला सवलत मिळायची. मी माझ्या वडिलांच्या बरोबर तेथे जाऊन घोंगडीवर बसून एकेकाकडे पहात बसायचो. सगळी मोठमोठी माणसे मोठया आवाजात एकमेकांशी वादविवाद असे काही करायचे कि आता भांडणे पार विकोपास जाऊन मोठी मारामारी होणार कि काय असे वाटायचे. पण असे नाही व्हायचे. बैठक संपायची आणि काहीच झाले नाही अशा तऱ्हेने सर्वजण आपापसात बोलत विडी सिगारेट ओढत, पानतंबाखू खात खात घराकडे जात आणि देवळाच्या मंडपात थोडी सामसूम होई.

तोपर्यंत यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली असायची. गावाच्या बाहेर शाळेच्या समोरच्या बाजूला वावरात मातीचा हौद केला जाई आणि त्यात गावोगावच्या पहिलवानांच्या कुस्त्या होत असत. सुरुवातीला आमच्या गावच्या छोटया मोठ्या नामांकित किंवा हौशी पहिलवानांची प्रदर्शनीय कुस्ती होत असे आणि मग बाहेरगावच्या मल्लांची इनामाची कुस्ती. त्यात दोन एक तास जात. तोपर्यंत मी घराकडे एखाद फेरी मारत असे. तेव्हा घरात सणाच्या निमित्ताने पुरणपोळ्या बनविण्याचा कार्यक्रम चालू असे. तिथे ताज्या पुरणाचा थोडा बकाना भरीत असे. काल्याचा भंडारा असल्याने सकाळच्या वेळेत गावात चूल बंद असे. फक्त देवाला नैवद्य दाखवण्यापुरतेच गोडधोड शिजविले जाई. प्रत्येक घरात आलेल्या पाहुण्यांकरिता रात्रीच्या जेवणात गोडाचा, पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असे. यात्रेच्या निमित्ताने गावात आजूबाजूच्या गावातील मंडळी, लांबचे सगेसोयरे, मित्रमंडळी अशी खूपच माणसे प्रत्येक घरात उतरलेली असत.

whatsapp image 2020 11 07 at 9.42.35 am 1
बैलांची मिरवणूक
छायाचित्र : राजेश रामदास सावंतकुडे खुर्द ग्रामस्थ, वास्तव्य – मुंबई

तेवढ्यात गल्लीमध्ये गडबड होई. हलगी आणि पिपाणी यांचा आवाज जोराजोरात वाढत जाई. थोडा आरडाओरडा पण ऐकू येई. मग लक्षात येई आता बैलगाड्यांच्या शर्यतीची वेळ झाली. शर्यतीमध्ये सहभागी होण्याकरीता गावकरी आपापले बैल मोठ्या मिरवणुकीने वाजतगाजत आणत. हळदीने रंगलेले उंच खिलारी बैल, काळे पांढरे, लाल तांबड्या, करड्या रंगाची गावठी बैलं, त्यांच्या मागोमाग छोटे गोऱ्हे, एखादा घोडा अशी ती मिरवणूक गावातून निघून शर्यतीच्या घाटाकडे वाजतगाजत जात असे. त्यावेळेचे शर्यतीचे गाडे हे नेहमीच्या वापरातलेच गाडे असत. आजकालच्या सारखे खेळण्यातील गाड्यासारखी केवळ दिडएक फूट व्यासाची चाके त्याला नसत. वाजंत्रीवाले त्या बैलांपुढे उभे राहून जोराजोरात वाद्ये वाजवीत, त्यामुळे बैल अनावर होत, त्यांना आवरताना गाडा मालकाची दमछाक होत असे. काही नाठाळ, ताकदवान आणि चपळ बैलांना दोन्ही बाजूने मोठमोठे कासरे बांधून दोघा दोघांनी पकडलेले असे. मला हि मिरवणूक पाहायला आवडत असे. वाद्यांचा आवाज ऐकू आल्याबरोबर मी बाहेर येवून एखादया घराच्या ओट्यावर उभे राहून ती बैलांची मिरवणूक मी पाहात असे. बैलं हा माझ्या कायम आवडीचा आणि आकर्षणाचा विषय राहिला आहे. त्यामुळे बैलं दिसली कि मग त्यांचे निरीक्षण करणे चालू व्हायचे. त्यांची उंची, रंग, शिंगाचे आकार, वशिंडचा आकार आणि उंची, चालण्याची ढब, काजळ घातल्यासारखे काळेभोर डोळे, मानेखालची पोळी इत्यादी गोष्टी न्याहाळून मग मी प्रत्येक बैलाची तुलना करून सर्वात चांगला बैल कुठला दिसतो हे ठरवत असे. ह्या सर्व धामधुमीमध्ये काही बैलांच्या नाकातून वेसणीच्या खाली रक्त बाहेर पडत असे हे पाहिल्यावर खूप वाईट वाटायचे.

मग घाटाखाली हे सर्व आल्यावर अजून गोंधळ वाढायचा. सुरुवातीला आमच्या गावातील मानाचे किंवा नामांकीत गाडे सुटायचे. गावातील गाडामालकांकरिता हा एक प्रकारचा सराव असायचा. आमच्या पैंजण्याला सुद्धा गाड्याला जुंपले जायचे आणि तो खिलारी बैलाच्या जोडीने पळायचा. त्यानंतर नंबराप्रमाणे अथवा मानाप्रमाणे बाहेरच्या गावातील गाडे सुटायचे. आमच्या गावच्या बैलगाड्याच्या शर्यतीच्या घाटाच्या चढाच्या दोन्ही बाजूला चांगलाच उंचावटा होता. त्यावर सर्व प्रेक्षक दाटीवाटीने बसलेले असायचे. घाटाच्या सुरुवातीलाच एक लाकडी चौथरा बांधलेला असायचा. त्यावर गावातील काही मान्यवर आणि पंच उभे असायचे. ह्या मंचावर स्थान प्राप्त करण्यासाठी काही हौशी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागायची. त्या मंचावरून गावातील कोणी एक कार्यकर्ता हातातील माईकवरून सर्व घोषणा (रनींग कॉमेंट्री) करायचा. गाडामालकाचे नाव घेवून गाड्याची घोषणा करायचा, ‘आता आपल्या पंचक्रोशीतील नामंकीत (अमुकतमुक) गावाचे गाडामालक, प्रगतीशील शेतकरी —–, (अमुकतमुक) गावाच्या शर्यतीच्या प्रथम क्रमांकाचे विजेते, यांचा गाडा आता सुटत आहे’, अशी नावे घेवून एकेक गाडा सोडला जायचा.

गाडे सुटायच्या जागेजवळ आजूबाजूच्या शेतामध्ये बाहेरगावचे गाडे येऊन अगोदरच येऊन थांबले असायचे. त्याच गर्दीत गावातील यात्रेतील भेळ, गारीगार, पान तंबाखू यांचे काही दुकानदार आपापली दुकाने, गाडी घेवून आलेले असायचे. आजूबाजूच्या गोंधळाला न घाबरता मोठ्या धेर्याने ते आपली दुकाने लावून उभे असत. गाड्याला शर्यतीचे बैल जुंपणे हे फार मोठे कार्य असायचे. आजूबाजूला चाललेला मोठा गोंगाट, आरडाओरडा, वाजंत्र्यांच्या वाद्याचा आवाज, सभोवती जमलेली तुफान गर्दी, लाऊडस्पीकर वरून होणारा मोठा आवाज ह्यामुळे गाड्यांची बैलं अगोदरच बिथरलेली आणि घाबरलेली असायची. त्यांना गाड्याला जुंपणे हे मोठे कष्टाचे काम असायचे. गाडामालक आणि त्यांचे सहकारी मोठ्या मुश्किलीने गाड्याला बैलं जोडत असत. एखादा बैल अशा वेळेस निसटून देखील जायचा आणि आजूबाजूच्या गर्दीत घुसायचा आणि थोडी पळापळ आणि पांगापांग व्हायची. मग त्या बैलाला पकडून आणले जायचे आणि कसेबसे गाड्याला जुंपले जायचे. तोवर मंचावरील उद्घोषक नावे घेऊन घेऊन थकलेला असायचा. मग मधल्या वेळेत गावातील अथवा बाहेरगावच्या इतर मानकऱ्यांची नावे घेऊन त्यांचे स्वागत केले जायचे.

whatsapp image 2020 11 11 at 4.43.00 pm

एकदाची कशीबशी बैल गाड्याला जुंपली न जुंपली कि बैलं बेफामपणे उधळायची आणि घाटाच्या दिशेने धावत सुटायची. तसा माईकवर बोलणारा ओरडायचा. ‘झाली बारी झाली’. गाड्याची बैल जीव घेवून मोठ्या त्वेशाने पळायची. एखाद्या गाड्यापुढे घोडा धावत असायचा, त्यावर बसलेला स्वार मागच्या गाड्याचा अंदाज घेवून घोडा दामटायचा. आणि त्या घोड्याचा अंदाज घेवून गाड्याची बैल धावायची. काही गाडयांच्या मागे छोटी गोऱ्हे जुंपलेले लुटूपुटीचे गाडेपण सोडले जायचे. तर काही गाड्यांना चार चार बैल जुंपलेली असायची. ह्या चारांपैकी एखादा बैल कधी मागे पडायचा पण बाकीचेही बैलं त्याला ओढून फरफटत न्यायची. गाडा वरती शेवटाला पोचल्यावर निशाणाचा झेंडा खाली आणला जायचा कि खालच्या मंचावरील पंचाना ती खूण कळायची आणि गाडा किती सेकंदात वर पोचला हि वेळ जाहीर केली जायची. कधीकधी गाडामालक अथवा त्याचे सहकारी मंचाजवळ येवून हुज्जत घालायचे. तुमच्या माणसाने निशाण उशिरा खाली केले त्यामुळे वेळेत काही सेकंदाचा फरक पडला असे त्यांचे म्हणणे असायचे. कशीबशी त्यांची समजूत घालण्यात यायची. आणि दुसरे गाडे सोडण्यात येत. निशाणाच्या पुढे गाडे गेले कि कुठच्या बाजूला जातील याचा काही नेम नसायचा. चढ संपला कि रस्ता सरळ पुढच्या वाडीला जायचा आणि तिथेचा एक रस्ता उजवीकडे वळून शेताकडे जायचा शिवाय तिथे मोकळी जागा पण खूप आहे. ह्या तीनही बाजूपैकी कोणत्याही बाजूला गाड्याची बैल गाड्यासकट लांब पळत जायची. त्यांच्या पाठोपाठ गाडा मालकांची धावपळ व्हायची. कधीकधी काही बैलं सुटून खालच्या बाजूला म्हणजे जिथे प्रेक्षक बसलेत तीथपर्यंत यायची. मग प्रेक्षकांमध्ये धावपळ व्ह्यायची. काही गाडे सुटले कि सरळ वर न येता तिथल्यातिथे उजवीकडे किंवा डावीकडे फिरून गर्दीमध्ये घुसायचे आणि बाद व्हायचे. एकाच वेळेत खूप गाडे निशाणाला पोहोचायचे. मग त्या सर्वांमध्ये बक्षीस विभागून दिलेला जायचे. मी घाटाच्या डावीकडच्या उंचावर बसायचो, कारण तिथे बैलं पोहोचण्याची शक्यता खूपच कमी असायची. अशा तऱ्हेने बैलगाड्यांच्या शर्यतीची मी खूप मजा अनुभवलेली आहे. सध्या शासनाने बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आणल्यामुळे नवीन पिढीला ह्याची मजा अनुभवता येत नाही.

गावची यात्रा – भाग १ समाप्त.

यात्रेची अजून खूप गंमत शिल्लक आहे. ती वाचूया पुढच्या भागात ….

छायाचित्र : राजेश रामदास सावंतकुडे खुर्द ग्रामस्थ, वास्तव्य – मुंबई

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

4 comments

  1. खुप छान लेख आहे.नवीन पिढीला आपली परंपरा रितीरीवाज कळन्यासाठी फार उपयुक्त माहीती आहे.

  2. चारुदत्त दादा,

    गेले बारा दिवस नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने तुमचे लेख वाचता आले नव्हते. आज थोडी फुरसत होती. सगळे लेख वाचून काढले. खूप मजा आली गावाकडची मज्जा पुन्हा अनुभवताना. ज्यांना गाव आहे त्यांना ही संकल्पना आणि हे अनुभव थोड्याफार फरकाने नक्कीच आले असणार.

    तुमचे अनुभव वाचताना माझ्या बालपणात मी हरवून गेलो. आपल्या लिखाणाच्या बाबतीत एक योगायोग आहे. तुम्ही आणि मी एकाच विषयावर लिखाण करत आहोत. तुमची शैली खूपच चित्रदर्शी वाटते आहे. Keep it up.

    लिहीत रहा.

    1. आपले लिखाण बरेच दिवस वाचावयास मिळाले नाहीत. आपण ही लिहा, लेखन शैलीत फरक पडल्यामुळे वेगळेपणा जाणवेल.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply