महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza
महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza
हुतात्मा स्मारक, मुंबई. छायाचित्र – छायाचित्रकार: माननीय मुख्यमंत्री साहेब श्री. उद्धवजी ठाकरे
छायाचित्र सौजन्य: https://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-must-see-uddhav-thackerays-pixss-of-maximum-city/20120224.htm#3
आज १ मे! ‘महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन’ !
१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला (?).
पण हा मंगलकलश सहजासहजी मिळालेला नाही. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यातच ‘या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही’, अशी दर्पोक्ती मुंबईच्या चौपाटीवरील जाहीर सभेत मुखमंत्र्यांसमोर व्यक्त करणाऱ्या सरकारातील मराठी मंत्र्यांमुळे तर हा संयुक्त महाराष्ट्राचा जास्तच लढा तीव्र झाला. मराठी माणसांपासून मुंबई तोडली जात असल्याची भावना जनमानसात तीव्र झाली होती.
२१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले. त्या दिवशी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. त्याचवेळी एका बाजूने चर्चगेट रेल्वे स्थानक व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून प्रचंड जनसमुदाय घोषणा देत फ्लोरा फाउंटनजवळ आला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरेना. त्यांनी लाठीचार्ज केला. तरीही जमाव पांगला नाही. तेव्हा मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी ‘दिसता क्षणी गोळीबाराचे’ आदेश दिले. त्यावेळच्या या अमानुष गोळीबारात १५ आंदोलनकर्ते हुतात्मा झाले. तिथून पुढे जाने.-फेब्रु. १९५७ पर्यंतच्या कालावधीत एकूण १०८ कार्यकर्ते, आंदोलनकर्ते हुतात्मा झाले.
ह्या १०८ हुतात्मांच्या बलिदानाने १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा यशस्वी झाला आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना करण्यात आली. तेव्हापासून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. अखंड महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या या सर्व १०८ हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम !!
२१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईतील फोर्ट भागातील फ्लोरा फाऊंटनसमोरच्या आंदोलनात १५ आंदोलनकर्ते हुतात्मा झाले त्याच ठिकाणी इ.स. १९६५ मध्ये त्या जागी ‘हुतात्मा स्मारकाची’ उभारणी करण्यात आली.

लहानपणी शाळेत १ मे रोजी ‘महाराष्ट्र्र दिना’ निमित्त सुट्टी मिळायची. त्या दिवशी आमच्या विभागातील प्रत्येक गल्लीबोळात ध्वनीवर्धकावर सकाळीच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे लागायचे. ह्या गाण्याने कमालीची लोकप्रियता त्यावेळी मिळवली, त्या गाण्याची जादू आजही तशीच आहे. ह्या गाण्यातील ‘भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा‘ हे बोल कानावर पडले कि अंगातून एक वीज गेल्याच्या भास व्हायचा. शरीरात एक नवचैतन्य निर्माण व्हायचे. हे गाणे पुढे अनधिकृतपणे महाराष्ट्र राज्याचे ‘राज्यगीत’च बनले. प्रत्येकी सरकारी कार्यक्र्म, सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेतील कार्यक्रम आणि अशा विविध प्रसंगी हे गाणे म्हटले जातेच. आमच्या लहानपणी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात, कलापथकात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या गाण्याशिवाय कार्यक्रम सुरूच होत नसे. मध्येच एकदा अवधूत गुप्तेने ह्या गाण्याचे बोल वापरून नवीन चालीत नवे गाणे बसविले होते तेही गाजले होते. मागे एका कार्यकर्मात दूरदर्शनवर केदार शिंदे, भरत जाधव आणि अन्य यांना ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ऐकताना सुखद धक्का बसला होता. (केदार शिंदे आणि भारत जाधव यांनी शाहिरांबरोबर सोबत कलापथकात काम केलेले आहे).
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होणार हे निश्चित झाल्यावर, त्या निमित्ताने आकाशवाणीवर प्रसारीत करण्यासाठी एका स्फूर्तिगीताची गरज होती. कार्यक्रमाच्या संचालकांनी खूपच धावपळ करून कविवर्य राजा बढे यांच्याकडून गीत तातडीने लिहून घेतले. त्याच तातडीने संगीतकार श्रीनिवास खळे यांनी चाल लावली, आणि शाहिर साबळे यांनी ते गाणे गायले. आकाशवाणीवर प्रसारण झाल्यावर अल्पावधीतच हे गाणे लोकप्रिय झाले. ह्या गाण्याने ‘महाराष्ट्र गीत’ म्हणून प्रसिद्धीही मिळविली ती आजही कायम आहे. ह्या गाण्याच्या मागची सर्व मंडळी आज आता आपल्यात नाहीत. परंतु त्यांनी ह्या गाण्याद्वारे भावी पिढीसाठी हा ठेवा त्यांच्यामागे ठेवून गेले आहेत.
चला तर आता प्रथम ते गाणे आपण ऐकूयात.
महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा गाणे – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza Song
Song source link: https://www.saregama.com/song/jai-jai-maharashtra-maza_36717
आपण आता जे गाणे ऐकले हे कविवर्य राजा बढे यांनी लिहिलेल्या मूळ कवितेचे संपादित रूप आहे. चला आता आपण ह्या गाण्याची दोन्ही रूपे पाहूयात.
महाराष्ट्र ‘राज्यगीत’ – जय जय महाराष्ट्र माझा गाण्याचे बोल – Maharashtra Rajyageet – Jai Jai Maharashtra Maza Lyrics
जय जय महाराष्ट्र माझा – ध्वनीमुद्रित गीत
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या (तट्टांना या)
भीमथडीच्या तट्टांना या
यमुनेचे पाणी पाजा
जय महाराष्ट्र माझा
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
आस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
आस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो (सिंह गर्जतो)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला “महाराष्ट्र माझा”
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय-जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा – मूळ रचलेले गीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रावी ते कावेरी भारत-भाग्याच्या रेषा
निळें निळे आकाश झाकतें या पावन देशा ।। धृ. ।।
तुंग हिमालय, विध्य अरवली, सह्याद्री निलगिरी
उत्तर दक्षिण वारे पाउस, वर्षविती भूवरी
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्र गोदावरी
एकपणाचें भरती पाणी मातीच्या घागरी
भीष्मधडीच्या तट्ठांना या यमुनेचें पाणी पाजा ।। १।।
भीति न आम्हा तुझी मुळींही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।। २।।
गलमुच्छे पिळदार मिशीवर, उभें राहतें लिंबूं
चघळित पानें पिकलीं करितो, दो ओठांचा चंबू
मर्द मराठा गडी ओढतो, थंडीची गुडगुडी
ठसक्याची लावणी तशी ही, ठसकदार गुलछडी
रंगरंगेला रगेल मोठा करितो रणमौजा ।। ३।।
काळ्या छातीवरी कोरलीं, अभिमानाची लेणीं
पोलादी मनगटें खेळती, खेळ जीवघेणी
निढळाच्या घामाने भिजला
दारिद्याच्या उन्हांत शिजला
देशगौरवासाठीं झिजला
दिल्लीचेंही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।। ४ ।।
१९७६ साली नागपूरच्या श्री. प्रभाकर देशमुख यांच्या वैभव प्रकाशन यांनि छापलेल्या ‘मंदिका’ या काव्यसंग्रहात प्रकाशित झालेल्या ‘जय महाराष्ट्र’ ह्या कवितेचे छायाचित्र, ज्यात मूळ कविता प्रसिद्ध झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ‘मुंबईसह महाराष्ट्र’ या आंदोलनात सप्टेंबर १९५६ ते फेब्रुवारी १९५७ ह्या कालावधीत मुंबई, नाशिक, बेळगाव, निपाणी अशा विविध ठिकाणी एकूण १०८ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. यात काही स्त्रीयांचाही समावेश आहे. ह्या सर्व हुतात्म्यांच्या नावाचा फलक मुंबईतील हुतात्मा स्मारकावर कायम लावलेला आहे. पण रोज तेथून येजा करताना वाचण्याचा त्रास कोण मराठी माणूस घेतो? पण, एक मात्र नक्की सेल्फी न चुकता घेतो आम्ही. असो. त्या सर्व हुतात्म्यांची संकलित केलेली नावे खालील प्रमाणे:
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे
१) सिताराम बनाजी पवार
२) जोसेफ डेव्हिड पेजारकर
३) चिमणलाल डी. शेठ
४) भास्कर नारायण कामतेकर
५) रामचंद्र सेवाराम
६) शंकर खोटे
७) धर्माजी गंगाराम नागवेकर
८) रामचंद्र लक्ष्मण जाधव
९) के. जे. झेवियर
१०) पी. एस. जॉन
११) शरद जी. वाणी
१२) वेदीसिंग
१३) रामचंद्र भाटीया
१४) गंगाराम गुणाजी
१५) गजानन ऊर्फ बंडू गोखले
१६) निवृत्ती विठोबा मोरे
१७) आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
१८) बालप्पा मुतण्णा कामाठी
१९) धोंडू लक्ष्मण पारडूले
२०) भाऊ सखाराम कदम
२१) यशवंत बाबाजी भगत
२२) गोविंद बाबूराव जोगल
२३) पांडूरंग धोंडू धाडवे
२४) गोपाळ चिमाजी कोरडे
२५) पांडूरंग बाबाजी जाधव
२६) बाबू हरी दाते
२७) अनुप माहावीर
२८) विनायक पांचाळ
२९) सिताराम गणपत म्हादे
३०) सुभाष भिवा बोरकर
३१) गणपत रामा तानकर
३२) सिताराम गयादीन
३३) गोरखनाथ रावजी जगताप
३४) महमद अली
३५) तुळशीराम पुंजाजी बेलसरे
३६) देवाजी सखाराम पाटील
३७) शामलाल जेठानंद
३८) सदाशिव महादेव भोसले
३९) भिकाजी पांडूरंग रंगाटे
४०) वासुदेव सुर्याजी मांजरेकर
४१) भिकाजी बाबू बांबरकर
४२) सखाराम श्रीपत ढमाले
४३) नरेंद्र नारायण प्रधान
४४) शंकर गोपाल कुष्टे
४५) दत्ताराम कृष्णा सावंत
४६) बबन बापू भरगुडे
४७) विष्णू सखाराम बने
४८) सिताराम धोंडू राडये
४९) तुकाराम धोंडू शिंदे
५०) विठ्ठल गंगाराम मोरे
५१) रामा लखन विंदा
५२) एडवीन आमब्रोझ साळवी
५३) बाबा महादू सावंत
५४) वसंत द्वारकानाथ कन्याळकर
५५) विठ्ठल दौलत साळुंखे
५६) रामनाथ पांडूरंग अमृते
५७) परशुराम अंबाजी देसाई
५८) घनश्याम बाबू कोलार
५९) धोंडू रामकृष्ण सुतार
६०) मुनीमजी बलदेव पांडे
६१) मारुती विठोबा म्हस्के
६२) भाऊ कोंडीबा भास्कर
६३) धोंडो राघो पुजारी
६४) हृदयसिंग दारजेसिंग
६५) पांडू माहादू अवरीरकर
६६) शंकर विठोबा राणे
६७) विजयकुमार सदाशिव भडेकर
६८) कृष्णाजी गणू शिंदे
६९) रामचंद्र विठ्ठल चौगुले
७०) धोंडू भागू जाधव
७१) रघुनाथ सखाराम बीनगुडे
७२) काशीनाथ गोविंद चिंदरकर
७३) करपैया किरमल देवेंद्र
७४) चुलाराम मुंबराज
७५) बालमोहन
७६) अनंता
७७) गंगाराम विष्णू गुरव
७८) रत्नु गोंदिवरे
७९) सय्यद कासम
८०) भिकाजी दाजी
८१) अनंत गोलतकर
८२) किसन वीरकर
८३) सुखलाल रामलाल बंसकर
८४) पांडूरंग विष्णू वाळके
८५) फुलवरी मगरु
८६) गुलाब कृष्णा खवळे
८७) बाबूराव देवदास पाटील
८८) लक्ष्मण नरहरी थोरात
८९) ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
९०) गणपत रामा भुते
९१) मुनशी वझीरअली
९२) दौलतराम मथुरादास
९३) विठ्ठल नारायण चव्हाण
९४) देवजी शिवन राठोड
९५) रावजीभाई डोसाभाई पटेल
९६) होरमसजी करसेटजी
९७) गिरधर हेमचंद लोहार
९८) सत्तू खंडू वाईकर
९९) गणपत श्रीधर जोशी
१००) माधव राजाराम तुरे(बेलदार)
१०१) मारुती बेन्नाळकर
१०२) मधूकर बापू बांदेकर
१०३) लक्ष्मण गोविंद गावडे
१०४) महादेव बारीगडी
१०५) कमलाबाई मोहिते
१०६) सिताराम दुलाजी घाडीगांवकर
१०७) शंकरराव तोरस्कर
१०८) बंडु गोखले
महाराष्ट्र ‘राज्यगीत’ ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ह्या गाण्याविषयी सांगत आहेत, शाहीर साबळे यांच्या उपस्थितीत त्यांचे चिरंजीव देवदत्त साबळे
हुतात्मा स्मारक, मुंबई. छायाचित्र – छायाचित्रकार: माननीय मुख्यमंत्री साहेब श्री. उद्धवजी ठाकरे
छायाचित्र सौजन्य: https://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-must-see-uddhav-thackerays-pixss-of-maximum-city/20120224.htm#3
– जय महाराष्ट्र –

Very well researched!!
धन्यवाद.