आमच्या चाळीतील दिवाळी – Diwali Celebration in Mumbai Chawls

आमची चाळ आणि दिवाळी -Diwali Celebration in Mumbai Chawls

मध्य मुबईतील डोंगरी भागातील चिंचबंदर येथील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बी.आय.टी. चाळीत मी लहानाचा मोठा झालो. ह्या बीआयटी चाळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ ह्या योजनेखाली बांधलेल्या चाळी. मध्य मुंबईत अनेक ठिकाणी अशा बीआयटी चाळी आणि बीडीडी चाळी सरकारने बांधल्या होत्या. शिवाय गिरगाव पासून गिरणगावापर्यंत इतर खाजगी चाळी असंख्य होत्या. प्रत्येक चाळीचे एक स्वतंत्र अस्तित्व आणि संस्कृती वेगळी असायची. त्यातील काही चाळींची ओळख हि सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध ह्या दोंघांपैकी एका गटात असायची. उरलेल्या चाळी ह्या फक्त चाळी असायचा. बाहेरून दखल न घेण्यासारख्या दिसणाऱ्या. पण त्यांच्या आत नांदायचे ते एक अख्खे कुटुंब. हो, अनेक खोल्या आणि मजले असलेल्या ह्या चाळीत अनेक कुटुंबे वास्तव्याला असली तरीही ती चाळ बाहेरच्या आणि आतमध्ये राहणाऱ्या लोकांना एक कुटुंबच वाटायची. आणि हो, प्रत्येक चाळीला स्वतःचा एक चेहरा असायचा. एक विशिष्ट ओळख असायची.

आम्ही रहात होतो त्या बीआयटी चाळी म्हणजे एकूण सात चाळींची रांग होती. पण चाळी बांधताना काहीतरी गडबड झालेली असावी. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या उजव्या बाजूला चाळ क्र. १ होती. दोन क्रमांकाची चाळ रुंदीने अर्धवटच आणि फक्त तळमजला बांधलेला होता. तिचा वापर गोडाऊन म्हणून केला जात असे. अन १ आणि २ क्रमांकाच्या चाळीच्या मधून रेल्वे स्टेशनचा मोठा पादचारी पूल खाली उतरलेला होता. आम्ही रहात होतो ती चाळ सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या पूलाच्या डाव्या बाजूला पहिली चाळ होती. त्यापुढे अजून ४ चाळी होत्या. प्रत्येकी ३ मजले, प्रत्येक मजल्यावर २० प्रमाणे प्रत्येक चाळीत ६० खोल्या होत्या. खोल्यांची दारे चाळीच्या आतल्या बाजूला होती, बाहेरच्या बाजूने फक्त खिडक्या दिसत. चाळीच्या मध्यभागी प्रशस्त जिना. प्रत्येक मजल्यावर जिन्याच्या दोन्ही बाजूला ५ -५ खोल्या. त्यांच्या समोर ५-५ खोल्या दोन्ही बाजूला आणि जिन्याच्या समोरच सार्वजनिक पाण्याचा नळ. अशा तऱ्हेने प्रत्येक मजल्यावर समोरासमोर १० खोल्या, मध्ये लांबलचक व्हरांडा. चाळीच्या पुढे सुमारे १५ फुटांची गल्ली सातही चाळींना सोबत होती, आणि त्यापुढे दुसऱ्या खाजगी चाळींची पाठमोरी रांग. चाळीच्या मागच्या बाजूला सेंट्रल आणि हार्बर रेल्वेमार्ग त्याच्यापुढे रेल्वेचे वर्कशॉप आणि मुंबई बंदराचा भाग. त्यामुळे आमच्या चाळीच्या पूर्वेला लांब लांब पर्यंत मोकळे आकाश आणि खूप दूरवर द्रोणागिरी डोंगराची रांग आणि उरणचा किनारा दिसायचा. अशा आमच्या चाळीत सर्वच सण साजरे व्हायचे. पण दिवाळीची मजा काही औरच. त्याच्या ह्या आठवणी. पण यात दिवाळी बरोबरच दिवाळीच्या सुट्टीची गंमत पण तुम्हाला सांगणार आहे.

आमच्या लहानपणी दिवाळीचे वेध लागायचे ते सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले की. सहामाही परीक्षा कधी सुरु होते यापेक्षा शेवटचा दिवस कोणता हेच फार महत्वाचे असायचे. सहसा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गावी किंवा कोठेच जात नसू. पण सुट्टी कधी लागते हे कळले कि पुढचे कार्यक्रम ठरवायला सोपे जाई. दिवाळीच्या आठ ते दहा दिवस अगोदर सुट्टी सुरु होई. सुट्टी लागली कि लगेच दुकानात जाऊन ४-५ रुपयांची गोष्टीची पुस्तके आणायचो. दोघे तिघे मित्र मिळून पैसे जमवून पुस्तके विकत घ्यायचो. ६० पैसे – ८० पैसे अशा किमती असायच्या. तेव्हा सगळी मिळून चांगली ८ ते १० पुस्तके मिळायची. ती मग एकमेकांना देवून वाचून काढायचो. यात दोन तीन दिवस जायचे. मग सुरु व्हायची तयारी दिवाळीच्या फराळाची. रेशनच्या दुकानात डालडा, तेल, रवा, साखर ह्या महत्वाच्या वस्तू कधी येणार ह्याची माहिती काढण्याचे काम आम्हा मित्र मंडळाकडे येई. मग एखाद्या गुप्तहेराच्या तोडीने आम्ही ते काम करीत असू. दुकानात ह्या वस्तू आल्या रे आल्या की आमच्या बातमीदाराकड़ून आम्हाला लगेच खबर मिळे आणि मग आम्ही ती बातमी आमच्या मजल्यावर सर्वांना देत असू. मग लगोलग रेशनच्या दुकानात जाऊन रांगा लावून त्या वस्तू घरी आणायची जबाबदारी पण आम्हां मित्रमंडळीवर पडायची. मग दुकानात गेलो कि कळायचे कि आज फक्त रवा आणि साखर आली, डालडा, तेल उद्या मिळणार वगैरे. पण हरायचो नाही. जे मिळेल ते पिशवीत पाडून घ्यायचो, अन परत उरलेल्या वस्तू प्राप्त करण्याच्या मोहिमेची तयारी करत असू. साखर मिळाली असली कि दुसरा उद्योग करावा लागायचा. मी अर्थात हातभार लावायचो. आमच्या माळ्यावर (मजल्यावर) कोणाकडे तरी दळण्याचे जाते होते. ते घरी आणावे लागे, जमिनीवर स्वच्छ कापड अंथरले जाई त्यावर जाते मांडून तयार ठेवायचे त्यानंतर काम झाले की जाते परत नेवून द्यायचे अशी बाहुबली टाईपची कार्ये मला लहानपणी करावी लागत, पण त्यावेळेस मला कोणीही बाहुबली किंवा दारासिंग म्हटल्याचे मला आठवत नाही. जात्यावर साखर दळून पिठी करावी लागत असे. सुरुवातीला आई जात्यावर बसे, थोड्या वेळाने मी त्यावर बसून जाते फिरवीत बसे. जाते कितीही जोरजोरात गरगर फिरविले तरी खाली काहीच पडत का नाही याचा शोध घेईपर्यंत आई परत येई आणि मग मला नाईलाजाने जात्यावरून उठावे लागे आणि माझा शोध तिथेच थांबायचा. मग त्या झालेल्या श्रमाचे मोल म्हणून जात्याच्या सभोवती निर्माण झालेल्या पांढऱ्याशुभ्र थरातून बचकाभर पिठी साखर उचलून घ्यायचो.

चकली करण्यासाठी गिरणीतून हरभऱ्याच्या डाळीचे पीठ करून आणावे लागे. गिरणीत गेल्यावर चकलीची भाजणी वेगळी दळून द्या अशी सूचना करून डोळ्यात तेल घालून गव्हाच्या पिठावर आपली भाजणी टाकत नाही हे पहावे लागे. पोह्यांचा चिवडा करण्यासाठीचे पोहे गच्चीवर नेऊन कडक ऊन दाखवून आणावे लागत. अशा तऱ्हेनं प्राथमिक तयारी झाली कि मग करंज्या करण्याकरिता आईला मदत करीत असे. साच्यामध्ये करंजीची लाटी घालून त्यावर आई सारण घाली मग साचा दाबून त्यातून टम्म फुगलेली टपोरी करंजी काढून खाली कागदावर अथवा कापडावर मांडून ठेवी. मध्येच मी साचा हातात घेवून प्रयत्न करायचो. तोही फसायचा, मग ती त्या फुटलेल्या करंजीतून बाहेर पडलेले गोड सारण खाऊन टाकायचो. मध्येच आई कशाला तरी उठली कि लगेच पातेल्यातील सारण हातावर घेऊन बकाना मारायचा अशी मदत मी करीत असे. चकली आणि तिखट शेव तयार करण्याचा पितळेचा जाड सोऱ्या वापरून चकल्या आणि शेव पाडायचे मोठ्या कष्टाचे काम मात्र मलाच करावे लागे. ह्यात मात्र हयगय नसायची आणि ह्या कामात तोंडात बकाणा भरायची काहीच सोय नसल्याने तोंड न चालविता हे काम निमूटपणे करावे लागे. आई फक्त खाली पाडलेल्या चकल्या आणि शेव गोळा करून तळायचे सोपे काम करायची. पोह्यांचा चिवडा करताना तो चांगला हलवून मिक्स करायचे सोपे काम पण माझ्याच अंगावर यायचे. फक्त हात खूप दुखायचे, तो राग मग दोन चार दिवसांनी त्या चिवड्यावर काढायचो. येता जाता चिवड्याचा डबा उघडून वाटीभर चिवडा फस्त करून करून त्या चिवड्याला मी खूप त्रास द्यायचो.

ह्या सगळ्या धामधुमीमध्येसुद्धा कष्टाळू आणि अभ्यासू मुले ‘दिवाळीचा अभ्यास’ नावाच्या अत्याचाराला संधी समजून सुट्टीचा सदुपयोग करून एकाच आठवड्यात सर्व ज्ञान प्राप्त करून उरलेल्या सुट्टीत मजा करायला मोकळे रहायचे. मी मात्र आळस नावाच्या राक्षसाच्या तावडीत सापडून उद्यापासून सुरुवात करू, थोडा थोडा करून अभ्यास पूर्ण करू हाच जप करीत असे. अन मग शाळा सुरु व्हायला दोन दिवस राहिले कि मग खडबडीत जागा होऊन ‘दिवाळीचा अभ्यास’ दिवाळी नंतर कसाबसा पूर्ण करायचो. खरं तर ‘दिवाळीचा अभ्यास’ हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. साधारण २१ दिवसांच्या ह्या दिवाळीच्या सुट्टीत अख्ख्या एका सहामाहीचा अभ्यास करायला देत असत, तेही सहामाही परिक्षा संपल्यावर? मला सहामाही परीक्षेत पहिला क्रमांक येणारच याची पूर्ण खात्री असायची, मग ह्या ‘दिवाळीच्या अभ्यासाचे’ मला काहीच वाटत नसे.

असे करता करता दोन चार दिवस निघून जायचे. मग एके दिवशी वडिल फटाके आणून द्यायचे. आमचे फटाके फारच साधे असायचे. लवंगी बारचे हिरव्या पिवळ्या रंगातील चार पाच पुडे, फुलबाजे, चकली (भुईचक्र), पाऊस, टिकल्या व बंदुकीचे रोल यांची दोन चार पाकिटे एवढेच फटाके मिळायचे. बाकी बंदूक मी माझ्या आवडीने घ्यायचो. पेटविल्यावर वेगात सुर्रकन इकडे तिकडे पळणारे रंगीत चित्रे असलेलया चिमण्या, त्रिकोणी आकाराची पानपट्टी असे फटाके मी स्वतः घ्यायचो. घरात सर्वांनाच नवीन कपडे आणलेले असायचे. मग लगबग व्हायची ती आकाश कंदील बनविण्याची. माझे वडील आणि आणखी दोघा तिघांना काड्यांचे कंदील बनविता येत. चांदणी आणि इतर आकारात काड्यांचे ते बनवीत. त्याला पारदर्शक रंगीत जिलेटीन कागद लावून आतमध्ये विजेचा दिवा सोडला जाई. रात्रीचे हे रंगीत कंदील छान दिसत. माझ्या वडिलांनी एकदा फिरती चित्रे असलेला कंदील बनविला होता. मग रात्री उशिरापर्यंत कंदील बनविण्यासाठी जागरणे व्हायची. आम्हा मुलांना फार काही यायचे नाही. पण काड्या तासून दे, कागद कापून दे, कंदील बांधण्यास मदत कर अशी कामे आम्ही करत असू. आणि दिवाळीच्या आधी कोणाचा कंदील पहिला लागतो ह्याची चढाओढ व्हायची. पण काही वर्षांनंतर ह्यात बदल झाला. प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर लावलेले विविध आकाराचे, रंगाचे असे कंदील विसंगत दिसतात असे जाणवल्यावर सर्व खोल्यांबाहेर एकाच प्रकारचे कंदील लावावा अशी प्रथा सुरु झाली. समोरासमोर दोन खोल्यांच्या मध्ये एक कंदील अशा तऱ्हेने एकाच प्रकारचे दहा कंदील आणून आमच्या मजल्यावर लावले गेले. मग अख्खा मजला सुंदर दिसायला लागला. पण मग ह्या सामायिक कंदिलाला विजेची जोडणी कोणत्या खोलीतून द्यायची, मग ती आम्हीच का द्यायची अन तशी किती दिवस हा विजेचा खर्च आम्हीच एकट्याने का करायचा हा नवीन प्रश्न निर्माण झाला आणि सोडवावा लागला. असो.

अशा तऱ्हेने आम्ही सर्व चाळकरी आणि शाळकरी मुले दिवाळीच्या स्वागताला तयार व्हायचो.

आणि तो मंगल दिवस उगवायचा. शहरात असल्याकरणाने वसुबारस हा सण आम्हाला माहितच नसायचा. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी … ‘ हे गाणे म्हणजे फक्त शाळेतल्या पुस्तकातील एक कविता एवढीच आम्हाला ह्या सणाची ओळख. धनत्रयोदशी अथवा धनतेरस हा गुजराथी, मारवाड्यांचा सण ह्या विचाराने आमची दिवाळी सुरु व्हायची ती नरक चतुर्दशीच्या दिवशी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून पहिला फटका फोडण्याचा मान मिळविण्याचा आम्हा मुलांचा प्रयत्न असे. नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत कुडकुडत पहाटे ५च्या सुमारास उठून गरम पाण्याने अंगाला उटणे वगैरे लावून अंघोळ करायची. नवीन शर्ट, नवी अर्धीचड्डी घालायची. फटाके आदल्या दिवशीच काढून ठरवले असायचे. लवंगीच्या दोन चार माळा उसवून त्यातील प्रत्येक लवंगी वेगळी करून ठेवलेली असे, त्या खिशात घालायच्या, अजून तीन चार माळा हातात घ्यायच्या. एक उदबत्ती घेऊन बाहेर यायचे. अजून बाहेर कोणीच मुले दिसत नाही आता ह्या वर्षी पहिला फटका मीच फोडणार ह्याचा आनंद व्ह्यायचा. एखाद्या खोलीबाहेर लावलेल्या दिव्यावर हातातली उदबत्ती पेटवायची आणि लवंगीची माळ खाली जमिनीवर ठेवून पहिला फटाका फोडण्याकरिता माळेला भीतभीतच उदबत्ती लावणार, तेवढ्यातच मोठा आवाज व्हायचा तो माझ्या अगोदर जिन्यावर कोणीतरी माळ लावल्याचा. स्वतःवर चडफडत केवळ काही सेकंदाने माझा प्रथम क्रमांक चुकला ह्याचे वाईट वाटायचे. पण तेव्हढ्यापुरतेच, मग हा मानकरी कोण ते पाहण्याकरिता जिन्याकडे धावायचे. अन मग आपण दोघंच लवकर उठलो ह्याचा आनंद आम्ही घ्यायचो. मग हातातील फटाके फोडून आम्ही उरलेल्या सर्वांना जागे करायचो. मग मजल्यावर सगळी गडबड उठायची. एकेक उठायचे आणि सार्वजनिक संडासाकडे जाण्यासाठी लोकांचा ओघ वाढायचा. आमचे मित्र एकएक करून बाहेर येऊन आम्हाला मिळायचे, मग आम्ही अजून विविध प्रकारे फटाके फोडायचो. म्हणजे हातात माळ पेटवली कि ती माळ जिन्यावरून बाहेरच्या दिशेला हवेत फेकून कशी मजा येते ती पाहणे. तोवर आमच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असलेले मुले-माणसे मोठमोठे फटाके घेऊन बाहेर यायचे. मग त्यांचे मोठे लक्ष्मी बॉम्ब, मोठ्या आवाजाचे दणका उडविणारे सुतळी बॉम्ब, लवंगीपेक्षा मोठे लाल बार असले अघोरी फटाके बाहेर यायचे. आम्ही मग जरा दुरून ते अघोरी प्रकार पहायचो. जणू काही पाकिस्तान किंवा चीन बरोबर लढाई करायची आहे अशा तयारीने ती मोठी मुले खोकी भरून फटाके आणत असत आणि अर्धा तासभर मोठा दणका उडवून देत. मजल्यावर नुसता धूर व्हायचा (त्या काळी पर्यावरण हा शब्दच अस्तित्वात नव्हता). जळालेल्या फटाक्यांचा वास सगळीकडे भरून राहायचा. आतापर्यंत पूर्ण उजाडलेले असे आणि एवढी सर्व गडबड आणि मोठमोठे आवाज होत आहेत तरी आमच्या मजल्यावर खोलीच्या बाहेर व्हरांड्यात काहीजण अजूनही डाराडूर झोपलेले असत. त्यातील काहीजण हाक मारल्यावर उठून घरात जात असत. पण आमच्या खोलीच्या बाहेर झोपणारा ‘मधुमामा’ हा मात्र इतरांसारखा नव्हता. दारू पिऊन रात्री उशिरा यायचा, न जेवता तसाच अंथरून घालून लगेच झोपायचा. कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण हाक मारून मारून उठत नाही म्हटल्यावर मोठी मुले वात्रटपणा करायची. मधुमामाच्या अंथरुणाशेजारीच लवंगीच्या दोन माळा पेटवायचे. छोटे फटाके असले तरी देखील शरीराजवळ पेटविल्यानंतर त्याची धग, ताडताड अंगावर उडणारे लवंगी बार ह्यांचा परिणाम व्हायचा. अंगात फक्त बनियन आणि पट्टेरी हाफचड्डी घातलेला, हात पायच्या काड्या असलेला मधुमामा अंथरुणातून धडपडत उठायचा. आधीच अशक्त आणि त्यातून रात्रीची न उतरलेली नशा, अशा मधुमामाला लगेच उठता येत नसे. तो धडपडायचा, तोल जायचा. आणि हा प्रकार जो कोणी केला असेल त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली द्यायचा आणि दिवाळी पहाट मंगलमय करायचा. फटाके संपले कि अंथरून उचलून निघायचा. पण त्याच्या शिव्या काही संपायच्या नाही. बाहेर येवून दातांना मशेरी लावून संडासाच्या रांगेत उभा राहिला आणि त्याचा नंबर लागला तरी त्याचे शिव्या देणे सुरूच असायचे. अशा तऱ्हेने चाळीच्या दिवाळीची पहिली पहाट संपन्न व्हायची.

तोवर जोराची भूक लागलेली असायची. मग घरात येऊन आईने तयार केलेल्या फराळाचे ताट देवापुढे ठेवून देवाला नमस्कार करायचा. वाटले तर आई वडिलांच्या पाया पडायचे (हा विषय आमच्या घरात ऑपशनला होता). मग आम्ही फराळ खायचो. त्यांनतर लगेच प्रत्येक घरात फराळाच्या ताटाचे वाटप करावे लागे. आमचे घर सोडून उरलेल्या १९ खोल्यांमध्ये आमच्या घराचा फराळ जायचा. दारावर आल्यागेलेल्यांना सुद्धा घरचाच फराळ व्यवस्थित दिला जायचा. आमच्याप्रमाणे दुसऱ्या घरातून सुद्धा आम्हाला फराळाचे ताट येत असे. माझी आई तर सुगरणच होती. सर्वांच्या घरी फराळ करण्यासाठी आईला जावे लागत असे. त्यामुळेच बऱ्याच घरातून आईनेच केलेला फराळ आमच्या घरी येत असे.

तर अशी होती गमंत आमच्या चाळीतील दिवाळी पहाटेची.

हि पहिली पहाट झाल्यानंतर दोन दिवसांनी पाडव्याला आई म्हणायची ‘उठ, आज पहिली अंघोळ आहे’. मनात प्रश्न यायचा मागच्या दोन दिवसांपूर्वी केलेली अंघोळ काय होती?

अजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण आधीच खूप सांगून झालेय. तेव्हा इथेच विश्राम घेतो.

आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

छायाचित्र : रमाकांत सावंत, मुंबई (चाळीतील रहिवासी)

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Charudatta Sawant

Charudatta Sawant

5 thoughts on “आमच्या चाळीतील दिवाळी – Diwali Celebration in Mumbai Chawls

  1. दिवाळी चे फार सुंदर वर्णन मला त्यामुळे मी राहत होतो त्या पोलीस चाळीतील दिवाळी आठवली फराळ बनवताना लागणाऱ्या पिठापासून करायची मजा किंवा कंदिलाची शर्यत आणि त्याहून जास्त फटाके पण या सर्व गोष्टी आता भूतकाळात गेल्या हा वरील लेखामुळे मला bit चा अर्थ कळला धन्यवाद

  2. चारुदत्त दादा,

    सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

    दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाळीत जाऊन आल्याचा भास झाला. तुमच्या लिखाणाला त्रिवार सलाम.

    असेच लिहीत रहा आणि आम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टींचा अनुभव द्या.

  3. अरे ,मी स्वतः सुद्धा थोडे दिवस या चाळीत राहिलो आहे .चारू तुझ्या लेखात हुबेहूब चित्र ऊभे राहिले .छान .असाच लिहीत रहा .दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .Be lated .

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!