डॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

Dr. Nitu Mandke

#डॉ_नितू_मांडके.. – एक_हृद्य_आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

लेखक: प्रकाश सरवणकर, ९८६९२८०६६०.

मुखपृष्ठावरील डॉ. नितू मांडके यांच्या अर्धपुतळ्याचे शिल्पकार: श्री. शरद कापूसकर, पुणे – श्री. शरद कापूसकर यांची वेबसाईट

८५/८६ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईत आलो. तसं मुक्काम ठोकावा असं घरातलं कुणी नव्हतं. आधीचा भाऊ महालक्ष्मी रेसकोर्सवर राहणाऱ्या मावशीकडे रहायला होता. त्यामुळे अस्मादिक पण तिकडेच तंबू ठोकते झाले. या मावशीचे यजमान रेसकोर्सच्या सिक्युरिटीमध्ये काम करत होते. भिकाजी मणचेकर त्यांचं नाव. रेसकोर्सच्या लतामावशीचं घर म्हणजे त्यांना दिलेली स्टाफ क्वार्टर तशी साधीच होती, पत्र्याच्या भिंती, वर कौलं. पण रेसकोर्सचं वातावरण एकदम बाप.. रेसच्या उंची नस्ल म्हणजेच जातिवंत घोड्यांचे तबेले, त्यांचा थाट, सगळीकडे गर्द झाडं, हिरवळ, जॉगिंग ट्रॅक, त्यावर संध्याकाळी धावायला येणारी उच्चभ्रू माणसे, सगळच सहसा कोणाला न बघता येणारं. पण आम्हाला त्याचं काही विशेष वाटत नसे. खरा त्रास व्हायचा तो पावसाळ्यात. बाहेर कंबरभर पाणी भरायचं आणि घरात.

पण, ८८ च्या दरम्यान आम्ही मावशीकडून ठाण्यात राहायला आलो, मग रेसकोर्सवर जाणं अधून मधून होत राहिलं. ९४ च्या दरम्यान, म्हणजे मला नक्की तारीख वगैरे आता आठवत नाहीय, मावसभाऊ सुरेंद्रचा कॉल आला, “भाऊ, पप्पांना हार्टचा त्रास सुरू झालाय, जरा घरी येऊन जा”.

ऑफिस सुटल्यावर रेसकोर्सवर गेलो. रिपोर्ट्स पाहिले, तीन ठिकाणी ब्लॉकेजेस होते, ते पण ९० टक्क्यांहून जास्त. “भाऊ, काय करूया आता?”.

“हार्ट ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर्सचा सल्ला घेऊया आपण. होईल सगळं नीट.” मी धीर दिला आणि निघालो.

दुसऱ्याच दिवशी काकांना कामावर असतानाच त्रास व्हायला लागला, रेसकोर्स व्यवस्थापनाने त्यांना थेट मुंबई हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यांच्या वॉर्डचे डॉक्टर होते पारीख म्हणून. त्यांनी सांगितले की ऑपरेशन करावे लागेल. मावसभावाने थोडी चौकशी केली होती. मुंबई हॉस्पिटलमध्ये पॅनेलवर डॉ. भट्टाचार्य नावाचे बंगाली हार्ट सर्जन होते, तसेच डॉ. नितू मांडकेही होते. नितू मांडके यांची प्रचंड प्रसिद्धी आणि हवा झालेली होती. नाही, नाही, तेव्हा त्यांनी माननीय शिवसेनाप्रमुखांचे ऑपरेशन नव्हते केलेले, पण श्रीमंत आणि मोठ्या माणसांचा डॉक्टर अशी ख्याती होतीच, पण हातात धन्वंतरी वास करत असल्याची पण प्रसिद्धी होतीच. त्यामुळेच मावसभाऊ त्यांच्या नादाला न लागता, डॉ. भट्टाचार्य यांना भेटला, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझी टीम असते, त्यांना पैसे द्यावे लागतात. साडेतीन लाख रुपये द्यावे लागतील. तेही हॉस्पिटलच्या बाहेर”.

आता यांच्या पैशाहून हॉस्पिटलचं बिल वेगळंच भरायला लागणार होतं. माझ्या गरीब मावशीच्या ते आवाक्यात नव्हतंच, आणि खरं सांगायचं, तर माझीही त्यावेळी इतकी ऐपत नव्हतीच. शेवटी मी आणि सुरेंद्र, माझा मावसभाऊ आम्ही दोघे त्यावेळी मुंबई हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर असलेल्या विश्वविख्यात डॉ. बी. के. गोयल यांना त्यांच्या प्रशस्त केबिनमध्ये वेळ घेऊन भेटलो. त्यांनी काकांची फाईल चाळली.

आमच्याकडे बघून म्हणाले, “कशाला करताय यांचं ऑपरेशन? त्यांचे ब्लॉकेजेस सिव्हियर आहेत, पेशंट ऑपरेशन टेबलवर जाईल. त्यापेक्षा एक करा, डिस्चार्ज घ्या, घरी घेऊन जा, जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं हवं नको ते खायला प्यायला घाला.” आम्ही दोघेही अविश्वासाने एकमेकांकडे बघतच राहिलो.

“मी नोटिंग करतो, त्यांना डिस्चार्ज मिळेल.” डॉ. गोयलनी आम्हाला निरोपाचा नारळ दिला. आम्ही दोघेही बाहेर पडलो, हॉस्पिटलखाली आलो नि जोश्या भेटला.

“अरे सरवनकरा, हय काय करतं रे, नि हय इलस त माका आदी सांगूचा तरी, काय काम व्हता?”. जोशी, आमचा लाईनमन. मी एमटीएनएल मुंबईत कामाला होतो, मुंबई जिमखान्यासमोरच्या सिटी दूरध्वनी केंद्रात पोस्टिंग होती. हा सगळा भाग आमच्या केंद्राच्या अंतर्गत होता हे खरे. पण आपल्या कामासाठी कुठून सोर्स लावावा, हे अजूनही कळत नाही, तेव्हा काय कर्म कळणार होते? त्याकाळी एमटीएनएलच्या लँडलाईन्सचा मेंटेनन्स बघणारे लाईनमन म्हणजे दुकानदार, हॉस्पिटल यांच्यासाठी देवदूत असत. त्यांना हवं ते मिळत असे. मी युनियनचं काम बघत होतो त्यामुळे कुलाब्यापासून ते गिरगांवपर्यंत सगळेच लाईनमन ओळखीचे असत, आणि हा जोश्या तर आपला मालवणी माणूस होता.

“बोल, हयसर काय काम काडलं?”, हातात वाफळणारा चहाचा कप देत जोशी बोलला.

आता आम्ही मुंबई हॉस्पिटलच्या तळघरात असलेल्या आमच्या डेपोत बसलो होतो. मी त्याला सगळी रामकहाणी सांगितली.

“तू पन काय येडा काय रे सरवनकरा, माका सांगायचा ना, कोन डॉ. व्हयो? “.

“डॉ. नितू मांडके मिळतील? आता काही केलं तर तेच करतील असं वाटतंय”.

सुरेंद्र हरखून बोलला, “मिळतील? बगीत ऱ्हवा आता.., पॉल..”, जोश्याने हाक मारली तसा पीबीएक्स, पीएबीएक्स रूममधून एक केरळी तरुण बाहेर आला. तो मुंबई हॉस्पिटलचा टेलिफोन ऑपरेटर पॉल होता. पेजर, मोबाईल भारतात यायचे होते, त्यामुळे लँडलाईन्स, टेलिफोन ऑपरेटर्स, लाईन्समन यांना प्रचंड मान होता. पॉल ला सगळेच डॉक्टर ओळखत होते. त्यांचे कॉल्स मॅनेज करणं, निरोप देणं, कॉल जोडून देणं ही सगळी कामं पॉल इमानेइतबारे करत असे. त्यामुळे पॉलने एखादी गोष्ट सांगितली की कुठलाही डॉक्टर नाही म्हणत नसे. त्यामुळे आमचा जोश्या आणि पॉल हे गोरगरिबांना मदत करत असत.

पॉलला आम्ही सगळी गोष्ट समजावून सांगितली. पॉलने डॉ. नितू मांडकेंकडे आमची केस व्यवस्थित मांडली, त्याचबरोबर त्यांच्या खाजगी कंसलटिंग रूमची अपॉइंटमेंट पण मिळवून दिली. तेव्हाही डॉ. नितू मांडके यांची कंसलटिंग रूम केम्प्स कॉर्नरच्या ‘व्हाइट हाऊस’ या एकदम पॉश बिल्डिंगमध्ये होती. पाय ठेवताच मन प्रसन्न होईल अशी ती जागा होती. तिकडे आपला नंबर लागणे हीच मोठी गोष्ट होती.

आम्हाला रात्री साडे अकराची अपॉइंटमेंट मिळाली होती. चक्रावलात ना? आपली दिवसभरातली सगळी ऑपरेशन्स आटोपून डॉक्टर रात्री इकडे येत असत. त्यानंतर पहाटे तीन चार वाजेपर्यंत त्यांची ही कंसलटिंग रूम जागी असे. डॉक्टर घरी जाऊन झोपत कधी आणि सकाळी परत दहाच्या ऑपरेशन्सना हजर कसे राहत ते, ते आणि देवच जाणे. आमचा नंबर कधी लागतो याकडे माझं लक्ष होतं, कारण घड्याळ मला जाणीव करून देत होतं शेवटची ट्रेन हुकली तर मग, पहिली ट्रेन सुरू होइपर्यंत व्हि.टी. स्टेशनवर, (तेव्हा सीएसटी नव्हतं झालं), मच्छर मारत बसावे लागणार होते. नशीब म्हणजे डॉक्टर वेळेवर आले.

आल्या आल्या त्यांना दिसलं की एक ऑपरेशन झालेला पेशंट व्हीलचेअरवर बसून आलाय. गुज्जू होता तो. त्याला बघून ते इतके खवळले की, “×××, उठ पहिला व्हीलचेरवरून. नाटकं नाय करायची. मी ऑपरेशन केलय तुझं, बिनधास्त फिरायचं, असं घरच्यांना त्रास दिलास तर याद राख..”.

आतापर्यंत घरच्यांना आपली सरबराई करायला लावणारा तो पेशंट, व्हीलचेअर सोडून नीट बसला. हे पाणी काही वेगळच होतं. आमचा नंबर लागला, तसे आम्ही त्यांच्या केबीनमध्ये गेलो. एखाद्या मंदिरात गेल्याचा भास झाला. मंद प्रकाश. साईबाबांच्या मूर्तीवर छान फुले. जुन्या हिंदी सिनेमातली गाणी मंद सुरात केबिन भरून टाकतायत.. माहोल भारीच होता. भारावल्यासारखे आम्ही उभे होतो.

“बसा, काय म्हणता?”. पॉलचं नाव घेतल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. “बघू फाईल? एंजियोची फिल्म दे”. एंजियोग्राफीची फिल्म त्यांनी मशीनला लावली, भरभर बघितली. “हं, वय काय भिकाजी तुझं?”

“५० डॉक्टर”.

“डॉ. गोयल काय बोलले?” आम्ही सांगितलं.

“५० काय मरायचं वय आहे काय? मंगळवारी ऍडमिट हो तिकडेच, गुरुवारी कापून टाकू तुला..”.

“पण डॉक्टर तुमची फी?” मी चाचरत विचारले, “पॉल बोललाय मला, माझी फी परवडणार नाही तुम्हाला. करून टाकू रे ऑपरेशन! बाबा आहेत..”.

साईबाबांच्या पायाशी प्लेटमध्ये ठेवलेली चारपाच चॉकलेट्स उचलून त्यांनी आमच्या हातात ठेवली. एका महान डॉक्टरांच्या माणुसकीच्या दर्शनाने भरून आलेल्या मनाने आम्ही बाहेर पडलो. इतर धनवान पेशंटकडून ते किती घेत होते ते मला माहित नाही, पण एका गरीब माणसाचा जीव वाचवण्यासाठी फुकट ऑपरेशन करण्यास तयार झालेला तो देवदूत होता.

त्याही पेक्षा “पेशंटला मरायला घरी घेऊन जा.” म्हणून सांगणाऱ्या डॉक्टरांपेक्षा, “मी त्याला वाचवतो” हा विश्वास देणारा डॉक्टर खरा डॉक्टर होता.

गुरुवारी त्याच मुंबई हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काकांची बायपास केली. बाहेर येऊन “छान झाली सर्जरी. चार दिवसांनी डिस्चार्ज घेऊन टाका, नंतर एकदा दाखवा” असं स्वतः सांगून ते निघून गेले. डॉ. गोयलांनी सोडून दिलेली केस डॉ. मांडकेनी कशी केली, याबद्दल मुंबई हॉस्पिटलच्या डॉ. मंडळीमध्ये खल सुरू झाला. आम्हाला काही वेगळीच कुणकुण लागली, मग आम्ही घाईघाईत डिस्चार्ज मिळवला नि तिकडून बाहेर पडलो.

डॉ. नितू मांडकेनी एकही पैसा न घेता, पूर्णपणे मोफत ही सर्जरी केली होती, किती मोठं मन. फॉलोअप साठी पुन्हा अपॉइंटमेंट पॉलला भरीस घातलं आणि व्हाइट हाऊसला दाखल झालो. डॉक्टर मांडके गरिबांचा किती विचार करतात हे पुन्हा जाणवले. त्यांनी काकांना तपासलं आणि बोलले, “सगळं ठीक आहे, काळजी करण्याची गरज नाही. आता माझ्याकडे येऊ नका, उगाच माझी कन्सल्टिंग फी (त्याकाळात पण हजार रुपये फी होती) तुम्हाला परवडणार नाही. तुमच्या जवळचा कोणी एम.डी. डॉक्टर बघा, आणि त्यांच्या सल्ल्याने औषधं, गोळ्या घेत चला. आता बाहेर काही देऊ नका, मी सांगतो..”.

पुन्हा हातावर साईबाबांची चॉकलेट्स आली, त्यांनी रिसीवर उचलून रिसेप्शनला पैसे न घेण्याचं बजावलं. डॉ. नितू मांडके या वैद्यकीय क्षेत्रातील महान जादूगाराला मनोमन एक कडक सलाम करत आम्ही बाहेर पडलो.

ऑपरेशन टेबलवर मरणारा पेशंट नंतर पुढे अजून १५ वर्षे जास्त जगला तो केवळ डॉ. नितू मांडके यांच्या स्वतःवरच्या आत्मविश्वासामुळेच.

मा. बाळासाहेबांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया, त्यानंतर मिळालेली अफाट प्रसिद्धी, हॉस्पिटलसाठी मुंबईत मिळालेली जमीन, त्यांचं स्टार हॉस्पिटलचं स्वप्न आणि नंतर सगळं विस्कटून टाकणारी नॅशनल हॉस्पिटलच्या गेटमधून अचानक झालेली एक्झिट.. सगळ्यांच्या हृदयांची काळजी घेणाऱ्या माणसाचं हृदय बंद पडलं आणि आमची हृदये विदीर्ण झाली..

(परवा डॉ. श्रीकांत धारपवार यांनी डॉ. नितू मांडके यांच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या आणि हे सगळं आठवलं..)

डॉ. नितू मांडके Dr. Nitu Mandke – एक हृद्य आठवण…. – लेखाचे सर्वाधिकार: © प्रकाश सरवणकर, ९८६९२८०६६०.


131466930 4126076034106004 3579322851975455801 n
श्री. प्रकाश सरवणकर

मराठी कथा, कविता, चारोळी तसेच मालवणी गजाली, मालवणी कविता लेखन.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून ३० वर्षे नोकरी. जाने. २०२० मध्ये मुदतपूर्व स्वेच्छा निवृत्ती.
दै.तरुण भारत सिंधुदुर्ग आवृत्ती मध्ये वर्षभर ‘मालवणी सकळ..’ सदराचे लेखक.
मराठी कथा, कविता, चारोळी तसेच मालवणी गजाली, मालवणी कविता लेखन चालू असते.
‘गाजलीतली माणसं..’ हे पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर.
मूळ गांव देवगड तालुक्यातील वानिवडे. सध्या ठाणे इथे वास्तव्य.


Digiprove sealCopyright secured by Digiprove © 2021 Charudatta Sawant
Article Written by:: Mr. Prakash Sarvankar

One thought on “डॉ. नितू मांडके – एक हृद्य आठवण…. Remembering Dr. Nitu Mandke

  1. ह्रृदयस्थ हे सौ मान्डके नी लिहीलेल पुस्तक वाचुन डॉक्टर मांडके विषयी मोलाची माहिती कळली आहेच.आता ज्या लोकानी डॉक्टरच देवत्व अनुभवले आह त्या आनौभवाचा संग्रह व्हावा.

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: