माझे गाव: भाग ३ : आमची मावशी

आमची मावशी

मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. कधी गणपत रामभाऊ सावंत, कधी समोरचा नानाजी मोरे उर्फ नान्या. कधी भिकाजी सावंत, कधी नाथा बाबुराव असे माझे सवंगडी बदलत असायचे. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो.

पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे …

आमचे दात घासून झाले, अंघोळ झाली, मग चहा वगैरे झाले. कि आमची तयारी व्हायची ती गावभर भटकण्याची. पण अजून तशी कोणा सवंगड्याची साथ मिळालेली नसते. सोबत कोणी समवयस्क मुलगा नसल्यामुळे गावात एकटे फिरायला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. कारण शेजारच्या घरातील किंवा रस्त्यात भेटणाऱ्या गावकऱ्यांना कसे सामोरे जायचे हेच कळायचे नाही. कारण सर्वच जण नाना चौकश्या आणि प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. अर्थातच ते सर्व प्रेमानेच होत असे. शिवाय आजूबाजूची काही लहान मुले अजूनही दरवाज्याबाहेर अंगणात रेंगाळत असायची. लगेच त्यांच्यापुढे जाऊन उभे राहण्यास मला संकोच वाटायचा. त्यामुळे जरा हळू हळू करत मी दरवाज्याच्या चौकटीपर्यंत येऊन उभा रहायचो, मग थोडी भीड चेपली की, अंगणातल्या पायरीवर येवून भिंतीला टेकून उभा राहायचो. आणि तिथून उजव्या बाजूला खाली समोरच दिसायचे ते आमच्या मावशीचे घर.

खालच्या घरातल्या अंगणात किंवा घरात मावशी, भीमा काकू कधी गुलाब बाय अशा दिसायच्या पण लगेच जायची हिंमत होत नसायची, कोणाची तरी सोबत हवी असायची. तेव्हा मदतीला यायचे ते मावशीचे नातू रामदास आणि धाकटा रोहिदास. तसे ते आम्ही घरात पाऊल टाकल्यापासून ते आमच्या घरात आलेले असायचेच. भीमा काकू त्यांना घेऊन यायची आणि जरा वेळ थांबून, बोलून परत जायची. आणि आम्हाला लागेल ती वस्तू घरात नसेल तर, म्हणजे दुकानातून साखर, घरातून दूध वगैरे आणण्यासाठी ते लगेच पळत जात (हा काळ जरा नंतरचा आहे, माझी आजी असताना असे काही होत नव्हते, घर सर्व भरलेले असायचे). रामदास “बरयं का दादा?” असे काही तरी बोलायचा आणि समोरच बसायचा पण रोहिदास मात्र फक्त हसायाचा आणि मान आणि अंग वेळावून लाजायचा. ते दोघेही रंगाने काळे, पण नाकीडोळी छान आणि गोंडस दिसायचे आणि स्वच्छ पण असायचे. आमचे आटोपून होईपर्यंत ती दोघं चार पाच वेळा खाली जाऊन परत येवून बसायचे. मग रामदास म्हणायचा, “खाली बोलवलंय, चा प्यायला”. मला तर तेच हवे असायचे, घराच्या बाहेर निघायला सोबत मिळाली. मी लगेच तयार व्हायचो. मी खाली चाललोय, हे ओरडून सांगायचो आणि रामदास बरोबर निघायचो, खाली म्हणजे कुठे हे सर्वांनाच माहीत. कोणीही अडवायचे नाही. काळजी हि करायचे नाही. बहिणी पण पाठोपाठ यायच्या. शेजारच्या विठ्ठल धन्द्रे यांच्या घराची मंडळींची सकाळीच भेट झालेली असायची, त्या पुढच्या विठ्ठल मोरे यांच्या घरातील कोणी बायामाणसे अंगणात अथवा घराबाहेर असली कि विचारपूस व्हायची, त्यांच्यापुढे लक्ष्मण मोरे यांचे घर होते. तेथे कुणीतरी भेटायचे. समोरच कृष्णा आत्याचे घर, पण तिथे कोणी दिसले तर जरा बोलायचे नाहीतर सरळ मावशीच्या अंगणात पाऊल टाकायचे.

मावशीचे घर छोटे पण अंगण खूपच मोठे, आजही गावात सर्वात मोठे अंगण त्यांचेच असावे. मावशीच्या घरात गेले की भीमा काकू लगेच पुढे यायची, आम्हा एकेकाला जवळ घेवून सर्वांचे मुके घ्यायची, ती परंपरा अजूनही चालू आहे. आजही मी खाली गेलो की काकू आजही माझा मुका घेतेच. मावशी नेहमी प्रमाणेच आतल्या घरात अंधारात काही ना काही काम करीत असायची. मग आम्ही तिच्या जवळ जायचो. तिला दिसायाला जरा कमी होते, पण आमच्या आवाजावरूनच ती आम्हाला ओळखायची अन एकेकाला जवळ घ्यायची. डोक्यावरून हात फिरवायची. मावशीच्या आतल्या घरात फारच अंधार असायचा. पण तिचे कुठेच अडायचे नाही. आमची मावशी उंचीने जरा लहान, कमरेत वाकलेली, रंगाने काळी, पण तरतरीत चेहऱ्याची, बारीक आवाजाची, अतिशय प्रेमळ, कधीही कुणावर रागावलेली नाही पाहिले, नेहमीच काहीतरी काम करत असलेली. अन मग आम्हाला काय देवू अन काय नको असे तिला वाटायचे. कोणी जर वर अंघोळ केली नसेल तर लगेच गरम पाणी अंघोळीला मिळायचे. चहा मिळायचा, गूळ टाकलेले दूध मिळायचे. लगेच भाताचा टोप चुलीवर ठेवायाची अन एखादे कोरड्यास नाहीतर मसुर किंवा बटाट्याचे कालवण, लगेच पाट्यावर एखादी चटणी वाटली जायची. मी म्हणायचो, “जेवण आता नको, रात्री येतो, आता वर जेवतो, रात्री तुमच्याकडे”, पण ऐकायची नाही मावशी, “अरे, उलीसाचं भात घातलाय, त्याने काय होतय, थोडं थोडं खाऊन जा”. अन मग उलीसा काय तर पोट गच्च होईपर्यंत खायला द्यायची. आणि मी आवडीने आणि चवीने खायचो. तोपर्यंत आमच्या घरातून निरोप यायचा, “जेवण झालंय, वर बोलवलंय”. आता आली का पंचायत?

मग थोडा वेळ थांबून आम्ही वर यायचो, तेथेही जेवण तयार असायचे. जेवण साधेच, पण पापड किंवा पापडी, बीबडी, लाल चटणी असे तोंडी लावण्यासाठी असायचे. पहिला दिवस असल्याकारणाने आजी किंवा काकूंच्या जेवणाला नकार देणे कठीण व्हायचे, पोट भरले असले तरीही थोडेफार खाऊन घ्यायचो. आणि गंमत म्हणजे येथेही पोटभर खायचो. आमच्या गावच्या पाण्याची चवच छान. शिवाय गावाकडचे ते जेवण साधेच पण चविष्ट. गावाकडचे मसाले वेगळेच, शिवाय घरच्या भुईमुगापासून वाड्याला जाऊन घाण्यावर काढलेले शेंगदाणा तेल. खूपच मजा यायची. गावात फिरताना मला दिवसातून ४ ते ५ वेळा वेगवेगळ्या घरात जेवावे लागायचे. गावातील मुलीचे लग्न असले कि ती कशी सर्व घरात जाऊन घास घास खाऊन येते, तसे माझे व्हायचे. रात्री मात्र आमच्याच घरी जेवायचे हा नियम ठेवला होता किंवा तसे अगोदरच सांगायचो.

अंगणातील झोप

रात्री झोप मात्र अंगणातच, घरात रात्रीचे क्वचितच झोपलो असेन. आमची बैलगाडी घरासमोरच असायची. तिचे जुकाड (जू) घराच्या ओट्यावर ठेवलेले असायचे त्यामुळे गाडीची साटी जमिनीला समांतर होई. म्हणजे अर्धी गाडी ओट्यावर आणि अर्धी रस्त्यावर अशी होई. आणि मग मी माझ्या कोणा मित्राबरोबर गाडीच्या साटीमध्ये अंथरून घालून छान झोपत असे. भर उन्हाळ्यात पण आमच्या गावी थंडी असे. त्यामुळे अंगावर दोन जाड गोधड्या घ्याव्या लागत. मग झोप येईपर्यंत माझा सोबती मला आकाशदर्शन करवायचा. भर चांदण्यात अथवा अंधारात देखील शिंगीच्या डोंगराचा माथा छान दिसायचा. एप्रिल अथवा मी महिना असल्यामुळे मृग नक्षत्र डोक्यावर किंवा पश्चिमेकडे थोडे कललेले असायचे. मग त्याच्या भाषेत तो सांगायचा. हे वर दिसतंय ना, ते, मिरग, त्याच्या पोटात तीन ठिपके दिसतात तो बाण आहे, तो बाण मारला आहे त्याच्या खालच्या मोठ्या चांदणीने वगैरे. उत्तरेचे सप्तर्षी पण दिसायचे, (अर्थात मृग, सप्तर्षी, हस्त वगैरे नावे मला जरा मोठे झाल्यावर कळाली). मग तो सांगायचा, “ती वर दिसते ना ती बाज. त्या चार चांदण्या म्हणजे तिचे चार पाय. आणि त्याच्या खाली तीन चांदण्या दिसतात ना, ते आहेत चोर. ते चोर बाजेला चोरायला आले आहेत. ते चोर हळू हळू बाजेच्या जवळ जात आहेत, जेव्हा ते चोर त्या बाजेला पकडतील तेव्हा आपल्या जगाचा नाश होईल. असेल ऐकल्यावर खूप भीती वाटायची आणि मग रोज ते तीन चोर बाजेपासून किती दूर आहेत ते पाहायचे वेड लागले. आणि अजून खूप वर्ष लागतील चोरांना ह्या विचाराने शांत वाटायचे. कधी कधी मला तो चोरांच्या गोष्टी ऐकवायचा. हल्ली गावात रात्रीचे चोर येतात दरोडा घालायला. म्हणून रात्री गावात माणसे पहारा देतायत. मग कधी तरी तो दाखवयाचा, शिंगीच्या डोंगरावर उंचावर रात्रीचे दोन तीन कंदिलांचा प्रकाश हलताना दिवसायचा. मग तो सांगायाचा, ते बघ, चोर निघालेत दरोडा घालायला. पण आपल्या गावात येणार नाहीत, कारण ते दुसऱ्या बाजूला जाताना दिसतात. मग जरा बरे वाटायचे. मग थंड हवेच्या झुळकीने झोप लागायची. बऱ्याचदा मी खाली मावशीच्या घरी किंवा माझे चुलते दत्तू नानाच्या घरी झोपायचो. दोन्ही घरी अंगणात मस्त चांदण्या बघत बघत थंडीने कुडकुडत झोपण्याची मजा मी खूप घेतली आहे. नंतर थोडा मोठा झाल्यावर देवळात झोपायला जायचो, मारुतीच्या आणि विठ्ठलाच्या देवळात क्वचितच झोपलो असेन, पण मारुतीच्या देवळासमोरच्या पटांगणात किंवा खाली विठ्ठल मंदिरा समोरच्या पटांगणात अंथरून टाकून नेहमी झोपायचो. तेथे मारुतीच्या देवळा शेजारचा पिंपळ नेहमी पानांनी गच्च भरलेला असायचा, रात्री वाऱ्याने त्याच्या पानांची सळसळ थोडे गूढ वातावरण निर्माण करायची. मग तिथे पण गप्पा गोष्टी व्हायच्या.

आता सुट्टीवरच आलो असल्याकारणाने सकाळी लवकर उठायची गरजच नसायची. त्यामुळे उशीराच उठायचो. तशी पहाटे जाग यायची, आमच्या किंवा शेजारच्या घरातून जात्याची घरघर आणि ओव्या ऐकू यायच्या, ते ऐकून पुन्हा झोपायचो, कारण अजून अंधारच असायचा. घराच्या ओट्यावर बैलगाडीत किंवा देवळाकडे किंवा खाली मावशीकडे, कुठेही झोपलो आणि उशीरा उठलो तरी सूर्यदर्शन काही लवकर व्हायचे नाही, कारण आमचे गाव हे पूर्वेकडच्या टेकडीच्या उतारावर वसलेले असल्याकरणाने सूर्य चांगला कासरा, दोन कासरा वर आल्याशिवाय दिसायचा नाही. पण उजेड मात्र लख्ख पडलेला असायचा. मी अंथरुणातच असायचो, पण गावाला जाग आलेली असायची, लोकांची दैनंदिन कामे कधीच सुरु झालेली असायची. घराबाहेर गाडीत असेल तर, सकाळी पाण्याला जाण्याऱ्या बायांची लगबग चालू असायची, आमच्या घरातून सुद्धा पाण्याला जाण्याची गडबड चालू झालेली असायची. देवळात झोपलो असेल तर समोरच्या दूध डेअरीमध्ये गावकरी दूध घालायला येत त्यांची धावपळ सुरु असे. दूध गोळा करायला येणारा ट्र्क म्हणजे दूध गाडी येण्याची वेळ झालेली असायची. अशा या सर्व गडबडी चालू आहेत, अख्या गावाला जाग आलेली आहे, आणि फक्त मीच एकटा अंथरुणात लोळत पडलो आहे, हे लक्षात यायचे. देवळातून अंथरून गोळा करून घरी येईपर्यंत लाज वाटायची. कारण अख्खे जग कामधंद्याला लागले आहे आणि आपण आळशी माणसासारखे झोपतो याची लाज वाटायची, पण ती तेवढ्या पुरतीच. कारण दुसऱ्या दिवशी तेच घडायचे. आणि जर खालच्या घरात झोपलो असेल रामदास किंवा रोहिदास माझे कपडे वरून घेवून येई आणि मी खालीच अंघोळ करून, चहा पिऊन मग वर जात असे.

आता मी ताजातवाना झालेलो असायचो. मग घरात थोडी कामे करायचो. तसे पाहता मी गावाकडची कामे करणे शक्यच नसायचे. मग मी काय करायचो?

ते जाणून घेवूया पुढच्या भागात …

लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.