कुडे खुर्द - ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचे आवार

माझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)

आमची बैलं

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहाता मुंबईत लहानाचा मोठा झालेलो मी गावाकडची गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो?

फार काही नाही, करायचो ती फक्त लुडबुड आणि लुटुपुटुची कामे. आतापर्यंत सकाळ चांगलीच झालेली असायची. घरात पाणी भरून झालेले असायचे. जेवणाची तयारी सुरु असायची. मग नाना घरातून एक रंगीत कासरा आणि विहीरीवर पाणी भरायची लोखंडी बादली घेवून निघायचा वाडग्याकडे (गोठ्याकडे). मी लगेच मागोमाग निघायचो. आमचे वाडगे आमच्या घराच्या मागच्या बाजूला होते. शेजारचे विठ्ठल मोरे यांच्या घराला वळसा घालून माळावर जाणाऱ्या रस्त्यावर आमचे वाडगे होते. तेथे फक्त लक्ष्मण मोरे यांच्या घरामागे एक घर होते. आणि मागच्या बाजूला वरच्या बाबू सावंतांच्या घराच्या मागच्या बाजूपासून खाली नवीन डांबरी रस्त्यापर्यंतचा भाग एकदम रिकामा होता. आता तिथे नवीन घरे झालेली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लोकांचे गोठे होते. आमच्या शेजारी रभाजी मोरे यांचा गोठा, त्यांच्या गोठ्याचे दार ते आमच्या गोठ्याचे दार यांच्या दरम्यान एक मोठे आंब्याचे झाड होते. त्याला काळा आंबा म्हणायचे. नाना आमच्या वाडग्याचे दार उघडायचा. वाडग्याचे दार गवत आणि कुडापासून बनवलेले असायचे, काहींचे नुसतेच काटक्यांपासून बनवलेले असायचे, त्याला मध्यभागी किंवा वरच्या आणि खालच्या बाजूला झाडाची एकेक बारीक फांदी लावलेली असायची. एखाद्या काथ्याच्या तुकड्याने ते बंद केलेले असायचे किंवा नुसतेच लोटलेले असायचे. काहींच्या दरवाजाच्याला एक छोटी साखळी असायची आणि त्यात एक बारीक कुलूप गुंतवलेले असायचे. त्या कुलूपाला चावी तशी नावाचीच असायची. जोराने खालच्या बाजूला खेचले कि ते कुलूप उघडत असे. गावातील सर्वांनाच हे माहीत असले तरीही कोणीही वाईट उद्देशाने दुसऱ्याचे कुलूप उघडत नसे.

नाना हातातील बादली खाली ठेवून छोट्या चावीने वाडग्याचे कुलूप उघडायचा, दरवाजा तसाच बाजूला ढकलून ठेवला जायचा. मग आम्ही आत जायचो. आत जाण्याअगोदर पासूनच माझी धडपड चाललेली असायची ती गोठ्यात बैलं कुठली आहेत पाहण्याची. माझ्या आठवणीतील बैलं म्हणजे इंजण्या आणि पैंजण्या. इंजण्या वयाने मोठा होता तर पैंजण्या एकदम तरुण. मध्यंतरी पैंजण्याचा जन्म वगैरे काहीच माहिती नव्हती. एकदम तयार नवीन बैल समोर दिसला. त्याच्याअगोदर आमच्याकडे शेवरा आणि सावळ्या नावाचे बैल होते. मला आठवत नाहीत, पण मी त्यांना पाहिले असणार, कारण फोटोत दिसतात ते. आमचे सर्व बैल गावठी जातीचे होते. रंगाने काळे परंतु कपाळावर, मानेखाली पोळ्यावर आणि सर्वांगावर विविध आकाराचे आणि नक्षीचे सफेद ठिपके होते. फक्त सावळ्याच्या फोटोत त्याला कपाळावर सफेद ठिपके दिसत नाहीत. पण ह्या सर्व बैलांची शिंगे वैशिष्ट्यपूर्ण असायची, आमच्या बैलाची शिंगे एकाची इंग्रजी व्ही च्या त्रिकोनी आकारात बाहेरच्या बाजूला वाढायची तर दुसऱ्याची गोल आकारात आतल्या बाजूला वळलेली असायची. शेवरा गेल्यावर त्याच्या चेहऱ्याचा सांगाडा शिंगासकट आमच्या माळावर जुन्या पडाळीमागे (दगडांनी बांधलेले एक कच्चे घर – पावसाळ्यात त्याचा वापर जनावरांसाठी व्हायचा) ठेवलेला मी कित्येक वर्ष पाहिले आहे. खास ते पाहण्यासाठी माळावरून खाली शेतात उतरायचो तेव्हा वाटेवर ते दिसायचे. त्यांची शिंगे लांब होती ते जाणवायचे. नंतर कधीतरी ते तेथून गायब झाले. शेवरा हा चांगलाच उंच आणि ताकदवान होता. परंतु एकदा विहिरीवर पाण्याला जात असताना गावातल्या एका बैलाने त्याला झुंजीत जखमी केले आणि तो गेला. असो.

पैंजण्याला बघून मला आनंदाच झाला. खूप छान दिसत होता तो, तरुण असल्याकारणाने भयंकर चपळ आणि चंचल होता. त्याच्या कपाळावर छान ठिपके होते. शिंगे साधारण १६ इंच लांब आणि बाहेरच्या बाजूला इंग्रजी व्ही आकारात सरळ रेषेत तिरपी गेलेली होती. तो सतत चळवळ करायचा. त्याच्या गळयात घुंगरांची माळ असल्यामुळे त्याच्या सततच्या हालचालीमुळे छान आवाज यायचा. आमच्या या सर्वच बैलांची आई होती आमची ‘हरिणी’ गाय. नावच किती छान. ती सुद्धा गावठी, रंगाने काळी, कपाळावर, मानेच्या पोळ्यावर आणि अंगावर सफेद ठिपके असलेली, जरा जाड पोटाची. दिवसभर शेतात चरायला जायची आणि संध्याकाळी घरी यायची. कधीकधी अंगणात थांबायची. मग आजी तिला भाकर देत असे. मला ती सुद्धा खूप आवडायची. मध्यंतरी एकदा तिला झालेली एक कालवड माझ्या आजीच्या माहेरी आंदण दिले होते, हे कळल्यावर मला मला खूप वाईट वाटले आणि राग पण आला होता. (असो. ती एक पद्धत आहे, हे कळल्यावर मनातून शांत झालो). पैंजण्या हे तिचे बहुतेक शेवटचे वासरू, खिलारी बैलापासून झालेले, त्यामुळे पैंजण्यामध्ये गावठी आणि खिलारी बैल या दोघांचेही गुण होते. त्याला यात्रेमध्ये खिलारी बैलाबरोबर शर्यतीच्या गाड्याला जुंपले जायचे. आणि तो खिलारी बैलाबरोबर धूम पळायचा, मागे नाही हटायचा. असा हा पैंजण्या मला कधीहि जवळ येवू द्यायचा नाही. पण नाना समोर किंवा आजूबाजूला असल्यामुळे तो फक्त मान हलवून नापसंती दर्शवायचा. नानाचा त्याला खूपच धाक होता. नानाने त्याला नंदीबैलासारखे खेळ पण शिकवले होते. नाना विशिष्ट प्रकारे कोपराने त्याला पाठीवर धक्के द्यायचा कि मग, पैंजण्या गुढग्यावर बसायचा, नंदीबैलासारखी मान हलवून दाखवायचा. एकदा बैलपोळ्याला मी गावी होतो, तेव्हा त्याची मिरवणूक काढलेली पाहिली आहे. रंगवलेली शिंगे, अंगावर झूल किंवा हाताने काढलेली नक्षी असेल (आता आठवत नाही), गळ्यात निरनिराळया रंगाच्या मण्यांच्या माळा. अशा ह्या पैंजण्याच्या समोर येऊन वाजंत्री पिपाणी आणि डफ वाजवायचे तेव्हा तो घाबरून आणखीन उधळायाचा. पण नाना त्याला ताब्यात ठेवायचा.

गोठ्यात गेलेल्यावर नाना मला उचलून घ्यायचा अन मग मी पैंजण्याला हात लावायचो, त्याच्या कपाळावरून, खांद्यावर, मानेवर, वशींडांवर हात फिरवायचो. कपाळावर खाजवायचो. मग खाली उतरून त्याच्या मागच्या बाजूने दुसरा बैल इंजण्याकडे जायचो. इंजण्या थोडा वयस्कर आणि जाड होता, त्याची शिंगे गोल आकारात आतल्या बाजूला वळलेली. अतिशय शांत असा इंजण्या काहीही त्रास द्यायचा नाही. त्याच्या अंगावर कुठेही हात लावला तरी अजिबात हलायचा नाही. बैलांना दोन्ही बाजूला दावे बांधलेले असायाचे. मग नाना त्यांची दावे सोडे. इंजण्याला कसारा बांधून कसारा माझ्याकडे देई. पैंजण्याला कासरा बांधून स्वतःकडे ठेवी आणि मग आम्ही निघायचो बैलांना विहिरीवर पाणी पाजायला. वाडग्यात एक मोठी लोखंडी किंवा अल्युमिनीयमची बादली असे ती नाना घेई. मी बाहेर ठेवलेली छोटी बादली घेवून इंजण्याचा कासरा धरून मागोमाग निघायचो. इंजण्या असल्यामुळे मला त्याचा कासरा धरण्याची गरजच नसे, पण मी त्याला धरून नेत आहे ह्याचे समाधान मला मिळायचे (म्हणजे खरेतर मीच त्याच्या मागोमाग पळत जायचो). हे माझे पहिले काम! एकदा असेच पाण्याला जात असताना समोरून आला आमच्याच भावकीतील तुकाराम सावंत यांचा बैल ‘धुमाळ्या’, हा बैल खूप वयस्कर होता, त्याला आता औताला किंवा गाडीला जोडत नसत. खिलारी जातीचा, पण नारंगी आणि पांढरा अशा वेगळ्या रंगाचा, उंची थोडी कमी, लांब टोकदार आणि मागच्या बाजूला वशींडाच्याही वर गेलेली शिंगे, अंगाने खूपच मोठा असा होता. अन त्याला मारामारीची खूप हौस असावी, समोरून दुसरा बैला आला की धुमाळ्या लगेच डरकाळी आणि अंगावर जात असे. असेच एकदा आम्ही विहिरीवर जात असताना उतारावर धुमाळ्या समोर आला, आमचा गरीब इंजण्या सामोर दिसल्यावर धुमाळ्या त्याच्या अंगावर गेला आणि इंजण्याला दिले ढकलून, इंजण्या पडला आणि उठून गुपचूप पुढे निघून गेला. ह्याच धुमाळ्याने आमच्या शेवऱ्याला मारले हे कळाल्यापासून मला त्याचा खूप राग यायचा. पण तो दिसायला रुबाबदार असल्याने मला तो आवडायचा देखील, त्याला बघायला खास त्यांच्या गोठ्यात मी जात असे. ‘धुमाळ्या’ विषयी दंतकथा एकाने मला ऐकवली होती, या धुमाळयाला वाघाचे मांस का रक्त खायला दिल्याकारणाने तो एवढा ताकदवान, रागिष्ट आणि दिर्घायूषी झाला होता. खरे खोटे मी मोठ्यांना नाही विचारले.

आम्ही वेगवेगळ्या विहिरीवर बैलांना घेवून जात असू. मोठ्या विहिरीवर गेल्याचे क्वचितच आठवते. मोठ्या विहिरीच्या खालच्या बाजूला सखाराम सावंत यांची विहिर, त्याच खाचरातील अलीकडची दुसरी विहिर, या दोन ठिकाणी आम्ही जायचो. नाना विहिरीतून पाणी काढायचा आणि मोठ्या बादलीत ओतायचा. मग बैल ते पाणी आळीपाळीने पित असत. मग मी विहिरीतून दोन तीन बादल्या पाणी काढत असे. अर्थातच बादली वर येईपर्यंत निम्मे पाणी परत विहिरीत गेलेले असायचे. हे माझे दुसरे काम! नाना कधीकधी पैंजण्याला पाणी पाजताना त्याचा कासरा माझ्या हातात देई. माझे तर पाणिपाणीच होई. पण नाना त्याच्या भाषेत पैंजण्याला काही सूचना देत असे, मग पैंजण्या नानाच्या धाकाने मला काहीच त्रास न देता शांतपणे पाणी पित असे. मी अर्थातच कसारा धरून लांबच असायचो. बैल पाणी कसे पितात ते मी पाहात असायचो. केवळ ४ ते ५ घोटांमध्ये अख्खी बादली संपून जायची. बादली बैलांचे पाणी पिऊन झाले कि त्यांचे पोट भरल्याचे दिसायचे. नाना कधीकधी बैलांच्या अंगावर एखादी बादली पाणी ओतत असे. मग आम्ही तेथून निघून वाडग्यात यायचो. बैल परत दावणीला बांधून ठेवायचो. मग नाना वैरण किंवा कडबा काढायचा आणि बैलांना द्यायचा. मी त्यातला थोडा भाग त्यांच्या पुढ्यात टाकीत असे. हे माझे तिसरे काम! अशा तऱ्हेनं खूप काम करून मी घरी परत यायचो तेव्हा अगदी हुश्श्य वाटायचे.

मग दुपारचे जेवण व्हायचे तोपर्यंत माझे मित्र घराबाहेर दिसायचे. एखादा पुढे यायचा अन म्हणायचा, “शेतावर जायचं का, कैऱ्या खायला?”. एवढे निमंत्रण मिळाल्यावर घरात कोण थांबणार? मग व्हायची आमची शेतावर एक सफर आणि आम्ही धमाल मजा करायचो.

कशी आणि काय ते पुढच्या भागात.

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant

Similar Posts

3 Comments

  1. फारच सुंदर गावाचे वर्णन केले आहे अतिशय बारीक तपशिलांसह विषेशतः गावी गेल्यावर शेजारील मुले जमतात त्यातील काही आपल्या चड्डीची नाडी तोंडात धरून ओढतात किंवा बैलाची आठवण. माझे कोकणातील गाव थोडे वेगळ्या प्रकारे पण गावाचे वर्णन करताना जो आनंद मिळतो तो आनंद वरील लेख वाचताना मला झाला धन्यवाद मला विशेष आनंद झाला तो तुझ्यातील लेखक यानिमित्ताने जागा झाला कारण तू लेखक आहेस तुझा कल्पना विस्तार चांगला आहे तूझी स्मरणशक्ती सॉलिड आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे हातात घेतलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची तुझी निष्ठा या विषयी मला ठाम विश्वास आहे कारण आपण बराच काळ एकत्र घालविला आहे. तूझ्या या उपक्रमास माझ्या भरपूर शुभेच्छा संजय मुळीक

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply