20170310 111623

माझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला

शेतातील रानमेवा

मग दुपारचे जेवण व्हायचे तोपर्यंत माझे मित्र घराबाहेर दिसायचे. एखादा पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर आणि आम्ही धमाल मजा करायचो.

आमच्या गावाच्या चारीही बाजूला आणि टेकडीवर, टेकडी पलीकडे अशी चहूवार शेतं पसरलेली आहेत. कुठल्या शेतात जायचे हे सोबत कोणता मित्र आहेत यावर अवलंबून असायचे. मला त्याच्या शेतावर न्यायची त्याची ईच्छा असायची अन मला माझ्या शेतावर जाण्याची. पण सुरुवात मात्र व्हायची ती आमच्या मावशीच्या शेतावरून. कारण तिचे शेत हे सर्वात जवळ, गावाच्या लगोलग बाहेर. तिथे जाण्याच्या दोन वाटा. माळावर जाणाऱ्या वाटेवरून गोठ्यांच्या पलीकडे गेलो अन उजवीकडची खाचरे ओलांडली की पोचलो त्यांच्या शेतावर. खाचराच्या पलीकडील बांध खूपच उंच. आणि त्या बांधावर आंब्याची तीन मोठी झाडे होती. तिथून आमची मोहिम सुरु व्हायची. ह्या झाडांच्या पुढे मावशीची पडाळ आणि गोठा होता. बांधावरून वर चढत असतानाच पाहायचे कुठल्या झाडाला जास्त आंबे दिसतात ते. मग पहिली चढाई त्या आंब्यावर. त्यातली मोठी दोन झाडे जरा वैशिष्ट्यपूर्ण होती. खूप मोठे खोड, पण वरच्या शाखा कमी उंचीवरून सुरु झालेल्या. वर चढण्यासाठी आधाराला नैसर्गिक उंचवटा होता. त्यावर पाय देऊन वर चढणे सोपे व्हायचे. वर आलो कि अजून वरच्या बाजूला जायचे. तिथे एक मस्त खळगा तयार झालेला होता. तिथूनच भल्या मोठ्या फांद्या तिन्ही बाजूस पसरल्या होत्या. त्या तीन फांद्याच्या बेचक्यात आम्ही तीन चार लहान मुले सहज बसायचो. मला काही जास्त उंचावर चढणे शक्य नसायचे. मी प्रयत्न करायचो, थोडे फार वर जायचो, हाताला सहज लागतील अशा कैऱ्या काढायचो. अन खाली येऊन बेचक्यात बसायचो. मग माझे मित्र मला अजून वर जाऊन दाखवायचे, मला वर बोलावयाचे. वरच्या फांदीला धरून खालच्या फांद्यावर उड्या मारून फांद्या हलवून दाखवायचे. तेव्हा झाडांच्या पानांचा चांगला सळसळ आवाज व्हायचा, दोन चार कैऱ्या खाली पडायच्या आणि फुटायच्या. त्या आम्ही नंतर गोळा करून घरी खायला न्ह्यायचो.

मी कैऱ्या काढताना हाताला लागलेला चीक काढण्याचा प्रयत्न करू लागे. तो चीक भयंकर चिकट असे. हाताला लागला कि निघणे कठीण व्हायचे. माझे मित्र झाडाचे पान काढून माझा हात साफ करून देत नाहीतर मी फांद्यांवर हात रगडून साफ करायचो. मग आम्ही काढलेल्या कैऱ्या तिथेच बेचक्यात बसून खायला सुरुवात करायचो. माझे मित्र लगेच दातांनीच कैरीचा तुकडा पडून खायला सुरुवात करीत असत. मला ते जमायचे नाही. मग फांदीवर कैरी ठेवून हाताने बुक्की मारून कैरी फोडून मला देत असत. अशी ताजी फोडलेली कैरी खायला सुरुवात केली कि तिचा एक विशिष्ट सुगंध पहिला नाकात जायचा आणि मग तोंडाला मस्त पाणी सुटायचे. प्रत्येकी दोन तीन कैऱ्या आम्ही खायचो. दात आंबून जायचे, दातावर दात आपटले कि कचकच आवाज यायचा. हात चिकट झालेले असायचे. पण एवढे होईपर्यंत दुसरीच अडचण उभी राहिलेली असायची. आम्ही जिथे बेचक्यात बसलो असायचो तिथे खाली आणि आजूबाजूला मोठे मुंगळे फिरत असायचे. ते पायावर किंवा मांडीवर यायचे, तेव्हाच आमचा गणवेश म्हणजे अर्धी चड्डी आणि शर्ट, मग मुंगळा पायावर चढला कि माझी धावपळ व्हायची. पण माझे मित्र शांत असायचे. अंगावर आलेला मुंगळा ढकलून द्यायचे. मला ते जमायचे नाही. मग त्यांच्यापैकी कोणीतरी माझ्या अंगावरचा मुंगळा हाताने पकडून खाली टाकून द्यायचा.

मी मुंबईकर म्हणजे चवीने खाणारा. तेव्हा दुसऱ्या दिवसापासून शेतात कैऱ्या खायला जायचे म्हटले कि मीठ आणि लाल मसाल्याच्या दोन कागदी पुड्या अगोदरच खिशात ठेवायचो. झाडावर चढून कैऱ्या काढेपर्यंत मी हे कुणालाच सांगायचो नाही, मग कैऱ्या फोडल्या कि खिशातल्या पुड्या काढायचो. गावातल्या मित्रांना याची गंमत वाटायची. मग पुढच्या वेळेपासून मला मीठ आणि मसाल्याचे प्रमाण वाढवावे लागायचे. कैऱ्या घेवून घरी आणून आजीकडे द्यायचो. जेवणापूर्वी आजी काकूला सांगायची कैऱ्या पाटावर फोडून द्यायला. काकू कैरी कापून दोन तुकडे करायची, कोय काढून टाकायची. मग काकू पाट्यावर पसाभर जाडे मीठ (हो, तेव्हा आम्हाला आयोडीनची डेफिशियंसी नव्हती), त्यावर चिमूटभर हळद आणि लाल तिखट ठेवायची अन त्यावर कैरीचा कापलेला एक तुकडा ठेवून त्याला वरवंट्याने दोन चार वेळा चांगले ठेचायची. आणि आम्हाला जेवताना द्यायची. ठेचल्यामुळे कैरीला चांगल्याच भेगा पडायच्या, त्यातून खालचे मीठ, हळद आणि मसाला त्यात चांगलाच पसरायचा, कैरीला पाणी सुटायचे. मग ती अख्खी फोड एकेक जण खायचा. मी एक दोन फोडी खात असे. त्या कैरीला सुटलेले पाणी भातावर कालवणामध्ये टाकून खायचो. खूप मजा यायची. बऱ्याच जणांना कैरी खाण्याचा हा प्रकार माहिती नाही.

आमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वेकडची टेकडी चढल्यावर माळावरून पुढे जाऊन खाली उतरायला लागायचे. माळावरच्या लाल वाटेवर तुरळक ठिकाणी करवंदाची जाळी होती, तिथून सुरुवात व्ह्यायची करवंदे खाण्याची. मोसमाच्या सुरुवातीला हिरवी कच्ची करवंदे मिळायची. एप्रिलच्या शेवटाला काळी टपोरी करवंदे मिळायची. खाली उतरण्याची वाट वेडीवाकडी, उताराची आणि अनेक छोट्या मोठ्या दगडांनी भरलेली होती. आजूबाजूला टणटणीची झाडी, करवंदाची जाळी. आंब्याची अन आणखी कुठली झाडे पण होती. त्यांचा पालापाचोळा सर्वत्र पडलेला असायचा. त्यावर चालताना आवाज व्हायचा. मध्येच एखाद्या खड्यात पाय मुरगळेल का काय याची भीती असायची. उतार चांगलाच असल्यामुळे उतरताना त्रास व्ह्यायचा, मग मी तेथून उतरताना वरून एकदम धूम ठोकायचो अन धावत जाऊन खाली थांबायचो, हे कमी त्रासाचे होते. आणि त्या काळी दम वगैरे आम्हाला कधी नाही लागायचा.

रानात आमच्या भावकीची सामायिक आंब्याची झाडे आजही आहेत. त्यातील आंबे वैशिट्यपूर्ण आहेत. केळ्या आंबा, शेपू आंबा, साखऱ्या आंबा अशी काय काय नावे आहेत त्यांची. आणि प्रत्येकाची चव त्यांच्या नावाप्रमाणेच. उतारावरून आमचे निरीक्षण सुरु व्हायचे. सर्वांचे लक्ष आंब्याच्या सभोवती खाली कुठे खारोटी दिसते का? झाडावर एकदा पाड दिसतो आहे का? पक्षाने खाल्लेला. त्या पाडाला (आंब्याला) पक्षाने खाण्यासाठी एक भोक पाडलेले असायचे त्यातून आंब्याचा शेंदरी रंग दिसून यायचा. झाडाखाली एखादा पिकलेला बारीक आंबा पडला कि खारुताई येऊन त्याची चव घेवून त्याला भोक पाडून जायची. त्याला खारोटी म्हणायचो. तशी शेंदरी खारोटी आणि पाड दिसला की समजायचे ह्या झाडाचे आंबे पिकले आहेत. मग त्या आंब्यावर आमचा हल्ला. झाड उंच असेल तर खालून दगड मारून आंबे खाली पाडायचे. झाड सोपे असेल तर वर चढून एखाद्याने जोराजोराने फांद्या हलवायच्या आणि आम्ही खाली पडणारे पाड आम्ही झेलायचो. अशा तऱ्हेने गोळा केलेले पाड घरी न नेता एखाद्याच्या वाडग्यात नेऊन गवत अथवा कडब्याच्या गंजीत लपवून ठेवून त्याची आढी लावायचो, म्हणजे पिकायला ठेवायचो. कधी कधी झाडाखालीच खड्डा करून आढी लावायचो म्हणजे पुढच्या वेळेस रानात गेलो कि तयार आंबे खायला मिळायचे.

करवंदे पिकल्याचे कळाले कि घरातून मोठ मोठे टोप, भगुलं घेऊन आम्ही डोंगरावर जायचो. खरेतर खूप लांब जायची गरजच पडत नसायची. आमच्या रानात, मावशीच्या पडाळीच्या मागे टेकडीवर, समोरच्या टेकडीवर दांड्याच्या रानात करवंदांच्या खूप जाळ्या होत्या, मोठमोठी टणटणीची झाडी होती. झाडी खूप दाट होती. माणसे दिसायची नाही पलीकडली. आता तिथे मोठी डांबरी सडक झालेली आहे. ह्या सर्व ठिकाणी फिरलो कि प्रत्येकाला भांडे भरुन करवंदे मिळायची. तिथली करवंदे संपली कि मग जायचे शिंगीच्या डोंगरावर, तिथे तर अजून गच्च जाळ्या असायचा. खूप वर जायची गरजच नाही पडायची. खालीच भरपूर करवंदे मिळायची. मग पावसाळ्याच्या तोंडावर मावशीच्या पडाळीच्या मागे टेकडीवर तोरणे पण खायला मिळायची. अन पिकलेली तपकिरी रंगाची अळू खायला मिळायची. अळू पण प्रत्येकाला टोपं भरून मिळायची. भगुलं किंवा टोपं नसली तर मुले टोप्यांचा वापर करायची.

अशा तऱ्हेने माझी सुट्टी मस्त खाण्यात जायची. अजूनही खूप धमाल आहेत शेतातली.

पण त्या अगोदर आपण गावातल्या व्यक्तींची ओळख करून घेवूयात, पुढच्या भागात .…

छायाचित्र आणि लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2022 Charudatta Sawant

Similar Posts

One Comment

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply