Dukes chembur 1

ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons

ड्युक्स अँड सन्स – Dukes And Sons

माझा जन्म मुबईचा, १९६२ सालचा. लहानपणी मुंबईची अस्सल मजा आणि गमतीजमती मी अनुभवल्या आहेत. त्याचबरोबर त्या काळातल्या काही सुखद आणि अविस्मरणीय आठवणी सुद्धा आहेत.

त्याकाळी मुंबईत जवळजवळ प्रत्येक रस्त्याच्या, गल्लीच्या नाक्यावर ईराणी हॉटेल असायचेच. त्या ईराणी हॉटेलचा थाट काही वेगळाच असायचा. छोटी मोठी काचेची स्वच्छ कपाटे, भिंतीवर मोठ मोठे आरसे, काही आरश्यांवर रंगीत चित्रे असायची, गोल आकाराचे मार्बल लावलेले लाकडी टेबल, त्याभोवती गोल बैठकीच्या चार खुर्च्या, टेबलावर अंथरलेला पांढरा किंवा चौकटीचा स्वच्छ कपडा, एका कोपऱ्यात किंवा मध्यावर बीयर आणि थंड पेयांनी खच्चून भरलेला रेफ्रिजरेटर, दोन तीन इंग्रजी वर्तमानपत्रे, शक्यतो हॉटेलच्या प्रवेशद्वाराशी असलेले काचेचे किंवा रंगीत चित्रे सभोवती असलेले काऊंटर, त्यामागे बसलेला गोऱ्या रंगाचा शिस्तशीर बावाजी, काऊंटर शेजारी आईसक्रीमचा फ्रिझर, काऊंटरवरच आईसक्रीमच्या कपासोबत देण्यासाठी ठेवलेले पातळ लाकडी चमचे, शेजारीच कोल्ड्रिंक पिण्यासाठी ‘स्ट्रॉ’चा खोका, काऊंटरच्या आतल्या बाजूला वरच्या काचेतून दिसणारे सिगारेटचे डबे किंवा पाकिटे, काऊंटरच्या मागे आणि शेजारी कपाटाच्या कप्प्यात विविध रंगाच्या, आकर्षक गोळ्या, चॉकलेट्स आणि बिस्किटाचे छोटे मोठे पुढे भरलेल्या मोठ्या काचेच्या बरण्या, साधारण मध्यभागी एका उंच लाकडी टेबलावर एका छोटे काचेचे उघडे कपाट, त्यामध्ये मोठ्या डिशमध्ये ठेवलेला बनपाव किंवा ब्रूनवर लावण्यासाठीचा मस्का, त्याच्या बाजूला मस्क्याचे छोटे पुडे ओळीने रचून ठेवलेले, एका अंधाऱ्या कोपऱ्यात शीतपेयांचे भरलेले किंवा आणि रिकामे लाकडी क्रेट्स एकावर एक असे लावून ठेवलेले असत, काही इराणी हॉटेल्सना दोन्ही तिन्ही बाजूने दरवाजे असत, कुठूनही प्रवेश करावा, आणि शक्यतो मध्यभागी किंवा काऊंटरच्या जवळच असलेला मोठा ज्युक बॉक्स, असले काय नी काय असे त्या ईराणी हॉटेलमध्ये, आत गेल्यावर नजर भिरभिरायची, काय पाहू नी काय नको असे व्ह्यायचे. काही ईराणी हॉटेलात पोटमाळा पण असायचा, त्याला फॅमिली रूम असे गोंडस नाव असायचे. तिथे तरुण-तरुणी बसून भावी संसाराला काय काय लागते याची यादी करून, पूर्वतयारी म्हणून थोडेसे प्रात्यक्षीकाचे धडे गिरवत तासनतास बसायचे.

brabourne
ईराणी हॉटेलमधील गच्च भरलेले काऊंटर

पण ह्या सगळ्यांहून जास्त मजा असायची ती ईराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन थंड सोडालेमन किंवा मँगोला पिण्याची. टेबलावर मांडलेल्या दोन तीन मोठ्या ग्लासात वेटर लेमन (लेमोनेड) सारख्या प्रमाणात ओतायचा, नंतर त्यावर सोडा ओतायचा, वेटर ग्लासात स्ट्रॉ टाकून देत असे, मग ते फसफसणारे, ग्लासातील सोडालेमन पिताना लेमोनेडचा वास प्रथम नाकात जायचा त्या पाठोपाठ फसफस किंवा बुडबुड आवाज करून सोड्याचे तुषार ग्लासातून उडून तोंडावर यायचे. अतिशय थंड असे ते सोडालेमन पिताना जीभ आणि तोंड दोन्ही बधिर व्हायचे, पण मजा यायची.

763453 facebook wucassxoej 1445341374
ईराणी हॉटेलमधील टेबल आणि ज्युकबॉक्स

मँगोला पिण्याची मजा वेगळी असायची. काचेच्या मोठया पेल्यात मँगोला ओतत असतानाच आंब्याचा वास दरवळायला लागायचा. अतिशय घट्ट असे ते पेय खूपच चविष्ट असायचे, त्याचा वास आणि चव अजूनही स्मरणात आहे. घट्ट असल्याने मँगोला स्ट्रॉ न वापरता प्यावा लागायचा. दोन्ही हातात ग्लास घट्ट धरून थंड मँगोला चवीचवीने प्यायचा. फार मजा यायची. सोडा, लोमोनेड (लेमन), मँगोला यांच्याबरोबर जिंजर, आईसक्रीम सोडा, रास्पबेरी सोडा, पाईनोला, टॅंगो अशी इतरही शीतपेये तेव्हा उपलब्ध होती. ती प्याल्याचे मला काही आठवत नाही. पण मँगोला मात्र खूप वेळा प्यायलो आहे.

Dukes And Sons' Cold Drinks

वर उल्लेख केलेली सर्व शीतपेये हि ड्युक्स अँड सन्स (Dukes And Sons) ह्या कंपनीची उत्पादने होती.

आजचा हा लेख ह्याच ड्युक्स अँड सन्स कंपनी विषयीचा आहे. इसवी सन १८८९ ते १९९४ ह्या १०५ वर्षांच्या दीर्घ कालावधीत मुंबईतील जनमानसावर प्रभाव टाकलेल्या ड्युक्स अँड सन्सचा इतिहास आपण आता पाहणार आहोत.

त्या अगोदर मुंबईतील शीतपेयांचा इतिहासाचा एक धावता आढावा घेवूयात. वर्ष १८३७ मध्ये हेन्री रॉजर्स ह्या केमिस्टने (Chemist – रसायन शास्त्रज्ञ/औषधविक्रेता?) मुंबईत प्रथमच वातीत पेय (Aerated water) म्हणजेच कार्बनडाय ऑक्साईड वायू सोडलेले, पाण्यापासून बनविलेले शीतपेय, म्हणजेच आजच्या भाषेतील ‘सोडा’ बनविण्याचा कारखाना सुरु केला. त्याकाळी चैनीची वस्तू समजल्या जाणाऱ्या ह्या पेयाचे सेवन सुरुवातीला इंग्रजांनी सुरु केले. इंग्रजांसोबत राहून भारतातील उच्चभ्रू असलेल्या आणि मुळातच व्यापारी वृत्तीच्या पारसी समाजाने ह्या सोड्याचे व्यापारी महत्व ओळखले.

त्यानंतरच्या काळात एका पारशी गृहस्थाने खेचराच्या पाठीवर सोडा बनविण्याचे फिरते साहित्य बसवून अहदमनगर येथे ब्रिटिश सैनिकांच्या बराकीमध्ये सोडा विकण्याचा व्यवसाय सुरु केला. खरंतर हे एका अर्थाने स्वदेशी उत्पादनाच्या दृष्टीने भारतीय नागरिकाने टाकलेलं हे पहिले पाऊल म्हणावे लागेल.

त्यानंतर वर्ष १८६५ मध्ये नागपूर येथे पालनजी यांनी सोडा कंपनी सुरु केली. गेल्या १५० वर्षांपासून पालनजी यांचा रास्पबेरी सोडा अतिशय प्रसिद्ध आहे. ‘Contains No Fruit’ असे बिरुद पालनजी यांचा रास्पबेरी सोडा आजही अभिमानाने मिरवित आहे. आज मुंबईतील काही भाग, निवडक पेट्रोल पंप आणि निवडक इराणी हॉटेल अशा ठिकाणीच पालनजी यांची शीतपेये उपलब्ध आहेत, ते केवळ त्या कंपनीचे १९७९ पासूनचे नवीन मालक श्री. पी. व्ही. सोलंकी यांच्या पालनजी ह्या ब्रॅण्डच्या प्रेमामुळेच. मुंबईतील मानखुर्द भागात केवळ ४० कामगारांना सोबत घेवून सोलंकी पालनजी यांची शीतपेयांचे उप्त्पादन करीत आहेत.

Pallanji Raspberry Soda

पुढे १८८४ मध्ये पुण्यात अर्देशीर खोदादाद इराणी यांनी ‘अर्देशीर अँड सन्स (Ardeshir & Sons)’ ह्या नावाने शीतपेयाचे उत्पादन सुरु केले, त्यांचे उत्पादन आणि हॉटेल आजही पुणे शहरातील कॅम्प भागात गफर बेग स्ट्रीटवर कार्यरत आहे. ‘आर्डी’ या नवीन नावाने अर्देशीर अँड सन्स यांची शीतपेये आज प्यायला मिळतात. तसेच १८७८ सालापासून पुण्यातील कॅम्प भागातील शरबतवाला चौक येथील दोराबजी अँड सन्स ह्या इराणी हॉटेल मध्येही अर्देशीर अँड सन्सची शीतपेये मिळतात.

download 1

अशा तऱ्हेने मुंबई, पुणे, नगर नागपूर येथे सोड्याबरोबर विविध चवीची शीतपेये बनविण्याचा व्यवसाय जोम धरू लागला होता. (सोड्यानंतर विविध चवीची शितपेये बनविण्यास सुरुवात नक्की कधी झाली याची अचूक माहिती मिळालेली नाही).

आता आपण ‘ड्युक्स अँड सन्स Sons)’ ह्या कंपनीच्या नावाची रंजक माहिती जाणून घेवूया.

ड्युक्स अँड सन्स (Dukes & Sons)

Dinshwa Pandole - Founder of Dukes And Sons
Dinshwa Pandole – Founder of Dukes And Sons

‘ड्युक्स अँड सन्स (Dukes And Sons)’ ह्या कंपनीची स्थापना दिनशॉ कुवरजी पंडोल ह्या पारशी उद्योजकाने वर्ष १८८९ मध्ये मुंबईत केली. व्यवसायाने शिक्षक असलेले दिनशॉ पंडोल हे उत्तम क्रिकेटपटू देखिल होते. वर्ष १८८८ मध्ये इंग्लड विरुद्ध क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी गेलेल्या ‘पारशी क्रिकेट संघाचे ते सदस्य होते. त्या दौऱ्यात दिनशॉ पंडोल यांनी आपल्या गोलंदाजीची चमक इंग्लिश क्रिकेटपटूंना दाखवून त्या दौऱ्यात एकूण ८६ गडी बाद केले होते. ७ जून १८८८ ते १३ सप्टेंबर १८८८ ह्या कालावधीत एकूण ३१ सामने खेळले गेले, त्यातील ८ सामने पारसी संघाने जिंकले आणि ११ सामन्यात हार पत्करली. ऑगस्ट ३ ते ४ ह्या दरम्यान बॉर्नमाऊथ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दिनशॉ पंडोल यांनी पहिल्या डावात ४ गडी बाद केले, तर दुसऱ्या डावात इंग्लिश संघाचे ७ गडी बाद केले, त्यातील ४ जण शून्यावरच परतवले होते. अशा या यशस्वी गोलंदाजामध्ये भावी उद्योगपती दडलेला होता.

Dukes And Sons Cricket Ball
Dukes And Sons Cricket Ball

इंग्लडला क्रिकेट खेळायला गेलेल्या दिनशॉ पंडोल यांनी तेथील शीतपेयांची लोकप्रियता पाहिली होती. त्यावरुन प्रेरणा घेवून आपणही हिंदुस्थानात अशा प्रकारच्या स्वदेशी शीतपेयांचे उत्पादन सुरु करावे असे त्यांना वाटले. मुंबईला परतल्यावर दिनशॉ कुवरजी पंडोल यांनी वारसाहक्काने मिळालेल्या मोठ्या रकमेतून वर्ष १८८९ मध्ये मुंबईत ‘ड्युक्स अँड सन्स’ ही कंपनी सुरु करून प्रथम सोडा-लेमन आदी शीतपेयांच्या बॉटलिंगचा उद्योग सुरु केला. इंग्लंडच्या क्रिकेट दौऱ्यावर दिनशॉ पंडोल यांनी इंग्लंड मधील ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनीने बनविलेल्या लाल चेंडूने ८६ गडी बाद केले होते, त्यामुळे ‘ड्युक्स अँड सन्स’ (Dukes And Sons -Cricket Ball) हे नाव त्यांना भाग्यवान वाटले होते, म्हणूनच त्यांच्या नवीन कंपनीचे नाव त्यांनी ‘ड्युक्स अँड सन्स’ असेच ठेवले. सुरुवातीला शीतपेयांच्या बॉटलिंगचा व्यवसाय सुरु करून नंतर त्यांनी शीतपेये बनविण्यास सुरुवात केली. ‘लेमोनेड’ ही त्यांचे प्रथम उत्पादन होते. मुंबईतील भायखळा आणि गिरगाव अर्थातच खेतवाडी भागातील कामा गल्लीच्या बाजूला छोट्या शेडपासून व्यवसायाची सुरुवात केली. दिनशॉ यांचे सुपुत्र पेस्तनजी आणि इरुकशॉ यांनी हा व्यवसाय वाढविण्यास हातभार लावला आणि ‘ड्युक्स अँड सन्स’ (Dukes And Sons) हा पंडोल यांचा एक कौटुंबिक व्यवसाय बनला.

Dukes And Sons Logo
Dukes And Sons Logo

यावेळेपर्यंत पालनजी, अर्देशीर, रॉजर्स आदी कंपनीने भारतीय ग्राहकांचा कल पाहून विविधी चवीचे सोडे बनविण्यास सुरुवात केली होतीच. त्यात नागपूरमध्ये पालनजी आणि पुण्यात अर्देशीर यांचा रास्पबेरी सोडा अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनीने बॉटलिंग सोबतच सोडा बनविण्यास सुरुवात केली. साध्या सोड्याबरोबर रास्पबेरी सोडा, लेमन (लेमोनेड), जिंजर (जिंजरनेड), ऑरेंज (ऑरेंजनेड), पाईनोला अशी विविध कार्बोनेटेड ड्रिंक उत्पादने सुरु केली. दिनशॉ यांचा पुत्र पेस्तनजी हा मार्केटिंग आणि वितरण व्यवस्था सांभाळायचा आणि बुद्धीने अभियंता असलेला इरुकशॉ उत्पादन पाहायचा. याच इरुकशॉने पुढे स्वदेशी बॉटलवॉशर, बाटलीला क्राउन कॅप बसविण्याची यंत्रे स्वतः बनविली.

Dukes And Sons - Centenary Celebration
Dukes And Sons – Centenary Celebration

वर्ष १९०० नंतर मुंबईत ‘ड्युक्स अँड सन्स’ (Dukes And Sons) कंपनीच्या उत्पादनाचा खप वाढला होता. मुबईतील नाक्यानाक्यांवरच्या ईराणी कॅफे, ईराणी रेस्टारंट्स अशा ठिकाणी सोडा, रास्पबेरी सोडा, आईस्क्रीम सोडा, लेमन (लेमोनेड), जिंजर (जिंजरेड), ऑरेंज (ऑरेंजेड), पाईनोला तर हमखास मिळायचाच, पण पानाचे ठेले, क्लब, उडिपी हॉटेल्स, रेल्वे प्लॅटफॉर्म अशा सर्व ठिकाणी ही शीतपेये मिळू लागली. पुढे पुढे ज्या ठिकाणी फ्रिज असायचा अशा प्रत्येक ठिकाणी हि शीतपेये मिळायचीच असे वातावरण तयार झाले. भारतीय जनता देखील ह्या फसफसण्याऱ्या पेयांच्या प्रेमात फसली होती. ‘ड्युक्स’ म्हणजे इराणी कॅफे हे समीकरणच तेव्हा मुंबईत तयार झाले होते.

ह्या सर्व शीतपेयांपैकी सर्व इराणी हॉटेलमध्ये मिळणारा रास्पबेरी सोडा हा पारशी समाजात अल्पावधीतच अतिशय प्रसिद्ध झाला. लाल रंगाच्या, गोड चवीच्या ह्या रास्पबेरी सोड्याने पारशी समाजात प्रेमाचे आणि मानाचे स्थान मिळवले. पुढेपुढे पारशी लोकांचे प्रत्येक सण, मेजवानी लग्न अशा सर्व ठिकाणी रास्पबेरी सोड्याने आपली जागा निर्माण केली. रास्पबेरी सोडा हा पारशी परंपरेचा अविभाज्य घटक बनला. रास्पबेरी सोड्याशिवाय पारशी नववर्ष अर्थातच ‘नवरोज’ आजही साजरा होऊच शकत नाही. पारशी लोकांच्या मेजवानीतील पत्राणी मासे, हलीम, अकुरी, धनसक आदी पारंपरिक खाद्यपदार्थ हे अतिशय झणझणीत असत, म्हणून त्यांच्या मेजवानीत ह्या गोड आणि रंगीत रास्पबेरी सोड्याचा वापर सुरु झाला असे म्हटले जाते. ईराणी हॉटेलमध्ये पारशी ग्राहक आल्यावर नाश्ता किंवा जेवणाबरोबर रास्पबेरी सोडा त्याला न विचारता त्याच्या टेबलावर ठेवला जायचा. आजही मुंबई, पुण्यातील मोजक्या ईराणी हॉटेलमध्ये रास्पबेरी सोडा हा हमखास मिळणारच.

Dukes And Sons - Distribution Vans
Dukes And Sons – Distribution Vans

‘ड्युक्स अँड सन्स’ची शीतपेये त्याकाळी बैलगाड्यांवरून मुंबईत वितरण केली जात. गरीब आणि मेहनती बैल ह्या कामी उपयोगी पडायची. दररोज सकाळी शीतपेयांचे क्रेट्स भरलेली गाडी मुंबईच्या रस्त्यावर दिसत असे. कधीकधी एखादा नाठाळ किंवा थकलेला बैल मात्र ही गाडी पुढे नेण्यास नकार द्यायचा किंवा कधीकधी रस्त्यातच बसकण मारायचा, हे दृश्य तसे दुर्मिळ नव्हते. १९४० साली कंपनीने ‘फोर्ड’चे ट्रक विकत घेईपर्यंत बैलगाड्यांवरून वितरण करीत असल्यामुळे ‘ड्युक्स अँड सन्स’ची शीतपेये मुंबईबाहेर जात नसत.

सुरुवातीला ह्या सोड्याच्या बाटल्या काचेची गोटी लावून बंद केलेल्या असत, म्हणून त्यांना ‘गोटी सोडा’ म्हणत अन्य राज्यात त्यांना अजूनही विविध नावे होती. ह्या काचेच्या गोट्या जपानमधून मोठ्या प्रमाणात आयात केल्या जात. परंतु दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात जपानकडून ह्या काचेच्या गोट्यांचा पुरवठा बंद झाला, तेव्हा ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनीने भारतात प्रथमच धातूचे बिल्ले (Crown Caps) वापरण्यास सुरुवात केली. त्याकरिता त्यांनी बाटल्यांची डिझाईन सुद्धा बदलली, आणि आज दिसतात त्या बाटल्या जन्माला आल्या.

अशा तऱ्हेने ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनीचे सोडा, रास्पबेरी सोडा, आईस्क्रीम सोडा, लेमन (लेमोनेड), जिंजर (जिंजरनेड), ऑरेंज (ऑरेंजनेड) हि शीतपेये पारशी समाजाबरोबर मुंबईकरांच्याही पसंतीस उतरली होती. ‘ड्युक्स अँड सन्स (Dukes And Sons)’ कंपनी चांगलीच नावारूपाला येऊन तिची भरभराट झाली होती. जिथे तिथे ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनीची शीतपेये दिसू लागली. पोटात दुखत असले तर, हॉटेलात जाऊन ड्युक्सचा जिंजर (जिंजरनेड) पिऊन ये, असे सल्ले घरोघरी मिळायचे. शिवाय ही शितपेये किंमतीला स्वस्त होती. आजही पुण्याच्या अर्देशीर अँड सन्स मध्ये सोडा ८ ते १५ रुपयांना मिळतो. १९०७ च्या सुमारास ड्युक्सचा रास्पबेरी सोडा बारा आण्यास एक डझन ह्या भावाने मिळत असे.

Mangola By Satish Krishnamurthy Flickr Ah Mangola CC BY 2.0 httpscommons.wikimedia.orgwindex.phpcurid18524227
Dukes And Sons – Mangola

वर्ष १९५० मध्ये भारतात ‘कोका कोला’चा शिरकाव झाला. कोकाकोलाने स्पर्धा निर्माण केल्यावर त्यावर मात करण्याकरीता ‘ड्युक्स अँड सन्स’ने त्यांचे नाविन्यपूर्ण सर्वोत्तम उत्पादन ‘मँगोला’ सादर केले. ह्या ‘मँगोला’ ने तर मुंबईला वेडच लावले. ड्युक्सचे त्यावेळचे मालक फिरोज पंडोल यांनी आंब्याचा रस करण्याऱ्या कंपनीकडून ३००० कॅन्स आंब्याच्या रसाचा लगदा ऑर्डर देवून बनवून आणला. त्यांनी त्यावर प्रयोग करून स्वतःचे ‘मँगोला’ नामक शीतपेय बाजारात आणले. लेमोनेडच्याच किंमतीत ‘मँगोला’ विकल्याने, ‘Non Aerated Drink’ ह्या प्रकारातील (म्हणजेच वायू विरहित) आंब्याची चव आणि वास असलेले आणि १०० टक्के आंब्यापासून तयार केलेले हे घट्ट आणि चवीष्ट पेय अल्पावधीतच कमालीचे लोकप्रिय झाले.

95793804 2925037640918436 7398268483768680448 n

‘मँगोला’ची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने मागणी आणि पुरवठ्यातील अंतर वाढू लागले. त्यामुळे १९७० साली ‘ड्युक्स अँड सन्स’ने चेंबूर येथे २.५ एकर जागेत नवीन कारखाना सुरु केला. ह्या प्लॅंटमधून एका पाळीत १९,००० क्रेटस शीतपेयांचे उत्पादन होऊ लागले. (एका क्रेटमध्ये २४ बाटल्या बसतात, म्हणजेच एका पाळीतील उत्पादन ४ लाख ५६ हजार बाटल्या होते. दोन पाळीत दुप्पट उत्पादन होत असणार). ५०० कामगार ‘ड्युक्स’ मध्ये काम करीत होते. ह्यावरून कंपनीच्या भराभराटीची कल्पना वाचकांना येईलच. ह्या शीतपेयांचे वितरण करण्यासाठी १९९० सालापर्यंत ‘ड्युक्स’कडे स्वतःचे ९० ट्रक्स करीत होते. वर्ष १९९४ पर्यंत शीतपेयांच्या बाजारपेठेतील मुंबई आणि महाराष्ट्रातील ५५% हिस्सा हा ‘ड्युक्स अँड सन्स’ कडे होता.

‘ड्युक्स का दादा, लेमोनेड ज्यादा’ ह्या टॅगलाईने ‘ड्युक्स’ची जाहिरात केली जाई. परंतु ‘मँगोला’ची जाहिरात करण्याची त्यांना गरज नव्हती, ती लोकांकडून सांगोपांगी आपोआपच होत होती. मुंबईबाहेर महाराष्ट्रात व्यवसाय वाढविण्यासाठी छोट्या शहरात एस. टी. स्टॅन्ड बाहेर एखादा बोर्ड लावायचा, किंवा लहान मुलांच्या मासिकाच्या मागील पानांवर व्यंगचित्र सदृश्य जाहिरात केलेली असायची. ‘ड्युक्स अँड सन्स’ने एकूण जाहिरातीचा खर्च अतिशय मर्यादीतच ठेवला होता.

परंतु ‘कोकाकोला’ सारख्या कंपनीला मुंबई आणि महाराष्ट्रात शह दिल्यामुळे स्वतःच्या उत्पादनावर निर्माण झालेला अतीआत्मविश्वास, भविष्यकाळावर दुर्लक्ष, किंवा नवीन पिढीला आपल्याकडे वळविण्यात कमी पडणे, या आणि अन्य कारणांमुळे १९८५ सालापासून ‘ड्युक्स’ला स्पर्धा निर्माण झाली, आणि पुढच्या केवळ १० वर्षातच ‘ड्युक्स अँड सन्स’ कंपनी पेप्सिको’ सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीला विकावी लागली.

त्या अगोदर सुद्धा विविध शीतपेये उत्पादक म्हणजे, कोकाकोला, पार्ले, पेप्सिको यांसारख्या कंपन्यांनी आपली शीतपेये बाजरात आणली होतीच. त्यामध्ये पार्लेचा १९५२ सालचा गोल्डस्पॉट, कोकाकोलाचा १९७६चा माझा, १९७७चा लिम्का आणि १९८० सालचा सिट्रा अशी शीतपेये हळूहळू ‘ड्युक्स’च्या स्पर्धेत उतरत होतीच, परंतु ‘मँगोला, लेमोनेड, रास्पबेरी सोडा’ इत्यादी ‘ड्युक्स’च्या शीतपेयांची चव आणि सुगंध यांच्या जवळपासही ते सर्व नसत. त्यामुळे ‘ड्युक्स’चा खप काही कमी होत नव्हता, उलट ‘ड्युक्स’ची भरभराटच होत होती.

परंतु १९८५ साली ‘पार्ले ऍग्रो’च्या ‘फ्रुटी (Frooti)’ ह्या पेयाने हे चित्र पालटले. आणि ‘ड्युक्स अँड सन्स’ ला घरघर लागली.

पारले ऍग्रो’ने ‘फ्रुटी (Frooti) ‘मँगोला’च्या चवीवर मात करण्याऐवजी मँगोला’च्या रुपावर मात केली.

Parle Frooti
Parle Frooti

पार्लेने आंब्याच्या चवीच्या ‘फ्रुटी’ ला नवीन रूपात सादर केले. भारतातील ‘टेट्रा पॅक’ तंत्रज्ञान वापरून पॅक केलेल्या पहिल्या शीतपेयाचा मान ‘पार्लेच्या ‘फ्रुटी (Frooti)’ला जातो. हिरव्या रंगाचे आणि आंब्याचे मोहक चित्र असलेल्या आकर्षक छोट्या टेट्रा पॅक मधील ‘फ्रुटी’ची लहान मुले आणि तरुणाईला भूल पडली. ‘फ्रुटी’ कधीही कुठेही, अगदी हातात मिरवत सुद्धा नेता यायची. शाळेच्या डब्याबरोबर मुलांच्या बॅगेत टाकून देता येत असे. कॉलेजमधील तरुण, तरुणी बॅगमध्ये ‘फ्रुटी’ ठेवत असत. ‘फ्रुटी’च्या पॅकला एक छोटा स्ट्रॉ चिटकवून दिलेला असायचा, ‘फ्रुटी’च्या पॅकवरील खूण केलेल्या जागी तो स्ट्रॉ दाबला कि सहज आत जात असे. अशा तऱ्हेने स्ट्रॉ दाबून ‘फ्रुटी’ पिणे अधिक स्टायलिश वाटू लागले. आणि त्या जुनाट काचेच्या बाटलीतील ‘मँगोला’ पिणे हे कमीपणाचे वाटू लागले. तसेही ‘मँगोला’ हे तरुणाईचे पेय नव्हते. पण ‘मँगोला’ची तरुणांमध्ये जी काही आवड होती, ती सुद्धा ह्या फ्रुटीने नाहीशी करुन टाकली. ‘मँगोला’च्या तुलनेत ‘फ्रुटी’ची चव अतिशय फिकी होती आणि आजही आहे, परंतु ‘फ्रुटी’च्या इतर गुणांनी ‘मँगोला’च्या चवीवर मात केली.

हळूहळू ‘ड्युक्स अँड सन्स’ला उतरती कळा लागली. आणि अखेरीस वर्ष १९९४ मध्ये अमेरिकेच्या ‘पेप्सिको’ ह्या बहुराष्ट्रीय कंपनीने १०५ वर्षे चालेल्या ‘ड्युक्स अँड सन्स’ ह्या स्वदेशी कंपनीला विकत घेतले. आणि ‘ड्युक्स अँड सन्स’चा अध्याय संपविला.

464174 342744585809020 1345295626 o

१९९४ मध्ये ‘ड्युक्स अँड सन्स’ विकत घेतल्यावर ‘पेप्सिको’ने २००४ पर्यंत ‘मँगोला’ आणि ‘लेमोनेड’ वगळता ‘ड्युक्स’च्या इतर शीतपेयांचे उत्पादन बंद केले, कारण ‘ड्युक्स’ची सर्व पेये फक्त मुंबई आणि महाराष्ट्र येथेच प्रामुख्याने विकली जात असत. आणि ‘पेप्सीको’ला भारतभर चालणारे पेय निर्माण करायचे होते. पेप्सीच्या स्वतःचे ‘स्लाइस (Slice)’ ह्या पेयाची विक्री भारतभर वाढवायची होती. त्यापायी ‘ड्यूकस’च्या काही लोकप्रिय पेयांचा बळी दिला गेला. ‘मँगोला’ची लोकप्रियता पाहून पुढे पेप्सीने त्यांच्या ‘स्लाईस’ ह्या पेयाबरोबर ‘मँगोला’चे विलीनीकरण करून ‘स्लाईस मँगोला’ हे नवीन पेय बाजरात आणले, परंतु ‘मँगोला’ची सर त्याला नाही आली. पुढे सात वर्षांनी पेप्सीने ‘ड्युक्स’ ब्रॅंडने ड्युक्सची जुनी शीतपेये रास्पेबेरी सोडा, आईस्क्रीम सोडा, जिंजरेड ह्यांचे उत्पादन पुन्हा सुरु केले, आणि ही पेये नवीन रूपात बाजारात आणली. त्याचबरोबर ‘मसाला सोडा’ हे नवीन शीतपेय सुद्धा बाजारात आणले. पण ‘मँगोला’ आज ‘स्लाईस मँगोला’ नावाने घ्यावा लागतो.

‘ड्युक्स अँड सन्स’ बंद पडल्यावर मुबईतील ईराणी कॅफे आणि हॉटेलवर त्याचा चांगलाच परिणाम झाला. आजही मुंबईतील काही मोजक्या आणि निवडक ईराणी हॉटेल्समध्ये रास्पबेरी सोडा, लेमोनेड, आईस्क्रीम सोडा, जिंजरेड ही शीतपेये मिळू शकतात, पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. पारशी घरातील फ्रीजमध्ये मात्र ही पेये हमखास सापडतात. पण ह्या पेयांचा खरा आश्रयदाता म्हणजे पारशी समाज आज भारतातून हळूहळू कमी होत चालला आहे. २०१४च्या जनगणने प्रमाणे भारतातील पारशी लोकसंख्या केवळ ६९,००० होती. त्यामुळे ह्या पेयांचे भविष्य काय असेल याची शंका वाटते.

२०१३ साली पेप्सीने ‘ड्युक्स’च्या मुंबईतील चेंबूर येथील प्लॅन्टमधील उत्पादन बंद पूर्णपणे केले, आणि वर्ष २०१७ मध्ये पेप्सीने ती २.५ एकराची जागा वाधवा ग्रुपला १७० कोटींना विकली, आता येथे २२ मजल्याचे तीन टॉवर उभे होत आहेत.

‘ड्युक्स अँड सन्स (Dukes And Sons)’ कंपनीची ‘मँगोला’ पेयाच्या बाटलीची भलीमोठी प्रतिकृती असलेली ‘ड्युक्स’ची फॅक्टरी इतिहास जमा झाली.

Dukes ANd Sons - Chembur Factory
Dukes And Sons – Chembur Factory – in her old heyday

आजही पुणे, मुंबई येथे पालनजी आणि पुण्यात अर्देशीर यांची यांची शीतपेये काही प्रमाणात मिळतात. परंतु आजचा विषय ‘ड्युक्स अँड सन्स’ चा होता. म्हणून इतर शितपेयांचे उल्लेख ओझरते केले आहेत.


संदर्भ:

http://timesofindia.indiatimes.com/articleshow/64982385.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-dukes-iconic-bottle-makes-way-for-three-high-rises/articleshow/64982385.cms


आमचे इतर लेख वाचा:

https://charudattasawant.com/2021/11/03/diwali-celebration-in-mumbai-chawls/

Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Acknowledgements: Writeup by: Charudatta Sawant - 89997 more...

Similar Posts

One Comment

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply