IN VILLAGE – माझे गाव: भाग २ : गावात प्रवेश
(In Village) गावात स्वागत
बैलगाडी मंदिराला वळसा घालून उजवीकडे वळली कि मग गावात (Village) प्रवेश, समोरच आमच्या पूर्वजांच्या सामायिक घराची मागची बाजू आणि ग्रामपंचायतीचे कार्यालय आणि डेअरी. पुन्हा मुरुमाचा एक छोटा चढ आणि एक वळण आणि जरा पुढे आलो कि गाडी आमच्या दारात उभी राहायची.
तोपर्यंत घरच्यांना आमच्या येण्याची चाहूल लागलेली असायची तेव्हा आजी, राधा काकू, तारा आत्या किंवा अन्य जे कोणी असतील ते सर्वजण लगबगीने हातातील कामे बाजूला ठेवून दारात आमच्या स्वागताला येत. आमच्या घराच्या बाहेर एक मोठा ओटा आणि आंगण होते. बैलगाडी ओट्याला लागूनच उभी राहायची. नाना आम्हा तीन चार भावंडांना एकेक करून गाडीतून उचलून सरळ ओट्यावर ठेवत असे, मग आम्ही थोडे बुजरे होत सर्वांकडे आणि आजूबाजूला पहात पुढे पुढे जायचो. मग आजी आम्हाला एकेकाला जवळ घेवून चेहऱ्यावरून आणि अंगावरून हात फिरवायची आणि “आलं रे बाळ माझं (माझ्या बहिनीनां – बाय माझी), किती वंगाळ झालास बाबा, कशी हाडं वर आलीत, मागच्या येळंला आला तवा बरा होता” ह्या नेहमीच्याच सार्वकालीक प्रेमळ संवादाने स्वागत करायची, ताराआत्या असेल तर लगेच एकेकाला जवळ घेऊन सर्वांचे मुके घ्यायची. काकू मात्र हसून स्वागत करायची, कारण आजी पुढे असल्यावर काकू मागेच असायची. अशा तऱ्हेने आमचा गृहप्रवेश व्हायचा.
आमचे घर
आमचे घर खूपच चांगले, नवीन प्रकारचे बांधकाम असलेले होते. साधारण दोन खण रुंद आणि चार दालनांचे होते. प्रथम पडवी लागायची. पुढे स्वयंपाकघर, नंतर माजघर आणि शेवटी न्हाणीघर अशी रचना होती. सुमारे दीड मीटर रुंदीची ३ मोठी दारे एका रांगेत होती. मग तिथून सुरु व्हायची घराची तपासणी मोहीम. गेल्या वेळेस मुंबईला परत गेल्यापासून घरात काय काय बदल झालेत याची नजरेने पाहणी व्हायची. पडवीतून आत जाण्याकरीता दोन पायऱ्या चढाव्या लागत. त्या दोन पायऱ्यांच्यावर घरातील व्यक्तींची छायाचित्रे, बैलगाडी, बैलजोडी अशी अनेक कृष्णधवल, काही रंगवून घेतलेली अशी छायाचित्रे अनेक लहान मोठया फोटोफ्रेममध्ये लावून ठेवलेली होती. त्यावर पहिली नजर पडायची. त्या फ्रेममध्ये काही नवीन भर पडली आहेत का? बाजूच्या कोनाड्यात विहिरीवर पाणी भरण्याकरीता लांब दोरखंड लावलेली लोखंडी बादली गेलेल्या वर्षी नवी घेतली होती ती आता आहे कि नाही अशी तपासणी सुरु व्हायची.
मग इकडे तिकडे पहात सरळ न्हाणीघरापर्यंत एक चक्कर व्हायची. न्हाणीघरात एक मोठी लाकडाची पेटी होती. तिच्या बाजूला खाली आणि भिंतीवर शेतातील अवजारे, उपयोगी वस्तू लावलेल्या असायच्या ते सर्व पाहून बाहेर यायचो. खालूनच एक नजर माळ्यावर टाकायची. मग पिशव्या आत आणून आंघोळ केल्यांनतर बदलण्याचे कपडे बाहेर काढण्याचे काम चाले. आणि आता इथे प्रवेश होतो, आतापर्यंत उल्लेख न झालेल्या आमच्या आईचा. एसटीने वाड्याला उतरलो कि, मग माझ्या आई वडिलांची गरजच भासायची नाही. पण कुठल्या पिशवीत, गाठोड्यात आमचे कपडे, टॉवेल, दात घासण्यासाठी ब्रश आणि पेस्ट ठेवली आहे हे फक्त आईलाच माहिती असायचे. मग ब्रशवर पेस्ट लावून मी बाहेर यायचो आणि पडवीच्या दारात दात घासत बाहेर बघत उभा रहायचे. आणि मग सुरु व्हायचा नवीन अध्याय.
आतापर्यंत ‘मुंबई आली’ हि बातमी कर्णोपकर्णी गावात गेलेली असायची. (Village) आमचे गाव तसे खूपच छोटे, त्याकाळी मोजून ५० ते ५५ घरांचा उंबरा असेल. त्यामुळे सर्वांना माहिती व्हायची. आमचे घर तसे गावाच्या मध्यावर होते. खालच्या आळीतून वरच्या आळीत येता जाता आमच्या घरावरून जावे लागायचे तेव्हा येणारे जाणारे गावकरी आणि विहिरीवर पाणी भरायला निघालेल्या बायका आमच्या घरासमोर थांबायच्या आणि विचारायचे “कवा आली मम्बई?”, “बरी आहेत ना सगळी?”, ‘कोण कोण आलयं?’ अशा चौकश्या व्हायच्या. यात एकदम गुगली प्रश्न काही जण टाकायचे, “म्हातारी आली नाय का?”, माझ्या आजीला असे एकेरी आणि ते पण म्हातारी या नावाने संबोधन केल्याने मी रागावायचो, पण शांतपणे उत्तर द्यायचो, “आजी इथच आहे, आम्ही आताच आलो”, मग ते लोक हसायचे आणि म्हणायचे “आरं ती नाय, तुझी म्हातारी!”, मी परत अजून गोंधळायचो, आताच उत्तर दिले तरी लोक परत तोच प्रश्न का विचारतात हे कळेना, मग माझी अडचण त्यांच्या लक्षात यायची आणि मग ते ग्रामीण बोली सोडून विचारत “आई आली का तुझी?”. असे ४ ते ५ वेळेस झाल्यावर मग लक्षात आले, गावाकडे आईवडिलांना ‘म्हातारा-म्हातारी’ म्हणतात. यात आणखी एक गंमतीचा भाग होता.
तो म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूच्या घरातील माझ्या वयाची मुले-मुली आम्हाला पाहायला येत असे तेव्हा. त्याकाळी आमच्या गावातील मुंबईला राहणारी अवघी दोनचारच कुटुंबे होती. आम्ही जन्माने मुंबईकर असल्याकारणाने आमचे कपडे, बोलणे, चालणे सगळे त्या मुलांपेक्षा वेगळे असायचे. त्याचे त्यांना फारच अप्रूप वाटायचे, मग ती मुले-मुली आमच्या ओट्यावर, दरवाजात उभी राहून आमच्याकडे एकटक पाहात असत. आमच्या हालचाली न्याहाळत असत. त्यांचे त्यावेळचे कपडे म्हणजे एक बंडी ती पण गुढग्याच्या खाली जाईल एवढी लांब, आत मध्ये लंगोट असायचा. काहीजण लांब चड्डी घालून असायची, आणि चड्डीची नाडी तोंडात धरून आमच्याकडे एकटक पाहत असायची. काहींचे नाक वाहत असायचे ते फुर्रर्र करून आवाज करायचे. खूपच लहान मुले तर फक्त लंगोट किंवा काही एक दोन तशीच फक्त करदोट्यावर असायची. बहुतेक लहान मुलांचे टक्कल केलेले असायचे, पण टक्कल असले तरी समोरच्या बाजूला साधारण दीड ते दोन इंच लांब आणि रुंद केसांचा पुंजका न कापता तसाच ठेवलेला असायचा आणि मागे शेंडी. मुली शक्यतो परकर पोलक्यात असायच्या. पण कित्येक मुलींचे केस मात्र विस्कटलेले असायचे. मग ज्या मुलांमुलींचे चेहरे ओळखीचे वाटायचे त्यांच्याकडे बघून मी हसून ओळख दाखवायचो.
ती मुले त्याकाळी जरी तशी होती, गावाच्या शाळेत शिकली असली, तरी देखील शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, किंवा शिक्षण सोडलेले असूनही मुंबईला येवून छोटे मोठे काम करून आज नोकरीधंद्यात यशस्वी झालीत. ज्या मुलांचे कसे होणार असे वाटायचे त्याच मुलांनी आज हेवा वाटावा अशी नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यात आठवतील अशी नावे म्हणजे एकनाथ धंद्रे, आनंदा सावंत, ज्ञानू मोरे, बाळशीराम मोरे, आत्माराम मोरे, पंढरीनाथ मोरे, विद्यमान सरपंच आनंदराव मोरे, त्यांचा लहान भाऊ शंकर, सर्वजण त्याला कंकऱ्या म्हणायचे, गणपत सावंत, भिकाजी सावंत, शेजारचा रामदास मोरे, समोरच्या घरातील नानाजी, मधुकर मोरे हे भाऊ, अशोक शिंदे, साहिबराव, पहिलवान धोंडू सावंत, खोडकर आणि त्रास देणारा गंगाराम उर्फ गंग्या, नाथा बाबुराव, काशिनाथ, मधुकर, संपत हे सावंत भावकी आणि आणखी काही मित्र, मी आल्याची बातमी कळाली कि लगेच मला भेटायला यायचे. राजवाड्यातील काही मुले पण यायची. त्यातला दादू आठवतो. काही नावे राहिलीही असतील. माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले सदाशिव सावळेराम, रामदास गेनभाऊ, शंकर सावंत, रामू सावंत, पहिलवान गबाजी, कै. सुखदेव शिंदे, कै. लखाप्पा असे खूपच मित्र होते माझे. त्यात माझे समवयस्क असलेले नाथा तुकाराम, बाजीराव बबन, रामदास श्रीपती मोरे, दिलीप लक्ष्मण सावंत, समोरचा दिनू मोरे, तानाजी, सदा महादू सावंत, वरचा दादू मोरे असे अनेक मित्र मात्र अकालीच जग सोडून गेलेत. ह्या सर्वांबरोबर मी खेळायचो, मस्ती करायचो, भांडण सुद्धा व्हायची. असो, थोडे विषयांतर झाले. पण एक आठवण आली सर्वांची. (आता इतक्या वर्षांनी नावात काही चूक राहिली).
लोकांच्या भेटीगाठी
आम्हाला भेटायला बबन कोतवाल, श्रीपती पाटील, आमच्या भावकीतील वडीलधारे, शेजारच्या म्हाताऱ्या, आजूबाजूचे वयस्कर असे सर्व घरी यायचे. माझे खूप कौतुक करायचे, लाड करायचे. मी गावात सर्वांचा लाडका होतो. माझे ‘चारुदत्त’ हे नाव गावकऱ्यांना उच्चारण्यास थोडे अवघड व्हायचे, त्या कारणाने कदाचीत त्यांना सोईचे जावे म्हणून माझे नाव ‘चारुहास’ असे सांगितले गेले, पण तेही जमेना, मग कोणी तरी हाक मारायला सुरुवात केली ‘चारूस’; मग मी अख्ख्या गावाचा झालो ‘चारूस’. आजही काही लोक मला ‘चारूस’ याच नावाने हाक मारतात. दुपारच्या वेळेत गावातील बाया व म्हाताऱ्या माझ्या आईला भेटायला येत. साधारणपणे म्हातारी असली कि आजी, थोडी प्रौढ असेल तर काकू, मामी आणि जरा तरुण असेल तर आत्या किंवा वहिनी. मित्रांच्या घरात आमच्यापेक्षा वयाने मोठी मुलगी असेल तर तिला ताई, बाई, अक्का अशा तऱ्हेने आम्ही हाक मारत असू. अशा ह्या आजी, काकू आणि आत्या दुपारच्या घरी आल्यावर थोडया वेळाने मला कोडं घालीत आणि मी मात्र त्यात हरायचो. तसे मी सगळ्यांना ओळखायचो, म्हणजे कोण कोणाची आई, आजी वगैरे हे मला माहीत असायचे. पण नक्की नाते काय हे मात्र माहित नसायचे. अशा वेळेस एखादी आजी किंवा काकू मला विचारायची, “ओळख हाय का नाय आमची, का मुंबईला गेल्यावर विसरला काय?”, “हाय का ओळख?”. मी म्हणायचो “हा, ओळखतो ना मी”, मग एक गुगली यायचा, “मंग सांग, मी कोण लागते तुमची?”. मग काहीतरी करून वेळ मारून न्ह्यायची. मग तीच बाई स्वतःची ओळख सांगे. “मी तुझ्या बापाची चुलती लागते” किंवा “मी तुझी मावळण लागती” अशा तऱ्हेने त्या सुट्टीपुरती ओळखपरेड पूर्ण व्हायची. पुन्हा मुंबईला आल्यावर ओळख विसरून जायचो. एक वर्षाने गावाला गेलो कि, पुनः तोच प्रश्न दुसरी बाई विचारायची.
आता दात घासून झाले, अंघोळ झाली, मग चहा वगैरे झाले. मग आमची तयारी व्हायची ती गावभर भटकण्याची. पण त्या अगोदरची मोठी गोष्ट शिल्लक असायची ती म्हणजे ‘मावशीच्या’ घराची भेट. मावशी म्हणजे माझ्या वडिलांची मावशी, आजीची मोठी बहीण. पण आम्ही तिला मावशीच म्हणायचो. तिचे घर म्हणजे आमच्या गावातील आमचे हक्काचे पहिले घर. आमचे घर हे आम्हाला कधीही दुय्यम वाटायचे एवढे अकृत्रीम प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला त्या घरात मिळायचा आणि आज ही पिढ्या बदलल्या, पण जिव्हाळा तोच आहे, तसाच आहे. गावी गेलो की पहिले एक दोन दिवसच आम्ही भावंड आमच्या घरात असू, त्यांनतर माझ्या बहिणी अख्खा एक दीड महिना खालच्या घरात, म्हणजेच मावशीच्या घरात. आम्ही फक्त सकाळी अंघोळीलाच आणि दुपारी थोडा वेळ तोंड दाखवायला किंवा कॅरम खेळण्यासाठी घरात यायचो. जेवण, झोप पण खालच्या घरात, नाही तर कोणाच्याही घरात. गावात कोठेही, कसेही फिरा, खेळा काहीही त्रास नसायचा, भीती नसायची.
मला दरवर्षी एक सवंगडी भेटत असे. मग अख्खी सुट्टी त्याच्याच बरोबर. कधी गणपत रामभाऊ सावंत, कधी समोरचा नानाजी मोरे उर्फ नान्या. कधी भिकाजी सावंत, कधी नाथा बाबुराव असे माझे सवंगडी बदलत असायचे. मग मी अख्खी सुट्टी मजा करायचो. ती कशी? ते पुढच्या भागात.
पण त्या अगोदर मावशीच्या घरी जायचे आहे ….
लेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९

खूप छान लेखणी
गावाकडच्या लोकांचे व गावाचे अस्सल चित्र डोळ्या समोर उभे राहते. खुप छान